कबीर आस्तिक आणि नास्तिक या नात्यापलीकडे जाऊन त्याची भूमिका परखडपणे मांडतो. म्हणून तो कालातीत आहे!
पडघम - सांस्कृतिक
सतीश बेंडीगिरी
  • संत कबीर
  • Sat , 15 January 2022
  • पडघम सांस्कृतिक संत कबीर Kabir राम Ram हिंदू Hindu मुस्लीम Muslim

आजही मध्ययुगीन काळात जन्मलेला कबीर त्याने रचलेल्या दोह्याच्या रूपाने अस्तित्वात आहे. त्याचे दोहे कालातीत आहेत, कारण त्यांचा अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक वेळी त्यांच्यात नवीन अर्थ दडलेला दिसतो. ‘गीते’तल्या एखाद्या श्लोकाची उकल करण्याचा प्रयत्न केला, तर तो त्या त्या काळाला साजेसे अर्थ देऊन जातो, तसेच कबिराचे दोहे वेगवेगळे अर्थ सांगून जातात.

‘कबीर’ या नावाचा अर्थ ‘सर्वज्ञ’ असा आहे, परंतु हे नाव भक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. कबिराची महानता हिंदू-मुस्लीम दोघांनाही मान्य आहे. संत तुलसीदास यांच्याप्रमाणे त्यांचे लक्ष भारतीय ‘अद्वैतवाद’ आणि मुस्लीम ‘एकेश्वरवाद’ यांच्यातील सूक्ष्म भेदांकडे आकर्षित झाले नाही. हिंदू धर्मातल्या कर्मकांड व अवडंबर या दोन्ही गोष्टींना त्यांनी फटकारले आणि ‘रामा’ला सगुण व निर्गुण या दोन्ही रूपांत स्वीकारले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

“निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा

मूल कमल दृढ आसन बाँधु जी

उलटी पवन चढ़ाऊंगा,

मन ममता को थिर कर लाऊँ

जी पाँचों तत्त्व मिलाऊँगा”

असे म्हणत कबीरने रामाला निर्गुण रूपात स्विकारताच अनेक मुस्लीम संतांनी ‘रामा’ला जणू काही दत्तकच घेतले. कबीर यांच्या संगतीने, दादू, रजब, जयासी, रहीमदास, वाजिद जी, शेख, आलम, मुबारक असे अनेक संत रामनामाचा जप करू लागले आणि राम-रहीम तसेच केशव-करीम हे शब्द सर्वतोमुखी झाले. अशा तऱ्हेने कबीरांनी हिंदू-मुस्लीम यांच्यातली दरी मिटवण्याचे कार्य केले.

कबीराने अशी काय जादू केली की, तो मानवी मनाच्या पटलावर जेव्हा दोह्यांचा कुंचला घेऊन सफाईदार चित्र साकारतो, तेव्हा माणसात आमूलाग्र बदल घडला जाईल, याची ग्वाही देतो; तीही सडेतोड टीका करत आणि डोळ्यात अंजन घालत, फटकारे मारत. पण हे करत असताना तो पर्यायही सुचवतो आणि मानवी विचारसरणीला - जर तुमच्यात स्वतःची मानसिक भूमिका बदलण्याची इच्छा असेल तर - एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.

आज इंटरनेटच्या वेगवान जमान्यात स्वसंवाद किंवा आत्मचिंतन माणूस पूर्ण विसरून गेला आहे. तो चोवीस तास इतरांशी संवाद साधतोय, परंतु त्याला स्वतःच्या मनात डोकवायला वेळ नाही. कारण इतरांना समजावताना स्वतःची समजूत घालण्याचा प्रसंग येतो, तेव्हा मानसिक आंदोलने लोलकाच्या रूपात पुढे-मागे होत राहतात आणि त्याला निराशेची एक गडद छाया व्यापायला लागते.

अशा परिस्थितीशी सामना करताना मनाशी संवाद सुरू होतो आणि मग तो एखादा आधार शोधू लागतो. असा आधार मिळाला की, हा स्वसंवाद तत्त्वज्ञानाशी ओळख करून देतो. हे जग मिथ्या आहे, असे वाटायला लागले, जे जन्माला येणार त्याचा नाश अटळ आहे, हे कळाले की, अध्यात्माची पहिली पायरी आपण गाठली याची जाणीव होते. आणि नेमके इथेच, पुढची मार्गक्रमणा करण्यासाठी कबीर आपल्या मदतीला येतो. तो म्हणतो-

“माला फेरत जुग भया

फिरा न मन का फेर,

कर का मनका डारि दे

मन का मनका फेर।”

हा फक्त चार ओळींचा दोहा तत्त्वज्ञानाच्या अर्थाने काठोकाठ भरला आहे. एखाद्या देवाचा मंत्र हातात जपमाळ घेऊन वर्षानुवर्षे जपत असतानादेखील ऐहिक गोष्टीकडे लक्ष देण्यापलीकडे मनाचा आवाका जात नाही. हातात जपमाळ असते, पण सूनबाई मुलाशी काय खुसरपुसर करते, याकडे कान टवकारलेले असतात. नातवंडे काय उद्योग करून ठेवत आहेत, कामवाल्या बाईने भांडी नीट घासली की नाही, दूध उतू गेले की काय, असे विचार मनात येत राहतात. मंदिरात हात जोडताना बाहेर ठेवलेली नवी कोरी चप्पल कोणी चोरणार नाही ना, याची चिंता वाटत असेल तर त्या भक्तीत कसला आला आहे भाव!  माळ फिरवतानादेखील त्यांच्या मनोभूमिकेत काडीचा फरक आढळत नाही. म्हणून कबीर म्हणतो- “माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर.”

हातात जपमाळ आणि मनात कचरा ठासून भरलेला असेल, मेंदूत नको ते विचार थैमान घालत असतील, तर असा जप केला काय आणि नाही केला काय, काय फरक पडतो? म्हणून कबीर पुढे सांगतो- “कर का मनका डारि दे (हातातली जपाची माळ टाकून दे), मन का मनका फेर.” (मनाचा मणी फिरव)

आणि असा मनाचा मणी फिरवत असताना जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करू लागते, तेव्हा ती व्यक्ती प्रत्येक मुद्द्याकडे जागरूकतेने पाहते आणि या पाहण्यात सद्भावना व करुणा या दोन्ही गोष्टी सामावलेल्या असतात. विचारसरणी आपोआपच सकारात्मक बनते. जेव्हा आपण इतरांना स्वत:चाच विस्तारलेला भाग म्हणून पाहणे प्रारंभ करतो, तेव्हा आपली ग्रहणक्षमता आणि खुलेपणा वाढतो, निश्चलता आणि मन:शांती यांचा विस्तार होत जातो.

रोजच्याच जगण्यातले वास्तव मांडताना कबीरला केवळ या चार ओळी पुरेशा वाटतात. कबीरला इथे नास्तिक लोकांबद्दल टीका करायची नाही. आस्तिक आणि नास्तिक या नात्यापलीकडे जाऊन तो त्याची भूमिका परखडपणे मांडतो आणि म्हणून तो कालातीत आहे. त्याच्या शब्दांच्या निवडीला कुठलाही संवेदनशील माणूस दाद दिल्याशिवाय राहत नाही.

मानवी मनाची खोली समुद्राच्या तळाइतपत जाऊनही संपत नाही. अगदी ॲरिस्टॉटलच्या काळापासून आतापर्यंत मानवी मनाच्या अंत:पटलाचा आणि त्याला जोडलेल्या तत्त्वज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक वैज्ञानिकानी केला. तो शोध अजूनही अव्याहत चालू आहे. हे असे लोक आणि आपण यात काय फरक आहे, असे विचारले तर त्यांनी मनाचा मणी फिरवला. ‘मन का मनका फेर’ हे आचरणात आणले. कुठल्याही कर्मकांडात अडकायचे नाही, हे व्रत अंगीकारले तरच वैज्ञानिक प्रगती होते, हे त्यांनी जाणले. पृथ्वी गोल आहे असे सांगणाऱ्या गॅलिलिओला चर्चच्या कर्मकांडात अडकलेल्या धर्मगुरूंनी तर कैदेत टाकले होते. कित्येक शतकांनंतर मानसिकता बदलली गेली आणि गॅलिलिओचे म्हणणे खरे होते, हे कळले.

अशा पद्धतीने जग बदलून टाकेल असे तंत्रज्ञान, नवनवीन विषय घेऊन निर्माण होणारे साहित्य, जुन्या तत्त्वज्ञानाचे विस्तारित विवेचन, अशा सर्व नवीन गोष्टींची निर्मिती झाली. त्याच त्याच कर्मकांडात ही मंडळी अडकली असती तर मध्ययुगीन काळ अजूनही लांबला असता आणि तंत्रज्ञानाची फळे चाखायला बराच मोठा अवधी लागला असता.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

असे जे परिवर्तन नंतरच्याच काळात झाले, त्यासाठी ज्यांनी हे परिवर्तन घडवून आणले त्यांनी स्वतःला बदलले. स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणला. आपण इतरांना बदलायला जातो, आपली मते इतरांवर लादतो इथेच आपण चुकतो. आपण स्वतःत कितीसा बदल घडवतो, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण आपला हट्ट सहजासहजी सोडत नाही. माझेच कसे खरे आहे, हे पटवून देण्यासाठी आपण हट्टाला पेटतो, प्रसंगी भांडतो. आपल्याला ‘मन का मनका फेर’ करायचे आहे, हे कळत असूनदेखील वळत नाही. इथूनच आपल्या मनात नको त्या गोष्टींचा कचरा साठायला सुरुवात होते. माळेतला मणी फिरवण्या इतकी ही सोपी गोष्ट नाही, हे खरे आहे, तरीही तसा प्रयत्न करून आपण स्वतःला बदलले की, समोरचे आपोआप बदललेले दिसते. आजूबाजूला असणारे रोजचे विश्व बदलत नाही, पण आपली बघण्याची दृष्टी नव्याने मिळाल्याने त्याच विश्वातले नवेपण आपल्याला कळायला लागते.

जप करताना मंत्राऐवजी इतर अनावश्यक गोष्टीवर लक्ष जाते, तसेच आपल्याला इतरांनी चांगले म्हणावे, अशी इच्छा असताना इतरांच्यातले वैगुण्य आपण शोधत बसतो. आपले जे उद्दिष्ट असते, त्यापासून आपण च्युत होतो. मग त्यावर उपाय काय? उपाय एकच-  ‘मन का मनका फेर...’

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा