महासाथ चालू झाली की रोग, रोगाचा उगम याबद्दलच्या चित्रविचित्र उपपत्त्यांना जोर आणि पूर्वग्रह, जुनी वैरं, द्वेष, अंधश्रद्धा यांना मोठा ऊत येतो!
पडघम - विज्ञाननामा
मोहन द्रविड
  • वूहान येथील प्रयोगशाळेचे एक छायाचित्र
  • Thu , 15 July 2021
  • पडघम विज्ञाननामा कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus चीन China अमेरिका America वूहान Wuhan

ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये, असं म्हणतात. रोगांच्या बाबतीत तीच परिस्थिती असते. त्यामुळे एखादा महासाथीचा रोग आला, तर तो कुठून आला, याचं राजकारण न करता सर्वांनी कंबर कसून त्याचा नायनाट करावा यात शहाणपण असतं. १९१८मध्ये आलेल्या फ्लूच्या साथीत पाच कोटींपेक्षा जास्त माणसं मेली. त्या महासाथीचा उगम अमेरिकेत झाला होता, हे अनेक वर्षांनी कळलं. आणि त्यानंतरसुद्धा अमेरिकेकडे कुणी सूडबुद्धीनं पाहिलं नाही.

त्यानंतर हाँगकाँग फ्लू, बर्ड फ्लूसारखे मातब्बर फ्लू येऊन गेले. ऐंशीच्या दशकात प्रतिकारशक्तीला निकामी करणारा एचआयव्ही-एड्स आला. अगदी अलीकडे म्हणजे २००३-०४मध्ये इबोला येऊन गेला. यांचा उगम कुठे झाला, याची गहन चर्चा कुठे झाली नाही. इबोलावरती भरपूर संशोधन झालं, पण आज १८ वर्षांनंतरसुद्धा त्याचा उगम नक्की कसा झाला, हे अजून जगाला कळलेलं नाही. असं संशोधन कठीण असतं, हा एक भाग झाला. या रोगात प्रामुख्यानं आफ्रिकन, आशियन लोक मेले; प्रगत गोऱ्या देशातले लोक बऱ्यापैकी बचावले, हेही त्यामागचं एक कारण असू शकेल. इबोला हा रोग, रोग म्हणूनच राहिला, त्याचं राजकारण झालं नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अमेरिकी कावा

अँथ्रॅक्स हा गाईगुरांना आणि माणसांना जीवाणूंमुळे होणारा प्राणघातक रोग वेगळ्या रीतीनं राजकारणात आला. (हा रोग वैद्यकीय इतिहासात प्रसिद्ध असण्याचं कारण लुई पाश्चरने १८८०मध्ये या रोगाविरुद्ध काढलेली लस ही जीवाणूंवरची पहिली लस आणि एकूण दुसरी.) न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर २००१मध्ये घातपातानं नाहीसं झाल्यानंतर आठ दिवसांतच कुणी तरी अमेरिकेतील अनेक नेत्यांकडे पोस्टानं पाकिटातून अँथ्रॅक्स पाठवलं. सर्वत्र हाहा:कार माजला. जरी एकूण फक्त पाच जणांनीच प्राण गमावले असले तरी संसदेच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि इतर सरकारी इमारती बंद करून महिनाभर लॉकडाऊन लागू केलं गेलं. सुरुवातीला आरोपाचं बोट रशियाच्या दिशेनं होतं (अजून चीन दुश्मन व्हायचा होता), ते दक्षिणेकडे सरकत सरकत इराककडे वळलं आणि तिथं स्थिर झालं. अँथ्रॅक्स इराकनंच पाठवलं याचे हळूहळू शंभर पुरावे गोळा झाले. या सगळ्याचा कळस म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोलन पावल यांनी यूनोमध्ये हातात साबणाची पावडर भरलेली कुपी धरून केलेलं कुप्रसिद्ध भाषण. इथून पुढे ‘आक्रमण ss’ असा उद्घोष करत युद्ध सुरू झालं!

पोस्टानं पाठवलेलं अँथ्रॅक्स नैसर्गिक नव्हतं, तर प्रक्रिया केलेलं जबरी जालिम विष होतं. आणि तसं सरकारनं जाहीर केलं होतं. तेव्हा ते हातात घेऊन इकडेतिकडे फिरणं अतिशय धोक्याचं होतं. म्हणजे ती कुपीतली पूड इराकनं बनवलेलं अँथ्रॅक्स होतं, याच्यावर लहान मुलाचाही विश्वास बसला नसता; पण अमेरिकन लोकांचा विश्वास बसला, संसदेच्या सभासदांचा विश्वास बसला. त्यांनी डोळे मिटून देशभक्त कायद्यावर (Patriot  Act) सही केली. या कायद्यान्वये युद्ध पुकारायचे आणि चालू ठेवण्याचे संसदेचे अधिकार राष्ट्राध्यक्षाने स्वत:कडे घेतले. तसेच लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. या घटनेला आता २० वर्षं झाली, पण इराकमधलं युद्ध अजूनही वेगळ्या मार्गानं सुरू आहे आणि तो कायदाही अजून अस्तित्वात आहे.

काही वर्षं गेली. इराकमध्ये अँथ्रॅक्सच काय पण कोणतंही महासंहारक अस्त्र (Weapon of Mass Destruction-WMD) सापडलं नाही. तरीही अध्यक्ष सद्दामला फासावर लटकावण्यात आलं. त्याच सुमारास एफबीआयच्या लक्षात आलं की, अँथ्रॅक्स बाहेरगावचं नाही. त्याच्यावरचा शिक्का अमेरिकेचाच दिसतोय. अमेरिकेत संसर्गजन्य रोगांवर संशोधन करणारी फोर्ट डेट्रिक नावाची एक संस्था मेरिलँड राज्यातील फ्रेडरिक या गावात आहे. एफबीआयचा रोख देशांतर्गत फितुरांकडे वळला. प्रथम एका चुकीच्याच शास्त्रज्ञाच्या मागे लागले. त्याचं नाव चोरून ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका वार्ताहराला कळवलं. वार्ताहरानं आरडाओरडा चालू केला. शास्त्रज्ञाने भडकून सरकारवर आणि वार्ताहरावर खटले भरले आणि अब्रूनुकसानीपोटी ६० लाख डॉलर्स वसूल केले! काही वर्षांनी एफबीआयची मेहेरनजर दुसऱ्या एका शास्त्रज्ञाकडे वळली. त्याच्याकडे अँथ्रॅक्स अधिक प्रभावी करायचं काम होतं. त्याने संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केली. इराकी अँथ्रॅक्सच्या जन्माचं गूढ त्याच्याबरोबरच थडग्यात गाडलं गेलं.

खऱ्या-खोट्या सिद्धान्तांची महासाथ

महासाथ चालू झाली की रोग, रोगाचा उगम याबद्दलच्या चित्रविचित्र उपपत्त्यांना जोर येतो. त्याला कधी कधी शास्त्रज्ञ किंवा संशोधकही जबाबदार असतात. २००९मध्ये आलेल्या H1-N1 फ्लूच्या साथीच्या वेळी एका ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने H1-N1ची महासाथ लसीची एक शिशी फुटल्यामुळे पसरली, असा सिद्धान्त मांडला. (आपली औषधं अधिक खपावी म्हणून औषध कंपनीनं ती मुद्दाम फोडली, असाही त्याला एक फाटा फुटला!) त्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाचा फ्लूच्या संशोधनाशी काही संबंध नसला (त्याचा अभ्यास बटाट्यावरच्या रोगाचा होता) तरी त्याचा सिद्धान्त वणव्यासारखा पसरला. त्यामुळे फ्लूच्या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी त्या ऑस्ट्रेलियन सिद्धान्ताची चिरफाड केल्यानंतरसुद्धा पुढील दहा वर्षं तो सिद्धान्त चांगला तग धरून होता.

दुसरं म्हणजे महासाथ चालू झाली की, पूर्वग्रह, जुनी वैरं, द्वेष, अंधश्रद्धा यांना मोठा ऊत येतो. याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. युरोपमध्ये चौदाव्या शतकात आलेल्या प्लेगची जबाबदारी ज्यूंवर शेकवण्यात आली आणि त्यांच्यापैकी हजारोंना हकनाक बळी जावं लागलं. इबोलावर उपचार करायला आलेल्या डॉक्टरांनाच ‘इबोला आणतात’ या नावाखाली काँगो या देशात बडवून काढलं. या सर्वांतला समान धागा म्हणजे, आपल्या गलथानपणामुळे झालेल्या फळाला बाकीचे जबाबदार असतात, आपण नाही, हा दृष्टिकोन.

करोनासोबत फुशारला श्रेष्ठत्वाचा गंड

हल्ली बातम्यात असलेल्या नूतन करोना व्हायरस उर्फ कोविड-१९ या रोगानं जेवढा वितंडवाद माजवलेला आहे, त्याच्या शतांशानेही आतापर्यंतच्या एकूण महासाथींनी माजवला नाही. याचं कारण कोविडकडे एक रोग असं न बघता एका तत्त्वप्रणालीच्या भिंगातून बघितलं गेलं. आपला देश श्रेष्ठ, आपला वंश श्रेष्ठ, आपली अर्थव्यवस्था श्रेष्ठ, आपली राज्यव्यवस्था श्रेष्ठ हे ते भिंग. सुरुवातीस या रोगानं जेव्हा चीनमध्ये थैमान घातलं, तेव्हा या भिंगातून बघितलेलं दृश्य बरं वाटलं. अस्वच्छ आणि रोगट लोक, वाटेल ते खातात. मग रोग होतील नाही तर काय? सार्वजनिक आरोग्यव्यवस्था नावालासुद्धा नाही. मग रोगराई वाढेल नाही तर काय? शिवाय शास्त्रीयदृष्ट्या मागासलेले. रोगावर ताबा कसा ठेवणार? आणि वर हुकूमशाही. लोकांना विश्वासात घ्यायचं नाही, पारदर्शकता नाही.

चीन नावाचा नवा शत्रू

कोविड-१९चे पहिले रोगी सापडले वूहान या शहरात. पहिली साथ पसरली, ती तिथेच. वूहानमध्ये जीवशास्त्रावर संशोधन करण्यासाठी मोठी जगप्रसिद्ध प्रयोगशाळा आहे. (तिथं अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांवर ताबा आणि प्रतिबंध करणाऱ्या Center for Disease Control and Prevention-CDC या संस्थेचीसुद्धा गुंतवणूक आहे.) जवळपास असलेल्या गुहांत राहणाऱ्या वटवाघळांवर तिथं संशोधन होतं. वटवाघळांच्या अनेक जगावेगळ्या गुणधर्मांमुळे त्यांच्या पोटांत असंख्य प्रकारचे विषाणू (व्हायरस) आसरा घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे करोना व्हायरस त्यांपैकीच. तेव्हा वूहानची प्रयोगशाळा आणि कोविडची साथ यांचा परस्परसंबंध लावणं फार कठीण गोष्ट नव्हती, आणि तसा तो अमेरिकेतील चीनद्वेष्ट्या लोकांनी लावला. सुरुवातीला तो फक्त करमणुकीपुरता होता. पण हळूहळू चित्र बदलायला सुरुवात झाली.

चीन सावरला, इतर सैरभैरले

चीनमध्ये काहीतरी जादू झाली आणि रोग्यांची संख्या आणि बळींची संख्या दिवसेंदिवस उतरायला लागली आणि एक दिवस संपलीच! त्याच वेळी अमेरिका आणि भारत या देशांतील रोग्यांची लागण वाढत चालली. चीनचं नेतृत्व खंबीर हातांत होतं, कृती करणाऱ्यांच्या हातांत होतं. याउलट अमेरिका आणि भारत यांचं नेतृत्व होतं- वाचाळ विदूषकांकडे. एकाचा लोकांना सल्ला होता की, मास्क काढून टाका, चाचणी करू नका आणि जंतूनाशक द्रव्य प्या. दुसऱ्याचा बहुदा मनोबल उंचावण्यासाठी त्याच्या लोकांना सल्ला होता- थाळ्या वाजवा, रोग आवाजानेच पळून जाईल. ते नाही तर रात्री नऊ वाजता एकाच वेळी सर्वांनी दिवे मालवा की, अंधाराच्या भीतीनं रोग पळून जाईल. अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या देशबंधूंची थोडी पंचाईत झाली. कुणाचं ऐकायचं? शेवटी देशप्रेम वरचढ ठरलं. रात्री दिवे मालवले, पण अमेरिकेत वेळेची चार क्षेत्रं असल्यामुळे (हवाई हे राज्य धरलं तर आठ) ते काही एका वेळी करणं शक्य झालं नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हे झालं तरी कोविडचं हत्याकांड चालूच राहिलं. ट्रम्पसाहेबांना डोळ्यासमोर निवडणूक दिसत होती. कोणत्याही विषयाचा कसलाच अभ्यास नसल्यानं, त्यांना वैयक्तिक, ठाम अशी कोणतीच मतं कधीही नव्हती. त्यांचे निम्मे समर्थक Evagelical Christian होते, तर निम्मे आपल्याला गुलाम करू इच्छिणाऱ्या शक्तींनी घेरलेलं आहे, या काल्पनिक भीतीनं पछाडलेले. त्यामुळे मास्क लावायच्या विरुद्ध. मास्क लावणे म्हणजे जुलूमशाहीला शरणागती. दोघांचाही लस टोचून घ्यायला विरोध. लसीतून बिल गेट्स कम्प्यूटर चिप सोडणार आणि कायमचं गुलाम करणार! अशा परिस्थितीत कोविडचं फावलं. आपल्या अंगावर बेतत आहे, हे बघून ते झटकून दुसऱ्यावर टाकायला ट्रम्पसाहेबांना चीनशिवाय दुसरं चांगलं गिऱ्हाईक कोण? त्यांनी चीननामाचा गजर चालू केला- “China, China, China virus!”

चीनची बदनाम प्रयोगशाळा

वूहानच्या प्रयोगशाळेत विषाणू तयार करून जगाचं वाटोळं करायला चीनने तो मुद्दाम बाहेर सोडला, असा एक मतप्रवाह निघाला. पण चीनचा तो हेतू असता तर त्याला याच्यापेक्षा भयानक विषाणू-जीवाणू जगात सोडता आला असता. त्यामुळे तो दृष्टिकोन अल्पमतात राहिला. चीनने आपल्यापासून लपवलं, आपल्याला वेळेवर कळवलं नाही, असा आणखी एक मतप्रवाह निघाला. पण चीननं ३१ डिसेंबर २०१९ रोजी कळवल्यापासून तीन महिन्यांनी अमेरिकेत साथ आली. म्हणजे, प्रतिबंधाची तयारी करायला वेळ होता. ट्रम्पसाहेबांनी फेब्रुवारी २०२०च्या पहिल्या आठवड्यात दिलेल्या मुलाखतीत हा विषाणू भयानक आहे, हे मान्य केलं होतं (‘मला या व्हायरसबद्दल सर्व काही माहीत आहे!’). पण एप्रिल महिन्यात थंडी संपेल आणि तो वितळून जाईल, असं आश्वासनही दिलं. शिवाय मास्क, पीपीई, चाचण्यांची उपकरणं, यांसारख्या प्रतिबंधासाठी लागणाऱ्या साहित्याचा पत्ताच नव्हता. (त्यांचा पुरवठा नंतर झाला तो चीनमधूनच!)

असे विषाणू-जीवाणू प्रयोगशाळेत नव्यानं तयार करणं जवळजवळ अशक्य आहे, असं बहुतेक जबाबदार शास्त्रज्ञांचं मत पडलं. त्यांत कोविड निपटायच्या कामासाठी राष्ट्राध्यक्षांनी नेमलेले CDCचे डॉ. फाउची होते. असं असलं तरी अस्तित्वात असलेल्या जंतूंना प्रयोगशाळेत अधिक प्रभावशाली करणं (gain of function) शक्य असतं. किंबहुना, जगातल्या सर्व सरकारी/बिनसरकारी प्रयोगशाळेत हाच उद्योग चालू असतो. पण त्याकरता त्यांचं अनेक पिढ्या प्राण्यांत (विशेषत: वटवाघळांमध्ये) संवर्धन करावं लागतं. याउलट निसर्गात कोट्यवधी वटवाघळं असतात, त्यामुळे तिथं उत्क्रांतीचा वेग खूपच अधिक असतो.

असं असलं तरी करोना चीनच्या प्रयोगशाळेतूच बाहेर आला, हा आकर्षक सिद्धान्त निघून जायला काही तयार नाही. (त्या निमित्तानं चीनकडून हजारो अब्ज डॉलर्स वसूल करायचे, हे नवीन खूळ निघालं आहे.) मुद्दाम नाही, पण कोविड अपघातानं तयार झाला आणि अपघातानं गळून बाहेर पडला, असा नवीन फाटा फुटला. तिथं अनेक वर्षं काम करत असलेल्या एका डॅनिएल अँडरसन नावाच्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाला तिथल्या सुरक्षाव्यवस्थेची माहिती असल्याने तिने तो पर्याय उडवून लावला. (सुरक्षेच्या पातळीप्रमाणे जगातील प्रयोगशाळांना १ ते ४ असा दर्जा दिला जातो. वूहानच्या प्रयोगशाळेला सर्वांत सुरक्षित असा ४ दर्जा दिला आहे.)

नंतर ट्रम्पच्या माणसांनी डॉ. लीमेंग यान नावाच्या बाईला चीनमधून पळवून आणलं. तिचं विषाणू हे संशोधनाचं क्षेत्र नसलं तरी कोविड-१९ हा नैसर्गिक असणं शास्त्रीयदृष्ट्या शक्यच नाही, असा सिद्धान्त तिने मांडला. शास्त्रज्ञांनी त्याची चेष्टा केल्यानंतर तिने तिथं असताना माणसं कशी आजारी पडली, हॉस्पिटलमध्ये कशी गेली, वगैरे कपोलकल्पित कथा सादर केल्या. 

वूहानच्या प्रयोगशाळेची तपासणी करण्याकरता जागतिक आरोग्यसंस्थेनं ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी, जपान, कतार, हॉलंड, रशिया, व्हिएतनाम, अमेरिका या देशांतील ज्येष्ठ शास्त्रज्ञांचं शिष्टमंडळ चीनमध्ये पाठवलं. त्यांच्या अहवालाप्रमाणे कोविड-१९चा उगम प्रयोगशाळेत नाही. पण तो अहवाल बरोबर नाही, या सबबीखाली प्रयोगशाळेची पुन्हा तपासणी झाली पाहिजे, ही मागणी जोर धरू लागली आहे.

सत्यापेक्षा राजकारण महत्त्वाचं

या सगळ्यांमध्ये सत्य शोधण्यापेक्षा राजकीय फायदा कसा घेता येईल, इकडे सर्वांचं लक्ष आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ट्रम्पविरोधी डेमोक्रॅटिक पक्ष. तो ट्रम्पइतकाच चीनद्वेष्टा असला तरी २०२० हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं करोना वूहानच्या प्रयोगशाळेतच तयार झाला, असं त्याने फार ताणून धरलं नाही. तसं करणं म्हणजे ट्रम्पला अडचणीतून सोडवण्यासारखं होतं. आता निवडणूक झाली, तेव्हा गाडी पूर्वपदावर आली आहे. स्वत:च्या नाकर्तेपणाला झाकायला चीनसारखी दुसरी ढाल कुठून मिळणार?

आता येत असलेल्या बातम्यांप्रमाणे चीनच्या आधीच अनेक देशांत कोविडचं आगमन झालं होतं, असं दिसतंय. ‘ब्लूमबर्ग’मध्ये  प्रकाशित ५ मे २०२०च्या बातमीनुसार फ्लूसारखी लक्षणं असलेल्या ज्या रुग्णाला फ्रान्सच्या हॉस्पिटलमध्ये डिसेंबरच्या मध्यावर दाखल केलं होतं, त्याला तेव्हा कोविड झाला होता, हे सिद्ध झालेलं आहे. मध्य अमेरिकेतील काही राज्यातील नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या ८४ वेगवेगळ्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये कोविडच्या अँटिबॉडिज सापडल्या आहेत. तसेच १५ जूनच्या ‘Clinical Infectious Diseases’ या वैद्यकीय मासिकांत नमूद केल्याप्रमाणे कॅलिफोर्निया ते मॅसचुसेट्स या १५ राज्यांत जानेवारी महिन्यात गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कोविडच्या अँटिबॉडिज सापडल्या आहेत.

चीनच्या आधी फ्रान्स, अमेरिकेत कोविडसदृश आजार

त्याच्याही मागे निरखून बघितलं, तर आजाराचे काही उद्रेक कोविडसारखेच वाटतात. राजधानी वॉशिंग्टनजवळ असलेल्या फेअरफॅक्स गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हॉस्पिटलमध्ये जून २०१९मधील आलेल्या न्यूमोनियासारख्या रोगाचा उद्रेक हा त्यांपैकी एक. त्यात ५४ लोक आजारी पडले आणि दोन मृत्यू पावले. इथं गंभीर गोष्ट ही की, इथून जवळच फोर्ट डेट्रिकची संशोधनशाळा आहे. ही संशोधनशाळा ताबडतोब बंद करायला लागली. ही बंद करायला लागल्याची, ही गेल्या २० वर्षांतील चौथी वेळ. अमेरिका जशी वूहानच्या संशोधनशाळेच्या तपासणीची मागणी करत आहे, तशीच चीनने फोर्ट डेट्रिकच्या संशोधनशाळेच्या बाबतीत मागणी चालू केली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

फोर्ट डेट्रिकच्या संशोधनशाळेचा पूर्वेतिहास काही खास गौरवास्पद नाही. १९५०-६० या काळात अँथ्रॅक्सवर चाललेल्या संशोधनात दोन कर्मचाऱ्यांचा संशोधनशाळेत मृत्यू झाला. त्या कर्मचाऱ्यांचं रक्त अँथ्रॅक्स जीवाणूंचं संवर्धन करण्यासाठी लष्करानं वापरलं, असा त्या वेळी तिथं काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आरोप केला आहे. असले प्रकार इतर प्रयोगशाळेत आणि इतर देशांतही चालत असले पाहिजेत.

तेव्हा ‘China Lied, Americans Died’ असले एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन या जैविक प्रयोगशाळांचं संशोधन मर्यादित कसं करता येईल, ते बघितलं पाहिजे. प्रत्येक प्रयोगशाळेतून रोगाची गळती होण्याचा धोका, दहशतवाद्यांकडून चोरी व्हायचा धोका, असे अनेक धोके आहेत. एकट्या अमेरिकेतच सरकारी, खाजगी, विद्यापीठांशी संलग्न अशा २६३ प्रयोगशाळा आहेत. इतर जगात आणखीन तेवढ्याच. कोविड-१९ हा प्रयोगशाळेतून रोगाची गळती होऊन बाहेर आला की, नाही नक्की कळलं नसलं, तरी त्याने धोक्याची घंटा वाजवली हे नक्की. 

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ जुलै २०२१च्या अंकातून साभार

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. मोहन द्रविड फिजिक्समधील पीएच.डी. असून त्यांचे राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होतं. त्यांचं वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचं ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन घडवणारं पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ने प्रकाशित केलं आहे.

mohan.drawid@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रशियाचा भारताला भडकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भारत-अमेरिका संबंधांत काडी घालणे, हा त्यामागचा हेतू असावा. आंतरराष्ट्रीय पटावरील ‘प्रोपगंडा’ची ती एक चाल असणार...

आपण घरात घुसून दहशतवाद्यांना टिपतो, हे प्रचारात सांगणे अडचणीचे असले, तरी समाजमाध्यमांतून त्याचा प्रचार करता येतोच. तेव्हा अमेरिकेतून त्याबाबतच्या बातम्या आल्या, तरी त्या येथे सरकारला फायद्याच्याच ठरतात. किंबहुना त्या हेतूने तर तशा बातम्या पेरण्यात येत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अहवालाचे तसे नाही. त्यातील टीका उघडच तोट्याची ठरू शकते. ते लक्षात घेऊनच रशियाने तो मुद्दा उचलला.......