निकामी झालेल्या किडन्यांसोबत गेली १७ वर्षे जगताना डॉ.गोवारीकरांच्या ‘आधुनिक मनाच्या श्लोकां’नी दिलेले बळ…
संकीर्ण - ललित
भाऊसाहेब नेवरेकर
  • डॉ. वसंत गोवारीकर, ‘हसरी किडनी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि किडनीचे एक प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 30 November 2022
  • संकीर्ण ललित हसरी किडनी Hasri Kidney पद्मजा फाटक Padmja Phatak वसंत गोवारीकर Vasant Gowarikar किडनी Kidney डायलिसिस Dialysis

मला तसा काही प्रॉब्लेम नाही, हे सप्टेंबर २००५मध्ये हृदयासंबंधीच्या आवश्यक तपासणीतून समजले (त्याआधी सात-आठ महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिलेला होता), पण डॉक्टरांनी केलेल्या अनावश्यक रक्ततपासणीत मात्र मी मूत्रपिंडविकारग्रस्त (Kidney failure Patient) असल्याचे समजले. पुण्याच्या ग्लोबल हार्ट सेंटरमध्ये जाण्याचा आग्रह धरणाऱ्या एका सहकारी मित्रामुळे हे शक्य झाले.

रुग्ण ज्या आजाराच्या इलाजासाठी डॉक्टरकडे गेलेला असतो, त्यानुसार आवश्यक पॅथॉलॉजिकल चाचण्यांव्यतिरिक्त इतरही बऱ्याच चाचण्या सूचवल्या व केल्या जातात. मात्र डॉक्टर त्या रिपोर्टसचे काळजीपूर्वक वाचन कधीही करत नाहीत. तसे त्यांनी केले असते, तर माझे हिमोग्लोबिन सातत्याने कमी होतेय, हे समजले असते. २००० साली मला कराव्या लागलेल्या सर्व चाचण्यांत ब्लड युरिया व क्रियेटिनीन हे अगदी सीमारेषेवर होते, पण तंत्रज्ञांनी त्यास अधोरेखित न केल्यामुळे ते डॉक्टरांनी वाचले नाही, परिणामी त्यावर चर्चा झाली नाही. तसे झाले असते, तर मी नजीकच्या काळात मूत्रपिंडविकारग्रस्त होऊ शकतो, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, हे डॉक्टर सुचवू शकले असते, पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही. त्यासाठी सप्टेंबर २००५ उजाडावा लागला… आणि तेव्हा माझी मूत्रपिंडे बऱ्याच धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली होती.

एकाच वेळी अनेक अवयव निकामी (Multiple organ failure) होतात, तेव्हा मूत्रपिंड प्रथम निकामी होते, नंतर इतर अवयव, असे म्हटले जाते, पण मूत्रपिंड निकामी होण्याची सहज लक्षणे सहसा जाणवत नाहीत. परिणामी जेव्हा पायावर, चेहऱ्यावर सूज येते, तेव्हा मूत्रपिंडाच्या चाचण्या बऱ्याच गंभीर झालेल्या असतात. याची कारणे व लक्षणे याविषयी गुगलवर विस्तृत माहिती आहे, ती पुन्हा येथे नोंदवत नाही, परंतु अलीकडे त्याहून अत्यंत गंभीर कारणे मूत्रपिंडविकारग्रस्तांमध्ये पाहायला मिळतात. उच्च रक्तदाब अशा साधारण स्वरूपाच्या पण मानसिक ताणतणावग्रस्त रुग्ण अतिरेकी औषधोपचारांमुळे मूत्रपिंडे निकामी झाल्याने दगावला अथवा तो आता डायलिसीसवर आहे, अशा बऱ्याच घटना पाहायला-ऐकायला मिळतात. आरोग्यविमा असणारे रुग्ण आर्थिकदृष्ट्या निष्काळजी होतात, त्यामुळेही खूपदा असे घडते. करोनाचा पुण्यातील पहिला मृत्यु हा वास्तविक मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे झाला, हे सत्य नोंदवले गेले होते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सप्टेंबर २००५मध्ये एका प्रख्यात नेफ्रोलॉजिस्टकडे माझ्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी सुचवलेल्या आहारतज्ज्ञाकडून दररोजचा ‘डायट प्लॅन’ घेतला. दोन-तीन महिन्यांत असे दिसायला लागले की, माझ्या मूत्रपिंडांमध्ये कुठलीही सुधारणा होत नाहीये. त्यामुळे मी धास्तावलो, चिंतीत झालो.

वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचणे, हा माझा शाळकरी वयापासूनचा छंद. मूत्रपिंडाच्या आजारासंबंधी कोणी काही लिहिले आहे का, याचा शोध मी सुरू केला. त्यात मला दूरदर्शन निर्मात्या आणि प्रख्यात लेखिका श्रीमती पद्मजा फाटक यांचे ‘हसरी किडनी’ हे पुस्तक असल्याचे समजले. मात्र पुस्तक आउट ऑफ स्टॉक होते, तरीही मोठ्या चिकाटीने त्याची एक प्रत (पहिली आवृत्ती जून २००१, अक्षर प्रकाशन, मुंबई) मला मिळाली.

फाटक या मूत्रपिंडाच्या विकाराने (१९९२-९३) गंभीर आजारी असताना त्यांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर त्यांना भेटावयास आले. त्यांनी त्यांना सल्ले दिले, धीर दिला आणि काही तंत्रे सांगितली. तो या पुस्तकातला भाग (पान क्रमांक १३८ ते ४०) मला खूप महत्त्वाचा वाटला. तो थोडक्यात असा -

“१) अ‍ॅक्सेप्ट इट - त्या वेळी हा त्यांचा सल्ला नकारात्मक वाटे. पण यथावकाश वसंतरावांनी आणि माझ्या वेळोवेळी पलटी खाणाऱ्या आजारानेही मला त्यातलं मर्म कळण्याइतपत जाणतं केलं.

२) उपचारकांच्या निदानावर अंधश्रद्धा ठेवू नका, त्यांचं नेहमी बरोबरच असतं असं नाही.

३) मिरॅकल्स डू हॅपन - यावर माझं स्वगत चाले : ‘कोणी काही म्हणतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा याचं बाळकडू मला मिळालेलंच नाही. पण माझं शरीर माझ्या मनाचे आतून पाय ओढतंय त्याचं काय? त्याने माणूस खचेल, नाहीतर काय?’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४) ‘व्हाय मी?’ - हा प्रश्न मोडीत काढा. थकावट, झोपेची तक्रार, कणकण, वृत्तीतले चढउतार ही जी लक्षणं सांगताय ना, तसे प्रकार माझ्यासारख्या कार्यरत माणसालाही होत असतात, बरं का! तुमच्या बाबतीत अर्थातच त्यांतील तीव्रता जास्त असणार, पण आपल्याला काहीतरी वेगळंच आणि भलतंच होतंय, असं मात्र समजू नका.

५) डोंट होल्ड बॅक युवर इमोशन्स - तुमच्या नैसर्गिक प्रतिक्रियांसाठी झगडू नका. दुखत असेल, रडावंसं वाटत असेल, तर खुशाल तसं करा. स्वतःचा नसता कोंडमारा करू नका. भावनांचा निचरा व्हायला हवा. मात्र तो वृत्तीचा भाग बनता कामा नये. दुःख कुरवाळत बसायचं नाही, एवढं बघा.

६) चेंज युवर पर्पेक्टिव्ह - आपल्या विशिष्ट परिस्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहा. परिस्थिती आपण समजतो, त्यापेक्षा अनेकांगी असते.

“वर्षानुवर्षं पानंच्या पान लिहिणारी मी. आणि आज मला दीपाच्या चार पानी लेखाचं इंग्रजीत भाषांतर करताना धाप लागावी?”

“तेच सांगतोय. या गोष्टी आपण बघाव्या तशा असतात. ज्या गतीने कामाचा फडशा पाडत होतात, ती नॉर्मल होती का? लहानपणापासून समाजाने, संस्कृतीने आपल्याला कुठल्या हातानं कुठली गोष्ट करायची, इथपासून एक प्रकारच्या जडणघडणीत कोंबलेलं असतं आणि आपणही ते बिनतक्रार स्वीकारून आपल्या मूलभूत प्रवृत्तींना खीळ घालून अपेक्षित परफॉर्मन्स देत राहतो. केव्हा ना केव्हा, विशेषतः कसोटीच्या वेळी, अशी यंत्रणा कोसळून पडणारच. कदाचित आताचा हा धीमेपणाच जास्त स्वाभाविक असेल?.... समजा, नाही गेलं तुमच्याकडून एखाद्या मित्राच्या पत्राला किंवा फोन कॉलला वेळेवर उत्तर, तर त्याने असं काय जग बुडणार आहे?”

७) साक्षित्वाने पाहा : स्वतःच्या आजाराकडे, कोंडीकडे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून म्हणजेच लांबून, बाहेरून पाहायला शिका. या अनुभवातून जाणारी व्यक्ती जणू कुणीतरी तिसरीच आहे.

८) डोंट लूज युवर फोकस : जे अटळ आहे, बदलणं शक्य नाही, त्याच्याशी तंटा करत न बसता ती एनर्जी प्रत्यक्ष आजाराशी झुंज देण्यासाठी वापरा. माणसाची फायटिंग पॉवर मर्यादित असते. तिचा योग्य विनियोग करणं अशा वेळी महत्त्वाचं.

९) टेक एव्हरी एक्स्पेरियन्स बाय इटसेल्फ – ‘चव’ वगैरे गोष्टी शेवटी मानण्यावर असतात. पाणी पिण्यावरच्या निर्बंधाचंही तेच. कच्चं वांगंसुद्धा श्रीखंडासारखं खाणारी आदिवासी माणसं मी पाहिलेली आहेत. अळणी, बिनतेलाचं, जे समोर येईल, पथ्यात असेल त्याकडे पंचपक्वान्नांचं ताट आहे असं पाहा. कुठलीही गोष्ट करणं भाग असेल, ज्या गोष्टी करायची परवानगी असेल त्या पूर्णपणे समरस होऊन, मन:पूर्वकतेनं करा. कोणतीही गोष्ट एक कंटाळवाणं काम म्हणून कशीतरी उरकू नका.”

याला फाटक यांनी गोवारीकरांचे ‘आधुनिक मनाचे श्लोक’ असे म्हटलेय. ते अतिशय उचित, यथायोग्य आहे. पुढे त्या लिहितात – “वसंतरावांचे हे आधुनिक ‘मनाचे श्लोक’ रुग्णालयांच्या खोल्याखोल्यांतून भित्तिपत्रकांसारखे लावण्याजोगे आहेत. आजारपणात, संकटकाळातच नव्हे, रोजचे चढ-उतार पार करतानादेखील ते माणसाच्या बरोबर येऊ शकतील.”

आजही भले भले उच्चशिक्षित\पदस्थ एखाद्या गंभीर आजाराने हतबल झाल्यानंतर सोशल मीडियावर ज्या असहाय्यपणे व्यक्त होतात, ते पाहून-वाचून डॉ. गोवारीकरांचे सल्ले किती महत्त्वपूर्ण आहेत, हे जाणवते, प्रचितीस येते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी तसा फार लकी ठरलो. एप्रिल २००६मध्ये ‘स्थापत्य बांधकामे : गुणवत्ता हमी, नियोजन व कार्यक्रम’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वसंतराव गोवारीकर आणि त्या वेळचे मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. त्या निमित्ताने मला डॉ. गोवारीकरांना तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली. शेवटच्या भेटीत मी मूत्रपिंडविकारग्रस्त आहे, असे सांगून ‘हसरी किडनी’तील त्यांचे ‘मनाचे श्लोक’ त्यांच्याच पुढ्यात ठेवले. त्यानंतर डॉ. गोवारीकरांनी तब्बल तासभर माझी अत्यंत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तो माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा अनुभव ठरला.

आपण मूत्रपिंडविकारग्रस्त आहोत, हे मी तात्काळ ‘अ‍ॅक्सेप्ट’ केले, पण ‘व्हाय मी?’ यातून मला बाहेर पडायला खूप काळ जावा लागला. कारण, मी मद्यपान करत नसे. बऱ्यापैकी शाकाहारी होतो आणि माझा दिनक्रमही कधीच अति घाईगडबडीचा नव्हता.

उपचार देत असणाऱ्या डॉक्टरांशी माझा कायम संवाद साधण्याचा प्रयत्न असे. त्यांच्याकडून मी सर्व शंकांचे निरसन करून घेत असे. २००६मध्ये ज्या नेफ्रोलॉजिस्टकडे उपचार घेत असे, त्याच्याबाबत मला शंका येऊ लागली. दरम्यान एका प्रसिद्ध हॉस्पिटलमधली मूत्रपिंड गैरव्यवहाराबाबतची बातमी वाचनात आली. त्यातील संशयितामध्ये या नेफ्रोलॉजिस्टचेच नाव वाचून मी घाबरलो आणि त्याला ताबडतोब सोडण्याचे निश्चित केले. (आताही अशी रॅकेट्स काम करतातच, पण अगदी शिस्तबद्धपणे, प्रसंगी निर्दयपणे सार्वजनिक सेवेचा आव आणून. असो.) मग मित्राने सुचवलेल्या एका युरोलॉजिस्टकडे काही काळ उपचार घेतले. हिमोग्लोबिन योग्य ठेवणे महत्त्वाचे, असा सल्ला देऊन त्यांनी काही इंजेक्शन्स सुचवली.

आपल्या शरीरात इतर सर्व अवयव एक याच प्रमाणात आहेत, पण मूत्रपिंड मात्र दोन आहेत. दोन्हींमध्ये सुमारे ४० लक्ष चाळणी(नेफ्रॉन)चा पडदा असतो. उच्च प्रथिनयुक्त, खनिजयुक्त खाद्यपदार्थांचे यकृताकडून सप्तधातूत (रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी आणि शुक्र) परावर्तन होत नाही, तो रस यकृताकडून युरिया म्हणून रक्तात सोडला जातो. तसेच जे ‘सक्रिय औषधघटक’ (Active pharma ingredients) शरीरास हानिकारक आहेत, अशी औषधे सातत्याने घेतल्याने शरीर स्वीकारत नाही. त्यामुळे ती ‘इन बिल्ट सिस्टिम’ कार्यानुसार मूत्रपिंडात जमा होतात. साहजिकपणे मूत्रपिंड निकामी होत जाते. म्हणजे मूत्रपिंडातल्या ४० लक्ष गाळण्या आकुंचित होत जाऊन त्यांची संख्या झपाट्याने कमी होते. मात्र ते समजेपर्यंत गाळण्या ७० टक्के बंद झालेल्या असतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नेफ्रोलॉजिस्ट रुग्णाला देणाऱ्या औषधांमध्ये मधूमेह, रक्तदाब यावरील औषधांच्या मात्रेबरोबर जास्त लघवी होईल, अशी औषधे देऊन सतत पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामागे सतत होणाऱ्या लघवीमधून जास्त युरिया शरीराबाहेर निघून जाईल, हे एकमेव उद्दिष्ट असते, पण याचा मूत्रपिंडावर अकारण ताण येतो. डॉक्टर मात्र विसरून गेलेले असतात. हा प्रकार रुग्णाला वेगाने डायलिसिसकडे घेऊन जाणारा ठरतो.

एक घनिष्ठ मित्र मला होलिस्टिक उपचार देणाऱ्या एका प्रख्यात डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी त्यांच्याकडील आयुर्वेदिक औषधे दिली. सकाळी सुकलेली फळे (बहुतेक ब्लॅकबेरी असाव्यात) अर्धा तास पाण्यात उकळवून ते पाणी प्यायचे, दुपारी व रात्री अशीच काही पावडर घ्यायला सांगितली. त्यामुळे माझा बहुतांश वेळ स्वयंपाकघरातच जात असे. प्रत्येक रुग्णास ‘बस्ती’ (पाच पंचकर्मापैकी एक) अनिवार्य असते. मला जांभूळ साल उकळलेले पाणी आठवड्यातून दोन वेळेस, अशा ४२ बस्ती घेण्यास सांगण्यात आले. तीन महिन्यानंतर स्टेम सेलचे दोन डोस घेण्याचे सुचवले. महाग होता त्यामुळे एकच घेतला. तीन आठवड्यांच्या तपासणीमध्ये क्रियेटीनीन २.८वरून १.७वर आले. मोठा फरक झालेला दिसला. मग दुसरा डोस घेतला व पुन्हा तीन आठवड्यांच्या तपासणीमध्ये क्रियेटीनीन १.७ वरून पुन्हा  २.७वर आले.

डॉक्टरांकडे गेल्यावर रक्तदाब, तपासणीचे अहवाल पाहून औषधे लिहून दिली की, डॉक्टर पुढच्या पेशंटसाठी बेल वाजवत असत. प्रत्येक वेळी मी माझ्या शंका विचारण्याच्या प्रयत्न केला, पण डॉक्टर वेळ देऊ शकले नाहीत. पण मला बस्तीचा चांगला अनुभव येत असल्याने ४२चा क्रम गाठला आणि ही उपचारपद्धती सोडली.

या सर्व उपचारांच्या क्रमात २००९ साली नेफ्रोलॉजिस्टने सांगितले, ‘नेवरेकर, तुम्हाला पुढील तीन-चार महिन्यांत डायलिसिस चालू करावे लागेल.’ मी ती पद्धत बघण्याची इच्छा व्यक्त केली. मला मेट्रनने डायलिसिस रूममध्ये नेले. सुमारे तासभर मी तेथे होतो. सगळेच वेदनादायी, यातनादायी होते. प्रत्येक रुग्णासोबत जवळचे कुणीतरी आवश्यक होते. जणू काही सारे घरच मूत्रपिंडविकारग्रस्त झालेय. त्यामुळे डायलिसिसला आणखी तीन-चार महिने पुढे लांबवण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नेफ्रोलॉजिस्ट, आयुर्वेदिक, होमिओपथी, होलिस्टीक असे सर्व पॅथीचे उपचार घेतल्यानंतर २०१०मध्ये कोल्हापूरच्या ‘किडनी अँड कॅन्सर क्यूअर सेंटर’च्या डॉ. विजयकुमार माने यांचे होमिओपॅथी उपचार चालू केले. सर्व समस्यांची त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी डायलिसिस करण्याची गरज लागणार नाही, याची खात्री दिली. मात्र आधीची उपचारपद्धती बदलून नवी चालू केली की, सुरुवातीला चांगला फरक पडतो, पण दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात आजार मूळपदावर येतो. बदलती उपचारपद्धती शरीरासाठी एक ‘शॉक’ असतो, हा अनुभव गाठीशी होताच. दिवसातून पाच वेळा चार प्रकारची दोन दोन ग्लोबूल्स (शाबुदाणा टाईप गोळ्या) घेणे चालू झाले आणि  क्रियेटिनिन व ब्लड युरिया सुधारू लागले.

थोड्याच दिवसांत डॉ. विजयकुमार माने यांच्या उपचारामुळे मी सुरक्षित टप्प्यावर येऊन स्थिरावलो. एवढेच नव्हे, तर ऑस्ट्रेलियातील मुलीकडे दोन वेळा जाऊन आलो, पर्यटनाचा आनंद घेऊ शकलो. काही प्रवासी टूरही केल्या.

आता मूत्रपिंडाच्या उपचाराबाबत माझे एक सूत्र तयार झाले आहे- ४० टक्के योग्य उपचार, ४० टक्के सुयोग्य ‘रेनल डायट’ आणि २० टक्के सकारात्मक मानसिकता. रेनल डायटमुळे B12 व्हिटॅमिनची कमतरता होते. ते फार धोकादायक आहे. सुदैवाने सध्या त्यासाठी इंजेक्शन अथवा स्प्रे उपलब्ध आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मूत्रपिंडविकारात अपथ्य अन्नाला, युरियाला कोणताही पर्याय नाही, त्याचा किडनीवर परिणाम होणारच, हे लक्षात घेतले पाहिजे. बायको-मुलांनी आग्रह केला म्हणून मिसळ, वडापाव खाल्ला, पाहुण्यांच्या घरी मटण खाल्ले, अशा सबबी उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे कमीत कमी प्रथिने, खनिजे, मीठ, तेलयुक्त आहार असणे आवश्यक आहे. रासायनिक खते वापरलेले अन्नघटक टाळावेत.

आज मी ७५ वर्षांचा आहे. वाढत्या वयामुळे आरोग्याची, शरीराची झीज होत राहणार आहेच, पण डॉ. गोवारीकरांच्या ‘मनाचे श्लोका’मुळे या गंभीर आजारासह छान आयुष्य जगता येतेय, हे महत्त्वाचे.

.................................................................................................................................................................

 लेखक भाऊसाहेब नेवरेकर सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग) आहेत.

bsnevarekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Mandar Damle

Wed , 30 November 2022

आपले असे अनुभव लोकांसमोर मांडणे महत्वाचे . लेखकाला निरामय आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......