विनोद दुआ : असाही अँकर होता, हे येत्या पिढ्या आठवत राहतील…
पडघम - माध्यमनामा
मुकेश कुमार
  • विनोद दुआ (जन्म ११ मार्च १९५४, निधन - ४ डिसेंबर २०२१)
  • Wed , 08 December 2021
  • पडघम माध्यमनामा विनोद दुआ Vinod Dua एनडीटीव्ही NDTV ख़बरदार Khabardar ज़ायका इंडिया Zaika India प्रणय रॉय Pranav Roy

प्रख्यात टीव्ही अँकर विनोद दुआ यांच्या जाण्यामुळे टीव्ही पत्रकारितेतलं एक युग संपलं. इथं ‘एका युगाचा अंत’ हे घासून गुळगुळीत झालेलं विशेषण किंवा अतिशयोक्ती नाही, तर ती सत्य घटना आहे. खासकरून हिंदी टीव्ही पत्रकारितेसाठी. त्यांच्यामुळे पहिल्यांदा हिंदी पत्रकारिता टीव्हीवर झळाळली.

ज्या वेळी टीव्हीचं जग फक्त दूरदर्शनपुरतंच मर्यादित होतं आणि टीव्ही पत्रकारिता नावापुरतीही अस्तित्वात नव्हती, तेव्हा विनोद दुआ धूमकेतूसारखे प्रकट झाले. तेव्हापासून सलग तीसेक वर्षं ते एखाद्या दीपस्तंभासारखे माध्यमजगतात झळाळत राहिले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

दूरदर्शनवर त्यांची सुरुवात गैरबातम्यांच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणाने झाली होती, नंतर ते बातम्यांवर आधारलेल्या कार्यक्रमांमध्ये दाखल झाले आणि ते क्षेत्र त्यांनी व्यापून टाकलं. निवडणूक निकालांच्या उत्तम विश्लेषणामुळे त्यांची कारकीर्द उत्तुंग झाली. प्रणव रॉय यांच्यासोबतच्या त्यांच्या जोडीने संपूर्ण भारताला संमोहित केलं होतं.

तसं पाहता विनोद दुआ यांची स्वत:ची म्हणून एक शैली होती. त्यात त्यांच्या रोखठोकपणाचा आणि निर्भीडतेचाही समावेश होता. ‘जनवाणी’ या कार्यक्रमात ते मंत्र्यांना ज्या प्रकारे प्रश्न विचारत किंवा त्यावर टिप्पणी करत, त्याची कल्पनाही त्या काळात अशक्य कोटीतली बाब होती.

मंत्र्यांच्या तोंडावर टीकाटिपणी करण्याची हिंमत

सरकारचं नियंत्रण असलेल्या दूरदर्शनवरील एक अँकर एखाद्या सामर्थ्यवान मंत्र्याला असं म्हणत असेल की, तुमच्या कामाला दहापैकी तीनच गुण देता येण्यासारखे आहेत, तर ही त्याच्यासाठी खूप नामुष्काची गोष्ट होती. परंतु तसं बोलण्याची हिंमत विनोद दुआ यांच्याकडे होती. आणि ते ती सातत्यानं दाखवत. त्यामुळे मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार करून त्यांचा कार्यक्रम बंद करण्यासाठी दबावही आणला होता, पण त्यात त्यांना यश आलं नाही.

विनोद दुआ यांनी आपली ही शैली कधीच सोडली नाही. आजच्या काळात बहुतेक पत्रकार आणि अँकर सत्ताधाऱ्यांची ‘चाटुकारिता’ करण्यातच धन्यता मानताना दिसतात, तेव्हाही विनोद दुआ रोज पंतप्रधानांच्या लबाड्या, अहंकार, अपयश, द्वेष आणि लोकशाहीविरोधी वर्तनाच्या चिरफळ्या उडवत असत.

सरकार त्यांच्याशी कशा प्रकारे वागेल, याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. सत्ताधाऱ्यांनी त्यांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो खटला लढवला आणि सर्वोच्च न्यायालयात जिंकूनही दाखवला. त्यामुळे प्रसारमाध्यमांनाही एक प्रकारे दिलासा मिळाला.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

विनोद दुआ यांची हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर विलक्षण कपड होती. प्रणव रॉय यांच्यासोबत निवडणूक कार्यक्रमांत त्यांची ही प्रतिभा संपूर्ण देशानं पाहिली आणि वाखाणली. तत्परतेनं अनुवाद करण्याची क्षमता त्यांच्या अँकरिंगला एक पायरी वर पोहचवण्याचं काम करत असे.

टेलिप्रॉम्टरशिवाय अँकरिंग करण्यात तरबेज

अपवाद वगळता ते हिंदी कार्यक्रमच करत राहिले आणि हिंदी अँकरिंगच्या रूपातच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख तयार केली. आपण केवळ हिंदीत काम करतोय, यात त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. हिंदीला लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे पत्रकार म्हणूनही त्यांचं नाव आठवणीत ठेवलं जाईल.

ते स्वत:ला ‘सादरकर्ते’ म्हणवत आणि सांगत की, ‘मी पत्रकार नाही’. त्यात काही प्रमाणात तथ्यही होतं. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बातम्या वाचणाऱ्या बहुतेक अँकर्सचं पत्रकारितेशी काही देणंघेणं नसायचं. त्यांना फक्त टेलिप्राम्टरवर लिहिलेलं वाचता यायचं. मात्र विनोद दुआ यांना टेलिप्राम्पटरची गरज लागायची नाही. ते काही मिनिटांत काय बोलायचं, कसं बोलायचं याची मनातल्या मनात तयारी करत. थेट सादरीकरण करण्यात ते वाकबगार होते.

हे खरं आहे की, घटनांचं वार्तांकन करण्यासाठी ते सुरुवातीच्या काळानंतर कधी फील्डवर गेले नाहीत (खाण्यापिण्याच्या ‘ज़ायका इंडिया’ या कार्यक्रमाचा अपवाद वगळता) आणि वर्तमानपत्रांत किंवा नियतकालिकांत त्यांनी कधी फारसे लेखही लिहिले नाहीत. पण ते देश-विदेशातल्या घडामोडींबाबत खूप सतर्क असायचे. त्यातून त्यांची पत्रकारितेविषयीची निष्ठा अधोरेखित होते.

आणि त्यामुळेच त्यांची अँकरिंग पत्रकारितेची समज आणि जाणकारी यांनी समृद्ध असायची. त्यांच्या प्रश्नांत त्याचं प्रतिबिंब दिसायचं. प्रश्न विचारण्यातलं सौंदर्य केवळ दिमाखदारपणा आणि अंगविक्षेपातून निर्माण होत नाही, तर ते बातम्यांविषयीच्या बारीकसारिक जाणकारीतून येतं. त्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांशी सतत चर्चा करत असत.

विनोद दुआ यांची पत्रकारिता

‘परख’ या भारतातल्या पहिल्या साप्ताहिक कार्यक्रमाची लोकप्रियता त्याचं एक उत्तम उदाहरण होतं. या कार्यक्रमाचे ते केवळ अँकर नव्हते, तर निर्माता-दिग्दर्शकही होते. त्यासाठी त्यांनी देशभर बातमीदारांचं जाळं विणलं होतं आणि विविध साधनांच्या संयोगातून संपूर्ण देशाला कवेत घेतलं होतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

या साप्ताहिक कार्यक्रमाच्या जवळपास शंभर भागांचा मी संपादकीय प्रमुख होतो. त्यामुळे मी हे सांगू शकतो की, ते आपल्या सहकाऱ्यांना कामाचं पूर्ण स्वातंत्र्य देत असत. त्या काळी दूरदर्शनची प्रत्येक बातमी आधी तपासली जायची आणि सरकारी अधिकारी बरीच काटछाटही करायला लावायचे. पण दुआ यांनी कधी नाराजी बोलून दाखवली नाही की, अमूक बातमीत हे का नव्हतं आणि ते का होतं वगैरे.

याच काळात ते ‘झी’ टीव्हीसाठी ‘चक्रव्यूह’ हा कार्यक्रम करायचे. हा स्टुडिओबेस टॉक शो होता. त्यात निवडक सहभागी प्रेक्षकांसोबत एखाद्या ताज्या सामाजिक प्रश्नावर चर्चा केली जात असे. या कार्यक्रमातून विनोद दुआ यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि अँकरिंगचं एक वेगळं रूप पाहायला मिळत असे.

‘सहारा’ टीव्हीवर ते सादर करत असलेल्या ‘प्रतिदिन’ या कार्यक्रमातून त्यांच्या पत्रकारितेची प्रगल्भता पाहायला मिळत असे. या कार्यक्रमात ते पत्रकारांसोबत त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांची समीक्षा करत असत. हा कार्यक्रम पाहून कुणीही म्हणूच शकलं नसतं की, अँकर पत्रकार नसतो म्हणून.

विनोद दुआ टीव्ही पत्रकारितेतल्या पहिल्या पिढीतले अँकर होते. त्यांनी त्या काळात अँकरिंगला सुरुवात केली होती, जेव्हा लाईव्ह प्रसारण जवळपास नसल्यात जमा होतं. ‘युवा मंच’ (१९७४) आणि ‘आपके लिए’ (१९८१)सारखे कार्यक्रम रेकॉर्डेड असत. खूप नंतर १९८५नध्ये बातम्यांवर आधारलेलं निवडणूक विश्लेषणाचं लाइव्ह प्रसारण सुरू झालं. आणि त्यातही त्यांनी आपलं कौशल्य सिद्ध करून दाखवलं.

नंतर जेव्हा वृत्तवाहिन्यांचा काळ सुरू झाला, त्यात सगळंच लाइव्ह असायचं. त्यातही विनोद दुआंना आपलं स्थान निर्माण करायला फारसे प्रयास करावे लागले नाहीत. आणि जेव्हा डिजिटल पत्रकारितेचा जमाना सुरू झाला, तेव्हा त्यातही सहजपणे आपली विशिष्ट ओळख बनवण्यात ते यशस्वी झाले. ‘द वायर’ आणि ‘एचडब्ल्यू’वरील त्यांच्या कार्यक्रमांचे प्रेक्षक लाखोंमध्ये होते.

गाणं, खाणं आणि वाचणं यांचा छंद

ते सतत वाचणारे पत्रकार होते. हिंदू-उर्दू साहित्य त्यांनी खूप वाचलेलं होतं. नव्या लेखकांविषयी त्यांना खूप कुतूहल असायचं. साहित्यबाह्य विषयांवरही त्यांचा अभ्यास सतत चालू असे. पुस्तकं हे त्यांचे अभिन्न मित्र होते.

दुआसाहेबांना आम्ही ‘उत्साहानं फसफसलेलं व्यक्तिमत्त्व’ (‘ज़िंदादिल जोश-ओ-खरोश’) असं म्हणत असू. कृत्रिम गांभीर्याला ते आपल्या जवळपासही फिरकू देत नसत. ते कुठल्याही स्थितीत विनोद करण्यात आणि हसण्यात माहीर होते. कुणाच्याही सांगण्यातलं किंवा करण्यातलं वेगळेपण शोधण्याची त्यांची सहजप्रवृत्ती होती.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

त्यामुळे त्यांच्या मैफलीत उदासीला कुठलंही स्थान नसायचं. त्यांच्याकडे खूप किस्से-कहाण्या होत्या. चेष्टा करण्यात तर त्यांचा कुणीही हात धरू शकत नसे. त्यांच्या कॉमेडियन मुलीमध्ये हा गुण त्यांच्यामुळेच आला असावा. त्यांच्यासारखा हजरजबाबीपणाही दुर्लभ होता.

संगीत ही त्यांची पहिली पसंती होती, खासकरून सूफी संगीत. नेहमी बाबा बुले शाह आणि बाबा फ़रीद यांचे दाखले देत. त्यांच्या कारमध्येही याच प्रकारे संगीत लावलेलं असायचं. नेहमी त्यांच्या घरी संध्याकाळी मैफली व्हायच्या. त्यात गाणं-बजावणंही असायचं. ते स्वत:ही गायचे आणि त्यांची पत्नी डॉ. चिन्ना (पद्मावती)ही.

एक यौद्धा-पत्रकार

विनोद दुआ यांचे पाय नेहमी जमिनीवर असत. त्यांचं कुटुंब फाळणीच्या काळात पाकिस्तानातल्या डेरा इस्माइल खाँ या शहरातून पळून आलं होतं. तमाम फाळणीग्रस्तांना जे अत्याचार सहन करावे लागले, ते कदाचित त्यांनाही सहन करावे लागते असावेत. त्यामुळे त्यांच्यात विनम्रता होती. त्याचा अनुभव मला पहिल्या भेटीतच आला. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते मला घेण्यासाठी ऑफिसच्या गेटवर उभे होते.

अनेकदा असं व्हायचं की, ते यायचे आणि म्हणायचे की, ‘चला, मुकेशजी काकडी-गाजर खाऊया’. मग आम्ही रस्त्यावरील एखाद्या हातगाडीवाल्यासमोर कार थांबवून त्याचा आस्वाद घ्यायचो. खाण्याच्या बाबतीत मोठमोठ्या हॉटेलांपेक्षा छोट्याशा पण नीटनेटक्या ढाब्यांना त्यांची पसंती असायची. असो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

विनोद दुआ यांचं अशा प्रकारे सध्याच्या काळात जाणं हे केवळ पत्रकारितेचंच नाही, तर लोकशाहीचंही मोठं नुकसान आहे. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या अनेक पत्रकारांना प्रेरणा मिळत असे. आणि जे लोकशाही आणि सौहार्द वाचवण्यासाठी प्रयत्नरत आहेत, त्या लढवय्यांनाही लढण्याची आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावांना आव्हान देण्याची हिंमत मिळत असे.

आजच्या पिढीला विनोद दुआ किती माहीत आहेत आणि ती त्यांना कशा प्रकारे ओळखते, हे माहीत नाही. व्हॉटसअ‍ॅप-ज्ञान आणि ट्रोलिंगच्या आजच्या काळात लांच्छनास्पद ठरवण्याची-कलंकित करण्याची प्रवृत्ती कुणाचंही योगदान नष्ट-भ्रष्ट करण्यासाठी क्षणभराचाही वेळ लावत नाही. पण जेव्हा-केव्हा विनोद दुआ यांचं यथायोग्य मूल्यमापन केलं जाईल, तेव्हा त्यांना ‘यौद्धा-पत्रकार’ म्हणून ओळखलं जाईल. काळोख ओसरल्यानंतरच येणाऱ्या पिढ्यांना हे समजू शकेल की, विनोद दुआ या नावाचा एक अँकर होता…

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.khabarkikhabar.com या पोर्टलवर ४ डिसेंबर २०२१ राेजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.khabarkikhabar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा