टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • साध्वी प्राची, मंदा म्हात्रे, मोहन भागवत आणि आर. एस. सोदी
  • Wed , 05 April 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या साध्वी प्राची Sadhvi Prachi मंदा म्हात्रे Manda Mhatre मोहन भागवत Mohan Bhagwat योगी आदित्यनाथ Yogi Adityanath आर. एस. सोदी R.S. Sodhi

१. आदित्यनाथ हे मुख्यमंत्री बनल्यामुळे उत्तर प्रदेश ‘दुसरा पाकिस्तान’ होण्यापासून बचावला असल्याचे वक्तव्य तथाकथित साध्वी प्राची यांनी केले आहे. आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे घोषित केल्यानंतर साध्वी प्राची यांनी हा ‘हिंदूंचा विजय’ असल्याचे म्हटले होते. योगी आदित्यनाथ यांनी आता राज्यात दारूबंदी लागू केली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी खरं तर राज्यात अफू, भांग आणि गांजाबंदीही करायला हवी. पण, ती आहेत लोकप्रिय, बहुसंख्याक धार्मिक व्यसनं. त्यामुळे त्यांच्यावर बंदी येणं सध्याच्या काळात अशक्यप्रायच दिसतंय. त्यामुळे, अशा प्रकारच्या चाराणेछाप वक्तव्यांची सवय केलेली बरी!

......................................................................................

२. भारताला फक्त महाशक्तीच नव्हे तर विश्वगुरू बनवायचे आहे असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भारत हा असा एकमेव देश आहे जिथं माणसाची सेवा करण्याचे धडे पूर्वीपासूनच दिले जातात, असंही ते म्हणाले. जगात सगळेच आनंदात राहतील असं मानवी आयुष्य आपण तयार केलं पाहिजे. आता भारताचा भाग्योदय होत असून जगातील पीडित माणसांची आपल्याला सेवा करायची आहे, असंही ते म्हणाले. समाजातील भेदभावामुळे माणसाच्या आयुष्यात दुर्बलतेचा प्रवेश झाला. पण आता भारतात बदल होत आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

टाळ्या टाळ्या टाळ्या!!! गुरूला कशात काही गती असण्याचं बंधन आपल्याकडे परंपरेनेच नसल्यामुळे आपण आपल्या मनातल्या मनात विश्वगुरूही बनू शकतोच की! अनेक लोक आपल्या नावापुढे पंडित, योगी, साध्वी इतकंच काय, शंकराचार्यसुद्धा चिकटवून घेतात स्वत:चं स्वत:च, तसं आपण आपल्या नावामागे विश्वगुरू चिकटवून टाकायचं. नाहीतरी जगात बाकीचे सगळे रानटी लोक होते आणि माणुसकी, संस्कृती काय ती आपल्यालाच माहिती होती, असा एक गोड भ्रम आहेच आपला. म्हणूनच मिशनरी जिथं जिथं गेले, तिथं तिथं जाऊन वनवासींचं ‘कल्याण’ करण्याची बुद्धी आपल्याला होत गेलीच की.

......................................................................................

३. नारायण राणेनंतर आता नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. गणेश नाईक भाजपमध्ये आल्यास मी त्यांचं आरती ओवाळून स्वागत करेन, असं वक्तव्य भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि विद्यमान काँग्रेस नेते नारायण राणे हेदेखील भाजपचे कमळ हातात धरणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘गणेश नाईक आणि त्यांचं कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास मला कोणताही आक्षेप नाही. मीच गणेश नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेलं होतं. मात्र, त्यांनी माझ्याशी दगाफटका केला. परंतु, आता नाईक व त्यांचे कुटुंबिय भाजपमध्ये येऊ इच्छित असतील तर माझा कोणताही आक्षेप नाही,’ असं मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबईत गणेश नाईक यांची निर्विवाद सत्ता आहे.

मंदाताई, नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्यासारखे मोहरे गळाला लागणार असतील, तर भाजपच्या आरतीओवाळू पथकामध्ये तुम्हाला फारच मागे उभं राहावं लागेल. बाकी नाईक आलेच भाजपमध्ये, तर कदाचित तुमच्यावर पुन्हा एकदा अडगळीतून घड्याळ शोधून त्याला चावी देण्याची वेळ येऊ शकते. मग आरती वगैरे लांबच राहिलं.

......................................................................................

४. भगव्या वस्त्रांमुळे आपल्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. राज्यात सुखसमृद्धी आणून राज्यातील सर्व घटकांची मनं जिंकून घेऊ, असं वचनही आदित्यनाथ यांनी दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर साप्ताहिकाला आदित्यनाथ यांनी ही मुलाखत दिली.

मुळात राज्यातल्या सर्व घटकांचा उल्लेख असलेली मुलाखत आदित्यनाथांनी दिली याचबरोबर ती ‘ऑर्गनायझर’ने छापली, हे फारच कौतुकास्पद आहे. सध्याच्या त्यांच्या कारभारावरून तसं वाटत नसलं तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना वेळ द्यायला हवा. बाकी भगव्याची बदनामी इतर कोणी नाही, भगवी वस्त्रं धारण करणाऱ्यांनीच केली आहे, हे आदित्यनाथांना माहिती नाही, याचं आश्चर्य वाटतं.

......................................................................................

५. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या अंतरात असणारी दारूची दुकानं बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर दारूविक्रेत्यांची जी कोंडी झाली आहे, तिच्यातून मुक्तता करण्याचा अभिनव मार्ग सहकारी दुग्धव्यवसायातील अग्री ‘अमुल’ने सुचवला आहे. अमुलचे व्यवस्थापकीय संस्थापक आर. एस. सोदी यांनी १६,००० बारमालक आणि दारूविक्रेत्यांसमोर मिल्क बार सुरू करण्याची कल्पना ठेवली आहे.

चांगली कल्पना आहे. किंबहुना तिथे अमुलने गोठेच बांधावेत आणि कोल्हापुरातल्या दूधकट्ट्यांप्रमाणे जागेवर ताजं दूध काढून देण्याची व्यवस्था करावी. आता पाठोपाठ तामसी वृत्तीला आणि त्यातून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्गावरचे चिकन-मटण देणारे धाबे, हॉटेलंही बंद करून सगळीकडे जिलेबी-फाफडा आणि शुद्ध शाकाहारी थाळीचाही प्रबंध करायला हरकत नाही... अंबानी, अडाणी इकडे लक्ष देतील काय?

......................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......