कॉर्नेल वेस्ट : ‘‘आंतरराष्ट्रीयत्व’ हा आरंभ बिंदू आहे. त्यामुळे आपली ऐतिहासिक, संरचनात्मक आणि मनोविश्लेषणात्मक समज वाढीला लागते. जगभरात कोणत्या शक्तींचं प्राबल्य आहे, हे कळून येतं.”
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
स्रेको होव्हार्ट
  • कॉर्नेल वेस्ट
  • Fri , 13 January 2023
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कॉर्नेल वेस्ट Cornel West स्रेको होव्हार्ट Srećko Horvat ‘आंतरराष्ट्रीयत्व Internationalism

‘डेमॉक्रसी इन युरोप मूव्हमेंट’ आणि ‘सँडर्स इन्स्टिट्यूट’ यांनी डिसेंबर २०१८मध्ये जगातील पुरोगामी शक्तींना एक सामायिक आघाडी तयार करण्यासाठी खुलं आवाहन केलं. त्यानंतर काही व्यक्ती आणि संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ हा मंच सुरू केला. काही समविचारी व्यक्ती आणि चळवळी या गटासोबत आहेत. ज्या देशातील लोकशाही धोक्यात आलेली असते, तिथं ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’चे निरीक्षक पाठवले जातात. त्यासंदर्भातील वृत्तान्त, मुलाखती आणि लेख संघटनेच्या वेबपोर्टलवर प्रकाशित केले जातात.

अमेरिकेमध्ये १९९२ साली आफ्रिकन-अमेरिकन असलेल्या रॉडनी किंग यांना मारहाण केली गेली. हे प्रकरण न्यायालयात गेलं. तिथं हिंसेचं चित्रीकरण पुरावा म्हणून दाखवलं गेलं. गुन्हा सर्वांसमक्ष झाला होता, तरीही निकाल चार गोऱ्या पोलिसांच्या बाजूनं लागला. या निर्णयामुळे जनक्षोभ उसळला, दंगल सुरू झाली आणि कॉर्नेल वेस्ट यांना या विषयावर पुस्तक लिहावंसं वाटलं. ‘रेस मॅटर्स’ हे त्यांचं पुस्तक १९९३ साली प्रकाशित झालं.

कॉर्नेल वेस्ट वंश, वर्ण, आफ्रिकन-अमेरिकन संस्कृती, वैचारिक साहित्य, संगीत, धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अभ्यासक आहेत. त्यांचं ‘डेमॉक्रसी मॅटर्स’ हे पुस्तक २००४ साली प्रकाशित झालं. त्या नंतरचं पुस्तक म्हणजे ‘ब्लॅक प्रोफेटिक फायर’ (२०१४). हार्वर्ड आणि प्रिन्स्टन या विद्यापीठांत ब्लॅक यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. त्या शिवाय त्यांना प्रतिष्ठित फेलोशिपही मिळाल्या होत्या.

गेल्य आठवड्यात ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ या गटाचे सभासद स्रेको होव्हार्ट यांनी त्यांची मुलाखत घेतली. सतत बदल होणाऱ्या या जगात एकत्र येणं आणि चर्चा होऊन एकमत होणं, हे कितपत शक्य आहे, या विषयी त्यांनी चर्चा केली. या मुलाखतीचा हा मराठी अनुवाद...

.................................................................................................................................................................

स्रेको होव्हार्ट - ‘क्रांतिकारी आंतरराष्ट्रीयत्व’ या संकल्पनेबद्दल तुम्ही बरंच लेखन केलं आहे. या संकल्पना तुम्हाला प्रेरित करतात. फ्रान्झ फॅनन, अली शरियती, कार्ल मार्क्स, रोझा लकझेंबर्ग, एमा गोल्डमन, मार्टिन ल्युथर किंग आणि इतर काहींनी असेच विचार मांडले आहेत. तुम्हाला त्यांच्याकडून नेमकं काय मिळालं? त्यांच्याकडून काय घ्यायला हवं? आजच्या आंतरराष्ट्रीयत्वाला कोणत्या महत्त्वाच्या क्रांतिकारक कल्पनांची गरज आहे? या संकल्पना केवळ कागदावर राहण्याचा धोका उद्भवतो आहे का?

कॉर्नेल वेस्ट – माझ्यासाठी ‘आंतरराष्ट्रीयत्व’ हा नेहमीच आरंभ बिंदू असेल. तो तसा नसेल, तर तुम्हाला अनेक मुद्दे दिसणार नाहीत. उदाहरणार्थ, आपल्या सरकारच्या उणिवा, देशांतर्गत प्रश्न आणि परराष्ट्र धोरण. आजच्या घडीला ‘राष्ट्रवाद’ हा विचार रुजवला जातोय. तो आपल्या घरापर्यंत पोचला आहे. आपल्या विचारात तो रुजलाय. या राष्ट्रवादाने हिंसाचाराला जन्म दिलाय आणि त्याने सरकारच्या यंत्रणेवर मक्तेदारी मिळवलीय. आपल्या रोजच्या जीवनात त्याचा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवाद हा माझ्यासाठी एक अडथळा आहे. त्यामुळे एक देश दुसऱ्या देशाशी जोडला गेलेला असतो वा एका साम्राज्याची नाळ दुसऱ्या साम्राज्याशी जोडलेली असते, हे आपल्याला समजून येत नाही. तसंच साम्राज्य इतर देशांशीही जोडलं गेलेलं असतं, हे तरी कुठे समजून येतं? 

‘आंतरराष्ट्रीयत्व’ हा आरंभ बिंदू आहे, पण तो केवळ नैतिक आणि आध्यात्मिक पातळीवरील नव्हे, तर त्याच्यामुळे आपली ऐतिहासिक, संरचनात्मक आणि मनोविश्लेषणात्मक समज वाढीला लागते. जगभरात कोणत्या शक्तींचं प्राबल्य आहे, हे कळून येतं. उदाहरणार्थ, तेराव्या शतकापासून तो विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपिय देशांचं प्राबल्य होतं (१४९२ ते १९४५). दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन साम्राज्याचा उदय झाला. त्यामुळे गरीब देशांची संरचनात्मक लूटमार सुरू झाली. जगात कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, या संबंधीची आपली जाणीव वाढवली पाहिजे. एका बाजूला अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विळखा, तर दुसऱ्या बाजूला बोगस नव-उदारमतवाद वाढीला लागलेला दिसतो. त्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्याची जरुरी आहे. दुसऱ्या बाजूला आपला दृष्टीकोन, आपली उद्दिष्टं, यांबद्दल स्पष्टता असली पाहिजे. संस्थात्मक क्षमतेशिवाय कितीही भव्य आंतरराष्ट्रीय योजना प्रत्यक्षात उतरत नाहीत. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

स्रेको – तुम्ही अमेरिकी साम्राज्याचा उल्लेख केलात. आता करोनानंतर चित्र बदलल्याचं दिसतंय. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य स्वगृही परतलं आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू आहेत आणि रशियाविरोधात अमेरिका आणि नाटो (NATO) यांनी फळी उभी केली आहे. अमेरिकी साम्राज्याचा प्रभाव राहिलेला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली जागतिक राजकीय रचना आता बदलत आहे. विश्वाची आजची रचना बहुध्रुवीय आहे. चीनचं प्राबल्य वाढत चाललं आहे. त्यामुळे पॅसिफिकमध्ये नवीन संघर्ष दिसून येत आहेत. आता केंद्र परिघाकडे सरकलेलं दिसतंय. जगाचा नकाशाही बदलतोय. याकडे तुम्ही कसं पाहता?

कॉर्नेल - भविष्य नेहमीच अर्धवट, अपूर्ण आणि बिनभरवश्याचं असतं. तरीही जगभरात फॅसिझमने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मला इतकं नकारात्मक बोलताना वाईट वाटतंय. पण या परिस्थितीत आशेचा किरण दिसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रागतिक आणि डाव्या विचारांवर आधारित असलेलं कृतिशील व्यासपीठ दृष्टीपथात दिसत नाही. दुसऱ्या बाजूला नव-उदारमतवादाला प्रतिष्ठा राहिलेली नाही. उबग येईल एवढी संपत्ती, असमानता, विषमता आहे. करोना साथीनंतर लोकांना पर्याय हवे आहेत. अमेरिकेमध्येही लोकांना पर्याय हवा आहे. तिथं अजूनही एका वर्गाचा प्रभाव आहे. धनिक, फॅसिस्ट सरकार आणि सैन्य यांची युती झालेली आहे. गौरवर्णीय वर्चस्व आहेच, त्या शिवाय ज्यू, अरब-मुस्लीम, समलिंगी स्त्री-पुरुष, एलजीबीटीक्यू यांच्याबद्दलची घृणा रुजलेली आहे. त्यामुळे येत्या काळात पैसा आणि लष्कराचं वर्चस्व दिसणारच आहे. त्यासोबत परवंशीय आणि परदेशीयांबद्दल भीती आणि घृणा पसरवली जाणार आहे. 

स्रेको - या पार्श्वभूमीवर युरोपातही लष्करीकरण होईल असं वाटतं का? अलीकडेच जर्मन सरकारने शस्त्रास्त्रांसाठी १०० अब्ज युरोची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे. हे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच घडतंय. आपल्याला शांतता हवी असेल, तर शस्त्रास्त्रं उद्योगाने अधिकाधिक शस्त्रास्त्रं पुरवली पाहिजेत, असं आता शांततावादीही म्हणू लागले आहेत. हा विरोधाभास आहे की नाही? आता तुम्ही युरोपकडे कसं बघता? वसाहतीकरणामुळे युरोप महाशक्ती झाला होता, असं तुम्ही लिहून ठेवलं आहे. आता तिथं लष्करीकरणात मोठी गुंतवणूक केली जात आहे, भिंती पुन्हा उभ्या केल्या जात आहेत. आणि ‘नाटो’च्या माध्यमातून अमेरिकेच्या युद्धात सामील होत आहेत.

कॉर्नेल - युरोपला आपल्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटत आहे, पण स्वत:च्या देशातील फॅसिस्ट विचार त्यांनी प्रथम मोडून काढला पाहिजे. जगभरातील अनेक देशांत दंगली आणि दुफळ्या माजल्या आहेत, अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. या देशांतले अनेक नागरिक आशिया, युरोप आणि अमेरिका खंडातील देशांत स्थलांतर करत आहेत. रशियाचा विस्तारवाद जगासमोर दिसू लागला आहे. यूक्रेन हस्तगत करण्यासाठी रशियाने ताळतंत्र सोडलं आहे. रशियामध्ये नव-फॅसिस्ट वर्ग उदयाला आला आहे. रशियाचा तथाकथित गौरवशाली भूतकाळ परत आणला पाहिजे, असं या वर्गाला वाटतं आहे. युक्रेन पूर्वी वसाहतीचा भाग होता, आता तो स्वतंत्र देश आहे, हे या वर्गाला मान्य नाही. आणि त्यांना युक्रेनचा भू-भाग हवाय, नागरिक मात्र नकोत. युरोपने आपल्या क्रांतिकारी आणि प्रगत विचारांच्या वारश्याशी परत जोडून घेतलं पाहिजे. वसाहतीकरण ही युरोपची एक बाजू, तर दुसरी बाजू म्हणजे वसाहतीकरण आणि भांडवलशाही विरोधातील चळवळ, प्रगत विचार, मार्क्स-एंजल्स, यांना परत आणलं पाहिजे. तसंच आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील वसाहत विरोधातील चळवळींशी जोडून घेतलं पाहिजे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्रेको – डिसेंबर महिन्यात तुमच्याशी बोलत असताना इथं उष्णतेची लाट आली आहे. स्पेन, पोर्तुगल, फ्रान्स इथंही तापमानात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानातही उष्णता वाढली होती. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत जगभरात अण्वस्त्र आणि युद्धविरोधात चळवळी झाल्या होत्या. व्हिएतनाम युद्धाविरोधासोबत अण्वस्त्र विरोधातही आंदोलनं झाली होती. पण आताच्या हवामान बदलाच्या विरोधातील चळवळी युद्धविरोधात काही बोलत नाहीत. या दोन वेगळ्या चळवळींना एकत्र आणून एका मोठ्या लढ्याला सुरुवात करता येईल का?

कॉर्नेल – तुम्ही अचूक विधान केलं आहे. युद्ध-विरोध आणि पर्यावरणाच्या चळवळींनी एकत्र आलं पाहिजे. त्यासोबत सैनिकीकरण आणि शोषण करणाऱ्या भांडवलशाहीविरोधातील आंदोलनांशीही जोडून घेतलं पाहिजे. केवळ फायदा बघणारे उद्योग निसर्गाचं, तसंच कामगारांचं शोषण करतात. गेल्या महिन्यात ‘कॅथलिक वर्कर्स यूनियन’ सुरू करणाऱ्या डोरोथी डे यांच्या कार्याबद्दल बोलण्यासाठी मला बोलावलं होतं. तिथं त्यांची नात मार्थाची भेट झाली. मार्था आण्विक शस्त्रास्त्रांविरोधात चळवळ करते. आण्विक पाणबुडीवर तिने आपलं रक्त टाकलं म्हणून तिला अटक करण्यात आली होती. युद्धविरोधातील आंदोलनाचं हे एक अप्रतिम उदाहरण. तिला लवकरच सोडण्यात आलं. डोरोथी डे यांच्या स्मृतीला विस्मयकारक श्रद्धांजली दिली गेली. युद्धविरोध आणि आण्विक शस्त्रास्त्रांविरोधात डोरोथी डे, फिलिप बेरिगन आणि इतरांनी लढा दिला होता. हा लढा वांशिकभेदाविरोधी, युद्धविरोधी, अण्वस्त्रविरोधी, साम्राज्यवादविरोधी, वर्णद्वेषविरोधी, लिंगभेदविरोधी आणि भांडवलशाहीविरोधी लढा होता. असे लढे प्रकाशझोतात यायला हवेत, पण त्यांना प्रसारमाध्यमांतून पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. गरिबांच्या चळवळींना एवढी प्रसिद्धी मिळाली पाहिजे, जेवढी डोरोथी डे आणि मार्टिन लूथर किंग यांना मिळाली. यामध्ये आर्थिक आणि  सैनिकी आपत्तीसोबत, कामगारांवर होणारे हल्ले आणि  पर्यावरणीय  संकटाचाही अंतर्भाव असावा.

स्थानिक मुद्दे, तसंच आंतरराष्ट्रीयतेची सांगड घालणारा गट तयार करण्याचा प्रयत्न करायला हवा. जे क्रोएशियाबद्दल खरं आहे, तेच अमेरिकेबद्दल. आपण सगळीकडे संघर्ष करत आहोत, तरी लोकांचाच शब्दच शेवटी सगळ्यात महत्त्वाचा असतो.

.................................................................................................................................................................

मराठी अनुवाद - अलका गाडगीळ

मूळ इंग्रजी मुलाखतीसाठी पहा -

https://act.progressive.international/the-internationalist-issue-1/

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा