मॅक्झिम गॉर्कीने साहित्यिकांना एक प्रश्न विचारला होता. सुरेश भटांनी त्याचे उत्तर आपल्या सामाजिक-राजकीय आशयाच्या कवितांतून स्पष्टपणे दिले आहे!
पडघम - साहित्यिक
हेमंत खडके
  • सुरेश भटांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Tue , 19 April 2022
  • पडघम साहित्यिक सुरेश भट Suresh Bhat

शब्दांच्या आवश्यक घर्षणातून ठिणग्या निर्माण करणारे, शब्द हाच श्वास आणि शब्द हाच ध्यास असलेले, मराठी काव्य आणि मराठी ग़ज़ल या प्रांतात मनसोक्त मुशाफिरी करणारे कविश्रेष्ठ सुरेश भट यांची १५ एप्रिल २०२२ रोजी ९०वी जयंती होती. त्या निमित्ताने त्यांच्या काव्यप्रतिभेचा हा मनोज्ञ वेध...

..................................................................................................................................................................

सुरेश भट... मस्त कलंदर वृत्तीचा अरभाट कवी! बेडर, बेफिकर, रोखठोक, बहुश्रुत, व्यासंगी, निर्भीड असे त्याचे विलक्षण व्यक्तिमत्त्व. ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी / नाठाळाचे काठी हाणू माथा’, हा त्याचा जगण्या-वागण्याचा व लिहिण्या-बोलण्याचा मराठी बाणा! प्रेम आणि प्रणयाच्या गीतांमध्ये मेणाहून मऊ असणारा हा कवी विद्रोहाच्या कविता लिहिताना कठीण वज्रासारखा झालेला दिसतो.

‘स्व’कवितेच्या ‘रूप’ आणि ‘गंधा’ची जाणीव होऊन मराठीच्या काव्यदालनात हळूच पाय ठेवणारा हा कवी, पुढे आत्मविश्वासाने ‘रंग माझा वेगळा’ म्हणत सामाजिक-राजकीय दंभावर सर्वशक्तिनिशी ‘एल्गार’ करत तुटून पडतो; आणि पाहता पाहता त्याचे शब्द एका ‘झंझावाता’चे वादळी रूप धारण करतात... हा ‘सप्तरंगी’ चमत्कार मराठी माणसाने केवळ अनुभवलाच नाही, तर त्या कवीच्या ‘रसवंती’ला त्याने मानाचा ‘मुजरा’ही केला आहे. जन्मदिवसाच्या निमित्ताने ज्याची याद यावी, असा हा कवी निश्चितच नाही! म्हणूनच सुरेश भट नावाच्या या कवीला मराठी माणसाने मनाच्या कुपीत अत्तरासारखे जपून ठेवले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भटांनी जशा उत्कृष्ट प्रणय कविता लिहिल्या, तशा श्रेष्ठ दर्जाच्या सामाजिक आणि राजकीय आशयाच्या कविताही लिहिल्या आहेत. (त्या कविता दुर्दैवाने आजही आऊटडेटेड झालेल्या नाहीत! त्या लवकर गतकालीन व्हाव्यात, अशी आपण अपेक्षा करू या), चांगला कवी हा आधी संवेदनशील माणूस असावा लागतो. असा कवी सामाजिक सुख-दुःखांपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. तो कोट्यवधी सामान्य माणसांचा प्रवक्ता झालेला असतो. सुरेश भटांची कविता दलित-पीडित-वंचित जनतेचा असा बुलंद आवाज झालेली आहे. यासंदर्भात स्वतः भट म्हणतात की, ‘कवी स्वतःचे जीवन आणि भोवतीची दुनिया (समाज) यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून वाटचाल करणारा मुसाफिर असतो.’ भटांनी आयुष्यभर अशी मुशाफिरी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा सुरेश भट तारुण्याच्या उंबरठ्यावर होते. त्या स्वप्नाळू वयात भटांनीही स्वातंत्र्याची सुंदर स्वप्ने रंगवली असणारच. मात्र ही स्वप्ने जेव्हा भंगायला लागली आणि भटांसारख्या संवेदनशील कविमाणसाला जेव्हा त्यांचे भंगणे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले, तेव्हा त्यांच्यातला कवी शांत कसा बसणार? ज्या भ्रष्ट, स्वार्थी, अन्यायी, धर्मांध, दांभिक वृत्तींनी सामान्य माणसांची ही स्वातंत्र्याची स्वप्ने पायदळी तुडवली, त्यांच्याविरुद्ध भटांनी एल्गार केला. स्वातंत्र्याचा सूर्य उगवेल आणि त्याच्या प्रकाशात सर्वसामान्य जनतेचे जीवन उजळून निघेल, याची वाट पाहत असतानाच भटांना सर्वत्र अंधार दिसायला लागला... म्हणूनच त्यांनी त्वेषाने लिहिले आहे :

उष:काल होता होता काळरात्र झाली

अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

स्वातंत्र्याचा सूर्य सर्वसामान्य माणसांसाठी प्रकाशाची चार किरणेही घेऊन आला नाही, त्याने या सामान्यांचे अश्रूही पुसले नाहीत, उलट त्याने लोकांच्या पदरात अंधाराच्या केवळ पखालीच रिचवल्या, अशा भेदक शब्दांत सुरेश भटांनी स्वातंत्र्याची शोकांतिका चित्रित केली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात नेतृत्वस्थानी असणाऱ्यांना उदात्त ध्येयधोरणांचा विसर पडला. नेते अधिकाधिक सत्तालोलुप आणि स्वार्थी होत गेले. सत्तेत येण्यासाठी भरघोस आश्वासने दिली गेली; पण सत्ता प्राप्त होताच ती पूर्ण करण्याची गरज नेत्यांना वाटली नाही. हे समकालीन वास्तव भटांच्या कवितेत फार तीव्र उपरोध - उपहासाचे रूप घेऊन अवतरले आहे.

वृत्तपत्रांचे रकाने वायद्यांनी भरत होते!

अन् किड्यामुंग्यांप्रमाणे लोक साधे मरत होते!!

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

अशा लोकांच्या वाट्याला न्यायालयात जाऊनही न्याय येत नाही, कारण तिथेही संधीसाधू व स्वार्थलोलुपांचीच वर्णी लागलेली असते. सत्ताधाऱ्यांना असेच लोक परवडणारे असतात. म्हणून भट लिहितात :

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही

एका बाजूला असे भयानक वास्तव असले तरी काही परंपराप्रिय लोक आपल्या प्राचीन संस्कृतीचे गोडवे गात असतात. ज्यांना संस्कृतीचे आणि व्यवस्थेचे सर्व लाभ मिळाले, त्यांनी या संस्कृतीचे कितीही गोडवे गायले तरी भटांना ते मान्य नाही. या प्राचीन, पण विषमतामूलक संस्कृतीवर भाष्य करताना उपरोधाचा तीव्र सूर भट लावतात :

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला

मशहूर ज्ञानया झाला गोठ्यातच जगला हेला

असा भटांचा निष्कर्ष आहे. त्यांचे हे संस्कृतीवरचे भाष्य फार भेदक आहे. माणसांना माणसांपासून तोडणाऱ्या जात, धर्म, पंथ, संस्कृती अशा सर्वच गोष्टींवर भटांनी वेळोवेळी प्रहार केले आहेत. भारतीयांनी या सर्व गोष्टींच्या वर स्वतःचे ‘भारतीयत्व’ ठेवावे, असे त्यांना वाटे. त्यांच्या सर्व निष्ठा भारतीय घटनेप्रती एकवटल्या होत्या. देशाला राष्ट्रीय एकात्मतेच्या सूत्रात बांधणारी घटना त्यांना महत्त्वाची वाटे. ही घटना म्हणजे ‘भारतीय प्रबोधन परंपरे’चे सार आहे, अशी त्यांची धारणा होती. बुद्ध, कबीर, तुकाराम, फुले, आंबेडकर यांच्याविषयी भटांनी जागोजाग श्रद्धा व्यक्त केली, ती याच भावनेतून. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे आणि सर्वांत आधी आपण भारतीय आहोत, हा संदेश मनामनात रुजवणारे बाबासाहेब भटांना त्यामुळेच आदरणीय वाटतात. बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करून आपल्या दलित - पीडित बांधवांना फसवणाऱ्यांचाही भटांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते त्वेषाने लिहितात :

तुला अन् गौतमालाही विकाया काढले त्यांनी

तुझ्या नावावरी त्यांनी कमाई लाटली बाबा

कुणी केली दगाबाजी? कुणी केले तुझे सौदे?

तुझ्यामागे तुझी स्वप्ने कुणी ही छाटली बाबा?

हजारो वर्षांच्या जातवर्णव्यवस्थेतून आलेल्या व समाजाच्या अंतर्मनात रुजलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या अवैज्ञानिक धारणा या देशाच्या एकात्मतेला व सामाजिक सौहार्दाला तडा देणाऱ्या आहेत, अशी भटांची पक्की खात्री होती, विषमतेच्या विषाने काठोकाठ भरलेल्या या विद्रूप वास्तवावर भटांचे शब्द निकराने हल्ला चढवतात :

माणसे नाहीत या देशात आता

सांगतो जो तो स्वतःची जात आता

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकां

कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या जातिधर्माच्या अस्मितांवर भट येथे फार घणाघाती हल्ला चढवतात. या जातिभेदाच्या विषाने संपूर्ण समाज पोखरला गेला आहे. येथे एका जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीच्या माणसाविषयी प्रेम, आस्था वाटत नाही. पिढ्यानपिढ्या जोपासलेली ही विषवल्ली केव्हा स्फोटक रूप धारण करेल सांगता येत नाही. अशा वेळी या जातीय वैमनस्यातून गोरगरिबांच्या वस्त्या रात्रीतून जाळल्या जातात. त्या जाळून टाकण्याच्याच लायकीचा होत्या, अशी दडपशाहीची भाषा सर्रास वापरली जाते. हा सामाजिक आशय भटांच्या कवितेत तीव्र उपरोधाने प्रकट होतो :

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती

गावात सज्जनांच्या आता तणाव नाही

विषमतेच्या, अन्यायाच्या, शोषणाच्या झळा या निम्न वर्गातील लोकांनाच सहन कराव्या लागतात, याचेही भान भटांना आहे. आर्थिक वर्ग प्रसंगी जातजाणीवेपेक्षाही प्रभावी ठरतात, हे सांगताना भट लिहितात :

शेवटी पैसा पैशाला विचारी

पाडतो जातीतही पैसाच जाती

घटनेला अपेक्षित लोकशाही येथे रुजू शकली नाही. स्वार्थी, दांभिक लोकांनी लोकशाहीलाही बदनाम करून सोडले, याचे तीव्र दुःख भटांच्या कवितेत फार वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले आहे :

कालचे सारे लफंगे बैसले सिंहासनी

ढाळतो आम्ही भिकारी लक्तरांची चामरे

या ओळींमध्ये भटांनी दुहेरी दुःख व्यक्त केले आहे. लफंगे सिंहासनावर बसले हे एक दुःख, आणि सामान्य माणूसही हे बघून चिडून जात नाही, हे आणखी एक दुःख! सामान्य माणूस या लफंग्यांवर चवऱ्या ढाळण्यातच धन्यता मानतो, याची वेदना सुरेश भटांनी उत्कट शब्दांत व्यक्त केली आहे.

सुरेश भटांनी अनेक ‘हजल’ लिहिल्या आहेत. हा तसा विनोदाकडे जाणारा हलकाफुलका प्रकार! त्यामुळे कोणी त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. मात्र भटांच्या काही ‘हजल’ या नियमाला अपवाद म्हणाव्या लागतील. वरवर विनोदी वाटणाऱ्या या हझलांमध्ये भट कधीकधी इतका कडवट, तीव्र उपहास भरतात, की त्यांचे स्वरूप केवळ रंजनाचे राहत नाही. ‘पाच वर्षांनी’ या हजलमध्ये भट लिहितात :

भेटती सारे पुढारी पाच वर्षांनी!

जाहली वेश्या कुमारी पाच वर्षांनी!

घाबरा झाला बिचारा जीव प्राण्यांचा

तेच हे आले शिकारी पाच वर्षांनी!

या हझलमधील धारदार उपरोध तिला केवळ विनोदी बनू देत नाही. भटांच्या शेवटच्या संग्रहातील ‘आज बेडा पार पांडू!’ ही हझल तर मढेकर - मुक्तिबोध - माधव ज्युलियन - करंदीकर यांच्या जहाल उपरोधाशी नाते सांगणारी आहे. होळीच्या पार्श्वभूमीमुळे वाचक थोड्या सहजपणे ती वाचायला लागतो. ‘पांडू’ या संबोधनामुळे तर तो अधिकच गाफील राहतो. मात्र संपूर्ण हझल वाचून होते, तेव्हा परिणाम हलक्याफुलक्या विनोदाचा नसतो. एक गंभीर सत्य कवीने येथे फार भेदकपणे सांगितले आहे, असाच आपला प्रत्यय असतो!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?

जो तुला भेटेल नेता त्यास जोडे मार पांडू!

जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,

हीच आहे देशसेवा ! हा न भ्रष्टाचार पांडू!

शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे

आपल्या या भारताला कोणता आधार पांडू?

सोसणाऱ्यांच्या भुकेला जात कैसी धर्म कैसा?

हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू!

ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,

बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

येथील कडवट उपहास आणि भेदक उपरोध या कवितेला गंभीर सामाजिक भाष्याचे रूप देतात. ही कविता वाचताना वाचक अस्वस्थ होऊन चिडून उठल्याशिवाय राहू शकत नाही.

श्रेष्ठ कवितेत अनेक जाणिवा एकमेकींमध्ये गुरफटून गेलेल्या असतात. वरील हझलमध्ये भटांनी सामाजिक व राजकीय जाणिवा एकत्र गुंफून त्यांचा जाडजूड आसूड बनवला आहे. या फुलेप्रणीत आसूडाच्या आवाजाने व आघाताने वाचक खडबडून जागा झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात हा आसूड भटांनी तमाम कष्टकरी जनतेच्या वतीने भ्रष्ट, दांभिक माणसांविरुद्ध उगारला होता. तो त्यांनी शेवटपर्यंत कडाडता ठेवला. मॅक्झिम गॉर्कीने साहित्यिकांना एक प्रश्न विचारला होता, ‘संस्कृतीच्या मिरासदारांनो! तुम्ही कोणाच्या बाजूला आहात?’ सुरेश भटांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या सामाजिक-राजकीय आशयाच्या कवितांतून स्पष्टपणे दिले आहे. भट शेवटपर्यंत दलित - पीडित - वंचितांची बाजू लढवत राहिले. म्हणूनच ते म्हणू शकले :

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ एप्रिल २०२२च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा