कमाल खान यांच्या अशा प्रकारे जाण्यानं मी हतबुद्ध झालो आहे. केवळ मीच नाही, तर त्यांना ओळखणारे लाखो-कोट्यवधी टीव्ही प्रेक्षकही!
पडघम - माध्यमनामा
अनिल शुक्ल
  • एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान
  • Mon , 17 January 2022
  • पडघम माध्यमनामा कमाल खान एनडीटीव्ही टीव्ही पत्रकारिता पत्रकारिता अयोध्या राम

कमाल खान यांच्याशी माझी खूप चांगली मैत्री होती. त्यामुळेच अशा प्रकारे त्यांच्या न सांगता जाण्याचं मला खूप दु:ख आहे. २००५मध्ये मी जेव्हा माझी मातृभूमी असलेल्या उत्तर प्रदेशात परत आलो, तेव्हापासून माझी त्यांच्याशी मैत्री होती. ते माझ्यापेक्षा केवळ दोन वर्षांनीच लहान होते, त्यामुळे वयातल्या अंतराचा मुद्दा आमच्यात कधी निर्माण झाला नाही. ते दिसायला माझ्यासारखे म्हातारे नव्हते, तर सुंदर तरुण होते. त्यामुळेच माझे आणि त्यांचे तरुण विचार जमायचे. तारुण्यापासून आजपर्यंत पत्रकारितेत चांगली कॉपी लिहिण्याची मला आवड होती आणि मी नेहमी त्यासाठी प्रयत्न करतो. माझ्या टीव्ही पत्रकार असलेल्या मुलाचं हे मूर्खपणाचं म्हणणं मला कधी पटलं नाही की, ‘टीव्ही बातमीदारीत चांगल्या भाषेला कुठलंही स्थानही आणि टीव्ही हे फक्त दृश्य माध्यम आहे.’ त्या त्या वेळी मी मोठ्या ठसक्यात त्याला कमाल खानच्या बातम्यांचा हवाला देऊन टीव्ही बातमीदारीतल्या या गैरसमजाला फेटाळून लावत असे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लखनौला कमाल खानचा हेवा वाटायचा. आपल्या या मुलाला या शहरानं आधी तरुण, नंतर शहाणा, प्रौढ आणि पुढे चालून ज्येष्ठ नागरिक होताना पाहिलं. त्यांचं शहर त्यांचा आदर करायचं. आणि तेही आपल्या शहराचा तेवढाच आदर करायचे. लखनौमध्ये कमाल खान यांच्याविषयी तो आदर होता, जो पत्रकारितेत कुठल्याही लायक आणि प्रामाणिक पत्रकाराविषयी त्याच्या शहरात असायला हवा.

हा वेगळा मुद्दा आहे की, अलीकडच्या काही वर्षांत याच शहरानं आपल्या चाहत्या कमाल खानला पुन्हा पुन्हा अवमानित होताना पाहिलं. ते आपल्या पेशाची गरज, मन आणि स्वत:साठी लिहीत-बोलत. सत्ता आणि सत्ताधारी त्यांच्या लेखनाविषयी नापसंती व्यक्त करत. ते त्यांच्या बोलण्या-लिहिण्याचा तिरस्कार करत. त्यांचा पाणउतारा करत.

असं तर याआधीच्या सरकारांच्या काळातही खूप वेळा झालं की, जे कमाल खान यांनी लिहिलं, ते त्यांना आवडलं नाही. पण तेव्हा त्यांचा तिरस्कार केला गेला नाही. त्यांचा अवमान करण्याचं धाडस तर क्वचित कुणी करू शकलं असावं. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पांत ते त्याविषयी माझ्याशी बोलत. त्या प्रत्येक वेळी मी एका धाडसी, पण दुखावलेल्या पत्रकाराला काचेच्या टुकड्यासारखं तुटताना पाहत असे. ते सांगत की, त्यांच्या संस्थेवर त्यांच्या बदलीसाठी दबाव आणला जातोय. पण मग जोरात हसून म्हणत – ‘प्रबंधन भी ससुरा कहाँ भेजकर मुझसे पिंड छुड़ाएगा? हर जगह तो वही हैं, जो यूपी में हैं!’

अनेक रात्रींचं त्यांचं फोनवरील बोलणं त्यांच्या अवमानाच्या दु:खानं भरलेलं असायचं. मला चिंता वाटायची की, त्यांच्या पुढच्या बातमीत हे दु:ख कुठे ना कुठे पाहायला मिळेल आणि हे त्यांच्या पत्रकारितेला कमकुवत करेल. पण तसं कधी झालं नाही. पुढच्या प्रत्येक दिवसांत ते एका बहादूर वृत्तवाहिनाच्या आकाशात प्रामाणिक आणि धाडसी पत्रकार म्हणून एखाद्या ढगासारखे इकडे-तिकडे फिरताना दिसायचे. त्यांच्या विहरण्यावर जेव्हा तेव्हा त्यांच्या पेशाची वीज चमकताना दिसायची, तशीच ती पूर्वीही दिसायची.

कमाल खान राज्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांपैकी होते. राज्य सरकारने त्यांच्या अधिस्वीकृतीमध्ये कितीतरी वेळा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. नियोजनपूर्वक रितीनं मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांना येऊ दिलं जात नसे. खरं तर अधिस्वीकृत पत्रकार असल्यामुळे त्यांचा तो अधिकार होता. त्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवायचाही विचार केला होता, तेव्हा मी आणि त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना समजावलं की, लोकशाहीची लढाई केवळ वकिलांच्या भरवशावर लढवली जाऊ शकत नाही. याचा खरा न्यायाधीश ‘काळ’ आहे, तो याचा योग्य वेळी सोक्षमोक्ष लावेल. ते त्यांना पटलं.

इतर अनेक पत्रकारांप्रमाणे कमाल खानही आपल्या पत्रकारितेच्या काळात असंख्य वेळा अयोध्येत न कचरता गेले. ते सांगायचे की, लहानपणी त्यांच्या घरात ‘राम दरबारा’चं एक सुंदर कॅलेंडर टांगलेलं असायचं. तेव्हापासून ते रामाच्या मनमोहक प्रतिमेचे मोठे चाहते झाले होते. ते मला म्हणायचे, ‘आम्ही कधी रामाची पूजा-अर्चा केली नाही, पण राम आमच्या संस्कृतीचा भाग होते. लहानपणापासून मोठं होईपर्यंत रामाला मी याच रूपात पाहिलं आणि ओळखलं.’ ते नेहमी आपल्या संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या इलाख्यात होणारी रामलीला पाहण्यासाठी जात. त्यांना संपूर्ण ‘रामायण’ तोंडपाठ होतं. पण अलीकडच्या काही वर्षांत अयोध्येत बातमीदारीसाठी जाणं त्यांना एखाद्या युद्धक्षेत्रावर गेल्यासारखं वाटायचं. विशेष म्हणजे त्याविरोधात कधी युद्ध झालं नाही. ते मला म्हणायचे, ‘पण आज या अयोध्येला प्रत्येक ठिकाणी युद्धात ढकलण्याचा प्रयत्नांमुळे मी चकित झालो आहे आणि दु:खीही’.

त्यांनी केवळ तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’चा सखोल अभ्यासच केला नाही, तर लखनौ विद्यापीठातल्या हिंदी साहित्याच्या अनेक प्राध्यापकांसह अनेक जाणकार अभ्यासकांच्या मदतीनं ‘रामचरितमानस’ची जीवन पद्धतीही समजावून घेतली होती. तुलसीदासांचा पुरुषोत्तम राम त्यांना नेहमी लुभायचा, अभ्यासानंतर तर अजूनच आकर्षित करू लागला. ते रामाच्या शील आणि शांत स्वभावावर फिदा होते.

कोदंडावर प्रत्यंचा चढवलेल्या आणि हल्ल्यासाठी आतुर झालेल्या क्रोधित रामाचं विश्व हिंदू परिषदेनं कॅलेंडर प्रकाशित केलं, तेव्हा कमाल खान यांना खूप दु:ख झालं. फोन करून त्यांनी मला विचारलं की, “राम आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच क्रोधित झालेले दिसतात, जेव्हा समुद्र पार करून श्रीलंकेत जाण्याची त्यांची विनंती समुद्र स्वीकारत नाही तेव्हा. ऐसा क्यों है भाई कि वीएचपी को राम के जीवन का सिर्फ यही रूप ही लोक लुभावन लगा? उनके पुरुषोत्तम जीवन की शेष तमाम लाखों-लाख पुण्य छवियों को वह भूल क्यों गयी?’’ माझ्याकडे उत्तर नव्हतं.

ही सातेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा पहिल्यांदा अयोध्येतून बातमीदारी करताना त्यांचं मन डळमळीत झालं होतं. प्रत्येक वेळी अयोध्येत गेल्यानंतर त्यांना भगवी वस्त्रं परिधान केलेल्या स्वयंसेवकांसमोर आपल्या मुसलमान पत्रकार असण्याविषयी खुलासा करावा लागत होता. हळूहळू दिवस आणखी पालटत गेले आणि पुढे चालून तर त्यांना अयोध्या-फैजाबादच्या स्थानिक प्रशासनासमोरही खुलासा करावा लागू लागला. प्रत्येक वेळी ते दुखावले जायचे. त्याच दु:खी आवाजात ते मला फोन करून म्हणायचे, ‘मेरा जन्म बेशक़ मुस्लिम परिवार में हुआ हो भाई, लेकिन मैं ख़ालिस हिंदुस्तानी पत्रकार हूँ। फिर मेरे साथ यह ग़ैर बराबरी क्यों?’

‘रामराज बैठे त्रैलोका, हर्षित भये गए सब शोका।

बयरु न कर काउ सन कोई, रामराज विषमता खोई।’

अयोध्येत जस जसा कमाल खान यांचा ‘मुसलमान पत्रकार’ म्हणून अवमान होत राहिला, तसतशी तुलसीदास आणि ‘रामचरितमानस’ची सरस्वती त्यांच्या जिभेवर अवतरत गेली. ते माझ्यासारख्या, ‘रामचरितमानस’चं फारसं ज्ञान नसलेल्या त्यांच्या हिंदू मित्रांना तुलसीदासांची चौपाई ऐकवून त्यांचा अर्थ विचारत. कधी कधी आपल्या वार्तांकनामध्ये संघपरिवाराशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या नेत्यांना ‘रामचरित्रमानस’शी संबंधित काही कठीण राजकीय प्रश्नही विचारत. त्याविषयी अर्थातच हे महानुभाव माझ्यासारखेच अल्पज्ञानी असत. त्यातून अनेकदा त्यांची ज्ञानशून्यता सिद्ध होत असे. पण कमाल खान कधी त्यांचा अवमान करत नसत आणि हा शांत स्वभावाचा पत्रकार त्या संघी महानुभवांच्या या ज्ञानशून्यतेचा उल्लेखही आपल्या बातमीत कधी करत नसे.

शतकानुशतके सगळ्या धर्मांवर प्रेम करणाऱ्या अयोध्येची चर्चा ते नेहमी करत. पण कधी कधी मला विचारत की, असं काय झालं की, या पवित्र शहराचा उल्लेख होताच, ‘घुमटावर चढून हातात हातोडे आणि छिन्नी घेऊन ‘जय श्री राम’ म्हणत हिंसक कारसेवकांची गर्दी दृश्यपटलावर दृश्यमान होते?’ असं एकदाच झालं होतं हे नक्की, असं मानत ते त्याला विसरण्याचा प्रयत्न करत प्रेमरसाचा वर्षाव करणाऱ्या सरयू आणि तिच्या अयोध्येला आपला टीव्ही बातम्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत. शोधता शोधता ते उदास होऊन जात. ती त्यांच्या बातम्यांत स्वच्छपणे दिसायची.

खरं पाहता ही उदासी एका मुसलमान पत्रकाराची नाही, भारतीय पत्रकारितेची उदासी आहे, जी १९९२नंतर पुन्हा कधी प्रफुल्लित होऊ शकलेली नाही.

तथापि कमाल खान यांच्या अशा प्रकारे जाण्यानं मी हतबुद्ध झालो आहे. केवळ मीच नाही, तर त्यांना पत्रकार म्हणून ओळखणारे, लाखो-कोट्यवधी टीव्ही प्रेक्षकही. माझं उत्तर प्रदेशावर प्रेम आहे. या प्रदेशाच्या शेकडो वर्षांपासूनच्या ‘शानदार तहजीब’वरही माझं प्रेम आहे. माझं कमाल खान यांच्यावर यासाठी प्रेम होतं की, उत्तर प्रदेशच्या या ‘शानदार तहजीब’वर त्यांचंही प्रेम होतं. प्रेम करणाऱ्या उत्तर प्रदेशची ही ओळख गेल्या काही वर्षांत मिटून टाकण्याचे जारीनं प्रयत्न केले जात आहेत. त्याची मला घृणा वाटते. कमाल खान यांनाही ती वाटत असे. ते या प्रयत्नांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या माझ्यासारख्या लक्षावधी लोकांच्या फौजेत सर्वांत पुढच्या तुकडीत होते. त्यामुळेही मला त्यांच्याविषयी प्रेम वाटत असे.

मला उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गोष्टीचा गर्व आहे, त्यामुळे कमाल खानचाही गर्व आहे. स्वत:ला गौरवांकित करणाऱ्या कुठल्या गोष्टीचा विरह कुणाला सलत नाही? कमाल खान यांचं जाणं केवळ त्यांचं कुटुंब आणि परिवार यांनाच सलणार नाही. आणि त्याचं नुकसान केवळ एनडीटीव्हीलाच भोगायला लागणार नाही. स्वच्छ दृष्टीच्या आणि कुठल्याही चष्म्याशिवाय टीव्हीवरील बातम्या पाहणाऱ्या उत्तर प्रदेश आणि देशातल्या लाखो-कोट्यवधी प्रेक्षकही या नुकसानाचे भागीदार आहेत. हे केवळ माझं-तुमचं नाही, विष प्राशन करण्याचा शाप असलेल्या भारतीय समाजासाठी कापणाऱ्या हातांनी मधाच्या थेंबासाठी झटणाऱ्या भारतीय पत्रकारितेचंही नुकसान आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कमाल खान यांचं असं अचानक जाणं, हे व्हेंटिलेटरच्या टेबलावर बेशुद्ध पडलेल्या उत्तर प्रदेशच्या कोविडीय पत्रकारितेचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्यासारखं आणि त्यांचा विरह डायलिसिसच्या टेबलावर किडनी फेल भारतीय लोकशाहीच्या हिमोग्लोबिनची पातळी अचानक कमी होण्यासारखं आहे!

टीव्ही पडद्याशिवाय मी कधी कमाल खान यांना इतर कुठे पाहिलं नाही. पण ते माझ्या नजरेसमोर नेहमी राहत आले आहेत. त्यामुळे मी म्हणतो की, जे कमाल खान यांना जेवढं ओळखतात, त्यापेक्षा मी जास्त ओळखतो!

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.satyahindi.com या हिंदी पोर्टलवर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.satyahindi.com/media/kamal-khan-s-amazing-concern-was-seen-in-his-reporting-124309.html

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा