तंत्रज्ञानाच्या मागून फरफटत जायचे की, श्रेयसाच्या दिशेने जाणारी नवनिर्मिती करायची, याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे
दिवाळी २०२१ - विशेष लेख
विजय तांबे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 23 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख चौथी औद्योगिक क्रांती Fourth Industrial Revolution फोर्थ आयआर 4IR महात्मा गांधी Mahatma Gandhi

वर्ध्याचे ग्रामीण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री श्रीकांत कारंजेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  दरवर्षी ‘अश्वत्थ विमर्श’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाचे त्याचे सातवे वर्ष होते. या वेळी या कार्यक्रमात गांधीअभ्यासक व कथाकार विजय तांबे यांचं ‘चौथी औद्योगिक क्रांती (कृत्रिम बुद्धिमत्ता) व त्यातून येणारी आव्हाने’ या विषयावर ९ ऑक्टोबर २०२१ रोजी व्याख्यान झालं. त्याचं हे शब्दरूप…

..................................................................................................................................................................

श्री श्रीकांत कारंजेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित होणाऱ्या व्याख्यानात या वर्षी मला बोलायची संधी दिल्याबद्दल कारंजेकर कुटुंबीय आणि संयोजकांचे मी आभार मानतो. श्रीकांत  कारंजेकर यांचा माझा प्रत्यक्ष परिचय नव्हता. ग्रामीण तंत्रज्ञानात संशोधन आणि कार्य करणाऱ्या श्रीकांतभाऊंना विज्ञान, समाजशास्त्रापासून अध्यात्मापर्यंत सर्व विषयांत रस होता, गती होती. ते भविष्याचा विचार करणारे कृतीशील विचारवंत होते. रवीने जेव्हा मला श्रीकांतभाऊंबद्दल सांगितले, तेव्हा आपण या माणसाला भेटायला हवं होतं, असं मनापासून वाटलं. आजचा विषय मांडून झाल्यावर आपल्याला खरंच जाणवेल की, आज श्रीकांतभाऊंची फार गरज होती. आजचा कार्यक्रम खरं तर यापूर्वीच होणार होता. त्यानिमित्ताने मी एक टिपण लिहिलं होतं. यथावकाश ते ‘सर्वंकष’च्या अंकात प्रसिद्ध झालं.

गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘सेवाग्राम कलेक्टिव्ह’ नावाचा एक अनौपचारिक गट तयार झाला. त्यातला मी एक. लोकांचा गांधी लोकांपर्यंत पोचवण्याचे आमचे उद्दिष्ट ठरले. मी आणि प्रदीप खेलूरकर या निमित्ताने देशात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरलो. समाजातील विविध गटांशी संवाद केला. हे अंदाजे २०१७ला सुरू केले. आम्हाला सर्वत्र मोडकळीस आलेली शेती आणि सर्वदूर पसरलेली बेकारी दिसली. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून गांधीजींच्या गोष्टी सांगून स्मरणरंजन करण्याच्या आम्ही विरोधात होतो. आजच्या प्रश्नांशी गांधींना जोडून घ्यायच्या खटपटीत आम्हाला ‘चौथी औद्योगिक क्रांती’ हाताशी लागली. ती समजून घेण्यासाठी आम्ही सर्वजण संगणकतज्ज्ञ, प्राध्यापक मंडळी, औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ पदावरील मित्र या सगळ्यांशी बोलणे केले. त्यांची मदत झाली. नेटवर सर्फिंग केले. हे सगळं २०१८मध्ये सुरू केलं.

समाजात आमूलाग्र बदल घडतात, त्याचे जीवनात सर्वदूर परिणाम होतात, तेव्हा ‘क्रांती’ हा शब्द वापरला जातो, असं ढोबळमानाने म्हणता येईल. पहिली औद्योगिक क्रांती वाफेच्या इंजिनातून झाली. दुसरी विजेचा शोध लागल्याने झाली. तिसरी अगदी हल्ली संगणकाच्या वापरातून झाली. प्रत्येक वेळी उत्पादन तंत्रात आमूलाग्र बदल झाले. अतिशय सुबक आणि नेटक्या वस्तू वेगाने उत्पादित होऊ लागल्या. मालाचा दर्जा सुधारला आणि उत्पादन अफाट वेगात होऊ लागलं. त्यामुळे उद्योजकाला नवनवीन बाजारपेठा शोधणे क्रमप्राप्त झालं. गेल्या अडीचशे वर्षांतील साम्राज्यवाद ते जागतिकीकरण असा सलग विकास आपल्याला आढळून येतो. या सर्व काळात संपत्ती खूप वाढली, पण त्याच वेगाने विषमताही वाढली. तंत्रज्ञान विकसित होते तसे रोजगार कमी कमी होत जातात. बहुदा काही नवीन रोजगारांच्या शक्यता वाढतात. उदाहरणार्थ, विजेच्या वापरानंतर नवीन निर्माण होणारे रोजगार म्हणजे वायरमन, इलेक्ट्रिशियन हे होते. तिन्ही औद्योगिक क्रांत्यांमध्ये तंत्रज्ञान विकसित होत गेले, तरीही त्यावर माणसाचा ताबा होता. माणसाच्या अचूकपणाच्या, श्रमाच्या, वेगाच्या, कार्यक्षमतेच्या मर्यादा यंत्र ओलांडते, पण तरीही त्यावर माणसाचा ताबा होता.

..................................................................................................................................................................

भांडवलशाही ते मार्क्सवाद, गांधीवाद किंवा कोणतेही समाजचिंतन असले तरीही त्यामध्ये मानवी जीवनाचे श्रेयस म्हणजे अंतिम साध्य काय हे निश्चित करून  त्या दिशेने जाणारा समाज अशी मांडणी केली जाते. आज उपभोगापुरता उरलेला माणूस श्रेयसाचा विचार करू शकत नाही. आजचा समाज मोकाट तंत्रज्ञानाबरोबर फरफटत जात आहे. तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञान नसते.

.................................................................................................................................................................

चौथी औद्योगिक क्रांती ही विकसित होत गेलेली असल्याने आपल्याला धक्का जाणवत नाही. हे संबंधितांच्या पथ्यावर पडणारे आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ‘ए.आय.’सोबत इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशीन लर्निंग असं खूप काही आहे. ए.आय. हा अतिशय प्रगत प्रोग्राम असून माणसाच्या अनेक क्षेत्रात तो प्रभुत्व गाजवत आहे. एखाद्या प्रोग्रामला प्रथमच इंटेलिजन्स म्हटले गेले आहे. तो भविष्यात माणसांची जागा घेईल हे खरे ठरण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. ए.आय.मुळे घडणारा बदल दूरगामी परिणाम करणारा असेल. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे माजी अध्यक्ष क्लौज श्लोफ यांनी ‘आय आर फोर’ हा ब्रॅन्ड लोकप्रिय केला. त्यांनी या विषयावर पुस्तकेही लिहिली. ते आपल्या पुस्तकात म्हणतात की, जगामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे एकसारखे आणि साचेबद्ध असलेल्या ५२  ते ६९ टक्के नोकऱ्या किंवा कामे नष्ट होतील. ३७ टक्के कामांमध्ये बदल होतील, तर ९ टक्के नवीन नोकऱ्या निर्माण होतील. आपल्या देशाच्या नीती आयोगाने ‘एआय फॉर ऑल’ नावाचे प्रेझेन्टेशन बनवले. त्यात असे मांडले आहे की, तांत्रिकदृष्ट्या ऑटोमेशन होऊ शकणाऱ्या (ऑटोमेटेबल) क्षेत्राचे रोजगार मूल्य आहे १.१ ट्रिलियन डॉलर आणि संबंधित कामगारांची संख्या असणार आहे २३.३ कोटी. एकंदर ऑटोमेशनची क्षमता आहे ५२ टक्के. आयटी क्षेत्रातील ३० लाख आणि उत्पादन क्षेत्रातील एक कोटी रोजगारावर याचा परिणाम होणार आहे. अशी वेगवेगळ्या जागतिक संस्थांनी वेगवेगळ्या उद्योगांबद्दल आकडेवारी तयार केली आहे. थोडक्यात भावी काळात ऑटोमेशनमुळे रोजगारावर भयानक परिणाम होणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तांत्रिक प्रगती सोबतच ऑटोमेशन होत जाते. मालाच्या उत्पादनासाठी, यंत्रांचे नियंत्रण करण्यासाठी, शॉप फ्लोअरवर कुठलीही सामान्य अडचण आल्यास माणसाची गरज लागणार नाहीएय. आता आपण आपल्या आसपासची ऑफिसे, कारखाने, शेते सगळं आठवू या. तिथं काम कसं चालतं ते आठवू. त्या कामामध्ये तोचतोचपणा आणि साचेबद्धपणा किती टक्के असतो, हे तुम्हीच ठरवा. आपल्या मनात आकडा उमटल्यावर धक्का बसतो की, ही सगळी कामं नष्ट होणार... जेव्हा माणसापेक्षा ए.आय. किफायतशीर होईल, तेव्हा कामावर माणसाची गरज कशाला राहील? आपल्या इथे कापूस वेचण्यासाठी रोबो येणार अशी बातमी होती. उसतोडणी यंत्रेही महाराष्ट्रात अवतरणार असल्याचे कळते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

यात कोणते नवीन रोजगार निर्माण होतील हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याबद्दल संदिग्धता आहे. याचे एक कारण म्हणजे वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान. कोणते रोजगार निर्माण होतील, याबाबत असं मांडले जाते की, जे नवनिर्मितीचा, चौकटीबाहेरचा विचार करतात आणि ज्यांची तंत्रज्ञानावर पकड आहे, अशा मंडळींना संधी आहे. नवनिर्मितीसाठी त्यांचा उपयोग होईल. त्याचबरोबर मानसोपचारतज्ज्ञ, पुरातत्त्व अभ्यासक, हॉस्पिटलमध्ये काम करणारे वॉर्डबॉय आणि आया, आणि कोरिओग्राफर अशा प्रकारची थोडी कामे राहतील.

थोडक्यात ज्यांचा प्रोग्राम बनू शकत नाही ते राहतील. काही तज्ज्ञ मंडळी म्हणतात की, अनेक कामे उपलब्ध होतील. या कामांना ‘गिग जॉब’ म्हणतात. जेवढे काम कराल त्याचे पैसे घ्या. नवीन कामाचे नवीन पैसे. कुठल्याच कामाची शाश्वती नाही, बढती, आठवड्याची सुट्टी नाही, आरोग्य विमा, दीर्घकालीन सुविधा असं काहीच नाही. ओला-उबरच्या टॅक्सीचे चालक हे याचे आदर्श उदाहरण आहे.

…आम्ही या अभ्यासाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्यावेळी तज्ज्ञ म्हणत होते की, ऑटोमेशन होणार काय म्हणताय? झालंसुद्धा. आज करोनाचा इफेक्ट असा आहे की, जे पुढच्या पंचवीस वर्षांत अपेक्षित होते, ते आताच डोळ्यासमोर दिसत आहे. मोठ्या खाजगी उद्योगांत रोजगार निर्मिती जवळजवळ बंद आहे. सार्वजनिक क्षेत्राचे एवढेच सांगता येईल की, एका तरुणाने आत्महत्या केली, ती मीडियाने उचलून धरली म्हणून शासनाने एमपीएस्सीच्या परीक्षा जाहीर केल्या. माहीत नसलेल्या आत्महत्या किती असतील?

डावीकडून स्वाती सगरे, मदुरा व सुकल्प कारंजेकर, तारक काटे, लेखक विजय तांबे, विभा गुप्ता, मीना कारंजेकर, अनुराधा मोहनी व रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ. समोर छोटा अयांश

आता तंत्रज्ञानातून निर्माण होणारी स्थिती आपण पाह्यली. आता अर्थव्यवस्थेकडे वळू. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल सांगताना २०१८ची थोडक्यात आकडेवारी सांगणार आहे. ‘ऑक्सफॅम’ने भारताच्या विषमतेबद्दल मांडलेली आकडेवारी आहे. सर्वोच्च स्थानावरील १ टक्के लोकांकडे ५१ टक्के  मालमत्ता आहे. त्यापुढील ४ टक्के लोकांकडे १७ टक्के मालमत्ता आहे. नंतरच्या ३५ टक्के लोकांकडे २७ टक्के मालमत्ता आहे आणि तळातल्या ६० टक्के लोकांकडे फक्त ५ टक्के मालमत्ता आहे. थोडक्यात सर्वोच्च ५ टक्के लोकांकडे ६८ टक्के मालमत्ता आहे. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आणि अधोगतीचा आलेख अतिशय वेगाने खाली उतरला. मात्र ५ टक्के लोकांकडे ६८ टक्के हे समीकरण बदलले नाही. यापुढेही ऑक्सफॅमने आकडेवारी मांडलेली आहे. अगदी नुकताच २०२१चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अर्थव्यवस्थेवर कोणतेही अरिष्ट असो. हर्षद मेहता घोटाळा असो, नोटबंदी असो किंवा जीएसटीची अंमलबजावणी  सर्वोच्च मंडळींकडील मालमत्तेची टक्केवारी वाढती असते. देशाच्या विषमतेच्या स्थितीचे हे चित्र झाले.

आता आपण जीडीपीकडे वळू. अर्थशास्त्रीय ठोकताळा असा आहे की, देशाचा जीडीपी ३ टक्के वाढला, तर बेरोजगारी १ टक्का कमी होते. ‘अजीज प्रेमजी विद्यापीठा’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट’ने १९७२ पासूनची आकडेवारी जाहीर केली आहे. देशाचा जीडीपी सातत्याने वाढत असून रोजगार वाढण्याची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरलेली आहे. एक नवीन शब्द आहे – ‘जॉबलेस ग्रोथ’. म्हणजे प्रगती आणि विकासासाठी रोजगाराची गरज नाही. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर कॉम्प्युटर, रोबोमुळे रोजगार खालावला होताच. चौथ्या औद्योगिक क्रांतीतील ए.आय., ऑटोमेशन आणि त्याबरोबरच्या इतर तंत्रज्ञानामुळे रोजगार नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वांत टोकावरच्या ५ टक्के लोकांची भूक भागवायला ९५ टक्के लोकसंख्येची गरज लागणार नसेल, तर त्या ९५ टक्क्यांचे भवितव्य काय? अशा ९५ टक्क्यांना बाजूला काढून अर्थव्यवस्था चालू शकते का? हा प्रश्न आपण लक्षात ठेवू या आणि आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू.

आज ‘ग्रोथ’साठी ‘जॉब’ची गरज नाही म्हणतात. मात्र आता संपत्ती निर्मितीसाठी उत्पादनाची गरज नाही, हे आपल्याला मान्य करून घ्यायला हवे. पूर्वीपासून काय शिकवत होते की उत्पादक/ कारखानदार/भांडवलदार जो कोणी असेल तो कच्चा माल गोळा करतो, भांडवल, मजुरांसह उत्पादनाची सर्व साधने कामाला जुंपून पक्का माल तयार करतो. बाजारात विकतो. त्यावरील नफा परत धंद्यात गुंतवतो. अधिकाधिक फायद्यासाठी मजुरांचे शोषण करतो. आता परिस्थिती बदललेली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासातून भरमसाठ उत्पादन झाले. फायदा ही भरमसाठ झाला. अतिरिक्त पैसा भांडवली बाजारात आला. म्हणजे शेयर मार्केटमध्ये आला. या बाजारात जोखीम खूप आहे. वेग खूप आहे. स्थिरता नाही मात्र फायद्याची टक्केवारी प्रचंड आहे, कारण परतावा वेगात मिळतो. एखाद्या वस्तूच्या उत्पादनातून मिळणारा फायदा हा काही कालावधी नंतर मिळतो. शेयर बाजारात काही दिवसात फायदा मिळतो. यातील जोखमीचे व्यवस्थापन करायला कंपन्यानी तज्ज्ञ नेमले. आता सगळ्या कंपन्यांकडे फंड मॅनेजमेंट डिपार्टमेंट असते.

गेल्या दहा वर्षातील कंपन्यांचे ताळेबंद पाहिल्यास उत्पादनातून मिळणाऱ्या फायद्याच्या बरोबरीने भांडवली बाजारात फायदा मिळत असल्याचे दिसत आहे. उत्पादकाची गुंतवणूक उत्पादनाकडे वळवण्यापेक्षा भांडवली बाजाराकडे वळत आहे. पैशातून पैसा निर्माण करण्याचे आकर्षण वाढत आहे. तसेच परदेशातून येणारी गुंतवणूक उत्पादक कामामध्ये गुंतवली जाण्यापेक्षा अधिक प्रमाणात भांडवली बाजारात गुंतवली जात आहे. हे चिंताजनक असल्याचे कारण अपेक्षेप्रमाणे परतावा दिला नाही, तर गुंतवणूक काढून घेणे सोपे असते. आणि म्हणून परदेशी गुंतवणूकदारांच्या सोयीची जास्त काळजी घेतली जाते.

तंत्रज्ञानातून निर्माण होणारे संपत्तीचे केंद्रीकरण विकेंद्रित शासनव्यवस्थेत होऊ शकत नाही. अर्थव्यवस्था आणि शासनव्यवस्था एकमेकाला पूरक असतात. इथे लोकांनी निवडून दिलेले सरकार असले तरीही राज्यांना दुबळे ठेवून गरजेपेक्षा जास्त मजबूत केंद्रीय व्यवस्थेच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. राज्यांना जीएसटीमधील त्यांचाच वाटा मागितला तरी मिळत नाही. मग राज्य चालवायचे कसे, हे प्रश्न विशेषतः गैरभाजप राज्य सरकारांच्या बाबतीत जाणवत आहेत.  

तंत्रज्ञानाचे अजून एक वैशिष्ट्य असे की, आपल्यासोबत ते स्वत:ची संस्कृती निर्माण करते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्याने माल खपवण्यासाठी गरज निर्माण करावी लागते, म्हणजे ग्राहकाची आवड बदलावी लागते. उत्पादकाला हवी ती गरज आणि ग्राहकासाठी उत्पादनासंबंधित कृत्रिम प्रतिष्ठा माध्यमांद्वारे निर्माण करावी लागते. माझ्या जीवनाला वस्तूमुळे प्रतिष्ठा प्राप्त होते, ही भावना निर्माण करण्यात उत्पादक यशस्वी होतो आणि त्याचा व्यवसाय सुखाने चालत राहतो. मनुष्य एक उपभोग घेणारे मशीन बनतो. वस्तू जीवनाच्या प्रतिष्ठेचे मूल्य बनल्यावर मानवी जीवनात सवंगता आणि थिल्लरपणा सहजगत्या प्रवेश करतात. मग खरे आणि खोटे यात भ्रम निर्माण करणे सोपे जाते. माणूस सखोल विचार करू शकतो, हेच तो विसरतो. यातून निर्माण झालेली जीवनशैली ही विविधता आणि बहुसांस्कृतिकता नष्ट करत जाते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्याने माल खपवण्यासाठी गरज निर्माण करावी लागते, म्हणजे ग्राहकाची आवड घडवावी लागते. उत्पादकाला हवी ती गरज आणि प्रतिष्ठेच्या कल्पना माध्यमांद्वारे निर्माण कराव्या कराव्या लागतात. माझ्या जीवनाची प्रतिष्ठा वस्तूंमुळे मिळते ही भावना निर्माण करण्यात उत्पादक यशस्वी होतो आणि मनुष्य उपभोग घेणारे मशीन म्हणून घडवले जाते. वस्तू ही जीवनाच्या प्रतिष्ठेचे मूल्य बनल्यावर मानवी जीवनात सवंगता आणि थिल्लरपणा सहजगत्या प्रवेश करतात. मग खरे आणि खोटे यातही भ्रम निर्माण होतो. मनुष्य प्राणी सखोल विचार करू शकतो हेच माणूस विसरतो. यातून निर्माण झालेली जीवनशैली समाजातील विविधता आणि बहुसांस्कृतिकता नष्ट करत जाते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्यांना आणि त्याचबरोबर फॅसिस्ट विचारसरणीला विविधता आणि बहुसांस्कृतिकता या दोन गोष्टींचा अडथळा असतो. आतापर्यंत आपण तंत्रज्ञान, आर्थिक स्थिती, राज्यव्यवस्था आणि यातून होणारा भारतीयत्वाचा ऱ्हास याचा धावता आढावा घेतला.

मूळ प्रश्न हे आहेत की, मी मनुष्य म्हणून नक्की काय करतो? माझं मनुष्यत्व कसं घडतं? ते या सगळ्या प्रक्रियेत नीट घडेल का? माणूस विचार करून निसर्गात हस्तक्षेप करतो आणि त्यातून काही नवनिर्माण करतो. त्या निर्मितीचा तो उपभोग घेतो, आनंद घेतो. थोडक्यात विचार करणे, निसर्गात सर्जक हस्तक्षेप करणे आणि नवनिर्मिती करून त्याचा उपभोग घेणे. यातूनच माणसाचे मनुष्यत्व अधिकाधिक उन्नत होत जाते. समाज आणि संस्कृती घडत जाते. ऑटोमेशन माणसाच्या हातून श्रम काढून घेणार आहे आणि चौथी औद्योगिक क्रांती विचार करणे जवळ जवळ संपवणार आहे किंवा फारच मोजक्यांच्या हाती ते काम राहील. त्यामुळे सर्वसाधारण माणूस उपभोगापुरता राहील. समाजात रोजगार राहणार नाहीत, तेव्हा आपण निरुपयोगी असल्याची जाणीव तीव्र होत जाईल.

आजकाल माणसाच्या निरुपयोगीपणावर एका संकल्पना प्रसारित केली जात आहे- ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ (युबीआय). माणसाला रोजगार देऊ शकत नाही म्हणून त्याला जगण्यासाठी काही रक्कम देणे याला ढोबळमानाने ‘युबीआय’ म्हणतात. मात्र मला असं वाटतं की, तुम्हाला आम्ही रोजगार देऊ शकत नाही आणि आता तुमच्याकडे असलेली कौशल्ये समाजाला उपयोगाची नाहीत, आम्ही तुमची हलाखीची स्थिती बघू शकत नाही म्हणून आम्ही तुला मरेपर्यंत जगण्याचे पैसे देतो. मला पैसे देणाऱ्याबद्दल बोलायचं नाही. मात्र हे पैसे घेणाऱ्याला काय वाटत असेल? त्याची मानसिकता काय असेल? माझी समाजाला गरज नसणे म्हणजे माझी समाजाच्या लेखी किंमत शून्य असणे. ही त्या माणसाच्या आत्मसन्मानाला केवढी खोल जखम असेल. असे फुकट पैसे मिळाल्यावर माणूस सर्जक वागेल की विध्वसंक? समाजातल्या प्रत्येक स्तरावरील माणसाला, अगदी गरिबातल्या गरीबालादेखील, स्वत:चा आत्मसन्मान असतो. प्रत्येकाच्या आत्मसन्मानाचा मान ठेवल्यास समाजाचा गाडा नीट चालतो.

एक उदाहरण सांगतो. बीड जिल्ह्यातून दरवर्षी दीड ते दोन लाख मंडळी उसतोडणीच्या कामासाठी पश्चिम महाराष्ट्रात येतात. येताना ते गरीब असतात आणि आपल्या घरी परतताना जेमतेम वर्षभर पुरेल एवढी पुंजी गाठीला असते. ते कायमच गरीब असतात. मात्र आपण श्रम करून कष्ट करून पैसे  मिळवतो, हा त्यांचा आत्मसन्मान असतो. त्यांनी संघठित गुन्हेगारी केली तर जोखीम खूपच असेल, पण पैसे नक्कीच जास्त मिळतील. पण त्यांचा आत्मसन्मान त्यांना हे काम करू देत नाही. उद्या उसतोडणी यंत्रे आल्यावर यांचा रोजगार जाईल, त्या वेळी या मंडळींनी आत्मसन्मानाने कसे जगावे याचा विचार केला जाईल का? ऑटोमेशन आणि आयआर फोरच्या जमान्यात समाजातील आत्मसन्मानाचा तोल सांभाळला जाईल, याबद्दल शंका वाटते.

उद्यासाठी काय वाढून ठेवले असेल याचा विचार करायला सुरुवात केली की, आजची परिस्थिती हळूहळू समजू लागते. मोठ्या खाजगी उत्पादन कंपन्यांमध्ये भरती जवळजवळ बंद आहे. कायम रोजगारातील मोठा घटक तात्कालिक रोजगाराकडे वळला आहे. याची आकडेवारी ‘अजीज प्रेमजी विद्यापीठा’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट’च्या २०२१ च्या अहवालात उपलब्ध आहे. मोठ्या अर्थसंस्था आणि बँकांमध्ये एआयचा शिरकाव व्हायला सुरुवात होईल. सध्या सरकारी क्षेत्रात आउटसोर्सिंग वाढून नोकरभरती कमी कमी होत गेलेली दिसते. भावी काळातील सर्जक, कल्पक आणि नव्या रचना निर्माण करणारा वर्ग बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात तणावग्रस्त राहील. तर उरलेला वर्ग निरुपयोगी असेल. यामध्ये शेतमजूर, अकुशल कामगार, दारिद्र्यरेषेखालील मंडळींसोबत तंत्रज्ञानाने घरचा रस्ता दाखवलेले उच्चविद्याविभूषित, पदवीधर आणि तोचतोचपणाचे काम करणारे कारकूनही असतील.

आजपर्यंत विविध विचारांच्या मंडळींनी बेकारी, बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्य हे प्रश्न सोडवण्यासाठी विविध मार्ग शोधले. अगदी सशस्त्रपासून अहिंसक आंदोलने ते रचनात्मक कार्यक्रम इतका मोठा पट दिसतो. मात्र समाजातला मोठा घटक हळूहळू निरुपयोगी होत असल्याचे दिसत असताना त्या प्रश्नाला कसे सामोरे जायचे, याचा विचार कोणी केल्याचे आढळत नाही. माणूस म्हणून फक्त उपभोगापुरता प्राणी आणि समाजासाठी निरुपयोगी असणे ही दोन मोठी आव्हाने प्रथमच आपल्या समोर उभी ठाकली आहेत. स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्षाने राज्य करणे आणि वंचित पीडितांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून दबाव टाकणे, ही कामे वाटून घेतल्यासारखी झाली. आहे ती व्यवस्था टिकवून आणि आपल्या फायद्याचा विचार करता वंचितांच्या कोणत्या मागण्या मान्य करायच्या यासाठी सत्ताधारी डोकं लढवत राह्यले. तर आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षावर कोणकोणत्या मार्गांनी दबाव आणावा याचा विचार वंचित करत राहिले. या निरंतर चालेल्या प्रक्रियेत कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी सर्जकता आणि चौकटी बाहेरचा विचार करणे किंबहुना नव्या समाजाचा, मूलभूत बदलाचा विचार करणे आपण हरवून बसलो आहोत. सध्याची परिस्थिती खचितच निराशाजनक आहे. आता परिस्थितीचा रेटा इतका जबरदस्त आहे की, एकतर शरण जा किंवा नव्याने विचार करा, नव्याने मांडणी करा हे दोनच पर्याय शिल्लक आहेत.

आता सगळं जे घडत आहे ते थांबवून चक्र उलटं फिरवता येणार नाही. म्हणजे मी एकटा मला हवं तसं जगू शकतो. असं एकेकानं जगावं. असा सगळा समाज जगेल असं ज्याला म्हणायचं असेल त्यानं म्हणावं. मी या मताचा नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वेगवेगळे रंग एकमेकाच्या शेजारी ठेवून इंद्रधनुष्य तयार होत नाही, रंग एकमेकांत मिसळून त्यांच्या असंख्य छटा तयार होतात आणि त्या सर्वांचे मिळून आपल्याला अद्भुतरम्य इंद्रधनुष्य दिसते. समाज हा इंद्रधनुष्यासारखा असतो. असो.

मुळात आजच्या स्थितीला येईपर्यंत सगळे शांत आहेत. कारण प्रगत आणि अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञान हेच सर्व प्रश्नांना उत्तर देईल, दारिद्र्य निर्मूलन त्यातून होईल, अशी आपली धारणा होती. मात्र नंतर आपणच प्रश्न उपस्थित करू लागलो की, जगात सर्वांनी सरसकट एकच तंत्रज्ञान वापरणे योग्य होईल का? प्रत्येक भागाचे पर्यावरण, हवा, पाणी, नैसर्गिक संसाधने, लोकसंख्या, तिचा वाढीचा दर, जनतेची कौशल्ये, स्थानिक संस्कृती या सगळ्याला अनुरूप आणि साजेसे तंत्रज्ञान हवे, हा विचार स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला होता. पृथ्वीवरील आपण सर्वांनी एकाच छापाचे जगायचे का, या प्रश्नावर गंभीरपणे विचार करू लागलो, तर निराशेकडे न वळता उत्तराच्या दिशेने प्रवास करू शकतो.

कुठलाही समाजातील प्रश्न सोडवण्याचे ढोबळमानाने तीन मार्ग असतात. पहिल्या मार्गात मी आणि माझ्या आसपासचा जनसमूह मिळून हे प्रश्न सोडवू शकतो का? आपल्या विभागातील संसाधने कोणती? आपली कौशल्ये कोणती? आपल्या संसाधनांना अनुरूप अशी अजून कोणती कौशल्ये विकसित करू शकतो? त्यातून आपण कोणते उत्पादन निर्माण करू शकतो? कोठे विकू शकतो? अशा प्रश्नांच्या सोडवणूकीतून पर्यावरणपूरक आणि आत्मसन्मानाचा रोजगार निर्माण करू शकतो का?

स्वातंत्र्याच्या पूर्वी असा विविध अंगांनी गांधीजींनी विचार केला आणि त्यातून त्यांनी अनेक उद्योग निर्माण केले. त्या काळातील त्यांचे काम हे खऱ्या अर्थाने कल्पक, सर्जक आणि चौकटीबाहेरचे होते. अजूनही मुंबईच्या लोकल रेल्वे स्टेशनवर मिळणारे नीरा हे आरोग्यदायी पेय अनेकांना रोजगार देते. ही प्रेरणा गांधीविचारांची आहे. हे शंभर वर्षांपूर्वीचे प्रयोग आहे, तसेच करणे चुकीचे ठरेल. आजच्या काळाच्या संदर्भात नव्याने विचार करावा लागेल. नवे प्रयोग करावे लागतील. रोजगारक्षम आणि पर्यावरणपूरक उत्पादनतंत्र हे निकष कायम ठेवूनच विचार करावा लागेल.

एक उदाहरण घेतो. मधाला जगामध्ये खूप मागणी आहे. जगातला मोठा निर्यातदार देश चीन आहे. मात्र चीनमधील मध निकृष्ट दर्जाचा असल्याने ते भारतातून मध आयात करून तो आपल्या मधात मिसळतात आणि निर्यातक्षम मध निर्माण करतात. ‘बिझिनेस वर्ल्ड’च्या अंकात (India's competitor in export is not China but Industry 4.0, Business world, 16 July 2020) हे वाचले. आपण हेही लक्षात घ्यायला हवे की, जागतिकीकरणानंतर आपले उद्योगजगत आणि अर्थव्यवस्थाइतरांपासून वेगळी ठेवता येणार नाही. आपण कृत्रिम बुद्धिमता किंवा ऑटोमेशनला थोपवू शकत नाही, विरोध करू शकता. जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर या सगळ्यापासून आपले उद्योगजगत जास्त दूर राहू शकत नाही.

आपल्यापुढे हा पर्याय राहतो की, येणारे तंत्रज्ञान आपल्या इच्छेप्रमाणे वाकवण्यासाठी आपली ताकद निर्माण केली पाहिजे. यासाठी आपल्या विकासाच्या कल्पना परत एकदा तपासून घ्यायला हव्यात. आताचेच मधाचे उदाहरण घेऊ. इथे बसलेल्या मंडळींना मधमाशा पालनाचे फायदे काय, हे सांगण्याची गरज नाही. तेलबियांचे उत्पादन मधमाशा दुप्पट ते चौपट करू शकतात, हे ऐकून मी चक्रावलो. त्यानंतर मधमाशीतज्ज्ञ प्रा. निकम मला म्हणाले, ‘अहो, मधमाशीचा मध हे बाय-प्रॉडक्ट आहे. मुख्य काम शेतीचे उत्पादन वाढविणे आहे.’ असा हा मधमाशापालनाचा पर्यावरणपूरक व्यवसाय शेताच्या बांधावर पेटी ठेवून सुरू करता येतो. प्रा. निकम मार्गदर्शन करायला उत्सुक असतात. हा उद्योग आपले दोन्ही निकष पूर्ण करतो, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील मधाचे मानदंड कोणते? आपल्या देशात ते पूर्ण होऊ शकतात का? कसे पूर्ण करावेत? त्यानंतर जगातून ग्राहक मिळवून त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. या कामात एमबीए शिकलेल्या तरुणतरुणींना गुंतवावे लागेल. रोजगारक्षम आणि पर्यावरणस्नेही उत्पादनतंत्र ही दोन्ही तत्त्वे पाळून उत्पादन करावे, मात्र विक्री आणि वितरणासाठी आधुनिक तंत्रविज्ञानाची जोड घ्यावी. वर्ध्यातील सर्वांचा आवडता गोरसपाक आणि तिकडे मिळणारे शुद्ध तूप हे आता ‘अॅमेझॉन’वरून मला मुंबईत मागवता येते. थोडक्यात, परस्पर सहकार्यातून प्रश्न सोडवता येतात का, याचे प्रयत्न व्हायला हवेत.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

‘चौथी औद्योगिक क्रांती’ : आव्हानांचा पूर्णपणे नव्याने विचार करण्याची गरज

..................................................................................................................................................................

प्रश्न सोडवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे समाजाला लाभदायक होण्यासाठी माझ्या व्यक्तिगत जीवनात मी कोणते निर्णय घेणार आहे. मी एखादी वस्तू घेतो, तेव्हा तिच्या उत्पादन व्यवस्थेचा, निर्मितीचा मी समर्थक बनतो. त्यामुळे मी कोणती वस्तू खरेदी करावी, याचे निकष ठरवू शकतो का? माझ्या जीवनात वस्तूंच्या वापरावर मी मर्यादा आणू शकतो का? या विचारांचा /प्रश्नांचा मी संघटनात्मक पातळीवर गंभीरपणे विचार करू शकतो का? हे काही नवीन नाही.

गांधीजी दौऱ्यांमध्ये लोकांकडे हात पसरत. महिला आपल्या अंगावरील दागिने काढून अर्पण करत. त्या वेळी मी पुन्हा कधीही दागिना वापरणार नाही, अशी गांधीजी शपथ देत असत. दागिने न वापरणारी एक पिढी गांधीजींनी घडवली. गेल्या हजारो वर्षांतील अंधश्रद्धा दूर करून विवेकाने विचार करावा म्हणून चळवळ उभी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला. मात्र गेल्या ३५-४० वाढवलेली वस्तूंची किंवा उपभोगाची लालसा कमी करण्यासाठी आपण संघटनात्मक पातळीवर काहीच का करू शकत नाही? यासाठी चौकटी बाहेरचा विचार करून कार्यक्रम ठरविण्याची गरज आहे. परदेशात ‘मिनिमलीस्टिक’ जीवनशैली मानणाऱ्याना कदाचित गांधीजी माहीत नसतील, मात्र ती माणसं आपलीच  आहेत, समजून आपल्याला संवादाचे पूल बांधावे लागतील.

प्रश्न सोडवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे शासकीय धोरण बदलणे. शासनसंस्थेवर दबाव आणण्यासाठी जनसंघटन करणे हा मार्ग असतो. ही पद्धती पूर्वीपासूनची आहे. शासन करणारे आणि मागणी करणारे वंचित घटक एकमेकाशी कसे वागतात आणि त्यातून सर्जकता कशी हरवली जाते, हे मी आधीच बोललो आहे. त्याच चक्रात न अडकता जनतेला पटवून कोणत्या मागण्या मांडाव्यात, यावर डोकेफोडी करावी लागेल. उदाहरणार्थ, ज्या वस्तू गावात बनतात त्यांचे उत्पादन शहरात करू नये. शहराने शहरातली कामे करावी. टाटांनी स्टीलपासून मिठापर्यंत सर्व उत्पादन करावे ही आयडिया चुकीची आहे. हे आपले विचार जनतेच्या फायद्याचे आहेत, ते जनतेला कसं पटवून द्यायचं? याच्यावर विचार करताना आपल्याला चौकटी बाहेरचा विचार करावा लागेल. तसं पाहिलं तर हे तीनही मार्ग एकमेकांपासून वेगळे नाहीत, एकमेकात गुंतलेले, परस्परपूरकच आहेत.

राज्यसंस्थेच्या बाबतीत विषय चालू असल्याने अजून एक मुद्दा मांडायचा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि विरोधक असा संघर्ष होत राहिला. काही वेळा मागण्या मान्य होत, काही वेळा होत नसत. मात्र विरोधक आणि सत्ताधारी यांना संविधानाची चौकट मान्य होती. त्या दोघांनाही स्वातंत्र्य चळवळीची धगधगती पार्श्वभूमी होती. दोघांची ‘आयडिया ऑफ इंडिया’ मिळतीजुळती होती. मतभेद राखूनही सहअस्तित्व मान्य होते. आजची स्थिती वेगळी आहे. ज्या मंडळींना सहअस्तित्व मान्य नाही, जी मंडळी स्वातंत्र्य चळवळीच्या परंपरेला नकार देतात, संविधानाचा तोंडदेखला मान ठेवतात, असे लोक  आता लोकशाही मार्गाने संसदेत बहुमताने निवडून येउन सत्ताधारी आहेत. त्यांनी माध्यमांवर ताबा मिळवला आहे. न्यायव्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. अशा वेळी पूर्वापार चालत आलेले आंदोलनांचे, संवादाचे मार्ग बदलावे लागतील. जनतेशी कशाप्रकारे संवाद साधावा, ‘आयडिया ऑफ इंडिया’ त्यांच्या दैनंदिन जीवनाशी कशी जोडलेली आहे, हे त्यांना पटवून देण्याचा मार्ग कोणता आहे, याचा विचार करावा लागेल. आपल्या मूल्यांची चौकट न सोडता, अहिंसक सत्याग्रही वृत्तीनेच मार्गांच्या बाबतीत पूर्णपणे नवा विचार करण्याची वेळा आली आहे.

..................................................................................................................................................................

चौथी औद्योगिक क्रांती ही विकसित होत गेलेली असल्याने आपल्याला धक्का जाणवत नाही. हे संबंधितांच्या पथ्यावर पडणारे आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ‘ए.आय.’सोबत इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशीन लर्निंग असं खूप काही आहे. ए.आय. हा अतिशय प्रगत प्रोग्राम असून माणसाच्या अनेक क्षेत्रात तो प्रभुत्व गाजवत आहे. एखाद्या प्रोग्रामला प्रथमच इंटेलिजन्स म्हटले गेले आहे. तो भविष्यात माणसांची जागा घेईल हे खरे ठरण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. ए.आय.मुळे घडणारा बदल दूरगामी परिणाम करणारा असेल.

.................................................................................................................................................................

भांडवलशाही ते मार्क्सवाद, गांधीवाद किंवा कोणतेही समाजचिंतन असले तरीही त्यामध्ये मानवी जीवनाचे श्रेयस म्हणजे अंतिम साध्य काय हे निश्चित करून  त्या दिशेने जाणारा समाज अशी मांडणी केली जाते. आज उपभोगापुरता उरलेला माणूस श्रेयसाचा विचार करू शकत नाही. आजचा समाज मोकाट तंत्रज्ञानाबरोबर फरफटत जात आहे. तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञान नसते. वाढती उपभोगाची  लालसा, वस्तूसंचयाचा हव्यास, वस्तूसंचय हेच प्रतिष्ठेचे लक्षण, हे या तंत्रज्ञानाच्या फायद्याच्या मुळाशी आहे.

या सगळ्यातून एक उथळ सवंगता निर्माण होणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानाच्या वेगात एकटा पडलेला माणूस आपापले समूह गोळा करून अस्तित्वदर्शनाचे सोपे मार्ग शोधतो. त्यातून धार्मिक, जातीय, वांशिक, प्रांतिक अस्मिता धारदार बनतात. मॉब लिंचिंग, धार्मिक दंगली हे या सगळ्याचे साईड इफेक्ट आहेत. जसजसं ऑटोमेशन आणि एआयचा वापर वाढत जाईल माणसाचे अस्तित्व नीरस आणि सपाट होईल. देशातील सर्वस्पर्शी बहुविधता विरत जाऊन सगळे एकाच छापाचे सपाट होतील. हे सपाटीकरण फॅसिस्ट मंडळींसाठी फारच सोयीचे असेल. या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला आणि येणाऱ्या परिस्थितीला आपल्या इच्छेनुसार वाकवायला आपल्याला संस्कृती अभ्यासकांपासून संगणक तज्ज्ञांपर्यंत अनेकांची मदत घेऊन प्रत्येक क्षेत्रात नवे पर्याय उभे करावे लागतील. आज आपल्या जीवनमूल्यांच्या प्रकाशात आपल्या पारंपरिक मार्गांसंबंधी नव्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. कारण समाजाने तंत्रज्ञानाच्या मागून फरफटत जायचे की, श्रेयसाच्या दिशेने जाणारी नवनिर्मिती करायची, याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख