बालबुद्धी विद्ध्वंसकांच्या हातामध्ये समाजाच्या भवितव्याची सूत्रं नकळतपणे सुपूर्त होत असतात, कारण हा बेसावधपणाचा काळ असतो, काळरात्रीची सुरुवात असते...
पडघम - साहित्य संमेलन विशेष
भारत सासणे
  • संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि उदगीर संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष ९५वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उदगीर 95th A. B. Marathi Sahitya Sammelan संमेलनाध्यक्ष Sammelanadhyaksha साहित्य संमेलन Sahitya Sammelan भारत सासणे Bharat Sasne

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून उदगीर, जिल्हा लातूर इथं सुरू झालं आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथा-कादंबरीकार भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा तिसरा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

वृत्तीगांभीर्याने लेखन करणाऱ्या चिंतनशील लेखकाला साहित्यांतर्गत आणि साहित्यबाह्य विषयांबाबतसुद्धा काहीएक चिंतन मांडावं लागतं आणि काहीएक चिंता व्यक्त कराव्या लागतात. या चिंता प्रातिनिधिकदेखील असू शकतील आणि म्हणून त्या मी तुम्हा रसिकजाणकारांसमोर विचारार्थ ठेवत आहे.

आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलीकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल, तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे, हे पाहिलं पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावं लागेल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मुख्य म्हणजे ‘सामान्य माणसा’बाबतचं कोणतं आकलन आपल्या लेखकाला झालं आहे हा प्रश्न तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही ‘प्रेयस आणि श्रेयस’ यामध्ये अडकला आहे. तो सत्य म्हणजे काय, याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरीत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा अभ्यास करत नाही, असं निरीक्षण आहे. सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दुःखाचा परिहार कसा होणार, हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. पण असा कोणी मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. द्रष्ट्या कवींनी ती उद्याची पहाट उजाडेल असा दिलासा जरी दिला असला, तरी त्याचबरोबर तीव्र उपहासदेखील नोंदवलेला आहे, कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो. वाट पाहणं केवळ या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आहे. तो भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची आपण वाट पाहतो आहोत. या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी कथा अस्त{त्त्वात येण्याची आवश्यकता आहे.

एक विचित्र अशी घटना घडलेली आहे. साहित्याच्या परिघामध्ये एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. व्यक्तिगत पातळीवर अनेकांची टिंगल-टवाळी कोणी करत असेल तर त्याबाबत फारशी चिंता बाळगण्याचं कारण नसतं, कारण ही वैयक्तिक मतं असतात. मात्र परप्रकाशित, परभृत, इतरांच्या प्रभावळीतील सामान्य अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथित तुच्छतावाद आणि प्रदूषण पसरवत राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरुचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमानदेखील होतो, याची दखल सहसा घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून मराठी साहित्याचं आपण काही नुकसान करतो आहोत, याची त्या अनुयायांना जाणीव नसते कारण, काहीएक बौद्धिक विकृती त्यांच्या ठायी निर्माण झालेली असते. ज्येष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांनी या संदर्भात उघडपणे नाराजी प्रकट केलेली आहे. पण हा अपवाद वगळता या तुच्छतावादाबाबत बोलणं टाळलं जातं, हा चिंतेचा विषय.

मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेलं, निरस असं झाल्याचं दिसतं आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरात ढकलून दिलं. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अदभुतरसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात, असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. त्याउलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुलं पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी आणि अरसिक अशी निपजतात.

एखादा समाज किंवा संस्कृती नष्ट करायची असेल तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट केली पाहिजे, हा दुष्ट विचार इतिहासकालापासून सर्वत्र आढळतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतीची ग्रंथालयं नष्ट केली आहेत. आपण मात्र स्वतःच आपली ग्रंथालयं स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिळी करून टाकली आहेत, याबाबत आपण सर्वांनी चिंता वाहिली पाहिजे.

मराठी साहित्यसंशोधनातील आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा कसे याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार नसला, तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की, परदेशामध्ये शेक्सपिअर इत्यादी लेखकांची हस्तलिखितं जपून ठेवणं शक्य असेल तर आपण आपल्या ‘मास्टर स्टोरीटेलर्स’ची हस्तलिखितं आणि हस्ताक्षरं का जपून ठेवू शकलेलो नाही? उदाहरणार्थ नाथमाधव किंवा गो.ना. दातार किंवा अन्य मास्टर्स यांच्या प्रचंड कामकाजाची हस्तलिखिते आपण का उपलब्ध करून घेऊ शकलेलो नाही? या एकूण उदासीनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोललं पाहिजे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मित्रहो, काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाददेखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी साहित्याला व साहित्यिकांना नीटसं झालेलं नाही अशी टीका केली गेली आहे. मोठ्या अशा समूहाने धमांर्तर करणं, बहात्तरचा मोठा दुष्काळ व त्या निमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं, या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत. वर्तमानाचं भान नसणं हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्वाच्या घटना अलीकडे घडल्या त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे, असा थोडासा टोकदार सवाल आहे.

आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करुणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या सादत हसन मंटोने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर्स, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवनव्यवहाराबाबत विलक्षण करुणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळालेला नाही. अद्यापही मराठी कथेमध्ये करुणास्वरूप असं लिखाण आलेलं नसून समाजातला हा दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही, या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

साहित्यांतर्गत काही भाषेचे प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. कपड्यावरून माणसं ओळखण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा केली जात असली तरी भाषेवरून माणसांची ओळख पटवण्याचा खेळ जुन्या संहितेमध्ये आढळतो. अभिजन कोण तर अभिजात भाषा बोलतात ते, आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती, असा उपहास पाणिनीच्या सूत्रपाठात नोंदवला आहेच. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी ‘संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे’ असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात तेव्हा साहित्याला चिंता वाटली पाहिजे. भाषेवरून माणसांची ओळख कशी करणार? पाली इत्यादी प्राचीन भाषांचं काय करणार? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतीय भाषा आहे हे कोण सांगणार?

संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही, याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांतर्गत या घटनेचे पडसाद बहुधा पडलेले नाहीत.

साहित्यांतर्गत असे काही चिंतेचे आणि चिंतनाचे विषय आहेत.

भ्रमयुग

मित्रहो! आपल्या निवेदनाच्या उत्तरार्धापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. काळ तर मोठा कठीण आला हे तर मी आपल्याला सांगितलं. भर्तृहरीची भव्य कल्पनादेखील मी आपल्याला सांगितली आणि नंतर मी असं सांगितलं की, आपण अत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये आता प्रवेश केला आहे. या भ्रमयुगाबाबत, या फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत मला आपणाशी थोडं सविस्तर बोलायचं आहे.

भर्तृहरीप्रमाणेच आणखी एक रोमांचकारी संकल्पना आपल्या परंपरेत सापडते. प्रत्यक्ष महादेव स्वतःच काळ आहे. तो निरपेक्ष आहे. मात्र, गौरी काळाची नियंत्रिका आहे. या नियंत्रणामुळेच काळ लयबद्ध असतो, असं सांगितलं गेलं आहे. पण नियंत्रिका असली तरी ती महादेवाची पत्नीच आहे. म्हणून, केव्हा तरी काळाच्या छातीवर मस्तक ठेवून गौरीला निद्रा येते. अशी निद्रा आली की ‘काळरात्री’ची सुरुवात होते. याच काळात बालबुद्धी विद्ध्वंसकांच्या हातामध्ये समाजाच्या भवितव्याची सूत्रं नकळतपणे सुपूर्त होत असतात, कारण हा बेसावधपणाचा काळ असतो, काळरात्रीची सुरुवात असते.

आपण अशा छद्मबुद्धी विद्ध्वंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहोत असे संकेत मिळायला लागले आहेत. चिंतनशील लेखकाला अशा वेळेस चिंता वाटत असते, वाटली पाहिजे. हे विद्ध्वंसक, आपल्या पुढील पिढीच्या मुलांच्या हातामध्ये कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत, याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे. आपण थाळी वाजवली आणि ती वाजवताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरंतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की, दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये १२ वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन ‘त्राहिमाम’ म्हणत सैरावैरा झाला होता. भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळ्या वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणाऱ्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.

काही विचारवंत आता दबल्या आवाजात असं सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होतायत. श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होतो आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जातो आहे. दरी वाढते आहे. कदाचित पुढे चालून आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निमार्ण होईल. विचारवंत दक्षिण आफ्रिकेतील घटनांकडे अंगुलीदर्शन करत आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल, असा इशारा विश्लेषक विचारवंत देत आहेत. लेखक हे ऐकून चिंतित होतो आहे. थाळीवादनाचे ध्वनी त्याने ऐकले आणि येऊ घातलेल्या परिस्थितीकडेही तो पाहतो आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मौलाना रूमी यांचा जन्म अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतात १२०७ मध्ये झालेला आहे. त्यांनी पूर्वीच मानवजातीला सावध केलं आहे. समाजातील सामान्य स्त्री-पुरुषांना जगतव्यवहार करण्यासाठी आपल्या भोवती काहीएक व्यवस्था निर्माण करावी लागते. ही व्यवस्था चालवण्यासाठी व्यक्तींची निवड केल्यानंतर सामान्य माणसं पीडित का होतात, दुःख का भोगतात आणि बेचैनीला का सामोरं जातात, याचं कारण रूमीने दिलेलं आहे. त्या काळातली लोकसंख्या आणि समाजातल्या सक्षम व्यतींचं प्रमाण लक्षात घेता त्यांनी दिलेलं उदाहरण महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की,

एक हजार क़ाबिल आदमी के मर जानेसे इतना नुकसान नहीं होता

जितना, के एक अहमक के साहिबे एख़तियार होनेसे होता हैं

अर्थ असा आहे की, लष्करातली एक हजार सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं, मात्र एखाद्या विदुषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर जे नुकसान होतं, ते मात्र भरून निघणारं नसतं. ‘अहमक’ म्हणजे विदूषक. सर्कशीत काम करणारा विदूषक इथे अभिप्रेत नाही. विदूषकवृत्तीचा मूढ. ‘साहिबे एख़तियार’ म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदूषकप्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे. मौलाना रूमींनी विदूषकांपासून सावध राहण्याबाबत आपल्याला सूचित केलं आहे. ही प्रवृत्ती क्रूर प्रवृत्ती असते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पण इतकंच नाही. लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं.

अब्दुल बिस्मिमल्लाह नावाच्या हिंदी लेखकाने ‘दंतकथा’ नावाची लघुकादंबरी लिहिलेली आहे. मी या लघुकादंबरीचा मराठीतून अनुवाद केला होता. पुस्तकरूपाने हा अनुवाद आता उपलब्ध आहे. एक कोंबडा खाटीक मंडळींकडून स्वतःला वाचवून जीवाच्या आकांताने धावतो आहे आणि धावता धावता तो एका नालीच्या पोकळीमध्ये आतपर्यंत जाऊन बसलेला आहे. त्याला शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेली मंडळी कोंबड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जीवाच्या भीतीने हा कोंबडा पुढे पुढे सरकत राहिलेला आहे. आता पुढे सरकण्याचा रस्ता जवळपास बंद आणि मागे सरकण्याचा रस्ताही बंद. मृत्यु तर केव्हाही उपस्थित होऊ शकतो. आणि रात्र झाली आहे. अशा परिस्थितीत हा कोंबडा वाचकांना विश्वासात घेऊन संवाद करायला लागतो. आपल्या बालपणीपासूनच्या आठवणी सांगायला लागतो. एका कोंबड्याने सांगितलेल्या आठवणी म्हणून आपण या निवेदनाकडे पाहायला तर लागतो, पण आपल्या असं लक्षात यायला लागतं की, इथे सांगितलं जाणारं निवेदन तुमच्या आमच्या सामान्य जीवनापेक्षा वेगळं नाही. खुराड्यातलं जगणं, क्षुद्र अहंकार आणि लढाया, छोटी-मोठी प्रेमप्रकरणं आणि सामान्य पातळीवरचा सामान्य असा संघर्ष, आणि या सगळ्या जगण्यावर विशाल अशी आतंकाची छाया-मृत्युच्या भीतीची सावली. मनुष्याला असाच अनुभव येत असतो आणि त्याचंही जगणं यापेक्षा वेगळं नाही. क्षुद्रजीवन, क्षुद्रजीवनपद्धती आणि सततचं वावरणारं भय, याचा अनुभव माणूस घेत आलेला आहे. पण, या लघुकादंबरीच्या अखेरीस पहाट होता होता, हा मरणासक्त कोंबडा निर्भयतेने आरवलेला आहे. त्याचं आरवणं अंधाराच्या चादरीला लखलखीत सत्याच्या सुरीने फाडून टाकतं आहे. आपण कोठे लपलो आहोत, हे आपल्या आरवण्यामुळे शत्रूच्या लक्षात येईल इत्यादी भयोत्पन्न क्षुद्र सावधगिरी आता मागे पडलेली आहे. उगवत्या सूर्याला सलाम करायचा आहे. निर्भयता, व्यर्थ आणि क्षुद्र भयावर मात करते आणि अशी मात केल्यामुळेच नवजीवनाचं स्वागत केलं जाऊ शकतं, असंच हा कोंबडा सांगतो आहे. अलीकडे बहुतेक कोंबड्यांचं आरवणं बंद झालं असताना आणि भीतीची काजळी सर्वत्र व्यापून राहिली असताना निर्भयतेने आरवण्याचं महत्व ही लघुकादंबरी अधोरेखित करते. प्रस्तुत भ्रमयुगाशी ही लघुकादंबरी जोडली जाते आहे, हे पाहून आपण स्तिमित होतो. साहित्य आपल्या द्रष्टेपणातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारे देत असतं, ही साहित्याची शक्ती.

सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच आणि सत्य निर्भयपणे सांगितलं पाहिजे, हीदेखील काळाची गरज आहे. मात्र, उच्चरवाने सत्याचा उच्चार का करावा लागतो, याबाबत लेखकाने आपल्याला काहीएक सांगून ठेवलं आहे. एका बंगाली कादंबरीमध्ये प्रतीकरूपाने आलेलं सत्यवान नावाचं पात्र कोर्टामध्ये साक्ष देतं आहे. सत्यालादेखील साक्ष द्यावी लागते, तीदेखील शपथेवर. सत्य साक्ष देतं आहे, पण भोवतालच्या कोलाहात सत्याचा आवाज ऐकू जात नाही. टाईपरायटरचा खडखडाट, शेजारच्या कँटीनमधली कपबशांची किणकिण, लोकांचं परस्परांशी बोलणं आणि एकूणच निर्माण झालेला व्यर्थ, पोटार्थी कोलाहल यामध्ये सत्याचा आवाज विरत जातो. पण हा आवाज सातत्यपूर्ण आहे. सत्य आपलं कथन उच्चारित राहत असतं. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवानेदेखील उच्चारला जावा लागतो, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असं सांगत राहतो. आपण पाहिलं, ऐकलं पाहिजे हे मात्र खरं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझी एक ‘आरसा’ नावाची अप्रकाशित कादंबरी आहे. कथानक असं की, लेखकाच्या घरातला आरसा फुटलेला आहे. लेखक अवचितपणे असं बोलून जातो की, बरं झालं, आरसा फुटला, नाहीतरी आरसे जरा जास्तच सत्य बोलायला लागले आहेत. आरसे मंडळी हे उद्गार ऐकतात आणि नाराज होतात. त्यांचा प्रतिनिधी लेखकाला भेटायला आलेला आहे. तो लेखकासारखाच दिसतो. पण उलटा आहे. म्हणजे, लेखकाची उजवी बाजू तर याची डावी बाजू इत्यादी. आरशांचा प्रतिनिधी निषेध करून असं म्हणतो की, सत्यकथन करणं, हे आरशाचं कामच आहे, कारण आरसा सत्यव्रती असतो. लांगुलचालन करणे हा काही त्याचा धर्म नव्हे. पण आरसा असंही सांगतो की, बाजारामध्ये काही बाजारबसवे आरसे आलेले आहेत, जे दिसायला सुंदर दिसतात आणि तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवतात. उदाहरणार्थ, तुम्ही लठ्ठ असाल तर आरसा तुम्हाला सौष्ठवपूर्ण असं दाखवतो आणि तुमचे पांढरे केस या आरशात पांढरे दिसतच नाहीत. तुम्ही मोठे रुबाबदार, यशस्वी, धोरणी आणि अवतारी पुरूष दिसू शकता. असं दाखवणाऱ्या आरशांची बिलकूल कमतरता नाही. त्याउलट, एक आरशांची गुप्त संघटना भूमिगत राहून काम करते आहे, सत्यघोष करते आहे. ‘सांग दर्पणा मी कशी दिसते?’ या प्रश्नावर ‘तू सुंदर नाहीस’ असं स्पष्ट सांगणारा आणि म्हणून फुटलेपणाची शिक्षा भोगणारा आरसादेखील प्राचीन काळापासून या संघटनेचा सदस्य आहे. ‘दीने इलाही’ची स्थापना झाली, तेव्हा प्रतीकरूपाने ठेवलेला आरसा या संघटनेत सामील आहे. बाळशास्त्री जांभेकरांचा ‘दर्पण’सुद्धा या संघटनेत सदस्य आहे. हे आरसे जुने आहेत, आकर्षक नाहीत. पण खरं बोलणारे आहेत. अशा गुप्त संघटनेला भेट देण्याची लेखकाला ‘प्रातिनिधिक भीती’ वाटू लागते.

सुदैवाने माझी ही कादंबरी अजून प्रकाशित झाली नाही. पण या भीतीचं कारण तर आहेच. ते कारण सर्वांना माहीतदेखील असतं. परंतु, या कारणामागचं कारणसुद्धा शोधता येतं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा