चातक आणि अमूर ससाणा : मान्सूनच्या वाऱ्यांवर स्वार होणारे दोन पक्षीवीर…
पडघम - विज्ञाननामा
आरती कुलकर्णी
  • चातक आणि अमूर ससाणा
  • Tue , 02 August 2022
  • पडघम विज्ञाननामा चातक Pied crested cuckoo अमूर ससाणा Amur falcon सॅटेलाइट कॉलर Satellite Collar डॉ.आर. सुरेशकुमार R Suresh Kumar मान्सून Monsoon

चातक हा पक्षी फक्त पावसाच्या थेंबांवरच आपली तहान भागवतो, असं म्हणतात. तो साद घालू लागला की, पावसाचं शुभवर्तमान येतं. चातकाच्या अनेक कथा, कविता, संस्कृत साहित्यातले संदर्भ या सगळ्याने आपल्या मनाचा अनेक शतकं ठाव घेतला आहे.

डेहरादूनच्या ‘वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट’जवळच्या शेतांमध्ये अशाच एका चातक पक्ष्याला या सगळ्या दंतकथांसह पकडण्यात आलं. त्याच्या पायाला एक छोटंसं कडं बसवण्यात आलं. हा चातक पक्षी पुढच्या पावसाळ्यात पुन्हा याच जागी येतो का, हे पाहण्याचा शास्त्रज्ञांचा उद्देश होता... आणि हो, बरोबर पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात हा छोटासा पक्षी त्याच्या सगळ्या दंतकथांसह पावसासोबत परत तिथं आला!

चातक पक्षी खरोखरच नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत स्थलांतर करतो आणि पावसाच्या आगमनाची वार्ता देतो, हे त्या पक्ष्यानेच त्याच्या प्रवासात शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवलं.

चातक पक्ष्याला सॅटेलाइट कॉलर

२०१९च्या या यशस्वी प्रयोगानंतर पक्षीतज्ज्ञ डॉ.आर. सुरेशकुमार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणखी एक मोठा प्रयोग केला. १२ जुलै आणि १४ जुलै २०२० या तारखांना त्यांनी डेहरादूनजवळच्याच शेतांमध्ये आणखी दोन चातक पक्ष्यांना पकडलं. त्यांना एक अगदी हलकी २ ग्रॅमची सॅटेलाइट कॉलर बसवली आणि सोडून दिलं. एका पक्ष्याचं नाव ठेवलं ‘मेघ’ आणि दुसऱ्याचं ‘चातक’. हे पक्षी भारतात बरोबर पावसाळ्याच्या सुमारालाच कसे काय येतात आणि अशा कोणत्या प्रदेशातून आणि कसे येतात, हे त्यांना अभ्यासायचं होतं....

कोकिळेचे तीन जातभाई

चातकाचं इंग्रजी नाव आहे- Pied crested cuckoo. या शब्दांत त्याचं सगळं वर्णन येतं. हा पक्षी कोकिळेचा जातभाई आहे. हा काळ्या-पांढऱ्या रंगाचा असून त्याला एक छानसा तुराही असतो. जगभरात याच्या तीन उपप्रजाती आहेत. यातला एक चातकाचा जातभाई आफ्रिकेचा निवासी आहे. एक कायम दक्षिण भारतात राहतो, पण तिसरा जातभाई चातक दरवर्षी पावसाळ्यात आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करून येतो.

डेहरादूनच्या जवळ म्हणजे उत्तर भारतात पावसाळ्याच्या सुमाराला हा पक्षी दिसला म्हणजे तो स्थलांतर करून आलेलाच पक्षी असावा, असं आमचं निरीक्षण होतं, असं डॉ.आर. सुरेशकुमार सांगतात. या स्थलांतरीत चातकाला ‘मान्सून बर्ड’ किंवा ‘रेन बर्ड’ असंही सुंदर नाव आहे.

चातक आणि पावशा

चातक भारतात पाऊस घेऊन येतो, असं म्हणतात, पण खरोखरच हा पक्षी मान्सूनच्या वाऱ्यांसोबत, ढगांसोबत येतो का? ज्या वर्षी पाऊस कमी असेल, त्या वर्षी त्याच्या प्रवासावर त्याचा परिणाम होतो का, हेही सुरेशकुमार यांना पाहायचं होतं. चातक जेव्हा स्थलांतर करून भारतात येतो, तेव्हा त्याची वर्दी त्याच्या कॉलने मिळते. ‘पियु पियु’ अशी त्याची साद ऐकली की, शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची खात्री पटते आणि ते शेतीच्या कामाला लागतात.

आपल्याकडे चातकासारखाच आणखी एक पक्षी आहे. तो ‘पेर्ते व्हा’ असा संदेश देतो, असं आपण म्हणतो. पण हे सांगणारा पावशा आणि पावसाळ्यात स्थलांतर करून येणारा चातक हे दोन वेगळे पक्षी आहेत, हे डॉ. सुरेशकुमार आवर्जून सांगतात. पावशा आणि चातक हे दोन्ही कोकिळेच्याच प्रजातीचे आहेत. फक्त पावशा भारतातच राहतो आणि चातक विणीसाठी स्थलांतर करून भारतात येतो.

युरोप, रशिया, मंगोलिया अशा देशांतून आपल्याकडे येणारे कितीतरी स्थलांतरीत पक्षी आहेत. ते हिवाळ्यात इकडे येतात आणि त्यातले बहुतांश फक्त हिवाळा घालवून विणीसाठी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात परत जातात. चातक मात्र उन्हाळ्यात आपल्याकडे येतो आणि इथेच त्याच्या पिल्लांना जन्म देतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पिल्लांसाठी भाड्याचं घर

कोकिळा आपल्या पिल्लांसाठी घरटं बांधत नाही, ती कावळ्याच्या किंवा इतर पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी देते आणि मग ते पक्षीच तिच्या पिल्लांना भरवतात, तसंच चातकही करतो. तो भारतात पाहुणा म्हणून येतो आणि आपल्या पिल्लांसाठी भाड्याचं घरही शोधतो!

डॉ.सुरेशकुमार यांच्याकडे या भाडेकरू चातकाच्या पिल्लांच्या सगळ्या नोंदी आहेत. या चातकानं सातभाई (जंगल बॅबलर्स)च्या वसाहतीत आपल्या पिल्लांना वाढवलं होतं. हे सातभाई समूहानं राहतात आणि विणीच्या हंगामात एकमेकांच्या सहकार्यानं पिल्लांना मोठं करतात. अशा एकत्र कुटुंबपद्धतीत चातकाच्या पिल्लांचंही भागून जातं.

चातकची मादी सातभाईच्या घरट्यात अंडी घालते. अंड्यातून पिल्लू बाहेर आलं की, ते सातभाईंच्या पिल्लांसोबतच वावरतं. या पिल्लांपेक्षा हे काळं-पांढरं पिल्लू चांगलंच वेगळं दिसतं, पण तरीही सातभाईचे पालक आनंदानं त्याचा सांभाळ करतात. हे पिल्लू मोठं झालं की, त्याला आपोआपच कळून येतं- आपण सातभाई नाही, तर चातक आहोत!

चातकाबद्दलच्या या कथा अशा जन्मापासूनच त्याच्यासोबत असतात. चातकाचं हे पिल्लू मोठं होत असताना त्याचे आई-बाप सातभाईंशी कसे संबंध ठेवतात, त्यांचं त्यांच्या पिल्लांवर किती लक्ष असतं, याबद्दल बरीच रहस्यं आहेत, पण चातकाचं पिल्लू एकदा का मोठं झालं की, आपल्या आई-वडिलांना जाऊन मिळतं आणि मग स्थलांतराचा परतीचा प्रवास ते सोबतच करतात, अशी शक्यता आहे. पण चातकाची ही कहाणी इथंच संपत नाही.

पिल्लांचा एकट्यानं प्रवास

बऱ्याच वेळा असंही होतं की, चातक पक्षी सातभाईंच्या घरट्यात अंडी घालतात आणि त्यांचा इथला विणीचा कार्यभाग संपला की, त्यांच्या मूळ प्रदेशात निघून जातात. इकडे अंड्यातून पिल्लू बाहेर येतं, सातभाई त्याचा प्रेमानं सांभाळ करतात आणि मग ते मोठं झालं की, पिल्लं एकट्यानं आफ्रिकेच्या दिशेनं त्यांचा स्थलांतराचा प्रवास सुरू करतात. ही पिल्लं फक्त भारतातूनच आफ्रिकेत जातात, असं नाही. काही चातकाची पिल्लं पार मंगोलियासारख्या देशातून आफ्रिकेमध्ये एकटी जात असावीत, असं डॉ. सुरेशकुमार सांगतात.

डावीकडे डॉ. सुरेशकुमार, उजवीकडे चातक

चातकाच्या या पिल्लांना त्यांचे आईबाप नसताना स्थलांतराचा मार्ग कोण दाखवतं? इतके दिवस सातभाईंच्या कुटुंबात राहून त्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाची दिशा कशी कळते? ही निसर्गाची कोडी मोठी अजब आहेत. पण चातकाच्या पिल्लांमध्ये अनुवांशिकतेनं या प्रवासाच्या मार्गाची नोंद झालेली असते.

चातकानं केला समुद्र पार

डॉ. सुरेशकुमार यांच्याकडे या चातकांच्या प्रवासाचा संपूर्ण नकाशा आहे. १४ जुलै २०२० रोजी त्यांनी डेहरादूनजवळच्या शेतीच्या परिसरात एका पक्ष्याला पकडून त्याला सॅटेलाइट कॉलर लावली होती. त्यानंतरचा त्याचा प्रवास या नकाशावर दिसतो आहे. त्यानं उत्तराखंडमधून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंतचा पल्ला गाठला होता. त्यानंतर मंगलोरजवळून उडताना त्याची नोंद झाली. इथं असताना तो परतीच्या पावसाच्या वाऱ्यांचा अंदाज घेत असावा, असा डॉ. सुरेशकुमार यांचा कयास आहे.

चातकाला लावलेली सॅटेलाइट कॉलर थेट उपग्रहाशी संपर्क साधते आणि त्याच्या प्रवासाचा सिग्नल देत राहते. त्या आधारे डॉ.सुरेशकुमार यांनी त्याच्या प्रवासाचा नकाशा बनवला आहे. ही कॉलर चातकाने पाठीवर घेतलेल्या सॅकसारखी वाटते आणि ती इतकी हलकी असते की, पक्ष्याला आपल्या मानेवर काहीतरी आहे, हे जाणवतही नाही. ही सॅटेलाइट कॉलर सौरऊर्जेवर चालते.

या चातकाने अरबी समुद्रावरून उडत आफ्रिकेच्या दिशेनं प्रवास केला. स्थलांतरी पक्षी पाणी आणि खाद्य असलेले अधिवास मुक्कामासाठी निवडतात, असा तज्ज्ञांचा अनुभव आहे, पण या चातकाने अरबी समुद्रावरून स्थलांतर करून प्रवासाचा मार्ग निवडला होता. या प्रवासात तो कुठे थांबला असेल का? की समुद्र पार करण्याची शक्ती त्याला या स्थलांतराच्या हंगामानेच दिली असावी, हेही मोठं कोडंच आहे. याची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला आणखी काही पक्ष्यांचा माग घ्यावा लागेल, असं सुरेशकुमार यांचं म्हणणं आहे.

चातकाचा प्रवास...

मुसाफिर हूँ यारों...

चातकाप्रमाणेच आणखी एका विलक्षण पक्ष्याच्या स्थलांतराचा अभ्यास डॉ.सुरेशकुमार करत आहेत. हा पक्षी त्याच्या देशोदेशीच्या प्रवासामुळे आणि मान्सूनच्या वाऱ्यांसोबतच्या उड्डाणांमुळे आधीच सेलिब्रेटी बनला आहे. तो चीन, मंगोलिया आणि रशिया या देशांत त्याची वीण करतो. त्याचं नाव आहे- अमूर फाल्कन. फाल्कन म्हणजे ससाणा आणि अमूर हे एका नदीचं नाव आहे. ही नदी चीन आणि रशियामधून वाहते. या नदीच्या परिसरात हा पक्षी आढळतो, म्हणून त्याचं हे नाव आहे. या परिसरातल्या वाघाच्या प्रजातीलाही ‘अमूर टायगर’ असं नाव आहे.

चीन ते आफ्रिका!

हा अमूर ससाणा चीन, मंगोलिया, रशिया अशा देशात वीण करून भारताच्या दिशेनं आणि मग पुढे आफ्रिकेपर्यंत स्थलांतर करतो! इतर स्थलांतरीत पक्ष्यांप्रमाणे तो भारतात काही काळ मुक्कामी राहत नाही. तो भारताच्या मार्गानं प्रवास करतो, म्हणून आपल्यासाठी तो ‘पॅसेज मायग्रंट’ आहे. हा पक्षी आपली इतकी ऊर्जा स्थलांतर करण्यात का घालवत असावा, असा प्रश्न आम्हाला पडला आणि त्यातूनच अमूर ससाण्याला सॅटेलाइट कॉलर लावण्याचा प्रकल्प सुरू झाला. डॉ.सुरेशकमार सांगतात, हे पक्षी कसे युनिक आहेत, हे आम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं. तसंच ते ईशान्य भारतातून स्थलांतर करतात, तेव्हा त्यांची तिकडे मोठ्या प्रमाणावर शिकार होते. ती थांबावी, त्यांच्या रात्रथाऱ्याच्या जागा शोधाव्यात, त्यांच्या अधिवासांच्या संरक्षणाबद्दल जागृती करावी, हा आमच्या प्रकल्पाचा उद्देश होता.

अमूर ससाणा

ससाण्यांची राजधानी

ईशान्येकडचं नागालँड हे राज्य जगभरातल्या ससाण्यांची राजधानी आहे, असं म्हटलं जातं. इथल्या डोंगरदऱ्या आणि त्यावरचं आभाळ लाखो ससाण्यांनी गजबलेलं असतं. मणिपूर, मेघालय या राज्यांतही या ससाण्यांचे मोठे अधिवास आहेत.

अशा एका अमूर ससाण्याला ७ नोव्हेंबर २०१३ रोजी डॉ.सुरेशकुमार यांनी नागालँडमध्ये सॅटेलाइट कॉलर बसवली. ते म्हणतात, यानंतर लगेचच आम्ही त्याला सोडलं आणि १० नोव्हेंबरला त्याने दक्षिणेकडे प्रस्थान केलं. त्याने बांग्लादेशवरून उड्डाण करायला सुरुवात केली. बंगालच्या उपसागरावरून हजारो मैलांचं उड्डाण करून त्याने भारतात आंध्र प्रदेशच्या आकाशात झेप घेतली. तिथून कर्नाटक, महाराष्ट्र असा पल्ला पार केला. पुढे पुण्याच्या दक्षिणेकडून त्याने अरबी समुद्रावरून उड्डाण करायला सुरुवात केली आणि थेट आफ्रिकेमध्ये सोमालियाला पोहोचला!

अमूर फाल्कन एअरलाइन्स

अमूर ससाण्याने नागालँडहून सोमालियापर्यंतचं सुमारे ५ हजार ६०० किलोमीटर्सचं अंतर ५ दिवस आणि १० तास एवढ्या काळात कापलं! ही त्याची ‘नॉनस्टॉप फ्लाइट’ होती! डॉ.सुरेशकुमार यांचं हे प्रेझेंटेशन बघताना ‘याला अमूर फाल्कन एअरलाइन्स असं नाव द्यायला हवं!’, असा विचार मनात येऊन गेला.

अमूर ससाण्याचा प्रवास...

या अमूर ससाण्याने असा प्रवास अथकपणे का केला असावा? ईशान्य भारतात नागालँडमधून उड्डाण केल्यानंतर अख्खा भारतीय उपखंड त्याच्या दिमतीला होता. समुद्राचा मार्ग टाळून तो भूखंडावरून सहज प्रवास करू शकला असता. डॉ.सुरेशकुमार यांना हा आणखी एक जाणता प्रश्न पडला आणि याच्या उत्तरातच या ससाण्याचं आणि पावसाचं एक महा-रहस्य दडलेलं होतं.

मान्सूनचं महारहस्य

डॉ.सुरेशकुमार यांनी सॅटेलाइट कॉलर लावलेले बहुतांश ससाणे अशाच मार्गानं प्रवास करत होते. ते फक्त भारतीय उपखंड पार करत नव्हते, फक्त समुद्रावरून उड्डाण करत नव्हते, तर विषुववृत्त पार करून आफ्रिकेच्या किनारपट्टी भागात पोहोचत होते. ते जसे दक्षिणेला जात होते, तसेच पुन्हा अशाच मार्गानं ईशान्येकडच्या त्यांच्या विणीच्या प्रदेशात येत होते. त्यांच्या विणीच्या सवयीही तितक्याच अचूक होत्या, असं डॉ. सुरेशकुमार यांचं निरीक्षण आहे.

पुन्हा त्याच झाडावर घरटं

हजारो किमीचा प्रवास करून हे ससाणे त्यांच्या विणीच्या प्रदेशात म्हणजे अमूर प्रांतात परततात, तेव्हा मागच्याच वर्षीच्या झाडाची निवड करतात. हे पक्षी त्याच प्रदेशात, त्याच झाडावर परत येतात. चातकप्रमाणेच हेही घरटं बांधण्यात वेळ घालवत नाहीत. विषुववृत्त पार करून जगाची सफर करणाऱ्या या सागरी मुसाफिराला निसर्गानं घरटं बांधण्याच्या खटाटोपात अडकवलेलं नाही. हे रुख पक्ष्यांनी वापरात आणून रिकामी केलेली घरटी त्यांच्या पिल्लांसाठी वापरतात. रुख हा पक्षी कावळ्याचा जातभाई आहे.

या लाखो ससाण्यांसाठी अशी घरटी तयार असतात, याचा अर्थ रुख पक्ष्यांनी बांधून ठेवलेली घरटी नंतरही किती महत्त्वाची आहेत, हे आपल्या लक्षात येतं. निसर्गामध्ये काहीच वाया जात नाही, असं म्हणतात ते खरंच आहे.

मान्सूनच्या वाऱ्यांवर स्वार

हे अमूर ससाणे चातकाप्रमाणेच मान्सूनच्या वाऱ्यांसोबत प्रवास करतात. या वाऱ्यांशी पैजा घेण्याची ताकद या छोट्याशा पक्ष्यांमध्ये कशी आली असावी, हाही एक चमत्कारच आहे. ईशान्येकडून आफ्रिकेत पोहोचल्यानंतर त्यांचं स्थलांतर पुन्हा उलट्या बाजूनं सुरू होते. डॉ. सुरेशकुमार म्हणतात, आफ्रिका खंड अजून दक्षिणकडे विस्तारलेला असता, तर या पठ्ठ्यांनी त्यांची एअरलाइन आणखी पुढे नेली असती!

अमूर ससाण्याला लावलेली कॉलर

त्यांच्या या मार्गाचा नकाशा पाहिला की, त्यांचं आणि मान्सूनचं नातं आणखी घट्ट होतं. डॉ.सुरेशकुमार यांनी कॉलर बसवलेले अनेक अमूर ससाणे वर्षानुवर्षं याच मार्गानं स्थलांतर करत आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे या पक्ष्यांचा स्थलांतराचा मार्ग सगळ्या पुराव्यांसहीत नोंदलेला आहे.

हा मार्ग ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यातला आहे आणि नेमक्या याच वेळी मान्सूनचे परतीचे वारे अरबी समुद्राच्या दिशेनं वाहताना दिसतात. हे वारे आफ्रिकेमध्ये पाऊस घेऊन जातात. सोमालिया, केनिया, टांझानियामधल्या सुंदर जंगलांमध्ये याच वेळी पावसाची बरसात होते. हे वारे पार दक्षिण आफ्रिकेपर्यंत जातात. म्हणूनच अमूर ससाण्याचा प्रवास, या ईशान्य मोसमी वाऱ्यांवर स्वार होऊनच होतो. 

वाळवीच्या शोधात

जेव्हा नैऋत्य मोसमी वारे क्षीण होतात म्हणजे आपल्याकडचा पाऊस कमी होतो आणि ईशान्य मोसमी वारे वाहू लागतात, त्या काळात नागालँड, मणिपूरमध्ये वाळवीच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतात. अमूर ससाणे हे कीटकभक्षी आहेत आणि या मार्गात मोठ्या प्रमाणात वाळवीचा उद्रेक होत असल्याने ते त्यावर ताव मारतात. या खाद्यातून त्यांना पुढे पुढे उड्डाण करण्याची ऊर्जा मिळते. एखादं मोठ्या पल्ल्याचं विमान मध्ये थांबून इंधन भरून घेतं, तसंच आहे हे!

या मार्गात ते वाऱ्याच्या वेगासोबत त्यांचा वेग जुळवून घेतात. ते एरव्ही ४५ किमी प्रतितास एवढ्या वेगाने उडत असतील, तर या काळात ते २० किमी प्रतितास एवढ्याच वेगाने उडतात. कारण वाऱ्याचा वेग तेवढाच असतो. आफ्रिकेतून परतीचा प्रवास करतानाही ते एप्रिल-मे महिन्यातल्या उष्ण वाऱ्यांचा सहारा घेतात. या प्रवासात मात्र ते भारतात नागालँड, मणिपूर या राज्यांत थांबत नाहीत. कारण या काळात त्यांचं आवडतं वाळवीचं खाद्य त्यांच्यासाठी उपलब्ध नसतं.

अमूर ससाण्यांचा थवा

अमूर ससाणे की हवामानतज्ज्ञ?

डॉ.सुरेशकुमार यांनी कॉलर लावलेल्या अमूर ससाण्यांपैकी एक ससाणा त्याच्या वेगळ्याच प्रवासामुळे त्यांच्या लक्षात राहिला. त्याच्या मादीला त्यांनी नागालँडच्या भाषेतलं नाव ठेवलं होतं- ‘लाँगलेंग’. तिला ते ‘क्वीन ऑफ नागालँड’ असं म्हणतात. ही मादी आफ्रिकेतून परतीच्या प्रवासात गुजरातपर्यंत आली आणि वरच्या दिशेनं प्रवास करण्यापेक्षा तिने थोडा वेगळा मार्ग निवडला... गुजरातकडून ती मुंबईकडे आली आणि तिथून दक्षिणेकडे जाऊन मग पुन्हा एकदा ती थायलंड, दक्षिण कोरिया या मार्गानं मंगोलियापर्यंत गेली...

चक्रीवादळाचे संकेत

या काळात इथं चक्रीवादळाचे वारं तयार होत होतं. श्रीलंका, अंदमान इथं तयार झालेले हे वारं आंध्र प्रदेश, ओरिसाच्या दिशेनं वाहत होतं. २०१९मध्ये मे महिन्यात ‘फॅनी’ नावाचं चक्रीवादळ आलं होतं. त्याच वेळी ‘लाँगलेंग’ इथं येत होती. ती पुढे आली असती, तर चक्रीवादळात अडकली असती. पण तिने हे होऊ दिलं नाही. एक दिवस तिने ओरिसामध्ये मुक्काम केला, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकेपर्यंत वाट पाहिली. जेव्हा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली, तेव्हाच तिने ईशान्येकडे भरारी घेतली!

डॉ.सुरेशकुमार सांगतात, हे पक्षी हवेचा रोख कसा आहे, ते चाणाक्षणपणे ताडतात. ते चक्रीवादळासारख्या आपत्तींचा अदमास लावू शकतात, हे विलक्षण आहे. ते नुसता अंदाजच लावत नाहीत, तर वाऱ्याच्या दिशेचा फायदा उठवून आपली मार्गक्रमणा करतात हे महत्त्वाचं!

चीनमध्ये होते वीण

चीन, मंगोलिया या देशात अमूर ससाण्यांच्या विणीच्या जागा आहेत. त्यांच्या या अधिवासांवर आता वाढती शेती, नागरीकरण याचा घाला आला आहे. या सगळ्याचा त्यांच्या विणीवर आणि संख्येवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करावा लागेल. चीनमधल्या मांचुरियामधल्या गवताळ प्रदेशात या ससाण्यांचा अधिवास आहे. इथे दिवस १५ ते १६ तासांचा असतो. तापमान उच्चांकी असतं. अशा स्थितीत त्यांना जास्त खाद्य मिळतं आणि विणीच्या दिवसांत ते फार आवश्यक असतं. अमूर ससाणे आणि त्यांच्या पिल्लांनाही मांचुरियन आवडत असावं, असंही मला गंमतीनं वाटलं! 

उन्हाळ्यात अशी अनुकूल स्थिती असणाऱ्या याच प्रदेशात कडाक्याचा हिवाळा असतो. दिवस आक्रसत जातो आणि गोठणाऱ्या तापमानासोबत खाद्याची उपलब्धता कमी कमी होत जाते. त्यामुळे या भागातले पक्षी दक्षिणेकडे प्रवास सुरू करतात, पण तिकडचा कडाक्याचा हिवाळा टाळण्यासाठी अमूर ससाणे असे विषुववृत्ताच्या आसपास स्थलांतर करतात. त्यामुळेच हा पक्षी कधीच हिवाळा बघत नाही. तो नेहमी उन्हाळा अनुभवतो, असं पक्षीतज्ज्ञ म्हणतात. त्यांच्या या कौशल्यामुळेच अमूर ससाणे पृथ्वीतलावर एवढ्या मोठ्या संख्येनं राहण्यात यशस्वी झाले आहेत.

‘रुक जाना नहीं तू कहीं हार के

मुसाफिर हूँ यारों

मुझे चलते जाना हैं

बस चलते जाना...’

या अर्थाची कितीतरी गाणी आपण ऐकली आहेत. पण बदलत्या वाऱ्याशी पैजा घेत मार्गक्रमण करणाऱ्या मान्सूनच्या या मुसाफिरांनी या गाण्यांचंच जगणं केलं आहे.

जीवनगाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे... पुढे पुढे चालावे... जीवनगाणे.... असं गात गात एखादा पक्षी दूरच्या प्रवासाला निघाला असला, तर त्याच्या मनोहारी प्रवासाची नोंद नक्की घ्या. त्याच्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे. 

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा