नावल-अल-सदावी : अरब जगतातल्या पिचलेल्या-दबलेल्या स्त्रियांचाच नव्हे, तर समस्त जगातल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांचा बुलंद आवाज
अर्धेजग - कळीचे प्रश्न
‘द इकॉनॉमिस्ट’मधून
  • नावल-अल-सदावी आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 18 March 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न नावल-अल-सदावी Nawal El-Saadawi स्त्री-सुंता Female circumcision

नावल-अल-सदावी. स्त्री हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेली इजिप्तशियन स्त्रीवादी लेखिका-कार्यकर्ती. तिच्या विरोधाची धार स्त्री-सुंता करण्यासाठी वापरात येत असलेल्या पात्यापेक्षाही तीव्र-तीक्ष्ण. गेल्या वर्षी २१ मार्च रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी सदावीचे निधन झाले. तसे अरब जगतातल्या पिचलेल्या-दबलेल्या स्त्रियांचाच नव्हे, तर समस्त जगातल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांचा बुलंद आवाज निमाला. तिच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सदावीचे स्मरण करताना तिच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख...

..................................................................................................................................................................

एके दिवशी घडले असे की, जेमतेम दहावे वर्ष लागलेल्या नावल-अल-सदावीला तिच्याकडे असलेला मलई रंगाचा तो खास वेश परिधान करण्यास धाडण्यात आले. कारण, नाईल नदीच्या खोऱ्यातल्या कफ्र ताहला नावाच्या गावामधल्या त्यांच्या घरात त्या दिवशी काहीतरी खास कार्यक्रम पार पडायचा होता. तिला असे सांगितले गेले होते की, त्या दिवशी तिच्या वडिलांकडे खूप खास पाहुणे येणार होते. म्हणूनच सदावीने अंगात मलई रंगाचा वेश घातला होता. परंतु, त्याचबरोबर दात काळे दिसावे, यासाठी तिने घिसाडघाईने काळपट रंगाच्या कच्च्या वांग्याची साल आपल्या दातांवर फासली होती. या मागचा उद्देश हा होता, जो कोणी पाहुणा तिचा भावी पती म्हणून त्या दिवशी तिला भेटायला येणार होता, त्याला या अशा विद्रूप काळपट दातांच्या मुलीशी अजिबातच लग्न करावेसे वाटू नये.

सदावीने हा जो काही उपद्व्याप करून ठेवला होता, त्यासाठी आई-वडिलांचा मारही पडला. परंतु ही मात्रा चांगलीच लागू पडली. हा एकप्रकारे बंडाचा विजय होता. याच विजयाने सदावीला पुढे आयुष्यभर ताकद पुरवली. यातूनच आपल्यातल्या आत्मविश्वासाची तिला तीव्रतेने जाणीव झाली. याची तिला गरजही होती. कारण, पुढे जाऊन याच आत्मविश्वासाच्या बळावर तिने इजिप्तमधल्या महिलांविरोधात होत असलेल्या शोषण आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवला. हे शोषण जसे स्त्री-सुंतेशी निगडित होते, तसेच विवाहांतर्गत हिंसा, वारसाहक्कात स्त्रीला नसलेले स्थान आणि बुरख्याची सक्ती आदी परंपरेने चालत आलेल्या प्रथांशीही जोडलेले होते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पिढ्यानपिढ्या स्त्रियांवर होत आलेले अत्याचार थांबावेत, यासाठी ती प्रस्थापित प्रतिगामी व्यवस्थेविरोधात निडरपणे उभी ठाकली. या संघर्षात तिचे लिखाण रोखण्यात आले. तिच्या पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. १९६९मध्ये तिचे ‘वुमेन अँड सेक्स’ हे पुस्तक प्रकाशित झाले. परंतु या पुस्तकामुळे तिला तिची आरोग्य मंत्रालयातली नोकरी गमवावी लागली. ‘दी हिडन् फेस ऑफ इव्ह’ या पुस्तकाद्वारे तिने डॉक्टर म्हणून इजिप्तच्या खेड्यापांड्यात अनुभवलेल्या, मात्र तोवर सार्वजनिक चर्चेसाठी निषिद्ध ठरलेल्या स्त्री-सुंतेशी निगडित बारीकसारीक तपशील जगापुढे आणले. १९८१मध्ये अन्वर सादत यांच्या सरकारने सदावीला तीन महिन्यांच्या तुरुंगवासात धाडले. पुढे १९९०मध्ये तिला खुनाच्या धमक्या येऊ लागल्या, तसे तिला देश सोडणे भाग पडले.

अर्थात, प्रत्येक वेळी आपल्या बंडखोर स्वभावाला जागत सदावीने अडथळे पार करत परिस्थितीवर मात केली. तुरुंगवासात असताना जेव्हा आसपासच्या महिला कैदी रडत-भेकत होत्या, आपल्या नशिबाला बोल लावत होत्या, तेव्हा सदावी मुक्तीची गाणी म्हणत होती, बेभान होत नाचत होती, शिताफीने तस्करी करून मिळवलेल्या शिसपेन्सिलीचा वापर करत टॉयलेटपेपरवर आठवणी शब्दबद्ध करून ठेवत होती. २००७मध्ये जेव्हा तिच्या एका प्रकाशकाने देवाला सवाल करणारी आणि माणसापुढे गुडघे टेकायला लावणारी नाट्यसंहिता जाळून टाकली, तेव्हा तिने जाहीरच करून टाकले की, जर तिला जे काही म्हणायचे आहे, ते तिने प्रत्यक्षात म्हटले तर तिचे तसे करणे, ‘जोन ऑफ आर्क’प्रमाणे तिला स्वतःला जाळून टाकेल, इतके ते तप्त असेल.

या अशा तिच्या जाहीर अवतारामुळे ही एक रानटी नि धोकादायक बाई आहे, असे अनेकांचे मत पडे. ती एका अर्थाने आक्रमक होतीच. म्हणूनच तर तिच्या वाणीतून, लेखणीतून धगधगते शब्द बाहेर पडत होते. यातून तिची जवळपास ५५ पुस्तके आकारास आली. त्यात लघुकथा, कादंबऱ्या, कविता, भाषणे आणि नाट्यसंहिताही होती.

ती समस्त इजिप्तिशियन महिलांसाठी आवाज उठवत होती. या महिला शतकांपासून मूकपणे शोषणाच्या बळी ठरत आल्या होत्या. त्यांचा संघर्ष बहुतांशी दुर्लक्षित राहत आला होता. त्यांच्यासाठी सदावी आपल्या गगनभेदी आवाजात संघर्षासाठी पुढे सरसावत होती. त्यांच्या प्रश्नांची तड लागेपर्यंत निर्धारपूर्वक धडका मारत होती. या संघर्षात सदावीने आपला आवाज फिरदौस नावाच्या एका महिलेसाठी उठवला होता. फिरदौसची ओळख ‘ए वुमेन अ‍ॅट पॉइंट झिरो’, म्हणजेच मृत्युदंडासाठी निश्चित केलेली स्त्री अशी होती. ज्या पुरुषाने अत्याचार केले, त्याचा तिने न राहवून खून केला, या कारणास्तव फिरदौसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती.

अशीच भयावह हिंसा खुद्द सदावीने आपल्या लहानपणी अनुभवली होती. अवघी सहा वर्षांची असताना एके दिवशी घामाने डबडबलेली, अंगाला मेंदी आणि आयोडिनचा वास येत असलेली दाई घरी आली, तिने उबदार गादीवर झोपलेल्या सदावीला बेसावध क्षणी करकचून आवळत न्हाणीघरात नेले. तिचे पाय फाकवले आणि ईदच्या दिवशी जसे एखाद्या बकरीचा बळी देतात, तितक्या निष्ठूरपणे तिच्या योनीवर तिने धारदार पाते चालवले. त्या वेळी झालेली वेदना आणि त्यानंतरचा सदावीचा आक्रोश कल्पनेपलीकडचा होता.

मुलीची विचारशक्ती आणि क्षमता संपवण्याच्या योजनेचा भाग असलेल्या धारदार पात्याविरोधात पुढील आयुष्यात सदावीला तितकेच प्रभावी लेखणीरूपी अस्त्र गवसले. एका अर्थाने, लोखंडानेच लोखंडावर मात केली होती. तसे पाहता शस्त्रक्रियेसाठी वापरात येणारी कात्रीसुद्धा एक महत्त्वाचे अस्त्र होती. पण डॉक्टरबिक्टर व्हावे, अशी काही सदावीची इच्छा नव्हती. मात्र, शिक्षणात ती इतकी हुशार होती, त्यामुळेच तिचे डॉक्टर होणेही न चुकणारे होते.

एक मुलगी म्हणून ती म्हटली तर खूपच नशीबवान होती. कारण, पारंपरिकरित्या मुलीची जागा चूल आणि मूल इथवरच मर्यादित असताना तिच्या आई-वडिलांनी तिचे व्यवस्थित शिक्षण होईल, याची तजवीज केली होती. स्वयंपाकघरात तिला तसाही रस नव्हता. पण नाही म्हणायला रॉकेलचा स्टोव्ह पेटवता येतो, या एका कारणासाठी तिचे कौतुकही झाले होते. एका बाजूला आजी तिला म्हणत असे- ‘मुली म्हणजे ओझे, मुली म्हणजे जन्माला आलेली अनिष्टता, त्यापेक्षा मुलगे सर्वाधिक लायक’. पण, पुढे जेव्हा ती शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षणात दाखल झाली, तेव्हा स्त्रियांबरोबरच पुरुषांचीही कलेवरे विच्छेदनासाठी टेबलावर पडलेली तिने पाहिली. इथे जर स्त्री-पुरुषांमध्ये भेद केला जात नाही, मग इतरत्र स्त्रीपेक्षा पुरुष श्रेष्ठ हा विचार कुठून येतो, असा रास्त प्रश्न तिला पडे. ती स्वतःलाच प्रश्न विचारे- तिच्या कफ्र ताहला गावात का म्हणून तिला अस्वच्छ दाईने सुंथा केल्यानंतर रक्तस्राव होत असलेल्या बालवधूची सोबत करण्यासाठी रात्र घालवावी लागे.

२००८मध्ये इजिप्तमध्ये स्त्री-सुंतेला प्रतिबंध घालणारा कायदा पारित करण्यात आला. तिच्यासाठी ही मोठीच कामगिरी होती. कारण, या एका प्रथेविरोधात तिने तोवर अक्षरशः रान पेटवले होते. परंतु तेवढ्याने तिचे समाधानही व्हायचे नव्हते. कारण कायद्याने लादलेली ही बंदी वरवर खूपच कृत्रिम होती. सत्ताधाऱ्यांना सदावीने जगजाहीर केलेल्या कुप्रथेला तेवढे झाकायचे होते. संपवायचे नव्हते. तसेही ही बंदी प्रभावहीन ठरायची होती. याचे एक कारण, देशातल्या जवळपास ९० टक्के मुलींची प्रथेनुसार सुंथा झालेली होती आणि पुढे जाऊन अधिक प्रमाणात ती व्हायची होती.

तशीही ही बंदी केवळ एक अडखळती सुरुवात होती. विवाहांतर्गत हिंसेपासून सुटका करवून घेण्यासाठी महिलांना घटस्फोटाचा अधिकार गरजेचा होता. कायद्याने असा अधिकार मिळण्याआधीच तिने तिच्या तीन पतींना घटस्फोट देऊन आपला अधिकार जगाला दाखवून दिला. या उपर इजिप्तमधल्या स्त्रियांना लैंगिक हिंसेपासून संरक्षण हवे होते, कायद्यासमोर समानता हवी होती आणि रोजगाराचा समान हक्कही हवा होता. यातल्या बहुतांश स्त्रिया बुरखा परिधान करणाऱ्या होत्या. बुरखा परिधान करणारी स्त्री असो वा बुरख्याची सक्ती लादणारा पुरुष, तिच्यासाठी बुरख्याचा अर्थच मुळी, बंदिस्त मानसिकता असा होता. तिच्या मते, जोवर या प्रथेला तिलांजली मिळत नाही, तोवर व्यवस्था परिवर्तन शक्य नव्हते.

व्यवस्था याचा अर्थ तिला समाज, संस्कृती, राजकारण, अर्थकारण अशा साऱ्या व्यवस्था अभिप्रेत होत्या. सेक्युलर विचारांची व्यक्ती म्हणून परमेश्वर नावाच्या संकल्पनेचा अंत तिला अपेक्षित होता. स्त्रियांच्या सबंध आयुष्यावर ताबा मिळवून असलेल्या इस्लामिक कायद्याचा अंत तिला अपेक्षित होता. परंतु, तिच्या हाडापेरांत मुरलेला मार्क्सवाद तिला सांगत होता की, समस्यांचे मूळ इस्लाम नाही, तर समाजात रुजलेली पितृसत्ताक व्यवस्था हीच आहे.

हीच व्यवस्था स्त्रियांचे दमन-शोषण करत आली आहे. हे सारे रोखायचे तर संपत्तीचे समान वाटप होणे गरजेचे आहे. तसे झाले तर एकीकडे श्रीमंत वर्ग ऐषोराम उपभोगत असताना गरिबांना एका भाकरीच्या तुकड्यासाठी मरेस्तोवर कष्ट उपासावे लागणार नाहीत. किंबहुना, या समस्यांवर मात करत सारे व्यवस्थित होऊ शकते, इजिप्तचा सर्वेसर्वा नासेरने ठरवले तर खजिन तेलातून मिळणारी अगडबंब संपत्ती पाश्चात्य देशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तिजोऱ्यांमध्ये न जाता इजिप्तमध्येच उपयोगात येऊ शकते. सदावीच्या मते, हाच खरा इजिप्तसाठी समताकेंद्री लोकशाहीचा राजमार्ग होता. अशा वेळी सर्वंकष विचार न करता होत असलेल्या स्त्रीविषयक सुधारणा हा केवळ प्रगतीचा भ्रम राहिला असता. तसे अर्धेमुर्धे घडायचे नसेल, तर व्यापक विचार गरजेचा होता.

सदावीने हे आपले म्हणणे कितीतरी दशके लावून धरले होते. आपला बुलंद आवाज तिने क्षीण होऊ दिला नव्हता. टीव्हीवरच्या चर्चांमध्ये जेव्हा ती सहभागी होत असे, तेव्हा आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रत्येक मिनिटांचा ती सदुपयोग करत असते. तिचा म्हणून असलेला जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आतूर राहत असे. तिला तिच्या हयातीत अरब राष्ट्रांतल्या मजूर महिलांची चळवळ उभारायची होती, व्यावसायिक आणि कारखाना कामगारांची एकजूट घडवून परिवर्तनाच्या प्रक्रियेला बळ मिळवून द्यायचे होते.

या दरम्यान तिला जे काही दिसत होते, त्यानुसार तिच्या आसपास दखल घ्यावी, असे कोणी विश्वासार्ह स्त्रीवादी लोक उरले नव्हते. अमेरिकेच्या दौऱ्यात ती ज्या काही तथाकथित स्त्रीवादी महिलांना भेटली होती, तिच्या असे ध्यानात आले होते की, महिलांनी अत्यंत निर्बुद्धपणे इजिप्तशियन पुरुषांपेक्षाही वाईट प्रकाराने मर्दानगी गाजवणाऱ्या पुरुषांचे अत्याचार सहन केले होते. अर्थात, पाश्चात्य देशांनी सदावीचा सर्वार्थाने सन्मान केला होता.

१९९०मध्ये जेव्हा तिच्यावर इजिप्तमधून परागंदा होण्याची वेळ आली होती, तेव्हा तिने आपला वेळ नॉर्थ कॅरोलिनामधल्या ड्युक युनिव्हर्सिटीत अध्यापनात घालवला होता. असे असले तरीही तिच्या नजरेत पाश्चात्य हे नेहमीच वसाहतवादी शत्रू राहिले होते. २०११मध्ये इजिप्तमध्ये सत्ताधीश होस्नी मुबारक याच्याविरोधात असंतोष उफाळून आला. राजधानी कैरोमधल्या तहरीर चौकात लाखो लोक जमले. या आंदोलनात सामील होणे ही सदावीसाठी एक जैविक प्रक्रिया होती. ती वेळ, काळ, वय, व्याप सारे बाजूला ठेवून मुक्तीच्या त्या आंदोलनात सहभागी झाली होती.

२००५मध्ये याच होस्नी मुबारक याच्या विरोधात निवडणुकीत उभे राहण्याची सारी तयारी सदावीने केली होती. तिची ही धडाडी मुबारक यास सहन होणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याने तिच्यावर प्रसारमाध्यमांच्या पुढ्यात जाण्याबाबत बंदी घातली होती. संतापाच्या भरात तिच्याकडे बोट दाखवून, चेटकिणीशी तुलना करत सफेद केसांची म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिची यथेच्छ बदनामी चालवली होती. पुढच्याच वर्षी मुबारक याला आव्हान देत मुस्लीम ब्रदरहूडने जेव्हा निवडणुका जिंकल्या, तेव्हा भांडवलदारी पितृसत्ताक आणि पाश्चात्य राष्ट्रांच्या दावणीला बांधलेल्या या ब्रदरहूडला तिने नकार दिला. तिच्यासाठी ही राजकीय संघटनासुद्धा आधीच्या राज्यकर्त्यांइतकीच धोकादायक होती, आणि म्हणून आधीपेक्षाही अधिक मोठ्या आवाजात निषेध नोंदवणे गरजेचे होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एकदा लहान असताना सदावी आपल्या कुटुंबासह समुद्रकिनारी फेरफटका मारण्यात गेली होती. तेव्हा तिच्या भावांप्रमाणे छाती उघडी टाकून सूर्यस्नान घेण्यास तिला घरातल्या मोठ्यांनी मज्जाव केला होता. या भेदभावामुळे तिच्या मनाचा कमालीचा संताप झाला होता. नजरेसमोर समुद्राच्या लाटा उसळत होत्या, त्या लाटांवरून अफूची फुले वाहात किनाऱ्यावर पसरत होती आणि ती फुले पाहता पाहता तिच्या आत संताप उसळी मारून वर येत होता. ही फुले आधी कोवळी हिरवी असतात, नंतर निळी पडतात आणि सरतेशेवटी काळा रंग धारण करतात. यातला काळा रंग हे अन्यायाचे प्रतीक.

जग हे अन्यायाने भरलेले असते, अन्यायाची व्याप्ती वाढवणारी मुळे आणि शाखा दिसामाजी वाढतच असतात. तिच्यातल्या त्या भेदभावातून उद्भवलेल्या संतापाने अन्यायावर कधी मात केली असती? तिने त्यासाठी जीवतोड मेहनत तर नक्कीच घेतली असती...

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ मार्च २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘इकॉनॉमिस्ट’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकाच्या पोर्टलवर २७ मार्च २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......