रोहीनकुमार : “जीएम बियाणांची भलामण करताना, ज्यांची पोटे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर अवलंबून आहेत, त्यांचा आपण खरोखर किती विचार करतो?”
पडघम - देशकारण
राज बोराडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 17 April 2023
  • पडघम देशकारण शेती Farming जीएम बियाणे जेनेटिकली मोडिफाइड Genetically modified crops जीएम क्रॉप्स GM crops

१८ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्र सरकारने DMH-11 (GM-Mustard) या बियाणाला मान्यता दिली आणि पुन्हा एकदा जनुकीय परिवर्तित (जेनेटिकली मोडिफाइड – GM2) बियाण्यासंबंधी कृषी क्षेत्रात वादाचे तरंग उमटले. सरकार आणि त्यांचे समर्थक यांचे म्हणणे असे आहे की, आपण मोठ्या प्रमाणात खाद्यतेल परदेशातून आयात करतो, ते पण परिवर्तीत तेलबियांपासून बनवलेले असते. त्यामुळे आपला पैसा मोठ्या प्रमाणात खाद्यतेलावर खर्च होतो. मग परिवर्तीत बियाण्याचे आपल्या देशात उत्पादन घेतले, तर काय चुकीचे? तर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की, परिवर्तित बियाणांच्या वापरामुळे पर्यावरणाची जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे. नेमक्या याच प्रश्नासंबंधी ‘ग्रीनपीस फाउंडेशन’मध्ये कार्यरत असलेले पत्रकार-संशोधक रोहीन कुमार यांच्याशी हा साधलेला हा संवाद...

.................................................................................................................................................................

राज बोराडे- जेनेटिकली मॉडिफाइड अर्थात जनुकीय परिवर्तीत बियाणांची नेमकी कशी व्याख्या करता येईल? आणि यामध्ये ‘जीएम-मस्टर्ड’ हा काय प्रकार आहे?

रोहीनकुमार - साध्या शब्दांत सांगायचे तर, देशी वाणांचा परदेशी वाणांसोबत घडवून आणलेला संकर म्हणजेच जीएम, अर्थात जेनिटिकली मॉडिफाइड क्रॉप. भारतामध्ये अशा बियाणांच्या वापरायची सुरुवात हरित क्रांतीनंतर झाली. बीटी-कॉटन याचे एक प्रमुख उदाहरण. भरघोस उत्पादन करण्याच्या नावाखाली या बियाणांचा वारेमाप वापर सुरू झाला. यामध्येच आता जीएम-मस्टर्ड हे बियाणे आहे. यामध्ये मोहरीसारख्या देशी वाणांच्या बियांचा परदेशी बियाणांसोबत संकर घडवून आणला आहे. याचे नाव आहे- डीएमएच - १९.

प्रश्न- तुम्ही ज्या ‘ग्रीनपीस’ या संस्थेसाठी काम करता. तिचे म्हणणे आहे की, जीएम-मस्टर्ड पर्यावरण आणि जैवविविधतेला हानिकारक आहे, ते कशा प्रकारे?

उत्तर - ही गोष्ट आहे, राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची. नाव नाही सांगणार. हा पट्टा भारतात मोहरी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. या भागात जीएम-मस्टर्डच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आणि मृदा प्रदूषण झाले आहे. याचमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. या शेतकऱ्याने सांगितले की, या पीक लागवडीमुळे म्हणावे तसे उत्पादन वाढले नाहीच, उलट पर्यावरणीय अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या समस्यांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक पैसा खर्च करावा लागत आहे. या जमिनीवर उगवलेले गवत, जे मुळात पोषक खाद्य या वर्गवारीत मोडणारे नाही, ते सर्रास गाईगुरे खात आहेत. याचा उलटा परिणाम दूध उत्पादनामध्ये घट होण्यात झालेला आहे.

असे अनेक संकटग्रस्त शेतकरी तुम्हाला या भागात सापडतील. विचार करा, ज्यांची पोटे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर अवलंबून आहेत, जीएम बियाणांची भलामण करताना त्यांचा आपण खरोखरच किती विचार करतो?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या जनुकीय परिवर्तित प्रकारच्या बियाणामुळे मृदा प्रदूषण होते. हे बियाणे मोठ्या प्रमाणात खत आणि पाणी शोषून घेतात. त्यामुळे पाणी अवर्षण होते. शिवाय जे जीव आणि कीटक शेतीला पोषक असतात, त्यांचा विनाश घडून येतो. एकप्रकारे जैवसाखळी खंडित होते. त्यामुळे पर्यावरणातील जैवविविधता मुळापासून खंडित करण्याचे काम हे जीएम प्रकारातली बियाणे करतात. त्यामुळे आमचा या प्रकारच्या बियाणांना विरोध आहे.

प्रश्न - सरकारी आकड्यांनुसार आपण ६०-६५ टक्के खाद्यतेल परदेशातून आयात करतो, ते पण जीएम प्रकारात मोडते. उलट आपण आयातीवर खर्च केल्यामुळे आपला पैसासुद्धा खर्च होतो? याउलट आपल्याच देशात या जनुकीय परिवर्तित पिकांचे उत्पादन घेतले, तर काय चुकीचे आहे?

उत्तर - तुम्ही दररोज भारत हा विविधतेने नटलेला देश आहे म्हणून ओरडणार, पण पिकांच्या विविधतेसंबंधात काहीच विचार करणार नाही. माझे म्हणणे असे आहे की, तुम्ही हा विचार कधीच करणार नाहीत का, की पंजाबच्या मोहरीपेक्षा राजस्थानची मोहरी वेगळी आहे. कारण या देशात पर्यावरण विविधतासुद्धा तेवढीच लक्षवेधी आहे. पंजाब आणि राजस्थान येथे एकच जीएम-मस्टर्ड वाण वापरून आपण जैवविविधता मारतो, याचा कधी विचारच केला जात नाही.

याआधी बासमती तांदळच्या बाबतीत हेच झाले आहे. याउलट सरकारने जर देशी बियाणांना प्रोत्साहन दिले, त्यांच्यावर योग्य असे संशोधन केले, तर तर ती खाद्य तेलाची गरज भागवू शकतील.

शेतकऱ्यांना खरी गरज नवीन बियाणांची नाही. पण तीच तुम्ही त्यांना उपलब्ध करून द्याल, मात्र त्यांना भावच देणार नाही, तेव्हा भरघोस उत्पादन घेण्याचा फायदा काय? उत्पादनाच्या नावाखाली तुम्ही आगामी पिढ्यांचे नुकसान करत आहात.

या गोष्टीवर अभ्यास करायला हवा. पण मायबाप सरकार अशा गोष्टींवर काम करायलाच तयार नाही. या उत्पादनाच्या नावाखाली आपण लोकांच्या आयुष्याशी खेळत आहोत, हे विसरून चालणार नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रश्न – जीएम-मस्टर्डमुळे शेतीवर काय गंभीर परिणाम संभवतात?

उत्तर - या बियाणांमुळे सर्वांत जास्त नुकसान मधमाशांचे होत आहे. त्या फुलांमध्ये परागीकरण घडवून आणतात, हे सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे फुलांची वाढ नीट होते. पीक मोठ्या प्रमाणात येते. जीएम-मस्टर्ड यालाच धोका निर्माण करते. एकाच एक पिकावरील परागीकरण झाल्यामुळे मधमाशा जास्त प्रमाणात परागीकरण घडवून आणू शकत नाहीत. त्यामुळे निसर्गातील अनेक घटकांवर परिणाम होतो. कुठल्याही शेतीला मृदेचा कस फार उपयुक्त असतो. तो जर मारला गेला, तर एकटा शेतकरी नव्हे, तर संपूर्ण समाजावर याचे फार वाईट परिणाम घडून येतात. मृदेमध्ये नायट्रोजयुक्त घटक असतात. त्यावर जर परिणाम झाला, तर मातीचे प्रदूषण सुरू होते आणि संपूर्ण शेतीचे चक्रच बदलून जाते… आणि साऱ्या समाजव्यवस्थेचेही.

उदाहरण म्हणून पंजाब घ्या. हरित क्रांतीनंतर पंजाब हे भारताचे उत्पादनाचे कोठार म्हणून प्रसिद्ध झाले. अनेक जीएम पद्धतीच्या पिकांमुळे तिथे आर्थिक समृद्धी आली, पण पाण्याच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत कमी झाला. खताच्या अनिर्बंध वापरामुळे मृदा प्रदूषण झाले. त्यामुळे कर्करोगासारख्या आरोग्याच्या जटील समस्या निर्माण झाल्या. त्यातून सुटका करवून घेण्यासाठी अनेक लोक परदेशात स्थलांतर करू लागले. जे कमनशिबी होते, त्यांच्या वाट्याला मृत्यू आले. महिला विधवा झाल्या. त्यांची सामाजिक जबाबदारी कोण घेणार? नैराश्यामुळे व्यसनाधीन झालेल्या नव्या पिढीला कोण रोखणार? थोडक्यात, आपण उत्पादन वाढवण्याच्या फंदात या सगळ्या अधिकच्या समस्या निर्माण केल्या आहेत.

प्रश्न - देशी बियाणांद्वारे शेतीची उत्पादकता वाढू शकेल?

उत्तर – निश्चितच. जर सरकारने या देशी वाणांची जोपासना आणि संशोधन यांना प्रोत्साहन दिले, तर हे होऊ शकेल. आपल्या देशात विविधता आहे, याच्या आपण उठसूट वल्गना करतो, पण प्रदेशानुसार बियाणीसुद्धा वेगळी आहेत. ती ती त्या प्रदेशात जर वापरली, तर नक्कीच उत्पादन वाढेल. मात्र त्यासाठी आपल्याला शेतीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. आपल्या देशात शेतीशी संबंधित पायाभूत सुविधांसाठी किती टक्के खर्च होतो, फक्त दोन टक्के. एवढी नाममात्र गुंतवणूक करून तुम्ही शेतीचा विकास करू शकणार नाही. शेती विकास म्हणजे फक्त बियाणे ‘मॉडिफाइड’ करणे नव्हे, तर सगळी यंत्रणाच आधुनिक करणे होय.

हे खरे की, आपल्याला १०-१५ वर्षे जीएम बियाण्याद्वारे उत्पादन वाढलेले दिसेल, पण ३० वर्षानंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला लागतील. याउलट देशी वाणाचा नीट वापर केला, तर उत्पादन वाढू शकेल. याउप्पर, जनुकीय परिवर्तित बियाणांचा वापर म्हणजे, आपल्या शेतकऱ्यापेक्षा परदेशी कंपन्यांना मदत करणेच ठरते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रश्न - यामध्ये परदेशी कंपन्या कोणकोणत्या आहेत?

उत्तर - यामध्ये बहुतेक परदेशी कंपन्याचे वर्चस्व आहे. जीएम-मस्टर्ड या बियाण्यांमध्ये ‘बायर’ कंपनीचे वर्चस्व आहे. या कंपन्या मोठ्या प्रमाणात बियाण्याच्या क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करतात. ‘मोनसॅण्टो’ नावाची कंपनी बीटी-कॉटनच्या क्षेत्रात एकाधिकारशाही गाजवणारी कंपनी आहे. याचा अंतिम फायदा शेतकऱ्यांना होतो की, कंपन्यांना, याचाही विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे.

प्रश्न - जर जीएम-मस्टर्ड वैज्ञानिक पद्धतीतून तावून-सुलाखून आणि तपासून आले असेल तर, त्याच्या वापरावर का शंका आहे? उदाहरण द्यायचे झाले, तर ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्स’ या सरकारी संस्थेचे घ्या. ती म्हणते की, जीएम-मस्टर्ड विरुद्धचे सर्व आरोप तथ्यहीन आहेत?

उत्तर - मला माहीत नाही की, या सरकारी संस्था कशाच्या आधारावर हे मत मांडतात किंवा त्या अभ्यासाच्या कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करतात. पण हे सत्य नाही. शेवटी सरकारी संस्था सरकारलाच प्रोत्साहन देणार. त्याचा लोकांवर काय वाईट परिणाम होतोय, याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नाही. पंजाब-हरियाणात हेच झाले. तेथील शेतकरी आता विविध पर्यावरणीय समस्यांना सामोरे जात आहेत. तीसुद्धा सरकारी संस्थांची देणगी आहे, हे विसरता कामा नये.

प्रश्न - देशी वाणांना आपण कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?

उत्तर - यामध्ये सरकारला गुंतवणूक करावी लागेल. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन करावे लागेल. आपल्या देशात कृषी क्षेत्रामधील संशोधन क्षेत्रात एक टक्कासुद्धा गुंतवणूक होत नाही, ही सगळ्यात दुःखद गोष्ट आहे. देशी बियाणांना संवर्धित करण्याची गरज आहे. राहीबाई पोपरेसारखी महिला धुळे जिल्ह्यात देशी बियाणे संरक्षित करते. आपली कृषी विद्यापीठे यावर कधी विचार करतात की नाही, हा मोठा प्रश्न आहे. ही विद्यापीठे असूनसुद्धा आपण देशी वाणावर काम करू शकत नाही का? ‘आत्मनिर्भरता’ सरकारी जाहिरातींपुरतीच आहे का?

प्रश्न - शेवटी, आपण शाश्वत शेती कशी करावी?

उत्तर - हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. वाढत्या पर्यावरणीय बदलात तिचे महत्त्व मला नेहमी वाटते. आपण प्रादेशिक पर्यावरणाला अनुकूल शेती केली पाहिजे. रासायनिक खतांचा वापर टप्याटप्याने कमी केला पाहिजे. कारण पर्यावरणीय बदलांचा सगळ्यात मोठा फटका सध्या शेतीला बसतो आहे. वाढते तापमान, अवकाळी पाऊस, जैवविविधेत बदल, या सर्व गोष्टी अंतिमतः या देशातल्या शेतकऱ्याला सर्वाधिक त्रास देतील. या सर्व समस्या वाढवण्यात तथाकथित आधुनिकतेचा मोठा वाटा आहे. घसघशीत उसाच्या उत्पादनाच्या नावाखाली तुमच्या मराठवाडा प्रदेशाचं काय करून ठेवलंय, हे काही सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, पर्यावरणाच्या संबंधात विवेकशीलता जपली, तर ‘लोकल’सुद्धा ‘युनिव्हर्सल’ बनू शकते.

‘मुक्त-संवाद’ या मासिकाच्या एप्रिल २०२३च्या अंकातून

.................................................................................................................................................................

लेखक राज बोराडे जयपूरस्थित ‘हरिदेव जोशी युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन’मध्ये पत्रकारिता अभ्यासक्रम करत आहेत. समाज, राजकारण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

boraderuksharaj@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख