समुपदेशन म्हणजे ‘शिळोप्याच्या गप्पा’ किंवा ‘समुपदेशकाने केलेली बडबड’ नव्हे. अनेक उपचार पद्धतींसारखीच समुपदेशन हीदेखील एक उपचार पद्धत आहे!
पडघम - विज्ञाननामा
स्वप्निल पांगे 
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 13 April 2023
  • पडघम विज्ञाननामा समुपदेशक Counsellor समुपदेशन Counseling मानसशास्त्रज्ञ Psychologist मानसोपचारतज्ज्ञ Psychiatrist

“सर, मी तुमच्याकडे कौन्सिलिंगसाठी येतो, हे मी माझ्या मित्राला सांगितलं, तर तो मोठ्याने हसला. म्हणाला, ‘अरे, कौन्सिलरकडे जायला तुला काय वेड लागलंय? तिथं फक्त ‘मेंटल लोक’ जातात.”

माझ्यासमोर बसलेला एक युवक आपल्या अनुभवाबद्दल सांगत होता. ‘रिलेशनशिप ब्रेकअप’नंतर तो थोडा नैराश्यानं ग्रासला होता. त्याकरता तो समुपदेशनासाठी माझ्याकडे नियमित येत होता.

‘अरे, तुझ्या मित्राची काही चूक नाही. आपल्या समाजात मानसिक आजार आणि समुपदेशन, यांबाबतीत अजूनही म्हणावी तितकी जागरूकता  नाहीये.” मी माझी नेहमीची प्रतिक्रिया दिली.

पण आपल्या समाजात असे असंख्य लोक आहेत, जे अजूनही समुपदेशनाबद्दल अनभिज्ञ आहेत. मानसिक समस्यांवर समुपदेशनासारखे उपचार उपलब्ध आहेत, या गोष्टींवर त्यांचा विश्वास नसतो. मानसिक आरोग्य व समुपदेशन यांबद्दल असलेला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आणि गैरसमज याला जबाबदार आहेत.

कार्ल रॉजर्स, सिगमंड फ्राईड, अल्बर्ट एलिस यांसारख्या अनेक नामांकित मानसशास्त्रज्ञांनी मानसिक आजारावरच्या विविध मानसोपचार पद्धती विकसित केल्या आहेत. जगभरात मनोविकारांवरील उपचारासाठी विविध संशोधनांमधून सिद्ध झालेली अनेक मानसोपचाराची तंत्रे वापरली जातात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, समुपदेशन म्हणजे ‘शिळोप्याच्या गप्पा’ किंवा ‘समुपदेशकाने केलेली बडबड’ नव्हे. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, समुपदेशक आपल्याशी गप्पा मारतात, आपलं ऐकतात आणि सल्ला देतात. हे चूक आहे. अनेक उपचार पद्धतींसारखीच समुपदेशन ही एक उपचार पद्धत आहे. यामध्ये थेरपिस्ट किंवा समुपदेशक मानसशास्त्राचं ज्ञान आणि अनुभव असलेला प्रशिक्षित तज्ज्ञ असतो. त्याने मानसशास्त्राचं किमान पदव्युत्तर शिक्षण आणि काही विशिष्ट मानसोपचार पद्धतींचं शिक्षण घेण्यासाठी सखोल प्रशिक्षणही घेतलेलं असत.

सध्याच्या झटपटवाल्या जमान्यामध्ये ‘शॉर्ट टर्म’ कोर्सेस करून मानसिक आरोग्याची दुकानं मांडणारी मंडळी पुष्कळ आहेत. म्हणून ज्या थेरपिस्टकडून तुम्ही समुपदेशन घेता, त्याच्याकडे या विषयाची पदवी आहे का, हे माहिती असायला  हवं. समुपदेशकाची पात्रता आणि अनुभव या दोन्हींची खात्री करून घ्यायला हवी. माझ्याकडे उपचारासाठी येणारी मंडळी बऱ्याचदा माझ्या पात्रता आणि पूर्वानुभवाबद्दल विचारणा करतात आणि मी त्यांना उत्तरं देऊन त्यांचं शंकानिरसन करतो.

आजकाल समुपदेशन ही संज्ञा अनेकदा सैलपणे वापरली जाते. तुमच्याकडे आलेल्या रुग्णाशी वा ग्राहकांशी गप्पा मारणं, त्याला\तिला एखाद्या गोष्टीची माहिती देणं म्हणजे समुपदेशन नव्हे. मानसिक समस्यांबाबत केलं जाणारं समुपदेशन पूर्णतः मानसशास्त्रीय असतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एकदा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलाला त्याचे आई-वडील जबरदस्तीनं समुपदेशनासाठी माझ्याकडे घेऊन आले आणि म्हणाले, “सर, याचं जरा समुपदेशन करून टाका हो. त्याला जरा समजावा, अभ्यास करायला सांगा, हा वाईट संगतीत लागला आहे.” खरं तर असे बरेच जण बळेबळे समुपदेशनासाठी ‘आणले’ जातात. शक्यतो ते स्वतःहून येत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांना कुठली समस्या नसते. त्यांना स्वतःच्या वागण्यात काहीच गैर वाटत नाही किंवा आपल्या वागण्यामुळे आपल्याला व सभोवतालच्या लोकांना त्रास होत आहे, याची जाणीवही नसते. त्या मुलाशी बोलल्यावर त्यानेसुद्धा तेच उत्तर दिलं- “खरं तर मला नाही वाटत, मला काही त्रास आहे किंवा समुपदेशनाची गरज आहे.” तेव्हा मला आधी त्या पालकांचं समुपदेशन करावं लागलं, कारण तो मुलगा तयार नव्हता.

कोणाचंही असं जबरदस्तीनं समुपदेशन करता येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीनं आपल्याला काही समस्या आहे, हे मान्य करायला हवं आणि समुपदेशकाची मदत घेण्याची तयारी दाखवायला हवी. तसं नसताना समुपदेशन करणं म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी’. जोपर्यंत समुपदेशन ही आपली गरज आहे, हे जाणवत नाही, तोपर्यंत कुठलीही व्यक्ती मदत घ्यायला येत नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीचे पालक, जोडीदार किंवा नातेवाईकांनी तिच्याशी कसं वागायचं, याबद्दल समुपदेशकाकडून मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही.

समुपदेशन ही समुपदेशक आणि सल्ला मागायला आलेली व्यक्ती, यांच्यामध्ये घडणारी संवादाची संवेदनशील प्रक्रिया आहे. आम्ही त्या व्यक्तीला रुग्ण वा पेशंट म्हणायचं टाळतो, कारण समुपदेशनासाठी येणारे लोक प्रत्येक वेळी गंभीर मानसिक आजारानं ग्रस्त असतातच असं नाही. रोजच्या दैनंदिन व्यवहारातील आव्हानांमुळे ‘त्रस्त’ झालेले लोकदेखील समुपदेशनासाठी येतात. त्यांच्या समस्या तीव्र स्वरूपाच्या नसतात, पण त्यांनाही समुपदेशन मदतपूर्ण ठरू शकतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

समुपदेशक त्याच्याकडे आलेल्या व्यक्तीच्या समस्येबद्दल इत्थंभूत माहिती घेतो. त्याला ‘क्लिनिकल’ भाषेत ‘हिस्ट्री टेकिंग’ असं म्हणतात. साधारणतः पहिल्या सत्रामध्ये आवश्यक ती माहिती मिळवल्यानंतर समुपदेशक संबंधित व्यक्तीच्या मदतीनं तिच्या समस्येची एक सोपी व्याख्या तयार करतो. उदाहरणार्थ, समोर असलेल्या व्यक्तीची समस्या अभ्यास, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध किंवा वैयक्तिक तणाव इत्यादी बाबींशी निगडित असू शकते. काही वेळा एकच समस्या असते, तर काही वेळा ती अनेक समस्यांच्या जाळ्यात अडकलेली असते. अशा वेळेस दोघं मिळून सर्वांत तातडीची समस्या कोणती, हे ठरवून मग समुपदेशनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते.

सुरुवातीला समुपदेशनामधून काय साधायचं आहे, याचं चित्र दोघांपुढेही स्पष्ट नसेल, तर कित्येक सत्रं वेळ आणि पैसे खर्च करूनही हवा तसा बदल जाणवत नाही. त्यामुळे निराश होऊन मध्येच समुपदेशनाची प्रक्रिया अर्धवट सोडून दिली जाते. त्यातून एक ग्रह तयार होतो, तो म्हणजे ‘समुपदेशन वगैरे काही नाही हो, काहीच फायदा झाला नाही.’

समुपदेशनामधून अभिप्रेत असणारा बदल घडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. ‘पी हळद अन हो गोरी’ असला आततायीपणा इथं कामाला येत नाही. बदल घडवून आणण्यासाठी संबंधित व्यक्तीचा या प्रक्रियेवरचा विश्वास, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची तयारी आणि सत्रांमध्ये दिल्याप्रमाणे ‘होमवर्क’ पूर्ण करून आणण्याची जबाबदारी, या गोष्टी त्या व्यक्तीला कराव्या लागतात. मात्र हे नियमितपणे केल्यास वैचारिक, भावनिक किंवा वर्तणुकीच्या पातळीवर बदल दिसून येतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

समोरच्या व्यक्तीचे भावनिक चढउतार समजून घेणं, हे एक कौशल्याचं काम आहे. ते जर अचूक साधलं, तर आपल्या भावना किंवा समस्या या समुपदेशकाला समजल्या आहेत, ही जाणीव त्या व्यक्तीच्या मनात आपोआप तयार होते. त्याचबरोबर समुपदेशनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. गरज वाटल्यास औषधोपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडेही पाठवलं जातं.

बऱ्याच लोकांची अशी समजूत असते की, समुपदेशक हा ‘मनकवडा’ असतो. म्हणजे काहीही न सांगता आपल्या मनातील सर्व काही जाणणारा. सुरुवातीच्या काळात लोकांना जेव्हा मी ‘सायकॉलॉजिस्ट’ असल्याचं सांगायचो, तेव्हा ते दोन पावलं मागे जाऊन, ‘म्हणजे आता तुम्ही मनातलं ओळखणार. तेव्हा तुमच्यापासून लांब राहायला हवं’, असा पवित्रा घेत, तर काही वेळा ‘तुम्ही मानसोपचारतज्ज्ञ ना, मग सांगा बघू आता माझ्या मनात काय चाललं आहे ते’ असा चेष्टेचा सूर लावत.

कोणताही प्रशिक्षित समुपदेशक मानवी वर्तनाच्या सिद्धान्तानुसारच समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून, पूर्वेतिहासातून त्याच्या समस्येबद्दल एक अंदाज बांधत असतो आणि वेळोवेळी तपासूनही पाहतो. त्याच्या सध्याच्या समस्येची कारणं कशात असू शकतात, याबद्दल अधिक चिकित्सा करतो. बऱ्याच मानसिक समस्या ही बालपणातील अनुभव, कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव, आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, याच्या कमी-अधिक मिश्रणातून तयार झालेली असते. ती कधी पटकन उलगडते, तर कधी योग्य निदानासाठी बरीच ऊर्जा खर्च करावी लागते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अर्थातच या साऱ्या विचारमंथनाला सामोरं जायची त्या व्यक्तीचीही तयारी असणं आवश्यक असतं. आपण आपल्या स्वभावाकडे, गुणदोषांकडे तटस्थपणे बघण्यासाठी, त्यावर टीकात्मक टिप्पणी स्वीकारण्याची मनाची तयारी केल्याशिवाय समुपदेशनाची प्रक्रिया सफल ठरू शकत नाही. किंबहुना माझ्यात काही दोष आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी मी तयार आहे, ही भूमिका पक्की झाल्याशिवाय अंतरंगाकडे पोहोचण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत.

मुळात मानवी भावना गुंतागुंतीच्या असतात, त्या सहजसहजी सुटत नाहीत. एका भावनेमागे दुसरी सुप्त भावना दडलेली असते. ब्रेकअपनंतर नैराश्य आलेल्या एका तरुणाला त्याच्या समस्येबद्दल बोलताना असं लक्षात आलं की, त्याचं जिवलग व्यक्ती दुरावल्याचं दुःख जितकं तीव्र होतं, तितकीच आपणच तिला वेळ देऊ शकलो नाही, म्हणून नातं तुटलं, याबद्दल वाटणारी बोचरी खंतसुद्धा होती. इतकंच नव्हे, तर हे सगळं अनपेक्षितपणे घडलं, याबद्दल प्रचंड संतापदेखील होता. अशा भावनांचा हळूहळू निचरा होणं गरजेचं असतं. अनुभवी समुपदेशक या सर्व गोष्टींची दखल घेऊन सत्रांची आखणी करतो.

समुपदेशनामध्ये स्वतःचं वर्तन, भावना आणि विचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जातो, इतरांच्या नाही. एक ३५ वर्षांची विवाहित तरुणी आपल्या वैवाहिक आयुष्यामधील समस्यांबद्दल बोलत होती. तिच्या नवऱ्याच्या तापट, संशयी आणि हेकेखोर स्वभावाला तोंड देणं तिला कठीण जात होतं. मात्र नवरा काही समुपदेशनासाठी यायला तयार नव्हता. त्यामुळे त्याच्या स्वभावात काही बदल होण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे तो स्वतः जोपर्यंत समुपदेशनासाठी येत नाही, तोपर्यंत स्वतःचा त्रास कसा कमी करता येईल, यानुसार आमच्या समुपदेशनाची दिशा ठरवावी लागली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

खरं तर आपण सगळेच कधी ना कधी, कोणाला ना कोणाला सल्ला देतच असतो. पण सल्ला देणारे सगळेच समुपदेशक नसतात. तसंच समुपदेशक हा नेहमी सल्लाच देतो असंही नाही. जेव्हा आपण एखाद्या मानसिक समस्येनं त्रस्त वा ग्रस्त झालेलो असतो, त्या वेळेस आपला सारासार विचार करणारा मेंदू काही काळाकरता अपहृत म्हणजे ‘हायजॅक’ झालेला असतो. तेव्हा भावनांचा आवेग इतका असतो की, आपली विचारप्रक्रियाच मंदावते. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतला जाऊ शकतो. अशा वेळी समुपदेशक त्या व्यक्तीला तिच्या समस्येची उकल करण्याचे पर्यायी मार्ग सुचवतो आणि त्या प्रत्येक मार्गाची कोणती किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना येण्यासाठी मदत करतो. कारण शेवटी तो निर्णय त्या व्यक्तीलाच घ्यायचा असतो.

आपण बऱ्याचदा भावनिक चढउतारामध्ये अडकतो, गोंधळतो किंवा नैराश्य-चिंता यांसारख्या मानसिक आजाराच्या गर्तेत सापडतो. तेव्हा समुपदेशनाच्या गावी जायला हरकत नाही. स्वतःकडे तटस्थपणे बघण्यासाठी, ‘डिसकम्फर्ट’ झोनमधून बाहेर पडून स्वतःला आव्हान देण्यासाठी समुपदेशनासारखी दुसरी प्रक्रिया नाही. अर्थात, आपली समस्या आणि तिची उकल ही आपलीच  जबाबदारी आहे, याचं भान ठेवत!

.................................................................................................................................................................

लेखक स्वप्निल पांगे मानसतज्ज्ञ/ समुपदेशक आहेत.

manaswapnil20@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रशियाचा भारताला भडकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भारत-अमेरिका संबंधांत काडी घालणे, हा त्यामागचा हेतू असावा. आंतरराष्ट्रीय पटावरील ‘प्रोपगंडा’ची ती एक चाल असणार...

आपण घरात घुसून दहशतवाद्यांना टिपतो, हे प्रचारात सांगणे अडचणीचे असले, तरी समाजमाध्यमांतून त्याचा प्रचार करता येतोच. तेव्हा अमेरिकेतून त्याबाबतच्या बातम्या आल्या, तरी त्या येथे सरकारला फायद्याच्याच ठरतात. किंबहुना त्या हेतूने तर तशा बातम्या पेरण्यात येत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अहवालाचे तसे नाही. त्यातील टीका उघडच तोट्याची ठरू शकते. ते लक्षात घेऊनच रशियाने तो मुद्दा उचलला.......