राज्यातल्या नेत्यांना दुय्यम भूमिका देऊन आपण कर्नाटकात सत्ता राखू शकणार नाही, याची भाजपची जाहीर कबुली...
पडघम - देशकारण
व्यंकटेश केसरी
  • कर्नाटकचा नकाशा आणि येडियुरप्पा, डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या व बसवराज बोम्मई
  • Wed , 19 April 2023
  • पडघम देशकारण कर्नाटक बी.एस. येडियुरप्पा B. S. Yediyurappa डी. के. शिवकुमार D. K. Shivakumar सिद्धरामय्या Siddaramaiah बसवराज बोम्मई Basavaraj Bommai

कर्नाटक विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका केवळ धार्मिक ध्रुवीकरण, जातीय समीकरण आणि गेल्या पाच वर्षांतली सरकारची कामगिरी, यांवरच लढवल्या जाणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आपण लोकसभा-विधानसभा जिंकतो, महानगरपालिकाही जिंकतो, असा दावा करणाऱ्या भाजपची मदार आता वयोवृद्ध पण बेरकी राजकारणी बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर आहे. त्यांना खूष ठेवूनच आपण सत्ता राखू शकू, हे लक्षात आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येडियुरप्पांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. राज्यातल्या नेत्यांना दुय्यम भूमिका देऊन आपण कर्नाटकात सत्ता राखू शकणार नाही, याची ही एक प्रकारे जाहीर कबुलीच आहे.

कर्नाटकाचा ‘गुजरात’ (‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’) करण्याचे प्रयत्न २०१४पासून जोमाने सुरू झाले. ‘टिपू सुलतान विरुद्ध वीर सावरकर’, ‘हिजाब विरुद्ध भगवा’ अशा खेळी खेळल्या गेल्या. धार्मिक ध्रुवीकरणाने जातीय समीकरणे बदलतील, अशी अटकळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला होती. पण त्यामुळे निवडणुका जिंकता येतील, असा विश्वास त्यांना अजूनही येत नाही. कारण कर्नाटक हे विकसित, सुसंस्कृत, सुशिक्षितांचे राज्य आहे. तेथील समाजावर साहित्यिक, कलावंतांचा पगडा असल्याने लोकांची डोकी भडकावणे सोपे नाही, हे जाणून भाजप दुसरे कार्ड खेळू शकते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडांचा जनता दल (एस) हा भाजप व काँग्रेसचा समान शत्रू झाला आहे. या दोन्ही पक्षांनी राज्यात यापूर्वी जनता दल (एस) पक्षाबरोबर सत्ता भोगली आहे. आता जनता दलाची वाढ खुंटली आहे. हा पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्याच्यावर देवेगौडा कुटुंबाचा कब्जा आहे. त्याला वोक्कलिंग जातीचा मिळणारा आधार तोडला, तर त्याचे उपद्रवमूल्य कमी होईल. म्हणून भाजप, काँग्रेस यांनी ‘हल्ला बोल’ तीव्र केला आहे. या लढाईत हे दोन्ही पक्ष यशस्वी झाले नाहीत, तर कर्नाटकात आघाडीचे सरकार तरी येईल किंवा तोडाफोड्या होतील. वोक्कालिगांची संख्या १० ते ११ टक्के आहे. याचे विभाजन कसे होणार व त्याचा लाभ कोणाला मिळणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री कोण हे गुलदस्त्यात

एकेकाळी ‘अजगर’ (अहिर, जाट, गुज्जर, राजपूत), ‘खाम’ (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुसलमान) व ‘अहिन्द’ (अल्पसंख्याक, मागासजाती, दलित) ही समीकरणे अनुक्रमे उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी कामी येत. कर्नाटकात देवराज अर्स व सिद्धरामय्या यांनी याचा आधार घेत लिंगायत, वोक्कलिंग या जातींचा सत्तेवरील कब्जा तोडला होता. आगामी निवडणुकीत मागास जातींच्या मतविभागणीवर भाजप, काँग्रेस, जनता दल (एस) यांचा भर राहील, असे दिसते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

भाजप, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. कारण दोन्ही पक्ष अंतर्गत गटबाजीने पोखरले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची मांड अजूनही पक्की बसलेली नाही, तर काँग्रेसमध्ये डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकचे भूमिपुत्र असून त्यांनी आपले पत्ते अजून खेळलेले नाहीत. राहुल गांधी सिद्धरामय्यांच्या प्रेमात आहेत. डी. के. शिवकुमार यांच्या हाती संघटना आहे. ते वोक्कलिंग आहेत आणि भाजपचे मुख्य टार्गेटही तेच आहेत.

इकडे भाजपमध्ये येडियुरप्पा यांनी त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र याला आपला राजकीय वारस म्हणून घोषित केले आहे. मात्र, खरा खेळ तिकीट वाटपात दिसेल. याचे कारण येडियुरप्पा यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांची विश्वासू व केंद्रीय मंत्री शोभा करंदळजे यांना भाजपने निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख केले आहे. लिंगायत (१४ ते १६ टक्के), वोक्कलिंग (१० ते ११ टक्के) यांची मते डोळ्यासमोर ठेवून भाजप निवडणुकीची आखणी करताना दिसत आहे. त्यात मागास जाती व दलितांची काही मते मिळवण्यावर भर दिला जाईल.

कर्नाटकातील निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे निष्कर्ष भाजपच्या विरोधात जाणारे आहेत. हा पक्ष हरणार असल्याचा दावा डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. राहुल गांधी-प्रियांका गांधी यांचा अतिरिक्त हस्तक्षेप, उत्साह यामुळे काँग्रेसने पंजाबमध्ये दणकून मार खाल्ला. कर्नाटकातही रणजित सुरजेवाला, जयराम रमेश यांच्यासारखे ‘निष्ठावान’ आहेत. पण खर्गे यांच्यासमोर त्यांची डाळ शिजणार नाही. कर्नाटकात मुस्लीम-ख्रिश्चन (जवळपास १५ टक्के) एकजात भाजपच्या विरोधात जाणार. त्याशिवाय एस. सी. (१७.१४ टक्के), एस. टी. (७ टक्के) या मागास जाती लिंगायत, वोक्कलिंग यांचे वर्चस्व किती मानतील हा प्रश्न आहे. मंडल व अयोध्या आंदोलनाने ध्रुवीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. भाजपचे अनेक मुखवटे, काँग्रेसची घराणेशाही, प्रादेशिक पक्षांची एकाधिकारशाही, यामुळे या राज्यातला मतदार गोंधळला आहे, हे मागील निवडणुकीत दिसून आले. मतदारात संभ्रम निर्माण करण्याची खेळी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकी खेळत असतात. कारण ते त्यांना सोयीचे असते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तिरंगी लढती अटळ

भाजपने येडियुरप्पा यांना नाराज केल्याने त्यांनी २०१३ साली भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘कर्नाटक जनता पक्ष’ स्थापन केला. भाजपला निवडणुकीत त्याची जबर किंमत मोजावी लागली. लिंगायत मतदार भाजपपासून तुटला. मात्र, येडियुरप्पा पुन्हा भाजपत आल्याने लिंगायत समाज पुन्हा भाजपशी जोडला गेला. आता भाजपला लिंगायत समाजाला न दुखवता वोक्कलिंग, आदिवासी, मागासजाती यांना जोडायचे आहे. हे ‘सोशल इंजिनियरिंग’, मायक्रो मॅनेजमेंट वगैरे एवढे सोपे नाही. त्यात सत्तेचे हितसंबंध आहेत. भाजपला मुसलमानांना बाहेर ठेवून बाकीच्यांशी स्वतःला जोडायचे आहे, पण तसा चेहरा या पक्षापाशी नाही.

सिद्धरामय्या यांनी ते मुख्यमंत्री असताना भाजपची लिंगायत व्होट बँक तोडण्याचा प्रयत्न केला. वीरशैवांना उर्वरित लिंगायतांपेक्षा विशेष दर्जा दिला. प्रांत रचनेच्या पूर्वी कर्नाटकचा काही भाग मुंबई, हैदराबाद राज्यांचा भाग होता, तेथे लिंगायत समाजाचे प्राबल्य मानले जाते. भाजप तिथे जोर लावणार, हे स्पष्ट आहे. वोक्कालिगांची मते जनता दल (एस), काँग्रेस व भाजपत विभागली जाणार. सिद्धरामय्यांचे ‘सोशल इंजिनियरिंग’ उमेदवारांची निवड कशी होईल, यावर अवलंबून असणार आहे.

एकंदर या राज्यात या वेळी त्रिकोणी लढती अटळ दिसतात. पण बहुरंगीय लढतीत मतांचे विभाजन सोयीस्करपणे केले जाते. कर्नाटकातील मतदान जातींच्या आधारे झाले, तर भाजपला विशेष फायदा नाही. कारण काँग्रेस, जनता दल (एस) या पक्षांचे जातीय आधार कमकुवत झालेले नाहीत. धार्मिक ध्रुवीकरणाचा जेवढा राजकीय लाभ भाजपने गुजरात, उत्तर प्रदेशात उठवला, तेवढा त्याला दक्षिणेतल्या या विकसित राज्यात उठवता येईल काय, याचे उत्तर कदाचित या विधानसभेच्या निवडणुकीत मिळेल.

येडियुरप्पा यांनी या निवडणुकीत भाजप १४०पेक्षा अधिक जागा जिंकेल, असे जाहीर केले आहे. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली जाईल, पण मुख्यमंत्री नंतर ठरेल. जे नाराज आहेत, ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी खुशाल जावे (काही फरक पडणार नाही), असे त्यांनी सांगितले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

पूर्वोत्तर राज्यात सत्ता मिळाली म्हणून भाजपचे केंद्रीय नेतृत्व कर्नाटकात गाफील नाही. कारण इथे सत्तेच्या चाव्या स्थानिक नेत्यांच्या हाती आहेत. याशिवाय लिंगायत, ब्राह्मण आणि इतर जातींची मठे, जैन मंदिरे यांचासुद्धा राजकारणावर प्रभाव आहे. राज्यातील एकूण ५०० धार्मिक संस्थानांत येडियुरप्पा प्रभावी मानले जातात. भाजपची मदार त्यांच्यावर आहे, तर काँग्रेस मुस्लीम, ख्रिश्चन, दलित व मागासवर्गीय जाती यांच्या पाठिंब्यावर विसंबून आहे. आता मागास जातींचे एकगठ्ठा मतदान होताना दिसत नाही. कारण सर्वच राजकीय पक्ष त्यांना सत्तेत वाटा देतात. त्यांना तो द्यावा लागतो.

सिद्धरामय्या मागच्या वेळी मुख्यमंत्री असताना दोन जागेवरून लढले आणि त्यांच्या हुकुमी जागेवर जनता दलाने त्यांना पराभूत केले. जातीय समीकरणाचे कार्ड काँग्रेस एका मर्यादेच्या बाहेर खेळू शकत नाही. कारण त्यामुळे इतर जाती (लिंगायत, वोक्कलिंग, ब्राह्मण व उच्चवर्णीय) एकत्र येतात. दक्षिणेत भाजपचे हिंदुत्व बेगडी मानले जाते. परंतु या पक्षाच्या मुस्लीम विरोधी भूमिकेला कर्नाटकमध्ये काही प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतो.

भाजपचा धोका गैर-भाजप पक्षांना समजला आहे, पण नीट उमजला नाही, असे दिसते. या राज्यातील २२४ जागांचे मतदान व त्याच्या निकालांचे परिणाम शेजारच्या तेलंगणा विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीवर होतील. काँग्रेसने भाजपला रोखले, तर तिला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुका सोप्या जातील. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा राजकीय दृश्य परिणाम आता दिसेल.

दक्षिणेत कर्नाटकातच तेवढा जनता परिवार शिल्लक आहे. एके काळी काँग्रेसच्या विरोधात पर्याय म्हणून हा पक्ष उभा राहिला होता. त्यांच्याकडे एस. निजलिंगप्पा, वीरेंद्र पाटील, रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई, जे. एच. पटेल, एच. डी. देवेगौडा असे तालेवार नेते होते. लिंगायत, वोक्कालिग, मागासवर्गीय, शेतकरी, मुस्लीम समाज जनता परिवारापाशी होता. आता फक्त देवेगौडा यांचाच परिवार शिल्लक दिसतो. या परिवारातील कुमारस्वामी, रेवण्णा, सुरज, प्रजावल, अनिता हे सदस्य राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेत आहेत. कर्नाटकात ही ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणून ओळखली जाते. जनता दलाला मत दिले, तर भाजपचा फायदा होतो. कारण जनता दल स्वतःच्या ताकदीवर भाजपचा पराभव करण्याच्या अवस्थेत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एकंदर कर्नाटक विधानसभेच्या या वेळच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची चिन्हे असून, भाजपसाठी सत्ता कायम राखणे आव्हानात्मक आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. पं. मोदींचे दौरे सुरू झाले आहेत. त्याचा मतपेटीद्वारे भाजपला किती लाभ होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रादेशिक पक्षांवर वक्रदृष्टी

‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा दिल्यानंतर पं. नरेंद्र मोदी यांची भाजप व तिचे केंद्रातले सरकार प्रादेशिक पक्षांच्या मागे लागले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना तोडल्यानंतर दिल्लीत ते आम आदमी पक्षाच्या मागे लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन हे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. भाजपचे मुख्य टार्गेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते जेलमध्ये जातील काय, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. प्रादेशिक पक्षांचे नेते एकजात भ्रष्ट आहेत, त्यांना सरकार चालवता येत नाही, असा संदेश प्रचाराच्या माध्यमातून दिला जात आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता, लालू प्रसाद यादव यांचे अख्खे खानदान यांची चौकशी चालू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सुपातून केव्हाही जात्यात जाऊ शकतात. खलिस्तान, अतिरेकी या मुद्यावरून पंजाबमध्ये आपचे सरकार किती काळ टिकणार, यावर अटकळबाजी चालू आहे. या तुलनेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्राचे जगन मोहन रेड्डी सुखी आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारला 'जंगल राज' म्हणणारे भाजपचे नेते मोदी सरकारला, योगी सरकारला ‘राम राज्य’ का म्हणत नाहीत, हे एक कोडेच आहे...

त्रिपुरा, मेघालय, नागालँड या पूर्वोत्तर राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर भाजप सत्तेत आली, तरी तिच्या जागा घटल्या आहेत. मतांचे प्रमाणही कमी झाले आहे. प्रादेशिक पक्षांशी निवडणूकपूर्व व निवडणुकीनंतर केलेल्या युतीनंतर भाजपला सत्ताप्राप्ती झाली. अर्थात, तिथे प्रादेशिक पक्ष मैदानात आहेत, तर काँग्रेस मैदानाबाहेर जात आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या एप्रिल २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

लेखक व्यंकटेश केसरी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.

venkateshkesari73@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा