यदुनाथ थत्ते : कणखर चारित्र्यवान संपादक
पडघम - माध्यमनामा
नरहर कुरुंदकर
  • यदुनाथ थत्ते आणि साधना साप्ताहिकाची काही मुखपृष्ठे
  • Thu , 21 October 2021
  • पडघम माध्यमनामा यदुनाथ थत्ते साधना साप्ताहिक साने गुरुजी एस. एम. जोशी जयप्रकाश नारायण नानासाहेब गोरे

‘साधना’ साप्ताहिकाचे प्रदीर्घ काळ संपादक राहिलेल्या यदुनाथ थत्ते यांच्या ५ ऑक्टोबर २०२१पासून जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे. नरहर कुरुंदकर यांना केवळ ५० वर्षांचे (१९३२ ते १९८२) आयुष्य लाभले. यदुनाथांशी त्यांची ओळख झाली, तेव्हा ते २० वर्षांचे होते. पुढील तीन दशकांत कुरुंदकरांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर जे लेखन केले, त्यातील सर्वाधिक लेखन यदुनाथांच्या काळातील ‘साधना’तून प्रसिद्ध झाले. त्यामुळे कुरुंदकरांच्या या लेखातील विवेचनाला विशेष महत्त्व आहे. हा लेख त्यांच्या ‘वाटचाल’ या पुस्तकातून घेतला आहे.

..................................................................................................................................................................

माझी आणि यदुनाथ थत्ते यांची पहिली भेट केव्हा झाली, हे मला आता आठवत नाही. बहुधा १९५२-५३ साली सेवादलाच्या कामाच्या निमित्ताने ते वसमत येथे आले होते, त्या वेळी त्यांची-माझी प्रथम भेट झाली असावी. वर्ष मला नक्की आठवत नाही; पण त्या भेटीत श्रीमती दुर्गा भागवतांच्या एका दीर्घकथेवर आम्ही काही बोललो होतो, असे मात्र आठवते. ही सगळीच आठवण झावळ-झावळ आणि पुसट-पुसट अशी आहे. तिचा नेमकेपणा सांगता येणार नाही. हा परिचय वाढत कसा गेला आणि त्याचे गाढ ममत्वात रूपांतर कसे होत गेले, हेही मला रेखीवपणे सांगता येणार नाही. (तरीही हा ऋणानुबंध आता उणापुरा पंचवीस वर्षांचा झाला आहे.) यदुनाथ थत्ते यांचा परिचय झाला कसा आणि तो वाढला कसा, याविषयी मलाच नव्हे, तर इतरांनासुद्धा रेखीवपणे फारसे काही सांगता येणार नाही, असा माझा अंदाज आहे. बहुतेक सगळ्या अशा मोठ्या व्यक्ती, ज्यांच्या मी सहवासात आलो त्यांचा, परिचय झाला कसा हे मला आठवते. पण या सामान्य नियमाला जे काहीजण अपवाद आहेत, त्यांपैकी एक यदुनाथ थत्ते.

मोठ्या माणसाचा आणि आपला परिचय आठवणीत असतो, याला एक कारण असते. बुद्धीचे, कर्तृत्वाचे असे कोणते तरी तेजोवलय या माणसांच्या भोवती असते. आपण कुणातरी मोठ्या माणसाला भेटतो आहोत, याची (थोडी पूर्वीच) तिथे जाणीव असते. त्यांच्या बुद्धीच्या अगर कर्तृत्वाच्या पूर्वज्ञात विकासामुळे काही प्रमाणात आपण प्रभावित झालेले असतो. त्यामुळे आपली व एखाद्या मोठ्या माणसाची भेट झाली म्हणजे आपल्या बऱ्या-वाईट प्रतिक्रिया रेखीव व स्पष्ट असतात. यदुनाथ थत्ते यांच्याबाबत हे घडण्याचा संभव फार कमी आहे. आणीबाणीच्या कालखंडात ‘साधना’ने शासनाविरुद्ध जो लढा दिला, त्यामुळे अलीकडे काही तेजोवलय त्यांच्याभोवती जमा झालेले दिसते. पूर्वी हेही नव्हते. भारदस्त आणि एकदम छाप टाकण्याजोगे त्यांचे व्यक्तिमत्त्व नाही. यदुनाथ तिशी-पस्तीशीतले तरुण कार्यकर्तेच दिसतात. आपण एका प्रौढ व जाणत्या संपादकाच्या सहवासात आहोत, असे न जाणवता आपण एखाद्या समवयस्क तरुण कार्यकर्त्याशी गप्पा मारतो आहोत, इतकेच त्यांच्याशी बोलताना जाणवते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

माझी-त्यांची प्रथम भेट झाली त्या वेळी आचार्य जावडेकर हयात होते. जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन यांची नावे ‘साधना’च्या शिरोभागी छापल्यानंतर उरलेल्या नावांच्याकडे कुणाचे लक्ष जावे याला कारण नाही. ‘साधना’ हे उग्र आणि भडक नियतकालिक कधीच नव्हते. साधनाची प्रकृती आरंभापासून गंभीर, संयमित व सौम्य अशीच राहिलेली आहे. आणि यदुनाथ थत्ते यांनी प्रयत्नपूर्वक आपला स्वभाव सौम्य बनवला आहे. आपले काम दिपवण्याचे नाही, कुणावर छाप बसवण्याचे नाही. आपले काम भिन्नभिन्न वृत्तीची माणसे स्नेही म्हणून एकत्र आणण्याचे व जमल्यास त्यांचे जीवन उजळण्याचे आहे, याची त्यांनी खूणगाठ बांधलेली आहे. अतिशय आग्रही अशी तत्त्वनिष्ठा, अत्यंत सौम्य आणि शीतल प्रकाशात सातत्याने कशी तेवत राहते, याबाबत यदुनाथ हा एक नमुना आहे. त्यामुळे त्यांचा परिचय सहज होतो, सहज वाढतो व पूर्ण बांधले गेल्याविना आपण मायापाशात कायमचे जखडले जातो आहोत, हे कळतच नाही.

सहजगत्या एखाद्याची ओळख व्हावी, तशी त्यांची ओळख होते. गाडीच्या, बसच्या प्रवासात आपली कुणाशीही ओळख होते; तास-दोन तास गप्पा होतात; नावे-गावे परस्परांना विचारून घेतली जातात; पुन: पुन्हा भेटण्याचे आश्वासनही आपण एकमेकांना देतो; पण प्रवास संपला की, ती ओळख संपते. काही दिवसांनी त्यांतले काही आठवणीत शिल्लकसुद्धा राहात नाही. मुद्दाम आठवण ठेवावी असे काही घडलेलेही नसते. यदुनाथांची ओळख अशा गाडीतल्या ओळखीसारखी सहजासहजी होऊन जाते. दोन ठिकाणी फरक हा असतो की, यदुनाथ सहज परिचयात येतात, कायमचे बांधून ठेवून जातात, कुणाच्याही जीवनात त्याला नकळत प्रवेश करणे ही अवघड कला आहे. पण यदुनाथांना ती साधलेली आहे.

आपण कुणीतरी आहोत हे विसरता येणे फार कठीण असते. ज्यांना आपण कुणीतरी आहोत, असे वाटावे याचे काहीही कारण नसते, त्यांनाही विनाकारणच आपण कुणीतरी आहोत, असे वाटत असते. मानवी मनाचा हा एक स्वाभाविक भाग आहे. आपणही कुणीतरी आहोत, या समाधानातच माणूस जगत असतो. आणि ज्यांची मते निरनिराळ्या विषयांवर निश्चित असतात, त्यांना तर आपण कुणीतरी आहोत, हे विसरता येणेच कठीण असते. सामाजिक, वैचारिक, राजकीय अशा निश्चित निष्ठा यदुनाथांच्याजवळ आहेत, आणि या निष्ठा नुसत्या सांगण्यापुरत्या नाहीत. या निष्ठांचा प्रचार, प्रसार हे आपले जीवनभरचे कार्य आहे, ही गोष्ट क्षणभरही ते विसरत नाहीत. मतांच्या बाबत तडजोडी करून आपल्या चाहत्यांची संख्या वाढवणारी काही बोटचेपी माणसे असतात. त्या गटात यदुनाथ बसणार नाहीत. अतिशय जाणीवपूर्वक एखादा माणूस आपलासा करणे आणि त्याला आपल्या वैचारिक निष्ठा देणे, हा त्यांचा सततचा प्रयत्न चालू असतो. अशा वेळी नकळत काही घडणे कठीणच असते. पण थत्ते यांना ही अवघड गोष्ट जमलेली आहे. ही एक प्रकारची सिद्धीच आहे; पण आहे त्याला इलाच नाही.

हे असे का घडते, याचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला सारखे असे जाणवते की, माणसांचा विचार करताना आपल्याकडून दोन चुका सातत्याने होत असतात. मागे या चुका होत आलेल्या आहेत आणि याहीपुढे या चुका होत राहणार आहेत. आपले मत एखाद्याला पटवून देण्याऐवजी आपला आग्रह स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी करण्याकडे फार असतो. विजय माझा झाला पाहिजे, प्रभाव माझा पडला पाहिजे, नाव माझे झाले पाहिजे, असा हा ‘मी’ सर्वत्र प्रभावी असतो. या स्वत:च्या अहंतेला पाजळत उजळीत निघणे आणि एखाद्या विचाराचा प्रचार करणे, या दोन बाबींतील फरक आपल्याला बहुधा ओळखता येत नाही.

यदुनाथांनी अतिशय काळजीपूर्वक हा वागण्या-बोलण्यातील ‘मी’ पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम असा होतो की, बोलणाऱ्याचा मी आणि ऐकणाऱ्याचा मी याचा फारसा झगडा कधी होत नाही. मी कित्येकदा तर असेही पाहिले आहे की, थत्ते यांचेच विचार समोरचा माणूस हळूहळू थत्ते यांना समजावून सांगत असतो. आपण यदुनाथ थत्ते यांना काहीतरी पटवून देण्यात यशस्वी होतो आहोत, या उत्साहाने समोरचा माणूस बोलत असतो, आणि प्राय: थत्ते यांचेच विचार तो आपले विचार म्हणून आग्रहाने सांगत असतो. तसे यदुनाथ मोठे संयमी आहेत. आपल्याला हवा तो विचार आपण समोरच्या माणसाच्या गळी उतरवला इतके समाधान त्यांना पुरते. हा माझा विचार मी तुम्हाला पटवून दिला, असा आग्रह ते धरत बसत नाहीत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

माणसे बोलतात फार. हे बोलत असताना त्यांनी फारसा विचार केलेला असतो असे नाही. मीही अनेकदा असे बोलतो की, मला नोकरीची पर्वा नाही. पण जेव्हा वेळ येईल त्या वेळेला आपली सुरक्षितता धोक्यात घालणे मला जमेलच असे नाही. आपण जे विचार बाळगतो ते सोयीस्कर म्हणून नसतात. या विचारांची किंमत मोजण्यास तयार असणे, हे भाग्य फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येते. यामुळे जीवनात एक चमत्कारिक असा विसंवाद निर्माण झालेला दिसतो. ज्या वेळी एखादा विचार मांडल्यामुळे आपले काहीच नुकसान होणार नसते, त्या वेळी निर्भय वातावरणात माणसे अतिरेकी भाषेत विचार मांडत असतात. या भाषेच्या दिखाऊ आक्रस्ताळेपणामुळे ही माणसे लोकप्रियही होतात. पण ही ज्वलज्जहाल मंडळी ज्या वेळी धोका निर्माण होतो, त्या वेळी शरणागतीसाठी निमित्त शोधू लागतात. आपल्या मतांची किंमत आपल्याला मोजायची आहे, हे ज्यांना सदैव भान असते, ती माणसे संपूर्ण मोकळीक असतानाही जबाबदारीनेच बोलतात; आणि जे बोलावे ते जबाबदारीने, हे सूत्रच पत्करलेले असल्यामुळे जेव्हा वेळ येते, तेव्हा किंमत मोजायलाही हीच माणसे अग्रभागी राहतात. जगात एकदम जाळ धरून उठणे आणि विजेप्रमाणे कडाडणे याचे महत्त्व फार मानले जाते. कोणत्याही वादळात न विझता तेवत राहणे, याचे महत्त्व ओळखण्याइतका सुजाणपणा अजून समूहाच्या ठिकाणी आलेला नाही.

गेल्या काही वर्षांत आपण पुन्हा एकदा नव्याने आक्रस्ताळेपणा आणि धैर्य यांतील फरक पाहून घेतलेला आहे. लोकशाही होती. लोकशाहीत स्वाभाविक असणारे स्वातंत्र्य होते. त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, राजवट काँग्रेसची होती. काँग्रेसच्या राजवटीवर आणि व्यक्तिश: इंदिरा गांधींच्यावर टीका करत असताना अधिक अतिरेकी आणि आवेशपूर्ण बोलतो कोण, याची जणू चढाओढ लागलेली होती. कर्कश्श सुरात एकेक जण बोलत होता. लोकशाहीच्या काळात ‘साधना’ ही काँग्रेसविरोधी होती. इंदिरा गांधींचाही ‘साधना’ने विरोधच केला. पण निषेधाची आणि विरोधाची भाषा जबाबदारीची व सौम्य होती. आरोळ्या आणि गर्जनांच्यामध्ये ‘साधना’चा आवाज नेहमीच सौम्य आणि मंद असा वाटला. पुढे ज्या वेळी आणीबाणी आली आणि लोकशाही, स्वातंत्र्य गुंडाळून घेतले गेले, त्या वेळी गर्जना करणारे आवाज एकाएकी बंद पडलेले दिसले. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एकेक जण नुसता गप्प बसला नाही, तर शरणागतीची चढाओढ त्यांच्यात सुरू झाली. लोकशाही गुंडाळून ठेवणाऱ्या शासनासमोर आरती ओवाळण्यासाठी ही सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने पुढे सरकताना दिसत होती. सिंहाप्रमाणे गर्जना करणारे एकाएकी केविलवाणे स्तुतिपाठक झालेले आहेत, असे चित्र दिसत होते.

या संघर्षात समाप्त होण्याची तयारी ठेवून शासनाच्याविरुद्ध कणखरपणे उभे राहण्याचे काम फक्त ‘साधना’ करत होती. मोडून पडण्याची तयारी ठेवून, न वाकता ‘साधना’ झगडत होती. पण हा कणखर झगडा एका अमानुष दमन यंत्राविरुद्ध चाललेला असतानाही ‘साधना’चा निर्भय असा आवाज शांत व गंभीरच होता. त्याही काळात ‘साधना’ची भाषा अतिरेकी झालेली नव्हती. त्या कणखर आणि गंभीर झुंजीचे संपादक नेते यदुनाथ थत्ते होते.

आणीबाणीच्या विरुद्ध एखादे जोरदार व्याख्यान देऊन अगर सत्याग्रह करून तुरुंगात जाणे, थत्ते यांना कठीण मुळीच नव्हते. असे काही त्यांनी केले असते तर त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेत भरच पडली असती. पण सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याच्या कार्यापेक्षा निर्भयपणे निषेधाच्या आवाजाचे सातत्य टिकवायचे दायित्व यदुनाथांनी स्वीकारले. तुरुंगात जाण्याची दर क्षणी तयारी होतीच; पण तुरुंगात जाण्याच्या उत्साहापेक्षा अखंड निषेध जागवणे हे कमी दीप्तीमान, पण अधिक महत्त्वाचे काम यदुनाथांनी स्वीकारले. त्यांचे सगळे धैर्य आणि सगळा निर्भयपणा या आणीबाणीच्या कालखंडात उजळून निघाला.

शरण जाण्याला निमित्ते सापडतातच. एक अतिशय गोंडस निमित्त असे आहे की, आणीबाणी आज ना उद्या संपणार, त्यानंतर नव्या निवडणुका होणार, या नव्या निवडणुकांच्या वेळी आपले प्रचाराचे हत्यार सुरक्षित असले पाहिजे. म्हणून वाटेल ती किंमत देऊन आपण फक्त अस्तित्व टिकवून ठेवत होतो, असे सोयीस्कर स्पष्टीकरण देणे अतिशय सोपे आहे. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, तेव्हा तिच्याविरुद्ध झगडण्याऐवजी शरणागती देऊन अस्तित्व टिकवणे ही काही मोठ्या पुरुषार्थाची बाब नाही. तडजोडी करून जगण्याला सोज्वळ निमित्त सांगण्याइतकी काहींची बुद्धी चतुर असते, इतकाच याचा अर्थ.

पारतंत्र्याच्या काळात, आज ना उद्या स्वातंत्र्य येईलच, त्या वेळी कारभार चालवण्यासाठी जाणकार नोकरांची गरज लागेल, या भव्य दूरदृष्टीने प्रेरित होऊन फक्त अभ्यास करत राहिलो आणि पुढे शांतपणे नोकरी करीत राहिलो, असे जर कुणी सांगू लागला आणि स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेण्याचे समर्थन तो करू लागला तर फारच कठीण होईल. परिस्थिती बदलत असते ती टिकवून राहण्याची गरज म्हणून शरणागती पत्करणाऱ्यांच्यामुळे नव्हे! परिस्थिती नेहमीच, ‘मोडेन पण वाकणार नाही,’ या जिद्दीने जे उभे राहतात त्यांच्यामुळे बदलते. यदुनाथांनीच असे म्हटले आहे की, ‘संस्था ध्येयवादासाठी उभ्या करायच्या असतात. कधी वेळ अशी येते की, ध्येयवाद जतन करण्यासाठी संस्थांचे अस्तित्व धोक्यात घालावे लागते.’ अशा निर्णयाप्रसंगी ध्येयवादाशी तडजोड करून संस्था टिकवण्याचे कामच जे पत्करतात, त्यांनी पराक्रमावर हक्क सांगू नये.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या झगड्यात यदुनाथ टिकले याचे एक कारण असे आहे की, त्यांच्या जीवनात विचार आणि भावना यांचा समन्वय झालेला आहे. तसे पाहिले तर मुळात यदुनाथ थत्ते हे विज्ञानाचे विद्यार्थी. केवळ महाविद्यालयीन जीवनात ते विज्ञान शिकत होते, इतकाच याचा अर्थ नाही. विज्ञान ही त्यांची जीवननिष्ठाच आहे. अतिशय वस्तुनिष्ठपणे तावून-पारखून एखादी गोष्ट घ्यायची अशी त्यांची नेहमीची पद्धत राहत आली आहे. श्रद्धेने आणि भोळेपणाने एखाद्या बाबीचा स्वीकार ते कधी करणार नाहीत. यामुळे यदुनाथ स्वप्नांच्या राज्यात फारसे विहार करू शकत नाहीत. वास्तवाच्या भूमीवर त्यांचे पाय घट्टपणे रोवलेले असतात. हळवेपणा आणि भाबडेपणा त्यांना फारसा मानवणारा नाही. विज्ञाननिष्ठा हे त्यांच्या जीवनाचे सूत्रच आहे.

परंपरावादाचे कोणतेही फार मोठे दडपण त्यांच्या मनावर कधीच नसते. परंपरेविषयीची फार मोठी श्रद्धा व भक्तीच नाही; यामुळे परंपरेच्या कोणत्याही घटकाविरुद्ध बंड करताना त्यांच्या मनाला फारसे क्लेश कधी होणार नाहीत. तसेच परंपरेविरुद्ध बंड करण्यासाठी त्यांना फार आढेवेढेही घ्यावे लागत नाहीत आणि बंडासाठी फार मोठ्या आवेशाची गरजही लागत नाही. बाजारातून सामान भरून आणावे आणि घरी आल्यावर ज्या सहजतेने पुडीचा दोरा आपण उकलून फेकून देतो तितक्याच सहजतेने गळ्यातले जानवे कायमचे तोडून टाकणे त्यांना शक्य झाले आहे. एक गोष्ट विचाराला पटली म्हणजे ती पटली. निष्कारण भाबड्या श्रद्धेचे ओझे यदुनाथांच्या मनावर कधीच नसते. जी काही मते आपण बनवणार ती थंड डोक्याने विचारपूर्वक बनवू आणि एकदा मत ठरले म्हणजे तितक्याच शांतपणे त्याची किंमत मोजू अशी त्यांची प्रवृत्ती आहे. यदुनाथांच्या या प्रवृत्तीमुळे सहसा त्यांच्यावर कोणत्याही भावनात्मक आवाहनाचा परिणाम होत नाही. फारसे चिडणे, संतापणे हेही त्यांच्या पिंडात नाही आणि उदास, हताश होणे, हेही त्यांच्याजवळ फारसे नाही.

सामान्यपणे विज्ञानाचा उपासक तर्ककठोर आणि रुक्ष असतो. त्याला जीवनातील ऋजुता आणि भावना यांचे माधुर्यच कळत नाही. यदुनाथ थत्ते याला अपवाद आहेत. भावनेच्या सर्वच आविष्कारांचे ते काळजीपूर्वक निरीक्षण करत असतात. माणसे चुका करतातच. या चुकांकडे क्षमाशीलतेने पाहण्याइतका उदारपणा त्यांच्याजवळ असतो. भावनांचे माधुर्य ते नेमके ओळखतात. लहान मुलांना हसतखेळत आणि खेळवत एखादा विचार सोपा करून कसा सांगता येईल, याचे प्रयोग ते करत असतात. विज्ञाननिष्ठेमुळे यदुनाथांचे जीवन अश्रद्ध झालेले नाही, तर त्यांच्या जीवनातील सर्वच श्रद्धा डोळस झालेल्या आहेत. माणूस केवढाही मोठा असो, त्याची चिकित्सा करायला यदुनाथ कधीच नकार देणार नाहीत. यामुळे व्यक्तिपूजेचे स्तोम न माजवता अखंडपणे चालू असणारे, व्यक्तींवरील श्रद्धा चिकित्सेचा स्वीकार करणारे प्रेम असे मोठे गंमतीदार मिश्रण त्यांच्या स्वभावात झालेले आहे.

साने गुरुजी हे यदुनाथ थत्ते यांचे एक श्रद्धास्थान. यामुळे साने गुरुजींच्याविषयी त्यांच्याशी बोलावे कसे, याविषयी माझ्या मनात बरीच घालमेल चालू होती. सेवादल परिवारात वावरलेल्या सर्वांचेच श्रद्धास्थान कमी-अधिक प्रमाणात साने गुरुजी हे असते. तेव्हा गुरुजी हे माझेही श्रद्धास्थान यात वादच नाही. पण साने गुरुजींवर माझी कितीही श्रद्धा असली तरी त्यामुळे त्यांची जी मते पटणार नाहीत, त्या मतांचा उघड प्रतिवाद करणे मला भागच होते. साने गुरुजींसारख्या भावनेच्या अंगाने अधिक झुकलेल्या संतांना सत्याचे दर्शन होण्याला पुष्कळदा अडचण येते, असे मला वाटते. गुरुजींसारखी अति चांगली माणसे, आपल्या चांगुलपणाच्या पोटी काय असावे आणि काय आहे, यात नेहमी घोटाळा करतात. प्रश्न साने गुरुजींच्या ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकासंबंधी होता. त्या वेळी ते पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. या पुस्तकाविषयी आपले मत यदुनाथांना कसे सांगावे, याविषयी मी मनातल्या मनात पुष्कळच बावरून गेलो होतो. शेवटी एका झटक्यात मी सांगितले, ‘इस्लामी संस्कृतीचे जे स्वरूप साने गुरुजी सांगतात ते इतिहास म्हणून खरे नाही.’ यदुनाथ सौम्यपणे म्हणाले, ‘हे अगदी स्वाभाविक नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणे अगर मांडणे हा गुरुजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे, यापेक्षा गुरुजींना ती कशी जाणवली, याचेच चित्र त्या पुस्तकात पडलेले असणार.’

म्हणजे मी आता साने गुरुजींच्या पुस्तकावर जोरकस वाद करावा लागणार या तयारीत होतो, तो सगळा आवेग अनाठायीच होता. साने गुरुजींविषयी कितीही उत्कट श्रद्धा असली, तरी गुरुजींच्या संतमनाचा भाबडेपणा व त्यामुळे निर्माण झालेली मर्यादा, हे यदुनाथांना पूर्वीच माहिती असावयाचे. आपल्या श्रद्धास्थानांचे सामर्थ्य आणि मर्यादा याचा अतिशय डोळसपणे विचार करणे, हे यदुनाथांच्या स्वभावाचे वैशिष्ट्यच आहे. ते फार तर श्रद्धेयांच्या मर्यादा क्षम्य का ठरतात, याविषयी बोलतील; पण अशा मर्यादा आपल्या श्रद्धास्थानांना नाहीतच, असा त्यांचा दावा नसतो. चिकित्सेचे सर्व दरवाजे मोकळे ठेवणारे अनाग्रही मन आणि विचारपूर्वक स्वीकारलेल्या श्रद्धांना आग्रहाने जीवनात राबवणारे मन या दोन्हींचा समन्वय त्यांच्या ठिकाणी झालेला दिसतो. काही मुद्‌द्यांबाबत त्यांच्या भूमिका आश्यर्चकारक वाटाव्यात इतक्या स्वच्छ व तर्कशुद्ध असतात. याचे कधीकधी मला फार नवल वाटते.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

परवाच आम्ही आनंदवनातून परतत होतो. सहजगत्या चर्चेतून चर्चा निघाली आणि विषय एस.एम. जोशी व जयप्रकाश यांच्याकडे वळला. पुन्हा आम्ही दोघेजण अनपेक्षितपणे श्रद्धास्थानांच्या विषयीच बोलत होतो. सेवादल परिवारात मीही वाढलो आहे, थत्तेही वाढले आहेत, तेव्हा एस.एम.जोशी आणि जयप्रकाश या दोघांहीविषयी आमच्या मनात अतीव श्रद्धा असाव्यात, यात काही नवल नाही. पण भारतीय राजकारणातल्या सर्व पुरोगामी आणि सेक्युलर समाजनेत्यांची एक दुबळी जागा आहे. ही दुबळी जागा म्हणजे मुस्लीम समाज ही होय. मुस्लीम समाजाविषयी बोलण्याची वेळ आली म्हणजे या सर्व पुरोगामी नेत्यांची जीभ अडखळू लागते, चाचरू लागते.

या अडखळण्याची दोन कारणे स्पष्ट आहेत. पहिले कारण व्यावहारिक आहे, राजकीय गरज म्हणून मुस्लीम मतदारांना दुखवण्याची यांची इच्छा नसते. आजतागायत काँग्रेस पक्ष मुस्लीम समाजाची मते मिळतात म्हणून त्यांना दुखवत नसे. आता जनता पक्षाला याच मार्गाने जाण्याची इच्छा होऊ लागलेली आहे. जनता पक्षातील लोकसुद्धा हळूहळू मुस्लीम प्रश्नांवर काँग्रेसच्या भाषेत बोलू लागलेले आहेत.

उरलेली मंडळी सोडा, पण एस.एम. जोशींनी मुस्लीम परंपरावाद्यांच्या सुरात सूर मिसळावा, ही गोष्ट दु:खद आहे. मुस्लीम समाजात हमीद दलवार्इंनी पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू केली, या चळवळीला एस.एम.चा नेहमीच पाठिंबा राहिला. कालपर्यंत एस.एम. जोशी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे चाहते आणि पाठीराखे होते. ‘समान नागरी कायद्या’बद्दल कालपर्यंत त्यांचा आग्रह होता. हमीद दलवाई यांच्या निधनानिमित्त पुण्यात जी शोकसभा झाली, त्यात बोलताना नानासाहेब गोरे यांनी स्पष्टपणे हे सांगितले होते की, सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या काही अडचणी असतात; त्यामुळे कालपर्यंत जी उत्तरे तुम्हांला काँग्रेस पक्षाकडून मिळाली, त्यापेक्षा वेगळी उत्तरे आता जनता पक्षाकडून मिळतील अशी फारशी अपेक्षा करू नये. पण हे सांगतानाच नानासाहेबांनी एक मुद्दा स्पष्ट केला होता की, मुस्लीम समाजातील सुधारणांबाबत जनता पक्षाचे धोरण काहीही असो, व्यक्तिश: मी मात्र तुमच्याबरोबर येईन. एस.एम.जोशी यांच्याकडून अपेक्षा हीच असते, पण एस.एम. जोशी मुस्लिम प्रश्नांबाबत आता सत्ताधारी पक्षाची सोयीस्कर भाषा बोलू लागलेले आहेत. सगळ्याच पुरोगामी राजकीय नेत्यांची ही अडचण आहे की, त्यांना व्यावहारिक राजकारणाचे ताण नजरेआड करता येत नाहीत.

पण या व्यावहारिक अडचणींखेरीज दुसरी एक वैचारिक अडचण आहे. आपण मुस्लीम समाजाबाबत जर काहीही प्रतिकूल बोललो तर आपली गणना हिंदुत्ववाद्यांमध्ये होईल आणि या देशातील हिंदू जातीयवादी मुसलमानांच्या विरुद्ध बोललेल्या कोणत्याही वाक्याचा गैरफायदा घेतील, याची एक विलक्षण धास्ती या पुरोगामी मंडळींना वाटत असते. म्हणून मी यदुनाथांना म्हणालो, ‘‘आपल्याला कुठेतरी एक निश्चित भूमिका घेतली पाहिजे. उद्या अशी वेळ येणार आहे की, परंपरावाद्यांचे संरक्षण करण्यासाठी म्हणून अतीव औदार्याच्या पोटी एस.एम. जोशी व जयप्रकाश त्यांच्या बाजूने उभे राहतील. बोहरा समाजाच्या धर्मगुरूंनी आपल्या अनुयायांच्यावर अनिर्बंध हुकूमशाही गाजवावी आणि त्याची चौकशी करू लागताच बोहरा धर्मगुरूंनी आमच्या धर्मात हस्तक्षेप होतो आहे म्हणून आक्रोश करावा, इथपर्यंत ठीक आहे. पण अशी धार्मिक अन्यायाची चौकशी करू नका, असे जर जयप्रकाश म्हणू लागले; अगर एस.एम. जोशी ‘समान नागरी कायद्या’वर गोडगोड बोलू लागले तर अतिशय स्पष्टपणे आपल्याला त्यांचा निषेधही करावा लागेल. व्यक्तिपूजेच्या आहारी जाऊन विचारांच्या बाबतीत भोंगळपणा करून चालणार नाही. आमचे नेते आदरणीय आहेत, पण हे नेते आदरणीय आहेत याचा अर्थ त्यांच्याकडून आम्ही ध्येयवादाची प्रेरणा घेतो, हा आहे. ध्येयवादावर नेते तडजोड करू लागले तर त्यांचाही निषेध करावा लागेल.’’ यदुनाथ थत्ते मला म्हणाले, ‘‘तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. जर ध्येयवाद की, माणूस अशी निवड करण्याची वेळ आली तर मी अतिशय स्पष्टपणे मोठ्यात मोठ्या नेत्याच्या निषेधाला तयार होईन.’’

अतिशय निर्मळ आणि स्वच्छ अशी वैचारिक भूमिका हे यदुनाथांचे कायमचे वैशिष्ट्य आहे. स्वच्छ वैचारिक भूमिकेमुळे कोणत्याही आंधळ्या व्यक्तिपूजेचे स्तोम त्यांच्याजवळ नाही; पण वैचारिक भूमिका स्पष्ट आहेत. यामुळे व्यक्तींविषयी निष्कारणच अनादर दाखवण्याचीही त्यांची प्रवृत्ती नाही. एखादी व्यक्ती आणि तिचे व्यक्तिमत्त्व यांविषयीचा श्रद्धाभाव आणि आदर वैचारिक दास्य न पत्करता दाखवता येतो. स्थूलमानाने आपली भूमिका ज्यांच्या विरोधी आहे त्यांचेही मान्य असणारे गुण मोकळेपणाने सांगता येतात. स्थूलपणे ज्यांच्या भूमिका आपल्याला मान्य आहेत, त्यांच्याही बाबत जी भूमिका मान्य नाही, तिथे मनमोकळा निषेध नोंदवता येतो. व्यक्तीच्या प्रेमापोटी येणारा आंधळेपणा अगर आकसापोटी येणारा आंधळेपणा हे दोन्ही आंधळेपण टाळून विचारांविषयी स्पष्ट पण व्यक्तींच्या विषयी सुजाण, अशी भूमिका घेता येते. अर्थात, त्यासाठी आपल्या मनात आग्रह आणि अनाग्रह यांचा समतोल असावा लागतो. हा समतोल अतिशय कठीण आहे, पण तो यदुनाथांना साधलेला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अजून एका मुद्याचा मी जाता जाता उल्लेख करू इच्छितो. या मुद्द्याला चारित्र्य असे म्हणतात. चारित्र्याची रेखीव आणि चपखल अशी व्याख्या मला करता येणार नाही. ती मी करतही बसणार नाही; चारित्र्य हा शब्द वापरल्याबरोबर जी परंपरेने चालत आलेली कल्पना असते तीही मला या ठिकाणी अभिप्रेत नाही. ब्रह्मचारी माणूस विवाहितांच्यापेक्षा अधिक चारित्र्यवान मानावा, असे मला मुळीच म्हणायचे नाही. अगदी स्थूलपणे सांगायचे तर माणसाच्या जीवनात सर्वच पातळीवर स्वार्थ आणि कर्तव्य यांचा झगडा चालू असतो. कर्तव्य म्हणून ज्या बाबी आपल्यासमोर असतात, त्या आपल्या स्वार्थाला सोयीस्कर नसतात. हा प्रश्न नुसता शेजारची बाई चोरून पाहण्यापुरता मर्यादित नाही, तो ऑफिसला उशिरा जाण्याचाही आहे, वर्गात न शिकवता बसून राहण्याचाही आहे. अतिशय शांतपणे, जी बाजू सुरक्षित असते ती तत्त्व म्हणून पत्करण्याचाही आहे. दर ठिकाणी प्रश्न, आपणच आपल्या श्रद्धा आणि विचारांना प्रामाणिक असण्याचा असतो. स्वार्थ आणि सोय यांच्या आवाहनापेक्षा ज्यांच्या जीवनात कर्तव्य आणि आपल्या श्रद्धांशी प्रामाणिक राहणे, यांना निर्विवाद जास्त महत्त्व असते, त्यांना चारित्र्यवान माणूस असे मी म्हणतो. खरोखर काही चांगले घडणारे असते, ते चारित्र्यवान माणसांकडून. एक व्रत म्हणून या चारित्र्याची अवधारणा यदुनाथ थत्ते यांनी जन्मभर केली आहे. ही अतिशय कठीण अशी गोष्ट आहे.

‘भगवद्‌गीते’त असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते, तिथून निष्ठांचा उदय होतो. भावना ही परिनिष्ठित बुद्धीवर अवलंबून असते. विचारांच्यावर आधारलेली भावना आपले लोभस सोज्वळ स्वरूप न सोडता डोळस व जागरूक कशी राहते, याचा कुणी अभ्यास करू इच्छित असेल तर त्यांनी यदुनाथांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे असे मला वाटते.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १६ ऑक्टोबर २०२१च्या ‘यदुनाथ थत्ते विशेषांका’तून साभार)

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा