शोध घेतला, की गवसतो गांधी...
पडघम - देशकारण
गणेश मनोहर कुलकर्णी
  • म. गांधी द. आफ्रिकेत असताना...
  • Sat , 02 October 2021
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi

गेली काही वर्षे रेल्वेची नोकरी सांभाळून लिखाणाचा छंद जोपासताना काही विषय खुणावत होते. दरम्यान काहींवर लिहिले गेले, पण ‘गांधी आणि रेल्वे’ अशा काहीतरी विषयावर लिहायचे ठरले, तेव्हा मी उगाचच निवांत होतो, कारण अज्ञानामुळे विषयाचा आवाका लक्षातच आला नव्हता. नंतर जसा जसा मी या विषयाकडे वळायला लागलो, तसातसा पार गुंतत गेलो, गुरफटत गेलो. गेले वर्षभर या संबंधातले वाचन, नोंदी काढणं सुरू होतं आणि अजूनही सुरूच आहे, याची पण गंमतच वाटते. काही काही विषय तुमच्या आयुष्यात येण्यामागे तुमची समज किती वाढली, यावर बरेच काही अवलंबून असते.

साबरमतीचे सान्निध्य

मी साबरमतीला दर चार वर्षांनी रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी जात असतो. हा नेम कैक वर्षे सुरू आहे. पण साबरमतीच्या गांधींच्या आश्रमापर्यंत पोहोचावं असं कधी वाटलं नाही. तसंही माझं प्रशिक्षण केंद्र साबरमती स्टेशनपासून दूर आणि आश्रमापासून तर भलतंच दूर. त्यामुळे इतर बऱ्याच ठिकाणी फिरताना देखील बापूंच्या आश्रमापर्यंत पोहोचण्याचा काही योग येत नव्हता. काही काही योग येत नसतात, ते आपण आणावे लागतात. ज्या नजरेनं सगळेच गांधी वाचतात, तिथपतच मी ही गांधी वाचलेला होता. मग रेल्वेतच गांधींचे फोटो/त्यांच्या नावाने स्वच्छता मोहीम, असं काही काही अनुभवायला मिळत होतं. दरम्यान, सुरेश द्वादशीवारांच्या ‘साधने’तल्या सदराने गांधींकडे बघण्याची एक वेगळी नजर तयार होत गेली. मीही तसा समजूतदार होत गेलो आणि एके वर्षी प्रशिक्षणादरम्यान आमच्या सरांना मी साबरमती आश्रमाला जाण्याचा मार्ग विचारला. ते प्रचंड भारावले, खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘इतक्या वर्षांत मला हा प्रश्न कुठल्याही विद्यार्थ्यांने विचारला नाही. मला तुझा अभिमान वाटतो!’ वर आठवणीने त्यांनी तिथे कार्यरत असलेल्या ‘प्रेमाबेन’चा संदर्भही पुरवला. त्यांना आमचे सर ओळखत होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मग मी बसने साबरमती आश्रमाकडे जायला निघालो. मला आश्रमाचा थांबा काही माहीत नव्हता. इथे तिथे विचारत आश्रमाजवळ पोचलो. बरोबर कुणीही नव्हतं. दुपारची भणभणती वेळ, पण गेटच्या आत शिरल्यावर झाडांच्या सावलीत जीव थोडासा सुखावला. सगळीकडे गर्दीचे जथ्थे फिरत होते. सगळ्या स्तरातले लोक तिथे त्या वेळी दिसत होते. कुठल्या बाजूने फिरायला सुरुवात करावी, याचाही काही अंदाज येत नव्हता. शाळेच्या सहलीच्या बसेसही उभ्या होत्या. त्यामुळे त्यांच्याही गर्दीची भर पडली होती. प्रेमाबेन आश्रमाच्या मुख्य भागात आहेत असेही कळले.

त्याच काळात गांधींबद्दल वाचायला ‘महात्मा’ हे डी. जी. तेंडुलकरांनी लिहिलेले पुस्तक अगदी योग्य आहे, असे मनात येत होते. ते पुस्तक आपल्याला कसे मिळेल या विंवचनेत होतो, कारण रामचंद्र गुहांच्या एका लेखात ते सध्या दुर्मीळ आहे, असा उल्लेख वाचलेला आठवत होता. बापूंचा आश्रम बघण्यापेक्षा तिथल्या गांधींवर उपलब्ध साहित्यावर नजर ठरत नव्हती. अनेक गोष्टी बापूंच्या नावाने विकल्या जात होत्या. प्रतिष्ठानच्या दुकानात खादीचे कपडेही विकायला होते. गांधींवर लिहिलेली अनेक अंगाची पुस्तके होती. त्यांचे ‘मेरी आत्मकथा’, ‘सत्य के प्रयोग’ हे पुस्तक साधारण प्रत्येकानेच वाचलेले असते. त्याचे वेगवेगळ्या भाषेतले अनुवादही तिथे उपलब्ध होते. मी इतक्या गर्दीतही तिथली व्यवस्था नेटकेपणाने सांभाळणाऱ्या एका उंच माणसाला विचारले की, मला डी. जी. तेंडुलकरांचे ‘महात्मा’ हे पुस्तक मिळेल का? त्याने मला पहिल्यांदा नखशिखान्त न्याहाळले, माझा अंदाज घेतला आणि म्हणाला मुश्किल आहे, त्याची प्रत सध्या उपलब्ध नाही. मी थोडासा नाराज झालो, पण चिकाटीने त्याच्याशी बोलत राहिलो. पुन्हा एकदा विनंती केल्याबरोबर तो थोडासा नरमला व म्हणाला, ‘ही गर्दी जाईपर्यंत तुम्ही थांबणार असाल तर मी शोधण्याचा प्रयत्न करतो.’ मी पण खूश झालो. एखादे दुर्मीळ झालेले पुस्तक आपल्या तावडीत येणार, याचा आनंद वेगळाच असतो.

प्रेमाबेनच्या नजरेतले गांधीजी

दरम्यान तो म्हणाला, ‘तुम्ही तोवर आश्रमात फेरफटका मारून या.’ मी मग थोडासा निवांत होऊन एकटाच इकडे तिकडे फिरायला लागलो. प्रेमाबेनचा मागोवा घेताना एके ठिकाणी बापूंच्या मोठ्या घराच्या पडवीत अनेक जण तिथे असलेल्या मोठ्या चरख्यावर झटापट करताना दिसत होते. त्यांना शिकवणाऱ्या प्रेमाबेनच होत्या. गर्दी ओसरल्यावर मी त्यांच्या जवळ गेलो आणि सरांचा संदर्भ दिला. त्यांनीही ओळख दिली आणि छान गप्पा मारायला लागल्या. म्हणाल्या, ‘बापू जेव्हा पहिल्यांदा या आश्रमाच्या जागेवर आले, तेव्हा समोर जेल होते आणि मागच्या बाजूला स्मशान.’ ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले होते म्हणे की, ‘ज्या लढ्यात मी उतरलो आहे त्याचा अंत या दोन टोकांच्या मध्येच आहे. मी जेलमध्ये तरी जाईन किंवा मला मृत्यू तरी येईल!’ आश्रमाची जागा पूर्वीच्या संतमहात्म्यांनी पावन केल्याची भावना त्या वेळी गांधींच्या मनात होती. आश्रमाच्या ठिकाणी दधीची ऋषींची योगशाळा होती, अशी माहिती गांधींना त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली होती. बाजूला साबरमती संथपणे वाहत होती.

आज साबरमतीचे किनारे सुशोभित करण्याचे मोठे काम सुरू आहे. आपले पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असताना, या साबरमती नदीवर १३ पूल बांधण्याची योजना आखत होते. इंग्लंडच्या थेम्स नदीवर ११ पूल आहेत, त्या धर्तीवर १३ ठिकाणी साबरमती ओलांडता यावी, अशी महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी मांडली होती. आंतरराष्ट्रीय स्तराचे नामांकन असलेले रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याचं काम गेली कैक वर्षे साबरमतीत सुरू आहे.

प्रेमाबेन जराशा लोकांच्या गर्दीतून मोकळ्या झाल्यावर मी त्यांच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारायला सुरुवात केली. त्या मोठ्या चरख्यावर अगदी सहजपणे सूत कातत बसल्या होत्या. गांधींनी बराच काळ या आश्रमात घालवला. इथूनच त्यांनी प्रसिद्ध दांडीयात्रेसाठी प्रस्थान ठेवले होते. मग बेनने एक चावी काढून माझ्या हातात दिली म्हणाली, ‘बापूंच्या बैठकीच्या खोलीत आम्ही सगळ्यांना जाऊ देत नाही. तुम्ही इतक्या आस्थेनं आला आहात तर बघून घ्या.’ मी भारावलोच! थरथरत्या हाताने ते जाड कुलुप काढले. आत बापूंची खोली छान स्वच्छपणे रचून ठेवलेली होती. नुकतेच या बैठकीतून कुणीतरी उठले आहे की, काय असे वाटावे, इतपत सगळ्या वस्तू जागच्या जागी, पण कमालीच्या बोलक्या भासत होत्या. गांधींचा चरखा, लिहायचे पेन, दौताची बाटली ते उतरत्या अंगाचे पारंपरिक मेज, त्यावर कागदांची चवड, दुसऱ्या बाजूला बैठकीसाठी गादी मांडलेली.

दुर्गाबाईंचा आठव

इथे, दुर्गाबाई भागवतांची एक हळवी आठवण साबरमती आश्रमाच्या संदर्भातली आठवली. गांधींची हत्या झाल्यानंतर त्या एकदा साबरमतीला आश्रमात गेल्या होत्या. त्या म्हणतात – ‘‘गांधींच्या प्रार्थना स्थळाचे दर्शन घेतले. वाळू मऊ होती, सारे स्वच्छ होते. नदी वाकडी वळणे घेतलेली अशी कोरडी ठणठणीत पडली होती, पण गांधी तिथे नव्हते, म्हणून प्रार्थना नव्हती. पक्षी बोलत होते, पण त्यांचे बोल कोणाला समजत नव्हते.” नुकत्याच मी आत त्यांच्या वस्तू पाहिल्या होत्या. त्यात एक पत्राचा लिफाफा होता. वर लिहिले होते- ‘महात्मा गांधी, भारत देश, जिथे असतील तिथे’ ते वाचले आणि पोटात ढवळले. ‘जहाँ हो वहाँ!’ जिथे असतील तिथे. गांधी कुठे असतील, तिथे जाणारे ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहचले पण आता मात्र गांधी असतील तिथे तर कुणी पोहचू शकणारच नाही. हे आठवून माझ्याही डोळ्यात टचकन पाणी आले.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

बापूंच्या वर्ध्याच्या आश्रमात काम करणारे शांतीकुमार त्यांच्या आठवणीत लिहितात की, महात्मा पेनाने लिहायचे व पेनाची शाई संपली की, माझ्याकडे द्यायचे शाई भरायला, मी ते पेन ठेवून घ्यायचो व नवे पेन त्यांना द्यायचो. मग लोक माझ्याकडून गांधींनी वापरलेले पेन घेऊन जायचे, जपून ठेवण्यासाठी. मीही कुणाकुणाला ते देऊन टाकायचो. गांधींच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी पेनाने लिहिणे बंद केले व बोरूने लिहिणे सुरू केले. गांधी दोन्ही हाताने लिहायचे. उजवा हात थकला की, डाव्या हाताने लिहायला सुरुवात करायचे. त्यांचे डाव्या हाताचे अक्षर अधिक सुंदर होते असे म्हणतात. उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे असं ते मानत. त्यांना स्वत:च्या हस्ताक्षराची लाजही वाटायची. गांधींच्या लिखाणाचे मार्गदर्शक तत्त्व नेहमी सत्य हेच राहिले. त्यांनी कधी काही कल्पित लिहिले नाही आणि सत्याचे दाखले ते पार ‘रामायण’, ‘महाभारतात’ले द्यायचे.

लेखनमग्न गांधी

त्यांची लिहिण्याची उर्मी इतकी असायची की आपल्या रेल्वेगाडीत तसेच हलत्या बोटीतही ते अगदी सहज लिहीत असत. ‘कंस्ट्रक्टिव्ह प्रोग्राम’ नावाची पुस्तिका त्यांनी रेल्वेतच लिहिली. ते सतत पत्र लिहीत असत. कधी कधी दिवसाला ५० पत्रे ते लिहीत. त्यांच्या सुमारे एक लाख पत्रांचा संग्रह त्यांच्या लेखन साधनेचा महत्त्वाचा भाग आहे. चालत्या गाडीत ते बऱ्याचदा लिहीत. ‘हरिजन’चे संपादक असताना काही महत्त्वाचे लेख किंवा संपादकीय रेल्वेगाडीत लिहिलेले असायचे. ते स्वत: हिंदी, उर्दु, गुजराथी आणि इंग्रजीत लेख लिहीत. ते इतरांकडूनही वेळेत कामं करून घ्यायचे. बऱ्याचदा महादेवभाई देसाई रेल्वेच्या प्रवासात गर्दी टाळून प्रसाधनगृहात बसून त्यांचं लेखनाचं काम वेळेत पूर्ण करत. त्या काळातल्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक त्यांच्या मदतनीसांना माहीत असावे लागायचे. एवढेच नव्हे, कुठले टपाल केव्हा निघते, याचंही वेळापत्रक तोंडपाठ असावे लागायचे. कारण प्रकाशनाचा लेखी मजकूर त्यांना वेळेत पोहोचवावा लागे.

एकदा गांधी ज्या रेल्वे गाडीने प्रवास करत होते, तिला उशीर होत होता. बरोबर पाठवायचे लेख होते, पण ते टपालानं पाठवायला वेळ नव्हता, तेव्हा अहमदाबादच्या स्वत:च्या छापखान्यात छापण्याऐवजी त्यांनी ते लेख मुंबईत मदतनीसांकडे पाठवले आणि छापून अंक वेळेत प्रकाशित झाला. इतक्या धावपळीत देखील अंक देखणा / स्वच्छ / मोकळा असावा, असाच त्यांचा कटाक्ष असायचा. वाईट छपाईला गांधीजी हिंसेचं कृत्य मानत.

गोखलेंवरचे एक पुस्तक त्यांच्याकडे गुजराथी भाषेत अनुवादित करण्यासाठी आले, तेव्हा ते भाषांतर चांगले न वाटल्याने त्यांनी ते हस्तलिखित चक्क जाळून नष्ट करायला लावले, रद्दीतही विकू दिले नाही. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. स्वाक्षरी मागायला येणारा ज्या भाषेतला असेल, त्या भाषेत त्याला ते सही करून द्यायचे. अर्थातच ‘हरिजन’ फंडासाठी वर्गणी मिळाल्यावरच!

तर तिथल्या टेबलवर ठेवलेले पेन / बोरू, दौत बघून मी भारावलोच आणि हे सगळं आठवत गेलं. एकदम प्रसन्न वाटत राहिले. अशा वातावरणात आपणही काही तरी लिहायला हवे असेही वाटून गेले. तिथे फिरताना या सगळ्या पवित्र वातावरणाचा तुमच्यावर प्रभाव पडतच असतो. खोलीतला स्वच्छ संध्याकाळचा प्रकाश, खेळती हवा, भरपूर उजेड देणाऱ्या मोठ्या खिडक्या, त्यांचे लाकडी सज्जे / कौलारू घरांचा प्रशस्तपणा मनात भावत राहिला. प्रत्येक वास्तूतून एक सौंदर्यदृष्टी प्रतीत होत होती. भोवतालात झाडांचे पार, त्याच्या सावलीत हिंडणाऱ्या खारुताई, त्यांचा आवाज आसमंताला एक नितळ पवित्रता देत होता. हे सगळं आपल्याही आत झिरपत आपण शांत होत जातोय अशी भावना प्रखर होत गेली.

आठ खंडांतून उलगडणारे गांधी

बेनचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा पुस्तकांच्या दुकानात आलो. तिथल्या त्या उंचशा सद्गृहस्थाला पुन्हा एकदा आठवण करून दिली. त्यानेही अगत्याने माझ्यासाठी पुस्तक शोधायला सुरुवात केली. एव्हाना सहलीची गर्दी ओसरली होती. मग त्यांनी एक-दोन करता करता ‘महात्म्या’चे माझ्यासमोर आठ खंड ठेवले, तेव्हा मी दचकलो, कारण त्याचे आठ खंड असतील याची काहीच कल्पना नव्हती. एकतर दुकान ते गेट फारच मोठा पल्ला होता. ते आठ खंड हातात पकडणं अवघडच होतं. मग त्या गृहस्थाने स्वत:च दोन खोक्यात ते बाड बसवलं आणि वर दोरीही बांधून दिली धरायला व म्हणाला- ‘आमच्याकडची ही शेवटचीच प्रत होती, ती तुम्हाला दिली आहे.’ मी जरासा चमकलोच, पण नंतर लक्षात आले की, या प्रतिष्ठानचा कारभार आजच्या तारखेला इतका अजस्त्र आहे की, याची प्रत ते लवकरच काढतील याबाबत शंका नाही, मग मी ते बाड घेऊन बाहेर आलो. एका रिक्षावाल्याला आमच्या प्रशिक्षण केंद्रापर्यंत सोडायला सांगितले. कारण आश्रमापासून माझे वसतीगृह बरेच दूर होते.

मग दुसऱ्या दिवशी मी राजकोटहून सिकंदराबादला जाणाऱ्या गाडीच्या गार्डकडे ते सगळं बाड पोचवलं व मुलाला कल्याण स्टेशनवर उतरवून घेऊन घरी घेऊन जायला सांगितलं. मला घरी जाण्यासाठी अजून बरेच दिवस होते, कारण माझे प्रशिक्षण संपायला वेळ होता, पण ते आठ खंडी चरित्र माझ्या घरी पोचणं मला खूपच ग्रेट वाटलं होतं. काही काही पुस्तकांची जादूच अशी असते.

डी. जी. तेंडुलकरांचा साधेपणा, भाषेतला रसाळपणा चरित्रात पुरेपूर उतरला आहे. त्यातली इंग्रजी भाषा हे चरित्र वाचताना अंगावर येत नाही. दरम्यान अनेक तऱ्हेने गांधी माझ्याकडे पोचतच होता. वेगवेगळ्या अंगाने गांधी या विषयाचा वेध घ्यावा हीच प्रामाणिक इच्छा होती. गांधी हा विषय आपल्याला वाटतो तितका साधा सोपा नाही, असे हळूहळू लक्षात येऊ लागले. जितकं वाचत जावं तितकं नवं नवं सापडत जायला लागलं.

तर, गेले वर्षभर या विषयाने भारावलेल्या अवस्थेत होतो. नेटवर एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याचा लेख मिळाला. त्यांनी या विषयावर छोटेखानी टिपण लिहिले होते. निरंजन टकले नावाच्या पत्रकाराचा एक लेख मिळाला. त्याने महात्मा ज्या मार्गाने रेल्वेतून हिंडले तो प्रवास पुन्हा त्याच मार्गाने आणि क्रमाने करून पाहिला होता. अर्थातच त्याला एका वृत्तवाहिनीची भरघोस शिष्यवृत्ती मिळाली होती. वर्षभर नोकरीच्या वेळा-अवेळा, घरचे काम सांभाळत लेखाच्या नोंदी काढणं, त्या संदर्भातलं वाचन करणं सुरू होतं. दरम्यान लॉकडाऊन आला आणि इतर सगळे अस्वस्थ होताना मी मात्र निवांत होत गेलो. अचानक मिळालेला वेळ सत्कारणी लावताना गांधींचे अनेक पैलू उलगडत गेले. फार वरवर माहीत असलेले गांधी कॅलिडोस्कोपप्रमाणे भासायला लागे. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं गवसत होतं, पण मी मात्र रेल्वेच्या संदर्भातच गांधींचा विचार करत राहिलो. कुठे तरी वाचलं होतं की, ते फार तंत्र स्नेही नव्हते. म्हणजे आधुनिक सुखसोयींच्या साधनांचा त्यांना कधीच सोस वाटला नाही.

असे म्हणतात की, दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतताना गांधींनी शेवटची रात्र त्यांचे ज्यू मित्र मॉरिस अलेक्झांडर यांच्याकडे काढली. सोबत कस्तुरबा आणि त्यांचे दुसरे एक ज्यू मित्र कालेनबाख पण होते. दहा वर्षात गांधींना सगळा दक्षिण आफ्रिका ओळखत होता. त्यांच्यासाठी प्रत्येकालाच काय करू नि काय नको, असे झाले होते. तर यजमानांनी त्यांना घरातल्या सगळ्या आरामदायी व्यवस्था पुरवल्या, पण गांधींनी जमिनीवर झोपण्याचेच ठरवले. इतका मोठा नेता कसलाही सोस न बाळगता जमिनीवर अगदी निर्मळपणे झोपताना बघून यजमानांची पत्नी रुथ यांना भरून आले. त्यांनी नोंद केली आहे की, आयुष्यातल्या तीन महान आत्म्यांपैकी गांधी एक आहेत, दुसरे त्यांचे वडील आणि तिसऱ्या लेखिका ऑलिव्ह श्रायनर.

गांधी आणि रेल्वे : एक अद्वैत

दक्षिण आफ्रिका सोडताना इंग्लंडला जाणाऱ्या बोटीवर चढताना अनेकांनी अनेक भेटी गांधींना दिल्या. एकाने तर चक्क सोन्याचे घड्याळही दिले, पण गांधींनी विनम्रपणे ते नाकारले म्हणाले, ‘मला याचा काहीच उपयोग नाही.’ याचा लिलाव करून मिळालेले पैसे तिथल्या संघटनेला द्यावेत असेही त्यांनी सुचवले. टॉलस्टॉयच्या प्रभावामुळे त्यांनी आधुनिक जीवनशैलीला भले विरोध केला, असेल पण प्रत्यक्षात रेल्वेसारख्या उपलब्ध प्रवासी साधनेचा मुबलक वापर केला. आपल्याला सगळ्यांना गांधींना रेल्वेतून एकदा ढकलले इतकेच माहीत असते, पण नंतरची १३ वर्षे त्याच रेल्वेचा तिसरा वर्ग आपल्या लढाईचे अस्त्र बनवून गांधी आफ्रिकेतील कठोर प्रशासनाबरोबर अविरत लढत राहिले. त्यांनी रेल्वेने भरपूर प्रवास केला, तो भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत देखील!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपल्याला फक्त त्यांचा भारतातला रेल्वे प्रवास माहीत आहे. पण या वाचनातल्या मांदियाळीमध्ये मला गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या प्रवासाचे अनेक संदर्भ सापडत गेले. गांधींचा दक्षिण आफ्रिकेत रेल्वेच्या कुठल्या दर्जाने प्रवास करायचा या वरून भांडण झाले, त्यांचा अपमान करण्यात आला पण गांधी तिथे तेवढ्यावरच गप्प नाही बसले. त्यांनी प्रशासनाला जाब विचारत या विरुध्द प्रचंड मोठा लढा उभा केला. त्यातूनच त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांचे. गांधींनी त्या सगळ्या कामगारांना एकत्र करून त्यांच्या अस्मितेसाठीचा अभूतपूर्व लढा दक्षिण आफ्रिकेत उभा केला. जात - पात - भाषा  - प्रांत - धर्म यांच्या पलीकडे जाऊन लोकांची अभूतपूर्व एकजूट घडवली. सविनय कायदेभंगाचा पहिला यशस्वी प्रयोग गांधींनी दक्षिण आफ्रिकेतच घडवून आणला.

या लढ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते. गांधींचा अहिंसेचा मार्ग कितपत यशस्वी होतो यावर सगळ्यांनाच संशय होता, म्हणजे भारतात परतण्यापूर्वी अनेक ठिकाणी गांधींना लोकांनी मेजवानीचे आमंत्रण दिले होते. एके ठिकाणी आशियाई संरक्षण अधिकारी प्रमुख चॅम्ने यांच्याबद्दल कौतुकाने बोलताना, गांधी म्हणतात की, ‘चॅम्ने यांच्यावर प्रशासनाचा प्रचंड दबाव असताना देखील ते कधी माझ्याशी आकस ठेवून वागले नाहीत. एवढेच काय जेव्हा मी १००० सत्याग्रहींना घेऊन चालत निघालो, तेव्हा चॅम्ने केवळ त्यांच्या एका सहकाऱ्याबरोबर मला अटक करायला आले होते. त्यांचा माझ्या अंहिसेच्या सत्याग्रहावर एवढा विश्वास होता!’

दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारतातील रेल्वेसुद्धा ब्रिटिशांनीच उभारली. प. नेहरूंनी आपल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात एके ठिकाणी अशी नोंद केली आहे की, भारतात येणारा प्रत्येक परदेशी नागरिक भले तो जर्मन / डच किंवा इतर कुठल्याही देशातला असो, त्याला आपण भारतीय लोकांवर राज्य करायलाच जन्माला आलो आहे, ही भावना दृग्गोच्चर व्हायचं एकमेव कारण म्हणजे, इथल्या रेल्वे डब्यांवर / स्टेशनांवर, तिथल्या बसण्याच्या जागेवर / रेस्टरूमच्या दरवाजांवर ठळकपणे ‘ओनली फॉर युरोपियन’ लिहिलेले असायचे. भारतातसुद्धा अनेक जणांवर गांधींप्रमाणे रेल्वेच्या कुठल्या वर्गात प्रवास करायचा, यावरून अनेकदा संघर्षाचे प्रसंग आले, पण त्यातून एकही गांधी जन्माला नाही आला.

विरोधकांच्या नजरेतले गांधी

आयुष्यभर ज्याने आफ्रिकेत गांधींना सतत धारेवर धरले, त्या जनरल स्मट्सनेदेखील गांधी भारतात परतले, तेव्हा या ‘संत’ माणसाने दक्षिण आफ्रिकेचा किनारा कायमचा सोडला अशी मी आशा करतो, अशी नोंद केली आहे! याच जनरल स्मट्सला चर्चिल म्हणाला होता की, तू या नंग्या फकिराला आफ्रिकेतल्या जेलमध्येच संपवून टाकले असते, तर आपले हिंदुस्थानवरचे साम्राज्य आणखी काही वर्षे टिकले असते. या स्मट्सला आफ्रिकेच्या तुरुंगात असताना गांधींनी स्वत:च्या हातांनी बनवलेल्या चपला भेट दिल्या होत्या. गांधींना सत्तराव्या वर्षी शुभेच्छा देताना जनरल स्मट्स असे म्हणतो की, ‘माझ्या कैदेत असताना गांधींनी दिलेल्या चपला भले मी त्या वेळी वापरल्या असतील, पण आज प्रामाणिकपणे हे कबूल करतो की त्या महात्म्याने बनवलेल्या चपला वापरण्याची माझी खरंच लायकी नव्हती.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दक्षिण आफ्रिकेतल्या रामचंद्र गुहांच्या मित्राने गांधींच्या बाबत लिहिताना असे लिहिले की, ‘तुम्ही आम्हाला एक कायद्याने लढणारा साधा वकील दिला होता आणि आम्ही मात्र तुम्हाला एक महात्मा परत केला!’ आफ्रिकेतल्या असीम सिदात यांच्या संग्रहात गांधीवर जगभरात छापले गेलेल्या प्रत्येक पुस्तक किंवा लेखाची एक तरी प्रत उपलब्ध आहे. ते म्हणतात, ‘आफ्रिकेच्या भूमीत सर्वांत मौल्यवान हिरे सापडतात. पण त्याहीपेक्षा मौल्यवान असा हिरा, महात्मा गांधींच्या रूपाने आम्ही भारताला परत केला.’

आमेन!

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ ऑक्टोबर २०२१च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक गणेश मनोहर कुलकर्णी रेल्वे अभ्यासक आणि कला आस्वादक आहेत.

magna169@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा