टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर आणि सुनीता कौशिक
  • Tue , 11 April 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या चंद्रकांत पाटील Chandrakant Patil प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar सुनीता कौशिक Sunita Kaushik

१. महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारला बळ दे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारला जे करावे लागेल त्यासाठी बळ दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्राचा कुलस्वामी  श्री जोतिबाला घातले.

हे सगळे भंपक लोक्स राजीनामे देऊन राज्याचा सगळा कारभार श्री जोतिबाकडे, अंबाबाईकडे, तुळजाभवानीकडे आणि श्री विठुराया आणि श्री खंडेरायांकडे का सोपवत नाहीत? पाऊस पाडणं समजा या सगळ्यांच्या हातात आहे. पण, बाकीचं सगळं करायला तुम्हाला नेमलंय ना? तुम्हाला बळही हेच सगळे देणार असतील, तर तिकडे दिल्लीतले आणि नागपुरातले वरिष्ठ मिळून काय कंचे खेळणार की पतंग उडवणार?

.....................................................................................

२. दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी महापालिका निवडणुकीतील ज्या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला- सुनीता कौशिकला- तिकीट दिलं होतं, ती उमेदवार कोट्यधीश असून तिच्याकडे ९० लाख रुपयांचे फक्त सोन्याचे दागिनेच असल्याचे तिने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. या महिलेच्या उमेदवारीला आपने आक्षेप घेतला आहे.

यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? भाजपच्या साथीने झोपडीवासियांचा सुद्धा किती वेगाने विकास होतो, हेच या महिलेने स्वत:च्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. यापुढे ज्याला ज्याला आयुष्यात पुढे जायची इच्छा असेल, त्या प्रत्येकाने भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. निव्वळ उमेदवारीने एवढी बरकत, तर निवडून आल्यावर काय होईल!!!

.....................................................................................

३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गोवंश हत्याबंदीच्या विधानामुळे काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अलिप्ततेची भावना वाढण्याची शक्यता असून यामुळे भविष्यात देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

जाऊंद्या ना बाळासाहेब! तुम्ही तर सगळा खेळच उचकटून सांगून टाकता. भाकड जनावरांची किंमत कमी होऊन एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे मांस-व्यवसायावर पोटपाणी असलेला असंघटित मुसलमान असे दोन्ही घटक देशोधडीला लावण्याचीच ही कल्पना आहे. बेकायदा कत्तलखान्यांवरच्या कारवाईआडून बडे हिंदू-जैन मांसनिर्यातदार कसे अलगद सुरक्षित राखले गेले आहेत, ते पाहा ना. तुम्ही भाजपचे मतदार नसाल, भाजपच्या धोरणांचा विरोध कराल, तर तुमच्यासाठी या देशात जिवंत राहणंही अवघड असेल, असा हा इशारा आहे.

.....................................................................................

४. भाजपशासित झारखंडमध्ये महिन्याभरात जवळपास ५३ कुटुंबांची घरवापसी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झारखंडमधील अरकीमध्ये ‘ख्रिश्चन मुक्त’ ब्लॉक तयार करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत अनेकांचे धर्मांतर केले जात आहे. हिंदू धर्मात परत आलेली सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतीमधील आहेत. ख्रिस्ती मिशनरींनी मागील १० वर्षांपासून या भागात वर्चस्व प्रस्थापित करून अनेकांचं धर्मांतर केल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. ‘संघाच्या कृतीला धर्मांतर म्हणता येणार नाही. आम्ही फक्त आमच्या बंधू-भगिनींना त्यांच्या धर्मात परत आणत आहोत,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयोजक लक्ष्मण सिंह मुंडा यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं.

हे सगळे लोक आदिवासी होते की हिंदू? आदिवासी असतील तर हिंदू धर्मात प्रवेश ही ‘घरवापसी’ कशी? त्यांना धर्मात घेतलं ते ठीक आहे, पण, कोणत्या जातीत घेतलं, ते का सांगितलेलं नाही? बाटवले गेलेले सगळे परत येताना चॉइसनुसार ब्राह्मण किंवा क्षत्रिय होऊ शकतात की, शूद्र जातींमध्येच राहतात. तसं होत असेल तर हेही दबावाखाली केलेलं बळजबरीचं धर्मांतरच आहे.

.....................................................................................

५. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ( रालोआ) सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत रालोआतील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर केला. भाजपच्या वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसेनेनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

स्वाभाविक आहे. यांची मर्दुमकी फक्त सर्वसामान्य जनतेतल्या नोकरदारावर हात उचलण्यातून दिसते आणि स्वत:ला मावळे वगैरे संबोधून जाहीर समारंभांमध्ये भेंडी चिरायच्याही योग्यतेच्या नसलेल्या तलवारी उपसण्यातून. मुळात महाराष्ट्रातली जनता बेजार आहे. नंतर शेपूट घालणार ही काळ्या दगडावरची रेघ असताना आधी भयंकर गर्जना करून पोट दुखेपर्यंत हसवू तरी नका लोकांना.

.....................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......