किरण गुरव : ‘‘मला लिहिण्याविषयी प्रचंड जिव्हाळा आहे. प्रेम आहे. खेच आहे म्हटलं तरी चालेल. मग ते कथात्म साहित्य असू दे, ललित लेख असू दे!”
पडघम - साहित्यिक
संवादक : दत्ता घोलप
  • कथाकार किरण गुरव आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Wed , 02 March 2022
  • पडघम साहित्यिक किरण गुरव Kiran Gurav जुगाड Jugaad क्षुधाशांती भुवन Kshudhashanti Bhuvan श्रीलिपी Shreelipi बाळूच्या अवस्थांतराची डायरी Baluchya Avsthataranchi Diary राखीव सावल्यांचा खेळ Rakhiv Savlyancha Khel

प्रसिद्ध कथाकार किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या कथासंग्रहाला २०२१साठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने त्यांच्या एकंदर लेखनप्रवासाविषयीची ही मुलाखत तरुण समीक्षक प्रा. दत्ता घोलप यांनी घेतली आहे. साप्ताहिक ‘साधना’च्या २६ फेब्रुवारी २०२२च्या अंकात प्रकाशित झालेली ही मुलाखत ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

...................................................................................................................................................................

प्रश्न - सुरुवातीलाच आपले मन:पूर्वक अभिनंदन! साहित्य अकादमी पुरस्काराच्या या वर्षीच्या अंतिम निवड यादीत २०१८मध्ये प्रकाशित झालेली आपली ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ (कथासंग्रह) आणि ‘जुगाड’ (कादंबरी) ही दोन पुस्तके होती. अपवाद्‌भूत असे हे उदाहरण आहे. शिवाय मराठी साहित्य व्यवहारात उत्फूर्ततेने आपले स्वागत झाले. आपल्या लेखनाच्या या स्वागतार्हतेबद्दल काय सांगाल?

- तुम्ही म्हणता ती स्वागतार्हता मला समजण्याचे मार्ग फारच मर्यादित आहेत. एक तर वाचकांचा प्रतिसाद किंवा मग हे असे पुरस्कार वगैरे. तर ते वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेच. पण त्याचा फारसा विचार न करता मी आपला माझ्या परीनं लिहीत निघालो आहे. मला लिहिण्याविषयी प्रचंड जिव्हाळा आहे. प्रेम आहे. खेच आहे म्हटलं तरी चालेल. मग ते कथात्म साहित्य असू दे, ललित लेख असू दे. काही दिवसांपूर्वी पीएच.डी.साठीचं संशोधनही लिहून पूर्ण केलं. मी लिहिण्यात प्रचंड रमणारा माणूस आहे. चांगलं पुस्तक असेल तर वाचनासंदर्भातही हे होतं. अशा वेळी स्थलकालाचाही निरास होत असतो, हे नंतर लक्षात येतं. वाचनातून, लिहिण्यातून लौकिक जगात परतायला भाग पाडणारं व्यावहारिक कारण अनेकदा दुष्ट वाटत राहतं. भान हरपून लिहिलेलं जास्त वाचनीय असतं असंही माझं निरीक्षण आहे. वाचनीयता हा साहित्याचा चांगला निकष ठरतो. साहित्यात माणूस असतो. त्याची गोष्ट असते. काहीही विशेष न करता ती वाचनीय झाली की, लेखक म्हणून निर्मितीचा निर्मळ आनंद होतो. माणसांच्या जशा अनेक परी असू शकतात, तशा गोष्ट सांगण्याच्याही अनेक परी, पद्धती असू शकतात. तंत्रं असू शकतात. परंतु केवळ तंत्राच्या तरफेने गोष्ट उचलता येईल, असे वाटत नाही. त्यासाठी हाडामांसाचा जिवंत माणूस गोष्टीत असणे जसे आवश्यक आहे, तसाच वाचनीयतेचा टेकूही गोष्टीला असलेला बरा. बाकी तुमच्या प्रश्नाचं हे काही थेट उत्तर नव्हे. लेखक का स्वागतार्ह वाटतो, याचे उत्तर त्याचे वाचकच देऊ शकतील.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

प्रश्न - ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या संग्रहातील कथा आणि आपल्या एकूणच कथालेखना-संबंधीचा लेखकीय प्रवास जाणून घ्यायला आवडेल.

- चारी कथासंग्रह लेखनक्रमानुसार वाचले तरी तुम्ही म्हणता त्या लेखकीय प्रवासाची कल्पना येऊ शकेल. किंवा कुणी विरुद्ध दिशेनं तपास करत गेला तरी त्याला मुळापर्यंत पोहोचता येईल. या प्रवासातल्या काही कथा वैयक्तिक अर्थाने महत्त्वाच्या ठरतील. काही नुसतेच खाचखळगे ठरतील. मी नंतर त्यांच्यावर काही पॅचवर्क केलेलं नाही किंवा तो प्रवास पुस्तकातून वगळलेलाही नाही. जसा झाला तसा पुस्तकात ठेवलेला आहे. त्यामुळे पुस्तकातूनच सुरुवातीचा ओबडधोबड, अनघड प्रवास ते आजअखेरचा प्रवास कळू शकेल. कथा, मग दीर्घकथा, लघुकादंबरी, मग कादंबरी असा काहीतरी माझ्या एकूण लिहिण्याचा प्रवास आजपर्यंत झालेला दिसतो.

मला सुरुवातीला कथाच लिहायची होती. कारण मिळालेला वाचनाचा खुराक तसा होता. वाचक म्हणून आपण जे पेरून घेतो, तेच कालांतरानं उगवून येतं. हळूहळू मला कथेचा आवाका कळू लागला. कथा ही माळरानातून वाहणाऱ्या एखाद्या ओढ्यासारखी असते. त्या ओढ्याची म्हणून एक जैविक परिसंस्था असते. त्यात त्याचं पाणी, त्यातले जलचर, उभयचर, काठावरची पशू-पक्षी-वनस्पतिसृष्टी, असलाच तर मानवी हस्तक्षेप अशा सगळ्या गोष्टींनी ती बनलेली असते. नदी आणि समुद्रासारखी ओढ्याची परिसंस्था बृहद आणि महाकाय नसते. सीमित असते. पण तिच्या दृष्टीनं परिपूर्ण आणि जिवंत असते. निसर्गात तिचं म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असतं. तसंच साहित्यविश्वात कथेचं स्थान होतं आणि राहील. कादंबरीसारखा हा बृहद आणि महाकाय साहित्यप्रकार नव्हे, एवढे भान असले तरी पुरे. लेखकीय प्रवास हा अशा अनेक भानांपर्यंतचा प्रवासही असतो.   

प्रश्न - ‘इंदूलकर : चरित्र, काळ आणि निर्मिती यांची अन्वेषण कथा’ या कथेत कथारचनेचे वेगवेगळे आयाम आहेत. एकाच वेळी वास्तव आणि कल्पित, अनुभवकर्ता आणि कथनकर्ता सादरीकरणाच्या झटापटीत एकूण कथेचा अद्भुताकडे होणारा प्रवास आणि या प्रवासात सामावणारा वाचक ही वेगळ्या परिमाणाची कथा आहे. याविषयी काय सांगाल?

- या कथेचे निवेदक इंदूलकर हे लेखक आहेत. आणि आयुष्याशी एक प्रकारचा गनिमी कावा करत त्यांनी त्यांच्यातला लेखक जिवंत ठेवलेला आहे. चारचौघांसारखं इंदूलकरांनाही ऑफिस आहे, घरकुटुंब आहे. या सगळ्यांच्या इंदूलकरांकडून ठरलेल्या त्याच त्या अपेक्षाही आहेत. समंजस कर्तव्यभावनेनं इंदूलकर या अपेक्षांना भिडलेले आहेत, परंतु त्यांच्या मनातला आणि मेंदूतला लेखकाचा तिसरा डोळा कायम जागृत आहे. हा तिसरा डोळा जन्म आणि मरण, निसर्ग आणि जीवसृष्टी, यातलं इंदूलकरांचं ‘असणं’ ही एक अद्‌भुत गोष्ट आहे, हे सतत इंदूलकरांना दाखवत असतो. बरं, हे ‘असणं’ परत एका लेखकाचं आहे, याचाही साक्षात्कार इंदूलकरांना झालेलाच आहे. ज्याच्यातूनच खरं तर त्यांच्या जीवनविषयक गनिमी काव्याची सुरुवात झालेली आहे. इंदूलकर अगदी त्यांना झोपेत पडलेल्या स्वप्नातही अविस्मरणीयपणे लेखकच आहेत. स्वप्नात ते जीवसृष्टीचा एक छोटासा रहस्यकथा लेखक म्हणून स्वत:ला बघतात. ज्या रहस्याच्या त्यांना शोध घ्यायचा आहे, त्यासाठीचे सिक्रेट एजंटही ते स्वत:च आहेत, हे आणि वर. लौकिक इंदूलकर आणि लेखक इंदूलकर असा हा मजेशीर सामना आहे. या दोघांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या साहित्यकृतीही एकाच पेनात दोन वेगवेगळ्या रंगांची शाई भरावी आणि त्यातून तिसऱ्याच एखाद्या रंगाचं अक्षर कागदावर निर्माण व्हावं किंवा उमटावं, तशा झालेल्या आहेत. इंदूलकरांच्या दृष्टीनं त्यांच्या साहित्यसंहिता किंवा साहित्यकृती याच त्यांच्या खऱ्याखुऱ्या एलआयसी पॉलिसीज आहेत. ‘योगक्षेम वहाम्यहम्‌’. ज्या त्यांच्या जीवनासोबत काय, त्यानंतरही राहतील आणि वाचक हेच या पॉलिसींचे खरे वारसदार असतील. वाचकांनाच इंदूलकर आपले मित्र, पुत्र, मुक्तिदाता वगैरे मानून मोकळे होताना दिसतात.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा : ‘जुगाड’ : निमशहरी भागातल्या तरुणांचं शहरात आणि निमशहरात होणाऱ्या परवडीचं प्रातिनिधिक चित्र

..................................................................................................................................................................

प्रश्न - ‘बाजार : दि मार्केट’ या कथेत खेड्यातील परस्पर विनिमय बाजारापासून आपल्याला फक्त ग्राहक बनवणारे मार्केट येते. या बाजारू काळाच्या कोसळणीकडे आपण लेखक म्हणून कसे पाहता?

- खेड्यातील परस्पर विनिमय हा परस्पर सहकार्यावर आधारलेला होता. तो आता फारच मर्यादित झाला आहे. नाही म्हणायला सुगीच्या वेळी किंवा इतर वेळी लोक एकमेकांना लक्षात ठेवून का होईना, पण थोडी मदत करतात परतफेडीच्या अपेक्षेने. कष्टाचा परस्पर विनिमय थोडाफार तरी शक्य आहे. पण वस्तूंचा असा विनिमय जवळपास नगण्य झाला आहे. वस्तूंसाठी जवळपास सगळेच आजकाल बाजारावर अवलंबून. त्याची सुरुवात अगदी बी-बियाण्यांपासून आणि खतांपासून होते. कुणी मान्य करो, न करो, बाजार आता आपल्या जगण्याच्या केंद्रभागी येऊन चुकलेला आहे. या बाजाराचे स्वयंघोषित तत्त्व परत स्पर्धेचे आहे. ते लोकप्रिय असले तरी अनेकदा फसवेच असते. आपल्या समाजात निकोप स्पर्धा, समान संधी यांविषयी बोलणंही पुष्कळदा भाबडेपणाचं ठरतं.

‘बाजार : दि मार्केट’ ही कथा लिहून मी बाराएक वर्षं झाली. या काळात तंत्रज्ञानाचा आणि त्याच्या आडून भांडवलशाहीचा हात धरून तुम्ही म्हणता तो बाजार आणखी फोफावला. भांडवलशाहीला आता एकमेव आणि ‘आक्षीर इलाज’ भांडवलशाहीच आहे की काय असे वाटते. ‘गब्बर से तुम्हे एकही आदमी बचा सकता हैं, वह हैं खुद गब्बर!’ हा गब्बर नवा आहे, जुनाच आहे, क्रोनी आहे की, आणखी कसला आहे, याची चर्चा करणेही ‘नाही रे’ वर्गाच्या दृष्टीने निरर्थक ठरते. तो लूटमार करणाराच ठरतो. जगभरच्या लोकशाहींचा आणि अगदी हुकूमशाहींचाही ‘स्क्रीन प्ले’ हा गब्बर नामक घोस्ट रायटरच लिहितो आता बहुतेक. सर्वत्र त्याचेच कडक डायलॉग, त्याचाच स्टेरिओफोनिक साउंड, त्याचेच आक्रस्ताळी म्युझिक आणि त्याने निर्माण केलेली पात्रे. या पात्रांना तुम्ही आवडणारी राजकीय, सामाजिक, वैचारिक वगैरे नावे देऊ शकता. तेवढे स्वातंत्र्य तुम्हांला आहेच. अशी छोटी छोटी स्वातंत्र्ये किंवा खरं तर त्यांच्या कालमर्यादित ऑफर्स तुमच्यासाठी आहेत. त्या स्वीकारून मर्यादा पुरुषोत्तमासारखे आपण हळूहळू संवेदना पुरुषोत्तम होत जातो. या काळातील बाजाराचे दग्धभू धोरण एकदा आपण माणूस म्हणून स्वीकारले की, ग्राहक म्हणून संवेदना घडवणे एकदम सोपे जाते. आपल्यालाही आणि बाजारालाही. कुणाला हे सगळंच कदाचित थोडसं लाऊड वाटेल. पण गजबजलेल्या बाजारात नीट ऐकू जाण्यासाठी थोडंसं चढ्या आवाजात बोलावं लागतं, तसं हे समजण्यास हरकत नाही.

प्रश्न - ‘काळी कपिला गाय’ या कथेत सतीश या पात्राच्या मनात येणारे विचार आहेत, ‘पोट भरायला आपण शहराची वाट धरली आणि शहरानं आपल्याला पोटापुरतीच वाट दाखवायला सुरुवात केली काय?’ गावखेड्यातून शहरात येताना होणाऱ्या मूल्यविहीन वाटचालीकडं आपण कसे पाहता?

- ‘काळी कपिला गाय’ या कथेचा एकंदरीत बाज आणि लेखनसमय वेगळा आहे. ही कथा लिहून बरीच वर्षं झालेली आहेत. आपण ज्याचा उल्लेख केला ते विधान सतीश या पात्राच्या मनात कथेच्या ओघात येणारा एक विचारतरंग आहे. त्याला सुटं काढून तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली घेतलं आहे. पण हरकत नाही. कथेतल्या सतीशच्या मनाला एक टोचणी लागलेली आहे. मित्रासमान असलेल्या एका जवळच्या नातलगाचा मृत्यू झालेला आहे आणि अशा विदारक प्रसंगी पोटाची भूक कशी त्याचा पाठलाग सोडत नाही, मग तो एका स्थानिक हॉटेलात जातो, तिथले घटना-प्रसंग यांच्या संदर्भाने वरील विचारतरंग त्याच्या मनामध्ये येतो. त्याला बाकीचेही काही तृष्णात्मक कंगोरे आहेत. ते वैयक्तिक आहेत. तुमचा प्रश्न थोड्या वेगळ्या स्तरावरचा आहे. पोट भरण्यासाठी खेड्यातील अनेक लोक शहराची वाट धरतात. टिकून राहण्यासाठी हा मार्ग अनेकांना पत्करावा लागतो. त्यामुळे गावखेड्यातून शहरात होणारं सगळं स्थलांतर मूल्यविहीनच असतं, असं सरसकट म्हणता येणार नाही. कारण अनेकदा त्याचा तसा उद्देश नसतो. परंतु, स्थलांतर म्हटलं की पडझड आलीच. शहरात येऊन या लोकांना पोट भरण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. टिकून राहण्याच्या संघर्षात मूल्य अनेकदा बाजूला पडल्यासारखं होतं. सत्त्व बासनात गुंडाळून ठेवावं लागतं. सत्त्वाचं असं असतं की, ते एकदा गेलं की जातंच. त्याच्या बाबतीत ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती’, अशी परिस्थिती असते. ‘भूमी’ या कथेतला गावातून शहरात आलेला निवेदक म्हणतो, ‘‘आलीच कधी गावाची आठवण तर लावला आपला टीवी. तेच्यावरच्या भरजरी लावण्या बघितल्या, एसी स्टुडिओतले आदिवासी डान्स नाही तर शाहिरी गाणी, गोंधळबिंधळ बघितले की झालं. हाय काय त्यात? आयुष्य कसं मग बिनगिअरच्या गाडीसारखं स्मूथ वाटतंय.’’ या पद्धतीचं स्मूथ आयुष्य आजकाल बहुतेकांना मिळालं तर हवंच आहे. त्यासाठीचं स्वसमर्थनही आपोआप तयार होऊ लागतं. तुम्ही म्हणता ते मूल्य किंवा सत्त्व आणि एखाद्या पात्राचं स्वसमर्थन यांच्यात ज्या ज्या वेळी माझ्या कथेत संघर्ष किंवा टकराव निर्माण होतो, त्या त्या वेळी कथेचे निवेदन आणि भाषा आपोआप उपहासाच्या पातळीवर उतरते. दुसरा कुठला मार्ग मला लेखक म्हणून दिसत नाही.

प्रश्न - बदलत्या काळगतीने निर्माण झालेले नवे पेच, ग्रामरचनेतील बदलते सत्तासंबंध, दोन पिढ्यांमधील अंतराय हा संबंध बदलाचा अवकाश त्याच्या मूल्य-टकरावासह येतो. हा आपल्या कथालेखनाचा पायाभूत भाग आहे. याविषयी काय सांगाल?

- लिहिताना हे काही फार जाणीवपूर्वक होत नाही. कथा किंवा कादंबरी लिहिताना कथानकाशी भाषेसवे आपण नकळत एकजीव झालेलो असतो. परंतु त्यासाठी आपलं पूर्वायुष्यच एक प्रकारची रसद पुरवत असतं. गेली दोन दशकं मी लिहीत आहे. त्या पूर्वीपासून हाताला लागेल ते वाचत आहे. या सर्व काळात आजूबाजूच्या वर्तमानाचा कानोसा घेत असताना, माणूस म्हणून माझ्या आत काय काय झिरपत गेलं आणि साठलं, तेच यथावकाश

झऱ्यासारखं ठिकठिकाणी माझ्या लेखनात प्रकटलं आहे. जगलेलं, पाहिलेलं, अनेक मार्गांनी आपल्याला समजलेलंच लिहिण्यात येतं. दुसरं काय येणार? त्यात तुम्ही म्हणता ते बदलत्या काळगतीचे पेच, ग्रामरचनेतील बदलते सत्ताबदल आले असतील. दोन पिढ्यांमधील अंतराय हा तर कायमचाच विषय आहे. ‘श्रीलिपी’ या प्रदीर्घ कथेमध्ये हे सगळंच फार एकात्मिक पद्धतीनं आलेलं आहे. खरं तर ते नेहमीच लिहिताना एकात्मिक पद्धतीनं येतं, यावं. त्यातच भलाई असते. आशय वेगळा, कथानक वेगळं, भाषा वेगळी, मांडणी वेगळी असं सहसा होत नाही. तसं झालं तर अडचणीचं होतं. आपण ज्याचा वर उल्लेख केलेला आहे किंवा असे आणखीन काही मुद्दे असतील, तरी लिहिताना ते फार एकात्मिक पद्धतीनं एकजीव होऊन कथेत प्रकटतात. वर झऱ्याचं उदाहरण आपण घेतलेलंच आहे. तेच पुढं घेऊन जायचं तर त्याच्या पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन जसे नैसर्गिकपणे एकत्र आलेले असतात, तसेच साहित्य-कृतीमध्ये तुम्ही म्हणता ते वेगवेगळे मुद्दे एकत्र आलेले असतात. अगदी एकजीव झालेले असतात. त्यांना वेगळं करता येत नाही.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा : ‘क्षुधाशांती भुवन’ : किरण गुरव हा समकालीन मराठी साहित्यातला अत्यंत मौलिक, टाळता येणार नाही, असा ‘थांबा’ आहे...

..................................................................................................................................................................

प्रश्न - एक वेगळा प्रश्न. आपल्या कथेत येणारे स्त्रीजीवनाचे संदर्भ स्वतंत्रपणे विचारात घ्यावे असे आहेत. वेगवेगळा वयोगट, नातेसंबंध आणि शेतशिवार ते कुटुंबातील राबणुकीचा सततचा संदर्भ स्त्रीच्या जाणीव-विश्वाला आहे. याविषयी जाणून घ्यायला आवडेल.

- आपण म्हणता ते स्त्रीजीवन माझ्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या पहिल्याच कथासंग्रहात विशेष करून आलेले आहे. त्यासाठी मला विशेष काही करावे लागलेले नाही. लहानपणापासूनच स्त्रीजीवन, त्यातले कष्ट, राबणूक, हतबलता आणि एकंदरीतच त्यातील हर्षाखेदाच्या जागा यांच्याशी मी परिचित होतो. असा परिचय होतच खेडेगावात आपण वाढतो. माझ्या आजूबाजूच्या, घरातील आणि घराबाहेरच्या स्त्रिया यांचं जगणं मी बघतच होतो. त्यांची भाषा ऐकत होतो. ही भाषा खाजगीत वेगळीच असायची. चारचौघांसोबतच्या जगव्यवहारात वेगळीच शहाणपणाची असायची. गल्लीतल्या किंवा शेतातल्या भांडणात तिचं आणखी उग्र रूप समोर यायचं. ही भाषा आणि तिच्या आडून डोकावणारं एकंदरीत स्त्रीजीवन यांच्याकडं पूर्वीपासून खूप आत्मीयतेनं बघत आलो आहे. अर्थात या स्त्रीजीवनाकडे निखळ मानवी दृष्टीनंच पाहणं इष्ट आहे. प्रसंगपरत्वे त्यात निखालस दुष्टपणा येऊ शकतो. स्वभावाचा भाग म्हणून असेल किंवा परिस्थितीचा भाग म्हणून आलेला असेल, टोकाचा आपले-तुपलेपणा असतो. संकुचितपणा असतो. त्यामुळे ते सगळेच स्त्रीजीवन देदीप्यमान आणि कायमच नतमस्तक होऊन पाहावे असे असत नाही. आपल्यातला पुरुषी अपराधगंड कदाचित तसे म्हणू शकतो. परंतु सत्याच्या आणि न्यायाच्या तागडीत दीड दांडीचे वजन शक्य नसते.

हे सगळे जरी असले तरी ग्रामीण स्त्रीजीवनातला पीळ अनेकदा विलक्षण असतो. कष्टाला निरंतर धडक देण्याची वृत्ती, सोशीकपणा अचंबित करणारा असतो. भाषा आणि धडधाकट विनोदबुद्धीही तशीच. त्यामुळे एखादा भाजीवाला जसा माप भरल्यावरही दोन-चार हिरव्या मिरच्या, शेंगा, तागडीत आपलेपणानं टाकतो, तशी या स्त्रीजीवनाच्या पारड्यात माझी मूठभर सद्‌भावना मी आठवणीनं वर टाकीन.

प्रश्न - आपला कथाविष्कार टोकदार होण्यात भाषायोजनेचे महत्त्व अधिक आहे. एकूणच आपल्या कथालेखनातील भाषा उपयोजनामागील भूमिका जाणून घ्यायला आवडेल.

- फार पूर्वीपासून मला भाषेची, शब्दांची मोडतोड करण्याची खोड होती. भाषा आणि विशेषत: शब्दांची मोडतोड करून त्याच्यापासून नवीन काही तयार होतंय किंवा काय, हे बघण्याचा छंदच होता. एखादा लोकल मेकॅनिक जसा मोटारसायकलचं इंजिन खोलून दुरुस्त करण्याच्या नादात, ते जादाच बिघडून ठेवतो- तर त्या पद्धतीचा तो छंद होता. शाळेत आणि हायस्कूलमध्ये काही भोळेभाबडे विद्यार्थी त्यांचे निबंध माझ्याकडे दुरुस्तीला टाकत असत. मीही भाषेचा गावठी मेकॅनिक ते दुरुस्त करून देत असे. हायस्कूलमध्ये सहावी-सातवीतच कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. डाकू-दरोडेखोर, सावकार, त्याची मुलं, ती पळवणं, असा मोठा बेत मनाशी होता. पण तीन-चार पानांत तो आटोपला. पुढं कसं जावं ते समजेना. जादूची अंगठी किंवा जादूची काठी या पद्धतीनंही पुढं जाऊसं वाटेना. कारण घरात किंवा शाळेत काही आगळीक घडली की, जो हाग्या मार त्या वेळी पडायचा आणि तो टाळायला कोणतीही जादूची काठी किंवा अंगठी कधीच मदत करायची नाही.

सांगण्याचा उद्देश हा की, का कुणास ठाऊक मला लिहिण्याची पूर्वीपासून उबळ होती. आणि त्यासाठी घराचं छप्पर शाकारल्यासारखी भाषा थोडी नवी-जुनी करावी, उलथी-पालथी करावी, जुने शब्द मोडून नवीन काही घडतंय काय बघावं असंही वाटायचं. पुढं खरोखरंच ज्या वेळी मी कथा लिहू लागलो, त्या वेळी पूर्वी कधीतरी केलेला भाषिक उपद्‌व्याप उपयोगी पडतो, हे लक्षात येऊ लागलं. पण व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची धास्ती होती. ती वेळीच काही भल्या लोकांच्यामुळं दूर झाली. सुरुवातीच्या कथा लिहिताना गावखेड्यातील कष्टकरी स्त्रियांची प्रखर भाषा उपयोगाला आली. पण किती केले तरी माझ्यासाठी तो परप्रकाश होता. लेखकासाठी भाषेचा परप्रकाश उपयोगी नसतो. पुढं शहरात आल्यावर तो परप्रकाशही दूर गेला. हळूहळू त्याची दूरस्थ लुकलुकही मंदावत गेली. मलाही भाषेचं एकच एक वळण गिरवून लिहिण्यात समाधान वाटत नव्हतं. काळ पुढं सरकतो. आयुष्य थांबत नाही.

सुदैवानं लेखक केवळ लिहूनच होता येतं. असंच लिहिता लिहिता कधीतरी मला माझी भाषा सापडल्यासारखी झाली. अलीकडे एका लेखात ‘भाषा म्हणजे मन’ अशी सुटसुटीत, सुबोध व्याख्या मी केली आहे. ती चुस्त आणि टाइट असल्याचा अभिप्राय आदरणीय नंदा खरेसरांनी दिला आहे. मला ही व्याख्या आजकाल खूप आवडते. कारण ‘मौनराग’ या पुस्तकातील एलकुंचवारसरांची भाषा किंवा ‘कालकल्लोळ’ या पुस्तकातील अरुण खोपकर यांची भाषा, हा मुळात त्यांच्या विकसित आणि प्रगल्भ मनाचा भाषिक आविष्कार असतो. जगातील उत्तमातील उत्तम ज्ञान आणि कला स्वभाषेत लीलया पेलण्याचा चमत्कार त्यामुळे घडून येतो. ही साधी-सोपी गोष्ट नव्हे, हे काही मनस्वी लोक त्यांच्या पद्धतीने नकळत सिद्ध करत असतात. चार-चार, आठ-आठ ओळींचे एक एक वाक्य लिहूनही अर्थाच्या गावालाच काय, देशाला किंवा खंडालाही न लागता भरकटलेल्या समुद्री गलबतासारखे कुठंतरी आपले ते निघालेले असतात.

प्रश्न - जयंत पवार, आसाराम लोमटे, समर खडस, प्रतिमा जोशी, शिवाय आपल्याबरोबर आणखी काही नावे घेता येतील. ज्यांनी कथा या प्रकाराला अधिक उन्नत केले. या समकालीन कथालेखनाकडे आपण कसे पाहता?

- गेल्या एक-दोन दशकांत चांगली कथा लिहिली जात आहे. आपण उल्लेख केलेले सगळेच कथाकार खूप महत्त्वाचे आहेत. जबरदस्त कथा लिहिणारे काही कथाकार नुकतेच लिहू लागल्यानं कथेचा भविष्यकाळही उज्ज्वल दिसतो. परंतु आजच्या कथेचा विचार करत असताना, थोडं मागंही बघणं आवश्यक आहे. खरं तर ऐंशी आणि नव्वदीच्या दशकांतही कसदार कथा लिहिली जात होती. परंतु ती कादंबरीच्या तत्कालीन प्रभावाखाली झाकोळल्यासारखी झाली. रंगनाथ पठारे, राजन गवस, मेघना पेठे, भास्कर चंदनशीव यांची कथाकार म्हणून कामगिरी लक्षणीय आहे. कठीण काळात या लोकांनी कथेचे निशाण फडकत ठेवले.

गेल्या चार-पाच दशकांचा धावता विचार करताना माडगूळकर आणि भाऊ पाध्ये हे महत्त्वाचे कथाकार नोंदवता येतात. माडगूळकरांच्या कथेत समग्र ग्रामीण समाज येतो. म्हणजे गावची काळी, पांढर, आलुतेदार, बलुतेदार, भटके विमुक्त, दलित, पशू-पक्षी-वनस्पतिसृष्टी, अरण्य असं गावाच्या संदर्भातलं सगळंच माडगूळकरांच्या कथेत येतं. भाऊ पाध्ये यांच्या कथेतही महानगरी मुंबईचे जवळपास सगळे स्तर येतात. म्हणजे अगदी हाय क्लास सोसायटीपासून मध्यमवर्ग, चाळीतला कनिष्ठ मध्यमवर्ग, झोपडपट्टी ते थेट अगदी रस्त्याकडेच्या उकिरड्यावरचं जगणंही त्यांच्या कथेत येतं. माडगूळकर आणि भाऊ पाध्ये यांची कथा जगण्यातील समग्रता अधोरेखित करते.

आजची कथा तुम्ही सूक्ष्मपणे बघितली तर शेतकरी किंवा शेतमजूर यांच्यावर लिहिणारा एखादा कथाकार असतो. भटक्या विमुक्तांवर लिहिणारा परत एखादा वेगळा कथाकार असतो. दलित कथा लिहिणारा आणखीन एखादा. पशू-पक्षी-वनस्पतिसृष्टी यांच्यासह अरण्यवाचन करणारा आणखीन वेगळा. गावातून शहरात येऊन हवालदिल झालेला एखादा असतो. आजच्या महानगरीय कथेबाबतही हे थोड्या प्रयत्नांती म्हणता येतं.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा : ‘क्षुधाशांती भुवन’ : एका छोट्याशा खेड्यातलं राजकारण आणि समाजकारण कुठल्या भीषण पातळीवर पोहोचलं आहे, याचं भेदक चित्रण

..................................................................................................................................................................

आजचा जमाना हा स्पेशलायझेशनचा आहे. या काळातले सगळेच महत्त्वाचे कथाकार निर्विवादपणे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांत अधिक सूक्ष्म आणि मौलिक कथा लिहीत आहेत. ती कालसुसंगतच आहे. पण तिचा थेट संबंध जगण्यातील समग्रता हळूहळू संपुष्टात येण्याशी दर्शविता येतो. किंवा आपोआप मर्यादित आणि कप्पेबंद होत जाण्याशी जोडता येतो.

बाकी समकालाकडे बघताना जयंत पवार यांच्यासारखा श्रेष्ठ कथाकार या काळात झाला, याचा आनंद आणि अभिमान वाटतो. पण तिथंही परत असा कथाकार तयार होण्यापूर्वी त्याच्या गिरणगावाने आडमाप कष्ट अहोरात्र उपसलेले असतात. अंधारात टाचा घासलेल्या असतात. अर्थात त्या कष्टाचा उद्देश काही जयंत पवारांसारखा कथाकार निर्माण व्हावा असा नसतो. ती त्यांची रोजच्या भाकरीसाठीची लढाई असते. पण त्या जीवांनाही वाटत असतं की, भाकरीशिवाय आणखीन काही तरी अर्थ आपल्या आयुष्याला असला पाहिजे. आपण तो दिला पाहिजे. त्याच्यातून ते मग वारीला जातात. भजनी मंडळ स्थापून विठ्ठलाला आळवतात. आपली वेगळी कामगार रंगभूमी निर्माण करतात. तमाशे आणि मेळे उभे करून आपल्या कष्टप्रद जगण्याला अर्थ देऊ पाहतात. जयंत पवारांसारखा लेखक हा कष्टकरी जगाची दैनंदिन लढाई आणि तिला अर्थ देण्याचा या वर्गाने केलेला प्रयत्न, यांच्या निरंतन घुसळणीतून निर्माण होत असतो. क्वचित अशी प्रतिभा निर्माण होते.

साहित्य आणि समाज यांचा संबंध काय, असा प्रश्न काही लोक अधूनमधून विचारत असतात. वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता, हा प्रश्न विचारण्यापूर्वी या लोकांनी विचार करायला हवा.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा