गोदावरी डांगे यांचं ‘एक एकर मॉडेल’ उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत ५०,०००हून अधिक महिला शेतकरी वापरत आहेत. त्याविषयीच्या पुस्तकाची गोष्ट...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
रीतिका रेवती सुब्रमणियन आणि मैत्री डोरे
  • डावी-उजवीकडे गोदावरी डांगे आणि मध्यभागी त्यांच्यावरील पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 January 2022
  • पडघम कोमविप गोदावरी डांगे Godawari Dange एक एकर मॉडेल One Acre Model दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे Raindrop in the Drought: Godavari Dange

Goethe-Institutने जगभरातील कॉमिक बुक्स बनवणाऱ्या कलाकारांना २०२०मध्ये प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या स्त्रीवादी नेत्या किंवा चळवळींवर पुस्तक प्रस्ताव सादर करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आम्हा दोघींना लिंग समानता आणि सामाजिक हक्कांच्या विषयावर काम करण्यात रस असल्यानं आम्ही त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याआधीही आम्ही अशाच प्रकारच्या प्रकल्पावर एकत्र काम केलं आहे.

आम्ही दोघी मुंबईच्या असून यापूर्वी अनेक वर्षं मुंबई शहरात काम केलं आहे. आमच्यापैकी रीतिकाने मराठवाडा विभागातील लिंगभाव आणि कामगार समस्यायाविषयी संशोधन केलं आहे, तर मैत्रीने वर्तमानपत्र आणि मासिकांसाठी लिंगभाव आणि इतर सामाजिक समस्यांवर विविध रेखाचित्रे रेखाटली आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या प्रकल्पाला सुरुवात झाली, तेव्हा कोविड-१९चा प्रसार, लॉकडाऊन वगैरे चालू होतं. आम्ही महाराष्ट्रातील स्त्रीवादी नेत्यांचा शोध सुरू केला, कारण आम्हाला दोघींना मराठी भाषा समजते. जवळपासचा भाग निवडला तर, काम करणे सोपे जाणार होते. आम्हाला प्राधान्याने लिंगभाव, शेती आणि हवामान बदल यांतील संबंधांवर लक्ष केंद्रित करायचं होतं. कारण महिला भारतातील जवळपास ८० टक्के अन्न पिकवतात, तरीही त्यांना शेतकरी म्हणून ओळखलं जात नाही, जमीनही त्यांच्या मालकीची नसते.

सुरुवातीच्या संशोधनादरम्यान आम्हाला गोदावरी डांगे आणि ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ (SSP) या स्वयंसेवी संस्थेच्या कामाबद्दल माहिती मिळाली. गोदावरीताई उस्मानाबाद जिल्ह्यात २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामाद्वारे हजारो महिला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात बदलून घडवून आणला आहे. तरीही, महाराष्ट्रात आणि भारतीय पातळीवरील प्रमुख वर्तमानपत्रांत किंवा मासिकांत त्यांच्याबद्दल फारसं काही लिहिलं गेलेलं नाही.

आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकल्पाचा भाग बनण्यास स्वारस्य आहे का, असं विचारलं. त्यांनी होकार दिल्यावर आम्ही Goethe-Institutच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवला. त्यांच्याकडे आलेल्या दोनशेहून अधिक प्रस्तावांतून १६ प्रस्तावांची निवड झाली, त्यात आमचाही समावेश होता!

…आणि त्यातून ‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ या पुस्तकाचा जन्म झाला.

गोदावरीताई सहकारी शेतकरी महिलांसोबत

आमचं कॉमिक बुक गोदावरीताईंच्या जीवन आणि कार्याची कथा सांगतं. गोदावरीताईंचा जन्म १९७७मध्ये तुळजापुरात झाला. त्या काळात मराठवाडा ७२च्या दुष्काळातून सावरत होता. मराठवाड्यातील जनतेनं जवळपास अर्ध्या शतकात अनुभवलेला तो सर्वांत भीषण दुष्काळ होता. जनावरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला होता. अनेक कुटुंबांना पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. दलित आणि आदिवासी समाजातील लोकांना खूप हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. महिलांना पाणी भरण्यासाठी खूप लांबवर पायी जावं लागलं. अनेक मुलींना शाळा सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावं लागलं.

त्यानंतर बरोबर ४० वर्षांनी म्हणजे २०१२मध्ये मराठवाड्यात आणखी एक गंभीर दुष्काळ पडला. मधल्या काळातही या प्रदेशानं वारंवार तीव्र दुष्काळ अनुभवला. दुष्काळ, कर्ज आणि संकटाच्या या पार्श्वभूमीवर गोदावरीताई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या काळात उच्चवर्णीय समुदायातील बहुतेक पुरुष शेतकरी उसासारखी नगदी पिके घेत होते. त्याला खूप पाणी लागायचं. पण अल्पभूधारक आणि वंचित समाजातील शेतकऱ्यांकडे पुरेशी संसाधनं उपलब्ध नव्हती. त्यांच्यावर खूप कर्जही होतं. दुष्काळात महिलांचे श्रमही वाढायचे. कुटुंबाला खाऊ-पिऊ घालणं हे महिलांचं काम मानलं जात असल्याने त्यांना अनेकदा अर्धपोटीही राहावं लागत होतं.

‘एक एकर मॉडेल’मध्ये ही पिकं घेतली जातात

या समस्येवर मात करण्याच्या इराद्यानं गोदावरीताईंनी आपल्या ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ संस्थेतील सहकार्‍यांसह ‘एक एकर मॉडेल’ तयार केलं. या मॉडेलनुसार महिलांना जमिनीच्या छोट्या तुकड्यांमध्ये पिकं घेण्यास प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यात आलं. गोदावरीताईंनी महिलांना ३६ विविध प्रकारच्या अन्न पिकांच्या बियाणांचं वाटप केलं आणि त्यांना शेतीसाठी हातभार लावायला सुरुवात केली. कुटुंबात कोणीही उपाशी राहू नये आणि सर्वांना पोषक आहार मिळावा, यावरही लक्ष केंद्रित केलं. भाजीपाला, ठराविक तृणधान्यं आणि कडधान्यं पिकवण्यासाठी कमी पाणी लागतं आणि दुष्काळी परिस्थितीतही वर्षभर कोणतं ना कोणतं पीक घेता येतं.

हा प्रयोग करून पाहण्यासाठी सुरुवातीला फार कमी महिला पुढे आल्या. त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून, विशेषत: नवऱ्यांकडून विरोधाचा बराच सामना करावा लागला. बहुतेक पुरुषांना वाटत होतं की, हा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय आहे. मात्र, आज उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत ५०,०००हून अधिक महिला शेतकरी ‘एक एकर मॉडेल’ वापरत आहेत.

२०२०मध्ये कोविड-१९च्या सुरुवातीला लादलेल्या पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान सर्व काही ठप्प झालं होतं. या काळात प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी धडपडत होता. त्या वेळी उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत महिल्या शेतकऱ्यांसाठी गोदावरीताईंचं ‘एक एकर मॉडेल’ मोठं वरदान ठरलं. हे मॉडेल वापरणाऱ्या महिला शेतकर्‍यांनी स्वतःच्या एक एकर शेतात वेगवेगळी पिकं छोट्या प्रमाणावर घेतली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यशस्वीपणे चालवला. आणि शिल्लक पीक स्थानिक बाजारपेठेत विकून थोडेफार पैसेही कमावले. थोडक्यात, या मॉडेलने त्यांना कोविड-१९च्या त्या वाईट दिवसांतही टिकून राहण्यास मदत केली.

‘एक एकर मॉडेल’मध्ये सहभागी असलेल्या काही महिला शेतकरी

आम्हा दोघींचा कथेच्या सामर्थ्यावर खूप विश्वास आहे. आम्हाला वाटलं की, चित्रांद्वारे ही कथा सांगणं महत्त्वाचं आहे. गुंतागुंतीचे तपशील सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा ‘इलस्ट्रेशन’ (illustration) हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. यात भाषेचे अडथळे येत नाहीत. ते वाचू शकत नसलेल्या समुदायांपर्यंतही पोहोचू शकतं. म्हणून, आम्ही जाणीवपूर्वक ‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ हे कॉमिक बुक तयार केलं आहे. या माध्यमातून गोदावरीताईंच्या यशस्वी प्रयोगाची कथा स्थानिक आणि जागतिक पातळीपर्यंत पोहण्याची संधी मिळाली. आमच्या पुस्तकात बरीच चित्रं आहेत आणि आम्ही हेतुपुरस्सर अतिशय कमी मजकूर वापरला आहे.

आम्हाला आमच्या शहरी, उच्चवर्णीय पार्श्वभूमीमुळे याची जाणीव होती, म्हणून ही कथा सांगण्यासाठी गोदावरीताईंसोबत, त्यांचा सक्रिय सहभाग मिळवून काम करणं महत्त्वाचं होतं. आम्ही गोदावरीताईंचे शब्द वापरून मजकूर लिहिला. मजकुराचा साधेपणा आणि हातानं काढलेली चित्रं एकमेकांना पूरक होण्यासाठी आम्ही छोटी छोटी वाक्यं वापरली. चित्रांमध्ये, गोदावरीताईंनी केस कसे बांधले होते, त्यांच्या आईने स्वयंपाकघरात भांडी कशी लावली होती आणि घराच्या भिंतींचा रंग कोणता होता, असे सर्व बारीकसारीक तपशील समाविष्ट केले. आमचं लेखन आणि चित्रं यांवर वेळोवेळी गोदावरीताईंचा अभिप्राय मिळावा, यासाठी आम्ही एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप बनवला. त्यांच्या बालपणीची छायाचित्रंही त्यांनी या ग्रुपवर शेअर केली. गोदावरीताईंच्या मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य आणि इतर महिला शेतकऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली.

हे कॉमिक बुक प्रसिद्ध झाल्यावर आम्ही गोदावरीताईंना पाठवलं. त्यांना आणि त्यांच्या आईंना ते आवडलं. आम्हाला आशा आहे की, ही प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडेल...

‘स्वयं शिक्षण प्रयोग’ संस्थेतील महिला कार्यकर्त्या. मध्यभागी पुढे मैत्री डोरे आणि मागे रीतिका सुब्रमणियन

‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ हे पुस्तक इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी पहा :

https://www.goethe.de/resources/files/pdf239/raindrop-in-the-drought_godavari-dange_online_fa_en_za-v1.pdf

‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ हे पुस्तक मराठीमध्ये वाचण्यासाठी पहा :

https://www.goethe.de/resources/files/pdf239/raindrop-in-the-drought_godavari-dange_online_fa_marathi_za-v1.pdf

.................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी गोदावरी डांगे यांचा अभिप्राय :

“आपल्या देशाचीही फारशी माहिती नसलेल्या ज्या काही व्यक्ती असतील, त्यातलीच मी एक. पण आज मी ‘ग्लोबल नेटवर्क’ची सदस्य आहे. यावर माझाच अनेकदा विश्वास बसत नाही. मात्र हे सगळं साध्य झालं, ते ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ या संस्थेनं दिलेल्या संधीमुळे आणि आमच्या ‘एक एकर मॉडेल’मुळे. आजवर मला परदेशांत अनेक कार्यक्रमांमध्ये बोलण्याची आणि स्वत:चा अनुभव मांडण्याची संधी मिळाली आहे. उदा. क्लायमेंट वीक, UN वुमन कॉन्फरन्स, आशिया मिनिस्ट्री कॉन्फरन्स इत्यादी. माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या महिलेला या अशा व्यासपीठांवर जाऊन आपला अनुभव सांगण्याची संधी मिळणं, ही तशी अभिमानाची आणि सन्मानाचीच बाब आहे. अर्थात हे माझ्या संस्थेतल्या आणि तिच्याशी जोडल्या गेलेल्या महिलांमुळेच शक्य झालं आहे.

आमच्या कामाची तोंडओळख करून देणारं ‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ हे कॉमिक बुक रीतिका रेवती सुब्रमणियन आणि मैत्री डोरे यांनी इंग्रजी व मराठीमध्ये तयार केलं आहे, ही खूप आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. शिक्षण कमी असल्यामुळे मी इंग्रजी बोलू शकत नाही, पण या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या प्रयोगाची माहिती महाराष्ट्र आणि जगभराच्या वाचकांना जाणून घ्यायला मदत होईल. पुस्तक वाचणं आणि पुस्तकातून बोलणं हे आनंददायी क्षण असतात.

रीतिका आणि मैत्री या दोघींनी प्रत्यक्ष येऊन, भेटून, गावा-गावांत जाऊन माझं कुटुंब, मैत्रिणी आणि आमच्या महिला कार्यकर्त्या यांच्या मुलाखती घेतल्या. आमच्या मॉडेलची स्वत: पाहणी केली. त्याचबरोबर सखोल अभ्यास केला. त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकामुळे आम्हाला आनंद झाला आणि खूप छान वाटत आहे!”

.................................................................................................................................................................

रीतिका रेवती सुब्रमणियन मुंबईस्थित पत्रकार आणि संशोधक आहेत. 

rs893@cam.ac.uk

मैत्री डोरे मुंबईस्थित चित्रकार आहेत. 

maitri.dore@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Narendra Apte

Sun , 16 January 2022

गोदावरी डांगे यांच्या विकास कार्यक्रमाबद्दल उपयुक्त माहिती देणारे सुरेख चित्रमय पुस्तक तयार करून या लेखिका-द्वयीने खूप महत्वाचे काम केले आहे. या दोन्हींना धन्यवाद आणि गोदावरीताईंना शुभेच्छा!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......