चार्वाक, बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेत ‘आजचे मराठी साहित्य’ उभे राहावे, ही काळाची गरज आहे…
पडघम - साहित्यिक
रवींद्र शोभणे
  • पहिले मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन, पणजी
  • Tue , 13 September 2022
  • पडघम साहित्यिक रवींद्र शोभणे पहिले मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन Pahile Mukta Srujan Marathi Sahitya Sammelan

११ व १२ सप्टेंबर २०२२ दरम्यान गोव्यात पणजी इथे ‘पहिले मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांच्या भाषणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

१.

आपण एकाच काळाची अपत्ये आहोत. या काळाच्या उदरातून आपण बाहेर येऊन आपल्या अस्तित्वासाठी झगडतो आहोत. कधी हा झगडा आपला आपल्याशी असतो, तर कधी तो आपल्या भोवतालाशी, वास्तवाशी असतो. झगड्याचे, संघर्षाचे स्वरूप बदलते; बदलत राहते. पण मूळ  प्रश्न मात्र कायमचे तेच असतात. त्यांचे आपण ‘सनातन’ असे नामकरण करून मोकळे होतो. अमूक एक प्रश्न हा आपल्या समाजाचा पूर्वापार चालत आलेला प्रश्न आहे वगैरे. त्याचं वय तसंच कायम असतं, त्याची दाहकता तीच असते. सामाजिक संदर्भानुसार आपण त्याची उत्तरं वेगवेगळ्या मार्गांनी, माध्यमांद्वारे  शोधण्याचे प्रयत्न करतो. या प्रश्नांची उत्तरे हाती लागतात की, फक्त आपण प्रश्नांचाच पिच्छा पुरवत असतो शेवटपर्यंत? मागील कित्येक वर्षे, पिढ्या आपण त्या प्रश्नांशीच झगडत आहोत. पिढ्या संपल्या, नव्या आल्या, भोवताल बदलत गेला; पण हे प्रश्न मात्र चिखलात घट्टपणे पाय रोवून बसलेल्या काळ्या कातळासारखे उभे आहेत. या प्रश्नांची नावे तरी काय मग? रस्त्यावरच्या दगडांना आपण शेंदूर फासून आपल्या सोयीसाठी वेगवेगळी नावे देतो, तशीच नावे या प्रश्नांना द्यावी लागतात. कधी कधी या प्रश्नांचेच दैवतीकरण कधी झाले, हेही आपल्याला कळत नाही. आणि अशा प्रश्नांचं दैवतीकरण व्हायला वेळही लागत नाही.

हे प्रश्न आपल्या जगण्याच्या मुळांशी घट्टपणे वेटोळे घालून असतात. विचारवंत, तत्त्वज्ञ, समाजसुधारक त्यांची उत्तरे आपल्या मार्गाने शोधतात, तर सर्जनाच्या वाटेने जाणारी माणसे आपल्यापरीने त्या त्या प्रश्नांना सामोरी जातात. या दोन्ही पक्षांपेक्षा आणखी एक वेगळा पक्ष असतो. तो या पूर्वापार प्रश्नांचा स्वयंघोषित रक्षक म्हणून समाजात वावरत असतो. या प्रश्नाचा साधा टवकाही कुणी उडवू नये म्हणून हातात शस्त्र घेऊन तो सर्वत्र, सर्व काळ वावरत असतो. त्याला सगळंच गोड, गुडीगुडी दिसत असतं. त्या प्रश्नांना तो आपल्यापरीने सजवत असतो, अधिक मोहक करत असतो. त्यांच्या चिरंजीवीत्वासाठी तो काही अंतिम उत्तरे शोधून ठेवतो- इतिहास, परंपरेतून. त्यामुळे आता  त्या प्रश्नांची चिकित्सा कुणाला करता येत नाही. माणसाने चिकित्सा करू नये, श्रद्धा ठेवावी अशी मोहमयी शिकवण यातून समाजाला दिली जाते. जो ऐकतो त्याचं भलं होतं आणि जो ऐकत नाही त्याला मुळातूनच उचकटून फेकलं जातं. वरवर पाहता एवढ्या साध्या द्वंद्वावर ही सगळी उभारणी झालेली असते.    

समाजासाठी अमुक एक गोष्ट घातक आहे, मानवी हिताच्या, त्याच्या भविष्यकाळासाठी ही गोष्ट चुकीच्या मार्गाने फोफावते आहे, हे सांगणं आजच्या काळामध्ये अधिक धोकादायक झालेलं आहे. आम्ही ज्या घटकांना शेंदूर फासून एक खोळ उभी केली, ती तशीच राहावी, त्याचा टवकाही कधी उडू नये, म्हणून काळजी घेणारे या गोष्टीची सातत्याने काळजी घेतात. ते अशा चिकित्सा करणाऱ्यांना श्रद्धेची-एका अर्थाने अफूचीच गोळी समोर ठेवतात. हे अर्थात पूर्वापार चालत आलेले आहे. सॉक्रेटिसला दिली गेलेली शिक्षा, चार्वाकाची झालेली उपेक्षा, नित्शेला लागलेले वेड, ज्ञानेश्वरांची जिवंत समाधी, नामदेवांचा महाराष्ट्र त्याग, तुकारामाची हत्या, महात्मा गांधींची हत्या, साने गुरुजींची आत्महत्या ही यादी आपल्यासमोर आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ही नामावली कुणी फॅशन म्हणून उच्चारत नाही. ही सगळी माणसे तुमच्या आमच्या जगण्यालाच वेटोळे घालून बसणाऱ्या ‘त्या’ प्रश्नांची चिकित्सा, विच्छेद करू पाहत होते. त्यांच्या विचारांची दिशा समाजासाठी सर्वमंगल अशी वाट निर्देशित करणारी होती, हेही नाकाराता येत नाही. मला वाटते, आपण सगळेच या समाजाच्या सर्वमंगल व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न करणारे शुभचिंतक आहोत.

या अशा अनेक लहान-मोठ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या भूमिकेचा उच्चार सातत्याने व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. मुळात मुक्त श्वास घेऊन मनाजोगे लिहू पाहणाऱ्या लेखकाला, बोलू पाहणाऱ्या माणसाला असे व्यासपीठ अधिक महत्त्वाचे ठरावे, अशा विचारांचा मी आहे. आणि तोच विचार या व्यासपीठावरून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

२. 

रामायण-महाभारत ही हे भारतीय संस्कृतीतील दोन महत्त्वाची महाकाव्ये आहेत. किंबहुना त्या तत्कालीन समाजाचा ऐतिहासिक दस्तावेज प्रतिबिंबित करणाऱ्या कलाकृती आहेत, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. हे विधान मी करत नाही, तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आपल्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या निबंधात हे विधान ठोसपणे मांडले आहे. भारतीय समाजात मातृप्रधान कुटुंबव्यवस्था संपुष्टात येऊन पितृप्रधान, पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था स्थिरावण्याचा हा ‘महाभारत काळ’ होता; आणि महाभारतकर्त्या वेदव्यासाने हाच काळ भारतीय इतिहासाचा प्रारंभ कल्पून इतिहास लेखनाचा प्रारंभ केला, असा ठोस विचार मांडला. महाभारताच्या मूळ आवृत्तीचे नाव ‘हा जय नावाचा इतिहास आहे’, असे आहे. पण काळाच्या ओघात हा स्वच्छ विचार जाणीवपूर्वक बाजूला सरला गेला आणि हा सुंदर, प्रतिभासंपन्न, जागतिक साहित्यात सर्वश्रेष्ठ ठरणारा ग्रंथ आपण ‘पोथी’ म्हणून देवघरात गुंडाळून ठेवला. तत्कालीन सामाजिक स्थितिगतीचे, संस्कृतींचे वंशधारेचे चित्रण करणाऱ्या अशा ग्रंथांना आपण पोथीबद्ध करून ठेवल्यानंतर त्याचे काय भीषण सामाजिक परिणाम होऊ शकतात, याचे उदाहरण अलीकडच्या काही घटनांच्या निमित्ताने अनुभवले आहे. अशा मूळ विचारांना, ग्रंथांना पोथीनिष्ठ रूप कोण देतं आणि त्यातून काय निष्पन्न होतं, याचा आता एक मोठा इतिहास झाला आहे. आणि या इतिहासानेच आपल्या संपूर्ण समाजाच्या पटलावर चरे ओढले आहेत.   

ज्या प्राचीन किंवा ऐतिहासिक कथा मौखिक कथनपद्धतीने पुढे संक्रमित झालेल्या  असतात,  त्यांना मिथकांचे स्वरूप प्राप्त होते. आणि मिथकांच्या या मायाजालात त्यातले वास्तव स्वरूप झाकोळून जाते. परिणामी अशा मिथककथांमधील व्यक्तित्वाला देवत्व, अलौकिकत्व बहाल करण्याची परंपरा रुजू लागते. यातच मग अशा कथांचे मूळ स्वरूप नामशेष होऊन भाविकतेचे, भक्तिभावाचे नवे आयाम मिळत जातात. परिणामी यातला चिकित्सेचा भाग गळून पडतो. आणि मग जो चिकित्सेच्या अंगाने या कथांकडे पाहतो, त्याला अनेक परिणामांना सामोरे जावे लागते. कारण अशी चिकित्सा मग श्रद्धेच्या मार्गातील अडसर होऊन बसते. चिकित्सा करणारे मोजकेच असतात आणि श्रद्धेच्या कैफात वावराणारे हजारो असतात, ही कुठल्याही समाजाची, त्या समाजातील धर्मव्यवस्थेची वस्तुस्थिती ठरते. काही अंशी चिकित्सेची दारे उघडी झाली, तरी ती चिकित्सा किती प्रमाणात स्वीकारली जाईल, याविषयी दुमतच असते. किंवा त्या चिकित्सेला नंतर किती अनुयायी मिळतात, हा प्रश्न पुन्हा विचार करायला लावणारा असतोच.

मराठीत मिथकांची अशी चिकित्सा सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांनी केलेली आहे. ती सबंध चिकित्सा अतिशय परखड, विज्ञाननिष्ठ आणि तर्कनिष्ठ स्वरूपाची आहे. पण त्यांच्या या चिकित्सेचा किती परिणाम मराठी साहित्यावर, कथात्म साहित्यावर पडला? महात्मा जोतीरावांच्या या विचारानंतर शंभर वर्षांनीसुद्धा आमची मराठी कादंबरी अतिशय कच्ची, बालीश आणि तर्कशून्य स्वरूपाची लिहिली जात असेल, तर जोतीराव फुलेंच्या विचारांची फलश्रुती काय, असा प्रश्न पडतो. चार्वाक, बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेत आजचे मराठी साहित्य उभे राहावे, ही काळाची गरज आहे.

३.

साहित्याच्या प्रांतात मी सर्जनेच्या, ललितलेखनाच्या अंगणात काही करू पाहणारा, धडपडणारा एक साधा शब्दसाधक आहे. त्यातही कादंबरी हा माझा अधिक जिव्हाळ्याचा विषय आहे. कदाचित मी चुकत नसेल तर काही मोठ्या कादंबरीकारांची साक्ष काढत कादंबरी हा वाङ्मयप्रकार श्रेष्ठ प्रतीचा आहे, असे मानतो. सॉमरसेट मॉम असे म्हणतो- कादंबरीकार हा कवी, कथाकार, तत्त्वज्ञ, चिंतक यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा घटक आहे. या विधानाला समोर ठेवले की, माझ्यासारख्याची छाती निश्चितच उन्नत होणार, यात शंकाच नाही. आणि मी जेव्हा कादंबरीची निर्मिती करतो, तेव्हा मला या विधानाची प्रचीती आणि महत्ता जाणवल्यावाचून राहत नाही. कादंबरीकार म्हणून मी उभा राहत असताना माझ्या लेखनावर कुठल्या  परंपरेचा ठसा उमटू नये, माझे लेखन कुठल्या विशिष्ट प्रकृतीवैशिष्ट्यात अडकून पडू नये, जीवनासंबंधी अधिक मोकळेपणाने मला व्यक्त होता यावे, हाच माझा प्रयत्न होता आणि आहेही. म्हणून मी आज कुठलाही वादी नाही. जीवनाविषयी अधिक मोकळेपणाने बोलता यावे, व्यक्त होता यावे, हीच माझी भावना आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या आधी मी मराठीतल्या मिथकांच्या अनुषंगाने काही एक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच मुद्द्यांचा परामर्श इथे मला घ्यायचा आहे, तो वेगळ्या संदर्भात. माझ्या ‘उत्तरायण’ या कादंबरीचा संदर्भ इथे देतो. मूळ मिथकांची मोडतोड करून, त्या रूढ मिथकांना नवे संदर्भ देऊन त्यातून मला वेगळी संगती लावणारी कलाकृती निर्माण करायची होती. माझ्यासमोर रूढ पौराणिक कादंबरी नव्हती. ‘ललित लेखकाने इतिहास घडविणाऱ्या माणसांच्या बाजूने उभे राहण्यापेक्षा इतिहास भोगणाऱ्या माणसांच्या बाजूने उभे राहावे,’ हे नित्शेचे विधान माझ्या समोर होकायंत्रासारखे दिशादर्शक होते. पुराणांच्या, इतिहासाच्या गौरवीकरणात आपण किती काळ अडकून पडणार आहोत? त्यातला हाडामासाचा, षडरिपूंनी ग्रासलेला माणूस आपण पाहूच शकणार नाही का? राजे, महाराजे, राण्या, प्रधान, राजवाडे यांच्या खोट्या चित्रणात आपण किती अडकून पडणार आहोत आजसुद्धा? खरंच आपला प्राचीन  इतिहास एवढा गौरवोन्नत होता का? आणि होता तर तो कुणासाठी?

ललितलेखकाला जेव्हा असे झडझडून जागे करणारे प्रश्न पडतात, उदात्ततेचे मुखवटे तडकवणारे प्रश्न पडतात, तेव्हाच तो पारंपरिक लेखनव्यवस्थेला बाजूला सारून नव्या वाटेने जाण्याचा आपला मार्ग अवलंबितो. मी हे ‘उत्तरायण’च्या निमित्ताने गंभीरपणे केले आहे. जाणीवपूर्वक जुनं पारंपरिक खोडून काढण्याचा आणि नवं काही मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक जाणकारांनी त्याची दखलही घेतली. त्याच्या वेगळेपणाची बूज राखली, पण तरीही मी असमाधानी आहे. आणि त्यामागची कारणे वेगळी आहेत. हे झाले लेखकाच्या बाजूने. पुढचे फलित काय, हा प्रश्न आणखी गंभीर आहे.

यात मराठी समीक्षेची भूमिका काय? जबाबदारी काय? समीक्षेने सजग असावे, निरपेक्ष असावे या मताचा मी आहे. आपल्या मराठी समीक्षेत मात्र या गोष्टीचा दुष्काळ आहे, अशा मतापर्यंत मी आलेला आहे. मुळात मराठीत आजच्या काळात मोठे समीक्षक किती? सैद्धान्तिक समीक्षा मांडणारे तत्त्वचिंतक किती? आणि पुस्तक परीक्षणाला समीक्षा मानणारे भाबडे समीक्षक किती? पुन:सर्जन, नवसर्जन अशाच काथ्याकुटात अडकून समीक्षा लिहिणारे आणखी वेगळं असं काय मांडणार? नवे, लिहिते काही थोडे फार अभ्यासक आपल्या दैवतांच्या पलीकडे जाऊच शकत नाहीत. रेशमाच्या जाळ्यात अडकल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे, असे दिसून येते. आपल्या दैवतांच्या उदात्तीकारणात आणि त्यांच्या प्रतिमापूजनात अनेकांची मग हयात निघून जाते. अशा वेळी कप्पेबंद, झापडबंद समीक्षा अवतरणार नाही तर आणखी काय?

पुढच्या पिढ्यापर्यंत निकोपपणे साहित्यव्यवहार घेऊन जाणारी यंत्रणा म्हणून समीक्षेला महत्त्व असते. पण हा निकोपपणा आता शोधावा लागतो. मराठी समीक्षेत आणि ललितलेखनाच्या प्रांतातही आज टोळीसंस्कृती अतिशय निगरगट्टपणे उभी राहिली आहे. ही टोळी संस्कृती दगडी चाळीसारखी भक्कम झाली आहे. तिथे त्यांच्याशिवाय अन्य कुणाला प्रवेश नाही. आमच्या दैवतांनी कुण्या एके काळी ज्या संस्कृतीला मध्यमवर्गीय, लेखकराव, लेखनकामाठी वगैरे शेलकी नामाभिधानं बहाल केली होती, त्यांनी उभ्या केलेल्या स्वयंभू संस्कृतीचं आज काय झालं? एखाद्या हुकूमशहाविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकून ती सत्ता उधळून लावणारा क्रांतिकारकच, त्या सिंहासनावर बसल्यानंतर पुन्हा हुकूमशहा म्हणून पुढे येतो, हा इतिहासातला नियम सर्वत्र लागू होतो, असाच निष्कर्ष काढावा लागतो.

आज मराठी साहित्यापुढे काही वेगळे आणि महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेलं आहेत, ते या वाङ्मयीन संस्कृतीमुळे. नवे, लिहू लागलेले तरुण लेखक काही चुकीच्या ठोकताळ्यांचा आधार घेत धडपडत आहेत. आपल्या जगण्यातल्या अनुभवापलीकडे जाऊ नये, आपलेच जगणे आपण साहित्यात मांडावे, केवळ तेच अनुभव सच्चे असतात, अशा काही संकल्पना त्यांच्या अंगी भिनल्यामुळे आपल्या जगण्याच्या  सीमित वर्तुळाच्या पलीकडे काय? केवळ आत्मचरित्रात्मक स्वरूपाचे लेखन हेच प्रामाणिक समजणाऱ्या या लेखकांनी जागतिक साहित्याकडे किंवा भारतीय साहित्याकडे एकदा डोळसपणे पाहावे असेही सुचवावेसे वाटते.

४.

साहित्यव्यवहाराचे स्वरूप आज सर्वत्र बिकट झालेले आहे. साहित्यव्यवहारात आपण प्रामुख्याने प्रसिद्धी माध्यमांचा आणि प्रकाशन व्यवस्थेचा विचार करतो. इथे तरी मला तोच व्यवहार अपेक्षित आहे. कारण ही दोन क्षेत्रे साहित्याच्या पाठीशी उभी असतात. लेखकाचे लेखन आणि लेखक या दोघांनाही समाजापर्यंत पोहचवण्याचे महत्त्वाचे कार्य या दोन व्यवस्था करतात. पण आज बदलत्या सामाजिक पर्यावरणामुळे आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक, व्यावहारिक आक्रमणांमुळे साहित्यव्यवहार किंवा प्रत्यक्ष साहित्यच बाधित झालेले आहे. मागच्या शतकात, म्हणजे नव्वदच्या पुढे आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यापाठोपाठ जागतिकीकरणाचा लोंढा प्रचंड वेगाने आपल्या घरात शिरला. त्याचा परिणाम म्हणून आपल्या समाजात प्रचंड उलथापालथ झाली. काही प्रमाणात ती सकारात्मकही होती. कारण समाजातल्या जवळ जवळ सर्वच स्तरातल्या माणसांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल घडून आलेत. त्यांचा आर्थिक स्तर उंचावला. आधुनिक जीवनशैली पाठोपाठ आपल्या विचारातही बदल घडून आलेत. या बदलाने आपल्या नैतिक-सामाजिक संकल्पनाही बदलल्या. एक चंगळवाद सर्वत्र बोकाळला. हे सगळं आपल्याला नको होतं का? तर त्याला ‘हो’ असेच उत्तर द्यावे लागेल.

हे सगळंच वाईट होतं, असंही नाही. फक्त त्याची नशा किती आपल्याला चढते यावर ते सगळं अवलंबून होतं. आणि या सगळ्यांना हुसकावून लावण्यासाठी देशीवादाचा झालेला जन्म हा किती सार्थकी लागला हेही तपासून पाहावे लागेल. कारण इतर भारतीय भाषांमध्ये कुठे देशीवाद उभा राहिला? अर्थात देशीवादाने जे काम  करायचे ते केले. माझ्या विवेचनाचा मूळ मुद्दा आणखी वेगळेच काही मांडू पाहतो.

या काळात वाङ्मयीन  मासिके  बंद पडलीत. नव्याने काही सुरू  झालीत; पण त्यांचे आर्थिक  गणित किती गडगडले, अशी मासिके चालवणे किती दुरापास्त झालेली आहेत, हे पुन्हा सांगायला नकोच. वर्तमानपत्रांच्या साहित्यविषयक पुरवण्या बंद पडल्या किंवा त्यांचे स्वरूप पूर्णतः बदलले. त्या पुरवण्या साहित्यापासून बऱ्यापैकी दूर गेल्यात. पुस्तक परीक्षण-समीक्षण आणि साहित्यविषयक चर्चा, चिंतन पूर्णतः बंद झाले. ‘अलीकडे कुणी साहित्य वाचत नाही’ असे सांगत आम्ही केलेल्या बदलांना पर्याय नव्हता, अशी भूमिका वर्तमानपत्रांच्या संपादकांची, मालकांची तयार झाली. आणि ते स्वाभाविकही होते असे दिसते. कारण बहुतेक वर्तमानपत्रे भांडवलदारांनी आपल्या हातात घेतलीत. त्यामुळे एकमेव दिवाळी अंक एवढ्या बळावर लिहित्या लेखकाला समाधान मानावे लागते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी मुद्दाम इथे लिहित्या लेखकाला असे म्हटले आहे. यात नवा लेखक कुठे येत नाही. तो आलाच तर त्याला प्रस्थापित व्हायला खूप कष्ट पडतात. अशा वेळी त्याच्या हातात वाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी नवीन माध्यमे आलीत आणि त्याने आपली निर्मितीची भूक त्यावर भागवण्याचा निर्णय घेतला. व्यक्त होण्यासाठी ही माध्यमे निश्चितच उपयुक्त होती. तो आपल्या तोऱ्यात, कैफात त्यावर लेखन करू लागला. त्याच्या लेखनाला फेसबुक शिष्टाचार म्हणून लाईक्स, कॉमेंट्स मिळू लागल्या. आणि आपण मोठे लेखक झालोत, या आत्मरंगात तो रंगून गेला. पण केवळ व्यक्त होणे म्हणजे साहित्य नव्हे. ती साहित्यानिर्मितीची पहिली पायरी असते, हे या मंडळींना सांगणं गरजेचं होतं. पण आपण सागितलं  तरी ते किती गंभीरपणे आपलं सांगणं घेतील, याविषयी माझ्यापासून सगळेच साशंक आहेत. ‘अशी असावी कविता फिरुनी, तशी नसावी कविता, हे सांगावयास आहात तुम्ही कोण भले, पुसतो तुम्हाला’ किंवा ‘आम्ही कोण म्हणुनी काय पुसता आम्ही असू लाडके…’ अशी विधाने ही मंडळी आपल्याच अंगावर फेकल्यावाचून राहत नाहीत. साहित्य किंवा लेखन ही प्रक्रिया वाचन, लेखन, परिशीलन, विश्लेषण, पुनर्लेखन, संपादन, संस्करण या टप्प्यांमधून जाणारी आहे. एवढे तरी या मंडळींना कळावे, अशी अपेक्षा करू या. आणि हे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत सपक अशा लेखनाला आदर्श मानणारी ही मंडळी केवळ देवदयेस पात्र राहतील, असे खेदाने म्हणावे लागेल.

अलीकडे प्रकाशित होणार्‍या काही पुस्तकांच्या बाबतीतही बोलणे गरजेचे आहे. तसा विचार केला तर आजकाल तुललेने प्रकाशित होणार्‍या पुस्तकांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यांचा तांत्रिक दर्जाही उत्तम असतो. कारण आता छपाईचे तंत्र अतिशय विकसित झाल्यामुळे तुम्हाला तालुका स्तरावरही उत्तम पुस्तकनिर्मिती करणे सोपे झाले आहे. त्यामुळे प्रकाशन संस्थांचीही संख्याही बऱ्यापैकी वाढली आहे. पण एवढ्यावरच हे थांबत नाही. खरा आतला व्यवहार इथून सुरू होतो. आता आपला आर्थिक स्तर  वाढला म्हणून पुस्तक प्रकाशाची हौस म्हणून चाळीस-पन्नास हजार रुपये आपण सहज खर्च करू शकतो. आणि त्यामुळे हौस म्हणून पुस्तके छापण्यावर अधिक भर असलेला दिसतो. यातूनही काही चांगले लेखक, कवी पुढे आलेत, नाही असे नाही, पण आपण लिहितो आणि आपल्याजवळ पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पैसे आहेत, एवढ्या एका बळावर लेखक होण्याच्या महत्त्वाकांक्षा बाळगणारे लेखक-कवींची संख्या सुमारपणे वाढली आहे.

‘आपण जे लिहिले तेच ब्रह्मवाक्य’ अशा तोऱ्यात मंडळी पुस्तके प्रकाशित करतात. अशा लेखक-कवींची पुस्तके असे प्रकाशकही मग पैसे घेऊन दोनशे-तीनशे प्रती छापून देतात. आणि हे हौशी लेखक कवी मित्रमंडळींत पुस्तके वाटत फिरतात. आपण लेखक झालो म्हणून ते परम आनंदात असतात. आणि अशा पुस्तकांना पुरस्कार देणाऱ्या संस्थाही उदयास आल्यात. मग अशा काही लेखकांना, कवींना दहा-दहा पुरस्कार मिळतात. पुढे दहा-पंधरा वर्षांनंतर त्या लेखक कवीचं काय होतं, हा संशोधनाचा विषय आहे.

प्रस्थापित प्रकाशक आपली पुस्तके का स्वीकारत नाहीत, त्यामागची करणे तपासून त्यांच्या शिस्तीत आपल्या लेखनाला वळण देण्याचे काम ही मंडळी करीत नाही. प्रस्थापित, गणमान्य प्रकाशक, अर्थात जे प्रकाशक पैसे घेत नाहीत, अशा प्रकाशकांच्या संपर्कात राहून त्यांच्या शिस्तीत लेखक तपासून  घेणे, ते अधिकाधिक निर्दोष कसे करता येईल, यासाठी बैठक मारून पुनर्लेखन करणे, परिष्करणे करणे आणि मग त्यांच्या माध्यमातून पुस्तके प्रकाशित करणे, ही संस्कृती आजच्या नव्या लेखकांनी अंगी बाणली, तर कुठेतरी आशादायी चित्र दिसून येईल. एखाद्या लेखनावर पाच-पाच वर्षे काम करणे आणि असे काम करताना आपणच अधिकाधिक चिकित्सक होणे गरजेचे ठरते.

आणखी एका महत्त्वाच्या घटनेकडे म्हणा किंवा प्रकाराकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणजे ‘एपीआय’चा प्रकार. युजीसीने सुरू केलेले संशोधनासाठीचे काही प्रयत्न व धोरण फार महत्त्वाचे आणि नव्याने संशोधनाच्या कक्षा वाढविणारे असे होते. पण आपण प्राध्यापक मंडळी युजीसीच्याही डोक्यावर मिरे वाटणारे निघालोत. आपले संशोधन अधिक मूलगामी आणि अस्सल व्हावे, यासाठी काही सन्माननीय अपवाद वगळता आपण कधी प्रयत्नच  केले नाहीत. उलटी गंगाच आपण आपल्या दारात ओढून आणली. ISSN किंवा  ISBN नंबर्स आपण अक्षरशः विकत घेऊन त्याचाही व्यापार सुरू केला. यात चांगल्या आणि वाईटाचीही सरमिसळ झाली. आपल्यातल्या काही मंडळींनी तर चक्क एका प्रस्थापित नियतकालिकाचाच नकली अंक काढून तो परस्पर प्रकाशित केल्याची घटना घडली होती. याचाच अर्थ आपण किती हुशार आहोत हे दिसून येते. ज्ञानसाधनेत किंवा लेखनसाधनेत अशा शॉर्टकटला कुठलाही थारा नसतो, हे आपण लक्षात घ्यावे असे वाटते.

आजच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे मला वळायचे आहे. तो म्हणजे आजच्या शिक्षण क्षेत्रातल्या बेकारीचा भीषण प्रश्न. आणि त्यापाठोपाठ आज उभ्या  राहिलेल्या भस्मासुरी डोनेशन संस्कृतीचा प्रश्न. शिक्षणातील खाजगीकरणाने  हे प्रश्न अधिक भीषण आणि गुंतागुंतीचे झालेले आहेत. तरुणांच्या स्वप्नांना आज अधिक भीषणपणे चिरडल्या जाताना पाहून आपण सुन्न होऊन पाहण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. लेखनातून क्रांती करण्याची भाषा म्हणजे केवळ हास्यास्पद प्रकार आहे. ज्यांच्या हातात ही व्यवस्था आहे ती मंडळी लेखकांना खिसगिणतीतही गणत नाहीत. मग त्यांचे साहित्य वाचणे वगैरे तर दूरच. मी याच विषयावर ‘पांढरे हत्ती’ ही कादंबरी लिहिली आहे. पण पुढे काय? राजकीय व्यवस्थेच्या या प्रचंड शक्तीपुढे तुमच्या आमच्यासारखी माणसे कधी आणि कशी चिरडून जातात हेही कधी कळत नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या परिस्थितीत लिहू पाहणारी, कसदार लेखन करू शकणारी मंडळी आपला शक्तिपात होताना पाहत आहेत. खरं तर हे कुणाच्याही हातात नाही. आणि ज्यांच्या हातात आहे ती व्यवस्था बदलणे म्हणजे स्वप्नात वावरण्यासारखे आहे, हेही तेवढेच खरे. अशा वेळी नव्या पिढीकडून लेखनाच्या किती आणि कोणत्या अपेक्षा  बाळगणार?

मी निराशावादी नाही, पण भोंगळ आशावादीही नाही. आपल्या आशावादाला जमिनीचा आधार हवा असतो. समोर टणक माती आहे. तिला खोदत जाणे आपल्या हातात आहे. पाणी लागेल न लागेल. अन पाण्याच्या झऱ्यापर्यंत जाण्याचा तोच एकमेव मार्ग असू शकतो, हेही नाकारता येत नाही.

विसंवादाच्या भिंती अधिक मजबूत आणि उंच अशा उभ्या राहत असताना त्यात ओढला  आणि भरडला जातो तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आणि तरुण वर्ग. या वर्गाला एकप्रकारे साधन म्हणून वापरण्यात येत आहे, हे या वर्गालाही ठाऊक नाही, हे आणखी चिंताजनक  आहे. हे कळण्यासाठी आज मध्यमवर्गावर जी झापडं आहेत, ती दूर होणे गरजेचे वाटते. या अशा परिस्थितीत लेखक आपल्याला हवे तसे आशयद्रव्य घेऊन लेखन करू शकतो का? तर त्याला आज तरी नकारात्मक असेच उत्तर द्यावे लागेल. मग अशा वेळी प्रतीकात्मक, रूपकात्मक अशा मार्गाने जाणे हेच उपकारक ठरते. कारण अस्सल  लेखकाला मनातलं बोलायचं असतं. व्यक्त व्हायचं असतं. आमचा महाराष्ट्र आणि गोमंतकसुद्धा वैचारिकदृष्ट्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परंपरेचा वारसा सांगणारा असा आहे. त्याची प्रचीती काही लेखकांच्या लेखनातून का होईना, पण येत राहते. हीच पायवाट आपण स्वीकारली, तर पुढे आपल्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही सार्थ भावना आपल्याला व्यक्त करता येईल. आणि ती भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात कायम घर करून वसावी, हीच भावना व्यक्त करतो… नम्रपणे आपला निरोप घेतो.

.................................................................................................................................................................

डॉ. रवींद्र शोभणे

shobhaner@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा