श्रीचक्रधरांची दिवाळी अर्थात ‘लीळाचरित्रा’त आलेली दिन दिन दिवाळी
पडघम - सांस्कृतिक
हंसराज जाधव
  • श्रीचक्रधरांचं आपल्या शिष्यासोबतचं एक चित्र
  • Thu , 04 November 2021
  • पडघम सांस्कृतिक श्रीचक्रधर Shree Chakradhar लीळाचरित्र Leelacharitra दिवाळी Diwali दीपावली Deepavali

महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधरांचं महाराष्ट्रात उणंपुरं २० वर्षं वास्तव्य होतं. या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील अनेक सण-उत्सव साजरे केल्याचे उल्लेख ‘लीळाचरित्रा’त आहेत. त्यातून हिवरळी (जालना) आणि नेवासा इथं दिवाळी साजरी केल्याचं दिसतं. असं असलं तरी पंथीय परंपरेत मात्र श्रीचक्रधरांनी महाराष्ट्रात एकूण आठ दिवाळी साजरी केल्याचं सांगितलं जातं.

पंधराव्या शतकातले कवी राघवमुनी यांनी ‘चरित्र आबाब’ या काव्यग्रंथात स्वामींच्या दिवाळीचं अगदी क्रमवार वर्णन केलं आहे.

‘प्रथम दिवाळी शेगनारायणी । दुसरी करूनी सिन्नर पै ।।

तिसरी ती बीडी केली दिपावली । मग हिवरळी चवथी पै ।।

गणपतमढी दिवाळी पाचवी । आणिक सहावी निधीवासा ।।                                              

गणपतमढी मागुती सातवी । आठवी करिती नागार्जूनी ।।’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘लीळाचरित्रा’त शक नोंद नसली तरी श्रीचक्रधर कोणत्या ठिकाणी, किती दिवस, किती वेळ थांबले, राहिले, याच्या अगदी अचूक नोंदी आहेत. श्रीचक्रधरांचा परिभ्रमण काळ आणि दिवाळीचा मुहूर्त या सगळ्यांची संगती लावून त्यांच्या दिवाळीचं वर्ष आणि ठिकाण निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार प्रथम दिवाळी शके ११८७ची पैठण येथील भोगनारायणाच्या मठात, दुसरी शके ११८८ची सिन्नरला, तिसरी शके ११८९ बीड येथे, चौथी शके ११९०ची जालना येथे, पाचवी शके ११९१ डोमेग्राम येथे, सहावी शके ११९२ नेवासा येथे, सातवी शके ११९३ची पैठण येथे आणि आठवी शके ११९४ची आंबा (सेकटा) येथे केली.

श्रीचक्रधरांच्या महाराष्ट्रातील वास्तव्याचा आणि परिभ्रमणाचा शकवार इतिहास लिहिण्याचा प्रयत्न अनेक महानुभावांनी केला आहे. ‘चरित्र आबाब’ हे त्याचं उत्तम उदाहरण होय. कै.मुरलीधर कोळपकर यांनी लिहिलेला ‘महानुभावांचा इतिहास’ आजही महत्त्वाचा मानला जातो. समकाळातील महत्त्वाचे पंथीय संशोधक म. श्रीधरानंदशास्त्री पातुरकर हे सनावळ्यांसह चक्रधरचरित्र लिहिण्याचा नेटानं प्रयत्न करताहेत.

साधारणतः ३१ वर्षांचा काळ एकाकी घालवल्यानंतर श्रीचक्रधर पैठणला आले. महानुभाव इतिहासकारांनी हा दिवस पौष पोर्णिमा शके ११८६ असा निश्चित केला आहे. बाइसा भेटीनंतरची चार वर्षं पूर्वार्धाची आणि नागदेवाचार्यांनी संन्यास घेतल्यापासून उत्तरापंथेगमनापर्यंतची चार वर्षं उत्तरार्धाची, अशी एकूण आठ वर्षं श्रीचक्रधरांनी महाराष्ट्रात परिभ्रमण केलं. या कालावधीत आलेल्या आठ दिवाळी श्रीचक्रधरांनी कुठे ना कुठे साजऱ्या केल्याच असणार!

‘चरित्र आबाब’ या काव्यग्रंथात पैठणमध्ये एकूण तीन दिवाळी साजरी केल्याची नोंद आहे. एक पूर्वार्धात आणि दोन उत्तरार्धात. उत्तरार्धात आलेली पाचवी म्हणजे शके ११९१ची दिवाळी गणपतमढ (पैठण) मध्ये साजरी झाली. ‘महानुभावांचा इतिहास’ने मात्र पाचवी दिवाळी डोमेग्राम (जि.अहमदनगर)मध्ये केल्याचं म्हटलं आहे. ‘महानुभावांचा इतिहास’ने आठवी दिवाळी आंबा शेकटा इथं केल्याचं म्हटलं आहे. परंतु ‘चरित्र आबाब’ने मात्र ती नागार्जुनी (आताचे नागलवाडी ता.शेवगाव जि.अहमदनगर) इथं केल्याचं म्हटलं आहे.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

‘लीळाचरित्रा’त आलेल्या केवळ दोन उल्लेखांबाबत महानुभाव पंथातील विद्वत आचार्य महंत शेवलीकर बाबा (बदनापूर) यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितलं की- “आज आपल्यापर्यंत आलेलं ‘लीळाचरित्र’ हे सर्वार्थानं पूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. एकतर मूळ ‘लीळाचरित्र’ करताना म्हाइंभटांकडून लीळा संकलनाचं काम अत्यंत कष्टपूर्वक, नेटानं आणि आदर्शवत असं झालेलं असलं तरी काही लीळा सुटून राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात हे प्रमाण नसल्यात जमा आहे. दुसरी गोष्ट मूळ ‘लीळाचरित्र’ खालसेयाच्या धाडीत नष्ट झालं. श्रीचक्रधरांच्या तत्कालीन परिवारात जे जे शिष्य होते, त्यातील बहुतेक जण विद्वान पंडित असल्यामुळे त्यांना ‘लीळाचरित्र’ अक्षरक्ष: मुखोद्गत होतं. लीळाचरित्राची पुनर्बांधणी करताना त्याचा फायदा झाला. ‘एकछंदी प्रज्ञा’ असलेली हिराइसा या कामी अत्यंत महत्त्वाची ठरली. ‘लीळाचरित्रा’चा ‘हिराइसा पाठ’ प्रसिद्ध आहे. या टप्प्यावरसुद्धा अनेक लीळा सुटल्याचं नाकारता येणार नाही. काही लीळा प्रक्षिप्त झाल्याचं तर सर्वश्रुतच आहे. केवळ दिवाळीच्याच संदर्भानं नव्हे तर स्थान, व्यक्ती, दिवस या नोंदी करतानाही दुर्दैवानं अनेक लीळा राहून जाण्याची शक्यता आहे.’’

‘लीळाचरित्रा’त श्रीचक्रधरांनी भक्तांसमवेत दिवाळी सण साजरी केल्याच्या तीन लीळा आल्या आहेत. एक दिवाळी जालन्यात आणि दुसरी नेवाश्यात. हिवरळी (सध्याचा जालना)मध्ये दिवाळी साजरी केली असल्याच्या दोन लीळा पूर्वार्धात आहेत. श्रीचक्रधर दाभाडीहून जालन्याला आले. तिथं त्यांचं दोन महिने वास्तव्य होतं. या ठिकाणी अनेक लीळा घडल्या. हे स्थान जालना शहरातील मस्तगढ विभागात पश्चिमाभिमुख देवळात अवस्थान स्थानाच्या पूर्वेस पडवीत आहे. चक्रधरांच्या वेळी इथं नरसिंह मढ होता. आज हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावानं प्रख्यात आहे.

माहादाइसाने जाल्यनात दिवाळी केल्याची लीळा ‘।। माहादाइसा करवी दिवाळी सण करवणे।।’ या शीर्षकानं आली आहे. माहादाइसाने गोसावीयांना दिवाळी करीन अशी विनंती केली. श्रीचक्रधरांनी माहादाइसेला सर्व भक्तांसह दिवाळी करण्याची परवानगी दिली. काही कमी पडलं तर मार्गाची कारभारीन असणाऱ्या बाइसाकडे मागा असंही सांगितलं. माहादाइसानं आदल्या दिवशीच सर्व तयारी करून ठेवली. सांजवेळेलाच पाणी साठवून ठेवलं. उमाइसेच्या (थोरली बहीण) घरून चीकसा (उटणे) आणि तेल आणून ठेवलं. पहाटे स्वामींचा उपहूड झाल्यानंतर आसन रचलं. आसनाभोवती जोंधळ्याचा चैक भरला. भक्तजनांसाठी पाट ठेवले. श्रीचक्रधरांना वीडा दिला. भक्तजनांसाठी तांबुळ केला. माहादाइसाने श्रीचक्रधरांना, भक्तजनांना ओवाळलं. माहादाइसाने श्रीचक्रधरांचं उटण्यानं अंग चोळून दिलं. भक्तजनांनी एकमेकांचं अंग चोळलं. माहादाइसाने श्रीचक्रधरांच्या श्रीमुगुटावर तेल ओतलं. सचैल स्नान झाल्यानंतर श्रीचक्रधरांनी भक्तजनांना पुष्कळ पाण्यानं आंघोळ घातली.

श्रीचक्रधर आसनावर उपविष्ट झाल्यानंतर चंदनाचा टीळा लावला. श्रीचक्रधरांची आणि भक्तजनांची ओवाळणी झाली. तोपर्यंत उजाडलं. नेहमीप्रमाणे बाइसाने पुजावसर केला. श्रीचक्रधर विहरणाहून आल्यानंतर माहादाइसाने उपहार केला. त्यांचं भक्तजनांसह भोजन झालं. श्रीचक्रधरांचा गुळुळा झाला, विडा झाला.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

श्रीचक्रधरांच्या ठायी असलेल्या आत्यंतिक श्रद्धेपोटी भक्तांनी त्यांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी स्वतःच्या जवळची सामग्री खर्च करणं आणि उत्साहानं त्यात सहभागी होणं स्वाभाविक आहे. परंतु यातलं वेगळेपण हे की, स्वतः श्रीचक्रधर भक्तांनाही दिवाळीचा आनंद देतात. स्वतःच्या हातानं त्यांच्या अंगावर पाणी टाकतात. या लीळेचा शेवट ‘गोसावीयासी भक्तजनासहित दिवाळी सण जालाः’ असा आहे. आपल्या भक्तांच्या आनंदात सहभागी होण्याची श्रीचक्रधरांची हातोटी वेगळी म्हणावी लागेल.

दिवाळी केल्यानंतर श्रीचक्रधर जालन्यावरून माहादाइसा, भटोबास आणि हंसराजा यांना श्रीप्रभूंच्या भेटीकरिता रूद्धपुराला पाठवतात आणि सर्व जण निघाल्यानंतर श्रीचक्रधरांची ग्रामांतर करण्याची प्रवृत्ती होते. ही ग्रामांतराची प्रवृत्ती भंगावी म्हणून सर्वजण आग्रह करतात. परंतु श्रीचक्रधर कुणाचंही ऐकत नाहीत. मग माहादाइसाच्या सांगण्यावरून एल्हाइसा श्रीचक्रधरांना ‘जी जी:गोसावी राहावेः मी गोसावीयांच्या ठाइ भाऊबीज करीनः’ असा आग्रह धरते, तेव्हा ते तिची विनंती तत्काळ मान्य करतात.

ही एल्हाइसा माहादाइसेच्या थोरल्या बहिणीची म्हणजे उमाइसेची मुलगी छोटी मुलगी असते. थोऱ्यामोठ्यांना न बधणारे श्रीचक्रधर लहानग्या एल्हाइसेची लडिवाळ मागणी मात्र तत्काळ मान्य करतात! एल्हाइसा जेव्हा त्यांना ‘रहा, मी भाऊबीज करेन’ अशी म्हणते, तेव्हा ते तिला ‘तुमते काइ असे?’ असा प्रश्न विचारतात. ती आपल्याकडे चार दाम असल्याचं सांगते. खरं तर लहानग्या एल्हाइसेकडे चार दाम असण्याचं काही कारण नाही. (त्या काळातली ही मोठी रक्कम) असलेच तर ते दाम खाऊसाठीचे  असण्याचीच शक्यता. श्रीचक्रधरांच्या भाऊबीजेसाठी एल्हाइसा ते खाऊचे दाम खर्च करण्यास तयार होते.

एल्हाइसा जेव्हा श्रीचक्रधरांना ‘माते चारी दाम असति: त्याचे मी गोसावीसालागी लाडू करीन:’ म्हणते तेव्हा श्रीचक्रधर तिला लाडू करण्याचा विधी सांगतात. तो ‘लीळाचरित्रा’त अगदी त्याच शब्दात वर्णिला आहे. ‘आपणची गहू दळावे: आपणची सोजी काढावी: आपणची सेव वळावी: आपणची सेव तळावी: आपणची लाडू बांधावे: दाखौ लाभे पर करवु न लभे:’ (गहू दळणं, सोजी काढणं, सेव वळणं, तळणं आणि मग त्याचे लाडू बांधणं)

यातली मजेशीर गोष्ट अशी की, श्रीचक्रधरांनी एल्हाइसेला हे सर्व स्वतः करण्यास सांगितलं. खरं तर तिच्या वयाचा विचार करता हे सारं तिला न पेलवण्यासारखंच आहे. तरीपण श्रीचक्रधर तिला करावयास सांगतात. फार तर विचारावं, केलेलं दाखवावं, परंतु कुणाकडून करवून घेऊ नये. श्रीचक्रधर स्वयंसिद्धतेवर, स्वतःच प्रयत्न करण्यावर भर देतात, हे अगदी स्पष्ट आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अगदी लहानगी एल्हाइसा सांगितल्याप्रमाणे स्वतःच सारं करत लाडू तयार करते, ते दुरडीत घालते आणि त्यावर पालवं झाकून श्रीचक्रधरांसाठी घेऊन येते. आणलेले लाडू त्यांना अर्पण केल्यानंतर बाइसा एल्हाइसेचे हात पाहते, तर ते कुंकासारखे लाल लाल झाल्याचं तिच्या लक्षात येतं. बाइसाने ‘बाबा: बाबा: बटीकेचे दोन्ही हात कुंकु ऐसे जाले असति:’ असं म्हटल्यावर श्रीचक्रधर तिचे हात हातात घेतात, त्यावर श्रीमुखीची पिक घालतात आणि दोन्ही हात एकमेकांवर घासायला सांगतात. एवढ्यानं एल्हाइसेच्या हाताची आग कमी होते आणि तिला थंड थंड वाटायला लागतं.

यातलं श्रीमुखीची पिक घालण्यानं आग कमी झाल्याचं मिथक आपण थोडं बाजूला सारलं तरी श्रीचक्रधरांनी एल्हाइसेचा हात हाती घेणं, त्यावर फुंकर घालणं, प्रेमानं कुरवाळणं आणि ते हात एकमेकांवर घासायला सांगणे, यामुळे तिच्या हाताची आग शमणं, त्रास नाहीसा होणं आणि तिला शांत, थंड वाटायला लागणं, हे सहजसाध्य वाटतं.

नेवासा येथे असताना बाइसाने गोसावीयांच्या ठायी दिवाळी केली. त्याचं वर्णन ‘।।माहात्मेया दिवाळी सनु करवणे।।’ या लीळेत आलं आहे. श्रीचक्रधरांना मर्दना मादने झालं, मंगळार्ती झाली आणि ते बाहेरच्या पटीशाळेवर आसनस्थ झाले. दिवाळी सणानिमित्त गावातील महाजन दर्शनाला येतात. त्यांच्या अंगावरची भरजरी वस्त्रं पाहून श्रीचक्रधरांजवळ असलेल्या भक्तांना दुःख वाटू लागतं. आपल्या भक्तांच्या अंगावरील पांढरी, भुरकी वस्त्रं पाहून श्रीचक्रधरही खिन्न होतात. ही खिन्नता घालवण्यासाठी त्यांनी दोन गोष्टी केल्याचं वर्णन लीळेत आलं आहे-

‘भगतजनाते गोसावी कृपादृष्टी अवलोकीले: आणि अवघेयासि आनंद प्रकटले तथा संचरला: मग महाजन आपणेयाकडे पाहाति: आणि भगतीजनाकडे पाहीले: तवं आपणेयाते सौच्य देखति: आणि भगतीजनाते थोर आगाध देखति: ऐसी वाडवेळ अस्तीति भोगीली:’ हे एक वर्णन. आणि दुसरे ‘मग सर्वज्ञे म्हणीतलें: वानरेया: तुम्हासि काही म्हणीय असे कींगा: मग भटासि आठवले मज वस्त्रे आणु जावे असे:’

श्रीचक्रधरांची कृपादृष्टी आणि त्यातून मिळणारं चैतन्य अनेक भक्तांनी अनेक प्रसंगांत अनुभवलं आहे. या प्रसंगात ते मिथक म्हणून गृहीत धरलं तरी केलेली दुसरी कृती महत्त्वाची आहे. श्रीचक्रधरांनी लक्षात आणून दिल्यावर भटोबासांना वस्त्रं आणण्याची आठवण येते. त्यांना भक्तांच्या अंगावरील फाटक्या, जीर्ण वस्त्रांची कल्पना नसेल असं कसं म्हणता येईल? दिवाळीनिमित्त सर्वांसाठी नवे कपडे आणण्याचं श्रीचक्रधरांनी भटोबासांना आधीच सांगून ठेवलं होतं, पण महाजनांच्या येण्यानं त्यांच्या ते लक्षात राहिलं नाही. पण स्वामी जेव्हा ‘तुम्हासि काही म्हणीय असे कींगा’ असं म्हणतात, तेव्हा भटोबासांना ते आठवतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महानुभाव पंथातील ‘मार्गा’त भक्तांसाठी, मार्गमंडळीसाठी वर्षातून एकदा नव्या वस्त्राचं वाटप केलं जातं. त्याला ‘पासोडी’ असं म्हणतात. ती ‘पासोडी’ वाटपाची परंपरा मार्गात आजही सुरू आहे. या परंपरेमागे उपरोक्त लीळेतील स्वामींचा आदर्श पंथीयांच्या डोळ्यापुढे असतो.

श्रीचक्रधरांनी महाराष्ट्रातील परिभ्रमणाच्या काळात साजऱ्या केलेल्या दिवाळीचं जे वर्णन ‘लीळाचरित्रा’त आलं आहे, त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की, सण-उत्सवाच्या प्रसंगी श्रीचक्रधर भक्तांच्या विनंतीचा मान राखून त्यांच्या आनंदात सहभागी होत आणि स्वतःबरोबर त्यांनाही सहभागी करून घेत. भक्तांच्या मनातील न्यूनगंड कमी करून त्यांच्या ठायी आत्मविश्वास निर्माण करत. दुसरं म्हणजे यातून यादवकालीन सांस्कृतिक परंपरेचंही दर्शन होतं!

संदर्भ -

१) महानुभावांचा इतिहास -  ले. कै. मुरलीधर कोळपकर, महंत प्रभाकरबाबा संन्याशी, २०१०

२) स्थान दर्शन -  संपा. हंसराज खामनीकर, महानुभाव साहित्य प्रकाशन, २०१५

३) लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा -    संपा. प्रा.पुरुषोत्तम नागपुरे, लीळाचरित्र गौरव निधी, २०१८

४) लीळाचरित्र परिशिष्ट २ - व्यक्तीसूची -   संपा. नरेंद्रमुनी अंकुळनेरकर, अ.भा.महानुभाव महामंडळ, २०१९

..................................................................................................................................................................

लेखक हंसराज जाधव पैठणच्या ‘प्रतिष्ठान महाविद्यालया’मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

hansvajirgonkar@gmail.com          

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा