संमेलनाध्यक्ष आनंद यादवांचे भाषण, लिहिलेले पण न केलेले (उत्तरार्ध)
पडघम - साहित्यिक
आनंद यादव
  • आनंद यादव आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Wed , 29 March 2017
  • पडघम साहित्यिक आनंद यादव साहित्य संमेलन महाबळेश्वर

२००९ साली ८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वरला २०, २१ आणि २२ मार्च रोजी अध्यक्षाशिवाय पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथा-कादंबरीकार आनंद यादव यांची निवड झाली होती. पण दुर्दैवाने यादवांना या संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा तुकोबा चरणी वाहावा लागला. तेव्हापासून हे भाषण अप्रकाशितच राहिले. ते यादवांची मुलगी, कीर्ती मुळीक आणि मसाप, पुणे यांच्या सहकार्याने आठ वर्षांनी उपलब्ध होत आहे. त्याचा हा उत्तरार्ध.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१०) १९६० नंतर मात्र नव्या ग्रामीण पिढीचे तरुण लेखक हळूहळू साहित्य निर्मिती करू लागले. त्यात आनंद यादव, रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे, उद्धव शेळके, महादेव मोरे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. हे लेखक स्वत: ग्रामीण जीवनातील कष्टकरी कुटुंबातील होते. त्यांचे सगळे घरदार स्वत: शेतावर किंवा घरीदारी काबाडकष्ट करणारे होते. त्यांनी तेथील दारिद्रयाचा, उपासमारीचा, काबाडकष्टाचा, उपेक्षेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता. त्यामुळे त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतून सर्वसामान्यांच्या ग्रामीण जीवनाचे खडतर कष्ट आणि अनुभव व्यक्त होत होते आणि तसे ते व्यक्त होणेही स्वाभाविक होते.

या पिढीतील साहित्यिकांनी ग्रामीण कथा, कविता, कादंबरी, समीक्षा इत्यादी विविध क्षेत्रांत लेखन करून ग्रामीण साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढे साहित्य चळवळीमुळे ग्रामीण विभागांत अनेक छोटी-मोठी संमेलने भरू लागली. शिवाय शिबिरे, चर्चासत्रे घेऊन ग्रामीण समाजातील तरुण पिढीवर विविध अंगांनी साहित्यविषयक संस्कार केले. जागोजागी विविध संस्था स्थापन केल्या आणि त्यांनी नंतरच्या काळात ग्रामीण साहित्य प्रवाहाला स्थैर्य प्राप्त करून दिले. आज घडीलाही हे साहित्य भरघोस प्रमाणात निर्माण होताना दिसते.

११) १९७०च्या आसपास दलित साहित्याची चळवळ सुरू झाली आणि मराठी साहित्याला एक नवे परिमाण मिळाले. जनवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, आदिवासी साहित्य इत्यादी विविध सामाजिक घटकातील साहित्य निर्माण होऊ लागले. त्यांची लहानमोठी नियतकालिके, अनियतकालिके निर्माण होऊ लागली. मात्र ग्रामीण आणि दलित साहित्याला जे सातत्य होते ते सातत्य इतर साहित्य प्रवाहांना अनेक कारणांनी नंतरच्या काळात राहू शकले नाही. याचा अर्थ असा नव्हे, की ते साहित्यच निर्माण होऊ शकत नाही. ते निर्माण होते, पण त्यांची लक्षवेधी धारा जाणवत नाही. त्याचीही अनेक कारणे आहेत, एवढेच इथे तूर्त नोंदवावेसे वाटते. ग्रामीण विभागात निरनिराळ्या ठिकाणी छोटी-छोटी अनेक साहित्यसंमेलने भरत असतात. ही स्वागतार्ह घटना आहे. त्यामुळे त्या त्या परिसरातील साहित्यिकांना त्यात सहभागी होता येते. ते आपल्या पिढीसाठी विचार मांडू शकतात. त्यांच्या साहित्याचा परिचय तेथील तरुण पिढीला होतो. त्या परिसरातीलच सामाजिक, सांस्कृतिक स्थितिगतीशी त्यांचा संबंध असल्याने त्यांना ते आपले वाटते. त्या साहित्याची आणि समाजस्थितीची अनेक अंगेउपांगे प्रकाशात येतात आणि त्यामुळे इतर साहित्यिकांना ती अधिक परिचित होतात. त्यांना पुन्हा त्यातून साहित्याच्या निर्मितीची अधिकाधिक प्रेरणा मिळते.

१९८० पूर्वी एकूणच मराठी साहित्यक्षेत्रात निर्माण होणार्‍या नागरी (शहरी) साहित्याची विविध अंगोपांगांनी मीमांसा करणारी अनेक नियतकालिके निघत. ती तर बंद झालीच; पण तशी नियतकालिके विखुरलेल्या खेड्यापाड्यातील समाजात निर्माण होणे शक्य नव्हते. कारण एकतर आर्थिकदृष्ट्या ग्रामीण समाज दुबळा असतो. शिवाय तो शहरांसारखा एका जागी नसतो. त्यामुळे छोट्या छोट्या संमेलनातूनच एकत्र येऊन साहित्याविषयीची विविध अंगी चर्चा होणे शक्य व आवश्यक असते. अशी चर्चा होणे, नितांत गरजेचे आहे. याचे भान या छोट्या छोट्या संमेलनांनी जाणीवपूर्वक ठेवले पाहिजे आणि जपले पाहिजे. कारण अलीकडे या संमेलनांना जत्रेचे स्वरूप येते आहे की काय, अशी भीती मला वाटते. त्यात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम आणि जल्लोष होतानाच विशेष प्रमाणात जाणवते. त्यामुळे एकतर वाङ्मयीन संस्कृतीची नीटपणे जोपासना होत नाही; किंवा ती उथळ स्वरूप धारण करताना दिसते.

१२) पूर्वी ग्रामीण समाजात तुरळक साहित्य होते; पण अलीकडे त्यांची पिढी तयार झालेली दिसते. ती स्वागतार्ह घटना आहे. या पिढीने विचारपूर्वक आणि गांभीर्याने साहित्याची उपासना आणि जोपासना तसेच निर्मिती आणि समीक्षा गंभीरपणे, अभ्यासपूर्वक करण्याची गरज आहे. केवळ हौसे-मौजेने कोणतीही कलानिर्मिती होऊ शकत नाही. ती एक व्रतभावनेने केलेली उपासना असते, हे तरुण ग्रामीण साहित्यिकांनी जाणीवपूर्वक मनात रुजविण्याची आणि तिचे पोषण करण्याची गरज आहे.

वास्तविक नियतकालिकांची, विविध ग्रंथप्रकाशनाची त्यासाठी नितांत गरज असते. पण आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या ग्रामीण विभागात आज तरी ते शक्य नाही, असे दिसते. म्हणून छोटी-छोटी संमेलनेच त्याची माध्यमे मानून, त्यातून वाङ्मयीन चर्चा, चिकित्सा होण्याची आवश्यकता आहे. ही संमेलनेच तूर्त तरी वाङ्मयीन चर्चेची, चिकित्सेची आणि त्यांच्या प्रसाराची साधने मानली पाहिजेत.

(अ) याबाबतीत शहरी विभागांतील ग्रंथप्रकाशकांनी या ग्रामीण विभागातील वाङ्मयीन संक्रमणाच्या अवस्थेत आपली भूमिका ओळखून त्यांना खूप काही करता येईल, असे वाटते. विशेषत: ग्रामीण तरुण साहित्यिकांचे ‘साहित्य’ संस्करण करून छापले आणि प्रसिद्ध केले तर त्यांना नवशिक्षित ग्रामीण तरुणवर्ग ग्राहक म्हणून उपलब्ध होऊ शकेल. शहरात आज मराठी ललित साहित्याचा वाचकवर्ग कमी-कमी होत चालला आहे. कारण तो प्रामुख्याने इंग्रजी भाषेत शिक्षण घेऊन जागतिक पातळीवर नोकर्‍या करू लागला आहे. म्हणून तेथील प्रकाशकांनी आणि ग्रंथविक्रेत्यांनीही ग्रामीण विभागातील या नव्या ग्राहकवर्गाकडे वळावे. तेथील साहित्यप्रेमींना ग्रंथालये स्थापन करण्यास मदत केली आणि ती त्यांनी स्थापन केली तर त्यांना कायमचा नवा वाचकवर्ग मिळू शकेल; तसेच तेथील संस्कृतीलाही नवे परिमाण मिळू शकेल, असे मला वाटते.

(ब) नव्या पिढीच्या ग्रामीण साहित्यिकांनीही केवळ हातात पडेल तेच आणि तेवढेच साहित्य वाचण्यापेक्षा आपल्या वाचनाला ‘वाचन संस्कृती’चे स्वरूप प्राप्त करून दिले पाहिजे. साहित्यिकाची वाचनसंस्कृती म्हणजे नुसते इतरांचे साहित्य वाचून काढणे नव्हे. आपणास जर चांगला साहित्यिक व्हायचे असेल तर त्याने समाज नीटपणे समजून घेण्यासाठी ‘ग्रामीण समाजशास्त्र’ वाचावे, त्याचप्रमाणे सामाजिक मानसशास्त्र, व्यक्तीचे मानसशास्त्र, भारतीय संस्कृती, मूळ मानवधर्म, देशीविदेशी भाषांतील उत्कृष्ट साहित्य इत्यादी नीटपणे वाचले पाहिजे. ते वाचले तरच आपल्या हातून चांगली साहित्यनिर्मिती होऊ शकते. पर्यायाने ग्रामीण समाजाला साहित्यसंस्कृतीचे नवे परिमाण लाभू शकेल.

(क) ही संस्कृती निर्माण करण्यासाठी नव्या, तरुण ग्रामीण साहित्यिकांचा जसा हातभार लागेल; तसाच ग्रामीण समाजातील शिक्षकांचाही हातभार लागू शकेल असे मला वाटते. शहारातील शिक्षकांपेक्षा ग्रामीण विभागातील शिक्षकांवर वेगळी आणि फार मोठी नैतिक आणि सांस्कृतिक जबाबदारी येऊन पडते. प्राथमिक शाळांपासून ते महाविद्यालयांतील सर्वच अध्यापक-प्राध्यापकांना मी शिक्षकच मानतो. ग्रामीण भागातील बहुजन समाज हा शेतकरी, कष्टकरी, कामकरी आणि प्रामु‘याने निरक्षर असतो. त्याची अनेक प्रकारची कामे ही शारीरिक श्रमाशी जोडलेली असतात. अशा अडाणी कुटुंबातील मुलांना शिकवण्याची आणि घडवण्याची जबाबदारी शिक्षकाचीच असते. त्या दृष्टीने ग्रामीण विभागातील शिक्षक हा नव्या पिढीचा पालक आणि पिता दोन्ही असतो. कारण तो सर्वार्थाने नव्या पिढीला घडवत असतो. माणुसकीचे मूलभूत संस्कार तो नव्या पिढीवर करत असतो. नीतीचे धडे देत असतो. जीवनातील उदात्त मूल्यांविषयी तरुण पिढीत श्रद्धा निर्माण करण्याचे त्याचेच कार्य असते. त्यामुळे नव्या पिढीला नुसते शिकवण्याचे नव्हे; तर घडवण्याचेही काम त्याला करावे लागते. त्यासाठी चांगली चांगली पुस्तके शाळेच्या ग्रंथालयातून मिळवून ती वाचण्याची शिफारस तो करत असतो... त्यामुळेच खर्‍या अर्थाने नवी पिढी घडत असते. उदाहरणार्थ, मी शेतमजुराचा मुलगा होतो. घरात शिक्षणाचा कुणालाही गंध नाही. योगायोगानं मला लहानपणी शाळेत घालण्यात आलं. त्या वेळी शिक्षकांनी माझ्यातील सुप्त गुण ओळखून मला अनेक पुस्तके वाचायला दिली. त्याविषयी माझ्यावर अनेक संस्कार केले. ते इतके मला नवे आणि आवडणारे होते की, मलाही शिक्षण पूर्ण करून आपणही शिक्षकच व्हावे, असे वाटले आणि मी शिक्षक आणि साहित्यिक झालो... शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच मला साहित्याचे आणि साहित्यनिर्मितीचे धडे मिळाले. आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण विभागातील नवी पिढी साहित्यिक होते आहे, होऊ पाहात आहे. हे ओळखूनच ग्रामीण शिक्षकांनी त्यांना आरंभापासूनच जाणीवपूर्वक घडवण्याचा प्रयत्न केला तर ग्रामीण समाजाला उत्कृष्ट साहित्याचे नवे परिमाण लाभेल. ग्रामीण विभागातील महाविद्यालयीन पातळीवर मराठी भाषेच्या प्राध्यापकांवर आणखी एक सांस्कृतिक कार्याची जबाबदारी येऊन पडते. आज सर्वत्रच दूरदर्शनचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. अभ्यास सोडून विद्यार्थिवर्ग दूरदर्शनसमोर सतत बसलेला दिसून येतो. त्यामुळे त्याचे अभ्यासाच्या वाचनाकडे तर दुर्लक्ष होतेच आहे; पण पूर्वी निवांत वेळी ललित साहित्याचे जे वाचन केले जात होते, तेही बंद पडल्याचे जाणवते. एवढेच नव्हे; तर आज सर्वत्रच तरुण पिढीची वाचन-संस्कृती संपुष्टात आलेली दिसते; किंवा भराभर वाचन करून ती त्यातून चटकन मोकळी होतात.

अभ्यास करताना किंवा ललित साहित्य वाचताना त्यांना वाचन-संस्कृतीचा गंधही नसतो. त्यांचे वाचन त्यांच्या मनाला भिडू शकत नाही. त्यामुळे ‘वाचन संस्कृती’ म्हणजे काय, ते त्यांना समजून देण्याची गरज निर्माण होते.

(ड) विशेषत: ललित साहित्याचे वाचन हे वर्तमानपत्राच्या वाचनासारखे वरवरचे करता येत नाही. त्यासाठी ‘वाचन-संस्कृती’ हा शब्दप्रयोग त्या संदर्भात समजून घेतला पाहिजे. कारण ललित साहित्यात वाच्यार्थाइतकाच त्याचा लक्ष्यार्थ आणि ध्वन्यार्थही समजून घ्यावा लागतो. तो समजून घेण्यासाठी विशिष्ट वाक्याच्या मागेपुढे असलेल्या दुसर्‍या वाक्यांचे संदर्भ आणि बारकावे ध्यानात ठेवावे लागतात. तरच मधल्या वाक्यातील सूचक अर्थ कळू शकतो. ललित साहित्यातील विविध प्रकारच्या अर्थाबरोबर ही वाक्ये भावना, संवेदनाही सूचित करत असतात. त्यासाठी उपमादी अलंकारांची नाजूक शब्दांत योजना करत असतात. अलंकारांमुळे वेगळ्या कल्पनेच्या सुंदर विश्वात नेतात. त्यामुळे वाचक चकित होतो, शहारून जातो, भारावतो, वासनेपेक्षा निखळ भावनांच्या विश्वात रमतो, वाचताना भोवताल आणि त्याचे वास्तव विसरतो, पात्रांच्या विविध भावना, राग, लोभ, प्रेम, लळा, जिव्हाळा यांच्या आविष्कारामुळे स्वत:ही त्या स्वतंत्र विश्वात रमून जातो. त्यातील विविध पात्रे म्हणजे माणसे यांच्याशी एकरूप होतो. त्यामुळे माणसांचे विविध नमुने त्याला जाणवू लागतात. म्हणून त्याच विश्वात तो रमून जातो. सारांश ललित साहित्याच्या वाचनामुळे माणसाचा विवेक, विचार, चिंतन, भावनाशीलता, संवेदनशीलता, मानवी मनाचे विविध अंगांनी आकलन त्याला होते आणि एकूणच वाचकाचे मानवी जीवन सर्वांगानी समृद्ध होत जाते. तो जीवनाच्या उदात्त, समृद्ध पातळीवर जगू लागतो. त्यातून मिळणारा सात्त्विक आनंद मनमुरादपणे मिळवू लागतो... हे सर्व ललित साहित्याच्या मन:पूर्वक केलेल्या आणि अनुभवलेल्या वाचन संस्कृतीचेच संस्कार असतात. म्हणूनच माणसाने आपली वाचनसंस्कृती जोपासली पाहिजे, वाढविली पाहिजे. तरच त्याला जीवनातील अत्युच्च पातळीवरचा सात्त्विक आनंद अनुभवता येतो. हे ओळखून महाविद्यालयातील मराठी भाषेच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर मराठी वाचन संस्कृतीचे संस्कार करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य पालटून जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरुण ग्रामीण साहित्यिकांनी किंबहुना सर्वच तरुण साहित्यिकांनीही आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती अशी की ललित साहित्य ही एक महत्त्वाची जीवनदर्शी कला आहे. तिचे माध्यम भाषा हेच असल्याने ती त्या त्या भाषिक समाजाशी तात्काळ जोडली जाते. सगळा भाषिक समाजच तिचा रसिक-वाचक बनतो. त्यामुळे साहित्यकला ही इतर कोणत्याही कलेपेक्षा अधिक प्रमाणात समाजमनाशी अधिक निगडित असावी लागते. तिच्यातील सामाजिक आशय व्यापक, मार्मिक आणि मनोवेधक असाच असावा लागतो. पण तो तेवढाच ठेवून भागत नाही; म्हणजे असे की, साहित्याने फक्त व्यापक समाजदर्शन घडवून भागत नाही; तर ते समाजदर्शन सौंदर्यपूर्णतेने, कलात्मकतेने घडवणे अपरिहार्य असते. कारण कोणतीही कला ही आविष्कारासाठी सुंदरतेचा अंगभूत स्वीकार केल्याशिवाय आकारालाच येऊ शकत नाही. म्हणून नव ग्रामीण साहित्यिकांनी सौंदर्यशास्त्राचाही किंवा कलास्वरूप शास्त्राचाही अभ्यास करण्याची आणि त्याचा आपल्या साहित्यकृतीतून आविष्कार करण्याची नितांत गरज असते. तरच साहित्याची कलाकृती आकाराला येते. तसे झाले नाही तर ते लेखन केवळ हकिकत सांगणारे, वर्तमानपत्री रिपोर्टासारखे वाटेल. म्हणून तरुण ग्रामीण साहित्यिकांनी साहित्यकलेची उपासना अभ्यासपूर्वक करण्याची गरज आहे. खरे तर जातिवंत साहित्यिक एवढ्यावरच थांबत नाही. जन्मभर तो साधक अवस्थेतच असतो. प्रौढ वयात तो ‘तत्त्वज्ञ साहित्यिक’ (फिलॉसॉफर रायटर) बनण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी मानवी जीवनाशी संबंधित देशोदेशीची महत्त्वाची तत्त्वज्ञाने अभ्यासत राहतो. महान तत्त्वज्ञ साहित्यिकाच्या महान साहित्यकृती अभ्यासतो.

जागतिक पातळीवर आपले साहित्य कसे जाईल याचा त्याला ध्यास लागलेला असतो. त्या योग्यतेचे साहित्य निर्माण करून ते जागतिक पातळीवरील इंग्रजी भाषेत स्वत:च अनुवादित करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे प्रयत्न सखोल अभ्यासपूर्वक इतर ग्रंथ वाचल्यावरच चाललेले असतात, हे लक्षात ठेवावे. मराठीतील उत्कृष्ट साहित्याची इंग्रजीतील भाषांतरे जागतिक पातळीवर जाण्यासाठी केवळ साहित्यिकांनीच नव्हेत तर मोठमोठ्या विचारवंतांनी, साहित्यप्रेमींनी, प्रकाशकांनी, अनुवादकांनी त्यासाठी खास प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय मराठी साहित्याला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकणार नाही, म्हणून भाषांतराचे कार्य जाणीवपूर्वक चालू ठेवले पाहिजे, असे मला वाटते. असो.

ग्रामीण तरुण पिढीचे आजचे ग्रामीण साहित्य हे ग्रामीण समाजवास्तवाच्या चित्रणाच्या दृष्टीने समृद्ध असले तरी त्यातील जे समाजचित्रण आहे ते सामाजिकदृष्ट्या विदारक स्वरूपाचे आहे. माझ्यासारख्या सुशिक्षित, संवेदनशील नागरिकाला त्यातील समाजवास्तव अस्वस्थ करणारे आहे. आजच्या ग्रामीण समाजातील सर्वसामान्य माणूस म्हणजे बारा बलुतेदार, शेतमजूर, सामान्य कष्टकरी वर्ग, दलित, आदिवासी, भटके, इतर मागासवर्गीय यांचे शोषण या समाजात चमत्कारिकपणाने चालले आहे. म्हणजे असे की, परंपरागत चालत असलेले यांचे धंदे सुधारणांच्या नावाखाली बुडाले आहेत. त्यामुळे हा सर्वसामान्यांचा ग्रामीण समाज, शहरी उद्योजक, कारखानदार, निरनिराळ्या शेतीसंबंधित वस्तूंची शहरात निर्मिती करून विक्री करणारे व्यापारी यांच्याकडून श्रमाच्या माध्यमातून लुबाडला आणि पिळला जातो आहे. शेती सुधारणेच्या नावाखाली शहरी उद्योजकांनी तयार केलेली यांत्रिक अवजारे शेतीवर आली, पाणी उपसणारी इंजिने आली, विजेवर चालणारे पंप आले, डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर आले, गुळापेक्षा साखरनिर्मितीकडे म्हणजे साखर कारखान्यांकडे कारखानदार उद्योजकांकडे ऊस चालला, देशी खतापेक्षा कारखान्यात तयार होणारी रासायनिक खते आली, देशी पायताण-चपलांपेक्षा बाटा-टाटाच्या चपला, बूट वापरण्याची फॅशन आली. या सर्वांमुळे ग्रामीण विभागातील परंपरागत धंदे बुडाले आणि शेतीसंबंधित परंपरागत साधने कालबाह्य ठरली. त्यामुळे ग्रामीण समाजातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर, कष्टकरी आणि सर्व बारा बलुतेदार वर्ग बेकार आणि कंगाल झाला... ग्रामीण समाजाचे शोषण सुरू झाले. शेतकरी आत्महत्या करू लागले. अशी भयाण स्थिती ग्रामीण समाजात निर्माण झाली. पश्‍चिम महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचा काहीसा अपवाद सोडला तर उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात हीच समाजस्थिती निर्माण झालेली दिसते. आपला भारत प्रामुख्याने कृषिसंस्कृतिप्रधान देश आहे. अशा या भारतात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. याचा व्यापक अर्थ असा होतो, की कमीअधिक प्रमाणात सर्वच राज्यात अशीच सामाजिक स्थिती असण्याची दाट शक्यता आहे.

ग्रामीण समाजाची महाराष्ट्रातील अशी स्थिती असली तरी आणि ग्रामीण समाजातील तरुण साहित्यिक त्याचे पोटतिडकीने समाजदर्शन आपल्या साहित्यातून घडवत असले तरी महाराष्ट्राच्या शहरी विभागातील विचारवंत व्यक्ती, वाचकवर्ग आणि समाजसुधारक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. कारण शहरातील समाजसुधारकांनाही यांचा बिलकूल पत्ता नाही. सगळे शहरी विचारवंत, वाचकवर्ग आपल्या केवळ शहरी समाजसुधारणा, बातम्या, त्यांचे विवेचन आणि वाचन करण्यातच पूर्णपणे गुंतलेले दिसतात. शहरातील प्रकाशक आणि ग्रंथालयेही शहरी  साहित्यापुरतीच जागृत असतात. ग्रामीण समाजाची ही भीषण शोकांतिका आहे. चरितार्थासाठी नाइलाजाने शहरात राहणारा एक ग्रामीण साहित्यिक या नात्याने मला असे वाटते की, सर्व शहरी महाराष्ट्राच्या पोटापाण्याची अखंडपणे तरतूद करणार्‍या, त्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या या ग्रामीण समाजाकडे निदान आता तरी लक्ष द्यावे आणि या दारुण अवस्थेतील ग्रामीण समाजाला आता तरी सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी त्याच्या गतानुगतिक, पारंपरिक जीवनसरणीतून त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करावा. शहरातील विविध समाजसुधारणावादी संस्थांनी, शासकीय सुधारणांनी, स्वयंसेवी संस्थांनी, सुधारकांनी, विचारवंत मंडळींनी इकडे मनापासून वळावे आणि आपला वेळ आणि धन या ग्रामीण समाजासाठी द्यावे आणि त्याचे मूलगामी परिवर्तन घडवून आणावे. ते हे कार्य मनापासून अनेक वर्षे, दीर्घ काळ करीत राहिले तर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर काळातील ही एक युगप्रवर्तक क्रांती ठरू शकेल आणि समग‘ मराठी जीवनाचे सार्थक होऊन त्याला एक नवी कळा आणि कांती प्राप्त होईल... देववाद, अंधश्रद्धा, गतानुगतिक वृत्ती यांतून ग्रामीण समाज पूर्ण मुक्त होईल आणि मराठी समाज सर्वार्थांनी समपातळीवर येईल आणि एकमेकांशी समरस आणि एकरूप होईल आणि भारतासमोर एक नवा मूलगामी आदर्श निर्माण होईल. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचे मूलभूत स्वप्न खर्‍या अर्थाने परिपूर्ण होईल. ‘खेड्याकडे चला’ म्हणणार्‍या राष्ट्रपिता गांधींच्या मनाला खरीखुरी शांतता मिळू शकेल. एवढेच नव्हे; तर आपली समाजवादाची स्वप्ने खर्‍या अर्थांनी प्रत्यक्षात उतरलेली दिसतील.

(समाप्त)

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......