जागतिकीकरणाने गावांचा ‘विकृत विकास’ केला आहे. फक्त मूठभर संपन्न वर्ग तयार झालाय, बाकी गाव बरबाद झाला आहे
पडघम - राज्यकारण
कुंडलिक विमल वाघंबर
  • समदर्गा गावाची दोन छायाचित्रं
  • Tue , 03 August 2021
  • पडघम राज्यकारण जागतिकीकरण खाजगीकरण आर्थिक उदारीकरण समदर्गा शेती

जागतिकीकरण लागू होऊन ३० वर्षे झाल्यानंतर देशात किती मोठे बदल झाले आहेत, १९९० नंतरच्या पिढीला त्यापूर्वीचा काळ कसा होता, याची कल्पनाही करता येणार नाही… भारत कुठल्या कुठे पोहचला आहे, याच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झाल्या आहेत.

या चर्चेचा केंद्रबिंदू शहरी भागातील उद्योजक, मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय होता. या चर्चेत ग्रामीण भाग दिसलाच नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेत शहराचा वाटा जास्त असला तरी अजूनही भारताचा चेहरा ग्रामीणच आहे. या मोठ्या भागाला या चर्चेतून अदृश्य करण्यात आले आहे.

जागतिकीकरणाचे ग्रामीण भागावर कोणते परिणाम झाले आहेत, याबद्दलचे कोणतेही संशोधन, अभ्यास, अहवाल प्रस्तुत लेखकाला पाहायला मिळालेला नाही. ‘बारोमास’, ‘विहीर’ यांसारख्या काही कादंबऱ्यांमध्ये याचे वर्णन आहे, पण ते खूप मर्यादित आहे. ‘वळू’, ‘फॅन्ड्री’, ‘देऊळ’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सैराट’ यांसारख्या चित्रपटांतही ग्रामीण भागाचे केलेले चित्रणही अत्यल्प आहे. जागतिकीकरणाचे ग्रामीण भागावर कोणते परिणाम झाले आहेत? गावे कशी बदलली? गावातील नातेसंबंध, वर्गसंबंध, जाती-जातीतील संबंध कसे बदललेले आहेत? यावर सखोल अभ्यास होण्याची\करण्याची गरज आहे. जागतिकीकरणाचे विश्लेषण करायचे असेल, त्याचे यश-अपयश ठरवायचे असेल, तर सर्वांत तळाशी असलेल्या ग्रामीण भागाचा विचार करावा लागेल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आज मी तुम्हाला अशाच एका, म्हणजे माझ्या गावाबद्दल सांगणार आहे. ही फक्त एका गावाची गोष्ट नाहीये, तर शहराजवळची गावे सोडली तर सर्वच गावांची ही कथा आहे. मागासलेल्या मराठवाड्यातील मागासलेल्या समदर्गा गावाची ही कथा आहे. हे गाव लातूर जिल्ह्यात व औसा तालुक्यात येते. माझा जन्म जागतिकीकरणाच्या एक वर्षानंतरचा, तर किल्लारी भूकंपाच्या एक वर्ष आधीचा. जागतिकीकरणानंतर माझे गाव कसे बदलले याची सत्यकथा पाहुया.

या माझ्या गावाची लोकसंख्या १५००च्या आसपास आहे. मी लहान असताना चौथीपर्यंतची शाळा व येणारी एसटी सोडली, तर गावात काहीही आधुनिक नव्हते. अक्षरशः मध्ययुगीन काळात शोभावे असे आमचे गाव होते. बलुतेदारी व्यवस्था व जमीनदारी होती. एकच सरपंच अनेक वर्षे होता. शेती हाच व्यवसाय व शेतमजुरी हेच काम असायचे. आम्ही गावातल्या शाळेत असताना रविवारी न्हाव्याच्या घरासमोर केस कापण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. हे मी तालुक्याच्या शाळेत जाईपर्यंत म्हणजे २००५-०६पर्यंत चालले.

२००० सालानंतर गावात हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली. त्यात मोठा फरक पडला, तो म्हणजे सोयाबीन पीक शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केल्यानंतर. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, तूर, उडीद, मूग, बाजरी असे पिके घ्यायचे. सोयाबीन हे कमी पाण्यात व कमी वेळेत येणारे नगदी पीक आहे. उसाला पाणीही जास्त लागते आणि वेळही जास्त लागतो. आमच्या कोरडवाहू भागात पाणी नसल्याने उसापेक्षा सोयाबीन घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. तीन-चार वर्षांतच ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनखाली आले.

याच काळात राज्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनकडे वळलेले दिसतात. याचा पहिला मोठा परिणाम बलुतेदारी व्यवस्थेवर झाला. कारण शेतकरी बलुतेदारांना ज्वारी, बाजरी, तूर, मूग असे धान्य द्यायचे. ते गावातल्या गावात प्रक्रिया करून वापरता यायचे. उदा. ज्वारी, बाजरी दळून आणल्यानंतर भाकरी करता यायच्या, डाळी घरच्या घरी प्रक्रिया करून वापरता यायच्या. तसे सोयाबीनचे नव्हते. गावात प्रक्रिया करून त्यामधून तेल काढता येणे शक्यच नव्हते. त्यामुळे जवळपास सर्व सोयाबीन बाजारात विकले जाऊ लागले. परिणामी सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी इत्यादी बलुतेदारांना धान्य देणे बंद होऊ लागले. त्याबदल्यात त्यांना पैसे देण्यास सुरुवात झाली आणि बलुतेदारी पद्धतीचा ऱ्हास सुरू झाला.

कोरडवाहू शेतकरी सोयाबीनकडे वळण्याचे मुख्य कारण कमी पाण्यात व कमी वेळेत नगदी पीक हे आहेच. पण त्यासोबतच समाजात होणारे बदल हीसुद्धा कारणे त्यामागे आहेत. एका बाजूला खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादींमुळे शेतीचा खर्च वाढत चालला होता, ती बाजारावर अवलंबून होत चालली होती; तर दुसऱ्या बाजूला शिक्षण, आरोग्य व इतर खर्चही वाढत होता. त्यासाठी लागणारा पैसा सोयाबीनसारख्या नगदी पिकांतून येण्याची शक्यता होती. त्यामुळे सोयाबीन घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले.

गावातील लोकांचे मुला-मुलींना शिकवण्याचे प्रमाण वाढले. माझ्या वर्गात ६० विद्यार्थी होते. त्याआधी २०-२५ मुलांच्या पुढे संख्या कधीच गेली नव्हती. गावात सातवीपर्यंत शाळा झाली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागायचे. मुले-मुली तालुक्याला शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले. पूर्वी सकाळी एक बस यायची, त्यात आता दोन येऊ लागल्या अन् तरी एवढी संख्या होती की, बसच्या टपावर बसून मुले तालुक्याला जाऊ लागली.

त्यातील बरीच मुले-मुली पहिल्यांदाच तालुका-शहर जवळून पाहू लागली. पूर्वी खूप आजारी पडलो तरच तालुक्याला जाणे व्हायचे, त्याशिवाय नाही. आता दररोज शहराचे दर्शन व्हायला लागले. तो तालुका असला तरी शहराची सर्व वैशिष्ट्ये त्यात होती. एवढे जवळून शहर पाहणे, वेगवेगळ्या प्रकारची दुकाने, हॉटेल, वस्तू, झगमगाट या सर्वांचा गावातल्या मुला-मुलींवर प्रभाव पडणे स्वाभाविक होते. ते हवेसे वाटणे साहजिक होते. आता गावात न्हाव्यासमोर रांगा लावून केस कापायला लाज वाटायला लागली. तालुक्याला सलूनच्या दुकानात कटिंग करावी वाटायला लागली, पण पैसे नसल्याने ते शक्य नव्हते. तेच हॉटेलमध्ये जेवणाच्या बाबतीत होते. वर्गामध्ये फक्त गावातील मुले नव्हती, तालुक्यातील मध्यमवर्गीय मुले-मुलीही होती. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुला-मुलींच्या जीवनशैलीचा हेवा वाटणे साहजिक होते. मी तालुक्याला शाळेत असताना कधीच भाकरी घेऊन गेलो नाही, चपाती घेऊन जायचो, त्यासाठी घरी भांडायचो. कारण भाकरी घेऊन जायची लाज वाटायची.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आधुनिक तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार होण्याचा हाच काळ आहे. गेल्या २०-२५ वर्षांत गावाचा प्रवास रेडिओपासून ओटीटीपर्यंत झाला आहे. गावात एक काळ असा होता की, एक स्क्रीन लावून पूर्ण गाव एकच चित्रपट पहायचे. आता एकाच कुटुंबात वेगवेगळ्या मोबाईलवर चित्रपट पाहिले जातात. हा फक्त गेल्या २० वर्षांत झालेला बदल आहे. गावात ज्या वेळी टीव्ही, सीडी-डीव्हीडी प्रकार आला, त्या वेळी वेगळ्या प्रकारचे गट-तट पडण्यास सुरुवात झाली. ज्यांच्याकडे टीव्ही, सीडी-डीव्हीडी आहे, ते फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना घेऊन पाहू लागले. ही ग्रामीण संस्कृती नव्हती. तंत्रज्ञानामुळे ‘ज्यांच्याकडे आहे’ आणि ‘ज्यांच्याकडे नाही’, अशा दोघांमध्ये एक भिंत उभी राहिली. हाच नवनवीन मोबाईल येण्याचाही काळ होता. या आधुनिक वस्तू आपल्याकडे असाव्यात, अशी लोकांमध्ये इच्छा निर्माण झाली. या अशा कारणांमुळे पैसाचे महत्त्व अधिक वाढत गेले.

गावातील खेळामध्ये झालेल्या बदलातही याचे प्रतिबिंब दिसते. आमच्या लहानपणी विटीदांडू, सूर- पारंब्या, कोया, लंगडी, गोट्या इत्यादी खेळ असायचे. हे खेळ खेळण्यासाठी काही साधने लागायची नाहीत की, त्यासाठी बाजारात जावे लागायचे नाही. झाडाच्या फांदीपासून विटी-दांडू व्हायचा, सूर- पारंब्या तर झाडावरच खेळायचो, आंब्यांपासून कोया मिळायच्या. सर्व काही निसर्गातच असायचे. आमच्या लहानपणीच्या साध्या-साध्या, निसर्गाशी जोडलेल्या, सांघिक असणाऱ्या, पैशाचे महत्त्व नसणाऱ्या खेळाचा हा प्रवास लवकरच स्पर्धेच्या व पैशाचे महत्त्व असणाऱ्या खेळाकडे झाला.

नंतर आम्ही क्रिकेट खेळू लागलो. त्यात पैसा व स्पर्धा दोन्ही होते अन् प्रसिद्धीही. बॅट-बॉल घेण्यासाठी पैसा लागायचा, मॅच खेळण्यासाठी पैसा लागायचा. नंतर तर आम्ही कोया व गोट्या यांऐवजी पैसेच डावात मांडून खेळू लागलो व पैसेच जिंकू व हरू लागलो. या कारणांमुळे ज्यांच्याकडे पैसा तो खेळाचा राजा होणे साहजिक होते.

तालुक्याची हवा, येऊ पाहणारे नवनवे तंत्रज्ञान, शेतीत वाढलेला खर्च इत्यादींमुळे पैशाचे महत्त्व वाढत गेले. लवकरात लवकर पैसा आला पाहिजे, ही मानसिकता बनत गेली. या कारणांमुळे व घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातल्या मुलांनी शाळा सोडून तालुक्यातल्या दुकानांत कामे करायला सुरुवात केली. तीन-चार वर्षांतच पोरांचे दुकानात कामे करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले.

या सर्वांचा परिणाम राजकारणावर झाला. पूर्वी गावात कित्येक वर्षे एकच सरपंच होता. वंशपरंपरेने जसे राजघराणे चालत असते, तसे या सरपंचपदाचे होते. आता राजकारणातही स्पर्धा निर्माण झाली. गावात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर माळी, धनगर आणि दलित समाज. आतापर्यंत मराठा समाजाचे वर्चस्व होते. त्याला आव्हान दिले ते माळी व धनगर समाजाने. देशाच्या राजकारणात जी अवस्था १९९०च्या दशकात होती, ती गावात २०१२ नंतर निर्माण झाली. माळी व धनगर समाज आर्थिकदृष्ट्या थोडासा संपन्न झाला, तो व्यवसाय व तालुक्यातील कामांच्या माध्यमातून. त्या तुलनेने मराठा समाज शेतीतच राहिल्याने थोडासा मागे राहिला.

माळी व धनगर समाजातील नवीन पिढीने ग्रूप स्थापन केला, मग मराठा समाजानेही. गावात चढाओढीने महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जाऊ लागल्या. शिवाजीमहाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे इत्यादी जयंत्या पहिल्यांदा साजऱ्या होऊ लागल्या. शाळेत असताना यातील अर्ध्या महापुरुषांची नावेही माहीत नव्हती. प्रत्येक जातीने आपला नेता निवडून त्याची जयंती साजरी करायला सुरुवात केली. गावातील दत्तमंदिराचा मोठा सप्ताह साजरा करण्यात येऊ लागला. पूर्वी गावात एक गणपती बसायचा, आता चार गणपती बसायला लागले. फ्लेक्सबाजीला सुरुवात झाली. या सर्व कारणांमुळे गावातील राजकारण स्पर्धा व पैशाने भरून गेले. आता गावात पाच वर्षांत तीन-चार सरपंच होऊ लागले.

गावातील काही लोकांनी आपल्या पोरांना लहानपणापासून इंग्रजी शाळेत घालायला सुरुवात केली. मराठी शाळा व इंग्रजी शाळा असे दोन वर्ग तयार झाले. गावात असे अनेक गट- तट निर्माण झाले आहेत. टीव्ही, चांगले घर, महागडा मोबाईल, गाडी, इंग्रजी शाळा हे असणारा मूठभरांचा एक वर्ग गावात तयार झाला आहे अन् दुसऱ्या बाजूला काही नसणारा दुसरा मोठा वर्ग आहे. या दोन वर्गातील दरी वाढतच चालली आहे. यामुळे या दोन वर्गाच्या संस्कृतीही वेगवेगळ्या होत आहेत. आता ग्रामीण भागाची एक अशी संस्कृती नाहीये. संपन्न होत जाणाऱ्या वर्गाने शहरी व चंगळवादी संस्कृती स्वीकारलेली आहे. या वर्गातील महिला आता शेतीत कामाला जात नाहीत.

दुसऱ्या बाजूला अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर यांचा वर्ग आहे. त्यांची अवस्था अजून वाईट झालेली आहे. शेती हा तोट्याचा धंदा झाला आहे. डोक्यावर कर्ज होऊ लागलेय. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. गावातील दुकानात बिसलेरी आहे, कोका कोला आहे, पण अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात गाड्या आहेत, पण चांगला रस्ता नाही. टीव्ही, मोबाईल आहे, पण चांगली शाळा व साधा दवाखानाही नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

या सर्वांचा परिणाम गरीब वर्गावर होतो आहे. गावातला मूठभर संपन्न वर्ग आपली गाडी घेऊन कुठेही फिरतो आहे, पोरांना इंग्रजी शाळेत घालतो आहे, नवीन साधनांचा लाभ घेतो आहे, पण आता गावात एसटी बंद झाल्याने गरिबांसमोर अडचण आहे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खराब केल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांचे भविष्य अंधारात ढकलले जाते आहे. अजूनही बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. कमी- अधिक प्रमाणात सर्वच गावांची अशीच अवस्था आहे.

जागतिकीकरणाने गावांचा ‘विकृत विकास’ केला आहे. फक्त मूठभर संपन्न वर्ग तयार झालाय, बाकी गाव बरबाद झाला आहे.

या बदललेल्या गावांचा अजून खोलवर अनेक अंगाने संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. तरच आपल्याला गावांना चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि या गावांचा ‘सर्वसमावेशक शाश्वत विकास’ करता येईल.

..................................................................................................................................................................

लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.

kundalik.dhok@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा