असत्याला ललकारण्याची, आव्हान देण्याची, प्रश्न विचारण्याची गरज आहे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं, हासुद्धा विद्रोह ठरू शकतो
पडघम - साहित्यिक
चंद्रकांत वानखेडे
  • १७व्या अखिल विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे
  • Mon , 06 February 2023
  • पडघम साहित्यिक १७वे अखिल विद्रोही मराठी साहित्य संमेलन 17th Akhil Bhartiy Vidrohi Marathi Sahitya Sammelan चंद्रकांत वानखेडे Chandrakant Wankhede

१७वे अखिल विद्रोही मराठी साहित्य संमेलन ४ व ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वर्धा इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा तिसरा आणि शेवटचा अंश...

..................................................................................................................................................................

सध्याची लढाई अशा विचारधारेशी व अशा विचारधारेच्या संघटनेशी आहे की, ज्याचा स्वतःचा असा आखाड्यात उतरवण्यासाठी पैलवानच नाही. म्हणून ते आपल्याला आपल्यातच लढवतात. महात्मा गांधींविरुद्ध महात्मा फुले, गांधींविरुद्ध आंबेडकर, गांधींविरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधींविरुद्ध भगतसिंग, नेहरूंविरुद्ध पटेल अशा लढाया त्यांनी लावल्या आहेत. आपणही त्यांच्या या कुटील डावाला बळी पडून टाळ्याही पिटल्या आहेत. या विषमतावाद्यांचा कोणताही नेता त्यांच्या संघटनेशिवाय जनमानसांमध्ये मोठा होऊ शकत नाही. स्वतःची जात व त्या जातीचे हितसंबंध, त्या जातीचे जन्मजात वर्णश्रेष्ठत्व यापलीकडे ज्यांची ‘करुणा’च पोहोचत नाही, ते काय खाक मोठे होणार? त्यांना असंघटनेच्या अंतर्गत कितीही प. पू. म्हटले तरीही. म्हणून मग ते आपल्याच लोकशाहीवादी, समतावादी नेत्यांचे अपहरण करतात.

स्वामी विवेकानंदांचं असंच अपहरण केलं. त्यांनी भगवे कपडे परिधान केले असल्यामुळे त्यांनाही ते सोपं गेलं आणि आम्ही त्या अपहरणाला हातभार लावला. पण, आता दत्तप्रसाद दाभोळकरांनी खरा विवेकानंद समजावून सांगितला, तेव्हा तो त्यांचा नाहीच, हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. आज दत्तप्रसाद दाभोळकरांना त्यांनी विवेकानंदांच्या बाबतीत सत्यकथन केले, म्हणून पोलीस संरक्षणात जगावं लागतं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनाही याच मंडळींनी ‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ म्हणून ‘हिंदुत्वाच्या’ तुरुंगात डांबून ठेवले होते. मुस्लिमांच्या विरोधात त्यांचा यथेच्छ वापर करून घेतला. त्यांची ‘हिंदुत्वा’च्या तुरुंगातून गोविंद पानसरेंनी सुटका केली. या पापाची शिक्षा म्हणून पानसरेंची हत्या झाली. आता राहता राहिले सावरकर. पण, त्यांनी सावरकरांच्या कितीही महिमा गायला, तरीही त्यांच्याबाबत उपलब्ध असलेले पुरावे त्यांचा हा खोटा महिमा काळवंडून टाकणारच आहे. त्या भरोशावर त्यांची उतमाज सुरू आहे. सर्व स्वायत्त संस्था, प्रसारमाध्यमे त्यांनी वेठीस धरली आहेत. अशा वेळेसच खर्‍या अर्थाने ‘विद्रोहा’ची गरच असते. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सत्ताधार्‍यांच्या असत्य प्रस्थापित करण्याला ललकारण्याची, आव्हान देण्याची, प्रश्न विचारण्याची आता खरी गरज आहे. ते प्रश्नांची ‘नाकेबंदी’ करतील. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून प्रश्नांची ‘नसबंदी’ही करतील. या अन्यायाविरोधात यापुढे प्रखर असा लढा उभारावा लागेल. तोच खरा विद्रोह असेल आणि विद्रोही संमेलनाची फलश्रुतीही.

१९८०मध्ये मी व माझी बायको माया यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा या गावी रहायला गेलो. सोबत कोण्यातरी महापुरुषांच्या विचारांनी विणलेली खाट घेऊन गेलो आणि त्या खाटेवर त्या परिसरातील माणसांना बसवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण माणूस त्यावर आडवा करून झोपवायचा प्रयत्न करायचो. तेव्हा तो माणूस पूर्णपणे त्यात मावायाचा नाही. कधी डोके तरी बाहेर यायचे. डोके आत घेतले तर पाय बाहेर यायचे. कड फेरला तर हात बाहेर यायचे.

खाट तर महापुरुषांच्या विचारांनी विणलेली. माझ्या लेखी या खाटेमध्ये कोणतीही चूक असण्याची शक्यता नाही. त्यात अपुरेपणा तर असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण ती खाट विणलेलीच महापुरुषाने. तो कसा चूक असणार? चूक असलीच तर त्या माणसात असेल. त्या खाटेच्या बाहेर माणसाचे पाय येत असतील, तर त्या माणसाच्या पायातच काही खोट असेल. डोके बाहेर येत असेल, तर त्याच्या डोक्यातच काही फरक असेल आणि हात बाहेर येत असलीतल तर त्याच्या हाताचच काही मिस्टेक असेल. महापुरुष कसा चुकू शकतो? काही डिफेक्ट असेल, तर तो त्या माणसात. म्हणून मग मी त्या माणसाला त्या खाटेवर परफेक्टपणे बसवण्यासाठी त्या माणसाचे बाहेर येणारे पाय कापू लागलो, हात कापू लागलो. आणि खाटेवर फीट बसवण्यासाठी त्याचे डोकेही कापू लागलो.

महापुरुषाने ज्या काळात त्या विचाराची खाट विणली तो काळ. त्याच्या वेळेचा माणूस त्या खाटेवर बरोबर बसला असेल; पण आताच्या माणसाला ती अपुरी पडत असेल. म्हणून त्या खाटेचा ‘विस्तार’ करण्याची गरज आहे, हेच मी विसरून गेलो की काय? हाही स्वतःशीच विचार करण्याची गरज आहे. या विचारांची खाट, त्या विचारांची खाट असे आम्ही ‘खाटमांडू’ तर झालेलो नाही ना? माणसापेक्षाही माझी ‘खाट’ आणि खाटमांडूंचे आपआपसात सदासर्वकाळ भांडू-भांडू असे काही तर होत नाही ना? या अंगानेही स्वतःला तपासावे लागेल.

माणसांसाठी खाट असेल, खाटेसाठी माणूस असू शकत नाही. तव्दतच माणसांसाठी विचारधारा असेल, विचारधारेसाठी माणूस असणार नाही.एकेकाळी मुंबईत कामगार चळवळ प्रभावी होती व त्यावर कम्युनिस्ट विचारधारेचा मोठा प्रभाव होता. पण, म्हणून गणेशोत्सव मुंबईत थांबला होता, असे दिसत नाही व बंगालमध्ये अनेक दशके कम्युनिस्टांची सत्ता होती म्हणून तिथला दुर्गोत्सव थांबला तर नाहीच. उलट कमीसुद्धा झाला नाही. सर्वसामान्यांना देव लागत असावा. याची जाणीव संतांना सुद्धा असावी असे दिसते. म्हणूनच ‘विठ्ठल विठ्ठल’ करणारे तुकाराम महाराज म्हणतात,

‘देव आहे ऐसी वदवावी वाणी

देव नाही ऐसे जाणावे मनी’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ज्ञानेश्वरांची एक ओवी अशाच आशयाची आहे. संत गाडगेबाबा पंढरपूरला जायचे; पण कधी मंदिरात गेले नाही. तुमच्या देवावर कुत्रं टांग करून मुतते असे जाहीरपणे ते म्हणायचे आणि लोकही ते ऐकून घ्यायचे. कारण गाडगेबाबांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ ही टॅगलाईन धरून ठेवली होती. समाजातून देव ‘रिटायर्ड’ करायला निघालेल्या डॉ. श्रीराम लागूंना आपल्या घरातले देव ‘रिटायर्ड’ करता आले नाहीत.

समाजातले देव ‘रिटायर्ड’ करण्याचा गोष्ट तर खूप दूरची. समाजात माझी बर्‍यापैकी ओळख आहे. ज्या कॉलनीत मी राहतो तेथेही बर्‍यापैकी लोक ओळखतात. तरीदेखील एखाद वेळेस पाच-दहा गुंड माणसं मला सडकेवर खेचून मारताहेत, हे पाहून कॉलनीतील माणसं माझ्या बचावासाठी धावून येतील, याची खात्री मला नाही. पण त्याच कॉलनीतील एका झाडाखाली दगडाला शेंदूर फासलेला देव आहे. त्या देवाची कोणी विटंबना करतो आहे, हे दिसताच त्या कॉलनीतील तीच माणसं विटंबना करणार्‍याच्या अंगावर धावून जातील, याची मला खात्री आहे आणि हीच ‘देव’ या कल्पनेतील ताकद आहे. ही ओळखून रणनीती आखण्यात आपण कमी पडलो की काय असेही वाटते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कोणत्याही देशात जा. देश प्रगत वा अप्रगत असू द्या. मागासलेला वा पुढारलेला असू द्या. साक्षर वा निरक्षर असू द्या. त्या देशातील राष्ट्रध्वजाबद्दल म्हणा, ‘या फडक्याने मी माझ्या घराची फरशी पुसतो.’ तुम्ही कोणत्याही देशात असा तुमचा मुडदा पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे शेंदूर फासलेल्या दगडाला दगड म्हणून चालत नाही. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहीरातील वा कार्यक्रमात ‘आम्ही कोणत्याही देवा धर्माच्या विरोधात नाही’ या वाक्यानेच सुरुवात करावी लागते. यातील गमक ‘विद्रोही’ म्हणवणार्‍यांनी वेळीच ओळखलेले बरे, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

गाडगे महाराजांनी कठोरपणे देवावर टीका केली असेल. पंढरपुरात जाऊन ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरातही गेले नसतील. पण, तेथे येणार्‍या वारकर्‍याला ‘कशाला येथे येतोस मरायला?’ असं कधी म्हणाले नाहीत. त्याची त्या गर्दीतील गैरसोय बघून, निवार्‍याला जागा नाही बघून त्यांनी त्यांच्यासाठी करुणेतून धर्मशाळा बांधली. विद्रोहातून, क्रांतीतून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं, याचही भान ‘विद्रोही’नी बाळगलं पाहिजे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं, हासुद्धा विद्रोह ठरू शकतो, याची मला जाणीव आहे. माणसा-माणसांनी दंगलीत केलेल्या परस्परांच्या कत्तलीतून झालेल्या रक्तमांसाच्या चिखलातूनच कमळ चांगला फुलतो, याची कमळीवाल्यांना चांगलीच जाणीव आहे आणि द्वेषाच्या वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विषाणूचं पोषण होतं, याची कल्पना रेशीमबागेतील भागमभाग करणार्‍याला आहे. त्यामुळे त्या विषाणूंना पोषक ठरणार्‍या द्वेषाला दूर सारत प्रेमाचा अंगीकार करणे, हाच सध्याच्या काळातील ‘विद्रोह’ ठरणार आहे, याची मला खात्री आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा