‘महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध’ : शेजवलकरांचा ८१ वर्षांपूर्वीचा मौलिक लेख
संकीर्ण - पुनर्वाचन
त्र्यंबक शंकर शेजवलकर
  • त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि त्यांच्या ‘निवडक लेखसंग्रहा’चे शीर्षकपृष्ठ
  • Tue , 22 November 2022
  • संकीर्ण पुनर्वाचन त्र्यंबक शंकर शेजवलकर Tryanbak Shankar Shejwalkar इतिहास गांधी Gandhi मराठे Maratha महाराष्ट्र Maharashtra

महाराष्ट्राला एक जबरदस्त भूत — फार मोठा समंध — बाधत आहे. त्याचे नांव इतिहास.

इतिहास माणसाला शहाणा करतो असे बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनविताना दिसत आहे. जगांतील अनेक आपत्ति आणि अनर्थ इतिहासापासून निर्माण होताना दिसत आहेत.

यहुद्यांना इतिहास नसता तर त्यांची विटंबना - शतकानुशतके होत असलेला त्यांचा छळ - थांबली असती. हिटलरच्या उदयाचे एक कारण मुळांतच खुडले गेले असतें.

पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, फिनलंड... ही सगळी अनर्थपरंपरा इतिहासामुळेच उद्भवली आहे.

सर्व जगाचा, सर्वं राष्ट्रांचा, सर्व लोकांचा इतिहास एकसमयावच्छेदेकरून भस्मसात् होईल तर जगातील अनेक आपत्ति मुळातच नष्ट होतील. युद्धाची आद्यकारणे दबून जातील, समाजसुधारकांचा मार्ग, विश्वकुटुंबवाद्यांचा मार्ग, नवयुग सुरू करू पाहणारांचा मार्ग निष्कंटक खुला होईल. महाराष्ट्राला इतिहास नसता, तर गांधींविरुद्ध जी अढी महाराष्ट्रात दिसली- दिसते ती मुळातच धरली नसती. त्यांच्याविरुद्ध जी धुळवड उडाली, तशी ती उडू शकली नसती.

पण कोणीच इतिहास जाळण्यास तयार नाही! आणि एकाच राष्ट्राने तो जाळून त्याचा उपयोगहि नाही. निःशस्त्रीकरण हे जसे एका राष्ट्राचे ध्येय होऊ शकणार नाही, अहिंसा ही जशी एकाच व्यक्तीने आचरणात आणण्यासारखीच नाही, तसेच येथेहि समजावे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इतिहास जाळण्यास, दडपण्यास, विकृत करण्यास कोणी तयार नाही हे सुद्धा खरे नाही. अनेक हुशार डोकेबाज माणसे खरा इतिहास शक्य तेथे जाळून टाकण्यात- निदान दडपण्यात, किमान विकृत करण्यात—गुंतलेली, गढलेली आहेत. उलटपक्षी इतिहास बनविण्याचे - आपल्या खोलीत बसून गुपचूप मनासारखा बनविण्याचे - कारखाने आज सुरू आहेत. असे कारखाने सुरू आहेत, तोवर नवयुगाची आशा करणे वेडेपणाचे ठरेल.

मनासारखा इतिहास बनविणाराचे आज अनेक मोठमोठे अड्डे आहेत व ते सर्व जगभर विस्तृत पसरलेले आहेत. आज सर्वच नवीन प्रयोग सोव्हिएट रशियांत प्रचंड प्रमाणावर चालताना दिसतात; इतिहास तयार करण्याचा प्रचंड कारखानाहि मार्क्सवाद्यांचाच आहे. सर्व जगाच्या इतिहासाचे सार कोळून एका घोटात पिऊनच कम्युनिस्ट तयार होत असतो.

श्वेतेतरांना रानटी ठरविण्याचे कारखाने युरोप-अमेरिकात पुष्कळच आहेत. कोणत्या तरी दुसऱ्या राष्ट्राला कमी ठरविण्याचे कारखाने प्रत्येक देशांत जारी आहेत. ख्रिस्ती, इस्लामी किंवा हिंदू संस्कृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे कारखानेहि बहुतच आहेत.

पण हा फार दूरचा विचार झाला. आज आपल्या महाराष्ट्रात मराठ्यांचे श्रेष्ठत्व इतिहासाने सिद्ध करू पाहणाऱ्यांचे अविश्रान्त अविरत प्रयत्न सुरू आहेत.

पण त्यांत थोडा वांधा आहे. म्हणताना मराठ्यांचा इतिहास म्हटले तरी कोणी त्याचा अर्थ मराठे क्षत्रियांचा इतिहास असे समजतात; कोणी कुणब्यांनाहि त्यात गोवतात; कोणी ब्राह्मणांचा पेशव्यांचा इतिहास म्हणजेच मराठ्यांचा इतिहास असे समजतात. कोणी कायस्थ प्रभूंची कर्तबगारी म्हणजे मराठ्यांचा इतिहास मानतात; दुसरे कोणी चित्पावन हेच खरे मराठ्यांचे एकमेव प्रतिनिधी असे गृहीत धरतात; तर अन्य अन्ये सारस्वत, कऱ्हाडे, ऋग्वेदी व यजुर्वेदी देशस्थ अशांचीच कर्तबगारी प्रामुख्याने मांडताना दिसतात. या सर्व प्रयत्नांची एकवाक्यता करणे कठीणच जाईल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अशामुळे आज मराठीत पांढऱ्यावर काळे करून लिहिलेल्या इतिहासांपैकी तीन चतुर्थांश भाग एकांगी, अतिशयोक्तिपूर्ण, विपर्यस्त, खोटा आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. याच्यामुळेच अनर्थांचे बीज रुजत घातले गेले आहे. नित्याच्या व्यवहारांत याचा पराक्रम दिसतच आहे. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचे खरे राष्ट्रघातक स्वरूप स्पष्ट निदर्शनास येईल. अशांपैकी प्रत्येक लेखक मनात म्हणत असतो की, माझ्या जातीचे वर्णन थोडेसे अतिशयोक्तीने थोडे दोष लिकवून लिहिले तर त्याने एकंदर इतिहासाची काय हानि होणार आहे? माझ्या जातींतील एखाद्या सामान्य माणसाला महापुरुष बनविले तर त्यात बिघडते कोठे? माझ्या घराण्यांतील एखाद्या कारकुंड्या पूर्वजाचा मुत्सद्दी तयार झाला, तर मग जग बुडणार आहे थोडेच!

पण येथे बिरबल-बादशहाच्या गोष्टींतील गवळ्यांच्या गोष्टीची आठवण होते. ठाऊक नसणारांसाठीं ती येथे संक्षेपाने सांगतो :

एकदा गावातील गवळ्यांविरुद्ध फार तक्रारी झाल्यामुळे बादशहाला गवळ्यांचा प्रामाणिकपणा तपासण्याची इच्छा झाली. बिरबलाने तो तपासण्याची युक्ति आपल्या मेंदूतून शोधून काढली. राजवाड्यांत एक मोठा हंडा ठेवून त्यात दूध सोडणारी एक तोटी वाड्याच्या बाहेरून भिंतीतून भोक पाडून जोडून देण्यात आली. या तोटीतून जाण्यासाठी जे दूध प्रत्येक गवळ्याने ओतावयाचे ते बाहेरच्या बाजूस असलेल्या तोटीच्या विस्तीर्ण मुखात ओतावयाचे अशी आज्ञा करण्यात आली. अशा रीतीने गवळ्याला हंड्यात काय पडते आहे ते दिसू नये व त्यालाहि ओतताना कोणी पाहू नये असे दोन मुद्दे साधण्यात आले. प्रत्येक गवळ्याने शेर शेरच दूध बादशहासाठी ओतावयाचे ठरले होते. त्यांपैकी दरेकाने विचार केला की, माझ्या एक शेर दुधाबद्दल पाणीच ओतले तर बिघडले कोठे? बाकीच्यांच्या मणावारी दुधात ते कोठेच अदृश्य होईल! पण सर्वांनी हा मुत्सद्देगिरीचा विचार मनात आणल्यामुळे बादशहाच्या हंड्यांत फक्त यमुनेचे काळेभोर पाणी तेवढे साठले व अशा रीतीने गवळ्यांची पारख झाली!

पेशवाईतील ‘नवकोट नारायणां’च्या संपत्तीची मोजदाद केली तर आश्चर्य वाटते की, मग पेशवे लाख-पन्नास हजारांच्या सुद्धा फिकिरीत का दिसतात? सर्व सरदार-दरकदारांच्या जहागिरींची बेरीज केली, तर ती राज्याच्या अनेकपट क्षेत्रफळाची व वसुलाची भरेल! मुत्सद्द्यांची याद केली तर पृथ्वीचे राजकारण चालवून वर पुष्कळच उरण्याइतकी संख्या भरेल! वीरांनी कत्तल केलेल्यांची संख्या कोणी मोजील, तर हिंदुस्थानच्या लोकसंख्येपेक्षांहि जास्त भरण्याचा संभव फार! हे इतिहासचरित्रकुलवृत्तांत-लेखकू गणिताला हरिभाऊ आपट्यांइतकेच पारखे दिसतात! अर्थात् त्यांचे लेखन कादंबऱ्यांप्रमाणे मनोरंजक, रसाळ, उत्तेजक, लोकप्रिय का ठरू नये?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इतिहाससंशोधकांनीं ‘नाहीं' म्हणून आक्रोश केला तरी सदाशिवरावभाऊंनीं दिल्लीच्या तख्ताचे राईराईएवढे तुकडे केले, असे शिवाजीमंदिर गरजते. बाळाजी विश्वनाथाने आणलेल्या सनदा स्वराज्याच्या नसून दास्यांच्या होत्या, हे अजून उमजत नाही! बाजीरावाने शाहूची भरदरबारांत खात्री पटवून उत्तरेला प्रयाण केले असेच सर्वांनी समजले पाहिजे! जंजिरा पेशव्यांच्या विशिष्ट धोरणामुळे जिंकला गेला नाहीं असे म्हणण्याची सोय नाही! पानिपतची उत्तरक्रिया कर्कश किंकाळ्या फोडून निदान लाकडी रंगभूमीवर (की रणभूमीवर?) करून घेण्याची वीरवृत्ति सर्वत्र फैलावली पाहिजे!

या सर्व प्रयत्नांची उत्तरक्रिया झाल्याशिवाय महाराष्ट्राला बरे दिवस दिसण्याची आशा नको! तोवर इतिहासाच्या क्षीराऐवजी दुरभिमानाचे काळे कुट्ट नीरच हाती येणार! तोवर हा इतिहासाचा समंध बाधतच रहाणार! नवयुग पाहिजे असेल तर खरा इतिहास जाणून घ्या. तोच बेकनच्या उक्तीप्रमाणे शहाणपणा शिकवील.

साभार -

‘निवडक लेखसंग्रह’ : त्र्यंबक शंकर शेजवलकर

संग्राहक - ह. वि. मोटे, ह. वि. मोटे प्रकाशन, मुंबई... प्रथमावृत्ती - २६ जानेवारी १९७७

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......