भारताने काश्मीरचा ‘फुटीरतावादी’ चेहरा तेवढा पुढे आणला आणि काश्मिरींनी भारताच्या ‘जुलमी चेहऱ्या’चे दर्शन घडवले. पण सत्य कायमच या दोन चित्रांच्या मध्ये कुठे तरी अडकलेले राहिले आहे
पडघम - देशकारण
विवेक कोरडे
  • प्रातिनिधिक चित्रं
  • Fri , 01 October 2021
  • पडघम देशकारण काश्मीर मुस्लीम कलम ३५-अ Article 35A कलम ३७० Article 370 जम्मू-काश्मीर Jammu and Kashmir दहशतवाद Terrorism पाकिस्तान Pakistan

‘वो जो गुलशन को लूटते ही रहे, साहब-ए-लाला ज़ार है अब तो... दिल को अम्न-ओ-अमाँ नसीब नहीं, खुशियाँ सारी फरार हैं अब तो...’

नामी नादरी नावाच्या शायराच्या या ओळी काश्मिरींच्या वर्तमानातल्या भावना पोहोचवण्यास पुरेशा आहेत. आजवर अनेकांनी, अनेक प्रकाराने काश्मीरचे चित्र रंगवले. त्यात उर्वरित भारताने काश्मीरचा फुटीरतावादी चेहरा तेवढा पुढे आणला आणि काश्मिरींनी भारताच्या जुलमी चेहऱ्याचे दर्शन घडवले. पण सत्य कायमच या दोन चित्रांच्या मध्ये कुठे तरी अडकलेले राहिले. त्याचाच काश्मीरच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यानिमित्त काढलेला हा माग...

..................................................................................................................................................................

थोड्याच वेळात आपण श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत आहोत, अशी घोषणा झाली आणि माझ्या मनात सात वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. २०१४मध्ये काश्मीरमध्ये महापूर आलेला होता. सप्टेंबरचा महिना होता. प. बंगालमधून आलेल्या एका वैद्यकीय पथकाबरोबर दोन आठवड्यांसाठी मुंबईतून मी एकटाच इथे आलो होतो. त्यानंतर पुन्हा ‘मुंबई सर्वोदय मंडळा’ने जमा केलेल्या मदत निधीतून खरेदी केलेल्या ब्लँकेट्सचे वितरण करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात तीन दिवसांसाठी आलो होतो.

एखाद्या प्रदेशातील लोकमानस जाणण्यासाठी हा कालावधी पुरेसा नसला तरी काही एक अंदाज आला होता. काश्मीरला महापुरानंतर मदत करायला जाण्यामागची भावना ‘जर आपण काश्मीर भारताचा भाग आहे, म्हणतो तर तिथले लोकही आपले आहेत’ ही होती. आणि काश्मीरची वाताहत झाल्याच्या त्या काळातही काश्मिरींच्या आतिथ्याचा अनुभव आला होता. कॅम्प संपल्यावर आवराआवरीला जो वेळ लागत होता, त्यावेळात आणि चहाच्या वेळात मी अनेकांशी बोलत होतो. दिवसभर बरोबर राहिलो असल्याने कॅम्पच्या आयोजकांशी मनमोकळ्या गप्पा होत होत्या. आम्हाला मदत करणाऱ्या स्थानिकांमधील अब्दुल कय्युम हाशिया, या वृद्धाशी आणि अ‍ॅड. आबिद गिलानी, अ‍ॅड. राफिया आणि सय्यद शामीर या तरुण कार्यकर्त्यांबरोबर चांगलीच मैत्री जमली आणि या साऱ्यांमुळेही अनेकांशी मोकळी चर्चा करता आली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ज्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यात जसे भारताबरोबर राहायची इच्छा असणारे होते, तसेच पाकिस्तानवादीही होते आणि स्वतंत्र काश्मीरसाठी संघर्ष करणारेही होते. ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे’ हे माझे मत मी स्पष्टपणे मांडूनही त्या मंडळींच्या बोलण्यात कोणताही कडवटपणा नव्हता. त्या काळात त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून स्वतंत्र काश्मीरच्या बाजूने सुमारे ७० टक्के लोक असले तरी, भारत की पाकिस्तान?  यावर सार्वमत झाले तर ६० टक्क्यांहून अधिक लोक भारताच्या बाजूने मत देतील, असा माझा अंदाज होता आणि तो अंदाज अगदी पाकिस्तानवाद्यांनाही बोलून दाखवल्यावर त्यांनी तो मान्यही केला होता. महापुराने काश्मीरची प्रचंड हानी झाली होती व केंद्रात नव्याने आलेल्या मोदी सरकारकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, आशा होत्या. अर्थात, अन्य आपत्तीग्रस्तांच्या बाबत होते, त्यापेक्षा फार काही वेगळे झाले नव्हते. अनेक गावांमध्ये आम्ही जाईपर्यंत कोणतीही मदत पोहोचली नव्हती आणि नोव्हेंबर महिन्यातही पुन्हा गेला तेव्हाही परिस्थिती तशीच होती. परंतु या नव्याने परिचित झालेल्या काश्मिरींबरोबर माझा सतत संपर्क होता. ‘युथ एक्सचेंज’सारखे कार्यक्रम राबवायला हवेत, या माझ्या विचारला त्यांचीही मान्यता होती.

म्हणूनच केंद्र सरकारने घटनेचे ३७० कलम रद्द करुन, काश्मीरच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यावर आणि इंटरनेट व मोबाइल नेटवर्क बंद केल्यानंतर जेव्हा तेथील काही मित्रांनी सुरू असलेल्या लँडलाइनवरून माझ्याशी संपर्क केला, तेव्हा मी परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी विमान सेवा सुरू झाल्यावर येतो, असे म्हणालो. पण त्या वेळी सर्वांनी सुरक्षेच्या दृष्टीने मी येऊ नये, असे सांगितले होते. नंतर कोविडच्या महामारीमुळे जाणे शक्य झाले नाही. शेवटी, ३७०0 रद्द झाल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटल्यावर मी आलो होतो. अर्थात, या वेळेच्या येण्यात पर्यटनाचाही उद्देश होता आणि त्यामुळे अनेक क्षेत्रांतील लोकांशी बोलण्याची संधीही मिळणार होती. म्हणूनच एक आठवड्याहून जास्त दिवस राहण्याचे ठरवले होते आणि त्यातील एक दिवस केवळ काश्मीरमधील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चेसाठी ठेवला होता.

काश्मीरचे अस्थिर वर्तमान

४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर इतका काळ मी काश्मीरमध्ये होतो. जाण्याच्या तीन दिवस आधी, अली शा गिलानी या पाकिस्तानवादी काश्मिरी नेत्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. गेली अनेक वर्षे गिलानीला श्रीनगरातील हैदरपुरा भागातील त्याच्याच घरात कैदेत ठेवले होते. त्याच्या मृत्यूनंतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काश्मीरची इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आल्याने निघण्यापूर्वी मित्रांशी संपर्क होत नव्हता. सुदैवाने, विमान दिल्लीत पोहोचले, तेव्हा मोबाइल सेवा सुरू झाल्याचे सांगणारा फोन मित्राने केला. इंटरनेट दोन-तीन दिवसांत सुरू होईल, असेही सांगितले. त्यामुळे श्रीनगरमध्ये घ्यायला येणार्‍या ड्रायव्हरशी संपर्क होऊ शकला आणि त्याला शोधत फिरण्याचा त्रास वाचला. जहांगीर त्याचे नाव. याआधी तो मध्य मुंबईत टूरिस्ट कार चालवत होता. कोविडमुळे मुंबईत धंदा नाही आणि काश्मीरला अचानक पर्यटक वाढल्याने दोन महिन्यांपूर्वी तो येथे आला होता. गाडीत बसल्याबसल्या ‘हमे इंटरनेट, मोबाइल बंद होने की आदत हुई हैं. त्याचे काही वाटत नाही. पण सुरू झाल्याने तुम्हाला शोधून काढायचा त्रास वाचला’ असे तो  म्हणाला. आश्चर्य म्हणजे, गाडीचा नंबर मुंबईचा होता आणि ती कार वापरल्याबद्दल त्याने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसाला ‘दक्षिणा’ दिल्याचे मी पाहिले. काश्मिरी पोलीस व मुंबई पोलीस यांच्यातील समान दुवा लक्षात आला. पुढे हा प्रकार अनेकदा होत राहिला.

मध्येच कधीतरी त्याने मला काश्मीरमध्ये जो काही विकास झाला, तो काँग्रेसच्या राजवटीत विशेषतः गुलाम नबी आजाद मुख्यमंत्री असताना झाल्याचे सांगितले. मी हळूच फारूख व ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्याबद्दल विचारले. त्यावर ते सारे चोर आहेत आणि ‘आज जो हुआ उसके जिम्मेदार वही हैं’ असे तो म्हणाला. ३७० रद्द करून काश्मीरशी भारताने ‘दगाबाजी’ केली असे त्याने म्हटले. मग लोक का शांत आहेत, हे विचारल्यावर त्याने ‘आधी ३७० रद्द केल्यावर लावलेल्या संचारबंदीमुळे व नंतर कोविडमुळे लोक थकलेले आहेत. पण लवकरच तुम्हाला काही वेगळे ऐकायला मिळेल’ असे  सांगितले. त्यादिवशी मुघल गार्डन बघितल्यावर ‘शिकारा राइड’साठी दाल लेकवर आलो. अर्थात राइड आमच्या पॅकेजमध्ये असल्यामुळे शिकारा शोधावा लागला नाही. गुलाम भट नावाचा एक वृद्ध शिकारा चालवत होता. गृहस्थ खूपच बोलका होता. धंदा कसा चाललाय विचारल्यावर सध्या उत्तम असल्याचे म्हणाला. राइड चांगला दीड तासांचा असल्याने मीदेखील एकदम विषयाला हात घालण्याची घाई केली नाही. कोणीच मास्क कसा वापरत नाही, विचारल्यावर ‘यहाँ कोविड नहीं हैं’ असे पुढे अनेकांकडून आलेले उत्तर त्याने दिले.

मनातली ठसठस ओठांवर

दाल सरोवराच्या कडेने अनेक दुकाने आणि छोटी छोटी उपहारगृहे आहेत. एका ठिकाणी बोट दाखवत इथे कांदा-भजी खूप चांगली मिळते, आपण खाणार का? असे त्याने विचारल्यावर आम्ही ‘हो’ म्हणालो. तिथे त्याच्यासाठीही मागवल्यावर तो अधिकच खुलून बोलू लागला. ३७० रद्द केल्याने काय फरक पडला? असे विचारल्यावर, ‘आमच्यासारख्यांसाठी कसला बदल होणार?’ असा उलट प्रश्न करून त्याला काहीच फरक न पडल्याचे त्याने सांगून टाकले. पण त्याचबरोबर ‘साब, आप देखेंगे ३७० वापस बहाल होगा’ असेही तो म्हणाला. कारण विचारल्यावर ‘सच हमेशा उपर आता हैं’ हे त्याचे म्हणणे होते. त्याच्या आत्मविश्वासाने मी थक्क झालो.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

युनुस नावाचा एक तरुण आपल्या भावाच्या मदतीने ते छोटे उपहारगृह चालवत होता. ‘आप यह कभी से चलाते हो?’ असे विचारल्यावर त्याने चार महिन्यांपूर्वी गोव्याहून गावी परत आल्याचे सांगितले. तोपर्यंत त्यानेही चर्चेत भाग घ्यायला सुरुवात केली होती. तो म्हणाला की, आमच्याकडे जमीन नाही. त्यामुळे विकण्याचा आणि कोणी घेण्याचा प्रश्नच नाही. पण हे सर्व राजकारण आहे. म्हणून हा विषय तापवत ठेवला जाईल, असे त्याचे म्हणणे होते.

दाल सरोवरासमोरच २०१४ मध्ये परिचय झालेली आणि नेहमी संपर्कात असलेली राफिया राहते. ती आम्हाला चहासाठी घरी घेऊन जायला आली होती. ती स्वतंत्र काश्मीरवादी. ‘इंडिया को जो करना हैं करने दो. आज नहीं तो कल हम आजाद होंगे,’ असे ती तेव्हाही म्हणाली होती आणि आताही तिचे तेच मत होते. उलट मधल्या काळात आजाद काश्मीरची ओढ अधिकच वाढल्याचे तिच्या बोलण्यात जाणवत होते. मोदींच्या ३७० रद्द करण्याच्या कृतीने भारतात आनंद झालाय, हे आम्ही समजू शकतो. पण त्याने काश्मीर भारतापासून अजून दूर गेला आहे, असे तिचे मत होते.

अशा प्रकारे काश्मीरमधला पहिला दिवस संपला. आम्ही हॉटेलवर परतलो. रस्त्यात जागोजागी लष्कराचे जवान हातात बंदुका घेऊन उभे होते. लोकांनाही त्याची आता त्यांची सवय झाली असावी. कारण त्यांच्याकडे लोक लक्ष न देता, आपले व्यवहार पार पाडत होते.

काश्मिरींची अंतस्थ भावना

दुसऱ्या सकाळी नेहमीप्रमाणे लवकर जाग आली. हॉटेलबाहेर पार्किंगमध्ये एक तरुण ट्रॅव्हलर व्हॅन पुसत होता. संभाषण सुरू करायचे म्हणून ‘इतक्या लवकर कुठे निघालास?’ असे विचारले. ‘नाही, निघायला वेळ आहे. पण आपण तयारीत असलेलं बरं. माझ्यामुळे वेळ झाला असं व्हायला नको,’ असं त्याचं उत्तर. ‘कुठे राहतो?’, या प्रश्नाला ‘गद्रबल जिल्हा, पण आम्ही मूळचे आफगाणिस्तानचे. माझं नाव मुस्ताक पठाण. ‘मै पठाण हूं’ ’ असं तो मोठ्या अभिमानानं म्हणाला. त्याचे आजोबा काश्मीरला आले आणि स्थायिक झाले. त्याला ड्रायव्हर म्हणून पाच हजार रुपये पगार मिळतो. घरची थोडी शेती आहे म्हणून भागतं कसंतरी, त्याने अधिक माहिती दिली. बाहेरून आलाय म्हटल्यावर स्थानिक काश्मिरी काही त्रास देत नाहीत, का, या प्रश्नाला ‘नाही, हम एक मजहब के’ हे उत्तर.

बऱ्याच काश्मिरींचा ओढा पाकिस्तानकडे का, याचं उत्तर आपोआपच मिळालं. मग त्याला ‘आप के गांव मे पंडित लोग कितने हैं?’ असं विचारलं तेव्हा, ‘आता ते नाहीत. सारे आपली प्रॉपर्टी विकून गेल्याचं’ तो म्हणाला. त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले असंही त्यानं सांगितलं. तेवढ्यात त्याला, सोनमर्ग पर्यटनासाठी त्या दिवशी बंद असल्याचा फोन आला. ती माहिती त्याने मला दिली. आम्हालाही त्या दिवशी सोनमर्गलाच जायचं होतं. परतताना एका मित्राकडे रात्री जेवण घेऊन यायचं ठरलं होतं. तो अली शाह गिलानीच्या मृत्यूचा चौथा दिवस होता. ‘मातम’ म्हणजे दुःख प्रदर्शित करण्याचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. सोनमर्ग भागात गिलानीचे प्राबल्य होते. म्हणून पर्यटकांना या भागात जायला बंदी घालून विशेष काळजी घेतली जात होती.

शांततेला दर्प दहशतीचा

ठरल्या वेळी आमचा ड्रायव्हर आला. त्याने सोनमर्गबाबत आपण चान्स घेऊन बघू असे म्हटले. अर्थातच सोनमर्गला जाणाऱ्या रस्त्याची सैन्याने नाकेबंदी केली होती. अडथळे उभारले होते. मग आम्ही दूधपत्री नदी पाहायला जाण्याचा निर्णय घेतला. जाताना मी सांगितल्याप्रमाणे त्याने वाकडी वाट करून गाडी हैदरपुरा भागातील गिलानीच्या घरासमोरच्या रस्त्यावरून घेतली. जवळजवळ अर्धा किलोमीटर रस्ता सैन्याच्या जवानांनी व्यापला होता. इतके बंदुकधारी सैनिक एकाच वेळी मी प्रथमच पाहिले. एका ठिकाणी गाडी अडवून कोण, कुठे चालले याची विचारणाही झाली. काश्मीरची शांतता भंग पाऊ न देण्याच्या केंद्रीय आदेशाचा अमल केला जात होता. पण त्या शांतीला असलेल्या दहशतीचा दर्प मला या ठिकाणी जाणवला. ‘दूधपत्री’ हे अत्यंत रमणीय स्थान आहे. अर्थात ती स्थळे पाहण्यासाठी घोड्यावरून जावे लागते. गाडी आल्याबरोबर उतरण्याआधीच घोडेवाल्यांचा गराडा पडतो. (तो अनुभव नंतर कधी) दोन तासांच्या रपेटी बरोबर घोडेवाल्यांचे जास्त टीप मिळावी म्हणून चाललेले रडगाणे ऐकत राहावे लागल्याने फार बोलणे झाले नाही. पण ३७० रद्द झाल्याने त्यांच्यावर काही परिणाम झाला नव्हता. पण ‘जो किया वो गलत किया’ असं त्यांचं मत होतं.

तेथून दुपारी चार वाजताच श्रीनगरला परत आलो. त्यामुळे कुठेही बाहेर गेलो की होतो, तसा शॉपिंगचा कार्यक्रम ठरला. दुकानाचा मालक एक सुशिक्षित तरुण होता. पसंती आणि ट्रायल या दीर्घ कालखंडात त्याला बोलकं करायला वेळ लागला नाही. पंडितांबाबत जे झाले ते एकदम चूक होते, असे तो म्हणाला. आजही ते परत आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल असे त्याने सांगितले. त्याचे बोलणे प्रामाणिकपणाचे वाटत होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मग मी त्याला ‘तुम्हाला भारतापासून वेगळं का व्हायचं आहे?’ हा थेट प्रश्न विचारला. त्यावर त्याने या प्रश्नाचं उत्तर माझे वडील देतील, असं म्हणून मला जवळच असलेल्या दुसऱ्या दुकानात एका कर्मचाऱ्याबरोबर पाठवले. त्याच्या वडिलांनी आधी ‘मी व्यापारी माणूस आहे. मला राजकारणात रस नाही. आपल्यासारख्या अनोळखी माणसाबरोबर बोलायला भय वाटते,’ असे म्हटले. पण त्यांनी मला त्यांच्या फेसबुकवरचा एक व्हिडिओ दाखवला. एक तरुण मुलगी रडत होती. एक वृद्ध मुस्लीम मनुष्य तिला जवळ घेऊन तिचे सांत्वन करत होता. भोवताली जमलेले लोक गंभीरपणे हे सारे पाहत होते. व्हिडिओची भाषा काश्मिरी  होती. पण हृदयाला भिडणारी होती. त्यातील संभाषण त्यांनी मला सांगितले. ती मुलगी लहान असताना १९९०मध्ये आपल्या पालकांबरोबर गाव सोडून गेली होती आणि जवळजवळ ३० वर्षांनी पुन्हा गाव पहायला आली होती. त्या वेळी तिच्या शेजारी राहणारा तिचा मुस्लीम चाचा तिला जवळ घेऊन रडत रडत ‘आता तू परत जाऊ नको. माझी अर्धी जमीन मी तुझ्या नावावर करतो’ असे पुन्हा पुन्हा सांगत होता.

सांप्रदायिक राजकारणावर मात करायची असेल तर प्रेम आणि विश्वास या भावनांनीच करता येईल याचा प्रत्यय तो व्हिडिओ देत होता. आम्हा दोघांचेही डोळे पाणवले होते. तशातच आपल्याला भारतापासून वेगळे का व्हायचं आहे, हा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यांनी अत्यंत शांतपणाने दिलेल्या उत्तराचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. ते म्हणाले, “व्यवसायाच्या निमित्तानं मला अनेकदा दिल्ली, लुधियाना इत्यादी ठिकाणी जावं लागतं. तिथे हॉटेलात जागा मिळवण्यासाठी केवळ ओळखपत्र देऊन भागत नाही. आम्ही कोणत्या कामासाठी आलोय हे सांगावं लागतं. मग संबंधित व्यक्तीकडे तो खरंच त्याच्यासाठी आलाय का, याची चौकशी होते आणि मगच हॉटेलात जागा मिळते. जर आम्ही भारतीय आहोत, मग आमच्यावर हा अविश्वास का? सारे काश्मिरी दहशतवादी आहेत का? तुम्हाला अशी वागणूक मिळाली तर तुम्ही काय कराल?” हे त्यांचे प्रश्न, मी निरुत्तर.

स्थानिक दहशतीचे दुपेडी कथन

श्रीनगरहून पहलगाम जाताना सॅफ्रन व्हॅलीत (केशराचे खोरे) एका दुकानातून ड्रायफ्रूट आणि सॅफ्रन घेण्यासाठी थांबलो. दुकानाचा मालक ३० वर्षांचा तरुण होता. उमेर भट नाव. स्वतंत्र काश्मीर आंदोलनातील तो सक्रिय कार्यकर्ता होता. आमची संस्कृती वेगळी आहे. आम्हाला बळाने भारत फार काळ दडपू शकणार नाही. आम्ही आमच्या देशात आमच्या घरात राहतो आणि सैन्याचे जवान आमच्या घरी येऊन आमचे ओळखपत्र मागतात. हे आम्ही सहन करणार नाही. ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर शांत कसा राहिला? असे विचारल्यावर. तुम्ही ज्या पहलगामला जाताय त्या ८० हजार वस्तीच्या पहलगाममध्ये दोन हजार बंदुकधारी जवान तैनात केले होते. संचारबंदी लादली होती. म्हणून काश्मीर शांत दिसत होते. पण ही शांती फार काळ टिकणार नाही. आम्ही स्वतंत्र होणारच, असे तो वारंवार म्हणत होता. काश्मीरचे लोक आनंदी आहेत, असं केंद्र सरकार म्हणतं, असं म्हटल्यावर त्याने ‘मग ही लष्करी राजवट येथे कशाला?’ असा त्याचा प्रश्न होता. आमच्या भागात कोणीच मतदानाला जात नाही आणि कधी जाणारही नाहीत. तुमची लोकशाही तुम्हाला लखलाभ असो. मी ज्या ७०-८० लोकांशी बोललो, त्यातील कोणीही मतदान करत नव्हते.

पहलगामहून अमरनाथ यात्रा सुरू होते. माझ्या हॉटेलजवळ मला दोन-तीन ढाबे असे दिसले की, त्यांच्या पाटीवर शंकराचे चित्र होते. तोपर्यंत मला कुणाही हिंदू माणसाशी बोलण्याची संधी मिळाली नव्हती. म्हणून अगदी सकाळी मी चहा पिण्याच्या निमित्ताने तेथे गेलो. उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा घनश्याम गुप्ता नावाचा मनुष्य, तो धाबा चालवत होता. ‘कैसा चल रहा हैं’ विचारल्यावर, दोन वर्षे धंदा नाही. आधी गडबडीमुळे आणि नंतर कोविडमुळे गेली अडीच वर्षे कठीण गेल्याचे म्हणाला. इथले स्थानिक त्रास देतात का, असे विचारल्यावर त्याने, मी येथे गेली १२ वर्षे राहतो. बायका-मुलांसह राहतो. मला मुले तीन. त्यातील दोन मुलांचा जन्म इथलाच. जर त्रास असता तर मी इथे कसा राहिलो असतो? असा प्रश्न त्यानेच मला विचारला.

तेवढ्यात तिथे अन्य दोन माणसे आली. आमचे संभाषण ऐकून त्यातील एका व्यक्तीने स्वतःची ओळख महाराज कृष्णन अशी करुन दिली आणि मला आपण हे सर्व का विचारत आहात, असे विचारले. मी कारण सांगताच त्याने बोलायला सुरुवात केली. म्हणाला, ‘काश्मिरी मुस्लीम तुम्हाला काश्मिरी पंडितांच्या निघून जाण्याचे कारण राजकारण हे आहे, असे सांगतील. सारा दोष भाजप आणि जगमोहन यांना देतील. पण तुम्ही त्यांना पंडितांना मारणारे, त्यांची हत्या करणारे लोक त्यांचे शेजारी राहणारे होते की बाहेरून आले होते? हा प्रश्न विचारा. या पहलगाममध्ये पंडितांची मोठी वस्ती होती. येथून खाली एका गावात शीख समाजही होता. चाळीस शिखांना घराबाहेर काढून गोळ्या घातल्या, त्या गोळ्या घालणारे त्याच गावचे होते. पंडितांना पाकिस्तानी अतिरेक्यांनी नाही, गावातल्याच बंदुकधारी अतिरेक्यांनी मारले. मशिदी-मशिदीतून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आजाद काश्मीर’च्या घोषणा दिल्या जात होत्या. एका रात्रीत लोकांच्या हातात बंदुका आल्या. याचा फायदा राजकारण्यांनी घेतला ही गोष्ट खरी. पण केवळ त्यामुळे पंडित लोक निघून गेले नाहीत. मीदेखील पहलगामचा रहिवासी होतो. मलाही जावे लागले. आता येथे माझे काही राहिलेले नाही. केवळ व्यवसायानिमित्ताने येतो. त्रास झाला, जीवनात असुरक्षितता वाटू लागली, भीती घातली गेली, जाणं भाग पाडलं म्हणून पंडित गेले. केवळ राजकारणामुळे आणि बाहेर सवलती मिळतील म्हणून कुणी आपली मातृभूमी सोडत नाही. त्यांना विचारा काश्मीरमधील दारूची दुकाने आणि चित्रपटगृहे कोणी बंद केली? त्यांना इथे इस्लामचे राज्य आणायचे आहे.’ मग मी, पंडितांनी आपल्या जमिनी करोडोंच्या भावाने विकल्या हे खरे का? असं विचारलं या प्रश्नाला त्याने शहरांतून बरा भाव मिळाला, पण खेड्यापाड्यातल्या जमिनी कवडीमोल भावाने विकाव्या लागल्याचे उत्तर दिले.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

हाच धागा पकडून मी माझ्या मित्राला याबाबत विचारले. त्याने काश्मीर विधानसभेत सरकारने २०१०मध्ये दिलेल्या आकडेवारी नुसार २१९ काश्मिरी पंडित ठार झाल्याचे सांगितले. तसेच २०१७मध्ये सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे एकूण ४१ हजार लोक लष्कर वा अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडल्याची माहिती त्याने दिली. या ४१ हजार लोकांमध्ये पंडितांची संख्या नगण्य आहे. पंडित पळून जाऊ शकले. त्यांना आश्रयही मिळाला. सवलती मिळाल्या. आम्ही कुठे पळायचे? त्याने विचारले.

काश्मीरमधली मंदिरे आणि अन्य धर्मीय पुजारी

काश्मीरमधली काही मंदिरे फार प्राचीन आहेत. पहलगामचं मामलेश्वर मंदिर मुद्दाम पाहिले. तेथे फक्त पर्यटक जात असावेत. काही सुकलेली फुले पिंडीवर पहायला मिळाली. मटन (मार्तंडचा अपभ्रंश असावा) या गावात सूर्य मंदिर आहे. श्रीनगरमध्ये शंकराचार्यांचे देऊळ आहे. त्या ठिकाणी शंकराचार्य येऊन गेल्याचा इतिहास आहे. खीर भवानी मंदिरही प्रसिद्ध आहे. गद्रबल जिल्ह्यात नारानाग येथील पुरातन शंकर मंदिर १३०० वर्ष जुने आहे. सध्या ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे.

गुलमर्गमधील एका छोट्या टेकडीवर शंकराचे मंदिर असून भारतीय सैन्याने त्याचा जीर्णोद्धार केल्याचा फलक मंदिरावर लावला आहे. पिंडीवर ताजी पानेफुले वाहिलेली. तेथे एक तरुण पुजारी म्हणून बसला होता. अगदी आधुनिक वेशात. दाढी उत्तमरीत्या राखलेली. त्याला नाव विचारले, समीर भट, त्याने सांगितले. जास्त चौकशी करायला लागल्यावर काहीतरी बोलून जवळच्या छोट्या खोलीत जाऊन बसला. देवळात तीन-चार फूट उंचीची, दीड फूट लांबी-रुंदीची काचेची चौकोनी पेटी, एक फुटाहून जास्त शंभर, दोनशे, पाचशे अशा नोटांनी भरली होती. आम्ही तेथून निघालो. जेव्हा अन्य पर्यटक आले, तेव्हा तोच तरुण पुन्हा धावत देवळात आला. आमच्या ड्रायव्हरला विचारल्यावर त्याने तो मुसलमान असल्याचे बोलले जाते, असे सांगितले. निदान काश्मीरमध्ये तरी कुणी अन्य धर्मीय पुजारी आहे.

काश्मिरींना संशय कॉर्पोरेट कंपन्यांचा

शेवटचे दोन दिवस मुक्काम पुन्हा श्रीनगरमध्ये होता. त्यातील एक दिवस मी मला पूर्ण मोकळे ठेवले होते. माझ्या विनंतीने जम्मू-काश्मीर आरटीआय (JKRTI)) या संघटनेने काही प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग माझ्याशी बोलण्यासाठी आयोजित केली होती. काश्मीरच्या विविध भागांतून १५-१६ कार्यकर्ते आले होते. या संघटनेतील बहुतेक जण स्वतंत्र काश्मीरवादी आहेत. संघटनेचे प्रमुख डॉ. शेख गुलाम रसूल. त्यांना सात वर्षांपूर्वी भेटलो होतो. मुंबई आणि श्रीनगर यांच्यात ‘युथ एक्सचेंज’सारख्या उपक्रमांची सुरुवात व्हावी, असे मत मी तेव्हा मांडले होते. त्यांनीही त्याला होकार दिला होता. काही कारणांमुळे, मुख्यतः आर्थिक कारणामुळे तो उपक्रम होऊ शकला नाही. या वेळीही त्यांनी तसे व्हायला हवे, हे सुरुवातीसच सांगितले. माझ्या या भेटीचा उद्देश त्यांना माहीत असल्याने असेल पण बोलण्याची सारी सूत्रे त्यांनी स्वतःकडेच ठेवली होती. अलीकडे अशा बैठका होत नाहीत. कारण यातून काही साधेल यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना त्यात ‘दिलचस्पी’ नाही. सर्वत्र भयाचे वातावरण आहे हे त्यांनी सांगितले. या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सुमारे अडीच वर्षांनी भेटतोय, असेही ते म्हणाले.

काश्मीर आणि भारतातील सिव्हिल सोसायटी हा घटक संपूर्णपणे अपयशी झाला आहे, असे म्हणून पारंपारिक ‘मोमबत्ती संप्रदाय’ म्हणजे केवळ रिच्युअल आहे, असे ते म्हणाले. जिथे दाद मागता येईल, अशा न्यायालयांपासून निवडणूक आयोगापर्यंतच्या सार्‍या संस्था आपला विश्वास गमावून बसल्या आहेत, दाद मागायची कशी? एक एन. ए. पी. एम. सोडल्यास कुणीच काश्मीरींना त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पाठिंबा दिला नसल्याचे त्यांनी म्हटल्यावर मी मुंबई सर्वोदय मंडळाच्या पुढाकाराने, डाव्या पक्षांना एकत्र करुन मुंबईत १० डिसेंबर २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनी ‘काश्मिरी जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा बहाल करा’ म्हणून निदर्शने केल्याचे स्पष्ट केले. त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी, लोकांकडून घेतल्या जाणाऱ्या करांचा गैरवापर, काश्मिरात होत असलेला कार्पोरेट्चा शिरकाव याबाबतीत त्यांनी मते मांडली. ३७० रद्द करण्यामागचे हिंदुत्ववादी राजकारण हा एक भाग आहे. पण दुसरा समोर न आणलेला भाग कार्पोरेट्सना येथे प्रवेश देऊन काश्मीरची नैसर्गिक साधन संपत्ती कार्पोरेट्सना लुटण्यास देण्याचा आहे, ही गोष्ट त्यांनी ३७० रद्द केल्यापासून, अनेक वर्ष मान्यता न मिळवू शकलेल्या, ३०० प्रकल्पांना ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ या काळात मंजुरी दिल्याची माहिती देवून स्पष्ट केली.

इथल्या निवडणुकीत जेमतेम १२ टक्के लोक मतदान करतात. बाकी मतदान निवडणूक आयोग करतो, असे ते म्हणाले. काश्मीरला भेट देणाऱ्या ‘पीस ग्रुप’वर त्यांचा राग होता. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. पी. शहांच्या शिष्टमंडळाला त्यांनी ‘हम कैसे रहे ये आप हमे मत बताओ. आप मिलिटरी कब वापस लेंगे ये कहो’ असे त्यांनी सुनावले होते.

विश्वासघाताची भावना

नावीद दफ्तियार, एक तरुण वकील. उरी या बॉर्डरवरील छोट्या शहरातून बैठकीस आला होता. जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर स्टूडंट्स युनियनचा माजी अध्यक्ष. दिल्लीत इंटर्नशीप मिळाली, पण राहायला भाड्याने जागा मिळेना. दोघा-तिघांनी तर त्याला जमा मशिदीत प्रयत्न कर म्हणून सांगितले होते. आम्ही भारतीय आहोत, असे म्हणता, मग आम्हाला असे का वागवले जाते हा त्याचा प्रश्न होता. त्यावर काय बोलणार? तरीही त्याला ‘धर्माच्या आधारावर राष्ट्र उभारता येते का आणि उभारल्यास ते टिकते का?’ हा प्रश्न विचारला. पण त्याचे उत्तर त्याला देऊ न देता डॉ. शेख यांनी काश्मीरचा इतिहास सांगायला सुरुवात केली. आम्हाला स्वयंनिर्णयाचा अधिकार हवा. आम्ही त्यापेक्षा वेगळे काहीच मागत नाही. कारण इतिहासात काश्मीर नेहमीच एक स्वतंत्र राज्य होते.

जहीद परवाज सुमारे चाळीशीचे. काश्मीरमधील बकरवाल आणि गुजर समाजाचे संघटन त्यांनी केले आहे. त्या समाजाला राजकीय आरक्षण मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचं म्हणणं आमचा समाज स्वयंनियंत्रित आहे. त्यांचे स्वतःचे नियम कायदे आहेत. त्यांच्यात ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ आहे. ३७० आणि ३५-ए हे त्यांच्या हक्काच्या झालेल्या जमिनींसाठी महत्त्वाचे होते. आम्ही ‘डिग्निटी’ने राहू इच्छितो. आमची डिग्निटी आणि वैशिष्ट्ये जपण्यासाठी ३७० होतं. ते काढून घ्यायचं होतं तर दिलं कशाला? आणि ते काढताना जे काही केलं तो विश्वासघात होता. आम्हाला आता स्वातंत्र्य हवे आहे. स्वयंनिर्णयाचा अधिकार हवा आहे असं ते म्हणाले.

बद्रुदुजाँ, हे आणखी एक कार्यकर्ते, लैंगिक छळ आणि जंगल हक्क यासंदर्भात त्यांचं मोठं काम आहे. त्यांचं म्हणणं असं की, ३७० रद्द केल्यानं जे काही थोडेफार काश्मिरी भारताबरोबर राहू इच्छित होते, त्यांचेही मन बदलले आहे. त्यावर मी अब्दुल्ला कुटुंब व मेहबुबा मुफ्ती यांच्या मागेही मोठं जनसमर्थन आहे, असं म्हणालो. त्यावर त्यांनी ‘होय आहे ना, पण त्यांनाच तुरुंगात टाकून भारत सरकारनं त्यांना लोकांना तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता ते भारताचं समर्थन कसं करणार?’

माझ्या समर्थनाच्या मुद्द्यावर डॉ. शेख पुन्हा बोलते झाले. नुकतेच मृत्यू पावलेले अली शा गिलानी विधानसभेवर सहा वेळा निवडून आल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीय सैनिकांनी अतिरेकी म्हणून ठार केलेल्या तरुणांची प्रेते पूर्वी नातेवाइकांच्या ताब्यात देत असत. त्यांच्या प्रेतयात्रांना हजारो लोक जमायचे. ते त्यांना पाठिंबा नव्हता म्हणून जमायचे का? लोक जमू नयेत म्हणून आता त्यांची प्रेते सैन्यांचे जवान कुठे अज्ञात ठिकाणी पुरतात, असं त्यांनी म्हटलं. गिलानीच्या मृत्यूनंतर सरकारला इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा आणि त्याचं प्राबल्य असलेला भाग बंद करावा लागला, हे ‘सेपरेटिस्ट मूव्हमेंटला’ पाठिंबा नाही म्हणून का? आणि जर लोकांचा पाठिंबा आहे असं सरकार म्हणतंय तर मग रस्त्यांवर लष्कर का उभं करून ठेवलंय? येऊ द्या ना लोकांना रस्त्यावर. करू द्या ना त्यांना सरकारचे समर्थन?

बराच वेळ बैठक चालली. पण त्यांना जे बोलायचे होते ते बोलून झाले होते. शेवटी त्यांनी ‘युथ एक्स्चेंज’चा कार्यक्रम करायला हरकत नाही. आमचे सहकार्य असेल. निदान एकमेकांशी संवाद होईल. समजून घेता येईल असे म्हटले. हाच धागा पकडत माझा मित्र अ‍ॅड. आबीद म्हणाला की, तो अशाच एका कार्यक्रमांतर्गत गुजरातला गेला होता. तेथे जाण्याआधी सारे गुजराती मोदींच्या विचाराचे असणार असा त्याचा समज होता. पण तेथेही मोदींना विरोध करणारे लोक आहेत, ही गोष्ट त्याला गुजरातमध्ये राहिल्याने समजली. ‘युथ एक्सचेंज’चा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवून बैठक संपली. लेखात आपली नावे कोट केली तर चालेल का? असे विचारल्यावर काहीच हरकत नसल्याचे ते म्हणाले.

स्वतंत्र राहण्याची तीव्र भावना

पुढचा दिवस आमचा काश्मीरमधील शेवटचा दिवस होता. या दिवशी सकाळी सोनमर्गला जाऊन परतताना आबीदच्या घरी रात्रीचे जेवण करण्याचे ठरले होते. तसेच तेथून आठ-दहा कि.मी. अंतरावरचे नारानागचे पुरातन शंकर मंदिरही तो दाखवणार होता. याच आबीदने मला २०१४मध्ये खीर भवानी मंदिरात नेले होते. त्याचे आजोबा शेख अब्दुलांचे निकटचे सहकारी. फारूख अब्दुल्लांनी काँग्रेसशी केलेली युती मान्य नसल्याने त्यांनी पक्ष आणि राजकारण दोन्ही सोडल्याचे आबीदने सांगितले होते. स्वतः आबीद आणि त्याचे वडीलही स्वतंत्र काश्मीरचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांनी पुन्हा सारा इतिहास सांगितला. ‘आमचा एक भाग चीनने बळकावला, दुसरा पाकिस्तानने आणि तिसरा भारताने. आमचे तीन तुकडे करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आमचा एक स्वतंत्र, सुंदर देश होता. तो आम्ही परत मिळवणार आहोत. ब्रिटिशांनी बंदुकीच्या आधारे भारताला १५० वर्षे गुलाम ठेवले. आम्हाला भारताने गेली ७५ वर्षे बंदुकीने आम्हाला गुलाम ठेवले आहे. ठीक आहे. आणखी ७५ वर्षे ठेवतील. पण आम्ही स्वतंत्र होणारच. त्यांचे हे बोलणे ऐकून मी, या साऱ्याचा अर्थ मुस्लीम बहुसंख्य असलेले प्रदेश भारतात राहू शकत नाहीत, असा लावला जाईल. त्याचा दोष मुस्लीम धर्माला दिला जाईल आणि याचा भारतीय मुस्लिमांवर वाईट परिणाम होईल, याचा विचार आपण का करत नाही असे विचारले. त्यावर ‘वो अलग, उनका मुल्क अलग’ आम्ही तो विचार का करायचा? हा त्यांचा प्रश्न.

तेवढ्यात नमाजची वेळ झाली आणि सारेच घरात निघून गेले. नमाज आटोपल्यावर त्यांनी आता चर्चा पुरे. आपण सर्व येथे आलात, त्याचा खूप आनंद आहे. आता सर्वजण एकत्रपणे जेऊ या. मनसोक्त गप्पा मारत जेवणे संपले. रात्रीचे नऊ वाजले होते. श्रीनगरला परतण्यासाठी आम्ही त्यांचा निरोप घेतला. सारे घर त्यांच्या तीन वर्षांच्या नातीसह आम्हाला निरोप द्यायला बाहेर आले. पुन्हा या, असे पुन्हा पुन्हा म्हणत होते. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईस परतणार होतो.

श्रीनगरला परतीच्या वाटेवर रात्रीच्या अंधारात मेंढ्यांचे अनेक कळप हिवाळा जवळ आला म्हणून परतीच्या प्रवासाला निघालेले दिसले. रस्ता सोडून कुंपणांतून शेतात घुसणाऱ्या चुकार मेंढरांना मेंढपाळ चुचकारून, ओरडून, तर कधी हाताने ओढत  मुख्य रस्त्यावर आणत होता. मेंढ्याही मुकाट्याने रस्त्यावर येऊन कळपाला मिळत होत्या. जेव्हा कुणावर काही लादायचे नसते, तेव्हा समजवण्यास प्रेम पुरेसे असते. बळाचा वापर काही तरी लादण्यासाठी केला जातो. काश्मीरला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी बळाची नव्हे प्रेमाची गरज आहे, हे त्या दृश्यातून पुन्हःपुन्हा उमगत राहिले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दुसऱ्या दिवशी मुंबईस परतायचे होते. सकाळी आठ वाजता विमानतळावर जाण्यासाठी निघालो. तो रविवारचा दिवस होता. रस्त्यावर तुरळक माणसे होती. लष्कराचे जवान मात्र बंदुका घेऊन ठरल्या जागी तैनात होते. त्यांना पाहून देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानात बरीच वर्षे तुरुंगवास भोगून सुटका झाल्यावर भारताच्या भेटीवर आलेल्या एका पाकिस्तानी शायराचा शेर मला आठवला.

कहते हैं वतन से नही मोहब्बत मुझे

सिखा रहे हैं मोहब्बत मशिनगन से मुझे

विमानतळ रस्त्यावर टिकिटे पाहूनच पुढे जाऊ दिले जाते. तिकिटे तपासली. पहिली तपासणी विमानळापासून दोन फर्लांग अंतरावर आहे. ड्रायव्हरने तपासणीसाठी गाडीतील सारे सामान उतरविले. आम्हालाही उतरावे लागले. गाडी, सामान आणि माणसे अशी कडक तपासणी चालली होती. माझ्या मुलीने माझे लक्ष तेथे लावलेल्या एका फलकाकडे वेधले. त्यावर लिहिले होते-‘Trespasser will be shot’.

(या लेखात आलेली सर्व नावे बदलली आहेत.)

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ ऑक्टोबर २०२१च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक विवेक कोरडे समाजअभ्यासक, शिक्षण व्यापारीकरण विरोधी चळवळीचे कार्यकर्ते आहेत.   

drvivekkorde@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा