‘आयाज होम’ : लंडनमधल्या भारतीय आयांची परवड, कुचंबणा, अवहेलना यांचा स्मृती-जागर
अर्धेजग - कळीचे प्रश्न
भक्ती चपळगावकर
  • लंडनमधील ‘आयाज होम’ आणि काही आयांची छायाचित्रं (सर्व छायाचित्रं - गुगलच्या सौजन्याने)
  • Fri , 17 June 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न आयाज होम Ayahs Home

पूर्व लंडनमध्ये हॅकनी भागात किंग एडवर्ड मार्ग आहे. याच मार्गावर एक चार मजली इमारत आहे. लंडनमध्ये जुन्या, एकसारख्या दिसणाऱ्या, एका रांगेतल्या इमारती काही कमी नाहीत. त्यातलीच ही एक इमारत. पण या मागच्या इतिहासाच्या, तिथं राहिलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी लवकरच तिच्या प्रवेशद्वारावर एक निळी पाटी लावण्यात येणार आहे.

ही निळी पाटी किंवा ब्लू प्लाक लंडनमधल्या ऐतिहासिक वास्तूंवर लावण्यात येते. इंग्लंडमधील ‘इंग्लिश हेरिटेज चॅरिटी ट्रस्ट’तर्फे हा बहुमान दिला जातो. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भारतीय महापुरुषांचं निवासस्थान असलेल्या इमारतींवर यापूर्वी अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत.

पण या इमारतीचं कोणतं वैशिष्ट्य आहे, ज्याचा गौरव होतोय? यात भारतीय उपखंडातून गेलेल्या शेकडो आया राहायच्या. आया म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुलं सांभाळण्याचं काम करणाऱ्या महिला कर्मचारी. भारतीय असेल तर ‘आया’ आणि चिनी असेल तर ‘अमा’ अशी नावं त्यांना दिली गेली होती. फरहाना मामूनजी नावाच्या दक्षिण आशियायी वंशाच्या एका ब्रिटिश महिलेने बीबीसीवर आलेल्या एका माहितीपटात या आयांबद्दल पुसटसं ऐकलं, तिला या आयांबद्दल उत्सुकत निर्माण झाली आणि तिने त्यांचा शोध घेतला. त्यांचा इतिहास जाणून घेतला. तिच्या प्रयत्नांत हॅकनी वस्तूसंग्रहालयही सामील झालं आणि त्याचंच फलित म्हणून या इमारतीवर ब्लू प्लाक लावण्यात येत आहे.

कोण होत्या या आया?

भारतात ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य तळपत असताना मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश लोक भारतात नोकरीला येत होते. बरोबर आपला कुटुंबकबिला घेऊन येत. घरातल्या लहान मुलांना सांभाळायला आया असत. त्या हळूहळू कुटुंबाचा हिस्सा बनत आणि मुलांना त्यांचा लळा लागे. त्यांची मदत इतकी होत असे की, ब्रिटिश कुटुंबं परत इंग्लंडला जायला निघाली की, त्यांना बरोबर घेऊन जात. कधी तरी त्यांना सांगितलं जाई, प्रवासात मदत होईल तुमची, एकदा तिकडे पोचलो की, तुमचे तिकिट काढून देतो, तर कधी सांगितलं जायचं, मुलं लहान आहेत, त्यांना तुमचा लळा आहे, दोनेक वर्षांत परत पाठवतो. काही आया ठरल्याप्रमाणे भारतात परतत, पण अनेकदा ही कुटुंबं या आयांना वाऱ्यावर सोडत. त्यांच्याकडे परत जाण्यासाठी कोणतंही साधन उपलब्ध नसे. कित्येकदा त्यांच्यावर भीक मागायची वेळ येई.

अशाच एका सोडून दिलेल्या आयाची कहाणी ब्रिटिश इतिहासावर आधारित एका कार्यक्रमाच्या मीरा सयाल यांनी सांगितली, तेव्हा विस्मृतीत गेलेल्या या आयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. १९०८ साली एक घाबरलेली भारतीय बाई किंग्ज क्रॉस स्टेशनवर खिशात एक पाऊंड घेऊन फिरत होती. तिची अवस्था पाहून काही जणांना तिची दया आली आणि त्यांनी तिला आयाज हाऊसला पोचवलं. तिथल्या निरीक्षक मिसेस डन यांना तिची कहाणी कळाल्यावर संताप आला. ही आया भारतातून एका ब्रिटिश कुटुंबाकडे आली, त्या कुटुंबानं तिला दुसऱ्या एका कुटुंबाकडे सोपवलं, ते कुटुंब भारतात येणार होतं. त्यांच्याबरोबर ती पंधराएक दिवस स्कॉटलंडला जाऊन आली, आणि नंतर बहुदा त्या कुटुंबाचा कार्यक्रम बदलला आणि त्यांनी आयाला एक पाऊंड दिला आणि किंग्ज क्रॅास स्टेशनवर सोडून दिलं. मिसेस डन यांनी इंडिया ऑफिसकडे पाठपुरावा करूनही या आयाला कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत, असं ब्रिटिश सरकारने स्पष्ट केलं.

१८५७च्या उठावानंतर ब्रिटिशांनी आपली भारतावरची पकड अजून मजबूत केली. सुएझ कॅनॉलचा वापर १८६९ साली सुरू झाला, त्याच्या आधी या प्रवासाला चार ते सहा महिने लागत, पण सुएझ कॅनॉलने हा प्रवास तीन आठवड्यांवर आणला. आता इंग्लंडहून भारतात येणं सोपं झालं. राज्यकारभार करण्यासाठी आधी ब्रिटिश तरुणांचे ताफे भारतात आले. त्यांच्या मागोमाग त्यांच्या बायका आल्या. त्यांच्या घरी राबणारे ब्रिटिश पुरुषांना ‘साहिब’ तर बायकांना ‘मेमसाहिब’ म्हणू लागले.

मेमसाहिबांना जेव्हा भारतात मुलं झाली, तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना मातीची गरज भासली. इथं ना मित्रमंडळ होतं, ना नातेवाईक. मग भारतीय महिलांना त्यांनी आया म्हणून नेमायला सुरुवात केली. भारतातले रईस नोकर चाकर बाळगत, पण बहुदा ते पुरुष असत. मेमसाहिबांना बायकांना नोकरी देणं अधिक पसंत पडलं. एकतर या कामात चोख होत्या आणि दुसरं म्हणजे त्या मुलांना फार लळा लावत. त्यांच्याबरोबर खेळत, त्यांना अंगाई गात, कित्येक जणी आपली भाषा त्यांना शिकवत. आयांचं नशीब असेल तर त्यांचे मालक प्रेमळ असत, त्यांना माणुसकीनं वागवत, अनेकदा त्यांना हिडीसफिडिस केलं जाई आणि हिनतेनं वागवलं जाई.

या परिस्थितीत इंग्लंडला नेलेल्या आयांना चांगली वागणूक मिळेल, अशी अपेक्षा करणं काही उपयोगाचं नव्हतं. मुलं मोठी झाली की, त्यांना शिकायला इंग्लंडला पाठवलं जाई. अशा वेळी त्यांची आईसुद्धा मायदेशी परत जाई, मग जहाजप्रवासात मुलांना एकटीनं सांभाळणं मेमसाहिबना जमायचं नाही. काही जुन्या कागदपत्रांत अशा प्रवासाची नोंद आहे. मेमसाहिब आणि मुलं फर्स्ट क्लास केबिनमध्ये, तर आया डेकवर अशी व्यवस्था असे.

विशेष म्हणजे गवर्नेस वगैरे ब्रिटिश कर्मचारी मात्र आपल्या मालकांसारखेच केबिनमध्ये राहत. डेकवर जागा मिळाली नाही की, या ‘नेटिव्ह’ आया आपल्या मालकांच्या केबिनबाहेर पथारी पसरत. काही आया मात्र जहाज प्रवासाला सरावलेल्या असत. त्यांचा पगार जरा जास्त असे. ब्रिटनमध्ये पोचल्यानंतर आया एकतर आपल्या मालकांच्या घरी जात किंवा ज्यांना त्यांची गरज नसे, असे मालक त्यांची परवानगी आयांच्या घरी करत. काही आया वर्षातून दोन-तीन वेळा इंग्लंड दौरा करत.

मुलं इंग्लंडच्या बोर्डिंग स्कूलमध्ये गेली की, आया भारतात परतत. काही मुलांना आयांचा इतका लळा लागलेला असे की, त्यांना राहून राहून त्यांची आठवण येई, कित्येक पत्रांमध्ये मुलं आयांची आठवण येते, असा उल्लेख करतात. पण बहुतेकांना उर्वरित आयुष्यात आपली आया पुन्हा भेटली नाही.

निराधार आयांना इंग्लंडमध्ये राहता यावं, यासाठी  १८२५ साली अल्डगेट भागात ‘आयाज होम’ सुरू झालं. जवळपास एका शतकानं म्हणजे १९२१ साली ते हॅकनी भागातल्या किंग एडवर्ड मार्गावर हलवण्यात आलं. जुन्या कागदपत्रांवरून जाणवतं की, या आयांना अक्षरशः वस्तूसारखं फिरवलं गेलं. त्यांना भारतातून आणलेल्या कुटुंबाने परतीचं तिकिट दिलेलं असायचं. ते तिकिट ही घरं चालवणाऱ्या चालकांना दिलं जायचं आणि ते तिकिट ते ज्यांना आयांची गरज आहे, अशा कुटुंबांना विकत. त्याच्या बदल्यात आया नव्या कुटुंबात काम करत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

नोव्हेंबर ते मार्च या काळात आयाज होम रिकामं असायचं, कारण कुणी फारसे प्रवास करत नसे. मार्च ते नोव्हेंबर या काळात मात्र इथं एकदम चहलपहल असे. १९००च्या सुरुवातीला ख्रिश्चन मिशनरींनी आयांना मदत सुरू केली. बदल्यात काही आयांचं धर्मांतर झालं. पहिल्या महायुद्धाच्या काळात महिलांना प्रवासाची परवानगी नव्हती. त्यामुळे अनेक आया ब्रिटनमध्ये अडकल्या.

हळूहळू ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य अस्ताला गेला. ब्रिटिश नागरिक आपल्या देशात कायमस्वरूपी परतले. आया हळूहळू विस्मृतीत गेल्या. त्यातल्या अनेक जणी हुशार होत्या, आपल्या कामात तरबेज होत्या. संधी मिळाली असती, तर त्यांनी संधीचं सोनं केलं असतं. वंशवाद आणि गुलामगिरी यांसारख्या प्रथांमुळे या महिलांना त्यांच्या हयातीत अनेक संकटांचा, अपमानांचा सामना करावा लागला. आता त्यांचं अस्तित्व ब्लू प्लाकच्या निमित्तानं का होईना इंग्लंडमध्ये नव्यानं जागवलं जात आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhalwankarb@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

Post Comment

Vivek Date

Sun , 19 June 2022

Good translation of Wiki on this subject - https://en.wikipedia.org/wiki/Ayahs%27_Home


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......