या ‘मास हिप्नॉटाईज्ड’ अवस्थेत माझी असंख्य मित्रमंडळी, दूरचे व जवळचे नातेवाईक आणि अगदी (गुजराती) शाळेतील सवंगडी नेहमीच आढळून येतात…
पडघम - देशकारण
प्रशांत कोठाडिया
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 18 May 2022
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP काँग्रेस Congress गुजरात मॉडेल Gujrat Model विकासपुरुष Vikaspurush हिंदू Hindu मुस्लीम Mulsim

२०१४ हे अनेक अर्थाने ‘वॉटरशेड’ वर्ष म्हटले पाहिजे. राजकीय उलथापालथी होण्याबरोबरच जनमानस घुसळून काढण्याचं सामर्थ्य या काळाने अनुभवले आणि त्याची कंपनं अद्यापही मनामनांत उमटताना दिसून येत आहेत. त्यामध्ये त्या वेळची काँग्रेसची राजवट ही जगातील सर्वांत भ्रष्ट, अकार्यक्षम आणि मुस्लीमधार्जिणी राजवट असल्याच्या सर्वव्यापी प्रचाराने, उच्चवर्णीय सुशिक्षितांपासून ते ग्रामीण भागातील शेतमजूर; सांस्कृतिक व करिअरच्या दृष्टीने यशस्वी ठरलेल्या श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांपासून ते अगदी गावागावांतून अथवा शहरातील गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये सडाफटिंग असणाऱ्या बेकार लोकांच्या मनावर (खरं तर मानगुटीवर) गतकाळातल्या राज्यकर्त्यांविरोधातली भावना रुजवण्यात भाजप, रा.स्व. संघ आणि त्यांची सर्व अंगे यशस्वी ठरली आणि परिणामी, आधीच्या सत्ताधाऱ्यांचा आश्चर्य वाटण्यापलीकडे पाडाव झाला.

मात्र या सर्व प्रचारतंत्राचे सूक्ष्म नियोजन आणि सर्व नेपथ्य मात्र २०१० पासूनच तयार करण्याचं काम सुरू झालं होतं. त्या दृष्टीने संघ-भाजपने मागील कित्येक वर्षांपासून अतिशय शांत डोक्याने तयार केलेले ‘नेटवर्क’ उपयोगी पडले. त्याचप्रमाणे, मोदीप्रणित ‘गुजरात मॉडेल’मुळे विशेषतः मध्यमवर्गीयांच्या डोक्यात देशाच्या गतिमान विकासाची झूल आणि भूल चढली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गुजरात मॉडेल हाच पाया

तसं पाहिलं तर, मोदींची ‘लार्जर टॅन लाइफ’ इमेज उभारण्याची तयारी २००२पासूनच म्हणजे गुजरातेतील नरसंहारापासूनच वा त्यामुळेच सुरू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मीडियाने मोदी हे ‘विकासपुरुष’ आणि ‘हिंदूंचा नवा तारणहार युगपुरुष’ म्हणून प्रसिद्धीची वावटळ निर्माण केली गेली. भारतातील ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’ची मोठ्या प्रमाणात पायाभरणी करण्याचा काळही २००२ पासून गुजरातेत सुरू झाला. काँग्रेसच्या राजवटीतही उद्योग जगताशी सलगी होती, परंतु सरळसरळ आपल्या जवळचे व आवडीचे कॉर्पोरेट्स निवडून, त्यांना राज्यसत्तेचा प्रचंड प्रमाणात फायदा करून देण्यास ‘गुजरात मॉडेल’मध्येच सुरुवात झाली होती. मीडिया आणि समाजमाध्यमांवर हळूहळू या कॉर्पोरेट्सचा विळखा पडू लागला आणि म्हणता म्हणता मीडियाने, एखाद-दोन अपवाद सोडता, संपूर्ण शरणागती पत्करली. मग काय विचारता द्वेषपूर्ण प्रचार देशातील वातावरणात भिनू लागला.

‘काँग्रेस’ हेच आजच्या प्रश्नांचे, देशाच्या अवस्थेचे मूळ आहे, त्यांचे मुस्लीमप्रेम हेच देशातील हिंदूंच्या अधोगतीचे मुख्य कारण आहे, ‘नेहरू-गांधी’ कुटुंबाने देशाला पूर्ण लुबाडले आहे, या स्वरूपाचे विखारी चित्कार मोदी-संघप्रणित मीडियामधून क्षणोक्षणी ऐकू येऊ लागले. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर नेहरू-गांधी परिवाराच्या काँगेसला नेस्तनाबूत केले पाहिजे, असा पर्याय मोदींनी ठळकपणे मांडला.

काँग्रेस पक्ष हा जणू देशाचा एक क्रमांकाचा शत्रू आहे, हे आजवरचे भाजपचे नेते दबक्या आवाजात कुजबूज तंत्राला अनुसरून मांडायचे, ते सारे मोदी उच्चरवाने आणि आपल्या नाटकीय व आवेशपूर्ण पद्धतीने मांडू लागले. त्यामुळे देशाला पहिल्यांदाच एक सक्षम, मजबूत व ५६ इंची छातीचा पंतप्रधान लाभणार, या भावनेने लोकांच्या मनात घर केले. प्रचारतंत्राच्या झंझावाताने कोट्यवधी भारतीयांच्या मनाचा ताबा घेतला होता आणि मध्यमवर्गीयांना तर मोदींकडे जादूची छडी आहे आणि त्याने संपूर्ण देश ‘गुजरात मॉडेल’च्या दिशेने धावू लागेल आणि आपला देश पुढील काही काळात ‘विश्वगुरू’ बनेल, याची खात्री वाटू लागली.

काँग्रेसविरोधाचा सार्वत्रिक विखार

आजवर काँग्रेसने देशाच्या विकासाची जी पायाभरणी केली, देशामध्ये नवनवे तंत्रज्ञान आणले, शेतीतील उत्पन्न बाढवले, शिक्षणाचे जाळे देशभर विणले या सर्व बाबींचा ज्या वर्गाने जबरदस्त फायदा घेतला, तोच मध्यमवर्ग काँग्रेसच्या भ्रष्ट व गलथान राज्यकारभारावर आणि तथाकथित मुस्लिमधार्जिण्या राजकारणावर कोरडे ओढू लागला. मागील ६० वर्षांत जणू या देशामध्ये काहीच घडले नाही, कसलीही प्रगती झाली नाही, या स्वरूपाच्या खोट्या प्रचाराला ‘मेन स्ट्रीम’ मीडियाने इतके फुगवले की, भलभल्या व स्वतःला हुशार समजणाऱ्या आणि दिवाणखान्यातून इतर सर्वांना वेड्यात काढण्यात तरबेज असणाऱ्या मंडळींना मोदींचा हा प्रचार खराच वाटला. आता परिस्थिती अशी आहे, की मोदींच्या अत्यंत ‘अकार्यक्षम’, ‘दिखाऊ’ आणि ‘प्रचारकी’ राज्यकारभाराचे सर्वच क्षेत्रात धिंडवडे निघत असतानादेखील, मोदी स्वतः, त्यांचा पक्ष आणि त्यांचे भक्तगण आजही त्यांच्या ‘महाकाय’ विष्णुमय प्रतिमेच्या प्रेमात आनंदाने डुंबत आहेत.

या सर्व प्रचारतंत्राबरोबरच २०१४ पासूनच मोदी-शहांनी ‘धार्मिक द्वेषा’ची मात्रा चाटवण्यास सुरुवात केली आणि त्याच्या झालेल्या जीवघेण्या आणि देशाची एकात्मता संपवणाऱ्या भीषण परिणामाचे चटके देशाला बसू लागणे स्वाभाविकच होते.

एकीकडे, देशातील सामाजिक सद्भाव, स्वातंत्र्यलढ्याने देशाला मिळालेले संविधान व त्यातील ‘विश्वात्मक’ मूल्ये, राज्यांचे अस्तित्व व अधिकार आणि सर्व घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य या सर्वांची गळचेपी केली जात असतानाच, भारताची अर्थव्यवस्था गटांगळ्या खाण्याच्या वाटेवर असूनही, मोदीभक्तांना भावनिक मुद्देच महत्त्वाचे वाटत आहेत. मध्यम व उच्च मध्यमवर्गीय जणू ‘मास हिप्नॉटाईज्ड’ अवस्थेत वावरत आहेत, नव्हे प्राप्त परिस्थितीचे वास्तव नाकारून, देश ‘विश्वगुरू’ होणार या भरभक्कम समजुतीच्या विश्वात तरंगताना दिसत आहेत.

समूह संमोहनात नातेवाईक

या ‘मास हिप्नॉटाईज्ड’ अवस्थेत माझी असंख्य मित्रमंडळी, दूरचे व जवळचे नातेवाईक आणि अगदी (गुजराती) शाळेतील माझे सवंगडी मला नेहमीच आढळून येतात. मोदींवर टीका करणारा एक शब्दही त्यांचे समोर उच्चारणे हे भले मोठे पाप ठरते. त्यातील अनेक जण हे पूर्वापार काँग्रेस विरोधक होतेच, परंतु आता त्यांच्या विरोधाला अधिक धार आल्याचे दिसते आणि काही नातेवाईक हे मूळ काँग्रेस परंपरेशी नातं असणारे, सांगणारे असूनही आज मोदींच्या प्रचारयात्रेत लीलया सामील झालेले दिसत आहेत, तेव्हा मात्र त्यांची कीव करावी की, त्यांच्या संधीसाधूपणाबद्दल थक्क व्हावे, हे समजेनासे होते.

मला चांगले स्मरते की, कॉलेजमध्ये असताना अनेक मित्रांचे परिवार हे मुळातच संघाच्या वैचारिक मुशीतून घडलेले आणि पुण्यामुळे त्यातील अनेक जण ‘सवर्ण’ सदरात मोडणारे असल्यामुळे, ते संघ आणि त्या वेळच्या जनसंघाविषयी सहानुभूती बाळगणारे होते.

मीही त्या काळी मुळात समाजवादी विचारांकडे (पक्षाकडे नव्हे) आकर्षित झालो असल्याने, थोडाफार काँग्रेस विरोध माझ्यातही होताच. आणीबाणी आणि त्यानंतरची दोन ते तीन वर्षे मी या मित्रांशी वा नातेवाईकांशी जेव्हा जेव्हा काँग्रेसविरोधी बोलायचो, त्या वेळी ही मंडळी मनातल्या मनात आनंदित होताना मला आढळून येत; मात्र तेव्हा ही मंडळी खूप संयमित शब्दात काँग्रेसवर टीका करायची वा मौन पत्करायची. अगदी २०१४पर्यंत त्यांच्या काँग्रेस विरोधाला आणि मुस्लीम-ख्रिश्चन धर्मियांच्या द्वेषाला आजच्या इतकी धार खचितच नव्हती.

हा जो सारा परिणाम दिसतोय तो, मोदी व भाजपने नियोजनबद्धपद्धतीने वाढवत नेलेला विखारी प्रचार, मीडियातून गायब झालेले बेरोजगारी, दारिद्र्य, महागाई, आदी महत्त्वाचे प्रश्न आणि समाजमाध्यमातून रोज ओकला जाणारा ‘भाडोत्री’ प्रचार या सर्वांच्या झालेल्या एकत्रित परिणामामुळे आहे.

खोट्या प्रचाराचे ग्रुप्स

सुरूवातीला माझे नातेवाईक व अनेक वर्षांपासूनचे मित्र अतिशय आक्रमकपणे मोदींची बाजू लावून धरणारे व्हॉट्सअ‍ॅपीय मेसेजेस पाठवत राहायचे. मी स्वतःहून कोणाही नातेवाईक वा मोदीप्रेमी मित्रांना मोदींच्या विरोधातील मेसेजेस पाठवत नाही. प्रारंभी, नात्याचा मान राखून त्यांनी पाठवलेल्या मोदीधार्जिण्या मेसेजेसना प्रत्युत्तर द्यायचे टाळायचो. परंतु नंतर अपप्रचार असह्य झाल्याने मीदेखील आक्रमकपणे मोदींचा खोटा प्रचार उघडा पाडणारे मेसेजेस पाठवू लागलो. त्यावर यातले काही नातेवाईक संवाद थांबवायचे, तर काही आचरटपणा करत संवाद सुरू ठेवायचे. अशाच एक ते दोन नातेवाईकांनी पाठवलेल्या मेसेजेना मी स्वतः लिहिलेला मेसेज पाठवून त्यांच्या म्हणण्याचा खरमरीत समाचार घ्यायचो. त्यामुळे, हा प्रकार कमी झाला.

यासंदर्भातचे एकच उदाहरण द्यायचे तर एकदा एका जवळच्या नातेवाईकाने मला मोदी किती शक्तिमान आहेत, वगैरे वर्णन असणारा संदेश पाठवला. त्या वेळी चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून आपल्या सैनिकांचे प्राण घेतले होते. ‘आपला एक सैनिक शहीद झाला तर आपण त्यांचे दहा सैनिक मारू’, अशी वल्गना करणाऱ्या मोदींनी साधा ‘चीन' हा शब्द उच्चारण्याचे धारिष्ट्य दाखवले नव्हते. म्हणून मी त्यांच्या वरील मेसेजला प्रत्युत्तर म्हणून त्यांना एवढीच विनंतीवजा सूचना लिहिली की, तुमच्या ५६ इंची मोदींना सांगा की, एकदा तरी ‘चीन’ असा शब्द त्यांच्या तोंडून उच्चारा आणि चीनला स्वतःचे लाल डोळे दाखवा. त्यानंतर मात्र हे नातेवाईक मेसेज पाठवायचे थांबले.

मोदीप्रेम आणि मुस्लीमद्वेष

माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, बहुतांश जैन, मारवाडी व गुजराती समाजात मोदीप्रेम आणि मुस्लीमद्वेष पराकोटीला पोहोचला दिसून येतो. त्यांचे गुरूदेखील भाजप प्रचारसभेतून या प्रकारचा विद्वेष बिनदिक्कतपणे पसरवताना दिसतात. या लांड्यांना कापले पाहिजे, मारले पाहिजे, धडा शिकवला पाहिजे, या प्रकारची भाषा जेव्हा व्यापारउदिमात अनेक पिढ्या घालवलेल्या वरील समाजातील मंडळी उच्चारतात, तेव्हा मात्र मला न राहवून, तुम्ही किमान स्वतःला जैन म्हणून घेत जाऊ नका, ज्यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला, त्या भगवान महावीरांचे नाव तरी घेऊ नका, असे आवर्जून ऐकवत असतो. ‘विरोधक’ आणि ‘शत्रू’ यातला फरकही जी मंडळी लक्षात घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्याशी वादविवाद घालून आपला रक्तदाब का वाढवून घ्यायचा, हा मी स्वतः घेतलेला पवित्रा आहे. झोपेचे सोंग करणाऱ्याला ज्याप्रकारे उठवता येत नाही, त्याचप्रमाणे अंधभक्त असणाऱ्यांचे मनपरिवर्तन होऊ शकत नाही, आणि आपण कोणाशी किती वाद घालत बसायचे, हे लक्षात घेऊन मी अशा ‘दिव्य’ज्ञान प्राप्त झालेल्या जुन्या मित्रांच्या ग्रुप्समधून बाहेर पडलो.

माझ्या ग्रामीण भागातील काही नातेवाईकांशी बोलताना जर माहितीपूर्ण पद्धतीने बिनतोड युक्तिवाद केला की, ते मोदींचा विषय शरद पवारांवर आणतात, आणि या माणसाने राज्याचे नुकसान केले, असे बोलू लागतात. ग्रामीण भागातील या भक्तगणाला त्या-त्या परिसरात प्रामुख्याने मराठा समाजाशी सामना करावा लागतो किंवा जुळवून घ्यावे लागते. म्हणून मग ते शरद पवार, अजित पवार यांच्या नावाने बोटे मोडू लागतात आणि मग देवेंद्र फडणवीसांनी या मंडळींना (म्हणजे मराठ्यांना) कसा धडा शिकवला, त्यांची कशी ठासली, अशी आरतीही गाऊ लागतात.

माझ्या बहुसंख्य नातेवाईकांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती ठीक असल्याने अशी राजकीय व जातीय अस्मिता उसनवारीने आणावी लागते, हे चित्र मला सर्रास पहायला मिळते. कालपर्यंत इंदिरा गांधींचे गोडवे गाणारे आता मात्र संघाची शिस्त, मोदींना पर्याय नाही, भाजपशिवाय काही नाही, अशी वक्तव्ये करू लागतात आणि मग, विश्व हिंदू परिषद, संघ, भाजपला आर्थिक सहकार्य करण्यापर्यंत मजल मारतात. अर्थात काही वेळा, अनपेक्षितपणे एखादा नातेवाईक मोदींच्या कारभारावर कोरडे ओढताना आणि खरमरीत शब्दांत टीका करून, आश्चर्याचा धक्काही देतो.

हुकूमशाहीचे समर्थक नातेवाईक

तसं पाहिलं तर फार तर वर्तमानपत्र आणि व्हॉट्सअॅप सोडल्यास इतर वाचनाशी कसलाही संबंध नसलेल्या, परंतु उच्चशिक्षित नातेवाईकांना देशात ‘लोकशाही’पेक्षा ‘हुकूमशाही’च हवी, असे पूर्वीपासूनच वाटत असले तरी, २०१४पासून ते ‘हुकूमशाही’चा स्वर अधिक जोरकसपणे लावू लागले आहे. ‘लोकशाही’ शासनव्यवस्थेचा आजवर फायदा घेणारे आता ‘लोकशाही’ कशाला हवी असेही म्हणू लागले आहेत. समाजातील सर्वच जाती-जमाती व धर्मियांतील मध्यमवर्गीयांमध्ये ही ‘मानसिकता’ थोड्याफार प्रमाणात दिसून येत आहे. २०१४पासून सुरू झालेला हा विद्वेष व सूडाचा प्रवास आपल्या देशातील लोकशाही आणि एकात्मता संपवणार याचे भान नसलेल्या आणि ‘अच्छे दिना’च्या भ्रमात रममाण होणाऱ्या वर्तमान समाजाच्या मनोवृत्तीमुळे भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि संवैधानिक जीवनावर अत्यंत गंभीर परिणाम संभवणार आहेत. आता जे काही अनुभवास येते आहे, ही तर केवळ ‘झलक’ आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मागील सात ते आठ वर्षात नोटबंदी, जीएसटी, मॉब लिंचिंग, दलित व महिलांवरील अत्याचार, चीनची घुसखोरी, क्रोनी कॅपिटलिझम, राफेलसारखी अनेक प्रकरणे, करोना काळातील हलगर्जीपणा आणि मृत्यूचे आकडे लपवण्याची शर्थ, लसीकरणाबाबतचा गोंधळ, पीएम केअर फंडातील आणि एकूणच राज्यकारभार व प्रशासकीय कारभारातील लपवाछपवी, मध्यरात्री सीबीआयच्या संचालकांना सत्तेच्या जोरावर हुसकून लावणे, प्रचंड भाववाढ, बेरोजगारीने केलेला उच्चांक व रुपयाने गाठलेला नीचांक, मुस्लीम व ख्रिश्चनद्वेष प्रकट करण्यासाठी वापरलेला ‘बुलडोझर’, अर्थव्यवस्थेची लावलेली बाट, जीएसटीचा कायदेशीर बाटा राज्यांना न देताच, राज्यांनी पेट्रोलवरील कर कमी करावा अशी निर्लज्ज मागणी, स्वतःसाठी विमानखरेदी, प्रचारतंत्रावर होणारा कोट्यवधी रुपयांचा चुराडा, वाढत्या पेट्रोलदरातून चालू असलेला आर्थिक (गैर)व्यवहार, दिवसागणिक वाढत जाणारे आंतरराष्ट्रीय कर्ज, स्वतःच्या मर्जीतील उद्योगसमूहांना दिली जाणारी व देशाला न परवडणारी सवलत, कोळसाटंचाईचे महासंकट या सारखे असंख्य गंभीर प्रश्न माझ्या नातेवाईकांच्या गावीही नाहीत.

कसलेही वाचन नाही, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वरील खोटेनाटे संदेश हेच अंतिम सत्य मानून स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकलेली ही मंडळी ज्या आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने बोलताना पाहिले की, वाटू लागते - ही तर अंधभक्तीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यांना फक्त मोदींनी मुस्लिमांना कसे चेचले, ‘काश्मीर फाइल्स’ला (आणि ‘जिओ’ला) कसे उचलून धरले, यासारख्या मुद्द्यांचे अजूनही अप्रूप वाटते.

जबरदस्त प्रचारतंत्रामुळे हिटलरच्या काळात निर्माण झालेली व अनुभवलेली सामाजिक व राजकीय बधीरता ही भारतात या पुढील काळात अधिकाधिक गहिरी होत जाणार, यात माझ्या मनात मुळीच शंका नाही. मोदी-शहा व संघालाही नेमके हेच हवे आहे. या प्रकारच्या द्वेषमूलक राज्यकारभाराच्या फोफाट्यातून आपले मित्र, नातेवाईक व आप्तेष्ट तरी कसे सुटणार?

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ मे २०२२च्या अंकातून

लेखक प्रशांत कोठाडिया सामाजिक कार्यकर्ते आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा