सोनाली नवांगुळ रोज नव्या वाढत्या आव्हानांना तोंड द्यायला तयार आहे, पण आपण समाज म्हणून तिला पूर्वग्रहांशिवाय, स्टिरिओटाईप्ड कोंदणांशिवाय, एक माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहोत?
पडघम - साहित्यिक
परिमला प्रभूदेसाई
  • ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सोनाली नवांगुळ
  • Sat , 04 February 2023
  • पडघम साहित्यिक सोनाली नवांगुळ Sonali Navangul महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

लेखिका आणि अनुवादक सोनाली नवांगुळ यांना लेखन व अनुवाद या क्षेत्रांतील योगदानासाठी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘विशेष पुरस्कार’ मिळाला. तो त्यांना नुकताच, म्हणजे २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) : स्मरणिका २०२३’मध्ये सोनालीविषयी प्रकाशित झालेला हा लेख...

.................................................................................................................................................................

सोनाली नवांगुळ आणि माझ्या ओळखीला आता जवळपास २० वर्षं झाली. आमच्या पार्श्‍वभूमीच्या दोन अत्यंत भिन्न विश्‍वांना, कधीकाळी मी एका सामाजिक कार्यात भाग घेण्याच्या निमित्ताने, छेद जाऊन आमची आश्‍चर्यकारकरित्या भेट झाली आणि गाठी जुळल्या त्या कायमच्या. आमची अगदीच किशोरवयात भेट झाल्यामुळे सोनालीने सुरुवातीला त्या सामाजिक संस्थेमध्ये नोकरी करण्यापासून ते पॅराप्लेजिक असूनही स्वबळावर संस्थेतून बाहेर पडून कोल्हापुरात स्वतंत्रपणे घर घेऊन राहणं, पत्रकारितेतून तिला लिखाणाची वाट सापडणं ते अनुवाद व स्वतःची अशी मिळून तिची एकूण आठ पुस्तकं आजमितीला प्रकाशित होणं, असा तिचा सारा प्रवास मी अगदी जवळून पाहू शकले.

आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला गेलो की, नेहमीच घडणारे हे प्रसंग! - तिच्या मनमोकळ्या आणि थेट ओळखीचं बोलण्याने नवखा माणूस तिचं दृश्य अपंगत्व विसरून तिच्या थेट प्रेमातच पडतो, हे मी बरेचदा, नव्हे, प्रत्येक वेळी होताना पाहिलं आहे. नव्याने भेटलेल्या व्यक्तीला तिच्याशी बोलताना आधी अवघडल्यासारखं होतं, हे तिला नेमकं माहीत आहे. मग ती अशा काही मोकळ्या गप्पा सुरू करते, विनोद करते. सोबतच्या मित्रमैत्रिणींची ओळख करून देते, प्रसंगी त्यांची खिल्लीही उडवते आणि नव्या व्यक्तीला हसायला नि मोकळेपणाने बोलायला भाग पाडते.

विशेषतः लहान मुलांमध्ये तर ती इतकी रमते, की ती त्यांच्यासोबत त्यांच्या इतकीच कितीही वेळ असंबद्ध बडबड करू शकते! मुलंही मग तिच्या व्हीलचेअरला हात लावून पाहतात. तिला बिनदिक्कतपणे विचारतात की, तुला चालता येत नाही तर मग तू शू करायला कशी जातेस? अशा थेट, निरागस पण अवघड प्रश्‍नांना सोनाली मुलांना समजेल अशी छान उत्तरं, न लाजता देते.

खरं तर प्रत्येक नव्या संवादाच्या सुरुवातीला लहानमोठ्या प्रत्येकाची अवघडलेपणाची नि तिच्या अवस्थेबाबतीतील अनभिज्ञतेची भिंत पाडणं सोपं नसतं. पण ही धडपड ती प्रत्येक नव्या व्यक्तीला भेटल्यावर न थकता करते. त्यामुळेच ती नवनव्या माणसांशी जोडली जाते नि मुख्य प्रवाहात सहज सामावून जाते. हा अनुभव नव्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी वगैरे असला तरी मला तिच्या त्या धडपडीमध्ये नव्या माणसांशी जोडलं जाण्याची, विचारांचं आदानप्रदान होण्याची भूक दिसते.

ही तिची भूक मला केवळ अशा भेटीगाठींच्या बाबतीतच नव्हे, तर तिच्या संपूर्ण जगण्यामध्ये जाणवते. पॅराप्लेजियातून उठून स्वयंपूर्ण होण्याआधी, कोवळ्या वयातली जवळपास ११ वर्षं सोनालीने घरातल्या चार भिंतींमध्ये राहून बाहेरच्या जगाची केवळ कल्पना केली होती. त्यामुळे नंतर स्वतंत्रपणे राहायचं ठरवल्यावर नव्या संधी घेत, नव्या वाटा चोखाळत, नव्या अनुभवांनी पल्लवित असं ती जगली, तर त्याचं आश्‍चर्य वाटू नये. ती नवख्या गावा-शहरा-देशामध्ये मनसोक्त भटकंती करते. गोव्यात घेतलेल्या पहिल्या ‘स्पा’च्या अनुभवानं शहारते. मॉलमध्ये विंडो शॉपिंग करते. स्विमिंग पूलमध्ये पोहून बघते. उत्तम सिनेमे, वेबसिरीज आणि कार्यक्रम आसुसून पाहते. आलेला प्रत्येक अनुभव हा छानच असतो असं नाही, कधी काही प्रयोग फसतातही. पण चांगल्या-वाईट परिणामांची संपूर्ण जबाबदारी घेऊन, उमेद न हरता, तिच्या जगण्यातून तिने वेचलेले उत्तम क्षण तिला पुढचे बरेच दिवस रोमांच देत राहतात. सतत भेडसावणार्‍या शारीरिक प्रतिकूलतेतून सावरण्यासाठी मानसिक उभारी देतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

जगण्यासाठीचं तिचं हे लहान मुलागत असलेलं आसुसलेपण तिच्यासाठी जाणिवांच्या नव्या खिडक्या उघडतं, तिच्या विचारी मनाला सकारात्मक मंथन करायला भाग पाडतं आणि तीव्र अपंगत्वातून येणार्‍या नैराश्यात बुडून जाण्यापासून वाचवतं. या तिच्या जगण्याच्या प्रक्रियेतूनच आज ‘जितकी संकटं, अडचणी किंवा विरोध अधिक- तितका त्या परिस्थितीतून जास्त झळाळून उठण्याचा’ तिचा लढवय्या स्वभाव तयार झाला आहे. हाती-पायी धड असणार्‍या माझ्यासारख्या अनेकांना खूप काही शिकवून जाणार्‍या तिच्या या वैयक्तिक प्रगतीपुढे, मला वाटतं, तिने आजवर केलेली विशेष उल्लेखनीय साहित्यिक-सामाजिक प्रगती ही केवळ तिच्या अशा पद्धतीने जगण्यातून जन्माला आलेली आणखी एक निष्पत्ती आहे.

सोनालीचा साहित्यिक प्रवास आणि आयुष्याचा प्रवास हे एकमेकांहून फारसे वेगळे नाहीत. घरात बसून काढलेल्या लहानपणात पुस्तकंच तिची अखंड सोबती होती! त्यामुळे उत्तम वाचन, मनावर असलेले कवितांचे संस्कार, आल्या-गेल्याला वाचलेल्या गोष्टींचं कथन करण्यातून आपसूक आलेलं भाषेवरचं प्रभुत्व नि ओघवतं वक्तृत्व हे सारे गुण तिच्यात होते. पुढे त्याला जोड मिळाली, ती मनाच्या सताड उघड्या खिडक्यांतून अनुभवलेल्या व्यक्तींची-प्रसंगांची-प्रवासांची आणि जागतिक सिनेमांची! शारीरिक-मानसिक अडचणी असणार्‍या माणसांशी सर्वांनी सर्वसमावेशकपणे, समानतेने पण संवेदनशीलतेने वागण्याबद्दल ती आग्रही आहे. त्यामुळे रोजच्या आयुष्यातल्या लहानमोठ्या प्रसंगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन इतरांपेक्षा निराळा, अधिक डोळस आणि प्रगल्भ आहे. तिच्या या दृष्टीकोनात केवळ बाह्य प्रसंग नसून त्यांच्या साक्षीतून निर्माण होणारी शरीर आणि मनाच्या परस्पर-संबंधाची, उलाघालींची एक विलक्षण अंतस्थ गुंफणही आहे. ती वाचणार्‍याला विचार करण्याकरिता प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाही.

- आणि लिखाणाचे विषय तरी किती वैविध्यपूर्ण! - कधी कुठल्याश्या समुद्रातल्या डॉल्फिन माशांची संख्या कमी होण्याविषयी, कधी जगावेगळ्या विषयांवर काम करणार्‍यांचे व्यक्ती-विशेष किंवा मुलाखती, कधी लहानांसाठी तर कधी मोठ्यांच्या कथा, कधी तिच्या शारीरिक अडचणींविषयी, कधी आपल्या विचारांना कलाटणी देणार्‍या विलक्षण सिनेमांविषयी, तर कधी अपंगांच्या समाजाने दुर्लक्ष केलेल्या लैंगिकतेविषयी! तिचे हे वैविध्यपूर्ण विषयांवरचे लेख वाचताना वाटायचं की, ही तिच्या घरात राहून जिथे गूगलही पोचू शकत नाही, अशा निरनिराळ्या विषयांवर इतकं अभ्यासपूर्ण लिहिते तरी कशी?

लिखाणाचं काम ती गंभीरपणाने, अत्यंत उत्कटतेने आणि समरस होऊन करते. त्यामुळेच ऑस्कर पिस्टोरिअसचं ‘ड्रीमरनर’ हे आत्मचरित्र असो किंवा सलमाची ‘अवर पास्ट मिडनाईट’सारखी कादंबरी असो, तिला त्यात नमूद केलेल्या धडपडीतली आणि तिच्या जगण्यातली साम्यस्थळं दिसू लागतात. ती त्या मूळ लिखाणाच्या गाभ्यात आधी पूर्णत: विरघळून जाते आणि त्या अंतरंगाचा भाग होऊनच अनुवाद करते.

‘अवर पास्ट मिडनाईट’ या कादंबरीचा अनुवाद तर त्यातल्या लैंगिक भावभावनांच्या जटिलतेसह तिच्याकरता अनेक बाबतीत पायरीपायरीवर प्रश्‍नचिन्ह उभी करणारा होता. परंतु तरीही, संपादिका कविता महाजनांनी तिच्यावर ठेवलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवत, त्यानंतरचे जवळपास नऊ महिने ध्यास घेतल्याप्रमाणे कादंबरीच्या संपूर्ण सामाजिक-प्रादेशिक आणि धार्मिक बाजाला जराही धक्का न लावता तिनं तिचं काम चोख केलं. इतकं की, २०२०मध्ये साहित्य अकादमीनंही त्या कामाची नोंद घेतली! असं हे तिचं कामाविषयीचं झपाटलेपण मेधा पाटकरांच्या लहानपणात शिरताना असतं, तसंच ‘जॉयस्टिक’ मधल्या कुमारवयीन मुलामुलींच्या गोष्टी सांगतानाही असतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या वर्षी सोनाली जेव्हा ‘मध्यरात्रीनंतरचे तास’च्या तिने केलेल्या अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी’ स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेली, तेव्हा घडलेला हा किस्सा. तिचं पुरस्कारासाठी नाव पुकारल्यावर रॅम्पवरून स्टेज चढायला अर्थातच तिला इतरांपेक्षा थोडा जास्त वेळ लागला. ते पाहून अध्यक्ष म्हणाले, ‘त्यांना कशाला वर यायचा त्रास? आम्हीच खाली उतरून येतो आणि पुरस्कार देतो’. त्यावर सोनाली तत्काळ स्वच्छपणे उत्तरली, ‘मी जर कोल्हापूरहून दिल्लीत येऊ शकते, तर या इथल्या स्टेजवर चढणं ही काय बडी बात आहे सर! होऊ दे सर्वांना माझ्या व्हीलचेअरमधून वावरण्याची सवय!’

अनेक व्यासपीठांवरून, व्याख्यानांमधून, कधी कुणा अधिकारी व्यक्तींशी झालेल्या चर्चांमधून सोनालीने अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अपंगांसाठी मैत्रीपूर्ण वास्तुरचना करण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे. त्याचा परिणाम होऊन कोल्हापुरात सिनेमा हॉल, दुकानं, हॉटेलं अशा ठिकाणी अपंगांसाठींच्या पायाभूत सुविधांबद्दल जाण तयार होते आहे. काही प्रमाणात का होईना, पण लोकांमध्ये अपंगांच्या शारीरिक, भावनिक व सांस्कृतिक गरजांबाबतीत संवेदशीलता जागी होऊन आज समानतेचा छोटा कोंब फुटला आहे.

असं सारं असलं तरीही, पाठीवर बैलगाडीचा जू पाठीवर पडण्याने वयाच्या नवव्या वर्षी तिला जे अपंगत्व आलेलं आहे, त्या सोबत जगणं तेवढसं सोपं नाही. तिची प्रकृती हट्टाने तिला दर थोड्या दिवसांनी दणके देते. कधी जुनी, कधी नवी दुखणी डोकं वर काढतात आणि तिला आतून घाबरवतात. एरवी आयुष्यात हव्या हव्याश्या वाटणार्‍या या स्वातंत्र्याची किंमत, अशा या आजारपणांच्या दरम्यान, तिच्या इतकी दुसर्‍या कुणीही मोजली नसेल. एक तर तिचे बरेचसे त्रास हे वैद्यकीयदृष्ट्या ‘अपेक्षितच’ असतात. त्यांच्यावर काहीही ‘उपचार’ नसतो. तीव्रता थोडीफार कमी करण्यासाठी मदत होईल अशी औषधं घेऊन बरं होण्याची वाट पाहावी लागते.

अशा वेळी मनाला जे मऊपण येतं, निराशा येते आणि कुणीतरी कुठलेही सांत्वनाचे शाब्दिक बुडबुडे न सोडता केवळ सोबत असावं असं वाटतं, तेव्हा तिच्या मनोबलाचा खरा कस लागतो. पण अखेरीस सोनाली त्यातूनही जिद्दीने, स्वत:च स्वत:ची उत्तम सुश्रुषा करून टिकून उरते नि निग्रहाने नव्या उत्साहात पुन्हा कामाला लागते.

अशा या तिच्या अटळ शारीरिक परिस्थितीमुळेच गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी अन्न-वस्त्र-निवार्‍याआधीही तिच्यासाठी तिची ‘प्रकृती’ ही जगातली सर्वांत मौल्यवान आणि महत्त्वाची गोष्ट ठरते. तिच्याइतकं शरीराशी तादात्म्य साधलेलं मी इतर कुणालाही पाहिलेलं नाही. तिला कधीही फोनवर ‘कशी आहेस?’ असं विचारलं की, तिचं पहिलं उत्तर हमखास तिच्या शरीर स्वास्थ्याच्या संदर्भातून येतं!

तिच्या कामासाठी समाजाकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापेसह तिचा कालानुरूप वाढलेला प्रचंड लोकसंग्रह हाताळणं हा तिच्या मागे लागलेला एक असाच नवा उद्योग! क्वचित कधी तिला मदतीसाठी कुणाला हाक मारावी लागते. त्यातून नव्याच गमती सुरू होतात. कुणी ‘समाजसेवा’, तर कुणी ‘देवाची सेवा’ म्हणून तिला मदत करतं. कुणी मग हक्काने वेळी-अवेळी येऊन तिची भेट घेऊ पाहतं. कुणाच्या नजरेत ‘दया’, तर कुणामध्ये मदतकर्ता म्हणून चक्क ‘हिरोइझम’ दाटून येतो. क्वचित कुणाच्या मनात ‘आपल्याशिवाय आयुष्यात हिने काय केलं असतं?’ असं काहीतरी येतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

खरं तर आपण सगळेच समाजाचा एक भाग म्हणून जगताना या ना त्या कारणाने कधी इतरांची मदत घेतो आणि त्याची वेळोवेळी परतफेडही करतो. पण सोनालीसारख्या व्यक्तींचं सामाजिक देवाणघेवाणीचं गणित दुर्दैवानं केवळ कृतज्ञ परतफेडींनी सुटत नाही - तिला त्याला स्पष्टपणे ‘सिद्धतेची’ धारही लावावी लागते. अपंगत्वाची तीव्रता जास्त असल्याने काही वेळा इतरांची मदत घ्यावी लागत असतानाच, स्वतःचा स्वाभिमानही जपणं, मदतकर्त्याविषयी कृतज्ञ राहून त्याच वेळी आपलं आयुष्य कुणाच्याही ताब्यात जाऊ न देण्याचा तोल सांभाळणं, ही मानसिकरीत्या प्रचंड दमवणारी कसरत सोनालीला दुर्दैवाने सतत करावी लागते. त्यामुळं येणारी वेदना, सल, राग, जाग तिच्या लेखनाला खाद्य पुरवते, तल्लख करते.

आपल्या देशात जवळपास तीन कोटी अपंग नागरिक आहेत. त्यांच्यापैकी सत्तर टक्के गावा-खेड्यातले! त्यामुळे बर्‍याच जणांना स्वतःच्या सबलीकरणासाठी आवश्यक वातावरण किंवा संधी मिळत नाहीत. मग बरेचदा ‘दिव्यांग’पणाचा शिक्का मारून समाज त्यांना त्या दिव्यत्वाच्या देव्हार्‍यात बसवतो नि त्यांच्या मानसिक-शारीरिक इच्छांची चक्क हिंसा करतो!

अशा पार्श्‍वभूमीवर सोनाली नवांगुळ नावाचं एक प्रखर व्यक्तिमत्त्व बत्तीस शिराळ्यासारख्या एका छोट्याश्या खेड्यातून कोल्हापुरात स्वावलंबी व्हायला येतं. पुरेसा अनुभव घेतल्यावर संस्थेचं ‘अपंगांसाठी’ म्हणून बनवलेलं सुरक्षित(!) कोंदण धाडसाने झुगारून देतं. आयुष्यात पहिल्यांदाच पूर्णतः स्वतंत्रपणे राहताना पोटापाण्यासाठी लेखणी परजत स्वतःचं नाव कमावतं. अनुभवांच्या निरनिराळ्या सडकांवरुन आपली चाकाची खुर्ची मजेत वेगानं दौडवतं आणि उत्तम पुस्तकं आणि अनुवाद लिहून स्वतःच्या कामाला ‘अपंगत्वाच्या’ शिक्क्याशिवाय एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं!

सोनालीचं आयुष्य अनेक पातळ्यांवर आव्हानात्मक आहे. त्यात वाढत्या तीव्रतेची शारीरिक आव्हानं तर आहेतंच, पण त्या सोबतच तिने स्वत:च स्वत:ला दिलेली आव्हानंही पुष्कळ आहेत. एखाद्या व्हिडिओ गेमप्रमाणेच जगण्यातल्या अनुभवांच्या प्रत्येक पातळीवर ही आव्हानं बदलत जातात नि कठीण होत जातात. मनात आणलं असतं तर तिला स्वत:पुरती काही मर्यादा केव्हाच आखता आली असती - आणि त्याचं काही विशेष न वाटता समाजाने त्याबद्दल तिला काही विचारलंही नसतं, पण तसं न करता तिने निवडलेला जगण्याचा मार्ग सोपा नाही. तो तिचा प्रचंड कस लावणारा आहे!

मुळात तिला इतरांसाठी कुणी प्रेरणास्थान, मखरातली पूजनीय दिव्यांग-मूर्ती किंवा फार अनुकरणीय समाजसेविका म्हणून जगायचंच नाही. तिला जगायचंय ते एक सामान्य ‘माणूस’ म्हणून! एक अत्यंत गुणवत्तापूर्ण, चोखंदळ, स्वच्छंद, रसिक आणि स्वतःला भावणारं खाजगी आयुष्य जगणारं माणूस. मग तसं जगताना ती अपरिहार्यतेने कधी चुकेल, ठेचकाळेल, धडपडेलही- पण पुन्हा उठेल आणि धावू लागेल, नव्या चुका करण्यासाठी...

प्रश्‍न हा आहे की, जर सोनाली स्वतः रोज नव्या वाढत्या आव्हानांना तोंड द्यायला तयार आहे, तर आपण समाज म्हणून तिला कुठल्याही पूर्वग्रहांशिवाय, स्टिरिओटाईप्ड कोंदणांशिवाय, कुठल्याही ‘इझम’शिवाय समानतेच्या पातळीवर एक माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहोत का?

परिमला प्रभूदेसाई | parimalabhole@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा