राहुल गांधी काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की!
पडघम - देशकारण
श्याम पाखरे
  • ‘भारत जोडो’ यात्रेचं एक छायाचित्र
  • Wed , 05 October 2022
  • पडघम देशकारण भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

मी काही राहुल गांधींचा चाहता नव्हतो. तरीदेखील ‘भारत जोडो’ यात्रेच्या पूर्वसंध्येला त्याने केलेल्या “द्वेष आणि दुभंगाच्या राजकारणामुळे मी माझ्या वडिलांना गमावून बसलो. परंतु कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या प्रिय देशाला त्या राजकारणाला बळी पडू देणार नाही”, या ट्विटने सरळ हृदयालाच हात घातला. “मी यात्रेचे नेतृत्व करत नाहीये, मी केवळ त्यात सहभागी झालो आहे,” असे राहुल यात्रेच्या सुरुवातीलाच बोलला होता. त्यात तथ्य आहे. भारतातल्या आघाडीच्या १५० नागरिक संघटनांनी या यात्रेला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा संकल्प केला आहे. “प्रेमाचा द्वेषावर विजय होईल. भीतीवर आशेचा विजय होईल. आपण सर्व जण मिळून हा विजय मिळवू,” असे राहुलने त्या ट्विटमध्ये लिहिले होते. ही यात्रा असा उदात्त विचार घेऊन निघाली आहे.

हा विचार या मातीतील हजारो वर्षांच्या सामायिक सांस्कृतिक वारस्यातून सृजन पावला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेतील या विचाराचा चेहरा राहुलच आहे, याबद्दल कोणालाही शंका नाही. आज या यात्रेचा २६वा दिवस. यात्रेने ३५०० किमीपैकी ६८७ किमी अंतर पार केले आहे. अजून २८८३ किमी अंतर शिल्लक आहे. मी दररोज वेळ मिळेल तेव्हा युट्युबवर ही यात्रा पाहत असतो. हजारो लोक एका पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा सामूहिक कृती करतात, तेव्हा अशी कृती आपले लक्ष वेधून घेते. तर हजारो यात्रींचे नेतृत्व करत रस्त्याच्या कडेला उभ्या लोकांना अभिवादन करत, त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत अत्यंत सहज आणि नैसर्गिकपणे चालत असलेल्या हसतमुख राहुलला पाहणे, हा एक सुखद अनुभव असतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या यात्रेची काही क्षणचित्रे स्मृतीपटलावर कोरली गेली आहेत. आईच्या हक्काने राहुलचा हात आपल्या हातात धरून त्याला आशीर्वाद देणाऱ्या, मायेने त्याला आलिंगन देणाऱ्या वयस्कर महिला, अत्यंत विश्वासाने राहुलच्या खांद्यावर आपले मस्तक टेकवणाऱ्या महिला, राहुलचा हात हातात घेऊन चालणारी हिजाब घातलेली महिला, राहुलला गुलाबपुष्प देऊन लाजत त्याचा हात धरून चालणारी एक नवतरुणी, अत्यंत भावूक होऊन अश्रू अनावर झालेल्या एका तरुणीला मोठ्या भावाप्रमाणे आलिंगन देऊन, तिची पाठ थोपटत तिचे सांत्वन करणारा राहुल, राहुलच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासाने चालणाऱ्या महिला कार्यकर्त्या, उत्साहाने राहुलशी हस्तांदोलन करणारी लहान मुले, राहुलच्या कानात काहीतरी सांगणारी एक लहान मुलगी, राहुलच्या खांद्यावर बसलेली एक चिमुरडी, दुसऱ्या एका चिमुरडीला मांडीवर घेऊन बसलेला राहुल, सोबत चालणाऱ्या एका लहान मुलीच्या निसटलेल्या सॅंडलचे बक्कल लावणारा राहुल, राहुलला भेटणारे म्हातारे पुरुष, व्हीलचेअरवर बसलेल्या, कुबड्यांचा आधार घेऊन उभ्या असलेल्या दिव्यांग व्यक्तींशी हस्तांदोलन करणारा राहुल, दलित आणि आदिवासींशी चर्चा करणारा राहुल, त्याला प्रेमाने भेटणारे अल्पसंख्याक समुदायांचे लोक आणि म्हैसूर येथे रात्रीच्या अंधारात धोधो कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित करणारा चिंब भिजलेला राहुल आणि त्या पावसात भिजत राहुलला ऐकणारे सर्वसामान्य लोक…

वर उल्लेख केलेल्या मला भावलेल्या या क्षणचित्रांमधील हे लोक समाजातील दुर्बल घटक समजले जातात. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वर्तुळाच्या परिघावर फेकल्या गेलेल्या वरील घटकांचा या यात्रेतील सहभाग आणि दृश्यात्मकता, हे या यात्रेचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. परंतु राहुलच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असे काय आहे, जे या परिघावरील लोकांना त्याच्याकडे आकर्षित करते, असा प्रश्न मला पडला.

त्याचे उत्तर शोधू लागलो तर लक्षात आले की, ही पदयात्रा आहे, रथयात्रा नव्हे. अडवाणींच्या रथामध्ये केवळ विशेषाधिकार प्राप्त अशा काही व्यक्ती बसू शकत. सर्वसामान्य लोक तर जमिनीवरच असत. हे रथ आणि जमिनीमधील अंतर केवळ भौतिक अंतर नव्हे, तर युगानुयुगे राजकीय, सामाजिक, आर्थिक विशेषाधिकार भोगणारे, स्वतःला उच्च समजणारे मूठभर लोक आणि त्या अधिकारांपासून वंचित राहिलेले, डावलले गेलेले बहुजन यांच्यामधील ती युगानुयुगांची दरी आहे.

‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सर्वसामान्य माणूस राहुलसोबत चालू शकतो. त्यात समान पातळीवर सहभागी होणे, सर्वांना शक्य आहे. या लेखाच्या सुरुवातीपासून मी राहुलचा एकेरी उल्लेख करतो आहे, यामागे हे एक कारण आहे. राहुललादेखील इतरांनी त्याचा एकेरी उल्लेखच करावा, असे वाटते. मग मी वृत्तपत्रांमध्ये या यात्रेदरम्यानच्या राहुलच्या छायाचित्रांकडे बारकाईने पाहू लागलो. व्यक्तीचे डोळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात, असे म्हणतात. त्या छायाचित्रांमधील राहुलच्या डोळ्यांमधील खरेपणा आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे या व्यक्तीवर विश्वास ठेवावा, असे त्याच्याकडे बघणाऱ्याला वाटते.

‘भारत जोडो’ यात्रेसाठी निवडलेल्या १२२ यात्रींपैकी एक तृतीयांश महिला आहेत. परंतु यात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सर्व वयोगटांतील महिला अत्यंत विश्वासाने राहुलजवळ का जातात, हा प्रश्नदेखील मनात उभा राहिला. या महिला भारताच्या ५० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. त्या राहुलच्या सान्निध्यात सुरक्षितता आणि भावनिक ऊब अनुभवतात, असे दिसून येते. त्यातील अनेकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहतात. राहुल अत्यंत सहजपणे या महिलांशी संवाद साधतो. हे दृश्य आपल्याला हिंदुत्ववादी नेत्यांच्या बाबतीत दिसून येत नाही, याची दखल घ्यावी. हे असे का होते, याबद्दल या नेत्यांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

भारतीय राजकारणात सध्या दोनच शारीरिकदृष्ट्या धडधाकट पुरुष दिसून येतात. पहिले आहेत पंतप्रधान मोदी आणि दुसरा आहे राहुल. मोदींच्या छप्पन इंच छातीचा महिमा राजकीय व्यासपीठांवरून गायला जातो. मोदीदेखील चालताना, उठबस करताना उगाच छाती फुगवून अवघडून हालचाली करताना दिसतात. राहुल तुलनेने तरुण आहे आणि त्याचे व्यायाम करून कमावलेले शरीरसौष्ठव त्याच्या पांढऱ्या टी शर्टमधून डोकावत असते. राहुलला सिक्स पॅक अ‍ॅब्स असल्याचेही समजते. परंतु तो कधीही त्याचे प्रदर्शन करत नाही. त्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये सहजता असते. हे दोन्ही पुरुष शक्तिवान आहेत, परंतु मोदींची शक्ती त्यांच्या आक्रमकतेतून अभिव्यक्त होते, तर राहुलची शक्ती सहनशीलतेतून अभिव्यक्त होते. त्यात आक्रमकतादेखील आहे, पण ती संयत आहे.

गेली आठ वर्षे हिंदुत्ववादी मीडिया सेलने राहुलला ‘पप्पू’ बनवण्याची यशस्वी मोहीम राबवली. तरीही तो मोडून पडला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वात कोणतीही कटुता आलेली नाही. त्याला कोणालाही प्रत्युत्तर द्यायचे नाही. तो जसा आहे, तसाच या यात्रेत दिसतो. या ३५०० किमीच्या खडतर यात्रेत राहुलच्या सहनशीलतेच्या शक्तीचेच दर्शन होत आहे. दररोज २० ते २५ किमी पायी चालणे, हे कठीण काम आहे. सतत चालल्यामुळे माझे गुडघे दुखत आहेत, असे तो संकोच न करता जाहीरपणे सांगतो. उगाच आपण ‘सुपरमॅन’ असल्याचा आविर्भाव त्याच्यात नाही. आपल्या देशाला आक्रमक शक्तीची नव्हे, तर सहनशीलतेच्या शक्तीची आज अधिक गरज आहे. आपल्या देशासमोर उभ्या बाह्य आव्हानांपेक्षा देशांतर्गत आव्हाने अधिक गंभीर आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या आठ वर्षांत या देशात अनेक दुभंगरेषा निर्माण झालेल्या आहेत. त्यांना सांधण्यासाठी आज नेतृत्वामध्ये सहनशीलतेची शक्ती असणे अधिक गरजेचे आहे. राहुलसोबत चालणारे हजारो लोक आपल्यामधील या सहनशीलतेच्या शक्तीची अनुभूती घेत आहेत.

मोदी आणि राहुलच्या रूपाने आपल्याला पुरुषत्वाच्या दोन प्रारूपांचे दर्शन घडते. मोदी आक्रमक, कठोर आणि पारंपरिक पितृसत्ताक पुरुषत्वाचे प्रतिनिधित्व करतात. राहुलमध्ये आपल्याला पुरुषत्व (masculinity) आणि स्त्रीत्वाच्या (femininity) सकारात्मक गुणांचा संगम झालेला दिसतो. शिव आणि शक्ती यांचा संगम हा आपल्या संस्कृतीचा एक मोठा आदर्श आहे. राहुलमध्ये आपल्याला संवेदनशीलता, अहिंसा, सहकारिता, शालीनता हे स्त्रीत्वाचे गुण दिसून येतात. त्यासोबत त्याच्यामधील उत्साह, करारीपणा, आत्मविश्वास या पुरुषत्वाच्या गुणांचेही दर्शन होते. असे असणे म्हणजे पूर्ण मनुष्य बनणे.

राहुल पुरुषत्वाच्या नवीन प्रारूपाचे पालन करत आहे. हे नवीन प्रारूप १२५ वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी विकसित केले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अशाच प्रकारे पुरुषत्व आणि स्त्रीत्वाच्या सकारात्मक गुणांचा लोभस संगम झाला होता. त्यांचे एकाच वेळी ब्रिटिश साम्राज्यासमोर वज्राहून कठोर होऊन उभे राहणे आणि तसे करताना हृदयात आईचे मार्दव जपणे, जरा आठवून बघा. ही तुलना मी केवळ या प्रारूपाच्या संदर्भात केली. राहुल काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. श्याम पाखरे मुंबई येथील किशीनचंद चेल्लराम महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

shyam.pakhare111@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा