पर्यायी इतिहासलेखन झाले नसते, तर ही हीनवृत्ती आजच्या बहुजनांसमोर आली नसती...
पडघम - सांस्कृतिक
संध्या नरे-पवार
  • ‘जनवादी साहित्य संस्कृती संमेलना’चे बोधचिन्ह, संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार आणि संमेलनाचं एक छायाचित्र
  • Thu , 12 May 2022
  • पडघम सांस्कृतिक जनवादी साहित्य संस्कृती संमेलन Janvaadi Sahitya Sanskriti Sammelan संध्या नरे-पवार Sandhya Nare-Pawar

८ व ९ मे २०२२ रोजी सावंतवाडीमध्ये ‘जनवादी साहित्य संस्कृती संमेलन’ पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षा संध्या नरे-पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा दुसरा संपादित भाग...

..................................................................................................................................................................

जन म्हणजे कोण?

तर्कविसंगत मिथ्यासमर्थनाने भारलेल्या वातावरणात हे जनवादी साहित्य आणि संस्कृती संमेलन होत आहे. त्याला विषमतावादाविरोधात, जातवर्ण-वर्चस्ववादाविरोधात एल्गार पुकारत जन्माला आलेल्या ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेच्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त आहे. आपण इथे ‘जनवादी’ म्हणतोय, म्हणूनच यातले ‘जन’ कोण, त्यांची व्याख्या काय, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण जन म्हटले म्हणजे त्यात सर्व जनही येतात, अभिजनही येतात आणि बहुजनही येतात. बहुजनांमध्ये अभिजनांचे अनुकरण करून सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामावले जाणारे बहुजनही असतात आणि अभिजनांच्या प्रभुत्वाला आक्षेप घेणारे बहुजनही असतात. जे अभिजन नाहीत ते बहुजन, ही बहुजन शब्दाची व्याख्या असली तरी नुसता बहुजन शब्दही जन शब्दाइतकाच अस्पष्ट राहतो. म्हणूनच इथे १९७२मध्ये दलित पँथरने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा मार्गदर्शक ठरतो.

दलित कोण, याची व्याख्या करताना या जाहीरनाम्यामध्ये अनुसुचित जाती-जमाती, नवबौद्ध, कामगार, भूमिहिन आणि शेतमजूर, स्त्रिया तसेच राजकीय, आर्थिकदृष्ट्या शोषित असलेले आणि धर्माच्या नावाने ज्यांचे शोषण केले जाते, असे सर्व समूह म्हणजे दलित, असे सांगितले आहे. इथे दलितत्वाची व्याख्या अतिशय व्यापक करत सर्व शोषित जनसमूहांना त्यात सामावून घेण्यात आले आहे. तसंच राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांचा उल्लेख करत शोषणव्यवस्था नेमक्या कोणत्या, तेही सांगितले आहे. शोषण करणाऱ्या व्यवस्था कोण आणि ज्यांचे शोषण होत आहे, ते कोण, हे स्पष्ट करणारी ही १९७२ मधली एक क्रांतिकारी व्याख्याच होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्योत्तर काळात गावगाड्यातील अनुसूचित जातीजमातींवरचे, नवबाद्धैांवरचे अत्याचार वाढले होते. याच काळात वेगवेगळ्या दलित लेखकांची आत्मचरित्रे, कविता प्रसिद्ध होत होत्या. त्यातल्या अन्याय-अत्याचारांच्या विविध कथनांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दलित समूहांची दुःस्थिती कायम असल्याचे चित्र पुढे येऊन प्रतिकाराची भावना वाढीस लागली. ब्लॅक पँथर्सचा आदर्श समोर ठेवून तशाच लढाऊ संघटनेची गरज नव्या तरुण पिढीला वाटू लागली आणि नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, अर्जुन डांगळे इत्यादी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने दलित पँथर्स ही संघटना आकाराला आली. या संघटनेने त्या काळात जो विद्रोह पुकारलेला होता, आज त्या तशाच विद्रोहाची गरज आहे.

अलीकडेच नागराज मंजुळे यांनी विद्रोह म्हणजे प्रेम, अशी विद्रोहाची व्याख्या केली होती. एका अर्थी नागराज मंजुळे म्हणतात ते बरोबर आहे. जेव्हा ‘विद्रोह’ म्हटले जाते किंवा शहीद भगतसिंगांनी दिलेल्या नाऱ्याप्रमाणे ‘इन्किलाब जिन्दाबाद’ म्हटले जाते, तेव्हा त्याच्या मुळाशी मानव्याचे प्रेमच असते. शोषणाविरोधातली लढाई, गुलामगिरीविरोधातली लढाई, मानव्याविषयी, मानवी जगातील नीतीमूल्यांविषयी अंतःकरणात प्रेम असल्याशिवाय, करुणा असल्याशिवाय उभी राहत नाही

गुलामगिरीविरोधातल्या लढ्यासाठी अंत:करण प्रेममय असण्याचीच गरज असते, ते हिंसावादी लोकांचं काम नाही. हिंसावादी लोक जनांमध्ये उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, सोवळं-ओवळं, पवित्र-अपवित्र असे भेद निर्माण करून उतरंडीचा एक सापळा तयार करतात. या उतरंडीच्या सापळ्यातून ते केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक, भावनिक, शाब्दिक अशी सगळ्या पातळ्यांवरची हिंसा जन्माला घालतात. या हिंसेविरोधातला उच्चार म्हणजे विद्रोह. समाजपरिवर्तन करू पाहणारी क्रांती म्हणजचे मानव्याविषयीचं प्रेम, बुद्धाची करुणा आणि भेदाभेद अमंगळ म्हणणाऱ्या तुकोबांचा वारसा. मात्र मानवी गुलामगिरीविरोधात, भेदाभेदाविरोधात एक शब्दही न उच्चारता जर केवळ प्रेम हा शब्द उच्चारला जात असेल, तर तो केवळ एक पोकळ शब्द ठरेल. प्रेम या भावनेचे ते कलेवर असेल. दलित पँथरच्या हृदयात मानव्याविषयीचे प्रेम होते, म्हणूनच त्यांनी ‘दलित’ या शब्दाच्या व्याख्येत सर्व शोषितांना सामावून घेतले, धर्म-अर्थ-राज्य या शोषणव्यवस्थानांही अधोरेखित केले. या व्याख्येच्या आधारेच जर समाजपरिवर्तनाच्या लढ्याची पुढची वाटचाल झाली असती, तर कदाचित आज देशासमोर जो धार्मिक राष्ट्रवाद, जातीय कट्टरतावाद उभा आहे, तो उभा राहिला नसता.

दलित पँथर्सच्या ‘दलित’ या शब्दाच्या व्याख्येला प्रमाण मानले असता, ‘जन’ शब्दाची व्याख्या ‘सर्व शोषित जनसमूह’ अशी होते. मात्र आजच्या संदर्भात त्यातही अधिक स्पष्टता असायला हवी, असे वाटते. कारण आज शोषित जनसमूहातलेच अनेक जण जातवर्णवर्गवर्चस्ववादी अशा उजव्या राजकारणात, सांस्कृतिक दहशतवादाच्या कट्टरतावादी विचारधारेत सामावलेले दिसतात. त्यामुळेच वर्तमानात कधी नव्हे, एवढी शोषक आणि शोषित यांचं स्वरूप स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

इथल्या प्रस्थापित वैदिक, ब्राह्मणी वर्चस्वावर आधारित जातवर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने ज्ञानाची, पौरोहित्याची, प्रमाण भाषेची मक्तेदारी निर्माण केली. त्या मक्तेदारीच्या आधारे शोषण व्यवस्थांचा व्यूह रचण्यात आला आणि आता स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच सर्वंकष सत्ता हाती आल्यावर कट्टरतावादाचा, फॅसिझमचा एक भीषण चेहरा समोर आणला आहे. त्याविरोधात हे जनांचे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे.

त्यामुळेच इथे जनांची व्याख्या फॅसिझमला, कट्टरतावादाला विरोध करणारे जन अशी होते. पण इथे पुन्हा कोणत्या फॅसिझमला हे जन विरोध करत आहेत, भारतीय संदर्भात या फॅसिझमचे स्वरूप काय, हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाच्या उत्तरातूनच आजच्या या सांस्कृतिक संघर्षात कोणते जन कुठे उभे आहेत, हे स्पष्ट होईल. आजचा भारतातला फॅसिझम हा सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवादाच्या रूपात उभा आहे, हे खरे. पण सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद हीसुद्धा अकादमिक क्षेत्रातील व्यापक संज्ञा झाली. म्हणजे श्रीलंकेतील सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवाद यात फरक आहे. प्रत्येक देशातल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची मुळं ही तिथल्या सांस्कृतिक राजकारणात रुजलेली असतात. म्हणूनच या सांस्कृतिक राजकारणातला कोणता गट शोषक आहे आणि कोणता गट शोषित आहे, हे थेट सांगितल्याशिवाय आजच्या सांस्कृतिक संघर्षाला स्पष्टता येत नाही. जर्मनीतला नाझीवाद हा ज्यूंविरोधी असला तरी तो मुळात नार्डिक वंशाच्या, आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेवर आधारित होता. नाझीवाद म्हणताना त्यामागच्या या वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेचे स्मरण ठेवणे आवश्यक असते.

ब्राह्मणी प्रभुत्वावर आधारित वैदिक धर्माचे सांस्कृतिक वर्चस्व हे इथल्या सांस्कृतिक राजकारणाचे स्वरूप आहे.

वैदिकांचा हा सांस्कृतिक वर्चस्ववाद ‘अदरिंग’च्या प्रक्रियेतून, विशिष्ट समूहांना इतर ठरवण्याच्या प्रक्रियेतून जन्माला आला आहे. ‘आपण आणि ते’, ‘आपण आणि इतर’ अशी ही विभागणी आहे. या विभागणीवरच हा वैदिक सांस्कृतिक वर्चस्ववाद उभा आहे. वैदिकांचं हे अदरिंगचं तत्त्वज्ञान ‘पुरुषसुक्ता’च्या माध्यमातून व्यक्त होते. हे पुरुषसुक्त जसं ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे, तसंच ते यजुर्वेदात आणि इतर वैदिक संहितांमध्येही आहे. यावरून वैदिक विचारविश्वातील त्याचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट होते. षोडशोपचार पूजा करताना पुरुषसुक्तातील एकेक ऋचा म्हणून एकेक उपचार अर्पण करण्याची पद्धत रूढ आहे. म्हणजे आजही हे पुरुषसुक्त व्यवहारात प्रचलित आहे. वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उगम या पुरुषसुक्तात आहे.

पुरुषसुक्तामध्ये विश्वनिर्मिती कशी झाली, हे सांगताना मानवी समाजाची चार वर्णांमध्ये विभागणी केली आहे. विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहुंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र जन्माला आले, असे या सूक्तात सांगण्यात आले आहे. इथे मुखातून जन्माला आलेले ब्राह्मण श्रेष्ठ असे सगळ्या स्मृतीग्रंथांनी सांगितले आहे. शूद्रांनी पहिल्या तीन्ही वर्णांची सेवा चाकरी करायची, असेही स्मृतीग्रंथांमध्ये सांगितले आहे. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद या श्रुतीग्रंथांनी मानवी समुदायाची शरीरातील अवयवांच्या आधारे विभागणी केली आणि स्मृतीग्रंथांनी त्यातील उतरंड ठरवत विषमतावादी समाजरचनेची मांडणी केली. या मांडणीत प्रत्येक वर्णासाठी दुसरा वर्ण हा स्वपेक्षा वेगळा असा ‘अन्य’ आहे, इतरेजन आहे, स्वतःहून कमी दर्जाचा किंवा उच्च दर्जाचा आहे. म्हणजे ‘अदरिंग’ची प्रक्रिया, विशिष्ट जनसमूहांना ‘इतर’ ठरवण्याची प्रक्रिया हे वैदिक चातुर्वर्ण्याचं वैशिष्ट्य असून ते पुरुषसुक्ताच्या माध्यमातून उच्चारित झाले आहे.

वेदकाळातील या अदरिंगच्या प्रक्रियेने आधी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी समाजाची चार वर्णात विभागणी केली. नंतरच्या काळात कलियुगात ब्राह्मणांखेरीज सगळे शूद्र, असे सांगत ही अदरिंगची प्रक्रिया अधिक काटेकोर केली. आजही ही ‘अदरिंग’ची प्रक्रिया, इतर समूहांना ‘अन्य’ ठरवून, आपल्यापेक्षा हीन ठरवून त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आजच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाची मुळं या पुरुषसुक्तात आहेत.

म्हणूनच ‘जन’ची व्याख्या करताना वैदिक वाङ्मयाने पुरुषसुक्ताच्या माध्यमातून ज्यांना ‘अन्य’ ठरवून हीन लेखले, असे सर्व शूद्रजन आणि जे या वर्चस्ववादी विचारधारेला विरोध करतात, जे अब्राह्मणी-अवैदिक विचारधारा मानतात ते सर्व असे म्हणावे लागते. ‘जन’ ही संज्ञा व्याख्यांकित करण्याची तातडी यासाठी आहे की, त्याशिवाय सांस्कृतिक संघर्ष काय स्वरूपाचा आहे, याची स्पष्टता येत नाही.

विश्वोत्पत्तीची कथा सगळ्याच प्राचीन संस्कृतींमध्ये देण्यात आली आहे. पण कुठेच अशी जन्मजात विषमतेची मांडणी करणारी रचना आपल्याला आढळत नाही. भारतातील आदिवासी जनसमूहांमध्ये विश्वोत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. त्यातील कोरकू आदिवासींच्या मौखिक वाङ्मयातील कथा अतिशय विलक्षण आहे.

जेव्हा पृथ्वीवर कोणीच नव्हते, त्यावेळेस हुडिया-ओढा या अक्षय-वटाच्या पारावर देवतांची सभा भरली आणि त्या ठिकाणी मनुष्यप्राण्याची निर्मिती करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यासाठी लागणारी माती कशी मिळवायची? समुद्रकिनारी राहणाऱ्या दमिकदेवी जवळची माती आणण्यासाठी म्हणून कागभुशुंडजीची (कागलिया मासा) विशेष दूत म्हणून नेमणूक करण्यात आली. कागभुशुंडजीने माती आणण्याचे कबूल केले आणि प्रयाण केले. उड्डाण करत असताना अनेकदा त्याचे पंख झडले. अनेकदा तो थकला. थांबला पण पुन्हा त्याला पंख फुटले. अनंत अडचणींना तोंड देत मोठ्या प्रयासाने कागभुशुंडजी दीमकदेवीजवळ पोहोचला. त्याने देवीची प्रार्थना करून देवतांनी मनुष्यप्राणी निर्मितीसाठी मातीची मागणी केल्याचे सांगितले. दीमकदेवीने माती देण्याचे कबूल केले पण एक अट घातली. ती म्हणजे माझ्यापासून नेलेली माती मला परत करायची. परतबोलीची अट मान्य करून कागभुशुंडजीने देवतांना माती आणून दिली. देवतांनी त्या मातीच्या स्त्री आणि पुरुष अशा प्रतिमा केल्या आणि त्या सुकण्यासाठी म्हणून ठेवल्या, तर त्यांची पऱ्यांनी मोडतोड करून टाकली. रोजच असे घडायचे. देव कंटाळले. शेवटी त्या प्रतिमांच्या रक्षणासाठी देवांनी कुत्र्यांची नेमणूक केली. तेव्हा त्या प्रतिमा सुकल्या. त्यांच्यात मग देवांनी प्राणांची फुंकर घातली आणि मनुष्यप्राणी निर्माण झाला. कुत्र्याची आणि मानवाची मैत्री तेव्हापासूनची. मात्र दीमकदेवीपासून उधार आणलेली माती परत द्यायची राहून गेली, पण ती परत करणे आवश्यक होते. ती माती आजही मृत्युनंतर शवाच्या रूपाने आपण परत करतो, असा कोरकूंचा विश्वास आहे.

या कथेनुसार सगळ्याच मानवप्राण्यांची निर्मिती मातीपासून झाली आणि सगळेच समान आहे. स्त्री-पुरुषाच्या निर्मितीमध्येही कोणताच भेद नाही. विशषे म्हणजे कुत्र्याची निर्मिती आधीच झालेली आहे आणि कुत्र्याच्या संरक्षणातूनच मानवाची निर्मिती झाली आहे. त्यातूनच दोघांची मैत्री जमलेली आहे. या कथेतून आदिम साम्यवादाचे दर्शन घडते. जी माती द्यायची राहनू गेली, ती मृत्युनंतर शवाच्या रूपाने परत द्यायची, या धारणतेून आदिम समूहाची नैतिकताही अभिव्यक्त होते. एक निरागसता आपल्याला या कथेत जाणवते, त्याच वेळी मानवी शरीर म्हणजे अंतिमतः फक्त माती हे तात्त्विक भानही आढळते. विषमतामूलक विचारांची कुठचीच बीजं आपल्याला इथे आढळत नाहीत. हे आदिवासी साहित्य कधीच मुख्य प्रवाही वाङ्मयाचा भाग बनलं नाही. कारण इथल्या चातुर्वर्ण्य आधारित व्यवस्थेत आदिवासी कायम इतर, अन्य होते.

जन म्हणजे नेमके कोण, हे दलित-बहुजनवादी परिप्रेक्ष्यातून ठरवण्याचे आणखी एक कारण म्हणजे इथली वैदिक व्यवस्था जन म्हणजे शूद्र या स्वतःच्या व्याख्येबाबत कायम सजग असते. सध्या भोंग्यावरच्या अजानला प्रत्युत्तर म्हणून ‘हनुमान चालिसा’ म्हणण्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरे जे बोलताहेत ते सगळे योजनाबद्ध आहे. म्हणूनच अजानला प्रत्युत्तर म्हणून ‘हनुमान चालिसा’ का, वेदमंत्र का नाही? हा प्रश्न इथे आपण उपस्थित करायला हवा. भोंग्याला प्रत्युत्तर म्हणनू रस्त्यावर उतरण्याचे काम शूद्र जातींमधील तरुणच करणार आहेत. इथे उच्चजातीय तरुण रस्त्यावर उतरणार नाहीत. आणि शूद्रांना वेदमंत्र म्हणायचा अधिकार वैदिक संस्कृतीने दिलेला नाही. त्यामुळे इथे शूद्रांनी ‘हनुमान चालिसा’ म्हणायची आहे. म्हणजे भोंग्यावरून म्हटल्या जाणाऱ्या अजानला प्रत्युत्तर म्हणून कोणी नेमके काय म्हणायचे, याबाबत वैदिक संस्कृती दक्ष आहे.

पुरुषसुक्ताला, वेदप्रामाण्याला विरोध म्हणजे नास्तिक

अलीकडेच कोणाच्या तरी तक्रारीवरून पुणे इथे होणाऱ्या नास्तिक मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या एका सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना ते नास्तिक आहेत, त्यांना कधी मंदिरात जाताना पाहिलं आहे का, असे विधान केले. याचाच अर्थ आता समाजातले नास्तिक ही कट्टरतावादाचे लक्ष्य बनत आहेत. कट्टरतावाद अधिक तीव्र होत चालला आहे, याचंच हे लक्षण आहे. पण इथे ईश्वर न मानणाऱ्या नास्तिकांना लक्ष्य करणे एवढाच वैदिकांचा मर्यादित उद्देश नाही. सर्वसामान्यांच्या भाषेत जे देव मानतात, ते आस्तिक, तर जे देव नाकारतात, ते नास्तिक. पण वैदिक विचारविश्वात जे वेदप्रामाण्य मानतात ते आस्तिक आणि जे वेदप्रामाण्य मानत नाहीत ते नास्तिक असतात. वैदिक संस्कृती वेद हे अपौरुषेय मानते, म्हणजेच ते मानवाने निर्माण केलेले नाहीत, ईश्वराकडून आलेले आहेत, असे मानते. त्यामुळे वेदात जे सांगितले आहे, त्याला प्रश्न न विचारता ते जसे आहे, तसे स्वीकारणे म्हणजे वेदप्रामाण्य मानणे.

वैदिक संस्कृतीमध्ये जगाची उत्पत्ती, आत्म्याचं स्वरूप, जन्म-मृत्यु, मोक्ष, कर्म याविषयी काही मांडणी करण्यात आली आहे. यालाच रूढार्थाने वैदिक तत्त्वज्ञान म्हटले जाते. ही मांडणी करणारी तत्त्वज्ञानं, दर्शनं आहेत. यात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी सहा वैदिक दर्शनं आहेत, त्यांना ‘आस्तिक दर्शनं’ मानलं जातं. तर चार्वाक, बौद्ध आणि जैन या अवैदिक दर्शनांना ‘नास्तिक दर्शनं’ मानलं जातं. चार्वाक, जैन, बौद्ध ही तीन्ही दर्शनं वेदप्रामाण्य मानत नाहीत. त्यामुळे ती नास्तिक ठरतात.

सांख्य आणि पूर्वमीमांसा ही दर्शनं ईश्वराचं अस्तित्त्व नाकारतात, पण तरी त्यांचा समावेश आस्तिक मानलेल्या वैदिक षड्दर्शनात होतो. हा समावेश वैदिकांना नेमकं काय हवं आहे, हे स्पष्ट करतो. त्यांना ईश्वरापेक्षाही यज्ञयागाच्या रूपात असलेलं ब्राह्मणांचं वर्चस्व महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच यज्ञ निर्दोष पद्धतीने केला की, त्याचं फळ मिळणार, असं मानणारं पूर्वमीमांसा हे दर्शन आस्तिक होतं. म्हणजे इथे तुम्ही ईश्वर मानता की नाही, हे महत्त्वाचं नाही, तर यज्ञसंस्कृती मानता की नाही, वेदप्रामाण्य मानता की नाही, हे महत्त्वाचं आहे. वेदप्रामाण्य न मानणाऱ्यांची वैदिकांकडून व्यवहारात ईश्वर न मानणारे नास्तिक, अशी ईश्वराच्या नावाने हेटाळणी केली जाते. सर्वसामान्य लोकांसमोर नास्तिक म्हणजे ईश्वर न मानणारा पापी, दुराचारी मनुष्य अशी प्रतिमा निर्माण केली जाते. वैदिक संस्कृतीत ईश्वराचं अस्तित्त्व नाममात्र आहे.

ईश्वराने हे जग निर्माण केले असले, तरी जगाच्या चलनवलनाचा कायदा हा कर्मसिद्धान्त आहे. या जन्मी तुम्ही जे कर्म करता त्यावर आधारित तुम्हाला पुढच्या जन्माची सुखदुःखं मिळणार हा या कर्मसिद्धान्ताचा मूळ गाभा आहे. या कर्मसिद्धान्ताला धरूनच पापपुण्य, प्राक्तन या संकल्पना येतात. मानवी जगण्यामध्ये आज या संकल्पनांचा पगडा मोठा आहे. कर्मसिद्धान्ताचं तत्त्वज्ञान जगातील शोषण, विषमता कायम ठेवायला मदत करते. एखाद्यावर गरीब म्हणून, स्त्री म्हणून, दलित म्हणून जे अत्याचार होतात, त्यामागे मागच्या जन्मीचं पाप हे कारण आहे, असे एकदा मानले की, त्याविरोधात प्रश्न विचारला जात नाही, आहे ती व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. जनसमुदायाची वृत्ती ‘जैसे थे’वादी बनते. शोषकांना, सत्ताधाऱ्यांना हीच ‘जैसे थे’वादी वृत्ती हवी असते. भारतात शतकानुशतकं जातव्यवस्था टिकून राहिली, स्त्रीशूद्रांचं शोषण होत राहिलं, ते याच कर्मसिद्धान्तातून येणाऱ्या शैथिल्यामुळे.

वैदिकांनी ब्राह्मणांचं, यज्ञयागाचं महत्त्व वाढवून त्यालाच ईश्वरभक्तीचं, श्रद्धेचं आवरण देत आपल्याला कोणीही प्रश्न विचारणार नाही, अशी साये केली आहे. त्यामुळेच ज्यांनी ज्यांनी कर्मसिद्धान्ताला, यज्ञयागानं आणि श्रद्धा-अंधश्रद्धांना आव्हान देत प्रश्न विचारले, मग ते चार्वाक असतील, तुकाराम असतील किंवा दाभोलकर-पानसरे असतील त्यांची हेटाळणी केली गेली. आज शरद पवारांवरही जो नास्तिक म्हणून आरोप केला जातो आहे, तो ते ईश्वर मानतात की नाही, यापेक्षा ते यज्ञयाग, कर्मसिद्धान्त हा वैदिक तत्त्वज्ञानाचा गाभा मानत नाहीत, यासाठी केला जात आहे. जो कोणी विवेकवादी असेल, बुद्धवादी असेल त्याला नास्तिक म्हणून दुर्जनाच्या रूपात उभे केले जात आहे.

दास कोण होते? दासी कोण होत्या?

एखाद्या संस्कृतीचं स्मरणंही राहिलं नाही आणि तिचं अनुसरणंही उरलं नाही की, ती संस्कृती नष्ट हेते, असा एक महत्त्वाचा सिद्धान्त इरावती कर्वे आपल्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात मांडतात. यासाठी त्या टॅस्मिनिया आणि ईश्टर येथील संस्कृतींचं उदाहरण देतात. पॅसिफिक महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस टॅस्मेनिया हे बेट आहे. त्याचा शोध लागल्यावर युरोपियनांनी तिथल्या लोकांची शिकार करून त्यांना नष्ट केले. अर्थातच ती संस्कृती शारीरिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे खंडित झाली. पॅसिफिक महासागरालगतच्याच ईश्टर बेटावर मात्र वेगळे घडले. तिथली संस्कृती समृद्ध होती. दगडातून घडवलेले पुतळे तिथे होते. त्यावर त्यांची भाषाही लिहिलेली होती. तिथे पोहोचलेल्या युरोपियनांनी सरसकट सगळ्या लोकांना मारलेही. मात्र तिथल्या धर्मगुरूंना मारून तिथल्या लोकांचा धर्म बदलला. आज बेटावर ती लोकं राहताहेत, पण त्यांना त्यांच्या जुन्या प्रथा-परंपरांचं स्मरण नाही. बेटावरचे पुतळे कोणी व का बनवले, ते कोणालाही सांगता येत नाही. कारण ज्यांना जुन्या प्रथा परंपरा माहीत होत्या, ज्यांनी लिपी जतन केली होती, त्या धर्मगुरूंनाच मारून टाकल्यामुळे आज पूर्वीचं स्मरणंही राहिलं नाही आणि त्यामुळे परंपरांचं अनुसरणंही राहिलं नाही.

स्त्रीप्रधान धर्माच्या बाबतीत, मातसृत्तेच्या बाबतीतही नेमकं हेच झालेलं आहे. ख्रिस्तपूर्व काळातील स्त्रीप्रधान धर्म नष्ट करण्यासाठी चर्चने देवतांच्या पुजारणींना ‘विच’ ठरवून त्यांना ठार मारण्याची मोहीम उघडली होती, हा इतिहास फार जुना नाही. युरोपातील तेरा ते सोळा ही चार शतकं ‘विच हन्टिंग’साठी प्रसिद्ध आहेत. या काळात युरोपात अनेक मूतीर्पूजक पुजारीण स्त्रियांना, सुईणीचं, औषधोपचाराचं ज्ञान असलेल्या वैद्य स्त्रियांना चेटकिणीचा, डाकिणीचा आरोप ठेवून ठार मारण्यात आलं. आजही जगभरातल्या आदिवासी समाजांमध्ये ही प्रथा आढळते. मातसृत्तेतल्या पुजारणींनाच नष्ट केलं की, तो धर्म संपतो.

भारतीय संदर्भात मातृसत्ता आणि पुरुषसत्ता यांच्यातील संघर्षाचा, स्त्रीदेवता आणि पुरुषदेवता यांच्यातील युद्धाचा काळ म्हणजे ऋग्वेदाच्या घडणीचा काळ. मातृसत्तेची निर्मिती असलेल्या निर्ऋतीला ऋग्वेदात सातत्याने अघोर ठरवण्यात आले आहे, तीला मृत्युची देवता मानण्यात आले आहे. उषा आणि इंद्र यांच्यातील संघर्षाचा स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात आहे. दस्यू असलेल्या नमुचि राजाकडे स्त्रीसेना होती आणि इंद्र या स्त्रीसेनेविरुद्ध लढला, याचा ऋग्वेदात स्पष्ट उल्लेख आहे. ऋग्वेदात पानोपानी आर्य आणि दस्यू यांच्यातील संघर्षाचे उल्लेख आहेत. आपल्या ‘लोकायत’ या ग्रंथात देवीप्रसाद चट्टोपाध्याय मातृसत्ता आणि पुरुषसत्ता यामध्ये वैदिक काळी झालेल्या या संघर्षाला अधोरेखित करताना सांगतात, प्राचीन भौतिकवादी सर्व निर्मिती स्त्रीमुळे होते, असे मानतात.

म्हणून ते धरित्रीला स्त्री मानतात. स्त्रीत्वाला प्राधान्य देत देवत्वाची संकल्पना स्त्रीमध्ये करतात. या प्राचीनांच्या भौतिकवादात शेतीला नुकताच आरंभ केलेल्या मातृसत्ताक समाजाचे मन प्रतिबिंबित झालेले दिसते. वैदिक आर्य हे गोपालन अवस्थेतील भटके जीवन जगणारे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधी होते. आर्यांचे प्रमुख देव पुरुष आहेत. याउलट आर्यपूर्व भारतातील प्राचीन कृषी समाजात विकसित झालेल्या स्त्रीप्रधान संस्कृतीत देवीसंप्रदायाचा उगम झाला. स्त्री हे विश्वाचे निर्मितीकेंद्र आहे, अशी या समाजाची धारणा होती. मानवी मनाच्या विकासक्रमात धर्म-ईश्वर-भक्ती या कल्पना बऱ्याच नंतर येतात. प्रारंभीच्या काळात सर्व व्यवहार यातुकल्पनेवरच अधिष्ठित झालेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभकाळात माणूस आपल्या कामनापूर्तीसाठी ईश्वर अगर तत्सम शक्तींना शरण जात नाही, तर आपल्या यातुसामर्थ्यावर त्याची पूर्ण श्रद्धा असते. वैदिक विधींमध्ये पुरुषप्रधान टोळ्यांचं जीवन प्रतिबिंबित झालेले आहे, तर विविध व्रतांमध्ये मातृप्रधान कृषिसंस्कृती दिसून येते. व्रतांचं उद्दिष्ट हे कृषिविषयक समृद्धी आहे, तर वैदिक आर्यांचं सामगान हे पशुधनाच्या प्राप्तीसाठी आहे. ही मांडणी करत असतानाच पशुपालन अवस्थेतील समाजाचा पुरुषप्रधान चिंतनाशी आणि कृषिप्रधान अवस्थेतील समाजाचा स्त्रीप्रधान चिंतनाशी काही संबंध आहे का, असा प्रश्नही ते उपस्थित करतात.

रॉबर्ट ब्रिफँ (Robert briffualt), एहरनफेल यासारख्या मानववशं शास्त्रज्ञांनी स्त्री हेच प्राथमिक मानवाच्या सामाजिक संघटनेचे केंद्र होते, हे दाखवून दिले आहे. शेतीचा शोध स्त्रीनेच लावला, यासंदर्भातील मांडणी करण्यात आली आहे. सिंधु नदीच्या खोऱ्यापासून ते नाईल नदीपर्यंत प्राचीन स्त्रीदेवतांचे अवशेष उत्खननात उपलब्ध झाले आहेत. भारतातील शक्ती संप्रदाय आणि मध्य आशियातील देवी संप्रदाय यांच्यात विलक्षण साम्य आहे. आपल्या ‘मदर्स राईट इन इंडिया’ या ग्रंथात एहरनफेल भारतातच मातृसत्ताकाची प्रथम निर्मिती झाली, असे म्हणतो. इथूनच ती संस्कृती मध्य आशिया, इजिप्त या देशांमध्ये गेली, असे त्याचे म्हणणे आहे. भारतातच मातृसत्तेचा उगम झाला, हे एहरनफेलचे म्हणणे विवाद्य असले तरी पुरुषसत्तेच्या अनेक प्रयत्नांनंतरही भारतात मातृसत्तेचे अवशेष शिल्लक राहिल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. भारतीय ग्रामीण जीवनात आजही मातृदेवतांचा, ग्रामदेवतांचा प्रभाव आहे.

अनार्य मातृसत्ताक पद्धती नाहीशी करण्यात आर्य पुरुषसत्तेला यश आले असले तरी त्याचे अवशेष शिल्लक आहेत. इरावती कर्वे यांच्या स्मरण-अनुसरण या मांडणीप्रमाणे भारतीयांच्या भावविश्वात मातृसत्ताकालीन प्रथांचं स्मरण राहिलेलं नसलं तरी त्याचं अनुसरण शिल्लक राहिलेलं आहे.

भारतातील हा दोन संस्कृतींमधला संघर्ष ऋग्वेदकाळी घडून आलेला आहे. तो वरकरणी आर्य आणि अनार्य असा असला तरी मुळात ते मातृसत्ताक अनार्य आणि पुरुषसत्ताक आर्य असा होता, हे आपल्याला देवाप्रसाद चट्टोपाध्याय, दामोदर कोसंबी, शरद् पाटील, आ.ह. साळुंखे यासारख्या प्राच्यविद्येच्या अभ्यासक विद्वानांनी दाखवून दिले आहे. विशेषतः शरद् पाटील यांनी मातृसत्ताक वेदपूर्वकाळ आणि पितृसत्ताक वेदकाळ यातील संघर्षाची मांडणी करत या काळातील सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास लिहिला आहे. मातृपूजा अवैदिकांपासून वैदिकांनी स्वीकारली होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आपल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात सांगतात. अर्थात मातृसत्ता लोप पावल्यावर पुरुषप्रधान समाजात उरणारी मातृपूजा ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपात शिल्लक राहाते.

वेदपूर्वकाळातील मातृसत्ता ही दस्यूंची होती. मातृसत्तेत गणमाता या गणांच्या अधिपती होत्या. गणांमध्ये जमिनीचं, अन्नधान्याचं समान वाटप करण्याचं काम त्या करत होत्या. आर्यांबरोबरच्या संघर्षात त्या प्रत्यक्ष इंद्राशीही लढायला उभ्या राहिल्या. ऋग्वेदात इंद्र आणि वृत्र यांच्यातील युद्धाचं वर्णन आहे. या युद्धात वृत्र खाली पडतो, तेव्हा त्याला वाचवायला त्याची माता दनू पुढे येते, त्याच्यावर ओणवी उभी राहाते. त्या वेळी इंद्र तीच्यावरही वार करतो. दनूसंदर्भात वैदिक आणि पौराणिक साहित्याचे अभ्यासक आ.ह.साळुंखे आपल्या ‘बळीवंश’ या पुस्तकात दनूचे पुत्र ते दानव या वैदिक वाङ्मयातील कथनाची चिकित्सा करत त्यावर टीका करतात.

वैदिक कथांनुसार दिती आणि अदिती या कश्यपाच्या पत्नी होत्या आणि त्यांना कश्यपापासून दैत्य आणि आदित्य हे पुत्र झाले. तसेच दनू, विनता आणि कद्रू याही कश्यपाच्या पत्नी होत्या आणि त्यांना कश्यपापासून दानव, गरुड आणि नाग हे पुत्र झाले. अनार्यांना, प्राचीन गणमातांना आर्य समूहात सामील करून घेताना या अशा पुराणकथा रचण्यात आल्या. या अशा कथांमागचा उद्देश आ.ह. साळुंखे स्पष्ट करतात. ते सांगतात, अशा रीतीने वेगवेगळ्या संप्रदायांनी प्रजापती, ब्रह्मदेव, कश्यप, विराट पुरुष इत्यादींना आदिपुरुष मानून विविध जनसमूह ही त्याचीच अपत्ये असल्याची वर्णने केली आहेत.

या कथा कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या वातावरणात लिहिल्या गेल्या, त्या लिहिणाऱ्यांचे हितसंबंध आणि हेतू काय होते, ते लोकांना काय संदेश देऊ पाहात होते आणि त्यांना कोणत्या प्रकारची समाजरचना निर्माण करायची होती, हे सगळे नीट तपासून घेणे गरजेचे आहे. मातृसत्तेची प्रतीनिधी असणारी दनू वैदिक वाङ्मयात केवळ देवांशी भांडणाऱ्या दानवांची दुर्लक्षित माता म्हणून शिल्लक राहते, यामागचे सांस्कृतिक राजकारण नीट लक्षात घ्यायला हवे.

वसाहतकाळात काही ब्रिटिश इतिहासकारांनी ऋग्वेदातील वर्णनांच्या आधारे आर्य आक्रमणाचा सिद्धान्त मांडला. भारतातल्या वैदिक राष्ट्रवादी अभ्यासकांनीही युरोपियनांशी स्वतःची नाळ जोडत तो स्वीकारला. लोकमान्य टिळकांनी तर ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’ या आपल्या ग्रंथात आर्य मूळचे उत्तर ध्रुव या प्रदेशातले असून ते तिथून इथे आले, अशी मांडणी केली आहे. इतरही अनेक अभ्यासकांनी वेगवेगळी मांडणी करत, मोहंजोदरो-हरप्पा येथील उत्खननात सापडलेल्या गोष्टींच्या आधारे आर्यांनी सिंधुभूमीवर आक्रमण केले, हा सिद्धान्त मांडला. सुरुवातीला ज्या सिद्धान्ताचं वैदिक अभ्यासकांनी आनंदाने स्वागत केले, तोच सिद्धान्त त्यांच्या नंतरच्या सांस्कृतिक राजकारणाला अडचणीचा वाटू लागला. कारण या सिद्धान्ताच्या आधारे आर्य हे या देशात बाहेरचे, उपरे ठरतात. त्यामुळे आता एकेकाळी आपणच स्वीकारलेल्या या सिद्धान्ताला विरोध करून आर्य हे इथलेच कसे होते, हे सिद्ध करण्याचा एक उलटा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यासाठी इतिहासापासून ते पुरातत्त्वशास्त्रापर्यंत आणि नवीन सुरू असलेल्या उत्खननांपर्यंत सगळ्याच बाबींचा हेतूपूर्वक उपयोग केला जात आहे. रोमिला थापर यांच्यासारखे काही डावे इतिहासकारही आर्य आक्रमण न म्हणता ‘आर्य स्थलांतर’ असे म्हणत आहेत.

आर्यांचे आगमन झाले असेल किंवा त्यांनी स्थलांतर केले असेल. इथल्या जनांच्या दृष्टीने ते फारसे महत्त्वाचे नाही. आर्य कोण होते, या प्रश्नापेक्षा आर्यांनी ज्यांचा पराभव केला, ते दास कोण होते, त्या दासी कोण होत्या, हा प्रश्न इथल्या जनांसाठी महत्त्वाचा आहे. ऋग्वेदात जी युद्धांची वर्णने आहेत, इंद्राने ज्या दस्यूंच्या हत्या केलेल्या आहेत, दस्यूंची नगरं फोडलेली आहेत, ते दस्यू कोण होते? आज त्यांचे वंशज कोण आहेत? ऋग्वेदापासून ते महाकाव्यांपर्यंत अनेक दासींचे उल्लेख येतात. या दासी एकमेकांना भेट म्हणून दान दिल्या आहेत. या दासी कोण होत्या? इथेल जन ज्यांना वैदिकांनी कायम शूद्र लेखलं आणि दूर लोटलं, ज्यांना वेदाध्ययनाचा, वेदमंत्रांचा अधिकार दिला नाही, ते कोणाचे वंशज आहेत? हे सगळे प्रश्न विचारण्याची गरज आहे. आम्हाला आर्यांशी खरोखरच काही देणं-घेणं नाही, पण या भूमीवरचा आमचा इतिहास काय, हा आमच्या चिंतनाचा विषय आहे. कश्यपाची पुराणकथा आम्ही मान्य करणार नाही, आम्हाला आमचा इतिहास शोधायचा आहे, हे आता इथल्या जनांनी सांगणे गरजेचे आहे.

इतिहासाचे विकृतीकरण आणि पुनर्लेखन

‘सेपिअन्स’ या ग्रंथात युव्हाल नोआ हरारीने दक्षिण आफ्रिकेतील झुलुंच्या संदर्भात माहिती दिली आहे. एकोणिसाव्या शतकात झुलु जमातीतील बहुसंख्य लोक झुलु सुवर्ण काळाच्या कथनाने प्रभावित होते. झुलु जमातीचा एक सुवर्ण काळ होता, जेव्हा सगळ्या क्षेत्रात झुलुंनी प्रावीण्य मिळवलेले होते, त्यांचे सभोवतालच्या जगावर वर्चस्व होते, अशी त्यांची भावना होती. यातील विसंगती सांगताना हरारी सांगतात की, या झुलुंपैकी अनेक जण हे अशा जमातींचे वंशज होते, ज्या प्रत्यक्षात इतिहासामध्ये झुलु साम्राज्याविरोधात लढलेल्या होत्या. झुलुंच्या वर्चस्वाविरोधात त्यांनी संघर्ष केला होता. पण झुलुंनी त्यांचा पराभव केला आणि पराभवानंतर हिंसाचाराच्या माध्यमातून या जमातींना अंकित करण्यात आले आणि आता त्याच जमाती काही शतकांच्या प्रवासानंतर आपला भूतकाळ विसरुन झुलु जमातीचं वर्चस्वगान गात आहेत, सुवर्णकाळाच्या मिथकाचं स्वतः गौरवीकरण करत आहेत.

याचाच अर्थ असा की झुलुंच्या विरोधात लढणाऱ्या जमातींची दैवतं, त्यांचे वीरयोद्धे हे सगळं सामीलीकरणाच्या प्रक्रियेत पुसून टाकण्यात आलं किंवा त्यांचं अशा पद्धतीने राक्षसीकरण करण्यात आलं, की तो आपला वारसा आहे, असं आज त्या झुलुंविरोधात लढणाऱ्या जमातींच्या वंशजांना सांगता येत नाही. त्यांचं ते स्मरण पुसलं गेलं आहे आणि स्मरण नाही त्यामुळे अनुसरणही नाही.

इथल्या अवैदिकांपैकी काहींची अवस्था आज झुलु जमातीसारखी असली तरी किमान काहींना तरी आपली मुळं वेगळी आहेत, आपला इतिहास वेगळा आहे, याची जाणीव आहे. म्हणूनच आजही पुरुष सहचराविना असणाऱ्या मातृदेवतांची स्थानं देशभर पसरलेली आहेत. इथल्या वैदिक संस्कृतीने वामनरूपातल्या विष्णुला देवत्व दिले तरी इथल्या सर्वसामान्यांनी ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणत वामनाने पराभूत केलेल्या बळीराजाची स्मृती जपली आहे.

वामन आणि बळी हे जे द्वैत आहे आणि या द्वैतामधील जे विविध संघर्ष आहेत तेच भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये आणि पुनर्लेखनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतात. इतर कोणत्याही संस्कृतीत न आढळणारी अशी अभूतपूर्व सरमिसळ भारतीय संस्कृतीत आहे. परस्परविरोधी विचार मांडणारे नाना संप्रदाय आहेत, पंथ आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे साहित्य आहे. रचना आहेत. अलीकडच्या काळातील वारकरी साहित्यानेच शूद्र, अतिशूद्र, मुस्लीम अशा सगळ्या प्रवाहांना सामावून घेत अभंगरचनांचं भांडार निर्माण केलं. पण वारकरी संतांनी जो समतावाद मांडला, त्याच्या विरोधात ब्राह्मणी प्रभुत्वावर आधारित जातवर्णवर्चस्ववाद उभा आहे. आजही हा जातवर्णवर्चस्ववाद वेगवेगळ्या प्रकारे इतिहासाची मोडतोड करून इथल्या बहुजनांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते राजमाता जिजाबाईंचं चारित्र्यहनन करणारं जेम्ल लेन प्रकरण असो किंवा अलीकडेच रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार टिळकांनी केला, हा राज ठाकरे यांनी केलेला दावा असो. सातत्याने इतिहासाचे विकृतीकरण केले जाते. बळीला मारणाऱ्या वामनाची, पृथ्वी एकवीस वेळा निःक्षत्रिय करणाऱ्या परशुरामाची पूजा वेगवेगळ्या पौराणिक कथांच्या माध्यमातून इथल्या बहुजनांवर लादली जाते. या अशा वातावरणात कोणता इतिहास प्रमाण मानायचा? शोषितांचा की शोषण करणाऱ्यांचा? हा प्रश्न उपस्थित होतो.

इतिहासकार इ.एच.कार सांगतात, ‘इतिहासातून शोध घेणे ही एकतर्फी प्रक्रिया नसते. भूतकाळाच्या अनुषंगाने वर्तमान जाणनू घेणे म्हणजचे वर्तमानाच्या अनुषंगाने भूतकाळ जाणून घेणे असते. इतिहासाचा अर्थ ‘असे असे घडले’ असा असला तरी भूतकाळात नेमके काय घडेल आणि कसे घडले, हे सांगताना त्या सांगणाऱ्या व्यक्तीची विचारसरणी, तिचा धर्म, तिचा वर्ग, तिची जात, तिचं लिंग, तसंच तत्कालिन राजवट आणि त्या राजवटीची ध्येयधोरणं या सगळ्याचा प्रभाव त्या कथनावर असतो.’

इतिहासाचा नव्याने अर्थ लावताना किथ जेकिन्स हा इतिहासतज्ज्ञ सांगतो, ‘इतिहास आणि भूतकाळ या एकच गोष्टी नाहीत. इतिहासाचा नेहमी काही ना काही हेतू असतो. इतिहासाचा संबंध सत्तेशी असतो. इतिहास हा कधीही भोळा, निरागस, निष्पाप नसून तो विचारधारापोषक आणि पोषित असतो.’ या अशा स्थितीत इतिहास लेखन आणि पुनर्लेखन ही प्रक्रिया धर्मजातवर्गवंशलिंग यांच्या वर्चस्ववादी राजकारणाने प्रभावित होत असते. यात अनेक सोयीच्या गोष्टी प्रबळ ऐतिहासिक पुरावा नसतानाही रेटून सांगितल्या जातात. किंवा काही सोयीच्या नसलेल्या गोष्टी पुरावा असतानाही दुर्लक्षित ठेवल्या जातात. अभिजनांचं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी इतिहास कथनाचा वापर केला जातो. अशा वेळी शोषित समूहाची अस्मिता आपल्या दडपलेल्या इतिहासाचा शोध घेत इतिहास-पुनर्लेखनाची मागणी करते. यातून पर्यायी इतिहासलेखन केले जाते.

भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या प्रशासकीय गरजांतून आणि त्यांच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून त्यांनी भारताचा इतिहास लिहायला घेतला. त्याला साम्राज्यवादी इतिहासलेखन म्हटलं जातं. या साम्राज्यवादी इतिहासलेखनाला प्रत्ङ्मुत्तर म्हणून इथल्या स्वसंस्कृतीप्रेमी अभिजनांनी राष्ट्रवादी प्रेरणेतून इतिहासलेखन केले. पण इथल्या राष्ट्रवादी इतिहासलखेनातून शोषित जनांचा, शूद्रातिशूद्रांता इतिहास अदृश्य होता. म्हणनू इथल्या शोषित जनांमधील धुरिणांनी पर्यायी इतिहासलेखनाला सुरुवात केली. याची ठळक सुरुवात म. जोतीराव फुले यांच्यापासून झाली. जोतीरावांनी लिहिलेला ‘शिवरायांचा पोवाडा’ खरं तर शालेय अभ्यासक्रमात लावायला हवा होता. पण हा पोवाडा, हे पर्यायी इतिहासलेखन आजही दुर्लक्षित आहे. फुलेंप्रमाणचे केळुस्कर, रामस्वामी पेरियार, बाबासाहेब आंबेडकर, दामोदर कोसंबी, देवीप्रसाद चट्टापेाध्याय, प्र.रा. देशमुख, शरद् पाटील, आ.ह. साळुंखे, उमा चक्रवर्ती, गेल ऑम्वेट यांनीही इथल्या दलित-बहुजनांच्या बाजूने पर्यायी इतिहासलेखन केले आहे.

पर्यायी इतिहासलेखनाकडे येण्याआधी अभिजनवादी इतिहास कशा पद्धतीने लिहिला गेला, याचं एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. इतिहास दडपणे म्हणजे काय, हे त्यातून लक्षात येते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव पुरोगामी विचारविश्वातही आदराने घेतले जाते. आपल्या ‘हिंदूधर्माची समीक्षा’ या ग्रंथात शास्त्रीजी ब्राह्मणवरिष्ठत्व व शूद्रदास्य हा आर्यांच्या समाजसंस्थेचा महत्त्वाचा भाग होता, अशी स्पष्ट मांडणी करतात. तेच शास्त्रीजी आपल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात आपल्या लेखनामागचा उद्देश स्पष्ट करताना सांगतात, ‘येथे केवळ उच्च ध्येयभूत किंवा आदर्शरूप परंपरेचा, तत्त्वांचा आणि विचारांचा विकास दाखविणे एवढाच प्रतिपादनामागचा हेतू आहे. हीनोच्च परंपरांचा सर्वांगीण इतिहास सांगणे हा इथे मुख्य उद्देश नाही.’

थोडक्यात शास्त्रीजींना वैदिक संस्कृतीचा विकास मांडताना केवळ आदर्शरूप परंपरा आणि त्या परंपरांमधून विकास पावणारा विचार मांडायचा आहे, वैदिक धमार्तील हीन परंपरांचा विकास मांडायचा नाही. इथे एका गोष्टीसाठी शास्त्रीजींचे आभार मानले पाहिजेत. एक तर ते स्पष्टपणे सर्वांगीण इतिहास सांगणे, हा आपला उद्देश नाही, असे सांगतात आणि त्याच वेळी हीन परंपरा आणि त्यांचा इतिहास अस्तित्वात आहे, याचीही कबुली देतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

पर्यायी इतिहासलेखन या हीन परंपरा कोणत्या हे समाजासमोर आणते. वेगवेगळे स्मृतीग्रंथ शूद्रांविषयी आणि शूद्र स्त्रियांविषयी काय बोलतात, याची अगदी मोजकी उदाहरणे पाहिली तरी शास्त्रीजी कोणत्या हीन परंपरा दडवतात, ते लक्षात येईल. स्मृतीग्रंथांमध्ये कोणते विवाह शास्त्रसंमत आहेत आणि कोणते विवाह शास्त्रसंमत नाहीत, हे सांगताना ‘अनुलोम-प्रतिलोमा’ची पद्धत सांगितली आहे. अनुलोम विवाह हे शास्त्रसंमत आहेत. यात वरिष्ठ जातीच्या पुरुषाने कनिष्ठ जातीच्या स्त्रीशी विवाह केला असता, तो मान्य होतो. अनुलोमाच्या निकषाने ब्राह्मण वर्णाच्या पुरुषाला ब्राह्मण वर्णाच्या स्त्रीसह क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा उर्वरित तिन्ही वर्णांच्या स्त्रियांशी संबंध ठेवता येत होता. त्याल मान्यता होती. क्षत्रियाला क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णातल्या स्त्रियांशी, तर वैश्याला वैश्य आणि शूद्र वर्णातल्या स्त्रियांशी संबंध ठेवता येत होता. शूद्राला मात्र त्याच्या वर्णाबाहेरच्या स्त्रीशी विवाह करता येत नव्हता. कारण तो शास्त्रानुसार प्रतिलोम विवाह ठरतो. वरच्या वर्णाच्या स्त्रीशी खालच्या वर्णातल्या पुरुषाने विवाह करणे म्हणजे प्रतिलोम विवाह. हा प्रतिलोम विवाह शास्त्रकारांनी पूर्णतः निषिद्ध मानला आहे. म्हणजेच प्रतिलोमात ब्राह्मण स्त्रीशी उर्वरित तीन वर्णातील पुरुष विवाह करू शकत नाहीत. तसेच क्षत्रिय स्त्रीशी वैश्यय आणि शद्रू विवाह करू शकत नाहीत. अनुलोम-प्रतिलोमाच्या माध्यमातून उच्चवर्णिय स्त्रिया इतर वर्णाच्या पुरुषांसाठी अनुपलब्ध असतानाच ब्राह्मण पुरुषाला सगळ्या स्त्रिया उपलब्ध आणि शूद्र वर्णाच्या पुरुषाला शूद्र वर्णाची स्त्री वगळता सर्व स्त्रिया अनुपलब्ध. त्याच वेळी शूद्र वर्णाची स्त्री मात्र सर्व वर्णाच्या पुरुषांना उपलब्ध अशी चलाखी करण्यात आलेली आहे. थोडक्यात अनुलोम-प्रतिलोमाची ही मांडणी ब्राह्मण पुरुषाला सर्वाधिकार देणारी तर शूद्र स्त्रियांचा अवमान करणारी आहे. अनुलोम-प्रतिलोमाच्या या मांडणीबरोबरच शूद्र वर्णाच्या स्त्रियांबाबत वेगवेगळ्या स्मृतीग्रंथांमध्ये अतिशय हीन उद्गार काढण्यात आले आहेत.

१. कृष्णवर्णाची जी रमणी असते, ती फक्त भोगण्यासाठी असते, धर्मासाठी नसते.

(वसिष्ठस्मृती, १८.१८)

२. स्त्रीला प्रथम सोम, गंधर्व व अग्न हे तीन दैवी पती भोगतात आणि मग तिला मानवी पती प्राप्त होतो.

(वसिष्ठस्मृती, २८.५.६)

३. ब्राह्मण वर्ण म्हणजे अग्नी (वसिष्ठस्मृती, ३०.२.३)

४. उच्चकुलीन पुरुषांची भोगसेवा करणं हीन जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही (मनुस्मती, ८.३६५)

५. अक्षमाला ही हीनजातीय स्त्री वसिष्ठाशी आणि शारंगी ही हीनजातीय स्त्री मंदपाल मुनींशी संयोग झाल्यामुळे पवित्र झाल्या. अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरला आहे. (मनुस्मृती, ९.३३.२५)

अशी अनेक विधानं आहेत. हे उल्लेख इतके लाजीरवाणे आहेत की, यावर अधिक काय बोलावे? पर्यायी इतिहासलेखन झाले नसते तर ती हीनवृत्ती आजच्या बहुजनांसमोर आली नसती. आजही ‘मनुस्मृती’ आणि इतर स्मृतीग्रंथ पुजनीय मानणाऱ्यांनी या अशा उल्लेखांचे स्पष्टीकरण द्यावे, एवढी माफक अपेक्षा करायला हरकत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा