हे नववर्ष एक मनमौजी प्रसन्नपणा घेऊन आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यातही वास करो! और क्या?  
संकीर्ण - ललित
रेखा शहाणे
  • लेखातील सर्व छायाचित्रं - रेखा शहाणे
  • Sat , 01 January 2022
  • संकीर्ण ललित मनमौजी Manmauji प्रजापती Prajapati फुलपाखरू Butterfly साईक वांडरिंग स्नोफ्लेक Wandering Snowflake Leptosia nina

नवीन वर्षातली ही नवीनवी सकाळ. समोर उन्हात न्हालेलं शुभ्र धवल फुलपाखरू भिरभिरतंय. कोवळ्या हलक्या सोनसळी किरणांमध्ये उजळलाय, याचा मोहक, स्वच्छ पांढरा शुभ्र रंग. एक नेत्रसुखद भिरभिर मी न्याहाळतेय. आहा!

नुक्त्यानुक्त्या जन्मलेल्या तान्ह्या वर्षाची सुरुवात तर अगदी ‘मन करा रे प्रसन्न’ म्हणत झालीय. समोर ही चार-पाच उडती फुलपाखरं म्हणजे जणू ऊनकोवळं, शुभ्र सतेज, लोभस चैतन्यच समोर नाचतंय.

असं वाटेपर्यंत गोळा झालेल्या माहितीनं लगेच सूचित केलं- ‘रेखाबाई, माहिती आहे ना, शुभ्र फुलपाखरू देवदूताचा सांगावा घेऊन आलेलं असतं.’

‘कोणता?’

‘ते सांगत असतं की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.’

बरं, असू देत बाबा. सगळेच सन्मार्गावर असू देत एकदाचे.

तर हे साईक. याचं शास्त्रीय नाव आहे लेप्टोसिया निना. (Psyche : Leptosia nina, Family : Pieridae) मराठीतलं याचं नाव फार गोड आहे- मनमौजी!

पायरीडी कुळातलं हे फुलपाखरू भारतीय उपखंड, दक्षिणपूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही आढळतं.

याचा शुभ्र पांढरा रंग नजरेला सुखावणारा आहे. पण ऐकलंय की, उन्हाबरोबर हा रंग जसा लख्ख उजळून निघतो, ते पाहून याला ‘वांडरिंग स्नोफ्लेक’ असंही नाव दिलं होतं कधी कुणी. वापरात नाहीये ते, पण मला मात्र आवडतं!

हे तसं चिमुकलंसं फुलपाखरू आहे. याचा पंख विस्तार ३५ ते ५० मिमी आहे. याच्या पुढल्या शुभ्र पंखांवरचा मोठ्ठा गोलाकार काळा ठिपका वेधक आहे आणि पंखांची खालची बाजूसुद्धा तशीच शुभ्र असते. पण नीट निरखून पाहिलं तर त्यावर हलकी हिरवट छटा असलेली, दिसेल न दिसेल अशी, पण नक्षीही असते.

ही तीन-चार फुलपाखरं उडतायत इथं आणि आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड आयझॅक केहीमकर यांनी कधी उल्लेख केलेली एक छोटीशीच गोष्ट उगाउगा मनावर तरळतेय. ती गोष्ट याच्या वैशिष्टपूर्ण उडण्याच्या लकबीशी जोडलेली आहे, म्हणून सहज उल्लेख करतेय इतकंच. तशा तर गोष्टी फार गोड असतात. पौराणिक असतात. साधारण ढाचा बहुदा तोच राहिला तर राहतो, पण अनेक बदल संभवतात.

तर मी वाचते नि सोडून देते. पण सहज आठवतात मात्र.

आणि उल्लेख केलेली गोष्ट आत्ता मला आठवतंय ती अशी की, साइकी किंवा साईक ही कथेतील परी आहे. तिचा प्रियकर जंगलात हरवलेला आहे. ती त्याच्या शोधात सैरभैर झालेली आहे. आणि शोधतेय त्याला. या फुलपाखराचं नाव आहे- साईक. याचं उडणं म्हणजे जणू सततची एक अस्वस्थ भिरभिरच.

तर तसंही हे ‘मनमौजी’ एकाजागी बसणं अवघडच. आधीच शुभ्रसफेद. त्यात अस्थिर. चांगलं छायाचित्र अभावानेच टिपता येतं. फुलाफुलांतला मध याला अतिशय प्रिय आहे. मग इकडून तिकडे, तिकडून इकडे, जमिनीलगत, कधी गवत तुऱ्यावर, तर कधी इवल्याइवल्या रंगीबेरंगी रानफुलांवर भिरभिरत असतं. पण जरा चाहूल लागली की, ते लग्गेच त्या ठिकाणापासून दूर उडून जातं. याचा आढळ बाराही महिने असला तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतं.

आमच्या सोसायटीचं आवार हे त्याचं वस्तीस्थानच आहे. आमच्या इथल्या निळ्या तीळवणीवर अंडी घालताना मी याला दोनदा कॅमेऱ्यात टिपलंय. थोडी सावली असलेल्या जागी मादी वाघाटी वर्गीय वनस्पतींवर अंडी घालते. अंड्याचा रंग छानसा निळसर हिरवा असतो. एकेक सुटं सुटं अंडं कोवळ्या पानांवर घातलेलं असतं.

अळी गडद हिरव्या रंगाची आणि कोष मातकट तपकिरी अथवा हिरवाही असतो. आणि जमिनीलगत इवल्याशा फांद्यांवर लटकलेला असतो. या कोषातून दहा-बारा दिवसांत पूर्ण वाढ झालेलं शुभ्र फुलपाखरू बाहेर पडतं. ते पाहणं हा एक मनभावन क्षण असतो. त्याची पहिली गिरकी पाहणं म्हणजेही निरागस, निखळ आनंदाचाच अनुभव!

ग्रीक, रोमन पौराणिक कथेमध्ये फुलपाखराला ‘अमर्त्य आत्म्याचं प्रतीक’ मानलंय. बंगालमध्ये तर फुलपाखराला ‘प्रजापती’च म्हणतात! त्याचा संबंध प्रजानानाशी जोडलेला आहे. आपण लग्नपत्रिकेत जसं ‘श्री गजानन प्रसन्न लिहितो, ते स्थान बंगालमध्ये फुलपाखराचं आहे.

अशा किती तरी गोष्टी या इवल्याशा फुलपाखरामुळे, त्याच्या नावा-रंगामुळे, मनमौजीपणामुळे मनात आल्या. सकाळची सुरुवातही सुरेख झालीय.

हे नववर्षही एक मनमौजी प्रसन्नपणा घेऊन आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यातही वास करो.

और क्या?  

..................................................................................................................................................................

लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.

rekhashahane@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......