लेखकानं आपल्या अंत:स्वराला गोंगाटात हरवू देता कामा नये. गर्दीत राहून एकटेपण जपलं पाहिजे!
पडघम - साहित्यिक
अभिराम भडकमकर
  • बडोदा येथील ‘मराठी वाङ्मय परिषदे’च्या ७१व्या अधिवेशनात लेखक अभिराम भडकमकर
  • Mon , 20 June 2022
  • पडघम साहित्यिक अभिराम भडकमकर Abhiram Bhadkamkar मराठी वाङ्मय परिषद बडोदा Marathi Vangmaya Parishad Badoda

बडोदा येथील ‘मराठी वाङ्मय परिषदे’चे ७१वे अधिवेशन १६ व १७ एप्रिल २०२२ रोजी पार पडले. या संमेलन-सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचं हे अध्यक्षीय भाषण…

..................................................................................................................................................................

नमस्कार! या बडोद्याच्या साहित्य रसिकांच्या समोर उभं राहताना मला विलक्षण आनंद होतो आहे.

या वाङ्मय परिषदेचा इतिहास मोठा आहे. साक्षात चिं.वि. जोशी यांचं योगदान असलेली ही संस्था. माझ्यासारख्याच्या दृष्टीनं साहित्याचं मंदिरच आहे. मी त्यांना वंदन करतो. बडोदा म्हटलं की, सयाजीराव गायकवाड यांचं स्मरण होणं स्वाभाविक आहे. कलाकार, साहित्यिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारकांचे ते आधारस्तंभ होते. काळाच्या पुढे पाहणारा राजा असंच त्यांचं वर्णन करावं लागेल. त्यांना मी विनम्रतेनं अभिवादन करतो.

आपण सर्व साहित्याच्या धाग्यानं जोडले गेलो आहोत. सर्वप्रथमच मी स्पष्ट करू इच्छितो की, मी साहित्यावरच बोलणार आहे. आजकाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणाचा पायंडा थोडासा ठरलेला आहे. तो चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही, ती त्यांची मतं आहेत. मला असं वाटतं की, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सर्व विषयांवर बोलता बोलता साहित्यावर बोलणं राहून जातं का? साहित्याची बांधीलकी समाजाशी असते असं म्हणत असताना, राजकीय प्रश्नांबद्दल बोलत असताना साहित्याबद्दल आपण बोलतो का? माझ्या आजच्या भाषणाचा केंद्रबिंदू हा साहित्य आणि वाङ्मय हाच असणार आहे. हा माझा परीघ या ठिकाणी मी आखून घेतलेला आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नावर मला मतं नाहीत असं नाही. ती आहेतच, पण ती मांडायची ही जागा नव्हे.

साहित्य काय असतं हो, साहित्याचा प्रांत नेमका कुठे सुरू होतो, असे प्रश्न पडतात तेव्हा मला व्यंकटेश माडगूळकरांच्या लहानपणची एक आठवण आठवते. माडगूळकर खेळायला गेले होते आणि खेळता खेळता त्यांना त्यांच्या गावचा, मासे पकडणारा एक माणूस भेटला. तो मित्रच होता त्यांचा. वयानं मोठा होता. त्यांनी विचारलं, ‘काय रे, कुठे चालला?’ तो म्हणाला, ‘हे आपलं मासे पकडायला चाललो’. दिवसभर व्यंकटेश माडगूळकर खेळत होते मित्रांबरोबर. संध्याकाळी ते परत यायला निघाले, तेव्हा पुन्हा त्यांना तो माणूस भेटला. त्यांनी विचारलं, ‘काय रे, गावले का मासे?’ आता या प्रश्नाचं उत्तर ‘हो, मासे गावले’ किंवा ‘मासे नाही गावले’ असू शकतं. परंतु तो काय म्हणाला? - ‘नाय बा. आज एक बी मासा नाय गावला.’ तो तिथंच थांबला नाही. तो म्हणाला, ‘नाय बा, आज एक बी मासा नाय गावला. आज नदीला जनू एकादस होती’. मित्रांनो, साहित्याचा प्रांत ‘आज नदीला जनू एकादस होती’ इथून सुरू होतो...

सामान्य माणूस, आपण ज्याला ‘ले मॅन’ म्हणतो आणि आपण साहित्यिक, दोघांमध्ये नेमका फरक काय असतो? या मला वाटतं, सामान्य माणूसही जगतो, साहित्यिकही जगत असतो; पण साहित्यिक जगता जगता त्या जगण्याकडे बघत असतो. बघता बघता त्या जगण्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करत असतो. आणि मग तो अन्वयार्थ कुठल्या तरी साहित्यप्रकाराच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवायचा प्रयत्न करतो. मग ती कविता असेल, कादंबरी असेल, कथा असेल, इतर काही असेल. तर तो मासे पकडणारा जो होता ना, त्याच्याकडे कागद-पेन नव्हतं किंवा तो सुशिक्षित नव्हता, म्हणून आपण त्याला साहित्यिक मानत नाही, पण त्याच्याकडे साहित्यिकाचे गुण निश्चित होते. कारण त्यानं जगण्याकडे बघितलं, बघता बघता त्याचा अन्वयार्थ लावला आणि तो अन्वयार्थ ‘नाय बा. आज नदीला जनू एकादस होती’ अशा पद्धतीनं आपल्यासमोर ठेवला.

म्हणूनच साहित्यिकाचं मूळ काम आपल्या आजूबाजूला जे काही आहे, त्याच्याकडे बघणं, त्याचा अन्वयार्थ लावणं आणि ते साहित्यात मांडणं, असं असतं.

आता इथं आजूबाजूला म्हणजे नेमकं कुठे? कुठपर्यत? म्हणजे लेखकाचा भवताल असा एका स्थळ-काळापुरता बांधून घालता येतो का? सध्या ‘समकालीन’ वास्तव असा एक शब्द फार ऐकू येतो. परंतु साहित्यात, कलेत समकालीन नामक काही असतं का? असू शकतं का? लेखक ज्या गोष्टी सांगतो, त्याला काही तत्कालीन, समकालीन तपशील असू शकतात. म्हणून तो त्या तपशिलापुरताच बोलत बसला, तर रिपोर्ताजच्या पलीकडे त्याचं लेखन जाईल का?

महाभारताचा काळ कुठला? मला तर ते आजचंच वाटतं. शेक्सपिअर आजचाच वाटतो. मग लेखकाला ‘समकालीनतेच्या चौकटीत बस’ म्हणण्याचा आग्रह कितपत योग्य आहे? भूत, भविष्य, वर्तमान हे मानवानं आपल्या सोयीसाठी पाडलेले तुकडे आहेत. काळ सलगच असतो, असं आईनस्टाइनही सांगून गेला आहेच.

आताच्या कोलाहलात हा प्रश्न कदाचित असंवेदनशील वाटेलही, पण आजचं साहित्य समकालीन वास्तवाला भिडतं का? यावर परिसंवाद घेण्याआधी साहित्याचे ते काम आहे का, याचा विचार व्हायला नको का? प्रश्न विचित्र वाटेल, कारण मग साहित्यिकानं आजूबाजूच्या परिस्थितिकडे कानाडोळा करायचा का, असा प्रश्न येऊ शकतो. साहित्य आजूबाजूचे सामजिक, धार्मिक, राजकीय वातावरण, व्यवस्था, शोषण, सामाजिक दरी, वंचित, स्त्रिया तरुण, आदिवासी, अल्पसंख्य, यांचे प्रश्न, जगणं हे सर्व कवेत घेणार की नाही?

एकीकडे लेखक एका काळापुरता बांधील राहू शकत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे या सगळ्याचीही लेखनात अपेक्षा करायची, असं कसं होऊ शकेल? आणि लेखकाला या भवतालापासून दूर राहता येईल का?

या आणि अशा साहित्यिक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करण्याचं हे व्यासपीठ आहे, असं मला वाटतं. राजकीय गप्पा काय सोशल मीडियावरही होऊ शकतील!

लेखकाला लेखनाचं आशयद्रव्य पुरवतो, तो कुठला तरी काळच ना? म्हणजे लेखकाला ज्ञात असलेला काळच ना? माझ्या मते महान लेखक ही कोंडी फोडण्यात यशस्वी ठरतो तो इथेच. तो त्याला ज्ञात असलेल्या काळाचा तुकडा घेतो. तत्कालीन भवतालाबद्दल बोलता बोलता सार्वकालिक होत जातो. म्हणूनच शेक्सपिअर गोष्ट सांगतो, ती त्या काळातली असूनही ती मला माझी, आजची वाटू शकते. मोठा लेखक कदाचित समकालीन शोषणानं सुरुवात करेल, पण एकूणच माणसांतली शोषकवृत्तीच उलगडून काढेल. जसे महर्षी व्यास षड्विकारानं लिप्त माणसाची मांडणी करतात. जी.ए. कुलकर्णी नियतीचा धांडोळा घेतात. तर चिं.त्र्यं. खानोलकर अज्ञाताच्या प्रदेशाचा. जयवंत दळवींना माणसाच्या लैंगिक घुसमटीचा, तर चेकोव्हला महत्त्वाकांक्षांनी जखडलेल्यांचा शोध खुणावतो. हे सर्व एका मूलभूत चिंतानाकडे नेणारं असतं आणि ते तात्कालिकतेच्या पल्याड जातं.

समकालीन किंवा तात्कालिक भवतालाविषयी एक भान देणारं, ज्याला आपण मंथनवादी साहित्य म्हणू, त्यांचे त्या त्या काळात, त्या त्या काळापुरतं एक योगदान नक्कीच असतं, पण त्याला काळाची सीमा असते. म्हणून इब्सेनच्या नोरानं एका काळात एक भूमिका बजावली; पण अजूनही चेकोव्हची नीना जरेश्न्या किंवा शेक्सपिअरची लेडी मॅक्बेथ आजही न सुटलेली कोडी होऊन बसतात.

याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ असणं अथवा उदासीन असणं असं नव्हे; तर एक मोठीच जबाबदारी लेखकावर असते असा आहे. केवळ सद्यस्थितीबाबत एक जागृती किंवा तात्पुरती उपाययोजना (ज्यात असहमती वा लढ्यापासून सत्तांत्तरापर्यंत सर्व काही येईल) यासाठी जनमानस तयार करणं, इतपतच मर्यादित भूमिका अपेक्षित नाही, असा आहे.

यासाठीही साहित्यकृतीचा वापर होऊ शकतो. परंतु ते सर्वथैव, एकमात्र प्रयोजन असू शकत नाही.

लेखकाला स्थळकाळनिरपेक्ष असा शोध घ्यायचा असतो. तो एकाच वेळी समकालीन आणि सार्वकालीन असतो तो याच अर्थानं.

म्हणूनच विसाव्या शतकातले मोहन राकेश तिसऱ्या शतकातल्या कालिदासाची गोष्ट सांगतात ‘आषाढ का एक दिन’मध्ये. ती सांगताना कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही सर्जनशील कलावंतांच्या सृजनशीलता, भौतिकता आणि नातेसंबंधांबाबतचं अंतर्द्वंद्व रेखाटतात.

मानवी अस्तित्वाची वेगवेगळी रूपं, त्याची क्षणभंगुरता, त्याच्या आदिम प्रेरणा, बदलातून निसर्गचक्रात टिकून राहण्याची धडपड, विजिगीषूता, अंतर्मनातले काळोखे कोपरे, विविध वासना आणि वखवखीच्या पूर्ततेची पराकाष्ठा आणि त्यातून त्याला दिसणारं पुसता न आलेलं पशुत्व... आणि या सगळ्यातूनही एका मांगल्याची, सत्य-शिवाची आस... भविष्याबद्दलच्या अनभिज्ञतेतून येणारं भय... निसर्गाच्या गूढगर्भातली चकित करून टाकणारी रहस्यं, त्यामुळे विस्मयचकित होणं... अज्ञाताच्या प्रदेशाबद्दलचं कुतूहल... आणि या सगळ्या पसाऱ्यामध्ये उभं राहून मूळ मानवी अस्तित्वाचं नेमकं प्रयोजनच काय हा छळणारा प्रश्न... साहित्य या सगळ्या सगळ्याचा धांडोळा घेतं.

मोठा लेखक या सगळ्याला कवेत घेतो. स्थळकाळाची बंधनं त्याला अडवू शकत नाहीत.

मोहन राकेश मौर्यकाळाच्या किंवा बौद्धकाळाच्या तपशिलात आपले साहित्य बांधतात, तर जॉर्ज ऑर्वेल प्राण्यांच्या विश्वातून व्यक्त होतो- ‘अॅनिमल फार्म’मध्ये. एकेकाळी समतावादी तत्त्वज्ञानाचं पितळ उघडं पाडणारी कादंबरी म्हणून ती गाजली. आज विविध दिवाळी अंक, वर्तमानपत्रं यातून ऑर्वेलनं त्याच्या कादंबऱ्यांतून ‘ज्या भयस्वप्नाचं दर्शन घडवलं, तेच सध्या आजूबाजूला दिसतं आहे’ असं म्हणत, त्याच्या लेखनास फॅसिस्टविरोधी लेखन ठरवत, ऑर्वेलच्याच लाठीचा वापर होताना दिसतो आहे. म्हणजे गंमत बघा, एकच साहित्य वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या बाजूंनी वापरलं जातं. मी ही ऑर्वेलची ताकद समजतो आणि मोठं साहित्य हे कुणा एकाच्या अजेंड्याच्या दावणीला बांधलं जाऊ शकत नाही, याचं हे उदाहरणही मानतो.

साहित्याचा पैस असा आणि इतका व्यापक असल्यानं समग्र जीवनालाच कवेत घेण्याची क्षमता ते बाळगतं. म्हणूनच साहित्याला एकाच प्रयोजनात बांधून घालण्यापेक्षा त्याच्या विविध शक्यता ताडून बघणं साहित्यिकाचं काम असायला नको का?

एका एकांकिकास्पर्धेला परीक्षक होतो. एका संघानं उत्तम रहस्यप्रधान एकांकिका सादर केली. पण त्यांना पुरस्कार दिला, याचं सर्वांना, अगदी त्या संघालाही आश्चर्य वाटले. विचारलं तर म्हणाले, ‘आमची एकांकिका छान झाली, पण त्यात सामाजिक संदेश नव्हता ना!’

साहित्यबाह्य मोजपट्ट्या मोठ्या साहित्याचे निकष ठरवू लागतात त्या अशा.

म्हणून आज गरज आहे, ती आजूबाजूच्या कोलाहलातून आपल्या लेखनाचा पिंड व प्रयोजन शोधण्याची. जसे बहुसांस्कृतिकत्व ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, तसंच हे प्रयोजनही बहुविध असणार, हे मान्य करत गरज आहे त्या प्रत्येकाचा आदर करण्याची मानसिकता आपल्यात निर्माण करण्याची.

जीवन जर एकरेषीय नसतं, तर साहित्य कसं? जीवन बहुद्देशीय असतं, तसं त्याकडे पाहण्याची दृष्टीही तितकीच विशाल हवी. पण प्रयोजनाला आखूड करून ठेवलं, तर साहित्यही आक्रसत जातं. तशीच आपली स्थिती होत चालली आहे.

म्हणूनच मग अज्ञाताच्या प्रदेशात नेणारी गूढकथा, मेंदूला गुंगारा देणारं रहस्य, विचित्र विश्वाची मांडणी करणारी फँटसी, निखळ (आणि निर्विषही) विनोद, शक्यता ताणणारा फार्स, भावकविता, निसर्गकविता, सांगीतिका, असंगत नाट्य, प्रहसनं, चिंतनशील वैचारिक वाङ्मय आणि त्यासोबत ‘बेस्ट सेलर’ म्हणवलं जाणारं पण नेहमीच हिणवलं जाणारंसुद्धा... ही सगळी दालनं आक्रसत लुप्त होत जाताना दिसतात. यामागचं कारण काय, याचा विचार आपण करतोय का?

या सगळ्यातून लेखक मानवी जीवनातील काही अभिजात पेच मांडण्याचा प्रयत्न करतो. तो चिरंतन प्रश्नांचा शोध घेत असतो आणि त्याद्वारे मानवी मनाची समज वाढताना दिसते. मनुष्याचं स्वत:विषयीचं. एकूणच जगण्याविषयीचं आकलन वाढताना दिसतं. हे आकलन लेखक आणि वाचक दोघांना समग्र भान देतं.

मग असा लेखक त्याला आकळलेल्या आयुष्याचा एक तुकडा म्हणजेच आयुष्य मानत नाही. महानुभाव पंथामधल्या एका कथेत एक हत्ती होता. ज्याला सोंड दिसली, त्याला समग्र जीवन हे सोंडेसारखं वाटलं, ज्याला शेपूट दिसली, त्याला समग्र जीवन हे झाडूसारखं वाटलं; पण मोठ्या लेखकाकडे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची शक्ती निर्माण होते.

त्याचं साहित्य दुःखाकडे बघतं, नीती-अनीतीकडे बघतं आणि मग त्याची दुःखाची व्याख्या व्यापक होऊन जाते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं दुःख त्याला दिसतं, ते त्याला जाळतं, अत्यंत जवळचं वाटतं. त्याचबरोबर पोटाची भूक भागलेली आहे, सुबत्ता आहे, तरीसुद्धा घरामध्ये एक मतिमंद मूल जन्माला येतं आणि मग मतिमंदत्वाचं दुःख त्याच्याहीकडे तो त्याच समतोल नजरेनं बघण्याचा प्रयत्न करतो. इतकंच काय; पण सुबत्ता आहे, पोटापाण्याचा प्रश्नच नाहीये, आरोग्यही उत्तम आहे, तरीही केवळ आपल्या समाजाच्या रूढ चौकटीत न बसणाऱ्या लैंगिकतेमुळे समाज स्वीकार करत नाही, कुठेतरी बाजूला ठेवलं जातं, अशा प्रकारची कुचंबणा असलेल्या एखाद्या समलैंगिक म्हणजे होमोसेक्शुअल माणसाचं एकाकीपणसुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटायला लागतं. साहित्यिकाला असं दुःखाचं एक समग्र भान आलं की, दुःखाचा असा परीघच वाढतो.

या अर्थानं लेखक म्हणून जगणं एक मोठ्या जबबदारीचा भाग असतो. तपश्चर्येचाच म्हणा ना. म्हणून स्वत:चा पिंड समजून घेत स्वतःच्या साहित्याच्या प्रयोजनाची निश्चिती केली पाहिजे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

आजूबाजूच्या कोलाहलापासून अनभिज्ञ वा उदासीन राहता कामा नये, हे योग्यच, तसंच त्या कोलाहलाला शरणही जाता कामा नये. साहित्याबाह्य प्रवाह आज तर अधिक जोमानंच साहित्यिकाकडून विविध अपेक्षा करत आहेत. अगदी उच्चरवानं करत आहेत. या मोजट्टीत बसलो नाही, तर असंवेदनशील अगदी भित्रे वगैरेही ठरवले जाण्याची व्यवस्था कार्यरत असली, तरीही लेखकानं आपल्या अंत:स्वराला या गोंगाटात हरवू देता कामा नये. गर्दीत राहून एकटेपण जपलं पाहिजे.

माझ्या अलीकडल्या ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीमध्ये मी अशाच अभिनिवेशापलीकडच्या, ध्रुवीकरणाला नाकारणाऱ्या अंत:स्वराची कहाणी मांडली आहे. आजूबाजूच्या आग्रही अभिनिवेशी कर्कश वातावरणात ती अल्पसंख्य, अनफिट वाटू शकते.

एकदा लेखकानं आपलं अस्तित्व एका विवक्षित काळापुरतं नसतंच, हे मान्य करून टाकल्यानंतर सभोवातालाशी किंवा त्या मोजपट्टीच्या निकषावर उतरत बसण्याची तमा तरी का बाळगावी? कारण लेखकाला भवभूतीनं सांगूनच ठेवलं आहे की, काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे... केव्हा ना केव्हा आणि कुठे ना कुठे लेखकाला त्याचा समानधर्मा भेटेलच... तोवर लेखकाचं लेखन तो असताना आणि नसतानाही पायपीट करत राहतं. किंबहुना ते त्या ताकदीचं असावं. नाव, पैसा, पुरस्कार हे थांबे क्षणभर विसाव्यासाठी आवश्यक असतीलही, पण पायपीट हेच लेखकाचं भागधेय असतं.

ही पायपीट सुखकर होत नाहीच, किमान अंगवळणी तरी पडावी, इतकाच प्रयास तो करू शकतो.

यानिमित्तानं मनातले विचारतरंग मांडायची संधी मला दिली, याबद्दल मी आपणा सर्वांचे आणि बडोदा वाङ्मय परिषदेचे मनापासून आभार मानतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा