रा. रा. डोनाल्ड ट्रम्प, तुमची खूप खूप आठवण येते...
पडघम - विदेशनामा
संकल्प गुर्जर
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली काही व्यंगचित्रे
  • Thu , 20 January 2022
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump सीएनएन CNN वॉशिंग्टन पोस्ट The Washington Post जो बायडेन Joe Biden लोकशाही Democracy

२०१७ ते २०२० अशी चार वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द २० जानेवारी २०२१ रोजी संपली आणि जो बायडेन यांची कारकीर्द सुरू झाली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे अनावृत्त पत्र लिहिले आहे.

..................................................................................................................................................................

रा. रा. डोनाल्ड ट्रम्प यांसी,

(भारतातून) सप्रेम नमस्कार.

आता तुमची अध्यक्षीय कारकीर्द संपून एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी, ६ जानेवारीला तुमच्या समर्थकांनी अमेरिकी लोकशाहीच्या मानबिंदूवर, कॅपिटॉल हिलवर जो धुमाकूळ घातला, त्यालाही आता एक वर्ष झाले आहे. तुमच्या नेतृत्वाखाली अनुभवलेल्या अतिशय वादळी अशा चार वर्षांनंतर (२०१७-२०२१) अमेरिका आणि जग पुन्हा एकदा मूळपदावर येत आहे. जो बायडेन यांनी कार्यक्षमपणे अमेरिकेचा कारभार हाकायला सुरुवात केली आहे. अर्थात कोविडचे संकट संपलेले नाही, अफगाणिस्तानातून अमेरिका मानहानीकारक पद्धतीने बाहेर पडलेली आहे आणि अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातील ध्रुवीकरण अधिकच तीव्र झाले आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर, तुमची आठवण येणे अगदीच साहजिक आहे ना?        

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अमेरिकेच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासात होऊन गेलेल्या ४६ अध्यक्षांपैकी अनेकांना वाचन करण्याची, डायरी लिहिण्याची सवय होती. पण अध्यक्षीय जबाबदाऱ्या बाजूला ठेवून असल्या फालतू गोष्टींत वेळ घालवणाऱ्या अध्यक्षांच्या परंपरेपासून तुम्ही पूर्णतः फारकत घेतली. ‘फॉक्स’सारख्या तुम्हाला हवे तेच दाखवणाऱ्या आणि तुमच्या विरोधकांवर जोरदार टीका करणाऱ्या टीव्ही वाहिन्या आणि टि्वटरसारखी ‘शहाणी’ माध्यमे हाताशी असताना इतर काही म्हणजे वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके वाचण्याची गरजच नाहीशी झालेली आहे, हे ओळखणाऱ्या द्रष्ट्‌या जागतिक नेत्यांच्या मालिकेचे तुम्ही शिरोमणी! त्यामुळे हे पत्रही व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून ‘फॉक्स’ला पाठवावे किंवा टि्वटरवर टाकावे असे वाटले होते. पण तुमच्यावर टि्वटरने बंदी घातलेली आहे आणि ‘फॉक्स’च्या उच्च दर्जाला व तुमच्या लौकिकाला साजेसे हे पत्र नाही, असा माझा समज आहे. त्यामुळे व्हिडिओ किंवा टि्वट न करता जुन्याच पद्धतीचे असे हे पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. गोल्फ खेळणे, टॅक्स चुकवणे, विरोधकांची यथेच्छ हेटाळणी (बऱ्याचदा तर बदनामी) करणे, आणि ‘रिपब्लिकन’ पक्षाच्या समर्थकांना आपल्याच नेतृत्वाविरुद्ध चिथावणी देणे, अशा तुमच्या कार्यव्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तुम्ही हे पत्र वाचलेत तर मला आनंदच वाटेल.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, रा. रा. बायडेन यांच्या हाती सत्तेची सूत्रे आल्यापासून जगण्यातली मजा निघून गेली आहे, असे रोज वाटते. तुम्ही अतिशय ‘विचारपूर्वक’ घेतलेले निर्णय बायडेन यांनी फिरवले आहेत. त्यांनी अमेरिकेला वातावरण बदल रोखण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पॅरिस कराराच्या कक्षेत आणले, इराणशी पुन्हा अणुचर्चा सुरू केली, रशियावर अधिक कठोर निर्बंध लादले, युरोपला आश्वस्त केले आणि एकूणच जागतिक राजकारणाला वेगळे वळण द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही सत्तेत असताना पुतिन यांच्या चेहऱ्यावर एक लबाड-मिस्कीलपणा दिसत असे. आता त्याची जागा चिंतेने घेतलेली आहे, यातच नेमका काय बदल झाला आहे, हे कळून चुकते.

तुमच्या चार वर्षांच्या काळात तुम्ही कसे मनात आहे ते आणि वाटेल त्या शब्दांत बोलण्याचा प्रामाणिकपणा दाखवत राहिलात. त्यामुळे उत्तर कोरियाच्या किम जोंग ऊन ला ‘रॉकेटमॅन’ ही (शिवीपर) उपाधी तुम्ही दिलीत व स्वतःला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी अमेरिकेच्या या शत्रूला भेटायलासुद्धा गेलात. राजकीय हेतू आणि शब्दांची इतकी ‘क्लॅरिटी’ फार कमी जणांकडे असते! त्याउलट आताचे अमेरिकेचे सत्ताधारी बघा- ते मुत्सद्देगिरीच्या नावाखाली घासून घासून गुळगुळीत व अर्थहीन झालेले शब्द वापरत असतात. तुमच्या रोखठोक भाषेमुळे आणि बेधडक निर्णयांमुळे अन्य देशांचे नेते नाराज होत असत, तुम्हाला ते हसत असत आणि तरीही ते आपल्या खऱ्या भावना तुमच्यापासून लपवत असत. किती हा अप्रामाणिकपणा!

महासत्तेच्या अध्यक्षाने ओबामांसारखे समजूतदारपणे वागायचे नसते, तर बेमुर्वतखोरपणे, एककल्लीपणे, मनाला वाटेल तसे आणि इतरांची पर्वा न करता एखाद्या अनियंत्रित सम्राटासारखे वागायचे असते; मित्रांना दुखवायचे असते आणि शत्रूची प्रशंसा करायची असते, कायद्याचे राज्य, लोकशाही, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि संकेत वगैरेसारख्या निरुपयोगी गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते, इत्यादी धडे जगाला शिकवण्याचे श्रेय तुम्हाला कोणीच देत नाही. हे पाहिले की, किती वाईट वाटते!

‘खोटं बोला, पण रेटून बोला’ या कलेत जगातील अनेक नेते माहीर आहेत. पण त्या सर्वांना मागे टाकेल इतके तुमचे या कलेवर प्रभुत्व होते. त्यामुळे तुम्ही काहीही बोललात की, ते खरे आहे का, ते अध्यक्षीय परंपरेत बसते का, अमेरिकी अध्यक्षाने असे बोलावे का, वगैरे निरर्थक चर्चा घनघोरपणे सुरू होत असत. त्यामुळे अमेरिकेतील आणि जगातील टीव्ही वाहिन्यांना, वर्तमानपत्रांना, संपादकीय लेखकांना आणि अभ्यासकांना किती काम मिळत असे! ट्रेव्हर नोआ आणि जॉन ऑलिव्हर यांच्यासारख्या विनोदी टीव्ही शो होस्ट्‌सना लोकप्रियता मिळवून देण्यात तुमचा खूप मोठा वाटा होता. तुम्ही नसता तर त्यांनी रोज रात्री कोणाची रेवडी उडवली असती? हॉलिवुडच्या आघाडीच्या कलाकारांना उदारमतवादी राजकीय भूमिका आहेत आणि त्या किती पक्क्या आहेत, याची ओळख साऱ्या जगाला तुम्ही करून दिलीत. (त्यांना पाहिले की, इतर देशांतील सिनेस्टार्स कसे कचकड्याचे आहेत, ही विदारक जाणीवदेखील होत असे!) त्यामुळेच तुमच्या काळातल्या ऑस्कर सोहळ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. 

तुमच्यावर टीका केली की, जगभरात अनेक डाव्यांना जेवण सुखाने जात असे. तुमची बाजू हिरीरीने मांडली की, उजव्यांना त्यांचे कर्तव्य केल्याचे समाधान मिळत असे. तुमच्या एकूण कर्तबगारीमुळे डावे आणि उजवे असे दोन्ही बाजूचे लोक कायम कामात मग्न असत. त्यामुळे तुम्ही केवळ अमेरिकेतील बेरोजगारी कमी केली असे नव्हे, तर बाकीच्या जगातील बेरोजगारांना घरबसल्या काम मिळवून दिले. याचे शेय तुम्हाला का दिले जात नाही, याचे फार आश्चर्य नेहमीच वाटते.

तुमच्यामुळे अमेरिकेत वर्षानुवर्षे उपेक्षिल्या गेलेल्या, वर्णश्रेष्ठत्त्व मानणाऱ्या गौरवर्णीय गटांना राजकीय बळ मिळाले. स्त्रिया, कृष्णवर्णीय आणि उदारमतवादी विचारसरणी याविषयी या गटांची मते इतकी टोकाची असतात की, मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना यापूर्वी ती झेपणे कधीही शक्य नव्हते. मात्र असल्या क्षुल्लक गोष्टींची काळजी तुमच्यासारख्या धडाकेबाज नेत्याला कधीच नव्हती. कायदे न पाळणे, दंगली करणे, बायडेन यांच्या निवडणूक विजयावर जाणीवपूर्वक शंका घेणे, चित्रविचित्र रंगाचे कपडे घालून अमेरिकेच्या मानबिंदूंवर हल्ला करणे आणि तरीही आपला दांडगटपणा कोणीच समजून का घेत नाही, असे मानणाऱ्या या गटांना प्रोत्साहन देण्याचे काम तुम्ही केलेत. तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे आणि (कदाचित त्यामुळेच!) तेच खरे देशभक्त आहेत, असे तुमचे प्रामाणिक मत होते. सीएनएनसारख्या वाहिन्या आणि मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रांनी घोर अन्याय केलेल्या या गटांना तुम्ही आवाज दिलात. तुमच्या अनुपस्थितीत या अशा लोकांची बाजू आता कोण घेणार? शार्लोट्‌सव्हिलासारख्या दंगली पुन्हा झाल्या तर, या गटांनी समर्थनासाठी आता कोणाकडे पाहायचे? कारण आता बायडेन यांच्या काळात कायदे वगैरे पाळले जातात आणि पोलीस व न्यायव्यवस्था निरपेक्षपणे काम करेल, अशीच चिन्हे दिसत आहेत.          

तुम्ही सत्तेवर होतात तेव्हा आजूबाजूच्या जगात ब्राझीलचे बोल्सनारो, टर्कीचे एर्दोगन, फिलिपाईन्सचे ड्यूटर्ते, रशियाचे पुतिन, हंगेरीचे ओरबान असे एकाहून एक खरेखुरे ‘लोकशाहीवादी’ नेते आपापल्या देशात सत्तेत होते. (पुतिन यांनी तर नुकतीच चार तासांहून अधिक काळ चाललेली पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या लोकशाहीप्रेमाचा याहून अधिक पुरावा तो कोणता?) आपले तथाकथित पौरुषत्व अभिमानाने मिरवणाऱ्या, हिंसेचे आणि लष्करी सामर्थ्याचे (कारण नसताना) गौरवीकरण करणाऱ्या आणि वेळकाढू लोकशाही कार्यप्रणालीला बाजूला ठेवून धडाकेबाजपणे सत्ता राबवणाऱ्या या नेत्यांच्या मांदियाळीत तुम्ही कसे शीर्षस्थानी उठून दिसायचात.

तुमच्या असण्याने अशा राज्यकर्त्यांना एक झळाळी प्राप्त झाली होती. केवळ तुम्ही होतात म्हणून तर जगाला गेल्या दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय प्रगतीतील फोलपणा लक्षात आला. कितीही प्रगती झाली, तरी माणसाच्या मनातील मूळ पशुत्व जात नसते आणि संस्कृती-समाज, कला-साहित्य-संगीत इत्यादी निरर्थक गोष्टींमुळे केवळ त्या प्रेरणेला दडपले जाते, या वैश्विक सत्याचा आविष्कार तुमच्या असण्याने अनेकांना होत असे.

कोणतीही किंमत देऊन आपले राजकारण पुढे रेटता आले पाहिजे, ही तुमची मूळ प्रवृत्ती होती, तिचे अनेकांना कौतुक वाटत असे. त्यामुळे आपली सत्ता टिकवण्यासाठी देशाचे अपरिमित नुकसान झाले तरी चालेल, त्यासाठी मनाला अजिबात वाईट वाटू देऊ नये, अशी तुमची मानसिक जडणघडण होती. आणि या वर्तनाला सेलिब्रेट करण्यासाठी आवश्यक असणारे ‘चिअर लिडर्स’ तर नेहमीच तुमच्या दिमतीला होते. त्यामुळे तुम्ही ओबामांसारखे संवेदनशील म्हणजे (तुमच्या मते, दुबळे!) आहात, असा आरोप करण्याची हिंमत कोणीही केली नाही, याचे पूर्ण श्रेय तुमचे एकट्याचेच!                  

तुमची चार वर्षे हा अमेरिकी लोकशाहीसाठी कसा सुवर्णकाळ होता! तुमच्या काळात सत्तेवर नियंत्रण घालणारे लोकशाही संकेत कसे उधळून लावायचे, याचे धडे सगळ्यांना मोफतपणे मिळत असत, अगदी टीव्हीवर पाहता येत असत. लोकशाही रुजवण्यासाठी याचा उपयोग नक्कीच होईल. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स पत्रकारांच्या उपद्रवी प्रश्नांना कशी उडवा-उडवीची उत्तरे देत असत, त्या प्रश्नांना केराची टोपली दाखवत असत, शक्य असेल तर पत्रकारांचा अपमान करत असत आणि यापैकी काहीच नाही जमले तर मख्ख चेहरा करत असत. नाही तर आताच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी बघा: त्या न कंटाळता पत्रकारांच्या उपद्रवी प्रश्नांना उत्तरे देतात, त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेत नाहीत. उलट आवश्यक ती माहिती वेळेत मिळेल, याची व्यवस्था करतात. बिचाऱ्या जेन साकींना हे कळतच नाही की, क्षुद्र पत्रकारांच्या त्रासदायक प्रश्नांना उत्तरे दिल्याने त्यांचे समाधान होत नसते, तर उलट अपेक्षा अधिकच वाढत जातात. त्यामुळे पत्रकारांना त्यांची जागा दाखवून देणाऱ्या तुमच्या काळातल्या सँडर्सबार्इंची आठवण आता सर्वांना येत असेल.

तुमच्या काळात सत्तेचा अनिर्बंधपणे वापर कसा करावा आणि विरोधी आवाजांकडे दुर्लक्ष कसे करावे, याचे प्रात्यक्षिक रोज मिळत असे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सभागृहातील नेत्या बिचाऱ्या नॅन्सी पेलोसी (तुमच्या भाषेत ‘क्रेझी नॅन्सी’) तुमच्यावर टीका करून आणि उपहासात्मक टाळ्या वाजवून थकल्या, तरीही तुम्हाला त्याने काहीही फरक पडला नाही. उलट उदारमतवादी विचारांच्या तरुण पिढीच्या नव्या राजकीय नेतृत्वावर सतत टीका करून, त्यांना राष्ट्रीय स्तरावर पुढे आणून अमेरिकेच्या राजकारणाला तुम्ही फार मोठे योगदान दिले. तुम्ही नसतात तर अलेक्झांड्रिया ओकॅसिओ-कॉर्टेझ, इल्हान ओमर, अय्याना प्रेस्ली, रशिदा तालैब, अशा ‘फायरब्रॅन्ड’ स्त्री खासदारांनी कोणावर टीका केली असती? आणि त्यांना जगभरात प्रसिद्धी व मान्यता कशी मिळाली असती?

तुमच्यावर दोन वेळा महाभियोग चालवला गेला, हे किती बरे झाले. (तसा विक्रम करणारे तुम्ही पहिलेच!) नाही तर त्याआधी बिचाऱ्या बिल क्लिंटनना, महाभियोग चालवला गेलेले आणि सध्या जिवंत असलेले एकमेव अध्यक्ष म्हणून, किती एकटे एकटे वाटत असेल? तुम्ही होतात म्हणून तर ग्रेटा थुनबर्गला संयुक्त राष्ट्रसंघात आक्रमक भाषण देता आले. तुम्ही जर नेहमीच्या वाटेने गेला असतात, हवे तसे वागला नसतात, रोज उठून आक्षेपार्ह भाषेत, वेळीअवेळी ट्वीट्‌स केली नसती, पर्यावरणाकडे लक्ष दिले असते तर हे सगळे लोकं आज काय करत असते? खरं तर या सर्वांनी तुमचे आभार मानायला हवेत! तसेच तुम्ही शब्दप्रभूदेखील होतात, हे आता अनेकांच्या विस्मरणात गेले आहे. Fake News, Failing New York Times, Crooked Hilary, Make America Great Again, Worst Trade Deals, Shithole Africa, Covfefe, अशा फ्रेजेस निर्माण करून त्या लोकप्रिय करण्याचे काम तुम्ही केलेत.                           

थोडे वैयक्तिक बोलायचे, तर तुम्ही सत्तेत होतात, ती चार वर्षे रोज आम्ही धडधडत्या मनाने झोपी जात असू आणि हुरहूर घेऊन उठत असू. आपण झोपलो होतो, त्या काळात तुम्ही एखादा नवा पराक्रम केला असेल तर तो आपल्याकडून ‘मिस’ होऊ नये असे वाटत असे. तुमच्या टेबलवर असलेले एक बटन दाबले तर तुम्हाला हवे तेव्हा ‘कोक’ मिळते, हे कळल्यानंतर ‘कोक’ पिताना येणारी अपराधी भावना खूप कमी झाली होती. (आताच्या बायडेन यांनी ती सिस्टम बंद केली आहे.) तुम्हाला फास्ट फूड आवडते आणि ‘जंक’ मानले गेलेले खाद्यपदार्थ रोज खाऊनही इतके कार्यमग्न राहता, हे पाहून आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेतली होती. कितीही काम केले तरीही तुमच्या केशरी रंगाच्या चेहऱ्यावरील तेज कसे कमी होत नाही आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तुम्ही नेहमीच कसे ‘क्लीन शेव्हन’ असता, याचेही नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटत असे. तुमच्या तुलनेत आताचे बायडेन अगदीच साधेभोळे, जेवणाला वेळच्या वेळी घरी जाणारे आणि बायकोला कामात मदत करणारे सांसारिक गृहस्थ वाटतात.

तुमच्या वादग्रस्त भूतकाळामुळे सतत काही ना काही नवा मुद्दा चर्चेत असे आणि त्यामुळे तुमच्या असामान्य कर्तबगारीची खरी चर्चाच अमेरिकेत होत नसे. कधी कोणी पॉर्नस्टार काही म्हणत असे, तर कधी कोणी नातलग तुमच्यावर पुस्तक लिहीत असे. जर बरेच दिवस काही नवे झाले नसले, तर तुमच्या कोणत्या तरी सहकाऱ्याची हकालपट्टी तरी होत असे किंवा काही तरी नवे स्कँडल बाहेर येत असे. अगदीच काही नाही तर तुम्ही निदान, जो बायडेन यांचा मुलगा ‘हंटर बायडेन कुठे आहे’ हे सर्व कॅपिटल अक्षरांत टाईप करून टि्वट तरी करत असायचात. आता हे सारे थांबलेले आहे. सगळे कसे शांत आणि सुरळीत चालू आहे. आता रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडण्याचे काम मिच मॅक्कॉनेलसारखे कंटाळवाणे नेते करत असतात आणि गौरवर्णीय आक्रमक समूहाला चिथावणी देण्यासाठी, तुमच्याच मार्गावर चालणारे जॉश हॉलीसारखे तरुण नेते तुमच्या पक्षात उदयाला आलेले आहेत. त्यामुळे आता आम्हाला तुमची आठवण किती प्रकर्षाने येत असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तुमची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने जगातील इतर अनेक देशांतील (अगदी आफ्रिका खंडातीलसुद्धा) विचारी वर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला. जर अमेरिकेत तुमच्यासारखे अध्यक्ष निवडून येत असतील, तर बाकीच्या जगातले, तुमच्यासारखेच विचार आणि वर्तन असलेले, सत्ताधारी त्या तुलनेत बरेच ‘बरे’ आहेत, हे दिसून आले. त्यामुळे एकाच वेळी अमेरिकेविषयी वाटणारी असूया आणि आपापल्या देशाविषयी वाटणारी कीव, या दोन्ही भावना थोड्या प्रमाणात कमी झाल्या. जगभरातल्या विचारी वर्गाला असा दिलासा देणे, हे तुमचे खरे ऐतिहासिक योगदान आहे! त्याबद्दल जग कायम तुमच्या ऋणात राहील.

कोणत्याही देशाला तुमच्यासारखा नेता मिळणे खूपच कठीण असते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पाऊण शतकात तुमच्यासारखा एक(च) अध्यक्ष अमेरिकेला मिळाला, यातच सारे काय ते येऊन जाते! तुमचे आणि अमेरिकेचे हे ‘एकमेवाद्वितीयपण’ कायम राहावे आणि तुमचे यापुढील दिवस सुखाचे जावेत, या शुभेच्छा देऊन हे पत्र संपवतो.

कळावे,

तुमचा एक (माजी) नियमित टि्वटर फॉलोअर,

संकल्प गुर्जर,

नवी दिल्ली.

‘साधना’ साप्ताहिकाच्या १५ जानेवारी २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखक संकल्प गुर्जर दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.

sankalp.gurjar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......