राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी : सत्य विरुद्ध असत्य
पडघम - देशकारण
अनिल सिन्हा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी
  • Mon , 21 June 2021
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP संघ RSS राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress

राहुल गांधींविषयी बोलणं-लिहिणं हे एक कठीण काम आहे. देशातल्या एका सर्वांत जुन्या आणि महत्त्वाच्या पक्षाच्या नेत्याविषयी बोलताना अडखळायला होणं, हेच पुरेसं बोलकं नाही का! त्यातून हे सिद्ध होतं की, आपलं मत मनमोकळेपणानं व्यक्त करण्यावर किती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निर्बंध आहेत. अडचण एवढीच आहे की, हे सारे निर्बंध कायद्याच्या बाहेरचे आहेत. वातावरणच असं बनवलं गेलं आहे की, तुम्ही असं कुठलंही मत व्यक्त करू शकत नाही, जे सत्ताधारी पक्षाच्या विचाराशी सहमत नसेल. स्वत: राहुल गांधींना त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी किती काय काय सहन करावं लागतं! त्याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘फ्लाइंग शीख’ मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर त्यांनी केलेलं एक ट्विट.

त्यांनी इंग्रजीत ‘भारता’ला ‘माता’ म्हणून संबोधलं आणि मिल्खा सिंग यांना तिचा ‘पुत्र’. मग काय, लोक त्यांच्या इंग्रजीची रेवडी उडवायला लागले. आरोप करायला लागले की, त्यांनी भारताचं लिंगच बदललं. त्यात काही लोक असेही होते की, जे ‘भारतमाता’ न म्हणणाऱ्यांना ‘देशद्रोही’ मानतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, भारतीय लोक भारताला ‘मातृभूमी’ मानतात. ‘मदर इंडिया’ अर्थात ‘भारतमाते’चं प्रतीक कुणाला माहीत नाही!

राहुल गांधींनी ‘मूर्ख’ ठरवण्याचं अभियान बऱ्याच काळापासून चालू आहे. त्यांचं नावच ‘पप्पू’ असं ठेवलं गेलंय. त्यातून हे स्पष्ट होतं की, भाजप आणि संघपरिवाराचं प्रचारतंत्र किती सक्षम आहे! गंमतीची गोष्ट म्हणजे राहुल गांधींच्या बोलण्यात अर्थशास्त्र, राजकारण यांबरोबरच जीवनाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयीचं ज्ञान दिसतं. देशातले किती राजकीय नेते रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी वाद-संवाद करू शकतात? पण कधीही त्यांच्या बोलण्यात अहंकार किंवा उद्धटपणा दिसत नाही. ते विनम्रतेनं बोलताना दिसतात. हे सांगायची आवश्यकता आहे का, की आपल्याला अजून बरंच काही शिकायचंय हे माहीत असणं ही ज्ञानाची पहिली पायरी असते?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राहुल गांधींना ‘अज्ञानी’ ठरवलं गेल्यामुळे त्यांचं वा काँग्रेसचं जेवढं नुकसान झालंय, त्यापेक्षा कितीतरी जास्त देशातल्या वाद-संवादाच्या परंपरेचं झालंय. ही परंपरा स्वातंत्र्यलढ्याच्या शिलेदारांनी घडवलीय. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, जीवनाचं तत्त्वज्ञानच काय पण कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय ज्ञानसुद्धा मिळवण्याचा हक्क फक्त काही निवडक लोकांनाच होता. त्याला कबीर, रविदास आणि इतर काहींनी आव्हान दिलं, पण तरीही परिस्थिती फारशी बदलली नाही.

स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीनं केवळ राजकारणच नाही तर इतिहास आणि तत्त्वज्ञानाचे दरवाजेही सामान्य लोकांसाठी खुले केले. स्वामी विवेकानंद, महात्मा फुले यांच्यापासून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्यापर्यंत वाद-संवादाची एक सशक्त परंपरा होती. धर्मापासून इतिहासापर्यंत प्रत्येक विषयावर मनमोकळेपणानं चर्चा होत. असं असताना राहुल गांधी यांच्यासारख्या वाद-संवादावर विश्वास असलेल्या व्यक्तीला मोडीत काढणं, हे एकप्रकारे त्या परंपरेला नाकारण्यासारखंच आहे. खरं तर ती परंपरा हाच भारतीय लोकशाहीचा कणा आहे.

ज्ञानाविषयी बोलत आहोत, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण होणं स्वाभाविक आहे. कारण राहुल गांधी त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांची एकमेकांशी सतत तुलना केली जाते. मोदींनी आपल्या भाषणांमध्ये अनेक वेळा अशा चुका केल्या आहेत, ज्या एखाद्या शालेय विद्यार्थ्याला माफ करता येण्यासारख्या नाहीत, पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला तर नाहीच नाही. पण माध्यमं आणि बुद्धिजीवींनी त्यांच्या चुकांवर कधी गंभीरपणे चर्चा केलेली नाही. सर्वांत गंमतीची प्रतिक्रिया भारतीय मध्यमवर्गाची आहे, जो अशा चुका करणाऱ्या व्यक्तीला आपला ‘नायक’ मानतो. पण मोदींची ‘नायका’ची प्रतिमा बनावट आहे आणि ती बनवण्यामागे भाजप, संघपरिवार आणि संपूर्ण माध्यमं लागलेली आहेत.

त्यात अनेक जाहिरात एजन्सीजचाही समावेश आहे. त्या मोदींच्या छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमाचाही मोठा शो करून टाकतात. परदेशवाऱ्या, निवडणूक प्रचारसभा आणि करोनाकाळातही त्यांनी प्रचार करण्याचे ‘मीडिऑकर’ मार्ग अवलंबले. पण दुसऱ्या देशातल्या नेत्यांच्या गळ्यात पडणं, कॅमेऱ्याकडे चेहरा करून पोझ देणं किंवा बोलणं, यांमुळे त्यांच्या लोकप्रियतेत कुठलाही फरक पडला नाही. ‘गुजरात मॉडेल’ची पोलखोल झाली आहे. मात्र देशातल्या बुद्धिजीवी वर्गाला त्याचं काहीही वाटत नाही. यातून देशाचं ‘सांस्कृतिक पतन’च अधोरेखित होतं.

मोदी जागतिकीकरणाचं स्वागत करणाऱ्या वर्गाचे नायक आहेत. या उपभोगवादी वर्गासाठी अमर्याद उपभोग आणि जगणं हे एक मनोरंजनच आहे. त्यात नैतिकता नावाच्या गोष्टीला थारा नाही. सत्य-असत्याच्या सीमारेषा मोडीत काढल्या गेल्या आहेत. मोदींच्या जीवनातही तेच दिसतं. भरजरी पोशाखातून आणि त्या पोशाखाच्या रंगाच्या निवडीतून लोकांना आकर्षित करणं ही त्यापैकीच एक क्लृप्ती आहे. या अशा असत्य जगात भाषा सहज अभिव्यक्तीची वाहक राहत नाही, ती हल्ला करण्याचं हत्यार होते!

मोदी आपल्या विरोधकांविषयी ज्या भाषेचा वापर करतात, ती सभ्य समाजात स्वीकारली जाता कामा नये. पण लोक ती केवळ स्वीकारतच नाहीत, तर तिचा आनंदही घेतात. मोदींनी सोनिया गांधींपासून ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत जी भाषा वापरली, ती हीन म्हणावी अशी आहे. राहुल गांधी नेमके याच्या उलट आहेत. मोदींनी लाखोवेळा आव्हान देऊनही त्यांनी आपल्या भाषेचा दर्जा घसरू दिलेला नाही. कुठल्याही निवडणुकीत त्यांनी असे दावे केले नाहीत, जे त्यांना कमीपणा आणतील. त्यांच्या भाषेत शालीनता आहे आणि गोडवाही.

काही लोक त्यांच्या मंदिरांच्या भेटीची उदाहरणं देऊन म्हणू शकतात की, तो संधीसाधूपणा आणि ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चाच प्रयत्न होता. नक्कीच, ते त्यांचे चुकीचेच राजकीय निर्णय होते. त्यामुळे सेक्युलॅरिझम धोक्यात आलं. पण मंदिरात पूजा करणारे राहुल गांधी आणि अयोध्येच्या मंदिरात दंडवत घालणारे नरेंद्र मोदी, या दोन्हींमधला फरक स्पष्टपणे दिसून येतो. मोदी कडव्या हिंदूची प्रतिमा बनवत आहेत आणि राहुल गांधी सांगू इच्छितात की, त्यांचा हिंदूंच्या धार्मिक परंपरांना विरोध नाही. ते हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की, तेही याच धार्मिक परंपरेचा एक भाग आहेत. हेही चुकीचंच आहे, पण त्याची तुलना धर्माला राजकीय हत्यार बनवणाऱ्या मोदींच्या राजकारणाशी होऊ शकत नाही.

या दोन व्यक्तींमधला फरक आपल्याला लोकसभेत घडलेल्या एका घटनेतही दिसतो. राहुल गांधींनी मोदींजवळ जाऊन त्यांची गळाभेट घेतली, तेव्हा ते एकदम गडबडून गेले होते. जी व्यक्ती इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना कॅमेऱ्यासमोर मिठ्ठ्या मारते, ती संसदेत एका खासदाराच्या गळाभेटीमुळे गोंधळून जाते? याचा अर्थ त्यांच्या गळाभेटी तोंडदेखल्या असतात, त्यात नाटकीपणा असतो. राहुल गांधींनी नंतर आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत डोळा मारून सांगितलं की, पहा मी मोदींना गडबडवलं. हे एक निरागस उदाहरण आहे, जे लोकांना बदनाम करण्याच्या आणि कमी लेखण्याच्या संघटित प्रयत्नांपेक्षा वेगळं आहे.

राहुल गांधींच्या शिष्टाचाराविषयी एक उल्लेखनीय प्रतिक्रिया सीपीएमच्या माजी खासदार सरला माहेश्वरी यांनी त्यांच्या जन्मदिनी दिली होती. त्या म्हणाल्या होत्या – “राहुल गांधी से मुलाकात तो बस इतनी कि नागरिक उड्डयन मंत्रालय की सलाहकार समिति की एक मीटिंग में संयोग से हम दोनों उपस्थित थे। मीटिंग में हमने एक-दूसरे को बोलते देखा और सुना था। उसके कुछ दिन बाद एक बार राज्य सभा के सदन से बाहर निकलते हुए मैंने देखा कि शायद राहुल गांधी सामने के द्वार से तेजी से लोकसभा की ओर जा रहे थे। अचानक देखा कि वो लौटकर वापस आए और राज्य सभा के प्रवेश द्वार के सामने मुस्कुराते हुए हाथ हिला रहे हैं। मैंने भी मुस्कुराते हुए हाथ हिलाया। वे लौट गये! लेकिन उनका इस तरह लौटकर आना और मुस्कुराना अच्छा लगा! ये सौजन्य! ये शिष्टाचार अच्छा लगा।’’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यांच्या घराणेशाहीविषयी लोक प्रश्न उपस्थित करत आले आहेत. पण हेही लक्षात घ्यायला हवं की, आपल्या देशातल्या राजकारणात ही बिमारी सर्वत्र दिसते. डावे पक्ष वगळता भाजपसह सगळेच पक्ष त्यात अडकलेले दिसतात. अशा परिस्थितीत केवळ राहुल गांधींना लक्ष्य करणं हा अप्रामाणिकपणा झाला. मोदीसुद्धा घराणेशाहीला महत्त्व देणाऱ्या भारतीय मानसिकतेचा उपयोग आपली प्रतिमा बनवण्यासाठी करत आहेतच. ते कॅमेरे हजर असताना आपल्या आईचा आशीर्वाद घेतात! राहुल गांधींच्या परिवाराचं स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीपासून स्वतंत्र भारताच्या जडणघडणीपर्यंत योगदान आहे. ते कसं काय नाकारलं जाऊ शकतं? त्यांच्या घराणेशाहीपेक्षा आईसोबत राजकारण करणाऱ्या त्यांच्या निर्णयांवर चर्चा व्हायला हवी. पण केवळ घराणेशाहीच्या विवादावरून भारतीय राजकारणातल्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भटकवण्याचं काम केलं जातंय.

बनावट नसलेलं जग बनवू पाहणाऱ्यांना समोर आणण्याची वेळ आलेली आहे. राहुल गांधींसारखे नेतेच असं जग बनवू शकतात. आपण सर्वांनी करोनाकाळात पाहिलंय की, बनावट जग बनवणाऱ्यांचं काळीज ना ऑक्सीजनसाठी तडपून मरणाऱ्यांसाठी द्रवलं, ना गंगेमध्ये तरंगणाऱ्या प्रेतांना पाहून. चमकत्या डोळ्यांच्या जादूपेक्षा राहुल गांधींच्या करुणेनं भरलेल्या डोळ्यांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

लेखक अनिल सिन्हा ज्येष्ठ पत्रकार आहेत

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://janchowk.com या पोर्टलवर २० जून २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - https://janchowk.com/zaruri-khabar/rahul-vs-modi-false-between-truth-and-false-new/

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा