अनुवादातून मला माझी भाषा, माझा स्वर, माझं माझेपण सापडलं आहे... माझा पिंड मला सापडला आहे...
पडघम - साहित्यिक
सोनाली नवांगुळ
  • ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी सोनाली नवांगुळला काल (३० डिसेंबर २०२१) दिल्लीत साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
  • Fri , 31 December 2021
  • पडघम साहित्यिक साहित्य अकादमी Sahitya Akademi सोनाली नवांगुळ Sonali Navangul सलमा Salma द अवर पास्ट मिडनाईट The Hour Past Midnight मध्यरात्रीनंतरचे तास Madhyaratrinantarchae Taas मुस्लीम Muslim मुस्लीम महिला Muslim Women

सलमा या मूळ तमिळ लेखिकेच्या ‘इरंदम जामथिन कधाइ’ या कादंबरीच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या मराठी अनुवादासाठी सोनाली नवांगुळला काल (३० डिसेंबर २०२१) दिल्लीत साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कादंबरीच्या ‘द अवर पास्ट मिडनाईट’ या लक्ष्मी होलस्ट्रोमनी केलेल्या इंग्रजी अनुवादावरून तिने हा मराठी अनुवाद केला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार स्वीकारताना तिने केलेलं हे भाषण…

.................................................................................................................................................................

एखादं पुस्तक आपल्या आयुष्यात येतं आणि आपल्याला पकडून ठेवतं. आपला मित्र होऊन जातं. अशी मैत्री का होते? - कारण त्या पुस्तकाचा आशय, प्रसंग, त्यातली माणसं, माणसांच्या नात्यांमधली गुंतागुंत, त्यांचे सल, स्वच्छंदी सोहळे झालंच, तर त्यामधून आलेलं विधान आपल्याला आपलंसं करतं. आपल्या भीतीतून, अंधारातून, उत्सुकतेतून, रागातून, स्वत:विषयीच्या नकारात्मक खबदाडीतून आणि परिचित-अपरिचित अन्यायातून आपल्याला अलगद बाहेर काढतं. आपलं जग आणि त्या पुस्तकातलं जग यांची वेगळ्याच पातळीवर जोडाजोड होते. - हेच सगळं सलमाच्या ‘इरंडाम् जामंगळिन कदै’ या मूळ तमिळ भाषेतून लिहिलेल्या कादंबरीनं माझ्याबाबतीत घडलं आहे. त्यामुळेच या पुस्तकाचा मी अनुवाद केला असं तरी कसं म्हणावं, असा भावनिक प्रश्‍न मला पडलेला आहे.

‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीच्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमीनं पुरस्कार दिल्यामुळे बर्‍याच पातळ्यांवर ‘खास’ वाटायला लागलं आहे. माझं आणि सलमाचं, वेगवेगळे दबाव झेलणार्‍या आणि झुगारून देणार्‍या स्त्रियांचं जग काही संवाद करून पाहत आहे, त्यांचा खडतर प्रवास समजून त्याचे समंजस साथी होण्यासाठी बोलावत आहे, याचा पुनरुच्चार झाल्यासारखा वाटतो आहे. त्या हाकेला ‘ओ’ दिल्यासारखं वाटतं आहे. पुरस्कार हा अनुवादित भाषेला आहे, पण ती भाषा ज्या बोलताहेत, आपली गोष्ट सांगताहेत, त्यांना, त्यांच्या संहितेला गौरवणं हे एका अर्थी मला आम्हा अनेकींच्या प्रवासात जाणता, कृतीशील मित्र मिळाल्याची भावनाही जागवतं आहे. त्यासाठी साहित्य अकादमी, वाचक, परीक्षक, माझी संपादक कविता महाजन, मनोविकास प्रकाशन आणि अर्थातच मूळ लेखिका सलमा यांचे मी मन:पूर्वक आभार मानते.

मी ज्या प्रकारच्या कुटुंबात, खेड्यात वाढले तिथल्या जगण्यावागण्याच्या काही रितीभाती होत्या. मी स्त्री, त्यात अपघातानं अपंगत्व वाट्याला आलेली. त्यातून ज्या मर्यादा आल्या त्यांचे असंख्य ताण होते. त्या ताणातून झालेल्या अनेक संकोचांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे भाषिक संकोच. सलमाची आणि माझी घुसमट यांची तुलना करता येणार नाही. आमच्यासमोरचे जगण्याचे झगडे भिन्न आहेत. तरीही घुसमट, वेदना, बंडखोरी व स्वातंत्र्याची आस या भावनांमध्ये अनिवार सारखेपण आहे. म्हणूनच सलमाच्या कादंबरीत विखरून राहिलेल्या लहान मुली, मध्यमवयीन आणि प्रौढ बायका यांची गोष्ट, त्यांची बोलणी अनुवादित करताना त्यांना आपलंसं करणं हाच एक पर्याय माझ्यासमोर होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तामिळनाडूतल्या बारक्याशा खेड्यातलं कर्मठ आयुष्य जगलेली सलमा आणि महाराष्ट्रातल्या एका मागास गावात बंदिस्त अवस्थेत जगणारी मी - अशा दोघीजणी अनुवादाच्या पुलावर भेटलो. तिनं कादंबरीत रंगवलेल्या जगातल्या आपापल्या लहानमोठ्या स्वातंत्र्यासाठी लहानमोठी बंडाची निशाणी उभारणार्‍या स्त्रियांनी मला आत्मिक बळ पुरवलं. सलमाच्या धर्माने नव्हे तर धर्मातील कट्टर अनुयायांनी तिच्या भाषेवर व अभिव्यक्तीवर बंधनं लादली. तिच्यावर आरोप केले, धमक्या दिल्या. ती बधली नाही. हट्टाग्रही पुरुषसत्ताक आणि धर्मपरंपरेच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांविषयी कथा, कविता, कादंबरी लिहित तिनं शतकानुशतकांच्या लक्ष्मणरेषा ओलांडायचा आणि भोवताली बांधलेल्या भिंती फोडायचा प्रयत्न केला. माझ्या खाजगी आयुष्यात तिच्या या खर्‍याखुर्‍या गोष्टीमुळे परिणाम झाला. माझी भाषा जागी झाली, निर्भय झाली. हे अनुबंध अनुवादातून मिळाले आहेत, हे इथं नमूद करावंसं वाटतं.

आज साहित्य अकादमीची शाबासकी मिळतेय ही गोष्ट महत्त्वाची ती आणखी दोन अर्थाने. साहित्य अकादमीसारखी राष्ट्रीय पातळीवरची संस्था एखाद्या लेखक-अनुवादकाची पाठ पुरस्कारानं थोपटते तेव्हा आपल्या कामाविषयी तो सचेत होतो, जबाबदार होतो. आपल्या घरातल्या सर्वात ज्येष्ठ, अनुभवी, शहाण्या, द्रष्ट्या आजीपणजीनं आपलं कोडकौतुक केल्यावर जशी तरतरी येते व स्वत:विषयी बरं वाटायला लागतं तसं काहीसं वाटायला लागतं. ते मला वाटतंच आहे.

आणखी दुसरं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक अपंगत्वाचा आणि बौद्धिक क्षमतेचा अर्थाअर्थी संबंध नसूनही पुष्कळ माणसं आपल्यापेक्षा वेगळ्या स्थितीतल्या माणसांच्या म्हणण्यातलं तथ्य आणि सत्य समजून न घेता त्यांच्या ‘वेगळ्या’ स्थितीकडेच बघत राहातात. ती स्थिती गतीत बदलण्यासाठीच्या त्यांच्या कामाकडे काणाडोळा करण्याचं राजकारण फार गुंतागुंतीचं व अवघड आहे. तो विषय आज इथं प्रस्तुत नाही. तो मांडण्याची ही जागा व हा प्रसंग नाही. मात्र साहित्य अकादमीसारखी संस्था माझ्या शारिरीक स्थितीचा पदर वगळून माझ्या कामाची दखल घेते, यामुळे प्रतिष्ठा मिळते. त्यातून मलाच नव्हे माझ्यासारख्या शारीरिक अवस्थेतील माणसांना दिलासा मिळणार आहे, की आपल्या कामात लक्षपूर्वक, मेहनत घेऊन उभे राहिलो तर योग्य माणसं, योग्य संस्था दखल घेतील! त्यांचा आपल्या सच्चेपणावर, कामाच्या दर्जावर विश्‍वास बसेल!

आपलं काम अधिक चांगलं होण्यासाठी मैत्रीपूर्ण समाज आणि मैत्रीपूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी होणं या कामाला वेग येईल, किमान विचार तरी केला जाईल. माझ्यासारख्या लेखनाच्या माध्यमातून उभं राहाणार्‍या माणसाला देशभरातल्या लेखक, कवी, अनुवादक, समीक्षकांना भेटता यावं, त्यांच्याशी चर्चा घडाव्यात, त्यांना शंका विचारता याव्यात, त्यांच्या भाषणांना, परिसंवादांना उपस्थित राहता यावं, भरपूर प्रवास घडावेत अशी भूक असते, तहान असते. ती ‘असते’ हे मांडण्यासाठी याहून सशक्त व्यासपीठ कुठलं असणार?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सलमाविषयी सांगितलंच, पण सलमाशी माझी भेट घडवली ती कवयित्री, लेखक, संपादक कविता महाजन हिने. आज ती आपल्यात नाही, पण तिचं माझ्यावर ऋण आहे त्याचा उच्चार इथं केलाच पाहिजे. तिच्यामुळे मी माझ्या आयुष्यातला पहिला अनुवाद दहा वर्षांपूर्वी केला. स्वत:वर विश्‍वास नव्हता, स्वत:च्या भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड होता, अशा काळात अनुवाद आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला.

अपघातामुळे मला शाळेत जाऊन शिकायची संधी मिळाली नाही, त्यातूनच आपल्याला काहीही येत नाही, असा नकार माझ्या आत रूजला होता. अजूनही जमतंय असं वाटत नाही, पण त्यासाठी प्रयत्न करण्याची चिकाटी माझ्याकडे पुरेपूर आहे. घरातल्या मधल्या खोलीतून मी वर्षातून दोन-चार वेळाच कुणीतरी नेलं तर बाहेर पडत असे. त्यामुळे वेगळी माणसं, वेगळी भाषा कशाशीच माझा संपर्क येत नसे. आपलं शरीर वेगळं, आपल्या मर्यादा खूप असं वाटण्यातून व त्या वाटण्याला बदलता येईल असे मार्ग नसण्यामुळे माझ्यात प्रचंड न्यूनगंड साठला होता.

माझं पहिलं अनुवादित पुस्तक २०१२मध्ये प्रकाशित झालं. आजघडीला काही स्वतंत्र आणि काही अनुवादाची अशी आठ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनुवादातून मला माझी भाषा, माझा स्वर, माझं माझेपण सापडलं आहे. लिखित वाक्यांहून निराळा असणारा अर्थ कसा शोधावा याची युक्ती भाषेच्या ज्ञानातून येतेच, पण ती माणसांच्यात खोलवर उतरण्यातून जास्त येते हे मला कळलं आहे. दुसर्‍या भाषेतील स्वर आपल्या भाषेत लावता येणं हा अनुभव पिळवटून टाकणारा असतो, पण तो एक असीम निश्‍चयही देतो. जगते आहे तोवर मला हा अनुभव द्यायचा व घ्यायचा आहे. मात्र तो माझ्यापुरता तरी बर्‍याच अडथळ्यांना लांघण्याचा व टिकून राहाण्याच्या प्रयत्नांचा प्रवास आहे.

माझ्यासारखी पॅराप्लेजिक, व्हीलचेअरबाऊण्ड माणसं स्वतंत्रपणे आणि स्वावलंबी आयुष्य जगू शकतात याबद्दल बोलणं व लिहिणं याहून प्रभावी ठरतं ते जिथंतिथं उपस्थित असणं. भाजीबाजारात, दुकानांमध्ये, मॉल्समध्ये, वाचनालयांमध्ये, शासकीय निमशासकीय ऑफिसेसमध्ये, देवळांमध्ये आणि सिनेमा व नाट्यगृहांत, अगदी जिथेतिथे दिसणं हाच आपण आपल्या अस्तित्वाचा समाजाला व आपल्यालाही दिलेला पुरावा असतो, तीच भूमिकाही असते व तेच संवादासाठी हात पुढे करणंही असतं हे मला जगण्यातून कळलेलं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माझी भाषा या प्रयत्नांतून घडली आहे. कुणा दुसर्‍याची भाषा अनुवादित करताना केवळ भाषेचा अनुवाद करायचा नसतो तर तो लेखकाच्या भवतालच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव नि दबावांचाही अनुवाद असतो. संकेतांचा अनुवाद असतो. वाच्यार्थ व व्यंग्यार्थ यांचा अनुवाद असतो. संहितेत वाहून न जाणं व संहितेच्या शब्दाशब्दाबद्दल अतिचिकित्सकपणा करत अनुभवांचा उत्स्फूर्त खळाळ किंवा गांभीर्य न घालवणं म्हणजे काय हे दर अनुवादानंतर मला अधिक कळतं आहे. भाषांतराचा सैद्धान्तिक पातळीवर विचार करण्याचं शिक्षण मी घेतलेलं नाही, ना तसं मार्गदर्शन मिळालं. त्यामुळेच कदाचित जास्त निर्भय होऊन मला अनुवाद करता येतो आहे.

ऑस्कर पिस्टोरिअससारख्या खेळाडूचं आत्मकथन, सलमाची जीवनानुभवातून आकाराला आलेली कादंबरी, म.गांधींचे नातू डॉ.अरुण गांधी यांनी आपल्या आजोबांच्या सहवासाने घडलेल्या जीवनदृष्टीबद्दल सांगणारी दोन पुस्तकं, माणसात वसलेल्या दोन रूपांची रॉबर्ट लुई स्टिव्हन्सनची रहस्यप्रधान लघुकादंबरी, साहित्य अकादमीने दिलेलं महिमभट्टांसारख्या टीकाकाराचं छोटेखानी कार्यचरित्र, श्रीनिवास रामानुजन या गणितज्ञाची गोष्ट सांगणारं पुस्तक, प्रथम बुक्सची लहान मुलांची पुस्तकं अशा वेगवेगळ्या अनुवादातून भाषावापराचे असंख्य कंगोरे मला सापडताहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रत्येकाची भाषा, त्यातला ज्वर, शोषणाचे स्तर, सूक्ष्म हिंसा, विरोधाची सणसण, त्यातले उमाळे, आनंदाची झिलई हे त्यांच्या जगण्यातल्या खाचाखोचांमधून आलेलं असतं. तो जोर अनुभवण्यासाठी मला स्वत:चं म्हणणं बाजूला ठेवून त्यात शिरावं लागतं. तटस्थ राहणं व मिसळूनही जाणं, ही कसरत इम्युनिटी वाढवते हे खरंच.

अनुवादातून माझा पिंड मला खरोखरच सापडला आहे. आपण एकटे नाही, याचा भाव पोहोचण्यासाठी, त्या बिंदूवर थांबून न राहता आपल्या कृतीचा, जगण्याचा अर्थ लावण्यासाठी या कामाचा उपयोग होतो आहे. स्वत:ला प्रश्‍न करण्यासाठी व वहिवाट मोडण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेण्याकरता नैतिक बळ, आत्मिक बळ अनुवादातून मिळवता येतं हा अनुभव साक्षात्कारी आहे.

 पुन्हा एकदा साहित्य अकादमीचे आभार मानते आणि थांबते.

..................................................................................................................................................................

‘मध्यरात्रीनंतरचे तास’ - सलमा, अनुवाद - सोनाली नवांगुळ

मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - ५०० रुपये.

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4187/Madhyaratrinanantarche-Tas

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा