एन. डी. पाटील सम एन. डी. पाटीलच!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर  
  • छायाचित्रं सौ. स्वाती शिंदे-पवार (विटा, जिल्हा सांगली) आणि अलोक जत्राटकर, कोल्हापूर यांच्या सौजन्यानं
  • Tue , 18 January 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली एन. डी. पाटील N. D. Patil शेकाप शेतकरी कामगार पक्ष

आमच्या पिढीची पत्रकारिता ज्या नेत्यांच्या करिष्म्यावर बहरली, त्यात प्रमुख नाव प्रा. एन.डी. पाटील यांचं. इंग्रजीसोबतच मराठी वर्ततपत्रांतील बातम्यातही त्यांचा उल्लेख ‘एन.डी.’ असा सर्रास केला जात असे. पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे, १९७७-७८ या वर्षी मी कोल्हापुरात काही काळ पडाव टाकलेला होता. तिथल्या एक सायंदैनिकात उमेदवारी करत होतो आणि विलासराव  झुंजार माझे बॉस होतो. तेव्हापासून एन.डी. यांची ओळख. समाजवादी भूमिकेमुळे त्या वर्तुळात असणाऱ्या माझ्या वावरामुळे आमची ओळख होती. हा माणूस नखशिखान्त साधा. डोईवरचे केस मागे वळवलेले, विस्तृत भाल प्रदेश, जाड भुवया असलेले समोरच्याचा ठाव घेणारे मोठे डोळे, बांधीव देहायष्टी, हजार लोकांच्या गलक्यातही ऐकू येईल, असा कणखर आवाज आणि पॅन्ट-बुश शर्ट अशी साधी वेशभूषा म्हणजे एन.डी. पाटील. समाजातील दीन-दुबळे, शेतकरी, तळहातावरचं जिणं जगणारा सामान्य माणूस, अबोल यांचा आवाज आणि कैवारी असणारे हिमालयाच्या उंचीचे आणि तत्त्वनिष्ठ जे मोजके पुढारी अनुभवता आले त्यात एन.डी. आघाडीवर होते. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

त्यांची धडाडणारी तोफ एक पत्रकार म्हणून मी सभागृहात आणि रस्त्यावरही ऐकली, त्यांची अनेक भाषणं, पत्रकार परिषदा कव्हर केल्या. हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरच्या हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत मध्यरात्री अर्धा स्वेटर घालून आंदोलकांची काळजी घेणारे, त्यांची गाऱ्हाणी ऐकून गहिंवरलेले आणि दुसऱ्या दिवशी सभागृहात त्या समस्यांवर आवाज उठवणारे एन.डी. अनुभवता आले. एकच आठवण सांगतो –

वर्ष बहुदा १९८२ किंवा ८३ असावं. एन.डी. तेव्हा विधानपरिषदेचे सदस्य होते. पुलोदच्या काळात त्यांनी सहकार मंत्रिपद भूषवलं होतं, त्या नंतरचे हे दिवस. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला पोहचण्यासाठी बहुदा अकोल्याहून त्या कडक थंडीत एन.डी. यांनी पदयात्रा सुरू केलेली होती. विदर्भातील शेतकरी आणि सामान्य माणसाशी संवाद साधावा हा एक हेतू त्या पदयात्रेमागे अन्य मागण्यांसोबत होता; पुढाऱ्यांनी लोकांत मिसळण्याचे ते दिवसच होते.   

विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे यांच्याशी माझे भावबंध लहानपणापासून होते. मी त्यांना कधी अण्णा, तर कधी अण्णासाहेब असं संबोधत असे. आमचे कौटुंबिक आणि दैनंदिन संबंध होते. तेव्हा ते तत्कालीन नागपूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. विचारवंत, वक्ता म्हणून तोवर त्यांना मोठी मान्यता मिळालेली होती. त्या वेळी शेतकरी कामगार पक्ष या विषयावर तर पीएच.डी.साठी  संशोधन करत होते आणि मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. एन. डी. यांच्यासोबत पदयात्रेत आपणही सहभागी व्हावं आणि आजच्या भाषेत ‘लाईव्ह’ वृत्तसंकलन करावं असं मला वाटत होतं. त्या कल्पनेला भोळेसरांनी उचलून धरलं. मात्र फार लांब नाही तर कोंढाळी ते नागपूर या दरम्यान एक दिवस त्या पदयात्रेत जाण्याचं आम्ही दोघांनी ठरवलं आणि तसं नियोजन केलं. भोळेसर आहेत म्हटल्यावर एन. डी. यांना आनंदच झाला. कारण त्या दोघांची जुनी ओळखही होती, शिवाय पदयात्रेत होणाऱ्या गप्पात शेकापविषयी चर्चा होणार होती.

(थोडी अतिरिक्त माहिती- पुढे या संशोधनावर आधारित भास्कर लक्ष्मण भोळे यांचं ‘भारतीय शेतकरी कामगार पक्ष – जडणघडण आणि वाटचाल’ हे पुस्तक एन. डी. पाटील यांच्याच हस्ते प्रकाशित झालं. मात्र त्या वेळी भास्कर लक्ष्मण भोळे सर हयात नव्हते... भोळेसरांच्या पत्नी श्रीमती विजया भोळे यांनी यांनी आज बोलताना ही माहिती दिली.)   

कोंढाळी हे गाव नागपूरपासून सुमारे ५२-५५ किलोमीटर्स अंतरावर आहे आणि हा रस्ता अमरावती-नागपूर महामार्गाचा एक भाग आहे. एन. डी. सकाळी नऊ ते दुपारी पाचपर्यंत चालत आणि नंतर आराम करत. म्हणून मी आणि भोळे सर माझ्या स्कूटरवरून सकाळी सातलाच नागपूरहून निघालो. आमची स्कूटर माझ्या एक मित्र नागपूरला पोहोचवणार होता. आम्ही वेळेत पोहोचलो. स्कूटर घेऊन मित्र निघून गेला. थंडी बळकट होती. 

पदयात्रा सुरू झाली. हातात एक उंच बांबू, सोबत पाच-सहा (जास्त लोकांनी पदयात्रेत सहभागी व्हायचं नाही, अशा एन.डी. यांच्या सक्त सूचना होत्या.) कार्यकर्ते, समोर शंभर-दीडशे मीटर्सवर एक पोलीस जीप (कारण एन.डी. माजी कॅबिनेट मंत्री आणि एक प्रमुख विरोधी पक्ष नेते होते ना!) असा तो ताफा होता. त्यात भोळेसर आणि मी सहभागी झालो. गावातून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक उभे होते. त्यातील काही एन.डी. यांना हार घालत होते. अधूनमधून घोषणा दिल्या जात होत्या. कुणी तरी ‘एन.डी. पाटील यांचा विजय असो’, अशी घोषणा दिली त्याला जोरदार पाठिंबा मिळाला, पण लगेच तशी घोषणा न देण्याची ताकीद एन.डी. यांनी दिली. आपल्या जयजयकाराच्या घोषणांना मनाई करणारं नेतृत्व लोकांना प्रथमच अनुभवायला मिळालं.

गाव सुटलं, चमेली रेस्ट हाऊसही मागे पडलं आणि गर्दी चांगल्यापैकी ओसरली. एन.डी. आणि भोळे यांच्यात गप्पा सुरू झाल्या. सकाळची थंड हवा, रस्त्यावर तुरळक गर्दी आणि ते दोघे गप्पात रंगलेले; मधूनच रस्त्यालगतच्या शेतातून बाया-माणसं धावत येत. कुणी त्याच्याच गळ्यातला गमछा, अधूनमधून एखादा शुष्क हार एन.डी. यांना घालत. त्यांच्याशी एन.डी. संवाद साधत. येणाऱ्या प्रत्येकाशी एन.डी. पाटील दोन-चार तरी वाक्य बोलतच असत; समोरच्याचं म्हणणं ऐकून घेत. बोलणं झालं की, लगेच झपाझप  पुढे चालायला लागत.

ही जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वीची घटना आहे आणि तेव्हाचा एन. डी. यांच्यातला जोश लक्षात घ्या; तरी माझ्या तुलनेत एन.डी. तब्बल २५ वर्षांनी मोठे होते, पण त्यांच्या गतीशी जाऊलवून घेणं मला जमेना. मी मागे पडू लागलो. भोळेसरही थकले, कारण त्यांना आस्थामा होता. अकरा-साडेअकरानंतर तर मी चांगलाच मागे पडू लागलो. एन.डी. यांच्या ते लक्षात आलं. एका चहाच्या टपरीवर ते थांबले. लगेच लोक गोळा झाले. मी पोहोचल्यावर चहापाणी झालं. एन.डी. यांनी थकण्याबदल माझी थोडी गंमतही केली. एव्हाना बारा वाजत आलेले होते. भोळे आणि मी चालणं बंद करावं आणि नागपूरला परतावं, असं एन.डी. यांनी सुचवलं. थोडी ‘हो-ना’ झाली आणि आम्ही एन.डी. यांचं म्हणणं मान्य केलं, कारण भोळेसरांनाही थकवा जाणवू लागला होता. तेवढ्यात अमरावतीकडून एक एसटीची बस येताना दिसली. सामोरं होत एन.डी. यांनी हात दाखवला. चालकानं थोडं पुढे जाऊन बस थांबवली. तो व त्याच्या पाठोपाठ वाहकही धावत आला. त्यांनी एन.डी. यांना ओळखलं होतं. एन.डी. यांना नमस्कार करून ते दोघं अदबीनं उभे राहिले.

बसमध्ये जागा असल्याची खात्री करून घेत आम्हा दोघांना नागपूरला सोडावं, असं एन.डी. पाटील यांनी सुचवलं. त्यांनी ते मान्य केलं. आम्ही बसमध्ये बसलो. बस नागपूरच्या दिशेनं निघाली आणि आमची पदयात्रा अशा प्रकारे एकदाची संपुष्टात आली. एन.डी. यांची कामाची गती, ही अशी अतुलनीय होती; त्या गतीसोबत चालणं सर्वांना कठीणच होतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नागपूरला आल्यावर त्या पदयात्रेची मी एक बातमी दिली. ‘सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षांकडे आता लोकांच्या जगण्यांशी मुद्दे राहिलेले नाहीत...’ असं काहीसं शीर्षक तेव्हा दिल्याचं आठवतं. बातमीत छायाचित्र म्हणून एन.डी. यांचं एक जुनं छायाचित्र (ब्लॉक) वापरलं. त्या  बातमीचं कात्रण जपून ठेवावं असं काही तेव्हा सुचलं नाही, पण भेटल्यावर आमच्या अर्धवट पदयात्रेची आठवण पुढची काही वर्षं आम्ही काढत असू. हळूहळू, कालौघात ती आठवण पुसट होत गेली. अलीकडच्या काही वर्षांत तर भेटीही थांबल्या. बातमी समजली अन ती आठवण आता उसळून समोर आली. ती ऐकायला आता एन. डी. नाहीत...

एन.डी. पाटील यांच्या सम एन.डी. पाटीलच; तसा तळमळीचा नेता आता पुन्हा होणं शक्यच नाही!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......