भारतीय पत्रकारांनी कृपया असे काही करू नये; त्रास होईल, तुरुंगात जाल…
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • रशियाच्या ‘चॅनेल वन’ या वृत्तवाहिनीच्या संपादिका मरीना ओव्हस्यान्निकोवा पोस्टरसह
  • Sat , 19 March 2022
  • पडघम माध्यमनामा चॅनेल वन Channel One मरीना ओव्हस्यान्निकोवा Marina Ovsyannikova युक्रेन Ukraine रशिया Russia व्लादिमीर पुतीन Vladimir Putin

मरीना ओव्हस्यान्निकोवा नावाच्या चाळीशीतल्या आणि दोन मुलांची आई असलेल्या एका स्त्रीने सोमवारी म्हणजे १४ मार्च २०२२ रोजी एक इतिहास घडवला. मोजून सहा सेकंदांचा तो होता. स्थळ होते मॉस्को. ठिकाण होते ‘चॅनेल वन’. वेळ संध्याकाळची. रशियन वृत्तवाहिनीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा - व्रेम्याचा - कार्यक्रम चालू होता. मरीनाचीच एक सहकारी बातम्या देत होती. तेवढ्यात मरीना मागून आली. तिच्या हातात एक मोठा कागद होता. त्यावर तिने लिहिले होते - “हा प्रचार आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. ते खोटे बोलतात.”

मरीनाचे डोके त्या कागदामागून कसेबसे दिसते ना दिसते अन काय चाललेय हे कळायला सहा सेकंद गेले. कंट्रोल रूममध्ये बसलेल्या निर्मात्याने झटक्यात बातम्या बंद करून टाकल्या. एकच गडबड स्टुडिओत उडाली. मरीनाला पोलीस पकडून घेऊन जातात. तिचे तसे होणारे हे एव्हाना सर्वांना समजून चुकले होते. पण तब्बल १६ तास तिचा ठावठिकाणा लागेना, तेव्हा पुन्हा गडबड सुरू झाली. ‘चॅनेल वन’ची संपादिका असणारी मरीना तशी विख्यात होती. तिला ३० हजार रुबल्सचा दंड केला गेला. तब्बल १४ तास तिची चौकशी पोलीस करत होते. तिला रात्री झोपूही दिले नाही. संघटितपणे एक अनधिकृत घटना घडवून आणल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला. तिने तो अर्थातच नाकारला.

आता ती घरात तिच्या मुलांपाशी आहे. दोन दिवस विश्रांती घेते म्हणाली. पण मरीनावर मोठे बालंट येणार असे प्रत्येकाला वाटत आहे. पुतीन असा आपला अपमान आणि अधिकारभंग सहन करत नसतात म्हणे! बातम्यांच्या थेट प्रक्षेपणात मरीनाने ‘नो वॉर’चे फडकवलेले निशाण अनेकांनी बघितले. ज्यांना ऐनवेळी नाही बघायला मिळाले, त्यांना त्या क्षणाच्या तुकड्यांची प्रत रवाना झाली. फक्त सहा सेकंदाच्या मरीनाच्या त्या निषेधाने लाखो रशियनांच्या मनातलेच सारे बाहेर पडले. प्रचार, खोटारडेपणा, विपर्यास यांनी हैराण झालेले लाखो रशियन नागरिक जरा सावरले. साक्षात एक पत्रकार असे बजावतेय म्हणजे नक्कीच तिचे खरे असणार, असे त्यांना वाटू लागले. ‘चॅनेल वन’ तसे बरे बातम्या देणारे म्हणून विख्यात. सरकारी नियमही तितकेच कठोर. पण मालक व्लादिमीर व्लादिमिरोविच पोझ्नर पुष्कळसे स्पष्टवक्ते. त्यांनी कित्येकदा आपल्या मर्जीनुसार बातम्यांचे प्रक्षेपण केलेले.

पाच वर्षांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत एक स्फोटक विधान केले होते. ते म्हणाले होते, “आज पत्रकारिता खतम झालेलीय. पण मला खात्रीय की, ती पुन्हा उभारी घेईल. कारण राज्य या व्यवसायावाचून चालत नसते.” त्याही आधी पोझ्नर असेही म्हणाले होते की, ‘रशियात काही माणसांमुळे पत्रकारिता शिल्लक राहिलेली नाही. त्या लोकांनी हा व्यवसाय विकून टाकलाय, त्याच्याशी गद्दारी केलीय. त्यांना ही जागा सोडून जावे लागेल असा एक दिवस नक्की येईल!’ आता मरीनाच्या या निषेधापासून पोझ्नरसाहेब गप्प आहेत म्हणे!

हे सगळे कुठे छापून आलेय माहिताय? ज्यांना पत्रकारितेबद्दल म्हणजे सत्याची व शांततेची बाजू घेतल्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला, त्या दिमित्री मुरातोव यांच्या ‘नोवाया गॅझेट’ या वृत्तपत्रात. लेखिका इरीना पेत्रोवस्काया सांगतात, “मरीनाच्या या युद्धविरोधी भूमिकेचा फटका असा जबर होता की, पूर्वी काय घडले तेही बाहेर आले. मरीनाआधी मार्चच्या सुरुवातीसच ‘चॅनेल वन’च्या काहींनी राजीनामे दिलेले होते. युरोपियन कॉरस्पाँडंट झाना अगालाकोवा आणि वादिम ग्लुस्कर यांनी रामराम ठोकला होता. एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक लिलिया गिल्दिवा यांनीही गाजावाजा न करता नोकरी सोडली होती.” सरकारच्या वृत्तमाध्यमात खदखद सुरू झाल्याची माहिती मिळत असल्याचे हा लेख सांगतो. काही संपादक अन निर्माते बाहेर पडल्याचेही कळले. आणखी असेही समजते की, जे पत्रकार युक्रेनवर काही लिहिण्यास नकार देत असतील, त्यांना कामावर येऊ नका, असे सांगण्यात आले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मरीनाने जसा आपला निषेध नोंदवला, तसाच कागदी फलक हाती घेऊन ‘झारग्राड चॅनेल’च्या दोन कर्मचाऱ्यांनी मरीनाची टिंगल उडवली. ‘नो वॉ…. यस स्पेशल ऑपरेशन’ असे एकाच्या फलकावर होते, तर दुसऱ्याने ‘वुई ओन्ली टेल ट्रुथ’ असा फलक फडकावला. व्वा! अगदी ‘गोदी मीडिया’सारखेच हे सारे! काय म्हणावे अशा रशियन पत्रकारांना? पुतीनपीडित की पुतीनामावशी की पुतीनपुंड?

रशियात पत्रकारितेच्या नावाने पी.आर. म्हणजे पब्लिक रिलेशन्स सुरू असल्याचा निर्वाळा तसा २००४ सालीच मिळाला होता. त्या वर्षी रशियन टीव्ही अ‍ॅकॅडेमीच्या काही व्यक्तींनी सेन्सॉरशिप व सरकारी ढवळाढवळ यांना हरकत घ्यायचे ठरवले. पण त्यांच्यामागे बहुमत नव्हते. १३४पैकी ३६ जणांनी त्यांना सह्या दिल्या. २०१०मध्ये ‘चॅनेल वन’ आणि ‘एआरटी’ यांनी ठेवलेले ‘व्लादिस्लाव लिस्त्येक पारितोषिक’ लिओनिद पार्फोनाव यांना मिळाले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘आम्ही जे देतोय ती काही माहिती नसते. पण उत्कृष्ट प्रचार असतो तो. मला कुणावर टीका करायची नाही. मी काही लढवय्या नव्हे. आणखी काही करावे असेही मी म्हणत नाही. पण मुडद्याला मुडदा तरी किमान आपण म्हटले पाहिजे.’

त्यांच्या या भाषणानंतर सभागृहात शांतता पसरली. अनेक टीव्हीचालक अन नामवंत दगडी चेहरे करून बसले. पार्फोनाव यांचे भाषण कोणत्याही वाहिनीने दाखवले नाही. तो पुरस्कार अदृश्य झालाय. पार्फोनाव नंतर त्यांच्या नियमित कामावर दिसले नाहीत. निखळ प्रचाराचे दिवस सुरू झाले होते.

व्लादिमीर पोझ्नर एक गोष्ट सांगायचे. त्यांनी १९७७ साली बुडापेस्ट येथे ‘वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’ हा चित्रपट बघितला. त्यात मनोरुग्णांच्या इस्पितळात दडवून ठेवलेले धट्टेकट्टे लोक असतात. त्यांना गलितगात्र केलेले असते. मॅकमर्फी नावाचा एक रुग्ण (जॅक निकलसन्) त्यांना उठाव करायला उत्तेजन देत राहतो. त्याला त्याच्या संतापी स्वभावाबद्दल या रुग्णालयात आणलेले असते. तो एकटा पडतो. पण म्हणतो, ‘अ‍ॅट लिस्ट आय ट्राईड!’ पोझ्नर यांनी ठरवले की, हाच आपल्या जीवनाचा मंत्र. पण त्यांनी काही केले नाही. उलट त्यांची पत्रकार कर्मचारी मरीना सरसावली आणि तिने सिद्ध केले की, काहीही होवो, मी प्रयत्न तर केला! कोणास ठाऊक, तिची ही धडक काही परिवर्तन घडून आणेलही….

न्यायालयातून घरी जाताना मरीना काय म्हणाली? म्हणाली, ‘मला यापुढे शांत राहता येणार नाही. लोकांनी डोळे उघडले पाहिजेत. मी माझा देश सोडून जाणार नाहीये.’

मरीनाने आपले हे बंड करण्यापूर्वी आपला एक व्हिडिओ संदेश चित्रित केलाय. त्यात ती सांगतेय की, ‘मी इतकी वर्षे क्रेमलिनचा प्रचारच करतीय. त्याची मला लाज वाटते. युक्रेनमध्ये जे घडतेय तो एक गुन्हा होय. त्याला एकच माणूस जबाबदार आहे. तो म्हणजे व्लादिमीर पुतीन. माझे वडील युक्रेनियन असून, आई रशियन आहे. ते काही एकमेकांचे शत्रू नाहीत. हे सारे थांबू शकते. त्यासाठी रशियन नागरिकांनी निषेध केला पाहिजे. सरकार आपणा साऱ्यांना अटक करू शकणार नाही. लोकच हा वेडेपणा थांबवू शकतात.’

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या अशा बंडखोर व सत्यवादी मरीनाला ‘गोदी मीडिया’ मुळीच भाव देणार नाही. मरेना का ती, म्हणून तिला बाजूला सारतील. मनोमनी त्यांनाही वाटत असणार की, आपणही मोदी सरकार, संघपरिवार, भाजप यांचाच प्रचार करतोय. पण ट्रोल होऊ, ‘देशद्रोही’ होऊ अशा भयाने ते शांत राहतायत. शिवाय एवढा पगार, प्रतिष्ठा, प्रसिद्धी नुसती स्तुती करून मिळत असेल, तर का सोडा पाणी अशा नोकरीवर? उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर येथल्या पत्रकारांना तुरुंगात सडावे लागत आहे. उगाच कशाला सरकार अन सत्ताधारी मंडळींशी शत्रुत्व घ्या… गप्प राहावे हेच बरे.

मरीना, निदान तू प्रयत्न तरी केलास. तुझे अभिनंदन. चुकीची गोष्ट चूक आहे, हे सांगायचे धाडस तू तुझ्याच स्टुडिओत दाखवलेस…!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा