‘युगवाणी’चा हा ‘अरुण कोलटकर विशेषांक’ म्हणजे कोलटकरांच्या व्यक्तिमत्त्वाची सगळी रूपे एकत्रितपणे पाहण्याचा आणि त्यांना सगळ्या अंगाने समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे
पडघम - साहित्यिक
प्रफुल्ल शिलेदार
  • ‘युगवाणी’च्या ‘अरुण कोलटकर विशेषांका’चे मुखपृष्ठ आणि अनुक्रम
  • Fri , 08 July 2022
  • पडघम साहित्यिक अरुण कोलटकर Arun Kolatkar अरुण कोलटकर विशेषांक Arun Kolatkar Special Issue युगवाणी Yugvani

विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या त्रैमासिकाचा नुकताच ‘अरुण कोलटकर विशेषांक’ प्रकाशित झाला आहे. कोलटकरांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे आणि विविध भाषा व विविध कला यांतून दिसणाऱ्या अरुण कोलटकरांच्या कर्तृत्वाचा आराखडा, यांचा मागोवा घेणारा हा संग्राह्य अंक आहे. या अंकामागची भूमिका विशद करणारे ‘युगवाणी’चे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांचे हे संपादकीय...

.................................................................................................................................................................

‘युगवाणी’चा हा ‘अरुण कोलटकर विशेषांक’ आज वाचकांच्या हाती देऊन या बहुआयामी आणि अनन्यसाधारण कवीचे आम्ही आदरपूर्वक स्मरण करत आहोत. हा अंक विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षात प्रकाशित होतो आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे.

अरुण कोलटकरही आज हयात असते, तर त्यांना नोव्हेंबरात ९० वर्षे पूर्ण झाली असती. अरुण कोलटकर आधुनिक भारतीय परंपरेतीलच नव्हे, तर आधुनिक विश्व कवितेतील महत्त्वाचे कवी आहेत, हे त्यांच्यावरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जगातल्या विविध भाषांमधील समीक्षेवरून लक्षात येते. ही गोष्ट काही प्रमाणात का असेना अधोरेखित करण्याचा आणि त्यांच्या विलक्षण बहुमुखी प्रतिभेचे विविध आयाम लक्षात आणून देण्याचा छोटासा  प्रयत्न या अंकातून केलेला आहे.

अरुण कोलटकर हे निरंतर अनेक वळणे घेणारे व आपल्या कवितेला विकसित करत जाणारे कवी होते. ‘जेजुरी’ ते ‘भिजकी वही’ या मराठी-इंग्रजी कवितेच्या प्रवासात त्यांच्यातील विकास स्पष्टपणे दिसून येतो. भारतीय परंपरेतील आणि जगातील महत्त्वाची कविता पूर्णपणे पचवून आणि ती आपल्यात मुरवून घेतल्यामुळे त्यांच्या कवितेत एक विश्वदृष्टी विकसित झालेली दिसून येते. याच दृष्टीमुळे चराचराकडे ते एका व्यापक करुणेने पाहतात. 

कोलटकरांची कविता सतत अनेक प्रश्न उभे करते. हे प्रश्न परंपरेबाबतचे असतात, मिथकांबाबत असतात, मनात घट्ट रुतून बसलेल्या रूढींबाबत बाबत असतात. सर्वांत महत्त्वाचे प्रश्न हे कवितेबाबत असतात. मुळापासून हादरे देत त्यांची कविता नवा दृष्टीकोन तयार करण्याचा प्रयत्न करते. कवितेचे श्रेष्ठत्व ठरवण्याच्या आपल्या पारंपरिक निकषांबाबतदेखील ही कविता प्रश्न उभे करते.

कोलटकरांनी भाषेच्या वापराच्या नव्या पद्धती कवितेतून विकसित केल्या. अत्यंत नव्या दृक् आणि ध्वनी प्रतिमा आपल्या कवितेतून वापरल्या. अनेकदा विविध प्रकारच्या संवेदनांसह जटिल आणि संयुक्त प्रतिमा त्यांच्या कवितेतून विलक्षण परिणामकारकपणे आलेल्या दिसतात. एखाद्या शब्दाच्या विविध छटा, अनेक विभ्रम त्यांच्या कवितेला अकल्पित नवेपण मिळवून देतात. 

कोलटकरांची कविता कुठलेही पूर्वग्रह न बाळगणारी कविता आहे. ‘मला मते नाहीत’ असे त्यांनी एका इंग्रजी मुलाखतीत सांगून ठेवले आहे. त्यांना कवितेच्या जगभरच्या परंपरा नीटपणे माहीत आहेत. मात्र ते त्यांच्या कवितेची जाणीवपूर्वक नव्याने बांधणी करतात. हे नवेपण त्यांच्या कवितेचा लक्षणीय गुण आहे.

सगळी मिथकं, परंपरा आणि इतिहास पचवून त्यांची कविता वस्तुनिष्ठपणे अभिव्यक्त होते. हा वस्तुनिष्ठपणा त्यांच्या ‘जेजुरी’त दिसतो, शिवाय तोच ‘द्रोण’मध्येही दिसून येतो. ‘भिजकी वही’त त्यांची ‘कॅमेरा’ नावाची एक कविता आहे. कॅमेऱ्याची वस्तुनिष्ठता हाच त्यांच्याही कवितेचा एक गाभा आहे. ‘भिजकी वही’तील त्यांच्या कविता मिथकांच्या जड झुली खाली उतरवून खोलवर रुतलेल्या व स्त्रियांच्या स्थलकालातीत असलेल्या दु:खांना भिडते. ती दुःखाच्या मुळापर्यंत पोहोचते आणि समकाळाशी जोडली जाते. तिथे वाचकांना एका व्यापक स्तरावरील करुणेचा प्रत्यय येतो.

कोलटकरांच्या कवितेचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांच्या कवितेबाबत आपण कुठलेही अनुमान बांधू शकत नाही. ही कविता अनपेक्षितपणे कवितेच्या कुठल्याही टप्प्यावर वाचकाला चकित करत जाते. मात्र ही कविता चमत्कृती साधण्यासाठी आपल्याला चकित करत नाही, तर आपल्याला अंतर्मुख करून आत्मचिंतनाला बाध्य करते. अंतर्बोध देणारी अनपेक्षितता हे अस्सल कवितेचे एक लक्षण आहे आणि ते त्यांच्या कवितेत अनेक ठिकाणी आढळून येते.

कोलटकरांची कविता सश्रद्ध आहे की अश्रद्ध आहे, याबाबत कुठलेही ठाम विधान करता येणे शक्य नाही. ती सकृतदर्शनी या दोन्हीकडे एखाद्या लंबकासारखी आंदोलित होताना आढळते. त्यांची खरी श्रद्धा ही कवितेच्या सर्जनावर आहे. ते स्वतःचे कवित्व जाणतात. कवित्वाचे एवढे भान असलेला आधुनिक कवी आज मराठीत तरी  विरळाच आहे. या भानातूनच ते मानवी मनाच्या लंबकाच्या या दोन्ही टोकांवर जाऊन सगळे पूर्वसंकेत बाजूला सारून, श्रद्धेचं ओझं उतरवून ठेवून जगण्याकडे बघतात. दगडातला देव पाहणे आणि देवातला दगड पाहणे त्यांना यामुळेच शक्य होते. एखाद्या कॅमेऱ्याप्रमाणे वस्तुनिष्ठपणे बघणे हा या कवितेचा स्थायीभाव आहे. त्यांच्या लेखनाला अनन्यत्व मिळते ते यामुळेच.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अरुण कोलटकरांच्या कवितेत अनेक कथा, दंतकथा, मिथकं, गोष्टी जागोजागी विखुरलेल्या दिसतात. त्या किंवा त्यांचे अवशेष केवळ वाचकाला बांधून ठेवण्यासाठी तिथे योजिलेले नसतात. जाणीवपूर्वक निवडलेल्या आणि अत्यंत जैविकपणे कवितेत गुंफलेल्या अशा अनेक सूक्ष्म कथनांमधून व कथानकांमधून त्यांची कविता धीम्या पण ठाम लयीने एका स्तिमित करणाऱ्या महाविधानाकडे घेऊन जाते. सूक्ष्मता आणि भव्यता याचा अपूर्व संगम कोलटकरांच्या कवितेत आढळून येतो.

‘रामायणा’ची अनेक रूपे आपल्या बहुभाषी व बहुसांस्कृतिक समाजात ठिकठिकाणी प्रचलित आहेत. भारतातच २००हून अधिक रामायणं आहेत. याच परंपरेत ‘द्रोण’ ही दीर्घ कविता हे एका प्रकारे अरुण कोलटकरांचे आधुनिक रामायणच आहे. अनेक भारतीय कवी-लेखकांनी आपल्या लेखनात मिथकांचा वापर केलेला आहे. हा वापर करताना साधारणतः वर्तमानातल्या संदर्भांशी जोडून घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. अरुण कोलटकर मिथके वापरताना आधी त्यावरची गूढपणाची पुटे उतरवतात आणि मानवी पातळीवरून त्यांच्याशी जोडून घेतात. कोलटकरांच्या कवितेत जागोजागी येणारा मिस्कीलपणा या मिथकांमध्येही असतोच; हा मिस्कीलपणाच उपहास, उपरोध आणि कटुता या ‘खास’ आधुनिक शैलीतील लोकप्रियतेपासून त्यांच्या कवितेला वाचवतो. शिवाय कवितेच्या भाषेत नेहमी ताजेपणाही टिकवून ठेवतो.

भाषेच्या पातळीवर त्यांनी जाणीवपूर्वक अनेक प्रयोग केले असले, तरी त्यांनी आपल्या भाषेत कधीच शाब्दिक बोजडपणा येऊ दिला नाही. त्यांच्या आरंभीच्या काही कवितांमधली भाषा शब्दखेळ आणि बौद्धिक कोड्यांप्रमाणे असली तरी नंतर ती  भाषा नवेपणाने पण अत्यंत साधेपणाने येते.

त्यांनी आपल्या काव्यभाषेला सामन्यांच्या पातळीवर नेले असल्याचे दिसून येते. कवितेच्या भाषेला सर्वसामान्यांच्या भाषेपर्यंत नेणे, ही गोष्ट संतपरंपरेपासूनच चालत आलेली आहे. संतांनी भाषेचे नैसर्गिक सौष्ठव जपत संस्कृतजन्य क्लिष्टता टाळली. ही भाषिक अहंकार उतरवून ठेवलेली भाषिक करुणाच आहे. या अंगाने पाहिल्यास कोलटकरांची कविता थेट संतकवितेशी आपली नाळ जोडताना दिसते. मात्र संतकविता आणि कोलटकरांची कविता यातला महत्वाचा फरक असा की, संतपरंपरेतील कवितेचे अंतिम ध्येय आणि प्रयोजन परमार्थ, ईश्वरप्राप्ती आणि साक्षात्कार आहे;  कोलटकर नेमके विरुद्ध ध्रुवावर उभे आहेत.

कविता हेच कोलटकरांचे अंतिम ध्येय आहे. त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य कविता लिहिणे, या एकाच गोष्टीसाठी पणाला लावले. ते अंतर्बाह्य आणि निरंतर कवी होते. त्यांनी इतरही अनेक गोष्टी आयुष्यात केल्या असल्या तरी कवितेचे सर्जन हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते. संतकवितेशी त्यांचे नाते वा साम्य शोधायचे झाल्यास ते वेदना, करुणा आणि चराचराबद्दलचा कळवळा हेच आहे.

कोलटकर कुठल्याही विचारसरणीशी बांधलेले नव्हते. त्यांनी आयुष्यात मोठीच किंमत देऊन आंतरिक स्वातंत्र्य मिळवलेले होते. त्यांची बांधीलकी कवितेशीच होती. त्यांच्या आस्थेच्या केंद्रस्थानी विशिष्ट माणूस नसून संपूर्ण चराचर होते. त्यांच्या कवितेत ‘मी’देखील कधी येत नाही, इतके ते कवितेत ‘मी’पासून विलग झाले होते. या ‘मी’ला त्यांनी भाषेत विसर्जित केले आणि कवितेतील अभिव्यक्तीच्या अनेक जोखमी पत्करून आपले वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व प्रयत्नपूर्वक घडवले.

अरुण कोलटकरांचे द्विभाषिकत्व सर्वश्रुतच आहे. त्यांनी मराठीत लिहिली, तेवढीच महत्त्वाची कविता इंग्रजीतही लिहिली आहे. मात्र याची दखल मराठीत फारशा आस्थेवाईकपणे घेतली गेली नाही. कवी जेव्हा दोन भाषांमध्ये लिहीत असतो, तेव्हा त्याला संपूर्णपणे समजून घेण्याकरता दोन्ही भाषांतील त्याचे लेखन जाणून घेणे गरजेचे असते. हे ‘चंद्राची दुसरी बाजू’ पाहण्यासारखे असते.

अरुण कोलटकरांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे अंग त्यांचे दृक-कलावंत असणे, हेदेखील होते. दृश्यकलेच्या क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाचा विलक्षण दबदबा होता, एवढेच इथे तूर्तास सांगितले तरी पुरे. त्यांची दृक्-जाणीव ही अत्यंत प्रखर आणि प्रगल्भ होती, याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतील दृक्-प्रतिमांमधून दिसून येतो. त्यांच्या कवितेतील दृक आणि ध्वनी प्रतिमांचा विस्तृत विचार अरुण खोपकरांनी त्यांच्या ‘कालकल्लोळ’मध्ये केलेला दिसून येतो.   

आपल्या भाषेत आपण कोलटकरांकडे विशिष्ट नजरेने पाहत आलो आहोत, मात्र इतर काही भारतीय आणि काही परदेशी भाषांमधले कवी-अनुवादक कोलटकरांकडे कसे पाहतात, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. यामागे आपल्या ‘कोलटकर-विचारा’चा विस्तार व्हावा, ही भूमिका आहे. इतर भाषांमधील अनुवादकांना कोलटकरांच्या कवितांचे अनुवाद का करावेसे वाटले, कोलटकरांच्या कवितेचे कुठले वेगळेपण त्यांना जाणवले याचा उहापोह, या अनुवादकांनी आपापल्या अनुवादांसोबत आपली भूमिका लिहून केलेला आहे. या सगळ्या अनुवादकांच्या विवेचनातून कोलटकरांच्या कवितेतील भारतीयत्व आणि वैश्विक तत्त्व अधोरेखित होते. 

हा अंक कोलटकरांचे मित्र चंद्रकांत पाटील आणि आणि कोलटकरांशी दीर्घकाळ मैत्र असलेले अरुण खोपकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून आकारास आला आहे. या अंकाच्या उभारणीत या दोघांचे परिश्रम आणि योगदान महत्त्वाचे आहे. अरुण कोलटकरांच्या सगळ्या मित्रांनी, त्यांच्या कवितेच्या अभ्यासकांनी, अनुवादकांनी अतिशय आस्थेवाईकपणे आपले लेखन आणि इतर सामग्री उपलब्ध करून दिली. अरुण कोलटकरांचे साहित्य प्रकाशित करणारे आणि त्याचे जीवापाड जतन व संरक्षण करणारे अशोक शहाणे आणि रेखा शहाणे यांनी या अंकाला आपल्या शुभेच्छा दिल्या; अशोक शहाणेंनी आपले लेखनही उपलब्ध करून दिले, त्यांचा ऋणनिर्देश इथे गरजेचा आहे.

सुनील तांबे यांनी यासंदर्भात केलेली मदत मोलाची आहे. या अंकात आपले लेखन आणि इतर साहित्य देणाऱ्या सगळ्या लेखक, अनुवादक, छायाचित्रकार, दृक्-कलावंत यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. हे सगळे आपापल्या क्षेत्रातील नामवंत लोक आहेत. अरुण कोलटकरांवरील प्रेमामुळेच त्यांनी या अंकाकरता निरपेक्ष भावनेने सहकार्य केले, याची नम्र जाणीव मला आहे. कोलटकरांच्या ‘बळवंतबुवा’ या अप्रकाशित कादंबरीतील सुरुवातीची काही पाने स्वत: कोलटकरांनी त्यांच्यावरील विशेष अंकासाठी ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाला दिली होती, ती पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल ‘प्रतिष्ठान’चे संपादक-प्रकाशक यांचे मन:पूर्वक आभार.

मराठी कवी, इंग्रजी कवी आणि दृक्-कलावंत ही एकाच अरुण कोलटकरांची रूपे आहेत. यांच्याच सोबतीला अर्जुन शेजवळांकडे पखवाज शिकणारे कोलटकर, पॉप संगीताच्या रचना करून त्या गिटारवर गाणारे कोलटकर आणि बळवंतबुवांसोबत भजनी मंडळात देहभान हरपून भजने ऐकणारे कोलटकरही येतात. मराठीतल्या या श्रेष्ठ कवीकडे पाहण्याचे, त्याला समजून घेण्याचे अनेक दर्शनबिंदू आहेत.

‘युगवाणी’चा हा ‘अरुण कोलटकर विशेषांक’ म्हणजे कोलटकरांच्या व्यक्तिमत्त्वाची ही सगळी रूपे एकत्रितपणे पाहण्याचा आणि त्यांना सगळ्या अंगाने समजून घेण्याचा एक छोटासा आणि कदाचित पहिलाच प्रयत्न आहे. त्याकरता विविध भाषा व विविध कला यांतून दिसणाऱ्या अरुण कोलटकरांच्या कर्तृत्वाचा आराखडा मांडायचा हा प्रयत्न आहे. 

हे खरं तर चक्रधराच्या जात्यंध आणि हत्ती या दृष्टान्तासारखे प्रकरण आहे. अर्थातच इथे जात्यंधांच्या जागी कोलटकरांच्या कवितेचे अभ्यासक, तज्ज्ञ, कोलटकरांचे सहकारी, छायाचित्रकार, अनुवादक, दृक्-कलावंत सगळे आपापले डोळे घेऊन एकत्र आले आहेत. या अंकामुळे आपल्या परंपरेतला हा अनन्यसाधारण कवी अधिक कळेल, त्याचं समग्र रूप समजून घ्यायची निकड आपल्याला भासेल अशी अपेक्षा आहे. या छोट्याशा प्रयत्नातून कोलटकरांच्या व्यक्तिमत्वाचा कितीसा थांग आपल्याला लागतो याचा निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे.   

.................................................................................................................................................................

‘अरुण कोलटकर’ विशेषांक मागवण्यासाठीचा तपशील -

पाने १८४ – देणगी मूल्य : रु. २००/-

(रु. २४०/- रजि. टपालाने हा सुटा अंक पाठवण्यात येईल अथवा युगवाणीची तीन वर्षांची वर्गणी रु. १०००/- भरून या अंकापासून अंक मिळू शकतील)

बँक खात्याबद्दल माहिती :

Bank Account Name : YUGWANI-VIDARBHA SAHITYA SANGH

A\C No - 04650 100 00 5638

Bank Name : Bank of Baroda

IFSC Code : BARB0SITABU

(Please Note : In IFSC Code fifth character is ‘Zero’)

महत्त्वाची सूचना : अंकाकरता पैसे पाठवल्यानंतर ‘युगवाणी’च्या व्यवस्थापक श्रीमती सना पंडित यांच्या 7709047933 या व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावर पैसे पाठवल्याची माहिती, पावतीचा फोटो आणि पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल क्रमांकासह) त्वरित पाठवावा.  

.................................................................................................................................................................

लेखक प्रफुल्ल शिलेदार कवी, अनुवादक आणि ‘युगवाणी’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

shiledarprafull@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा