डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला…
पडघम - सांस्कृतिक
सुशील सूर्यकांत लाड
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 13 April 2017
  • पडघम सांस्कृतिक १४ एप्रिल 14 April डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar

आदरणीय बाबासाहेब,

जयभीम.

मला कल्पना हाय, कदाचित जयभीम ऐकून तुम्ही दचकला असाल? तुम्ही म्हणाल, ‘अरं, माझंच नाव भीमराव हाय आणि तुम्ही मला उद्देशून पत्र लिहितानापण संबोधन म्हणून ‘जयभीम’ असंच लिहिता व्हय? तुमचं म्हणणं रास्त हाय. पण काय करणार? अलीकडं नुसतं ‘जय’ म्हणायचं फॅड एवढं आलंय, की माझ्या हातूनही सहज लिहिलं गेलं. असो.

बाबा, उद्या, १४ एप्रिलला तुमची जयंती. समता, बंधुता, मानवता, धर्मनिरपेक्षता, अभ्यास, संघर्ष अशा कितीतरी गोष्टींची शिकवण देणाऱ्या माझ्या बापाचा म्हणजेच तुमचा वाढदिवस! आता वाढदिवस म्हटलं की, जल्लोष आलाच! यंदाही पोरांनी काही हयगय केल्याली नाही बघा!

गणपतीला वाजवत्यात ना, तसल्या डॉल्बीच्या भिंतीच उभ्या करायचा निर्धार केलाय पोरांनी! हा… तसं काही ठिकाणी आपल्या पोरांनी ढोल-ताशांची पथकं पण सांगितल्यात. पण डॉल्बीवर नाचल्याशिवाय काय रंगत येत नाय, असं त्या… आपल्या तुमच्याच नावानं स्थापन केलेल्या तरुण मंडळांच्या पोरांचं म्हणणं पडल्यानं २०-२५ हजार रुपये खर्चून चांगला मोठ्ठा डॉल्बीच सांगितलाय. हा पण, त्या डॉल्बीवाल्या पोराला चांगलंच बजावलंय… कायपण झालं, कुणी कितीबी म्हटलं तरी आपली विचारांची आणि चळवळींची गाणीच लावायची!

त्याचं काय झालं, गेल्या वर्षी पोरांनी जास्त डिमांड केली म्हणून एक-दोन चळवळीची गाणी लावून झाल्यावर त्या डॉल्बीवाल्यानं ‘शिंदें’च्याच आवाजातलं तिसरं गाणं लावलं आणि पुढं तासभर पोरं अगदी बेभान झाल्यागत नाचू लागली. तासाभरानं कुणाच्या तरी लक्षात आलं आणि मधूनच अचानक एक म्हातारं डॉल्बीसमोर आलं आणि त्यानं थेट त्या डॉल्बीवाल्याला शिव्याच घालायला सुरुवात केली. त्यो डॉल्बीवाला पोरगा लगेच बोलला, ‘का ओ, असं का वरडालायसा?’

ते म्हणाले, ‘अरं पोरा, कुठली गाणी लावायची याचं तरी जरा भान ठेव की!’

पोरगं म्हटलं, ‘शिंद्यांचीच हायत नव्हं?’

‘अरं व्हय, पण पिक्चरमधली हायत. आंबेडकर जयंतीची नव्हत…’

त्या पोरानं म्हाताऱ्याच्या या उत्तरानंतर खाड्‌कन डॉल्बी बंद केला आणि बेभान होऊन नाचणारी पोरं जागच्या जागी ‘स्टॉप’ झाली.

पोरं जाग्यावरनंच बोंबलायला लागली, ‘काय झालं? लाव की डॉल्बी…’

डॉल्बीवाला म्हणाला, ‘अरं डॉल्बीवर वाजत्याली गाणी आंबेडकर जयंतीची नव्हत.’

पोरं लगेच म्हणाली, ‘मग काय हुतंय त्याला? लाव की कुठली बी! पण डान्स बंद नाय झाला पाहिजे!’

तसं मला त्या म्हाताऱ्याचं पटलं म्हणा. पण आजकालच्या तरुण पोरांच्या पुढं बोलून चालतंय व्हय?

पण काय पण म्हणा, पोरासनी मानलं पाहिजे बघा! कालची अख्खी रात्र या पोरांनी जागून काढली. तुम्हाला वाटंल, तुमच्यासारखं लाईटीच्या प्रकाशात अभ्यासबिभ्यास करत होती की काय? पण तसं नाही. तुमच्या जयंतीनिमित्त पोरांनी मोठमोठ्ठं डिजिटल बॅनर बनवल्यात. एकेका बॅनरवर तुमचा मोठ्ठा फोटो, त्यावर तुमचा एखादा विचार आणि १५-२० पोरांचं बारकं-बारकं फोटो लावून, असलं बॅनर चौकाचौकात पोरांनी उभं केल्यात. रात्रभर जागून सगळ्या गल्लीत आणि गावगावात पोरांनी ‘निळं वादळ’च निर्माण केलंय.

तसं काही ठिकाणी लय काय-काय कार्यक्रम घेतल्यात. कुठं पोरं सलग १२ तास वाचन करणार हायत. कुठं तुमच्या विचारांचा जागर करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार हायत... व्याख्यानं होणार हायत. पण असल्या किरकोळ कार्यक्रमांपेक्षा जयंतीच्या दिवशीची मिरवणूक बाकी झक्कासच होणार हाय बघा.

कसं हाय, आजच्या काळात खरं तर तुमचा विचार समाजात पोचवण्याची लय गरज हाय. पण ते पुस्तक वाचन, विचार जागर, व्याख्यान असल्या कार्यक्रमाला आता गर्दी होत नाही हो! मग आता एवढा खर्च करायचा आणि माणसं मात्र हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच! म्हणूनच हे जरा डॉल्बी-मिरवणुकीचं नियोजन केलंय. कसं असतंय, नाचायला मिळतंय म्हटल्यावर आजकालची पोरं कार्यक्रमाला यायला तयार होत्यात. आता यातनं विचारबिचार काही जात नाही, हे आम्हालाबी माहिती हाय, पण वर्षाला मिरवणुकीमुळे तुमची जयंती बाकी जंगी होती बघा.

खरं तर, आजची तरुण पोरं मोठ्या संख्येनं जमतील असा मिरवणुकीशिवायचा दुसरा काय पर्याय मिळाला तर लय बरं होईल. तुम्हाला काय पर्याय सुचला तर आमच्या डोक्यात तेवढा प्रकाश पाडा. महाराष्ट्रातच नव्हं तर अख्या देशात तुमची जयंती साजरी व्हती. देशात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती तुमच्याकडं असंलच! तेव्हा अस्से कोण्ते कार्यक्रम देता येतील; ज्यानं आजकालची तरुण पोरं मोठ्या संख्येनं जमतील आणि तुमच्या विचारांना खऱ्या अर्थानं जागर करतील, ते जरा आम्हाला सांगा…

निदान पुढच्या वर्षापासून तरी नुसतंच ‘जय’ म्हणून धागडधिंगा करण्यापेक्षा  काहीतरी विधायक कार्यक्रम करण्याची संधी या पोरांना मिळेल.

बाबा, जयंतीनिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!

 

लेखक प्रसारमाध्यम व जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत.

sushillad1@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......