मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे!
पडघम - देशकारण
सुहास कुलकर्णी
  • ज्योतिरादित्य सिंधिया
  • Sat , 26 August 2023
  • पडघम देशकारण ज्योतिरादित्य सिंधिया Jyotiraditya Scindia भाजप BJP काँग्रेस Congress

गेल्या दशकभरात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचं भलं झालं. कुणी मुख्यमंत्री बनलं, कुणी मंत्री बनलं. कुणाला भाजपच्या संघटनेत उपाध्यक्षांसारखी बिनमहत्त्वाची का असेना, पण पदं मिळाली. कुणाला सत्तेच्या जवळ राहायला मिळालं.

म्हटलं तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार पाडून पक्षांतर केल्यामुळे केंद्रीय मंत्रिपद मिळालं, पण त्यांना जेवढं मिळालं, त्याहून त्यांनी जास्त गमावलं.

मध्य प्रदेशातील; विशेषत: ग्वाल्हेर-चंबळ भागातील पत्रकार आणि राजकीय निरीक्षकांच्या मते ज्योतिरादित्य यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कुणी तर म्हणत आहे की, त्यांनी कुऱ्हाडीवर पाय मारून घेतला आहे. त्यांनी भाजपमध्ये जाऊन आयुष्यातली सर्वांत मोठी चूक केली आहे. पक्षांतर केल्यामुळे ते केंद्रात हवाई वाहतूक मंत्री बनले खरे, पण राजकीय कारकिर्दीचा विचार करता त्यांनी स्वत:चं नुकसानच अधिक करून घेतलं आहे.

काँग्रेस पक्ष मोदींना टक्कर देऊ शकत नाही आणि त्यामुळे दीर्घकाळ विरोधक म्हणूनच राजकारण करावं लागेल, असं मानून ज्योतिरादित्य भाजपमध्ये गेले. अगदी राहुल गांधींच्या नावाने बोटं मोडून गेले. पण नंतर राहुल यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली आणि परिस्थिती बदलू लागली. गेल्या वर्षांत हिमाचल आणि कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली. छत्तीसगड-राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्याच्या टप्प्यात आली. खुद्द मध्य प्रदेशात सत्ता मिळवण्याची शक्यता तयार झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल यांच्याबद्दलचे ज्योतिरादित्य यांचे अंदाज गंडले आहेत आणि त्यांची कुचंबणा होऊन बसली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव हे काँग्रेसमधील जुने आणि ज्येष्ठ नेते होते. राजीव-सोनिया गांधी यांच्या जवळचे होते. त्यांना मध्य प्रदेशात आणि देशातही मान होता. त्यांचं अकाली निधन झालं म्हणून.. अन्यथा ते देशाचे पंतप्रधानही होऊ शकले असते. ते गेल्यानंतर त्यांचा वारसा ज्योतिरादित्य यांच्याकडे आला. वयाच्या तिसाव्या वर्षी ते खासदार बनले आणि ३६व्या वर्षी केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री. तेव्हापासून २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होईपर्यंत ते सत्तेतच होते.

ज्योतिरादित्य काहीही म्हणोत त्यांना देण्यात काँग्रेसने काही कमी केलं नाही. वेळोवेळी त्यांना महत्त्वाची मंत्रिपदं दिली. मध्य प्रदेशाच्या राजकारणात पहिल्या तीन नेत्यांमध्ये ते सदैव राहिले. महाराष्ट्राच्या उमेदवार निवड समितीचं अध्यक्षपद त्यांना दिलं गेलं होतं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रियंका गांधीच्या समकक्ष जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. सोनिया-राहुल-प्रियंका यांच्याकडे त्यांना थेट प्रवेश होता. भेटीची वेळ न ठरवता ते या नेत्यांकडे जाऊ शकत, असं सांगितलं जातं. सिंधिया घराण्यासोबत जुने आणि घनिष्ठ संबंध असल्यामुळे सोनिया गांधींनी ज्योतिरादित्य यांना मुलाप्रमाणे वागवलं, असंही म्हटलं जातं. मध्य प्रदेशमध्ये कोणतीही निवडणूक असो, ज्योतिरादित्य यांच्याकडून आलेल्या नावांना सोनियांनी कधीही नाकारलं नाही. अगदी प्रदेश स्तरावरील नेत्यांचा विरोध असला, तरी निकाल ज्योतिरादित्य यांच्याच बाजूनं लागत असे.

काँग्रेस पक्षात त्यांना एवढं महत्त्व मिळत असूनही त्यांनी पक्षांतर केलं. काँग्रेसमध्ये सिंधियांचा उल्लेख नेहमीच ‘महाराज’ असा केला जात असे. ग्वाल्हेर घराण्याचे ते वारसदार असल्यामुळे त्यांना हा मान मिळत असे. दिग्विजय सिंह यांच्यासारखा माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेताही सिंधियांसमोर वाकून नमस्कार करताना अनेकांनी पाहिला आहे. ज्योतिरादित्य त्यांच्या मुलाच्या वयाचे असूनही दिग्विजय सिंह किंवा त्यांच्यासारखे नेते त्यांचा उल्लेख ‘महाराज’ असाच करत आणि करतात. भाजपमध्ये तशी परिस्थिती नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मध्य प्रदेशात पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भाजप यांचा प्रभाव आधीपासून आहे. काँग्रेसशिवायची सरकारं देशात जिथे सर्वप्रथम आली, त्यात मध्य प्रदेशचा समावेश आहे. इथे या पक्षाचे नेते गेली तीसेक वर्ष दिग्विजय सिंह-कमलनाथ-सिंधिया यांच्या विरोधात लढत आले आहेत. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा पक्षांतर करून आलेल्या सिंधियांना विरोधच आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री शिवराज चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, प्रभात झा, कैलाश विजयवर्गीय, नरोत्तम मिश्रा, असे अनेक तगडे नेते आहेत. या कुणालाच सिंधिया नको आहेत. त्यामुळे पक्षात सिंधियांना मोदी-शहांशिवाय कुणाचा आधार नाही. परिणामी सिंधिया राज्याच्या राजकारणात एकाकी पडले आहेत. शिवाय राज्यातील अनेक नेत्यांपैकी एक (आणि नकोसे) नेते बनले आहेत. काँग्रेसमध्ये ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या ज्योतिरादित्य यांना हे सर्व नक्कीच मानवणारं नसणार.

ज्योतिरादित्य यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचे २२ आमदार फोडून आणल्यामुळे त्यांना मोदी-शहांनी केंद्रात मंत्रिपद दिलं आणि त्यांच्या समर्थक आमदारांना राज्यात मंत्रिपदं वगैरे दिली, पण ही मेहरबानी कायमस्वरूपी टिकेल अशातली गोष्ट नाही. काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य हे ‘नॅचरल’ नेते होते. भाजपमध्ये ते ‘आयात’ नेते आहेत. त्यांचा वरकरणी मान राखला जातो, पण मोदी-शहांना भेटायचं असेल, तर त्यांना भेटीची वेळ मिळवावी लागते, तिष्ठत थांबावं लागतं. ज्योतिरादित्य यांच्या मर्जीने भाजपमध्ये काही घडत नाही.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी परवा भाजपतर्फे ३९ उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यात सिंधियांच्या समर्थक आमदाराचं तिकिट कापलं गेलं आहे. इतरांनाही सुखासुखी तिकिटं मिळतील, असं नाही. त्यामुळेच सिंधियांचे अगदी जवळचे मानले जाणारे काही नेते काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत. आणखीही अनेक जाण्याच्या तयारीत आहेत. ही हालचाल प्रामुख्याने चंबळ खोऱ्यात घडते आहे. पूर्वी या भागाचे सर्वाधिकार सिंधिया यांच्याकडे होते. पण भाजपमध्ये नरेंद्रसिंह तोमर, नरोत्तम मिश्रा वगैरे नेते याच भागातले आहेत. तोमर यांच्याकडे निव्वळ चंबळ नव्हे, तर अख्ख्या राज्याच्या तिकिट वाटपाची सूत्रं दिली गेली आहेत. सिंधियांचं महत्त्व किती राहिलं आहे, हे त्यावरून कळावं.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

मोदी-शहा यांची ‘जादू’ हिमाचल प्रदेशात चालली नाही, कर्नाटकात चालली नाही; ती मध्य प्रदेशात तरी चालेल का?

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात, समान नागरी कायदा आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल!

समान नागरी संहितेचे स्वप्न साकार करायचे असेल, तर मोदी सरकारला ‘हिंदूराष्ट्रा’चे स्वप्न सोडून द्यावे लागेल...

..................................................................................................................................................................

एक इंटरेस्टिंग निरीक्षण म्हणजे, मध्य प्रदेश भाजपमध्ये ज्योतिरादित्य यांना सगळे ओळखतात, पण ज्योतिरादित्य फारच कमी लोकांना ओळखतात. जिल्ह्याजिल्ह्यांतील स्थानिक नेते-कार्यकर्ते तर त्यांच्या ओळखविश्वाच्या चिक्कार बाहेरचे आहेत. त्यामुळे भाजपच्या केडरला ज्योतिरादित्य यांच्याबद्दल ममत्व वाटण्याचं काही कारण नाही.

गेल्या निवडणुकीत सिंधियांना उल्लेखून ‘माफ करो महाराज, हमारा नेता शिवराज’ अशी घोषणा देणाऱ्या भाजपच्या केडरने आता अचानक त्यांना नेता मानावं, हे काही खरं नाही. ज्या ज्योतिरादित्य यांना आधी काँग्रेसने सर्व मानमरातब दिले आणि नंतर मोदी-शहा यांनीही सन्मान दिला, त्यांना भाजपचे स्थानिक नेते-कार्यकर्ते मीडियासमोर नामर्द, भिकारी, मूर्ख, बिभीषण वगैरे अपमानास्पद भाषेत संबोधतात, यातच सर्व काही आलं.

ज्योतिरादित्य यांच्या पक्षांतरामुळे राज्यात भाजपचं सरकार आलं खरं, पण सिंधिया आपली ताकद पुढे टिकवू शकले नाहीत. काँग्रेसमधून आणलेले २२ पैकी ८ आमदार पोटनिवडणुकीत हरले. हे सर्व ग्वाल्हेर-चंबळ भागातलेच होते. शिवाय ज्या ग्वाल्हेरवर भाजपचं मागच्या ४० वर्षांपासून राज्य होतं, ते सिंधियांच्या पक्षप्रवेशानंतर गमावलं गेलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा अपमानास्पद पराभव झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ग्वाल्हेर महानगरपालिकेत ४७ पैकी फक्त १५ जागा भाजप मिळवू शकला. थेट महापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपचा उमेदवार तब्बल २८ हजार मतांनी पराभूत झाला. त्या आधी नरेंद्रसिंह तोमर यांच्या मोरेना जिल्ह्यातही असंच काही घडलं होतं. सिंधिया पक्षात आल्यानंतर तोमर-सिंधिया यांची जुंपली आणि त्या सत्तासंघर्षात भाजपचं नुकसान झालं. या घडामोडीमुळेही भाजपचं केडर अस्वस्थ झालं आहे. राज्यभर भाजपची कामगिरी चांगली राहिली, मात्र याच दोन जिल्ह्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सिंधियांपायी पक्षाला तोटा झाला, असं मानलं जात आहे.

काँग्रेसमध्ये असताना सिंधियांचा राज्यभर प्रभाव वगैरे नसला, तरी त्यांची चांगली ओळख होती. ते तिथे टिकले असते तर योग्य वेळी मुख्यमंत्रीही बनले असते. पण आता भाजपमध्येच नव्हे, तर स्वत:च्या चंबळ प्रांतातही ते अनेकांपैकी पैकी एक आणि पराभूत नेते बनून राहिले आहेत. २०१९च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याने पराभव केला होता. त्याने आता सिंधियांविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे सिंधिया आपला मतदारसंघ सोडून इंदूरहून निवडणूक लढवण्याच्या मागे आहेत, अशा बातम्या आहेत. पराभूत होऊनही काँग्रेसकडून त्यांना हवं ते तिकिट मिळालं असतं, पण भाजपमध्ये तशी परिस्थिती उरलेली नाही.

मध्य प्रदेशच्या निवडणुकीची सर्व सूत्रं अमित शहा यांनी हातात घेतली आहेत. ते सतत भोपाळला येत आहेत. पण ते येतात, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य प्रमुख नेत्यांना भेटतात नि परततात. सिंधिया यांना ना बोलावलं जातं, ना विचारलं जातं. सिंधिया-समर्थक मंत्र्यांची कामगिरी खराब असल्याचीही चर्चा पक्षात उघडपणे केली जाते. या मंत्री किंवा आमदारांपैकी किती जण निवडून येतील, या बाबतही पक्षात शंका व्यक्त केली जाते. सिंधिया हे ‘महाराज’ आहेत, म्हणून त्यांना किती डोक्यावर बसवायचं, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना मुख्य निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवलं जात आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

मोदी-शहा यांची ‘जादू’ हिमाचल प्रदेशात चालली नाही, कर्नाटकात चालली नाही; ती मध्य प्रदेशात तरी चालेल का?

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात, समान नागरी कायदा आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल!

समान नागरी संहितेचे स्वप्न साकार करायचे असेल, तर मोदी सरकारला ‘हिंदूराष्ट्रा’चे स्वप्न सोडून द्यावे लागेल...

..................................................................................................................................................................

या उपेक्षेला कंटाळून ज्योतिरादित्य हे भाजप सोडून स्वत:चा प्रादेशिक पक्ष काढण्याच्या विचारात असल्याच्या अर्ध्या कच्च्या बातम्या ऐकू येत होत्या. पण स्वत:चा पक्ष काढायचा, तर रात्रंदिवस मेहनत करायला हवी, पक्षसंघटना उभी करायला हवी, कार्यकर्ते बांधायला हवेत, लोकांमध्ये जायला हवं. पण एवढं सारं करण्याचा महाराजांचा ना पिंड आहे, ना घास. त्यामुळेच कदाचित मोदींच्या भरवश्यावर राहून पक्षातला कोंडमारा सहन करण्याचा निर्णय ज्योतिरादित्य यांनी घेतला असावा.

ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडण्याला आणि भाजपमध्ये टिकून राहण्याला एक कारण आहे, असं मध्य प्रदेशातील काही पत्रकार आणि विरोधक सांगत आहेत. ग्वाल्हेर राजघराण्याच्या शेकडो एकर जमिनी सरकारी फायलींमध्ये अडकून पडल्या होत्या. पक्षांतराच्या बदल्यात शिवराज सरकारने त्या मोकळ्या करून दिल्या, असं म्हटलं जातं. या जमिनींची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे काही हजार कोटींची आहे असं म्हणतात. या आरोपात तथ्य किती हे माहीत नाही. काँग्रेसतर्फे येत्या निवडणुकीत या मुद्द्यावरून आरोपाच्या फैरी उडाल्या की, खरं-खोटं काय ते कळेलच. पण हे खरं की, इतर नेत्यांवर जसे आरोप होतात, तसे सिंधिया यांच्यावरही होऊ लागले आहेत. थोडक्यात, त्यांचं ‘महाराज’पण गळून ते आता सामान्य नेते बनले आहेत.

या सगळ्या घडामोडी पाहिल्या की, राजकारणात फासे कसे उलटेसुलटे पडतात आणि त्यातून कशी गोची, कोंडी होते हे कळतं. मागच्याला ठेच लागली, तरी पुढचा शहाणा होतो असं नाही. ज्योतिरादित्य सिंधिया हे त्याचं ताजं उदाहरण आहे.

.................................................................................................................................................................

लेखक सुहास कुलकर्णी ‘अनुभव’ मासिकाचे आणि ‘समकालीन प्रकाशना’चे मुख्य संपादक आहेत.

samakaleensuhas@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा