अमिताभ बच्चन, बेबस दुनियमध्ये असंतोषाची स्वप्ने विकणारा…
संकीर्ण - पुनर्वाचन
भाऊ पाध्ये
  • अमिताभ बच्चन
  • Thu , 13 October 2022
  • संकीर्ण पुनर्वाचन अमिताभ बच्चन Amitabh Bachchan भाऊ पाध्ये Bhau Padhye जया भादुरी Jaya Bhaduri रेखा Rekha राजेश खन्ना Rajesh Khanna दिलीपकुमार Dilipkumar

कालच्या ११ ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन ऐंशी वर्षांचे झाले. या वयातही त्यांचा उत्साह, ऊर्जा, कामातले चैतन्य, ग्रेस आणि एकंदरच ग्रेसफुलनेस ‘व्वा’, ‘थोर’, ‘वॉव’, ‘ग्रेट’, ‘लाजवाब’, ‘अप्रतिम’, ‘प्रेरणादायी’, ‘आदर्शवत’ अशा अनेक विशेषणांनी सांगता येईल. प्रत्येक जण तो वेगवेगळ्या विशेषणांनी किंवा सर्वनामांनी सांगेल. आता काही अमिताभ बच्चन नायक नाहीत. पण जेव्हा नायक होते, तेव्हाच्या त्यांच्या कामावर, कलेवर, अभिनयावर फिदा असलेले कोट्यवधी लोक या देशात असतील. ते त्या काळच्या आठवणी सांगत आजच्या बदललेल्या, किडुकमिडूक टीव्ही जाहिरातींमध्येही दिसणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याविषयी अधिक-उणं बोलतील.

जीवनाचा एवढा मोठा दौर पाहिलेल्या, साहिलेल्या आणि खेळलेल्या माणसाबद्दल सुलट बोलता येतं, तसंच उलटही. ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं. आपण पाहतो, तसं जग दिसतं.

अमिताभ बच्चन जेव्हा हिंदी सिनेमांचे ‘नायक’ होते आणि लाखो भारतीयांचे ‘हिरो’ होते, तेव्हा मराठीतले एक विचक्षण, कलंदर आणि मस्तमौला लेखक भाऊ पाध्ये हेदेखील अमिताभचे चाहते होते. किती? तर पाच हजारांहून अधिक शब्दांचा भलामोठा लेख लिहिण्याइतपत.

भाऊ पाध्ये यांच्या लेखणीत एक भन्नाट नजाकत होती, आहे. ती या लेखातही दिसते. तसं तर पाध्ये यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक नायक-नायिकांवर लिहिलंय. पण अमिताभवर फार प्रेमानं लिहिलंय. तेही तब्बल ४३ वर्षांपूर्वी. त्या वेळी आघाडीवर असलेल्या ‘माणूस’ साप्ताहिकाच्या १९७९च्या दिवाळी अंकात हा लेख प्रकाशित झाला होता. अमिताभ बच्चन यांच्याविषयीचा इतका सुंदर, उचित आणि यथायोग्य लेख मराठीत क्वचितच इतर कुणी लिहिला असेल. महानायक अमिताभ बच्चन यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त तो खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी…

.................................................................................................................................................................

दिवसभर पृथ्वीच्या उदरामध्ये कोळसा फोडून थकून-भागून विजय आपल्या खोलीत परतला आहे. थोबडा-कपडे काळेकुट्ट झाले आहेत. जीव इतका शीणला आहे की, त्याने स्वतःला मुडद्यासारखे खटियावर झोकून दिले आहे. अंघोळ करून फ्रेश होण्याइतकीही त्याच्यामध्ये एनर्जी राह्यलेली दिसत नाही. त्याला मग आयुष्यातले एक भेसूर स्वप्न पडले आहे!

बाहेरचे निवांत खाणकामगारांचे जीवन. अचानक पृथ्वीच्या उदरात होणाऱ्या जीवघेण्या प्रसंगामुळे भयसूचक सिग्नल वाजू लागतो. लोकांची खाणीच्याकडे धावाधाव. बायकांचे रडणे आणि खाणीच्या पाळण्याकडे भ्यालेल्या लोकांची भीड. तो सिग्नल कानावर पडताच, विजय उठलाय आणि तोही पाळण्याकडे धावू लागलाय. पूर्ण ताकदीने जीव टाकून-उरी फुटून-

मी क्षणभर ते धावणं पाहता-पाहताच थरारलो होतो. असे जीव टाकून डेव्हिड ग्रॉवर, टिक डार्लिंग किंवा ब्रिजेश पटेलसारखे उत्तम क्षेत्ररक्षक धावतात किंवा ऑलिपिक्समध्ये १०० मीटर्स, २०० मीटर्सच्या शर्यतीमध्ये स्पर्धक सुवर्णपदकाच्या आशेने धावतात. अशा धावण्यामागे एक पॅशन, एक आवेश असावा लागतो. या विजयच्या या धावण्यात-साध्या धावण्यात तो आवेश मला दिसतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हिंदी सिनेमात इतके खरे कोणी धावतात का?... ‘राजाराणी’मध्ये राजेश खन्ना हा चोर असतो आणि त्याच्यामागे पोलीस लागलेले असतात, पण राजेश खन्ना पोलिसांच्या भयाने धावतोय की, स्विमिंगसाठी धावतोय, हा प्रश्न पडतो. ‘देवता’मध्ये कातील संजीवच्या मागे पोलीस इन्स्पेक्टर डॅनी लागलेला असतो. संजीव आणि डॅनी हे तसे गुणी अदाकार, पण संजीवला स्वतःला सावरून पळायचं म्हणजे... फार काय, या ‘काला पत्थर’मध्ये ज्यामध्ये आपण ‘विजय’च्या भूमिकेतल्या अमिताभला धावताना पाह्यलेले असते त्याच चित्रपटात शत्रूही पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन पळतो. शत्रूचे ते पळणे किती बंडल वाटते, अमिताभच्या धावण्याच्या तुलनेने! अगदी खोटे!

‘काला पत्थर’ पाहताना पुन्हा एकदा आपल्याला अमिताभ बच्चन या नटाला मानावे लागते. अलीकडे ‘त्रिशूल’, ‘कस्मे-वादे’ किंवा ‘नटवरलाल’ ही चित्रं पाहताना मी जरा अमिताभला कंटाळलो होतो. त्याचं ‘धी ग्रेट गॅम्बलर’ हे चित्र फ्लॉप झाले, त्या वेळी फिल्मी अखबारवाले अमिताभसुद्धा राजेश खन्नाच्या वाटेनेच जाणार, असे भाकित करू लागले. राजेश खन्नाची सीरीजने नऊ पिक्चर्स फ्लॉप झाली आणि राजेश खन्ना बॅनरवरून उतरला होता. अमिताभ बच्चनही तसाच उतरेल, असे म्हटले जाऊ लागले. वहिदा रेहमानसारखी गुणग्राहक अदाकारा म्हणाली की, ‘ठीक आहे, अमिताभची आज लोकांना क्रेझ आहे. त्याची ‘अँग्री मॅन’ची अदाकारी पब्लिकला पसंत असेल. पण तीच ती अदाकारी पब्लिक किती दिवस मंजूर करील?’ वहिदा रेहमानचे म्हणणे मला ‘काला पत्थर’ पाहण्यापूर्वी पटले होते. पण ‘काला पत्थर’ पाहिल्यानंतर पुन्हा अमिताभची जोशीली अदाकारी, त्याच्या ‘गोल्डन व्हॉईस’मधल्या डायलॉगचा प्रभाव यामुळे अमिताभ माझ्या मनावर ‘छा गयासा’ झाला आहे.

अमिताभ बच्चनला मी मानतो. अर्थात हिंदी सिनेमावाल्या एखाद्या अदाकाराला मानणे काही गैर काम तर नाहीच. कारण केवळ पब्लिक ज्या माणसाला मानते, त्या माणसाला आपण मानायचे नाही आणि त्या माणसातल्या उणिवांवर हाणत बसायचे, हे आपल्याला जमणार नाहीच. पब्लिक का मानते, आपण का मानतो, या दोन्ही अलगअलग गोष्टी आहेत. पब्लिक अमिताभला का मानते - हिंदी चित्रपटालाच का मानते - कारण अमिताभ हिंदी चित्रपटात आहे आणि वैसा दुसरा कोई नहीं म्हणून मानते आणि

आपण का मानतो- हिंदी चित्रपट आपण मानत नाही; पण अमिताभसारखी गुणी माणसं आपले जोहर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चमकवू शकतात, म्हणून आपण हिंदी चित्रपटाला मानतो.

‘ब्रेक’साठी दाही दिशा

अमिताभ हा गुणी नट आहे. अलाहाबाद किंवा गंगाघाटावरील प्रदेशातून येणाऱ्या आणि साधा पत्ता शोधून काढणे ज्यांना मुष्किल होते व एखाद्या पत्त्याचा कितीही ठावठिकाणा समजावून दिला तरी ‘कुछ समज ना पाई’ असा चेहरा असलेल्या पब्लिकच्या पैकीच एक अमिताभ होता. हे आज त्याच्याभोवती असलेल्या झगमगाटामुळे पटणे कठीण असले तरी काळाची पाने मागे सारून आपण त्याच्या चित्रपटसृष्टीमध्ये धुळाक्षरे गिरवायच्या दिवसात गेलो तर लक्षात येईल. हिंदी चित्रपटात त्याला ‘ब्रेक’ पाह्यजे होता. त्याचे कुटुंब सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांचे- इंदिराबाईंच्या घरोब्याचे. इंदिराबाई या पंतप्रधान. त्यामुळे ब्रेक मिळणे सोपे गेले असते; पण नाही गेले. आपला मांसाचा थर कुठेही न दाखवणारा थोबडा आणि ताडमाड उंची ही आपल्याला ब्रेक मिळण्याच्या आड येणार, हे अमिताभलाही ठाऊक होते; पण आपल्यामध्ये गुण आहेत याची त्याला पक्की जाणीव होती. या जाणीवेमुळे स्वतःच्या चित्रपटसृष्टीमधल्या भवितव्याबद्दल तो निश्चित होता. देवयानी चौबळपासून तो आपल्याला ब्रेक मिळावा म्हणून दाणा टाकत होता. एक दिवस त्याला खरोखरच ‘ब्रेक’ मिळाला, ख्वाजा महंमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’मध्ये. अब्बाससाहेब कशी पिक्चर्स काढतात हे तुम्हाला ठाऊक आहेच. बरी काढतात; पण चालत नाहीत. (फक्त त्यांच्या कथेवर राजकपूर चित्रपट काढतो, त्याच वेळी ते चित्रपट चालतात!) मला अमिताभच्या करीअरसंबंधात विचार करताना आपले जुने कसोटीवीर खंडु रांगणेकर यांनी स्व. विनु मांकड यांच्याविषयी जे लिहून ठेवलंय, ते आठवतं- ‘मांकड हा काठेवाडचा गमेडिया (गावंढळ). पण आपल्या गुणांचा इतका त्याला आत्मविश्वास होता की, तो कधी लाचारपणे वागला नाही!’ अमिताभलाही आपल्या उपजत गुणांबद्दल आत्मविश्वास होता व आपली इंदिरा आंटी पंतप्रधान असूनही जरी त्याला ब्रेक मिळाला नव्हता, तरी तो कधीच ‘सेट बॅक’ मिळाल्याप्रमाणे खचला नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘आनंद’नंतर

सात हिंदुस्थानीनंतर अमिताभची गाडी चालू झाली होती, पण रडतखडत. काही थोडे चांगले परफॉर्मन्सेस. एरवी गडी लवकर बाद होऊ लागला होता. ‘आनंद’मधल्या बाबू मोशायच्या भूमिकेत एक गहरा सेन्सेटिव्ह बुलंद आवाज, गहराई में डुबी हुई आंखे पब्लिकसमोर आली. दिवस राजेश खन्नाचे होते. त्याच्या ऋजू, हृदयस्पर्शी, दिल को छु देनेवाली स्टायलिश डायलॉगबाजीने भारलेली पब्लिक राजेश लग्नाला पहिला आणि अमिताभला दुसरा नंबर देत होती. राजेश कान्नाने पोरीबाळींना आपल्या नादी लावले होते. (अर्थातच हिंदी चित्रपटाचा फार मोठा प्रेक्षकवर्ग बायकांचाच असतो). अमिताभलाही त्या प्रेक्षकवर्गामध्ये वाटा मिळू लागला होता.

‘अमिताभ’ला पसंत करणारी पब्लिक, तो आपल्या इंटलेक्चुअलगिरीचाच भाग समजत होती. त्यात ‘सिद्धार्थ’चे निर्माते कॉनरॅड रूक्स होते. सिद्धार्थला त्यांना अमिताभ हिरो म्हणून हवा होता. आपण अमिताभला इंटरनॅशनल स्टार बनवू अशी त्यांची ईर्ष्या होती. पण अमिताभने शशी कपूर-सिमीप्रमाणे आपण इंटरनॅशनल कारनाम्यासाठी विकाऊ नाहीत, याची त्यांना समज दिली. ‘आनंद’नंतर त्याची चांगली-वाईट कामे असा कोणी हिसाबच करत नव्हता. ‘रेश्मा और शेरा’मधल्या राखीने पेश केलेला नवविधवेचा आकांत आणि अमिताभने पेश केलेल्या मुक्या (डायलॉग शून्य) दुबळ्या भावाचे जिवंत चित्रण अगदी सहजासहजी विसरले गेले. ‘बाँबे टू गोवा’मध्ये छेडछाड करणाऱ्या हिरोची हलकीफुलकी भूमिका, महंमूद आणि त्याच्या बसमधल्या पार्टीच्या धमालीपुढे टिकली नाही. एरव्हीच महंमूद आपल्या दर्जेवाल्या समीक्षकांना नामंजूर. त्यात अमिताभने त्याच्या चित्रपटात काम केल्यामुळे समीक्षकांनी कोल्हेकुई केली. ‘अमिताभ महंमूदच्या संगतीने बिघडला. ज्याने ‘आनंद’मध्ये अव्वल अदाकारीचा नमुना दाखवला, तो अमिताभ आता महंमूदच्या सांगण्यावरून नाच-गाणी करू लागला. ‘परवाना’मधला मत्सरी खलनायक, अशा काहीच भूमिकांमधून अमिताभने आपल्या अदाकारीचे आश्वासक जोहर दाखवले. एरव्ही ‘बन्सी बिरजु’, ‘एक नजर’, ही त्याची भावी पत्नी जया भादुरी हिच्या समवेत निघालेली चित्रं धरून ‘बंधे हाथ’ वगैरे बहुतेक सर्व चित्रांत तो फ्लॉप झाला.

संजीवकुमारला जसे निराशेने घेरले होते, त्याप्रमाणे अमिताभलाही… पण आपण फ्लॉप अॅक्टर असल्याचे तो कबूल करत नव्हता. राजेश खन्ना त्यामुळे प्रसन्न होत होता. अमिताभ हा दुय्यम भूमिकेसाठी योग्य असून, बाबू मोशायच्या पलीकडे त्याची झेप जाणार नाही, असे त्याने पटवण्यास सुरू केले होते. नवीन निश्चल, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, संजीवकुमार हे त्या काळचे नवीन चेहरे. आल्या आल्या सर्वांनीच आपल्या अभिनय-गुणांची झलक दाखवून, थोड्याच दिवसांत ते फिके पडले आणि राजेश खन्नाने रुपेरी पडदा आडवला होता.

अंधेर ही अंधेर में

हिंदी सिनेमाची दुनिया नव्यांना एक चिरेबंदी भिंत भासू लागते. अमिताभ हा काही हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर आलेला आणखी एक चिकना हिरो नव्हता. अमिताभ किंवा संजीवकुमार ही माणसे हिरोच्या रिक्वायरमेंट्सच्या हिशेबात ऑकवर्डच माणसे होती. संजीवकुमारजवळ चेहरा होता, पण त्याबरोबर गलथानपणे पसरलेला निरुपयोगी देह होता. अमिताभची फिगर स्लीम होती, पण तोंडावर मांसाचा लेप नाही आणि लंबाईला काही माप नाही. हिंदी सिनेमात रेहाना सुलतान नामक एक अदाकारा काही काळ गाजून गेली, तिची मला आठवण होते. ‘दस्तक’, ‘चेतना’ वगैरे सिनेमांतून तिचा गाजावाजा झाला व तिला उर्वशी अवॉर्डही मिळाले. पण अखेर तिचा भाव इतका उतरला की, निर्माते तिला घेईनात. तिला ब्रेक देणारे निर्माते प्रसिद्ध लेखक राजिदरसिंग बेदी एकदा मला म्हणाले की, ‘रेहानाने मला लिहिले आहे, ‘बेदीसाहेब, मला पुन्हा एकदा ब्रेक द्या’- तिचे ते पत्र वाचताना मला जाणवले की, ती ढसढसा रडत असावी.’ अदाकाराला असे दूर फेकले गेल्यानंतर जी वेळ येते, ती वेळ मोठी जालीम असते. अमिताभवर ही वेळ आली होती. अमिताभचे व जयाचे ‘एक नजर’ हे चित्र नॉव्हेल्टीला लागले. तेव्हा जया सहज नॉव्हेल्टीमध्ये डोकावली. ‘शो’ला चिटपाखरूही नव्हते! असेही दिवस अमिताभला पहावे लागले. चित्रपटांची निवडबिवड चुकली? आपण अदाकारीला कमी पडलो? पब्लिकला दुसरे कोणी पसंत होते म्हणून ती आपल्यावर लक्ष देत नव्हती? कुठलेही कारण अशा वेळी रास्त वाटू लागते. आपण पलॉप अॅक्टर आहोत, एवढे सत्य-कटुसत्य मात्र गिळावेच लागते.

सूर लागला नाही म्हणावं, वेळ चांगली नाही म्हणावं, पण, काहीतरी आपल्या जिंदगीमध्ये बिघडलंय हे खास. या बेकार थोबड्याची आणि सहा फूट लंबाईची मुसीबत घेऊनही आपण या चित्रपटधंद्याच्या चिरेबंदी भिंतीपल्याड जाऊन पोहोचलो, पण इथे आता अंधेराही अंधेरा नजरेस येत होता. आशेचा आता किरणही नजरेस येत नव्हता.

तसा प्रत्येक हीरो आणि लीडर हा देवदेवस्की, गंडेदोरे, ताईत ज्योतिषी यांच्याशी सल्लामसलत करत असतोच. अमिताभ त्यांची चेष्टा उडवत असे, पण हा इंटलेक्च्युलगिरीचा भाग होता. माणूस म्हणून तो आतल्या आत भिजलेल्या मांजराप्रमाणे भेदरलेला होता. मंगळाचा खडा, गुरूचा खडा, पूजा, मुहूर्त हे तोही पाहत असेल. त्यानेच एकदा हे मंजूर केले होते की, या सर्व गोष्टींच्या चांगल्या फलश्रुतीची मी कळत-नकळत वाट पाहतो आहे! ‘भगवान के घर में देर हैं लेकीन अंधेर नहीं-’ सिनेमावाले हा डायलॉग सिनेमात टाकतातच, चुकत नाहीत, पण या व्यवसायाच्या चिरेबंदी भिंतीआड पसरलेल्या काळोखाच्या साम्राज्यात आशेचा किरण कधी दिसतो, याची कुतुहलाने आणि औत्सुक्याने वाट पाहत राह्यला होता अमिताभ.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

असे ऐकले की, प्रकाश मेहेरा नावाचा एक दिग्दर्शक ‘जंजीर’ नावाचा चित्रपट काढतो आहे आणि त्यात देव आनंदला घेणार आहे. पण आता अमिताभने, त्याच्या आईने जी व्रतवैकल्ये केली होती, त्याची फळे दृष्टोत्पत्तीस येऊ लागली होती. आणि हिंदी सिनेमाच्या चिरेबंदी जगात प्रकाशाचा पहिला किरण चमकू लागला होता. देव आनंदने ती भूमिका नाकारली आणि अनेक शिफारशीमुळे अमिताभकडे आली. देवानंद ते अमिताभ ही प्रकाश मेहेरांची झेप जरा न पटणारी होती; परंतु प्रकाश मेहरांच्या आणि अमिताभच्या तकदीरने एकदमच ही झेप घेतली आणि ते गाजू लागले.

‘शोमन शिप’मध्ये अस्सलपणा

‘जंजीर’मध्ये अमिताभला पुन्हा ब्रेक मिळाला आणि योग्य ब्रेक मिळाला. हिंदी चित्रपटाच्या स्वप्नसृष्टीमध्ये अस्सलपणाची गरज भासत होती. हॉलिवुडमध्ये गोळागोळींच्या चित्रपटांमध्ये क्लिंट इस्टवुड या नटाने अस्सलपणाला एक कमर्शियल व्हॅल्यू निर्माण केली होती. एका माणसाने आठ माणसांचा समाचार घेणे, ही बाब आता पब्लिकला भंकस वाटू लागली होती; पण क्लिंट इस्टवुडने आपल्या डॉलरवाल्या चित्रपटामधून टॉर्चरचा सेन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी केली. तो म्हणे, ‘हॉलिवुडचा नायक एक ठोसा झाल्यावर रक्ताचा पिंक थुकतो आणि काहीच झालं नाही, अशा रितीने हसतो आणि वर दुष्मनाचा वचपा काढावा अशा रितीने प्रती ठोसा मारतो. ही भंकस आता प्रेक्षक मंजूर करणार नाहीत.’

हिंदी प्रेक्षक काही वेगळा नाही. तो हळूहळू राजेश खन्ना, जितेंद्र, शशी कपूर या हीरोंनी केलेल्या मारामाऱ्या नामंजूर करू लागला होता. ‘जंजीर’ हा चित्रपट एकूणच हिंदी चित्रपटातल्या चालत आलेल्या गोष्टींना ब्रेक देणारा ठरला, तो याच दृष्टीने. यातील पोलीस अधिकारी एका अड्डेवाल्याने (प्राण) खुर्चीवर बसण्यापूर्वी ती लाथेने उडवतो किंवा अपघातामध्ये मेलेल्या मुलांची प्रेते दाखवून जयासारख्या चक्की-छुरियावाल्या, झोपडीवाल्या लडकीला ठणकावून शुद्धीवर आणतो, हे प्रसंग आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनात जाऊन ठसले. कुठल्याही अड्डेवाल्याला पोलीस अधिकाऱ्याने असेच वागवायला हवे आणि कुणीही साक्षीदार पैशाच्या लालचीने सत्य दडपणाचा प्रयत्न करू लागला, तर त्याला असेच पोलिसांनी ठणकवायला पाहिजे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. (हे करायचे नाही आणि मग डोईजड झालेले गुंड हाताळण्यासाठी ‘प्रिव्हेंटिन्ह डिटेंशन’ किंवा ‘मिसा’ हवा, हे म्हणणे पब्लिकला समजत नाही, ते याचसाठी.)

‘जंजीर’ हा धंदेवाईक चित्रपट खरा; परंतु त्यातील अदाकारांनी पेश केलेले गुण अस्सल होते. शोमनशिप आणि अस्सलपणा (Genuxne-ness) यांचा तो उत्कृष्ट आणि Sleek असा मिलाफ होता.

गोल्डन व्हॉईस

‘जंजीर’ हिट झाला. अमिताभच्या करिअरने पुन्हा शिखरावर उसळी खाल्ली. अमिताभमध्ये अभिनयाचे गुण होते. त्याला आवाजाची अशी देवी देणगी होती की, लता मंगेशकरच्या सुरेल्या कंठाने पण क्षणभर आविष्कार थांबवून तो ऐकत राहावा. चांगला खणखणीत आवाज असलेले शत्रुघ्न सिन्हा, किंवा अजित, अमजदसारखे अदाकार किंवा खर्जातला भरदार आवाज- राजेश खन्ना, राजकुमार, रझा मुराद यांचा, दिलीपकुमारचा मध्यम परंतु भरदार, घनेरा आवाज या सर्वांपेक्षा आणि सर्वांच्या आवाजाचा गुण विशेष आत्मसात असा आवाज- त्याची लयबद्ध, नेमका प्रभाव साधणारी आणि पल्लेदार अशी पेशकश ही अमिताभच्या अदाकारीची स्ट्रेंथ आहे. उत्कृष्ट आवाजामुळे कुणाची अदाकारी फुलत नाही! - सर लॉरेंस ऑलिव्हिए, रिचर्ड बर्टन, रोनाल्ड कॉलमन, लेस्ली हॉवर्ड, बर्ट लँकेस्टर, जॉन गिलगुड यांच्या अदाकारीमध्ये त्यांच्या प्रभावी, घनेऱ्या (Deep) आणि लयबद्ध आवाजाने केव्हढी भर टाकली आहे!

अर्थात आपल्याकडे राजकुमारसारखा नट एका पट्टीतच आवाजाची पेशकश करत असतो आणि त्याला दाद देणारी पब्लिकही मौजूद आहे. दिलीपकुमारने ‘राम और श्याम’, ‘गोपी’सारख्या ‘लाऊड’ भूमिकेकडे वळण्यापूर्वी अत्यंत धीम्या लयीत, खर्जामध्ये घनेऱ्या पट्टीतच डायलॉग फेक करून दर्दीली अदाकारी पेश केली होती. राजेश खन्ना ऋजु होता, त्याच्या आवाजात एक पेट्रनायनिंग असा सूर होता. कधी आर्जव, तर कधी पड खाऊन दुसऱ्यांच्या गळी आपला मुद्दा मारणे, हे राजेशचे उद्दिष्ट.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमिताभचा आवाज हा लोकांचा बुलंद आवाज आहे. ‘काला पत्थर’मध्ये राखी म्हणते त्याप्रमाणे त्याच्या काळजामध्ये धगधगणाच्या कोटी कोटी मणाच्या निखाऱ्याचा तो आवाज आहे. तो आवाज ‘दीवार’मध्ये एक देव न मानणाऱ्या, परंतु आपल्या ‘मां’ला वाचवण्यासाठी सर्वच मार्ग सुटल्यामुळे बेबस झालेल्या आत्म्याने देवाच्याच अन्यायाला आव्हान देतो, तर ‘इमान-धरम’मध्ये एका वेश्येच्या जिसमने जी जिंदगी सहन केली, तिच्यासाठी तो रूद्ध होतो. ‘काला पत्थर’मध्ये तो अधमाधम खाण मालकाला, खाण कामगार ‘हे नाव असलेले कामगार आहेत, इन्सान आहेत’ याची जाणीव देताना ज्वालामुखीसारखा पेट घेतो.

अमिताभ हा अदाकार आपल्या आवाजाच्या गुणामुळे भारताच्या काना-कोपऱ्यातील जनतेशी आयडेंटीफाय होतो, हेही पाहण्यासारखे आहे. तुम्ही पंजाबी, बंगाली, मराठी, कोणीही असा, अमिताभचा बुलंद आवाज तुम्हाला थरारून सोडतो. आपला आवाज अन्याय, जुलुम, अत्याचार, अंधार, या सर्वच्या सर्व दुष्ट जगाच्या कानापर्यंत जाऊन पोहोचवण्याचे लाजवाब काम अमिताभचा आवाज करतो. अमिताभचा बुलंद आवाज जोरदार हृदय फोडून निघून आपल्या अंतराला भेदून गेला ‘सौदागर’मध्ये. आपल्या छटेल बायकोपुढे (पद्मा खन्ना) मजबूर होऊन आपल्या बायकोपुढे (नूतन) गुडघे टेकतो आणि शरणागती स्वीकारतो. काय सांगू? काय आवाज खुललाय अमिताभचा! त्याचे ते शब्द कानात गुंजत राहत नाहीत, तर काळजात शिरतात आणि त्याच्या दुःखी मनाची पहेचान करून देतात.

हिंदी सिनेमासृष्टीत वरचेवर सुपर स्टार्स निर्माण झाले. या सर्व सुपर स्टार्सने त्या त्या काळातील प्रेक्षकांचा जो मूड होता, त्या मूडला अनुसरून आपले इमेज घडवले. दिलीपकुमारने आपल्या भूमिकातून लूझर्स डिग्निटी पेश केली. ‘देवदास’ हे त्याचे चांगले उदाहरण. ज्या वेळी प्रेक्षकांना काही तरी ‘दर्द भरे’ मनाला चटका लावणारे कॅरेक्टर भूरळ घालत होते, ज्या वेळी लताच्या आर्त आवाजाने पेश केलेली गाणी ऐकून प्रेक्षक भारावून जात होता, त्या काळात दिलीपने रसिकांच्या हृदयावर राज्य चालवले. पुढे त्याचीच चवथी किंवा पाचवी कार्बन कॉपी असलेला अदाकार राजेंद्र कुमार याने त्या या लूझरच्या आयुष्याला ‘हंपी एंड’चा रीलीफ आणला. आता हा हीरो लूझर नव्हता. त्याला कसोटीच्या काळातून जावे लागे, पण अखेर त्याची नायिका त्याला मिळाली. त्याच्या तपस्येची त्याला फलश्रुती मिळाली. ‘मेरे मेहबूब’ हे राजेंद्रकुमारची मानसिक उलघाल आणि अखेर त्याचे ‘साधना’शी मीलन यात केव्हढा ‘रिलिव्हिंग टच’ आहे.

राजेश खन्ना हा भोलाभाळा प्रेमी. शर्मिला-मुमताज यांच्यावर लाईन मारणारा पण अच्छा लडका. या बेईमान पोरांच्या दुनियेमध्ये मुली राजेशला शोधत होत्या आणि मुलं त्याच्याशी आयडेंटिफाय करत होती.

या सर्व सुपर-स्टार्सचे फॅन्स त्या त्या अदाकारामध्ये व्यक्तिशः इन्वॉल्व्ह असतात. शिरीष कणेकरसारखा चित्रपट-समीक्षक दिलीपकुमारकडे पाहताना इन्फेंच्युएटेड (संमोहित अवस्थेत) असतो, तर राजेश खन्नाने ‘फिर कब मिलोगे’ असे पडद्यावर म्हणताच, अंधारामध्ये तरुण मुलींकडून जबाब मिळत असे- ‘जब कहोगे-तब’.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अमिताभचा फॅन हा मात्र त्याच्यात पर्सनली इन्वॉल्वड नाही. एक रिकामी जमीन पडली आहे. तिथे गंगा शेट्टी आणि त्याचे साथीदार थर्टा ठोकत आणि जुव्वा खेळत बसले आहेत. इतक्यात अॅम्ब्युलन्स येते आणि तीमधून अमिताभ उतरतो. ‘अमिताभ आया!’ प्रेक्षकवर्गातून एकच आवाज निघतो. टाळ्या वाजतात. या गुंडांचे निर्दालन व्हावे म्हणून सारा प्रेक्षकवर्ग वाट पाहत असतो. जर आता अमिताभ आला नाही, तर पंचाईतच. कारण मग हे गुंड कसे हटणार? ही समस्या अमिताभ आल्यामुळे सुटते. प्रेक्षकांचा आत्मा थंड होतो.

अमिताभच्या मारामाच्याच अस्सल!

ही गुंडांची समस्या सार्वजनिक आहे आणि तिला जबाब देण्याचे कर्तृत्व अमिताभमध्ये आहे, म्हणूनच अमिताभमध्ये पर्सनली इन्वॉल्व्ह कोणीही होत नाही. तरी अमिताभ हा सर्वांचा आहे, असेच सर्वांना वाटते. सर्वांना अमिताभचा भरवसा वाटतो. खरे म्हणजे आठ-आठ माणसांना मारणारा हा हीरो हे एक फिल्मी कॅरेक्टरच आहे. आमचे विनोदी नट आय. एस. जौहर म्हणतात की, आमच्या हिंदी चित्रपटातल्या मारामाऱ्या म्हणजे पोरखेळ आहे. कुठच्याही प्रेक्षकांचा त्यावर विश्वास बसणे शक्य नाही; पण असे अमिताभच्या बाबतीत बऱ्याच वेळा होत नाही. मी बऱ्याच वेळा यासाठी म्हणतो की, ‘खून पसीना’सारख्या चित्रपटातल्या त्याच्या मारामाऱ्या ‘ढिश्यांव-ढिश्यांव’ वाटतात, बंडल वाटतात. पण ‘दिवार’मधल्या वाटत नाहीत, ‘जंजीर’मधल्या वाटत नाहीत, ‘काला पत्थर’मधल्या वाटत नाहीत. मला ‘मजबूर’ या चित्रपटातली अखेरची मारामारी आठवते. अमिताभ सत्येन कप्पू (खलनायक)ला ठोकत असतो. इतक्यात पोलीस येतात आणि सत्येन कप्पूला ताब्यात घेतात; पण आता तो व्हिलन आपल्या हातामधून गेल्यानंतरही अमिताभचा अनावर झालेला राग त्याला स्वस्थ बसू देत नाही, तो त्याला हवेतच लाथ मारतो. अर्थात अमिताभला दिग्दर्शक कसा हाताळतो, यावर हे अवलंबून आहेच. परंतु यश चोप्रा, प्रकाश मेहेरासारख्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना, आपल्याला अमिताभच्या अदाकारीमध्ये सगळी पॅशन किंवा जो जोश दिसतो, त्याला प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देत असतात.

‘काला पत्थर’मध्ये नितू सिंग तांत्रिक आंगूठी विकत असते. त्याविषयी बोलताना अमिताभ एक डायलॉग टाकतो, ‘वोह लडकी आंगुठी नहीं बेचती, वोह इस बेबस और विरान जिदगी में सपने बेचती हैं...’ अमिताभच्या अदाकारीबद्दल हेच म्हणता येईल. आपल्या पब्लिकच्या बेबस आणि विरान जिंदगीमध्ये तो एक स्वप्न विकत असतो. पण हे स्वप्न – राज कपूर किंवा राजेश खन्ना - विकतात तसले नाही. ‘आवारा’मध्ये भीषण मुखवट्यांना पाहून ‘ये नहीं हैं जिंदगी’ म्हणून गाणाऱ्या आवाजाला, ‘घर आया मेरा परदेशी’ म्हणून रुंजवणारे गीत इथे ऐकायला मिळत नाही. ‘प्रेमनगर’मध्ये राजेश खन्ना आणि हेमा ही गोंडस मुखड्यांची माणसे प्रेम करताना पाहून आमच्या दादा कोंडके यांना बरे वाटते, तसे अमिताभने राखीवर किंवा रेखावर प्रेम केल्याचे सुख आपण अनुभवत नाही. अमिताभच्या चित्रपटात प्रेम आणि त्याची पूर्तता ही फॉर्म्यालिटी असते. आणि दुष्टांचे निर्दालन त्यासाठी त्याच्या सामर्थ्याचा आविष्कार हे प्रमुख आकर्षण असते, उलट इतरांच्या चित्रपटात प्रेम हे प्रमुख आकर्षण असते, आणि दुष्टांचे निर्दालन ही फॉर्म्यालिटी असते. ‘त्रिशूल’ किंवा ‘काला पत्थर’मधले अमिताभ आणि राखीचे प्रेम अमिताभच्या करेक्टरमधला महत्त्वाचा भाग होत नाही.

अमिताभचे दुष्टांचे निर्दालन हे फिल्मी किंवा मेलोड्रॅमॅटिक लेव्हलचे असले तरी ते पब्लिक विसरत नाही. कारण या चित्रपटातील जी दुष्ट माणसे ती समाजातील Evilची प्रतीके आहेत. ती फिल्मी आहेत हे खरे; परंतु प्रत्यक्ष व्यवहारात ती शोधायची कशी? इंदिरा गांधी ‘हिटलर’ आहेत म्हणून काही त्यांना ठोकता येत नाही, एखादा व्यापारी काळाबाजार करतो म्हणून त्याला ठोकता येत नाही. आपली स्थिती ‘ग्रेप्स ऑफ राय’मधल्या जमीन गमावलेल्या त्या कुटुंबासारखी झालेली असते. आपली जमीन बळकावली कोणी तर कॉर्पोरेशनने! हे कॉर्पोरेशन म्हणजे कोणी माणूस आहे का, की त्याला दोन लापा घालून पारिपत्य करता येईल!...पण ‘काला पत्थर’मध्ये कोळशाचा खाणमालक, जो कामगारांच्या जीवाची फिकीर करत नाही, तो प्रेम चोप्राच्या रूपाने उभा राहतो आणि त्याला अमिताभच्या तोंडाने तुम्ही सांगत असता, ‘तुमको फिर मैं जिंदा नहीं छोडूंगा!’

अमिताभ लोकप्रिय होत होता. कारण प्रत्येक माणसाला कुठेतरी परिस्थिती प्रेम चोप्रासारखी निष्ठूरपणे किंवा गब्बरसिंगप्रमाणे सूडबुद्धीने सामोरी आलेली असते. आपला माणूस हा उपजतच पराभूत मनोवृत्तीतून जगत असतो. तो जिथे तिथे आपला पराभवच होत असलेला पाहतो आणि या पराभवाचे उट्टे काढण्याचे मांडे खात असतो. आपला देश मोठा, कधी काळी या देशात रामराज्य होते, कधी काळी या देशात शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी पुरुष होते; पण आता ते सर्व गेलं आहे. आता सभोवार खुजी माणसं जगताहेत, त्यांच्या हातात देशाचा कारभार आहे. आपण कुठे मार खात नाही? प्रत्येक क्षेत्रात मार खातो, क्रिकेटमध्ये मार खातो, हॉकीमध्ये मार सातो, राजकारणात मार खातो, या सर्व पराभवाचा शेवट करणारी अद्भुत पराक्रमी व्यक्ती आपल्या मनातून पाहिजे असते. ‘धी जजमेंट ऑफ न्युरेंबर्ग’मधला तो न्यायाधीश म्हणतो ना, ‘आम्हाला उंच बघता यावे म्हणून आम्ही हिटलरचे स्वागत केले. आम्हाला मानाने जगता यावे म्हणून आम्ही विचार केला की, थोडा वेळ आम्हाला दुर्दम्य व्यक्तिमत्वाची जरुरी आहे.’

असे व्यक्तित्व आम्ही अमिताभच्या क्रोधी कॅरेक्टरमधून स्वीकारत असतो. हा पराक्रमाचा पुरुषोत्तम, धैर्याचा मेरुमणी - वगैरे जी श्री रामदासांनी शिवाजीला विशेषणे लावली, ती ज्याला लावता येतील असा अमिताभ बच्चनही त्यांच्या मनात कुठेतरी वास करत असतो. मुक्तीच्या स्वप्नाचा तो शिल्पकार असतो, तर सुवर्णयुगाच्या वाटचालीवरचा तो दीपस्तंभ असतो.

अमिताभ बच्चन एक बिलकुल थोबडा नसलेला, लांबसडक अजगरासारखे हात आणि ताड-माड टांगा असलेला हा झिपरी-मानव एक ‘स्वप्न-मानव’ होऊन पडदावरचे तीन तास प्रेक्षकाला पराभूत जीवनावर मात केल्याची नशा चढवतो आहे. ‘जंजीर’, ‘दिवार’, ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ किंवा ‘काला पत्थर’ हे चित्रपट हे एका चित्रपट मालिकेप्रमाणे (Serial) प्रमाणे आले आणि अमिताभचा स्वप्नील कर्तृत्वाचा ठसा उमटवून गेले. ह्यातील प्रत्येक चित्रपट जरी मल्टी स्टार असला तरी मूलत: तो प्रत्येक चित्रपट एकाच व्यक्तिमत्त्वाभोवती गुंफलेला आहे. आणि त्याचे नाव आहे अमिताभ बच्चन.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या चित्रपटाचे टाळी घेणारे संवादही अमिताभसाठीच लिहिलेले असतात आणि या चित्रपटातील अदाकारीच्या दृष्टीने महत्त्व फक्त अमिताभलाच आहे. ‘जंजीर’मध्ये प्राण-जया भादुरी आहे, तर ‘त्रिशुल’मध्ये संजीवकुमारशी त्याचा मुकाबला आहे. ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये अमजद आणि अमिताभपेक्षा हँडसम विनोद खन्ना आहे, तर ‘काला पत्थर’मध्ये शत्रू आहे. परंतु हे सर्व अदाकार, अमिताभपेक्षा काही गुणामध्ये सरस असले तरी अमिताभचे सपोटिंग कॅरेक्टर्स म्हणून वावरतात. ‘जंजीर’मध्ये प्राणची खुर्ची लाथेने उडवणारा, तर ‘त्रिशूल’मध्ये ‘आज मेरे जेब मे पांच कौडीयाभी नहीं, लेकिन पंदरह दिनमे, मैं इसे (संजीवकुमारची जमीन) खरीदुंगा’, असे आत्मविश्वासाने संजीव कुमारला बजावणारा, आणि ‘काला पत्थर’मध्ये शत्रुच्या सिगारेटवर आपली विडी शिलगावून ती तुच्छतेने फेकून देऊन शत्रूचा अपमान करणारा अमिताभ हा अधिक श्रेय घेतो, ते त्याच्या दिग्दर्शकांमुळे. आणि सलीम-जावेदसारख्या पटकथा लेखकांमुळे. त्यांनाच त्याची इमेज तशी व्हावी ही इच्छा आहे.

अमिताभची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याला निर्मात्यांनी काम द्यावे, हे साहजिकच होते. परंतु यश चोप्रा-प्रकाश-सलीम जावेद या मंडळींनी पेश केलेला अमिताभ आणि इतर मंडळींनी पेश केलेला अमिताभ हा वेगळा आहे. ‘अमर-अकबर-अँथनी’, ‘नटवरलाल’, ‘मजबूर’, ‘नमक-हराम’, ‘अदालत’, ‘डॉन’ या चित्रामध्ये जो अमिताभ लोकप्रिय झाला, तो त्याच्या अभिनयाच्या जोरावर आणि ‘गंगा की सौगंध’, ‘खून पसिना’, ‘आलाप’, ‘परवरीश’, ‘कभी कभी’ या चित्रामध्ये अमिताभ लोकांच्या पसंतीस उतरला नाही, कारण अमिताभच्या आपल्या अदाकारीला योग्य अशा त्या भूमिका नव्हत्याच.

दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी अमिताभची प्रतिमा ती ‘उबगवाणी’ (Stale) होण्यापूर्वीच बदलली. आणि अमिताभ एका विनोदी अभिनेत्याच्या भूमिकेत पेश झाला. स्वतःशीच बोलणारा, डॉयलागमध्ये Slangचा सतत वापर करणारा, उटपटांग वागणारा, परंतु दुष्मनाशी मुकाबला करताना हिसाब चोख पुरा करणारा अमिताभ हा संथ धीम्या लयीत व घनगंभीर भाषेत मोजून मापून लंबेचवडे डॉयलाग टाकणाऱ्या, काळजात सुलगणाऱ्या निखाऱ्यामुळे साधे हसणेही विसरलेला अँग्री मॅन अमिताभच्यापेक्षा अगदी वेगळा होता. ‘अमर-अकबरमधल्या अँथनी’मध्ये परवीन बॉबीच्या बॉडीगार्डच्या हातून मार खाऊन येतो आणि आरशाला पट्टया मारू लागतो, तो प्रसंग सर्व अमर-अकबरमधला Kingpiss आहे. प्रेक्षक साऱ्या चित्रपटभर या प्रसंगाची वाटच पहात राहतात, त्याच्या बरोबर डायलॉग बोलतात. अमिताभला या कामासाठी त्या वर्षाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक (फिल्म फेअर अवॉर्ड) मिळाले तेही पटते- एका उत्तम अदाकाराला जर पब्लिकने दाद दिली तर ते चांगलेच. तर ‘डॉन’मध्ये पान खाणाऱ्या बनारसी बाबूचा भाबडेपणा पेश करताना, त्याने पानाची पिंक टाकण्यापासून गडबडबाले डॉयलॉग पेश करण्यापर्यंत एक हाडामांसाचा गंवार तुमच्यासमोर उभा केला आहे. आणि ‘खईके पान बनारसवाला’ या गाण्याबरोबर तो काय नाचलाय. अमिताभच्या लांब टांगा नृत्यासाठी अत्यंत लवलवीत वेतासारख्या हालतात. एरव्ही ऑकवर्ड चालीचा अमिताभ नाचताना अत्यंत लयीत आणि ग्रेसमध्ये नाचतो.

‘डॉन’ हे एरव्ही ‘ढिश्यांव-ढिश्यांव’ छाप मारहाणीचे चित्र परंतु अमिताभच्या बनारसी भैयाची बडबड आणि त्याचे नाचणे, यामुळे ‘डॉन’मध्ये जान आली आहे. अमिताभ काही चित्रात वाया गेला आहे. ‘खून पसीना’मध्ये त्याची पिटाई वैताग आणते. पिटाई करताना गुंडांशी तो कबड्डीदेखील खेळतो हा प्रकार आत्मविश्वास दाखवण्यापेक्षा हास्यास्पद वाटतो. ‘कभी कभी’मध्ये शशी कपूर, ‘खून पसीना’मध्ये विनोद खन्ना, ‘आलाप’मध्ये रेखा आणि ‘परवरीश’मध्ये नितू-शबाना, ‘कस्मे-वारे’मध्ये नितू सिंग, ‘शोले’मध्ये अमजद आणि जया यांच्या अदाकारीपुढे अमिताभच्या अदाकारीचे जोहर फिके पडले होते. ‘आलाप’ हे हृषिकेश मुखर्जींचे चित्र. यात एका गायकाची भूमिका केली अमिताभने. अलीकडे ‘जुरमाना’ या हृषिकेश मुखर्जींच्या चित्रात पुन्हा अमिताभला काम मिळाले. दोन्ही चित्रपटांतील भूमिका काही खास नव्हत्याच. केवळ हृषिकेश मुखर्जींच्याच या कथा आहेत, म्हणून त्या नीटपणे रेखीव आहेत, असे समजण्याचे कारणच नाही. हृषिकेश मुखर्जींना मान द्यायचा म्हणून या भूमिका अमिताभने केल्या एव्हढेच वाटते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अर्थातच आता चित्रपट व्यवसायामध्ये स्थिरावल्यावर अमिताभ एकामागून एक करार करत सुटलाय. आपण जितके करार करतो, तितकी आपल्या नाश्त्यामध्ये अंडी वाढतात, असे अमिताभने एका पत्रकाराजवळ सांगितले होते. आपली चित्रे पडल्यामुळे आपल्या लोकप्रियतेमध्ये काही उणे पडणार नाही, याची त्याला खात्री आहे. अमिताभ तसा धूर्त आहे. व्यवसाय कसा सांभाळावा, याची त्याला पूर्ण कल्पना आहे. देवयानी चौबळ कधी कधी आपल्या अदाकाराविषयी जबरदस्त नेमकी गोष्ट सांगते. अमिताभचे चित्रपट धंद्यामध्ये नुकतेच कुठे पाय रोवले असतील-नसतीलही, तेव्हा देवीने अमिताभचे घडवलेले हे दर्शन आजही यथातथा आहे, असे मला वाटते. देवी म्हणते-

“अमिताभ हा थंड, संयमी आणि अत्यंत धूर्त आहे. फिल्म धंद्यात तो बघता बघता मुरलाय. फिल्म करार मिळवण्यापासून, ते हजारो चाहते सांभाळण्याच्या अनेक कला त्याला अवगत आहेत. अगदी गंगेच्या प्रवाहासारखा शांत चेहरा करून बसण्यापासून ते जया भादुरीला लोकांना ऐकू जाईल अशा बेताने नैनीतालहून ट्रंककॉल करण्यापर्यंत, साऱ्या खुब्या तो वापरतो. फरक इतकाच आहे की, तो हे सारं इतक्या सफाईने करतो की, लोकांना वाटावं हा सुसंस्कृत, लाजाळू, शांत, भला माणूस असून चुकून या लायनीत आला आहे. मग या चुकलेल्या वासरावर सारे माया ओतत असतात.”

देवीने हे वर्णन केल्यानंतर अर्थातच बराच काळ - सात-आठ वर्षांचा लोटला आहे. अनेक करार करून पचवलेल्या अंड्यांची लकाकी तर अमिताभच्या चेहऱ्यावर आलीच आहे, परंतु आता त्याला कोणी सिनेमा क्षेत्रातला ‘दूधपिता बच्चा’ समजत नाही. अमिताभ हा समझदार प्रोफेशनल आहे आणि प्रत्येक हिंदी सिनेमासृष्टीतील अदाकाराला तसेच असावे लागते. आपण काय करतो हे त्याला ठाऊक आहे. आपण ‘नटवरलाल’सारख्या उघडच स्टंटबाज चित्रपटात काम करतो, त्या वेळी हा चित्रपट चालेल तर इज्जत जाईल आणि न चालेल, तर नाव जाईल, अशा एका पेचातून त्याला मार्ग काढायचा असतो. तो चित्रपट चालल्यामुळे नाव राहते आणि इज्जत जाते, हा हिशेब करून तो या चित्रपटातली आपली भूमिका पार पाडत असतो.

एक-दोन फेल्युअर्स इथे-तिथे, यामुळे आपण रस्त्यावर फेकले जात नाही, याची त्याने खात्रीच करून घेतली आहे. एरव्ही आपल्याला लायक अशी एकांड्या वृत्तीच्या माणसाची, तडफदार, परंतु आतल्या आत धुमसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका जेव्हा केव्हाही आपल्या वाटेला येईल, त्या वेळी तिचे सोने करणे, हे आपल्या हाती आहे, हे त्याला पक्के ठाऊक आहे. त्या वेळी त्या भूमिकेतील प्रत्येक कृतीमध्ये त्याची पॅशन ठसठसून भरलेली असते आणि सर्व प्रेक्षकवर्गाला, त्याच्या मनात ठसठसणाप्या, एका अँग्री मॅनला आव्हान करून बाहेर जाणतो.

अमिताभ हा जवळजवळ असा एकच अभिनेता आहे की, संभाषणाविना बोलतो. त्याचे Silence हेसुद्धा बोलते. त्याच्याभोवती on the Screen आणि off the Screen असा काही माहोल असतो की, जो दुसऱ्याशी काहीतरी बोलतो. त्याची खोल, रोखलेली स्थिर नजर जेव्हा पेश होते, त्या वेळी तुम्ही त्याचे दुष्मन असाल तर तुमच्या मणक्यातून वीजेची लहर नक्कीच गेलेली असेल. तो कधी कधी माणूस होऊन डोके खोल खांद्यामध्ये काटकोनात वाकवून बसलेला असतो स्वतःमध्ये डुंबलेला, तर कधी तो इंतजार करत असतो. ‘पीटर, तुम मुझे धुंडते थे, और मैं इधर तुम्हारा इंतजार कर रहा था’ गोडाऊनमध्ये थंडपणे, अनंतकालपर्यंत गुंडाची वाट पहात बसलेला अमिताभ आपल्या निःशब्द अदाकारीवर अशा एखाद्या डायलॉगने फिनिशिंग टच देतो.

‘काला पत्थर’मध्ये त्याची आणि शत्रूची कँटीनमध्ये होणारी मुलाखत, त्यात शत्रूचे तोंड चाललेले पण, अमिताभ थंडपणे, त्याचा अंतिम शेवट करत, अशी रंगतदार होते. तर ‘शोले’मध्ये विधवा जया आणि तिच्यावर आशिक झालेला अमिताभ यांच्यामध्ये होणारी निःशब्द मुलाखत तशीच चटका लावणारी. हिंदी अदाकाराला डायलॉग नाही म्हणजे त्याची ‘जळावीण मासा’ अशी परिस्थिती. दिलीपकुमारसारखा माना हुवा अदाकारही याला अपवाद ठरत नाही. पण, अमिताभ आपल्या निःशब्दतेतून अदाकारी करू शकतो. किंबहुना तो असा एकच अदाकार आहे.

अमिताभ बच्चनने आपल्या अदाकारीचे जे जोहर दाखवले, ते पब्लिकने सर्वच्या सर्व पसंत केले असे नाही. परंतु जे पसंत केले ते मीही पसंत करतो. त्याचा ‘गोल्डन व्हॉईस’ जो ‘शतरंज के खिलाडी’साठी सत्यजित रे सारख्या चोखंदळ दिग्दर्शकालाही वापरावासा वाटला आणि त्याचे ‘नटवरलाल’मधील खुशबुदार बालगीत जे लता-किशोरच्या गाण्यांच्या मुकाबल्यातही आपल्या मनाला लुभावते, त्याची डायलॉगची पेशकश जी विलक्षण नेमकी आणि भेदक आहे, त्याचा अबोल तिऱ्हाईतपणा जो अत्यंत बोलका व सोशल आहे, स्लँगमिश्रित स्वतःशी बडबडणे जे चिक्कार हसवते, त्याचा गंवारपणा, जो विलक्षण रांगडा आहे आणि त्याचे नाचणे जे अत्यंत ग्रेसफुल आणि मस्ताने आहे, हे सर्व जोहर मलाही पसंत आहेत.

याखेरीज अमिताभच्या अदाकारीने माझी पकड घेतली ती ‘बैनाम’ या चित्रातील रोमँटिक दृश्यामध्ये. ‘बेनाम’ हे ‘ढिश्यांव-दिश्यांव’वाले चित्र. एका पाश्चात्य चित्रपटाची तद्दन कार्बन कॉपी. फक्त यातील अमिताभ-मौशुमीचा सुखी संसार हा झिरमिऱ्यांसारखा जोडलेला. पण ‘बेनाम’मधल्या मारामाऱ्यांपेक्षा हा सुखी संसारच चांगला खुललाय. यातील अमिताभ आणि मौशुमी यांच्या प्रणयी जीवनाने एक प्लेझंट व स्वीट मूड पेश केला आहे, जो अद्यापही माझ्या स्मरणातून पुसला गेलेला नाही. अमिताभने जयाबरोबर ‘अभिमान’मध्येही या मूडची काहीशी झलक दाखवली होती, पण ‘बेनाम’मधल्या दृश्यातील प्रणयी जीवनाचा प्लेझंट अनुभव काही खास होता. ते दृश्य पाहता-पाहता मला अनेक वेळा वाटायचं, ‘आम्ही भारतामध्ये रोमिओ-ज्युलिएटची आवृत्ती आणखी एकदा का काढू नये? आणि जर कुणाला ही आयडिया सुचली, तर आज तरी अमिताभ-मौशुमी हे त्या भूमिकांना जेव्हढे साजतील, तेव्हढे साजणारे दुसरे अदाकार मला दिसत नाहीत. असो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जाड ओठ, मांसाचा लेप नसलेले गाल, केसांचे दाट झिप्पाड, लांब लोंबणारे जानदार हात आणि तशाच भव्य, असंबद्ध टांगा असलेला माणूस पाहताच गंगा घाट ते मुंबई धाम असा प्रवास करून ‘जय मुंबई धाम की’ म्हणत-म्हणतच बंबैया फिल्म इंडस्ट्रीमध्ये अस्ताव्यस्त पसरलाय. गलिव्हरला लिलिपुटियन्सने टाचण्या टोचाव्यात, त्याप्रमाणे ‘आलाप’चे अपयश, ‘धी ग्रेट गब्लर’चे अपयश त्याला टोचते. त्यामुळे तो हैराण होत नाही व त्याची चुळबूळ पाहून तो उठून फिल्म इंडस्ट्रीमधून निघून जाईल, असे मत्सरी मंडळींना वाटते, त्या वेळी तो ‘काला पत्थर’ उशाशी घेऊन पुन्हा निवांत होतोय.

अमिताभ आता चित्रपट धंद्यामध्ये मूळ धरून उभा आहे. त्याच्या लोकप्रियतेची प्रतवारी करताना पहिला क्रमांक वा दुसरा एव्हढीच चर्चा चालू असते. अर्थातच लोकप्रियतेच्या उत्तुंग लाटेवर आरूढ होणाऱ्या माणसाच्या लेखी जो मत्सर लिहिलेला असतो, तो अटळच म्हणायचा. एके काळी ‘आनंद’मधला बाबू मोशाय पाह्यल्यावर अमिताभच्या प्रेमात पडलेल्या इंटलेक्चुअलनी आता अमिताभशी पूर्णपणे फारकत घेतली आहे. मेहमूदच्या चित्रपटात उटपटांग करणारा अमिताभ, केसांचे झिप्पाड आणि गॉर्जस पेहेरावात वावरणारा अमिताभ, ‘ढिश्यांव ढिश्यांव’ या दोन शब्दांचे शेपूट जोडला गेलेला अमिताभ, लोकप्रियतेसाठी गॉसिपवाल्यांना दूर ठेवणारा आणि संसारावर दुष्ट छाया नको म्हणून जयापासून आपले रेखाचे संबंध अंधारात ठेवणारा अमिताभ आज त्याच्या इमिजिएट सर्कलमधल्या इंटलेक्चुअल्सनी अव्हेरला आहे. आज अमिताभ पडद्यावर अँग्री मॅन आहे, परंतु व्यवहारात अगदी व्यवहारी आहे. पडद्यावर त्याच्या काळजात सुलगणारे निखारे आहेत. परंतु प्रत्यक्षात ते निखारे विझलेले आहेत आणि चित्रपट व्यवसायातील सवंग लोकप्रियतेशी त्याने तडजोड केली आहे. म्हणून-म्हणूनच इंटलेक्चुअल्सना आजचा अमिताभ नामंजूर आहे.

अर्थातच इंटलेक्चुअल सर्कलमधली सगळी माणसं उच्च मध्यमवर्गातली किंवा अंग्रेजी पढ़ी लिखी असतात. अखबारवाले किंवा तसेच कोणी, ज्यांनी आपल्या चित्रपटाचा ढंग केवळ पब्लिकच्या उपहासाचा एक विषय बनवला आहे. अशा मंडळींना पब्लिक खेचण्याचे सामर्थ्य असलेला एक नट कसा मंजूर होईल? या सर्कलने एकेकाळी सी. रामचंद्रचे संगीत नामंजूर केले, मा. भगवान नृत्य नामंजूर केले, किशोरचे गाणे आणि मेहमूदचा विनोद नामंजूर केले. त्याला अमिताभच्या अदाकारीचे जोहर कसे पसंत पडणार? अमिताभच्या आवाजात डायलॉग ऐकणं, एखादे संगीत ऐकण्यासारखे आहे. पण ज्यांच्या जीवनात काही रसच उरलेला नाही, त्यांना ते कसे जाणवणार? आपल्या उच्च मध्यमवर्गाचे किंवा सुशिक्षित वर्गाचे पब्लिकशी काही नातेच नाही. त्यांना ‘क्लोज डोअर’ अॅक्टिव्हिटीमध्ये जी पूर्णता वाटते, त्यामुळे आपल्या समाजातील सर्वसामान्य माणसाच्या दिल और दिमागमध्ये अंगाऱ्यासारखा घुमसत असलेला अमिताभ त्यांच्या नजरेस पडतच नाही. त्यामुळे त्यांना पडद्यावरचा अमिताभ खोटा वाटतो. पण अमिताभ खोटाच आहे, नव्हे, अमिताभ हे आपल्या बेबस आणि विरान जिंदगीला पडलेलं एक पौरुषत्वाचं, मर्दानकीचं स्वप्न आहे.

या स्वप्नात टिकते ती फक्त अमिताभ नावाच्या एका बहाद्दर वीराला मजबूर होऊन स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता भोगावी लागलेली होरपळ. ‘दीवार’ चित्रपटामध्ये आपल्या भावाच्या पिस्तुलाची गोळी खाऊन, जेव्हा अमिताभ अखेरच्या क्षणी ‘मां’च्या ‘गोद’मध्ये विसावण्यासाठी येतो, त्या वेळी त्याच्या तोंडी असलेला तो डायलॉग, ‘मैं थक गया हूं, माँ’ मला हेलावून गेला. आपली आयुष्याची अंधेरी वाटचाल अशीच आपल्याला थकवणार आहे काय? आपल्या Defeatist psychologyला हेच उत्तर आहे काय?

अमिताभ बच्चनचे एक बरे आहे, तो नट आहे आणि त्याने पेश केलेल्या व्यक्तिरेखा या तशा ‘कार्डबोर्ड-कॅरेक्टर्स’ आहेत. त्यातून त्याने पैसा उभा केला आहे आणि ज्या वेळी त्याच्या लोकप्रियतेला ओहोटी लागेल, त्या वेळी तो त्याच्या प्रिय पत्नीकडे जयाकडे, संसाराकडे परतेल. त्याने आपला संसार, आपले खाजगी जीवन व्यवस्थित ठेवले आहे. त्याला छोट्या सुबक व गुबगुबीत गोष्टी आवडतात, तो लंबू असल्यामुळे. त्या गोष्टीपैकीच एक जया भादुरीही असावी. त्यामुळे तो जेव्हा लोकप्रियतेच्या लाटेवरून उतरेल, तेव्हा राजेश खन्नाला ज्याप्रमाणे डिंपल नावाची एक अपरिचित पाहुणी भेटली, त्याप्रमाणे अमिताभला भेटणार नाही. गुलजारच्या राखीप्रमाणे जया कधी अभिनयाच्या ओढीने पुन्हा फिल्म प्रवेश करणार नाही. थोडेसे फॅमिली प्लॅनिंगच्या संबंधात सोशल वर्क वगैरे... आणि दोन मुले. तद्वत नर्गीस व सुनील दत्त यांच्या संसाराच्या पॅटर्नवर, आधीच त्यांचा संसार आखलेला दिसतो.

अमिताभ बच्चन! एक पब्लिकमधला माणूस. अपना आदमी! आज लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाला आहे. पैसा, चमचे, मोटार, बंगला, नोकर, चाकर, सिनेमा धंद्यातली स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेली चमक-दमक सारे काही आहे. इतके आहे की, लोकप्रियता ओसरेल, तरी ते संपणार नाही. परंतु एरव्ही त्याने काय केले असते. लोकप्रियतेची लाट ओसरलेल्या नटाप्रमाणे त्याला न्युरोसिसने झपाटले असते. आपण एक चित्रपट पाह्यलाय ‘नेटवर्क’ नावाचा. त्याचा नायक असाच लोकप्रियता गमावलेला न्युरॉसिसने झपाटलेला ... एका बाईच्या डोक्यात येते, याला टीव्ही प्रोग्रॅममध्ये बोलू द्यावे. वाट्टेल ते बोलू द्यावे. आणि तो वाट्टेल ते बोलून लोकप्रिय होऊ लागतो. त्याला समाजातली विषमता ठाऊक असते. तो, टीव्ही प्रेक्षकांना आदेश देतो, ‘जा- खिडकीत उभे रहा आणि ओरडा - मी यापुढे हे सहन करणार नाही…’ घरोघर मग लोक ‘यापुढे हे सहन करणार नाही’ म्हणून ओरडत असतात. रस्त्यावर माणसे नशेत किंवा वैफल्याने पागल होऊन असेच बोलत असतात आणि त्यांच्याभोवती गर्दीही जमते. ऐकतात, करमणूक होते आणि विसरतात.

अमिताभ बच्चन या मर्दानकीचे स्वप्न दाखवणाऱ्या माणसामध्ये आणि टीव्हीवर ‘हे सहन करणार नाही’ हे सांगणाऱ्या ‘नेटवर्क’च्या नायकामध्ये मूलतः फरक नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एक असामी बुळबुळीत उतरणीवरून घसरणीवर लागला असता पब्लिकला ‘हे आपण सहन करणार नाही’ वगैरे प्रोटेस्ट करावयास सांगतो आणि पब्लिक त्याचे ऐकते आणि एक अदाकार आपल्या हृदयामध्ये सुलगणारे निखारे तेवत ठेवून पडद्यावरील खाणमालकाला, स्मगलर्सच्या चमच्यांना आणि गुंडांना धडा शिकवतो. या दोन्ही गोष्टींना तुम्ही काय म्हणाल? मी त्या दोघांनाही अदाकारांचा ‘Cry of the heart’ असे म्हणेन. इया साव्हिन्ना नामक एक होतकरू रशियन अदाकारा म्हणते, “Art is cry of the heart, overflowing with love, suffering, joy and fullness of one's perception of the world. If you are an artist, take up, what moves you, something you want to tell people so much that you will die, if you don't!”

‘नेटवर्क’चा नायक आणि अमिताभ आपला abstract समाजरचनेविरुद्ध जो प्रोटेस्ट मांडतात, तो इतक्या सिन्सिरिटीने की, त्याचा संमोहित करणारा (Spell-binding) परिणाम होतो आणि चाहत्यांनाही वाटते की, ‘They have done what is necessary to the people’. बंबैया फिल्मच्या जगात अदाकार फसलेल्या जनावरासारखा असतो. बंबैया फिल्मचा जो माहोल आहे, तो त्याला फिल्मी बनवतो. त्याला एखाद्या खच्ची केलेल्या सांडासारखा राबवतो. तो त्या दुनियेत झापड लावलेल्या जनावरासारखा उरी फुटून धावत असतो. वाढत्या वयाचे ओझे वाढल्यावर, दमछाक झालेल्या जनावराप्रमाणे तो निस्तेज व निवांत होतो. फिल्मी सिताऱ्यांचा प्रत्येकाचा एक वक्त असतो. त्या वक्तबरोबर त्याची निशाणी संपायची असते.

अमिताभ बच्चनची पेशकश काही बेमिसाल कॅरेक्टर्समधून उभी राहणार नाही हे मंजूर. पण त्याचा आदिमानवाच्या गुहेतून निघालेला बुलंद प्रतिध्वनिसारखा आवाज, त्याची खोल तुमच्या अंतर्यामात पाहणारी नजर, त्याच्या स्टाईलमध्ये असलेले सुलगणारे निखारे, त्याची अबोल निःस्तब्धता, हे सारे त्याच्या अदाकारीचे जोहर जोपर्यंत गुंडांचा धिंगाणा आहे, जोपर्यंत कामगारांचे रक्त शोषून पैसे कमावणारा कोयलावाला आहे, जोपर्यंत आया-बहिणींच्या अब्रू लुटणारे सैतान आपल्या कल्पनाविश्वात मौजूद आहेत, तोपर्यंत ताजेच राहतील. डोळ्यांमध्ये चमकत राहतील…

अमिताभचे चित्र तुम्ही केव्हाही पहा- गुंडांच्या मोकाट राज्यात, दोन पाय आकस्मिक दिसू लागतात. हळूहळू कॅमेरा पॅन होत होत अमिताभची दुर्दम्य आकृती दिसू लागते. त्या वेळी तुमच्या शेजारच्या खुर्चीवरचा, सिनेमात पूर्ण डुंबलेला पब्लिक उत्स्फूर्त टाळ्या वाजवतो नि उद्गारतो- ‘अमिताभ आया!’

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......