बौद्ध धर्म आणि जागतिक शांतता – मानवजातीसमोरील एक वळण
पडघम - सांस्कृतिक
ख्रिस्तोफर क्वीन
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 06 December 2022
  • पडघम सांस्कृतिक भगवान गौतम बुद्ध Bhagwan Gautam Budha बौद्ध धम्म Baudha Dhamma डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar दलित Dalit

हा लेख ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या डॉ. भालचंद्र मुणगेकर व आकाश सिंग राठोड यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील ‘Buddhism and World Peace: A Turning Point for Humanity’ या लेखाचा  हा अनुवाद आहे. २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या ‘पहिल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स’मध्ये सादर केल्या गेलेल्या शोधनिबंधांचा समावेश या संग्रहात केला असून हे पुस्तक नवी दिल्लीतील Bookwell या प्रकाशनसंस्थेने २००७मध्ये प्रकाशित केले आहे.

प्रस्तुत लेखाचा अनुवाद - कुमुद करकरे

..................................................................................................................................................................

या ऐतिहासिक परिषदेचे स्वप्न समोर ठेवून तिचे आयोजन करण्यात पुढाकार घेणारे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मी प्रथम आभार मानतो. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमान पद भारतानेच सांभाळणे उचित आहे, कारण शांतता प्रस्थापनेच्या बौद्ध परंपरेची जन्मभूमी आणि जगात पुनरुज्जीवित होत चाललेल्या बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार होत असलेला एक मोठा प्रदेश म्हणून भारताचे स्थान अढळ आहे. यासाठी मुणगेकरांसारखे भारत सरकारमधले एक ज्येष्ठ पदाधिकारी, विद्वान, सामाजिक न्याय, आर्थिक सुधारणा आणि जागतिक शिक्षण प्रसार यांची आग्रहपूर्वक तरफरी करणारे या विषयावरील भाष्यकार या परिषदेला संयोजक म्हणून लाभले आणि त्यांच्या अथक परिश्रमांनी केलेले नियोजन आणि विविध घटकांचा घातलेला सुसंवाद यांनी ही परिषद संपन्न केली, यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

डॉ. मुणगेकरांप्रमाणेच येथे जमलेले आपण सर्व दुसऱ्या एका थोर भारतीय नेत्याच्या म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या, त्यांनी मानवी प्रतिष्ठा आणि नागरी हक्क यांच्यासाठी दिलेला लढा, आधुनिक भारताचा त्यांनी घातलेला पाया आणि आधुनिक जगाचे त्यांनी आपल्या शिकवणीतून केलेले वैचारिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थान यासाठी ऋणात राहणे आवश्यक आहे. वास्तविक ते चैतन्याने क्रियाशील झालेले बोधिसत्वच आहेत. जर ते आज येथे उपस्थित असते, तर त्यांनी आपल्या विचारांचा प्रखर प्रकाशझोत ‘बौद्ध धर्म आणि जागतिक शांतता’ या विषयावर टाकला असता. त्यासाठी भारताच्या वैचारिक विश्वात रमलेले लेखक आणि पाश्चिमात्य जगातले तत्त्वज्ञानी, इतिहासतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि कवीसुद्धा – जे त्यांना अतिपरिचित होते - अशांना या परिषदेत बोलावले असते. आणि मग ‘बायबल’ काळातील एखाद्या प्रेषिताप्रमाणे आपला आवाज चढवून आपण आजच्या जगातल्या भीषण परिस्थितीला कसे सामोरे जात आहेत, यासंबंधी त्यांनी इशारे दिले असते.

जगामध्ये आज संपत्ती आणि संधी यांच्या उपलब्धतेमध्ये आलेली विषमता; पाणी, अन्न, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यांच्या पुरवठ्यामध्ये पडलेल्या दऱ्या, आणि जागतिक पातळीवर निर्बल राष्ट्रांचे सबलांकडून आणि मोठमोठ्या अर्थसंस्थांकडून होणारे शोषण यांच्यावर ते तुटून पडले असते. सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहार, लक्षावधी मानवांचा संहार करणारी आधुनिक शस्त्रास्त्रे, गरीब आणि श्रीमंत दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांना सारखीच भेडसावणारी संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद आणि शेवटी, वंश, धर्म, जाती यांच्यावरून समाजात पडलेल्या भेगा, वंशवाद, राष्ट्रवाद आणि संस्कृती यांच्यावरून वाढलेले दीर्घ द्वेष आणि तिरस्कार या सर्व प्रवृत्तींचा त्यांनी प्रखरपणे निषेध केला असता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पण आंबेडकर एवढेच करून थांबले नसते. तर मानव जात आता अतिमहत्त्वाचे वळण घेत आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुरावा गोळा केला असत. सध्या आपण अशा कालखंडात आहोत, जेव्हा जागतिक स्तरावरील दळणवळण व संपर्क व्यवस्था, या यामुळे लोकांना एकत्र येऊन त्यांच्या समोरील आपत्तींशी सामना करता येईल. अफाट भौतिक आणि तांत्रिक साधनसामग्रीचे स्त्रोत आणि सहानुभूती आणि करुणेने भारलेल्या स्वयंसेवकांच्या सेना भूकंप, त्सूनामी आणि युद्धासारख्या आपत्तींना बळी पडलेल्यांच्या सेवेसाठी धावतील; युनो (संघ), आंतरराष्ट्रीय न्यायालय, यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे निर्णय मानले जाऊन त्यांना काम करू दिले जाईल. उपयुक्त विधायक कामासाठी विविध देशांची सरकारे एकत्र येऊन काम करतील आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, ज्यू आणि बौद्ध असे सर्व जण आपले सर्व साधनस्त्रोत एकत्र करून आपल्या मुलांना वाढवतील, या सर्व गोष्टींची जाणीव डॉ. आंबेडकरांनी आपल्याला निश्चितपणे करून दिली असती.

आणि शेवटी डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अतिशय प्रिय आणि त्यांच्या जीवनाची अखेरची वर्षे व्यापून टाकणाऱ्या आणि ज्या साठी प्रकृती-अस्वास्थ्याला आणि राजकीय नैराश्याला तोंड देत त्यांनी आयुष्यातल्या सर्वश्रेष्ठ विषयावरील लिखाण प्रसिद्ध केले, तो विषय म्हणजे ‘बौद्ध आणि सामाजिक, परिवर्तन’. त्यावर त्यांनी केलेले भाष्य फार विचारप्रचूर आणि विदारक होते. डॉ. आंबेडकारांनी त्यांच्या निधनापूर्वी काहीच दिवस आधी केलेले ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ हे भाषण आणि त्यांचे शेवटचे पुस्तक ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ज्याचे संपादन त्यांच्या जीवनाच्या अखरेच्या क्षणापर्यंत ते करत होते. या दोघांमधून त्यांनी आपल्या काळातली आव्हाने आणि त्यामागे दिसणारे आशेचे किरण आपल्यासमोर उभे केले.

शांतता आणि न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी बौद्ध तत्त्वज्ञान जगाला कसे मार्गदर्शक ठरू शकेल, याचेही विवेचन त्यांनी केले. डॉ. आंबेडकरांनी या विषयांवर स्पष्टीकरण देताना त्या वेळी इतर कोणशी विचारविनिमय न करता स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडली होती, हे फारच थोड्यांना माहिती होते. बौद्धांच्या परंपरांचा आधार घेत त्यांनी आपल्या काळासमोरील आव्हानांचे धाडसीपणाने आणि नवा मार्ग अनुसकरून आविष्करण केले. १९५६ साली नागपूरला धर्मपरिवर्तनासाठी सर्व जमले असता, आधीच्या संख्याकाळी पत्रकारांनी आंबेडकरांना ते आणि त्यांचे अनुयायी दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्या प्रकारचा बौद्धधर्म स्वीकारणार आहेत, याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले, “भगवान बुद्धांनी स्वत: जे ज्ञान लोकांसमोर प्रकट केले, त्याच्या मर्यादांमध्ये आमचा बौद्ध धर्म राहील. हीनयान आणि महायान या धर्माच्या अनुयायांच्या दोन फळ्यांपासून तो मुक्त राहील. आमचा बौद्ध धर्म नवा असेल, त्याचे वाहन नवे असेल. आपण त्याला ‘नवायन’ म्हणू.”

माझ्या आजच्या विवेचनात डॉ. आंबेडकरांचा विचार आणि त्याच्याभोवतीची दलितांची धर्मपरिवर्तनाची चळवळ केंद्रस्थानी ठेवून काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या निष्कर्षांना गेल्या पन्नास वर्षांत आशियातील बौद्धधर्मीय राष्ट्रे आणि पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले बौद्ध समाज, यांच्या बौद्धधर्मीय परंपरा ज्या जागतिक फेरबदलामुळे लयाला गेल्या, त्याचाही संदर्भ आहे. भारतातील दलित समाजांप्रमाणे वर निर्देशित केलेले समाजही दडपशाही आणि हिंसा यांचा अवलंब करणाऱ्या शक्तींविरोधात झगडत आहेत. आणि भारतातील दलितांप्रमाणेच जगण्याचे आणि अस्तित्व टिकवून धरण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. त्याचबरोबर जुन्या राखेवर नव्या समूहांची उभारणीही करत आहेत. या प्रक्रियेत बौद्धधर्माची जुनी शिकवण आणि आचार अधिकच लखलखीत आणि पुनरुज्जीवित झाले. तेव्हा प्रथम या नवीन बौद्ध धर्माचा किंवा आंबेडकरांच्या ‘नवायनां’चा जागतिक उदय कसा झाला हे पाहू. नंतर जागतिक शांततेच्या ध्येयामागील या बौद्ध धर्माच्या शक्तीने दिलेल्या तत्त्वज्ञानाचा विचार करू.

नव बौद्ध धर्माचा किंवा नवायनांचा उदय

अलीकडील काही वर्षांत बौद्धांच्या धार्मिक परंपरांच्या स्वरूपात आणि सिद्धान्तांत काही लक्ष्यवेधी बदल घडून आले आहेत. एका शतकापूर्वी जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांनी या तत्त्वज्ञानाला ‘राजकीय दर्जा नसलेला धर्म’ असे संबोधले होते. याचे भटकत राहण्याचे धार्मिक तंत्र बौद्धिक क्षमतेने युक्त अशा भिक्षूंनी सांभाळले असून जे व्यक्तिगत मोक्षाच्या उद्दिष्टासाठी प्रयत्नशील आहेत, असेही बौद्ध धर्मीयांचे वर्णन केले होते. नवीन बौद्धवाद किंवा नवबौद्ध धर्म हा आशियातील भू-राजकारण आणि विविध देशांच्या अस्मितांना उजाळा देणारा ठरला आहे. संघर्षस्थगिती, अहिंसक समाज परिवर्तन, सामाजिक नीती आणि न्यायाधारित राजकारण, या मुद्द्यांवर जागतिक संवादात ओळखू येणारा आवाज ठरला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नवबौद्धवादाचा परिणाम असंघटित किंवा सुट्या सुट्या राहिलेल्या बिनसरकारी स्वयंसेवी संघटनांवर झाला असून नव्या जागतिक वातावरणातील त्यांचे शिक्षण आणि आचार यांनी त्याचे मार्गदर्शन होत आहे. १९६० साली व्हिएतनाममध्ये युद्ध चालू असताना तेथील एक भिक्षू थिक्-न्हाट-हान यांनी आपल्या सहकारी भिक्षूंचा युद्धविरोधी संघर्ष वर्णन करण्यासाठी मुक्ती किंवा मोक्ष या जुन्या संकल्पनेचा खुलासा करण्यासाठी ‘नवबौद्धवाद’ ही संज्ञा वापरली होती. निर्वाण किंवा आत्मबोध या व्यक्तिगत ध्येयांवर भर न देता नवबौद्धवादाने लोकोदय (जागतिक जागरण) या सामूहिक कल्पनेवर भर दिला- ज्यांमध्ये व्यक्ती, समाज, गावे आणि राष्ट्रे यांच्या अभ्युदयाचे आश्वासन परलोकात नव्हे, तर याच आयुष्यात, याच जगात याच भूमीवर देण्यात आले आहे.

श्रीलंकेमध्ये ११०००पेक्षा अधिक खेड्यांमध्ये आणि गावांमध्ये काम करणारे स्वयंसेवक, भिक्षू आणि विद्यार्थी ज्यांच्या कार्यामागे बौद्ध धर्म पुरस्कारित सर्वोदय श्रमदान चळवळीची प्रेरणा आहे. त्यांच्या जागतिक जागरण या कल्पनेमध्ये स्वच्छ पर्यावरण, शुद्ध पिण्याचे पाणी, किमान पेहरावासाठी लागणारी वस्त्रे, आहार, निवास आणि आरोग्य, संपर्काची सोय, ऊर्जा, शिक्षण, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्त्रोत या सर्व गरजा पूर्ण करण्याचा ध्यास आहे. १९५०च्या दशकात आशियामध्ये ज्या नवबौद्ध मुक्तीचळवळी चालू झाल्या, त्यांपैकीच श्रीलंकेत सर्वोदय श्रमदान ही एक चळवळ होती. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात श्रीलंका सरकारचे सैन्य आणि तमीळ बंडखोर यांच्यामधील संघर्षाला या संघटनेने अहिंसक पद्धतीने विरोध दर्शवला होता. या संघटनेचे बळही वाढत चालले आहे.

बौद्धांची (संघटनांची) समाजसेवा आणि राजकीय सक्रियता यांच्यामध्ये जगभर झालेल्या वाढीचे अलीकडे दृश्य दिसते आहे. हे केवळ परंपरागत समाजांमध्येही दिसते आहे. त्जिन-हुआंग मायकेल झियाओ या लेखकाने ‘जागतिकीकरणाची अनेकता : समकालीन जगातील सांस्कृतिक विविधता’ या ग्रंथात तैवानमधील बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासंबंधी लिहिले आहे –

“कॅथलिक आणि प्रॉस्टेस्टंटस या पंथांच्या कुंठित विकासाच्या तुलनेत स्थानिक बौद्ध धर्माचे नवीन धार्मिक प्रबोधन किंवा पुनरुत्थान चालू झाले आहे, असे मानण्यास हरकत नाही. बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या संख्येत मागील दशकात अभूतपूर्व अशी वाढ झालेली असून १९८०च्या दशकात आठ लाख असलेल्या अनुयायांची संख्या २००० साली, ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. बौद्ध मंदिरांची संख्याही १,१५७वरून ४,५०० पेक्षा अधिक वाढली आहे. बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी यांची संख्याही याच काळात ३,४७०वरून १०,००० वर गेली आहे…”

या नव्याने सचेतन झालेल्या बौद्ध धर्मात आणि त्याच्या परंपरागत अवतारात जाणवणारा मुख्य फरक म्हणजे त्यांच्या सैद्धान्तिक भूमिकांत जाणवणारे अंतर. नवीन गट दोन्ही हात पसरून समाजाला, त्यांची जनकल्याणाची कामे आणि सामाजिक उद्दिष्टे यांना, भरभरून साहाय्य करताना दिसतात. हे नवबौद्धवादी गट समाजकल्याण, आरोग्य सेवा, शिक्षण, प्रकाशन आणि पर्यावरण संवर्धनामध्ये मग्न झालेले दिसत असल्यामुळे तैवानमध्ये गेली अनेक शतके रूढ असलेल्या धर्मोपासनेचा मार्ग एकदम बदलून गेल्याचे दृश्य दिसते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अशाच प्रकारचे बदल दक्षिण आणि आग्नेय प्रदेशातील थेरवादी देशांमध्ये – श्रीलंका, थायलंड, कंबोडिया आणि म्यानमार या देशांमध्ये, त्याचप्रमाणे आग्नेय व पूर्व आशियातील महायान देशांत, म्हणजे व्हिएतनाम, जपान, तैवान व कोरिया या देशांमध्ये आणि हिमाचल प्रदेशातील वज्रयान देश – तिबेट, लडाख, सिक्कीम आणि भूतान यांमध्ये घडून आलेले दिसतात. पण त्या सर्वांपेक्षा अधिक नाट्यपूर्ण परिवर्तन, बुद्धाच्या आणि त्याच्या धर्माच्या जन्मभूमीत आणि जिथे त्या धर्माचा विकास, ऱ्हास होऊन हजार वर्षांपूर्वी तो पूर्णपणे अस्तंगत झाला, त्या भारतात आज चाललेल्या दलित-बौद्ध मुक्ती चळवळीतून झाले आहेत. या चळवळीकडे आणि धर्मांतराकडे लाखो लोक ओढले जात आहेत आणि मानवी दु:खाची निधर्मी जाणीव देणारे दारिद्रय, सामाजिक अन्याय, शासनयंत्रणेतील भ्रष्टाचार, जुलूम यांच्या विरुद्धचा संघर्ष आणि मानवाच्या सर्वंकष मुक्तीचा डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शिका, चळवळ करा आणि संघटित व्हा’ या घोषणेतून मिळालेला संदेश, यांमधून जुन्या बौद्ध तत्त्वज्ञानापासून ही नवबौद्ध संघटना किती पुढे आली आहे, याचा पुरावा मिळतो.

‘बौद्ध धर्म आणि विसाव्या शतकातील आशियाचे राजकारण’ (Budhhism and Politics in the 20th Century Asia) या ग्रंथाचे लेखक ब्रिटिश विचारवंत इयान हॅरिस यांनी त्या ग्रंथाच्या परिचयपत्रात नवबौद्धवादाच्या अभ्यासासाठी एक आराखडा किंवा चौकट सुचवली आहे-

“सध्याच्या बौद्धधर्मीय जगातला एकही देश असा नाही की, ज्याला आधुनिकतेच्या एकाही बाजूचा किंवा घटनांचा स्पर्श झालेला नाही. मग तो वसाहतवाद असो की औद्योगिकीकरण, दूरसंचारयंत्रणा, बाजारवाद, अतिरेकी व्यक्तिवाद किंवा डाव्या अथवा उजव्या शक्तींची एकाधिकारशाही, यांपैकी काहीही असो. या अशा अनपेक्षित जहाल परिस्थितीत बौद्धांना त्या परिस्थितीचा स्वीकार करणे किंवा हळूहळू अस्तंगत होत जाण्याच्या शक्यतेचा स्वीकारण करणे एवढेच पर्याय खुले होते. या काळात, विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात वसाहवादविरोधी चळवळीत बौद्धांचा सहभाग होता, हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे नव्या किंवा नवा मुखवटा चढवून उभ्या राहिलेल्या कडव्या राष्ट्रवादी, सुधारणावादी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय, उपशामक आणि प्रतिक्रियावादी व मूलतत्त्ववादी अशा सर्व प्रकारच्या स्वरूपातल्या बौद्धधर्मीय संघटना विसाव्या शतकात क्रियाशील झालेल्या दिसतात.”

एका दृष्टीक्षेपात रूढी-परंपरा व आधुनिकाता यांच्यामधील संघर्ष पाहून आपल्या हे लक्षात येते की, हॅरिस यांनी केलेले पृथक्करण बौद्धधर्मासमोर दोनच सरळ पर्याय उभे करते – स्वीकारा अगर नष्ट व्हा. त्याचबरोबर या संघर्षातून पुढे आलेल्या प्रतिक्रियांची मांडणीही सामोरी येते. वसाहतवादविरोधी आणि राष्ट्रीय (सनातनी) चळवळींपासून, सुधारणावादी, जहाल सामाजिक क्रियाशील चळवळी, मार्ग वळून व्यक्तिगत किंवा स्वातंत्र्यवादी उपशामक चळवळी ते मूलतत्त्ववादी प्रतिगामी चळवळी, असे या प्रतिक्रियांचे वर्तुळ पूर्ण होताना दिसते.

या सर्व चळवळींना पुरोगामी म्हणता येणार नाही. नवबुद्धवाद किंवा डॉ. आंबेडकरांच्या भाषेत ‘नवायान बौद्धवाद’ याची व्याख्या तळातून वर आलेला म्हणजे स्थानिक तळागाळाच्या संघटनांतून पसरत चाललेला बौद्धवाद, राष्ट्रीय धार्मिक संघटना किंवा सरकारे यांनी वरून लादलेला नव्हे.

हॅरिसच्या या ग्रंथामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या बौद्ध असलेल्या दहा राष्ट्रांमधील धार्मिकदृष्ट्या मोठ्या आणि सरकारी संस्था यांचा विकास आणि परस्परांवर होणारे परिणाम यांना केंद्र करण्यात आले आहे. याच प्रक्रियांना थाई बुद्धवादी विचारवंत ‘कॅपिटल बी-बुद्धिझम’ असे संबोधतात. तरीसुद्धा हॅरिस यांचे हे निरीक्षण जगातल्या ‘स्मॉल बी-बुद्धिझम’च्या चळवळींकडे अभ्यासकांचे आणि विचारवंतांचे लक्ष मागील दशकात कसे वेधले गेले, याचा खुलासा करते. त्यांत स्थानिक व धार्मिक संघटना ते आंतरराष्ट्रीय बिनसरकारी संघटना – ज्यांचा रोख न्याय, स्वातंत्र्य आणि पर्यावरण संरक्षण, यांच्यावर केंद्रित झाला आहे – अशांचा समावेश आहे. शांतता प्रस्थापनेसंबंधांत या सर्व संघटना आपल्याला काय सांगतात?

बौद्ध धर्म आणि शांतिप्रस्थापना

बौद्ध परंपरांचे शांती प्रस्थापनेचे प्रयत्न आणि प्रबोध, शिवाय मागील २५०० वर्षांतील त्यांच्या अहिंसक चळवळींचा इतिहास यांबद्दल त्यांची जगात सर्वत्र प्रशंसा होत आहे. ही प्रशंसा योग्य असली तरीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही की, बौद्ध धर्माचे योगदान केवळ शांतिप्रस्थापनेच्या बांधीलकीत नाही, कारण जगातले सर्वच धर्म या ना त्या रितीने शांतता प्रस्थापनेचा दावा करतात. तर त्यासाठी त्यांनी स्वीकारलेला विशिष्ट दृष्टीकोन आणि तंत्रे यांमुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये आणि समाजसमूहांमधील व्यवहारात शांतता प्रस्थापित करण्यास अगर टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. बौद्ध समाजांना हिंसेचाही परिचय होता, असे इतिहासात दाखले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बौद्ध तत्त्वज्ञानाची अगर धर्माची शिकवण, आणि ती देणाऱ्या संस्था टिकवून ठेवण्यासाठी बौद्धधर्मीय युद्धाला सामोरे गेले. शिवाय राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी आणि शेजारील राष्ट्रे जिंकून घेण्यासाठी सैन्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षणात बौद्धवादी ध्यान-चिंतन पद्धती आणि बौद्ध मठनिवासींची करडी शिस्त त्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी वापरली जात असे.

तरीसुद्धा बौद्ध परंपरांनी शांततानिर्मिती आणि अहिंसेची जोपासना याकरता भरपूर साधनसामग्री पुरवलेली आहे. आणि आशियामधील व पश्चिमेकडील अनुयायांवर त्यांचेच संस्कार झालेले आहेत. या शिकवणुकीतील काही गोष्टी अशा –

- बुद्धाने सांगितलेली पायाभूत धर्मतत्त्वे माणसाच्या क्लेशांपासून त्याची मुक्तता करणारी आणि त्याचे कारणे शोधणारी चार उदात्त सत्ये (पाली अरिया साक)

- पहिला महत्त्वाचा निर्बंध म्हणजे जिवंत प्राण्यांच्या – सजीवांच्या हत्येपासून दूर राहणे (अहिंसा) किंवा त्यांना न दुखवणे. प्रतिकार किंवा बदला यांच्यासाठी पर्याय शोधणे.

- दया, करुणा, आनंदाचा सहानुभाव घेणे आणि मनाची समतोल वृत्ती (ब्रह्मविहार) यांची वाढ किंवा जोपासना करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. सामाजिक जबाबदारीने वागण्यासाठी मनाला शिक्षण देणे.

- संघर्ष मिरवण्यासाठी नि:स्वार्थीपणा (अनत्त) परस्परावलंबन (परिक्कासामुप्पद) आणि निर्द्वंद्व (शून्यता) या नवीन आदर्शांचा स्वीकार

- खरे ज्ञान प्राप्त झालेले (बोधीसत्व) कुशल तंत्रे (उपाय) वापरून इतरांची दु:खांपासून मुक्तता करू शकतात, यावर विश्वास.

- चक्र फिरवणारे (चक्रप्रवर्तिन) थोर बौद्धजन आणि नैतिक मार्गदर्शन करणारे नेते (धम्मराज) – जनतेची मने आणि अंत:करणे जिंकून घेणारे – शत्रू आणि प्रदेश यांना दूर ठेवणारे आपल्या अथांग प्रज्ञेने आणि भूतदयेने ते कार्य साधतात.

या शिकवणुकीचा पाठपुरावा करणारे आणि निष्ठावान प्रचारक, ज्या ज्या संस्कृतींना बौद्ध धर्माचा स्पर्श झाला आहे, त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाले. आधुनिक जगात मानवी हक्क आणि सामाजिक न्याय यांसाठी चालवलेल्या अहिंसक लढ्यांना आशिया खंडात आणि पाश्चिमात्य देशांत अनेक बौद्ध अनुयायी लाभले.

अलीकडच्या वर्षांत नोबेल शांतता पारितोषिकांचे मानकरी म्हणून तेन्झिन ग्योत्सो- तिबेटचे दलाई लामा आणि आँग सान सू की या म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुख विरोधक, या दोन व्यक्तींची नावे जगापुढे आली. त्यांनी आपल्या देशातील लोकशाही आणि सांस्कृतिक पुनरुत्थान, या ध्येयांसाठी हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या विरोधात अहिंसक प्रतिकार अवलंबला आहे. नोबेल शांतता पारितोषिकासाठी नामांकन झालेल्या आणखी काही बौद्ध नेत्यांची नावे अशी आहेत - थिक् न्हाट हान् (व्हिएतनाम), डॉ. ए.टी. अरियरत्ने (श्रीलंकेतील सर्वोदय श्रमदान चळवळीचे प्रवर्तक), वेन महा घोसानन्द (कंबोडियातील शांती आणि पुनर ऐक्य चळवळीचे नेते) आणि सुलक सिवरक्ष (थायलंडमधील रूढ बौद्ध मत संघटनेतून बाहेर पडून नवायान बौद्धांच्या आणि इतर संघटनांचे आंतरराष्ट्रीय जाळे पसरवणारे संघटक). १९९० साली आंबेडकरांच्या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने त्यांना समाजसेवा आणि राष्ट्रीय नेतृत्व यांच्या सन्मानार्थ भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

(पूर्वार्ध)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा