फिफा २०२२ : या जागतिक फुटबॉल स्पर्धेतले काही रोमहर्षक, संस्मरणीय आणि मन हेलावून टाकणारे क्षण…
पडघम - क्रीडानामा
राजेंद्र हवालदार
  • लेखातील सर्व छायाचित्रं - गुगलवरून साभार
  • Mon , 16 January 2023
  • पडघम क्रीडानामा फिफा वर्ल्ड कप Fifa World Cup

खेळ म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर प्रसिद्ध खेळाडू, खेळातले वैयक्तिक अन सांघिक विक्रम, खेळातले बदलते तंत्रज्ञान इत्यादी बाबी येतात. खेळ म्हटलं की, हार-जित, मैदानावरची चुरस आली... शारिरीक अन मानसिक क्षमतेचा कस आला.

पण हे सगळं असलं तरी खेळ आपल्याला यापेक्षा वेगळंच काहीतरी देऊन जातो. उदा., संघभावना, समूह म्हणून, समाज म्हणून, एक माणूस म्हणून विकसित होण्याच्या वाटेवर मार्गदर्शकाचं काम खेळ करत असतो.

क्रीडाविश्वात ऑलिम्पिक खालोखाल लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉलची ‘विश्वचषक स्पर्धा २०२२’ नुकतीच कतार या देशात पार पडली. या स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर\राजदूत असणारा घनिम अल मुफ्ताह हा वीस वर्षांचा तरुण जन्मत:च पायानं अधू आहे. तरीही तो ‘पॅराऑलिम्पिक’ स्पर्धेत खेळायची मनीषा बाळगून होता… ते त्याचं स्वप्न साकार झालं.

या स्पर्धेची वैशिष्ट्यं सांगताना जपानची शिस्तबद्धता पहिल्या प्रथम डोळ्यासमोर येते. सामन्यानंतर स्टेडियममधला कचरा उचलणारे जपानी नागरिक अनेकांनी टीव्हीच्या पडद्यावर बघितले असतीलच. जेव्हा जपानने जर्मनीवर मात केली, तेव्हा शिबुया या टोकीओमधल्या एक खूप रहदारी असलेल्या चौकात रेड सिग्नल चालू असताना भर रस्त्यात विजयोत्सव साजरा करणारे जपानी नागरिक, सिग्नल हिरवा होताच वाहतुकीस रस्ता मोकळा करून देताना दिसले. जपानची ही शिस्तबद्धता ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्राच्या छायाचित्रकाराने टिपली आहे.

आपल्या भारतातले कोलकात्यापासून दीडशे किमीवर असणारे मिरपूर हे गाव पोर्तुगाल या देशाशी गेली तीनशे वर्षे जोडलं गेलेलं आहे. इथं शंभरच्या आसपास पोर्तुगीज वंशाची कुटुंबं राहतात. जेव्हा कधी पोर्तुगालचा सामना असतो, तेव्हा सगळं गाव लाल-हिरव्या रंगात न्हाऊन निघतं. इथला पोर्तुगीज युवा संघ रोनाल्डोचा पाठिराखा आहे.

भारतातल्या फुटबॉलप्रेमींचा सर्वांत जास्त पाठिंबा ब्राझीलला मिळतो. ब्राझीलचा संघ भारताचा असल्याप्रमाणे हे फुटबॉलप्रेमी या संघाची पाठराखण करत असतात. जेव्हा सर्बियाविरुद्ध सामना खेळण्यासाठी ब्राझीलचा संघ मैदानात उतरत होता, तेव्हा संघासोबत असणाऱ्या शाळकरी मुलांच्या चमूत जोश सिंग हा भारतीय वंशाचा मुलगा ब्राझिलियन फुटबॉलपटू नेमारला सोबत करत होता. सामन्याअगोदर जेव्हा ब्राझीलचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं, तेव्हा जोश सिंगच्या खांद्यावर नेमारने आपले हात घट्ट धरून ठेवले होते.

स्वित्झर्लंड या देशाने कॅमेरून या देशाचा १-० असा पराभव करून विश्वचषकातल्या मोहिमेची सुरुवात केली. जन्माने कॅमेरूनचा असणाऱ्या अन् स्वित्झर्लंडकडून खेळणाऱ्या ब्रील एम्बोलो या खेळाडूने शेवटचा एकमेव गोल करून स्वित्झर्लंडला विजय मिळवून दिला. पण आपल्या जन्मभूमीविरुद्ध गोल केलेल्या ब्रीलने आपले दोन्ही हात जोडून उंचावत आपल्या जन्मभूमीची माफी मागत विजयाचा उत्सव साजरा करणं टाळलं.

स्वित्झर्लंडकडून पराभूत झालेल्या कॅमेरूनकडून, विश्वविजेतेपदाचा दावेदार असणाऱ्या ब्राझीलवर एकमात्र विजयी गोल केला तो व्हिन्सेंट अबुबाकरने. तो विजयी गोल केल्यानंतर आनंदाच्या भरात व्हिन्सेंटने अंगातला शर्ट काढत मैदानाबाहेर धाव घेतली. त्याच्यापाठोपाठ सगळी टीम हा आनंद साजरा करण्यास धावली. त्या सामन्याचे रेफ्री इस्माईल एल्फाथ हे मैदानावरून सर्व पहात होते. या सामन्यात व्हिन्सेंटला एक पिवळे कार्ड मिळालं होतं. त्याची शर्ट काढण्याची कृती नियमबाह्य असल्याने त्याला दुसरं पिवळं कार्ड मिळणार हे निश्चित होतं. एकाच सामन्यात दोन पिवळी कार्डं याचा अर्थ होता- एक लाल कार्ड व खेळण्यावर तात्पुरती बंदी. व्हिन्सेंट आपल्या सहकारी खेळाडूंसोबत मैदानात येताच रेफ्री ईस्माईल यांनी त्याची पाठ थोपटून गोल केल्याबददल अभिनंदन केलं अन् पाठोपाठ पिवळं कार्ड दाखवलं. व्हिन्सेंटने पिवळ्या कार्ड पाठोपाठ रेड कार्ड हसत हसत स्वीकारून रेफ्रींशी कसलीही हुज्जत न घालता मैदान सोडलं. त्या सामन्यात रेफ्री इस्माईल यांनी नुसती कर्तव्यतत्परताच दाखवली नाही, तर आपल्यातल्या माणुसकीचंही दर्शन घडवत अवघ्या स्टेडियमचं मन जिंकलं.

या स्पर्धेत सर्वांत अविस्मरणीय कामगिरी केली, ती मोरोक्को या देशाने. डेरोईच फक्रुद्दीन हा मोरोक्कोचा नागरिक कतारमध्ये फुटबॉल स्टेडियममध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करत होता. मोरक्को व स्पेन दरम्यानच्या सामन्यातही डेरोईच सुरक्षारक्षक म्हणून मैदानावर तैनात होता. मैदानाकडे पाठ करून व प्रेक्षकांकडे तोंड करून लक्ष ठेवणं व गैरप्रकार थांबवणं, हे त्याचं मुख्य काम. आपल्या देशाचा सामना असूनही कर्तव्याला प्राधान्य देत डेरोईच संपूर्ण सामना होईपर्यंत मैदानाकडे पाठ करून उभा होता. सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत मोरोक्कोकडून अश्रफ हकीमी या खेळाडूने गोल केला, तेव्हा काही क्षणांसाठी डेरोईचने मैदानाकडे नजर टाकली. विजयाचा जल्लोष करणाऱ्या आपल्या देशाच्या संघाकडे अश्रुभरल्या नजरेनं पाहणाऱ्या डेरोईचने अत्युच्च कर्तव्यभावनेचं प्रदर्शन करत जगभरात तो सामना पाहणाऱ्या सर्वांचं मन जिंकलं.

स्पेनविरुद्धच्या सामन्यात गोल करून मोरोक्कोला विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीत नेणाऱ्या अश्रफ हकीमाचे माता-पिता सईदा व हसन हकीमी हे मोरोक्कोतून स्पेनमध्ये स्थलांतरित झालेले. सईदा या माद्रिदमध्ये घरकाम करतात, तर हसन रस्त्यावर विक्रेता म्हणून कष्ट करत घर चालवतात. अश्रफचा जन्म स्पेनमध्येच झालेला.

इव्हान पेरेसिक हे नेहमी क्रोएशियाच्या संघावर टीका करत, जरी त्यांचा मुलगा लिओ क्रोएशियाच्या संघातून खेळत असे. पण जेव्हा क्रोएशियाने ब्राझीलला हरवलं, तेव्हा लिओने आत येणाऱ्या क्रोएशियन खेळाडूंकडे धाव न घेता, या पराभवाने आपलं स्पर्धेतलं अस्तित्व संपल्याचं लक्षात येऊन निराश झालेल्या नेमारकडे धाव घेतली. त्याला सुरक्षारक्षकांनी अडवताच नेमारने रक्षकांना तसं करण्यापासून परावृत्त करून त्याला जवळ येऊ दिलं. जवळ जाताच लिओने नेमारला घट्ट मिठी मारली, त्याचं सांत्वन केलं.

इराणमधून आलेली मायामी असगरी ही तरुणी या काळात स्टेडियम बाहेर डोक्याला मुस्लीम पद्धतीचा स्कार्फ बांधून फुटबॉलसोबत निरनिराळ्या कसरती करून सामना पहायला येणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या फुटबॉलप्रेमींचं मनोरंजन करताना सातत्यानं दिसत होती. प्रेक्षक जेव्हा तिला तिचा पेहराव व तिचा खेळ याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा ती आत्मविश्वासाने म्हणाली- ‘जरी मी एक परंपरा पाळणारी मुस्लीम स्त्री असले, तरीही मी फुटबॉल खेळते अन् मला असं करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही’.

व्हॅन गॉल हे ‘ऑरेंज आर्मी’ म्हणून जगभर ओळखल्या जाणार्‍या नेदरलँडचे प्रशिक्षक. २०२०मध्ये कॅन्सरचं निदान झालेले अन् विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून संघ निवडला जाईपर्यंत वीसपेक्षा जास्त केमोथेरपी घेतलेले… व्हॅन गॉल यांनी आपला गंभीर आजार संपूर्ण संघापासून लपवून ठेवला. दरवेळेस उपचारांसाठी ते कोणालाही न सांगता इमारतीच्या मागच्या बाजूनं बाहेर पडायचे. उपचार घेऊन परत मागच्याच दरवाजाने संघात सामील व्हायचे. उपचाराचा अविभाज्य भाग असणारी कोलोस्टॉमी बॅग अन कॅथेटर ट्रॅकसूटखाली लपवून व्हॅन गॉल मैदानात खेळाडूंना मार्गदर्शन करायचे. केमोथेरपीच्या प्रचंड वेदना सहन करत नेदरलँडला उप-उपांत्य सामन्यापर्यंत नेणारे व्हॅन गॉल हे फुटबॉलप्रेमींच्या दीर्घकाळ लक्षात राहतील, यात कसलीही शंका नाही.

मैदानावरचं कौशल्य, ईर्ष्या, प्रेम, सहानुभूती तर आपण पाहिली आहेच, पण मैदानाबाहेरही फुटबॉल विश्व समृद्ध आहे, कारण इथं वैयक्तिक सुख-आनंद बाजूला सारून कर्तव्यदक्ष राहणारा, कठोर निर्णय घेतानाच स्वतःमधला माणुसकीचा अंश जपणारा, कर्तव्य पार पाडताना जन्मभूमीला न विसरणारा, रूढी-परंपरा यांना तात्त्विक विरोध करतानाच स्वतःचा आनंद कशात आहे, हे शोधाणारा, स्वतःच्या चुका न चिडता स्वीकारणारा, कर्तव्यापुढे वैयक्तिक सुख-दुःख बाजूला ठेवण्याची प्रेरणा देणारा, माणुसकीनं ओतप्रोत भरलेला पाठीराखा आहे. खेळामुळे जग जवळ येतं, असं म्हणतात ते का, याची प्रचिती अशा प्रसिद्धीपासून दूर राहून फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या लोकांकडे बघून येते.

.................................................................................................................................................................

राजेंद्र हवालदार

rajendra.hawaldar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा