पुन्हा बाईच ‘सॉफ्ट टार्गेट’! तिचे कपडे, बोलणे-हसणे-बसणे-चारचौघांत मिसळणे, ‘त्याच्या’पेक्षा वरचढ ठरणे... सहजासहजी नाही पचनी पडत धर्मद्वेष्ट्यांच्या
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अर्चना राणे-बागवान
  • इराणमधील हिजाबविरोधातील आंदोलनाची दोन प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Wed , 28 September 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न हिजाब Hijab इराण Iran बुरखा Burqa मुस्लीम Muslim

इराणमध्ये २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीला हिजाब नीट न घातल्याने तिथल्या मोरॅलिटि पोलिसांनी अटक करून अतिशय क्रूर मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेविरोधात इराणची राजधानी तेहरान आणि दुसरे मोठे शहर मशाद येथे मोठ्या संख्यने महिला निदर्शने करत आहेत. काही महिलांनी आपले हिजाब उडवून लावले, तर काहींनी ते जाळले. काहींनी आपले केस कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले.

हुकूमशाही सरकारविरोधात महिलांनी उभारलेल्या या आंदोलनाला तिथले पुरुषही पाठिंबा देताहेत. इस्लामी देशांमध्येच धर्माच्या जाचक रूढींचे आणि त्याच्या पाठिराख्यांचे बुरखे फाडण्यात तिथला समाज, प्रामुख्याने महिला आघाडीवर असताना आपण मात्र अजून धर्म, रीतीरिवाजांचं जोखड स्वतःवर लादून घेतोय.

इराणमधल्या मोरॅलिटि पोलिसांप्रमाणेच आपल्याकडेही सध्या तथाकथित धर्मरक्षक आणि त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर शिक्षण घेणारे ‘विद्वान’ अनुयायी प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत. कुठे खट्ट झालं नाही की, लगेच यांनी काढले फतवे, उगारले दांडे! एरव्ही हिजाब, बुरख्याशी तसा आपला काही संबंध नाही, पण या इराणमधल्या घटनेने शेजारपाजारच्या, परिचयातल्या, शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी, नेण्यासाठी येणाऱ्या परिचित, अपरिचित बायका नजरेसमोर येऊ लागल्या.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सोमैया कॉलेजमधली नूरी आठवली. भांडुपला राहायची. बऱ्याचदा ट्रेनमध्ये एकत्र असायचो. घरून निघताना तिचा बुरखा असायचा. ट्रेनमध्ये तो काढून बॅगेत भरला जायचा. आवडत नसला तरी शिकायला मिळतंय, घराबाहेर पडायला मिळतंय, ही एक तसल्ली असायची. ट्रेनमधल्या गर्दीत त्या पायघोळ झग्यात अडकून फलाटावर पडणाऱ्या बायका आठवल्या. स्त्रीत्वाच्या रक्षणासाठी घातलेल्या त्या बुरख्यातूनही होणाऱ्या ‘तसल्या’ स्पर्शाने भीतीनं विस्फारलेल्या नजराही आठवल्या.

रस्त्यात, एखाद्या कार्यक्रमात, प्रवासात दिसणाऱ्या या बुरख्यातल्या बायका मला अस्वस्थ करायच्या. कसं कोंडून घेत असतील या स्वतःला अशा बुरख्यामागे? स्वतःला कोंडून घेतात ते घेतात, पण आपल्या लहान मुलींना, काही महिन्यांच्या बाळालाही हिजाब घालतात, तेव्हा काय बोलावं ते कळत नाही.

हिजाब, बुरख्याची सक्ती का स्वतःवर अशी लादायची? फक्त धर्म जपायचा म्हणून की, समाजात इतरांपासूनचं आपलं वेगळेपण सिद्ध करायचं म्हणून? ‘कुराणा’त ‘सुरह नूर’ आयतमध्ये ‘महिलांनी डोक्यापासून छातीपर्यंतचा भाग आवरणात ठेवायला हवा’, असे म्हटले आहे. मात्र तसे न करणाऱ्यास दंड किंवा ती धर्माशी प्रतारणा असल्याचे म्हटलेले नाही. तर ‘सुरह अल अहजाब’मध्ये नबी आपल्या पत्नी आणि मुलींना, तसेच इतर मुस्लीम महिलांनाही चादर ओढून घेण्यास सांगतात. जेणेकरून त्या ओळखल्या जातील आणि बाहेर होणाऱ्या त्रासापासून त्यांचा बचाव होईल. तसेच त्यांनी आपल्या स्त्रीत्वाचे रक्षण करण्यासाठी छातीवर ओढणी घ्यावी. आपला साजशृंगार त्यांनी परपुरुषास दाखवू नये, असेही म्हटले आहे.

त्या काळात मोठ्या प्रमाणावर टोळी युद्ध होत होती. या युद्धांदरम्यान महिला-मुलींना त्रास दिला जात होता. पळवून नेले जात होते. या त्रासापासून बचावासाठी चादर घेण्याचा उपाय नबींनी सांगितला होता. मात्र ‘कुराण’मधील ही आयत म्हणजे अल्लाचा आदेश असल्याचे भासवत तथाकथित धर्मरक्षकांनी पुढे पडदा पद्धती कायम केली.

साधारण सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एके ठिकाणी एक बुरख्यातली बाई पटकन समोर आली. बुरख्यात असल्याने तिला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. चेहऱ्यासमोरचा झिरमिरीत कपडा बाजूला करत तिने विचारलं, ‘कशी आहेस?’ तिला बघून धक्काच बसला. यापूर्वी कधी तिला बुरख्यात पाहिलं नव्हतं. म्हणजे ती घालतच नव्हती बुरखा. मग अचानक हा बदल, बुरखा कसा?

बुरखा घालणाऱ्या मुस्लीम महिलांचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होते. गेल्या काही वर्षांमध्ये ते वाढू लागलेय. याबाबत मला जाणवणारी कारणे म्हणजे, सामाजिक दडपण, कौटुंबिक पातळीवर मोठ्यांकडून लहानांच्या मनावर बिंबवल्या जाणाऱ्या धर्मविषयक अवास्तव कल्पना, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल महिलांमध्ये असलेली दुय्यम भावना, शिक्षणाचा अभाव, कालानुरूप घातक ठरणाऱ्या जुन्या रूढी परंपरांना ‘टाटा, बाय बाय’ न करता सुरू असलेल धर्माचे अंधानुकरण.

तिला उलटसुलट प्रश्न विचारल्यानंतर माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले होते. पण तबलिगीचा धर्मप्रसार आजचा नव्हता. मग आताच असे काय झाले? ‘नात्यातल्या सगळ्याच महिला बुरखा घालू लागल्या होत्या, मी एकटी तरी नकार कसा देऊ?’, तिचा प्रश्न.

खरे तर धर्मप्रसारकाचे काम महिलाच मोठ्या जोमाने आणि नेटाने करताना दिसतात. कधी ते मनाविरुद्धही असते किंवा कधी आपल्या सोयीने केलेलेही असते. मात्र अशी सक्ती करताना आपण आपल्याच हातांनी आपल्याच मुलींचे आयुष्य पुन्हा एकदा धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या जोखडात बांधतोय, याचे त्यांना भानही राहत नाही. ‘पहले हिजाब फिर किताब’ म्हणणारे, मुली महिलांना केवळ धर्मसत्ताक समाजात कठपुतलीप्रमाणे नाचवण्यास तयार करताहेत, हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही.

यासंदर्भात एका अलिमांशी (धर्मशिक्षण घेतलेल्या) बोलणे झाले. त्यांचे म्हणणे होते, ‘कुराणा’मध्ये ‘हिजाब’, ‘चादर’चा उल्लेख आलाय. तो आदेश अल्लाचाच आहे म्हटल्यावर मुस्लीम महिलांसाठी तो फर्ज आहे आणि अर्थातच अल्लाचा हुकूम पाळला नाही, तर तो गुनाहच मानला जाईल. मुली महिलांना स्वसंरक्षणासाठी, पुरुषांच्या वाईट नजरेपासून बचावासाठी ‘बुरखा’, ‘हिजाब’ घालायलाच हवा. पण त्याची सक्ती करण्याऐवजी प्रथम तो का आवश्यक आहे, ते सांगायला हवे. मग त्या आपोआप त्यावर अंमल करतील.

त्या म्हणतात, ‘नेहमी बुरख्यावरच इतका उहापोह का? इतर मजहबच्या स्त्रियांच्या घुंगटावर, त्यांच्या पेहरावाबद्दल आम्ही आक्षेप घेतो का? मग सगळीकडून हिजाबवरच टीका का? स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी हिजाब, बुरखा आमचा हक्क आहे.’ हिजाब वा बुरखा परिधान करूनही किंवा अंगभर कपडे घातले, तरी कुठल्याच धर्मातील स्त्री वा स्त्रीत्वाचे रक्षण होत नाही, हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मुली महिलांनी स्वसंरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे, हे त्यांनी मान्य केले. चादर फर्ज आहे, यावर त्या ठाम राहिल्या. हिजाब न वापरणे गुनाह आहे, हे कुठे म्हटलेय, ते मात्र त्यांना सांगता आले नाही.

काही दिवसांपूर्वी एका यु-ट्युब चॅनेलवर सुरु असलेले हिजाबवरील चर्चासत्र पाहण्यात आले. त्यात उत्तर प्रदेशमधील काही मौलवी सहभागी झाले होते. एका पुरुषाने या चर्चासत्रात प्रश्न उपस्थित केला- ‘माझ्या मुली हिजाब घालून शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडल्या, तर त्यात काही चुकीचे नाही ना?’ यावर उपस्थित मौलवींने दिलेले उत्तर असे, ‘मुली महिला घराबाहेर कोणत्याही कारणास्तव पडू शकत नाहीत. दिनी तालीम घेण्यासाठी घरी व्यवस्था करण्यात यावी. व्यावहारिक शिक्षण त्यांनी घ्यायलाच हवे असे नाही, पण ते द्यायचे झालेच तर हिजाब घालायलाच हवा. तसेच आजकाल महिलांना बाहेर जाऊन नोकरी करावीशी वाटते. तेही चुकीचे आहे. ते काम पुरुषाचे आहे. महिलांनी घरी बसावं आणि घरगृहस्थी सांभाळावी.’

इतक्या बुरसटलेल्या विचारांना अजूनही एखाद्या समाजात स्थान असणे, हे कोणाचे मागासलेपण म्हणावे? हे मागासलेपण प्रत्येक समाजात कमी-अधिक फरकाने असतेच, पण त्याचे परिणाम अगदी टोकाचे दिसतात. अगदी कालची मुंबईतील घटना, हिंदू पत्नीने बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून मुस्लीम पतीने तिला जीवे मारले. धर्म म्हणजे अफू असल्याचे म्हटले जाते, त्यातील तथ्य अशा काही घटना घडल्या की, प्रकर्षाने जाणवू लागते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

समाजावरच धार्मिक वर्चस्व वाढत जाण्यामागचे आणखी एक प्रकर्षाने जाणवणार कारण म्हणजे समाजावर असलेला राजकीय प्रभाव. बहुसंख्य, अल्पसंख्याकांचा राजकीय खेळ. माझा धर्म मोठा की तुझा धर्म... पदोपदी सिद्ध करावी लागणारी देशभक्ती! भाजपची सत्ता आल्यानंतर मुसलमानाबद्दलचा द्वेष उघडपणे दिसू लागला. प्रत्येक जण आपापल्या संघटनाच्या तालावर नाचू लागलाय. तुम्ही कट्टरपणा दाखवता तर आम्ही आणखी दुप्पटीने दाखवू, अशी चढाओढ निर्माण झालीय.

यामध्ये ‘सॉफ्ट टार्गेट’ पुन्हा बाईच? तिचा बुरखा, घुंगट, कपडे, बोलणे-हसणे-बसणे, चारचौघांत मिसळणे, त्याच्यापेक्षा तिचे वरचढ ठरणे... सहजासहजी नाही पचनी पडत या धर्मद्वेष्ट्यांच्या. मग कधी तिची अवहेलना करत, तिला पायदळी तुडवत, स्त्रीत्वाच्या जोखडात अडकवत; पुन्हा उभे करायचे धर्माच्या सारीपाटात!

मागे ‘टिकली’ नाही म्हणून हिंदुत्व ‘खतरे में’ आले होते, तसेच हे बुरखा प्रकरण. महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना चौकटीत बांधून ठेवणाऱ्या जुनाट, तथ्यहीन रूढी मोडून समाजात स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी मार्ग मोकळा करून देणाऱ्या सर्व समाजसुधारकांनी कसोशीने केलेल्या प्रयत्नांची आपण माती करतोय, असे वाटतेय... पुन्हा त्याच मार्गावर जाऊन.

.................................................................................................................................................................

लेखिका अर्चना राणे–बागवान मुक्त पत्रकार आहेत.

archanaarane@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......