मैं और मेरी तन्हाई, अक्सर एक-दुसरें से बाते किया करते हैं!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अरुणा सबाने
  • प्रातिनिधिक चित्र आणि अरुणा सबाने
  • Thu , 10 June 2021
  • अर्धेजग कळीचे प्रश्न अरुणा सबाने Aruna Sabane माहेर Maher आकांक्षाAakshanksha कुटुंब Family एकटेपण Loneliness करोना Corona

‘एकटं’ हा शब्द उच्चारला तरी अनेकांना भयंकरच वाटतं. ज्यांच्यावर नाईलाजानं एकटं राहण्याची परिस्थिती निर्माण होते, ते लोक तर आमची किती दयनीय स्थिती झालेली आहे, असंच चित्र उभं करतात आणि समाजाला, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांनाही ते दयेस पात्र आहेत असं वाटतं. मात्र सहानुभूती दाखवण्यापेक्षा त्यांचं एकटेपण कसं कमी करता येईल इकडे कुणी लक्षच देत नाही. एकटं राहण्याची वेळ पारिवारिक व्यक्तीवर येऊ नये, हे जरी सत्य असलं तरी एकटेपणाला एवढं घाबरण्यासारखं आहे काय, हा माझ्यासमोर कळीचा मुद्दा आहे. बरं, जी व्यक्ती एकटेपण बायचॉईस स्वीकारते, तिचीही लोक फार काळजी करतात. असं का? आणि त्या व्यक्तीला एकटं पाडणाराही समाजाचाच एक भाग असतो. एकटेपण हे खरंच एवढं भयभीत करणारं प्रकरण आहे काय?

मी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या एकटेपणावर खूप चर्चा होताना ऐकते. अगदी नवऱ्याचं घर सोडून आले, तेव्हापासून ‘अगबाई, पण तीन तीन मुलांना घेऊन एकटी कशी राहशील?’, नंतर मुलं शिकायला, किंवा नोकरीला बाहेर गेल्यावर कुणीतरी म्हणायचं, ‘अगं बाई, एकटी कशा राहशील?’, मग सगळ्यांची लग्न होऊन मी खऱ्याअर्थी एकटी राहायला लागले आणि पंचावन्न ओलांडून जुनी झाले, तेव्हा तर काळजीचा सूर आणखीच वाढला. हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेल्यावर तर माझ्या बहिणी माझ्या एकटेपणाची फारच काळजी करायला लागल्या. अगदी ‘रात्रीचं झोपायला तरी कुणाला बोलवत जा ग’पासून तर ‘जाऊ दे मेले दहा-बारा हजार रुपये पण एखादी मदतनीस रात्रीची सोबत ठेवच’. मी म्हणायचे, ‘१०-१२ हजार रुपये ठेवून कुणाला सोबत म्हणून झोपायला बोलवण्यापेक्षा मीच कुणा एकट्या स्त्रीला सोबत म्हणून जाते, म्हणजे मलाच पैसेही मिळतील आणि सोबतही मिळेल.’ मी मजेतच हा विषय परतवते, म्हणून माझी बहीण ओरडायची मला. पण तिच्या माझ्याबद्दलच्या काळजीचा मी कायम आदरच करते. 

खरं तर मी एकटी राहते, म्हणजे खूप भयंकर काहीतरी करते, किंवा मला कुणी सहानुभूती दाखवावी अशी अवस्था आहे, असं मला अजिबात वाटत नव्हते. मात्र इतरांना यासाठी मी दयेस पात्र आहे, असं का वाटावं, हेही कळत नव्हतं. अजूनही कळत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एकदा मी एकटीच ‘वुई दि वुमन’ हा चित्रपट बघायला गेले. उत्तम सिनेमा. मी ज्या क्षेत्रात काम करते, त्यावरचाच तो चित्रपट. बिहारच्या पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट. चार मैत्रिणी तीन मित्रांसोबत त्यांच्या बँडच्या सादरीकरणानिमित्त त्यांच्या गावापासून दूर बाहेर मोठ्या शहरात जात असताना त्यांच्यावर जमीनदारांची मुलं रस्त्यात बलात्कार करतात. सोबतचे मित्र पळून जातात. त्यातून सुटका करून घेऊन त्या त्यांचं सादरीकरण जिथं असतं तिथं पोचतात, आपला परफॉर्मन्स उत्तम देतात आणि पुढे स्वत:च त्या मुलांचा कसा बदला घेतात, ही त्या सिनेमाची थीम होती.

कित्येक वर्षांपासून मी जे सतत माझ्या भगिनींना सांगते आहे की, बलात्कार करणाऱ्याला गिल्ट यायला हवा, जिच्यावर बलात्कार झाला तिला नाही. कठीण आहे, पण कॅन्सर ज्या अवयवाला झाला, तेवढाच भाग आपण कापून फेकतो आणि पुढे आयुष्य जगतोच ना, त्या अवयवाशिवाय. अनेक स्त्रिया त्यांच्या स्तनाशिवाय, गर्भाशयाशिवाय जगतात. तसंच बलात्काराची ही जखम विसरणं सोपं नाहीये, हे मला माहिती आहे, पण ती विसरून पुढचं आयुष्य मजेत जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक स्त्रीला. हीच या सिनेमाची थीम होती.

सिनेमा बघण्यात एवढी गुंतले होते की, मी एकटीच सिनेमाला आले, याचं त्या तीन तासांत भानही नव्हतं. आणि काही कलाकृती या एकटीनंच बघायच्या असतात. त्यात मध्ये कुठलाच रसभंग नको असतो. बरं, यात मी काही विशेष करते आहे असंही मला अजिबात वाटत नाही. सकाळी नऊचा शो होता. तिकीट काढतच होते, तर एका मैत्रिणीचा फोन आला. तिला म्हणाले, ‘नंतर  बोलू या. मी सिनेमाला आले आहे.’ तर म्हणाली, ‘बरं आहे बाई तुझं, एकटीच असते, ना बोलायला, ना टोकायला. कधीही काहीही करू शकते. आम्हाला नाही जमणार असं कधी. तुम्हा एकट्या बायकांचं बरं असतं!’

खरं तर या दुकट्या बायांनीही त्यांना जमेल तसं जगायला काय हरकत आहे? पण मी असं म्हणण्याचाच अवकाश की, ‘आम्हाला कसा संसार एकहाती सांभाळावा लागतो, नवऱ्याची, मुलांची सतत उस्तवारी काढावी लागतात’, हे ऐकवलंच म्हणून समजा. नवरा आणि मुलं आपापल्या मार्गी लागल्यावर तरी त्यांना हवं ते त्या करू शकतात काय, करू इच्छितात काय हा खरा प्रश्न आहे. देवदेव करत बसतील, कंटाळवाण्या टीव्ही सिरिअल्स बघतील, किटी पार्टी करतील, पण सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती शून्य. कारण इच्छाच नाही. आपल्यात हवा तसा बदल करणं हे आपल्याच हातात असतं. आणि कोणती सवय आपल्यात बाणवायची की नाही, याचं स्वातंत्र्यही पूर्णपणे आपलंच असतं. असो.

मी गाडी काढून सहजच २००-३०० किमीचं अंतर पार करून हवं तिथं जाऊन येते. गाडी एकटीनं चालवणं काय आणि संसार एकटीनं चालवणं काय माझ्यासाठी सारखंच. फक्त त्या एकटेपणाच्या आयुष्याला भिडता यायला हवं. एकटेपणाचा बाऊ केला की, मग मात्र खूप कठीण होऊन बसेल ही गोष्ट.

जगात मी आहे, एवढंच माणसाला पुरेसं असायला काय हरकत आहे? हे जग तसं चांगलंच आहे. त्यात आपण स्वत:ला घेऊन नीट उभं राहायला हवं. ऐन तारुण्यातच मी घर सोडलं. एकापरीनं ते अंधारात झोकून देणंच होतं.

एकूणच स्त्रीबाबत समाजाचे ठाम पूर्वग्रह असतात, आजही ते आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पुरुषाला जितक्या सहजपणे कुटुंबात, समाजात प्रतिष्ठेचं स्थान मिळतं, त्यापेक्षा कितीतरी पटीनं स्त्रीला आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी स्वत:ची ऊर्जा खर्च करावी लागते. आणि आपण ती करावीच, असं मला स्वत:ला वाटतं. स्त्रियांनी स्वत:च ‘सेक्स सिम्बॉल’ प्रतिमेतून बाहेर येण्याची गरज आहे. ग्रामीण स्त्री यात कधीच अडकत नाही. उलट माझं असं निरीक्षण आहे की, मोठ्या शहरातली स्त्री जास्त शिकलेली आहे, अर्थार्जित आहे, तीच यात जास्त गुंतत आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एकटेपणाशी माझी पहिली ओळख कधी झाली, मला आठवत नाही. पण एकटेपणा खूप भयंकर आहे, हे अल्प काळ सोडला तर मला कधी वाटल्याचं फारसं स्मरत नाही. कारण  एकटेपण मला आवडतंच. खरं तर मी गजबजलेल्या परिवारात जन्माला आलेले. आमचा निमगावचा खूप मोठ्ठा वाडा किंवा आमचं वर्ध्याचं घरही मोठं. त्यात आम्ही सख्खे आठ बहीण-भावंडं, चुलत दोन, आई, आजोबा… कधी निमगाव, कधी वर्धा, नोकरचाकर आणि सतत येणारे जाणारे. ऐन तारुण्यात येईपर्यंत सतत अशा राबत्या घरातच मी राहिले. बहीण-भावंडं, मित्रमैत्रिणी येणारे जाणारे मला प्रिय. भाऊ राजकारणात असल्यामुळे घरात कायम येणारे-जाणारे असायचे. मौजमस्ती, खेळणं-बागडणं यात लहानपण गेलं. पण तब्बेत बरी नसली आणि घरी राहिले की, मला माझ्या वरच्या खोलीत एकटंच खूप छान वाटत असल्याचा एक दिवस अचानक शोध लागला. (एरवी आम्हा दोन बहिणींची ती खोली.) पण ती शाळेत आणि मी जेवण करून एकदाची दहा-अकरा वाजता जी वरच्या खोलीत गेले, ती चक्क आरामखुर्चीत रेलून मस्त एक अख्खी कादंबरी वाचली किंवा मध्येच उठून रेडिओ लावला किंवा खिडकीत उभं राहून खूप वेळ बाहेर बघत राहिले, किंवा एकटीच बिट्ट्या खेळले. पण एका क्षणासाठीही मला असं वाटलं नाही की, बापरे, कधी येतील राजू-बंडू (माझे समवयस्क भाऊ). उलट दुपारचा आईनेच आवाज दिला, ‘अगं वरती एकटं एकटं वाटत असेल तर खाली येऊन पड जरा. खाली बरं वाटेल आम्हा सर्वांमध्ये तुला.’ पण मला भूक लागल्यावरच मी खाली आले.

मागच्या अंगणात खूप मोठं बेलाचं आणि लिंबाचं झाड होतं. माझी बहीण खोलीत बसून अभ्यास करायची, तेव्हा मी त्या झाडांखाली बसून काहीतरी वाचत, खेळत किंवा अभ्यास करत असायचे. एवढं मोठं घर असूनही मला त्या झाडाखाली बसून का वाचावंसं वाटायचं? जेवणं झाली की, सारे गप्पा मारत बसायचे. मी मध्येच उठून वर जायचे. खरं तर गप्पांमध्ये तर मी सहभागी नेहमीच व्हायचे. गप्पा मलाही आवडायच्या. भावंडांमध्येही मी रमायचे. पण त्याच वेळी एकटीनेच वर जाऊन वाचत बसावंसं वाटायचं. एखादं पुस्तक मला हाकारत राहायचं.

नागपूरला मी शिकायला आले, तर आईला हीच काळजी की, एवढ्या गोकुळातून आपली लेक आता वसतीगृहात राहायला जाते आहे, तिथं हिला एकटीला करमेल ना. माझे दोनही मोठे भाऊ तिला सांगायचे, ‘अगं, ती होस्टेलला एकटी कुठे राहणार आहे, किती तरी मुली असतील तिच्याजवळ तिथे.’ वसतीगृहात गेल्यावर उलट मला खूप मैत्रिणी मिळाल्या, मित्र मिळाले. चळवळ सापडली, अनेक मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. सतत मोर्चे, निदर्शनं, उपोषण काही ना काही कामात मी व्यस्त असायचे. पण कधीकधी दुपारी एकटी मी माझ्या खोलीत असले की, मला खूप बरं वाटायचं. आम्हा तीनच मुलींचं कॉलेज सकाळी साडेसात ते एक असायचं. बाकी सगळ्या नऊपासून बाहेर पडायला लागायच्या. मी एक दीडला कॉलेजमधून आले की, कधीकधी तर अख्ख्या बिल्डिंगमध्ये मी आणि वॉर्डनच असायचो. त्या संपूर्ण आवाराला एकांतानं व्यापून टाकलेलं असायचं आणि ती नि:शब्द शांतता मला फार आवडायची.

लग्नानंतर अगदी दोघांचा राजाराणीचा संसार होता. आम्हा दोघांचंही एकमेकांवर फार प्रेम, पण तो कॉलेजला गेला की, मला कंटाळवाणा दिवस असं कधी झालं नाही. हा, नियमित वेळ संपून खूप वेळ लोटला की, मग मी अस्वस्थ व्हायची, अजूनही कुणाहीसाठी होते. पुढे मुलं झाली. येणारे-जाणारे, माझ्याजवळ शिकायला असलेली मुलं. घर गजबजलेलं असायचं.

एव्हाना संसारानं एक वेगळं वळण  घेतलेलं होतं. दहा ते तीन तो कॉलेजला आणि अकरा ते पाच मुलं शाळेत. हा जो अकरा ते तीनचा वेळ होता, त्या वेळची माझी मी राणी असायची. तो वेळ मला असा मुठीत घट्ट पकडून ठेवावासा वाटायचा. त्या मिनिटामिनिटाचा मला सदुपयोग करून घ्यायचा असायचा. त्या काळात मी खूप लेखन केलं, स्वेटर्स विणले, नवीन नवीन पदार्थ केले आणि अगदी काहीही काम नसेल, कुठेही बाहेर जायचं नसेल, काहीही वाचायचं नसेल तरी मी माझ्या घरासोबत एकटीच गुडूप मजेत राहायची. मस्त वाटायचं. तो एकांत मला खूप प्रिय होता.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कालांतरानं माझ्या आयुष्याला अकल्पित असं वळण लागलं. मग सर्वांच्या लेखी मी अगदी बिचारी, एकटी किंवा दयनीय वगैरे झाले. माझ्या समोरचे प्रश्न खूप वेगळे होते आणि लोकांच्या नजरेतून माझे प्रश्न फार वेगळे होते. आता ही एकटी बाई काय करेल, हा गहन प्रश्न त्यांना होता. त्यांना हे कळतच नव्हतं, मी एकटी नाहीये, माझ्यासोबत तीन तीन मुलं आहेत. माझा प्रश्न एकटं राहण्याचा नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आहे. तो काळ माझ्यासाठी खूप संघर्षाचा होता. प्रत्येक मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचा असायचा. खूप जटील प्रश्न माझ्यासमोर होते. मुलांचं शिक्षण, माझी कोर्टकेस, पोट भरण्यासाठीचे उद्योग वगैरे वगैरे... डोकं आणि मनही चिवचिवून गेलं होतं.

मला आठवतं, कधी कधी एकटीच मी बर्डी ते सोनेगाव बसमध्ये बसायचे, आणि डोळे मिटून त्याच बसमधून ये-जा करायचे. डोळे मिटले की, माझी मीच असायचे. कारण त्या बसमध्ये मला कुणी काहीही विचारणारं नसायचं आणि माझ्याकडे कुणी ‘बिचारी’म्हणून बघणारंही नसायचं. कधी माझी मैत्रीण श्रद्धाकडे जाऊन बसायचे. तिला माणूस समजून घेणं खूप छान जमतं. त्या नको तेव्हा नको ते प्रश्न करत नाहीत. त्या आपला मूड ओळखून वागतात. माझं ते हक्काचं ठिकाण. केव्हाही मूड छान असला काय किंवा नसला काय मी त्यांच्या घरी जाणार. मूड असेल तर गप्पा जमणारच, पण नसेल तर गुपचूप खुर्चीवर जाऊन बसायचं. त्या समजून घेतात. चहापाणी झाल्यावरही माझी चिवचीव सुरू नाहीच झाली, तर त्या त्यांचं काम करत राहतील, मी माझं. अनेकदा तर मी गेले, बसले आणि येते म्हणून निघून आले. त्या समजून घ्यायच्या.

माझे प्रश्न वेगळे आणि मला घेऊन समाजाचे प्रश्न वेगळे. खरं तर काय संबंध माझ्या एकटेपणाचा त्यांच्याशी? जगात एकटं कोण नाही? संसार करणाऱ्या स्त्रिया एकट्या नाहीत? मेनोपॉझच्या काळात  मला खूप ‘लोनली’ वाटायचं. तब्येत खूप बिघडायची. मुली माझा मूड सांभाळण्याचा प्रयत्न करायच्या. ते बघून माझ्या संसारी मैत्रिणी म्हणायच्या, ‘लहान असून मुली तुला किती भावनिक आधार देतात गं. नाहीतर आमचे साहेब, वेळच नसतो त्यांना माझ्यासाठी’. म्हणजेच काय, संसारी स्त्रीही एकटी आहे, हे अनेक उदाहरणांवरून मी बघायचे. माझं एकटेपण नव्हे, माझे प्रश्न मला सतावत असायचे. माझ्याभोवती फेर धरून नाचायचे. त्या काळात या गावातला एक प्रचंड नकार मनात वागवत जगत होते. नवऱ्याचं घर सोडणं एवढं भयंकर असतं का? पायापासून मस्तकापर्यंत अनेक विचार मला कापत पुढे सरकून जायचे. माझे विचार माझ्याभोवती नाचायचे. त्यांना या आकृतीबंधातूनच मुक्त व्हायचं असायचं. पण ते कातळ झालेलं असायचं. माझ्या आतल्या स्फोटक विचारांना मी अंगाखांद्यावर सांभाळत फिरायचे. पण त्यांना मोकळं व्हायचं असायचं. मग त्यासाठी धडपड. निवांतपणा शोधण्याची एक असोशी... कधी प्राणायाम, कधी वाचन तर कधी भटकणं. अनंत प्रश्नांचे पाश गळ्याभोवती करकचत असायचे माझ्यात. मात्र जगण्याची तीव्र असोशी होती. वावटळ रोज यायचं आयुष्यात. त्यात अनेकदा मी गरगरा फिरायचे. तासन् तास. मी त्यात घुसळत घुसळत कधीतरी त्यातून मुक्त व्हायचे. त्या कातळाला फोडून जगण्याच्या लसलसणाऱ्या विचारांना मनाशी घट्ट पकडून ठेवायचे आणि एकांताचा आस्वाद घेत, जगण्याचे गणित मांडत राहायचे.

माझ्या स्वत:च्या आत मला पूर्वीपासून डोकावण्याची सवय होती. अजूनही आहे. या काळात मला त्याचा फार फायदा झाला. दिवसागणिक माझी स्वत:विषयीची आपली समजूतही वाढत गेली. रोज आपल्या आयुष्यात नवीन असं काही घडत नसतं. पण आपल्याभोवती अनेक घटनांची आवर्तनं चालूच असतात. माझ्याभोवती तर फारच होती. पण वाढलेल्या समजूतदार दृष्टीमुळे मला त्याचा त्रास कमी व्हायचा. मी आकलनाच्या दृष्टीनं त्याकडे बघायची.

काळ सरकत राहिला. आयुष्यात कितीही उत्पात झाले तरी काळ कुणासाठी थांबतो का? पण एक नक्कीच. दिवसभर कितीही शूर येसूबाईची भूमिका पार पाडत असले, तरी रात्री मात्र मी जिजाऊच असायचे. मुलांची आई. त्या खोलीत फक्त आम्ही मायलेकरं. आणि तेव्हा रात्रीचा मृत्यू मला दचकवून जागे करायचा. आपला अपघात झाला, आपला खून झाला (होय, ही शक्यता त्या काळात दाट होती) किंवा कशाही पद्धतीने आपला मृत्यूच झाला तर... मी भयभीत व्हायचे. मला दरदरून घाम फुटायचा. ते भय कदाचित मला अकाली मृत्यू येण्याचं नव्हतं, तर माझ्या माघारी माझ्या मुलांचं कसं होईल, या विचारांनी मला अनेक वर्षं छळलं आहे.

या विचारांच्या वादळाची रौद्रता, संहारकता व भीषणता त्या वेळी मी कोणत्या आत्मबळावर झेलली असेल? या काळात मला माझ्या मुलांनी, माझ्या माहेरच्यांनी, मित्रांनी खूप सांभाळून घेतलं. भावनिक एकटेपण माणसाला नाही पेलवत. अर्थात नाही म्हटलं तरी एवढ्या लवकर तर मला मरायचं नव्हतं. खूप कामं राहिली होती. मग मी आणखी जोमानं कामाला लागायची. मिळकतीतला माझ्या वाट्याचा पैसा मी बचत करून ठेवायची, माझ्या माघारी मुलांच्या हाताशी चार पैसे असावेत म्हणून. लोक आपल्याला एवढे छळतात, तर माझ्या माघारी माझ्या मुलांना किती छळतील, हा विचार मला  सतत राहायचा.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ज्या गोष्टी मी स्मरणात ठेवू इच्छित नव्हते, त्याच एकांतात सतत समोर यायच्या. मग मी एकांतात राहायलाच घाबरायला लागले. एकटेपणाची जेव्हा मला भीती वाटायला लागायची, तेव्हा मी पटकन परिस्थिती बदलवायची, गर्दीत जायची. ज्या विषयामुळे मी भयभीत झाले आहे, ज्या विषयावर विचार करूनही माझे तळवे घामेजतात, तेव्हा लगेच मी घराबाहेर पडायची. एकतर खूप लांब भटकून यायची, नाहीतर माझ्या सुहृदांकडे जाऊन बसायची, जिथे माझा वेळ छान जाईल. शनवारे, दभि, श्रद्धा, नेतादादा, नाहीतर सरळ गाडी काढून वर्धा किंवा राजनदादाकडे नागभीडला. पण नंतर माझी कामं वाढली. सतत  खूप कामात व्यस्त राहायला लागले. वसतीगृह, माहेर संस्थेत येणाऱ्या केसेस, ‘आकांक्षा’ मासिक. कामंच काम. पण या व्यस्ततेचा मला त्रास नाही झाला कधी. कारण ही सारी कामं आवडती होती. ऊर्जा देणारी होती.

हळूहळू यातूनही मी बाहेर पडले. एकेक कटू अनुभव, कटू स्मृती मागे टाकत, सुटकेच्या क्षणांना अलगद पकडून ठेवत, अवरोहाकडे पावलं टाकत त्या भीतीला मागे टाकण्यात यशस्वी झाले. जसजसं मला माझ्या कामात यश मिळत गेलं, मुलंही मोठी झाली, माझा आत्मविश्वास वाढला आणि मी एकटेपणाच्या भयातून पूर्णत: बाहेर पडले. मुख्य म्हणजे तोवर माझ्या डोक्यातली मुलांची अवाजवी काळजी दूर झाली. माझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि मला मारणं, माझा खून करणं आता एवढं सोपं राहिलेलं नाहीये. मला जर काहीही झालं तरी, घटना घटली आणि संपली असं होणार नाही, त्याचा इश्यू होऊ शकतो, असं वातावरण माझ्याभोवती जसजसं वाढत गेलं, तसंतसं माझं भय माझ्यापासून दूरदूर जायला लागलं. आपण खोलीत एकटेच आहोत, पण आपल्या आजुबाजूला सुरक्षित वातावरण आहे तेव्हा आपल्यापर्यंत ते एकटेपण पोचतच नसावं.

हा काळ होता १९९६ ते १९९८ (स्थलांतरीय आयुष्याच्या अलीकडलापलीकडला). पण तो  माझ्याच नव्हे आमच्या (माझी मुलं) आयुष्यातला  अमावस्येनी गडद झालेला काळ संपला आणि त्यासोबतच माझं भयही संपलं. पण त्याही काळात माझ्या मनातली भीती इतर कुणालाही दिसली नाही. मी ती मुलांनाही जाणवू दिली नाही. मी घाबरले आहे, हे जर मुलांना कळलं असतं तर तीही ढासळली असती. आणि मी परिस्थितीला, त्या नाजूक दौरमधून जाण्याला नव्हतेच घाबरले. मी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी घाबरत होते. माझी मुलं माझ्या भरवशावर भणंग झाली होती. त्यांना स्थिरता देणं, सुरक्षितता देणं माझं प्रथम कर्तव्य मी समजत होते. माझ्यापाठोपाठ त्यांनी त्यांच्या पित्याचं घर मी काहीही न म्हणता स्वेच्छेनं सोडलं होतं. मी कितीही काट्याकुट्यातून चालेल, पण त्यांना काटे बोचणार नाहीत, याची काळजी घेणं मी स्वीकारलं होतं. माझं भय त्यांच्यासाठी होतं.

एरवी लोकांना तर मी कायम ‘झाशीची राणी’च वाटत होते. हे एक बरं असतं. आपल्या मनातली खरी उलथापालथ लोकांना कळतच नसते. ते बिचारे बाह्य परिस्थितीवरूनच आपल्याला तोलत असतात, तिच्याबद्दलची निरीक्षणं नोंदवत असतात. व्यक्त झाल्यानं माणूस मानसिकरित्या संतुलित राहतो, असं अनेक जण म्हणतात. असेलही कदाचित. पण आपण आपलं मन कुणाजवळ व्यक्त करू शकू, मोकळं करू शकू, एवढी तोडीस तोड अशी व्यक्ती तुमच्याजवळ हवी ना? ती असते, यावर माझा तेव्हाही विश्वास नव्हता, आताही नाही. अनेकदा आपण कुणाजवळ काहीतरी मोठ्या विश्वासानं बोलावं अन् तुमची पाठ फिरत नाही तोच त्यानं/तिनं गॉसिप सुरू करावं. बरं, कुणाला सांगून आपल्या समस्येला उत्तर मिळेलच असंही नाही. आपल्या प्रश्नांना आपणच उत्तरं शोधली पाहिजे. आपणच ती शोधू शकतो.

वसतीगृहाची स्थापना, आर्थिक स्थिरता, सामाजिक कामातला माझा सहभाग, मोर्चे, ‘माहेर’ संस्था, त्यात येणाऱ्या केसेस, या साऱ्यात मी एवढी व्यस्त झाले की, माझ्या मनाचं व्यवस्थापन या कामात आपोआप नीट होत गेलं. आपण जेवढं घाबरू तेवढं आपलं मन चलबिचल होणार. त्या परिस्थितीला आपल्या मनावर हावी होऊ द्यायचं नाही, हे व्यवस्थापन मला खूप आधीपासून जमत होतं. (वैवाहिक जीवनातल्या उत्तरार्धात, अगदी अंतिम काळात  नवऱ्यानं कितीही त्रास दिला तरी मी माझं मन स्थिर ठेवत होते. मी मला डगमगूच देत नव्हते. त्या वेळी वेदना माझ्या भावनांवर हावी होत नव्हत्या. ज्याला आपण ‘कोरडी’ होणे म्हणतो, मी त्या काळात ‘कोरडी’च झाले होते. तेच त्या वेळी माझ्यासाठी योग्य होतं!)

पूर्ववत मला माझं एकटेपण आवडायला लागलं. आपल्या इच्छांशी आणि भावनांशी प्रामाणिक राहून जगणं स्वीकारलं की, सारंच सोपं होऊन जातं. खरं तर एकटेपण एवढं वाईट नाहीच. एकाकीपण आणि एकटेपणात अनेकदा गल्लत होते. मी एकटेपण स्वीकारलं आहे. नवऱ्याचं घर सोडणं म्हणजे मी ‘एकटं’ असणं नव्हे. हा मी समजून-उमजून घेतलेला निर्णय आहे. मुलांसोबत राहून माझी मी एकटी जगू शकते, हे मला जमलेलं व्यवस्थापन आहे.

मुलं आपापल्या मार्गी लागल्यावर त्यांच्यासोबत राहता येतं हा चॉईस असूनही मी माझ्याच घरात एकटं राहायचं ठरवलं, हा माझा चॉईस आहे. साठी ओलांडल्यावर चार-पाच आजार कायम वस्तीला असताना, कधीही चक्कर येऊन पडणं, हा आजार असताना रात्रीची तब्येत बिघडल्यावर कसं, अशी माझी काळजी करून ‘कुणाला तरी सोबत ठेव’ असे सल्ले येत असतानाही मी एकटीच राहाणं, हा मी स्वीकारलेला चॉईस आहे. म्हणजेच बायचॉईस मी एकटी आहे, पण एकाकी नाही. मी कधीही ‘एकाकी’ असू शकत नाही. माझं ‘सोशल लाईफ’ खूप मोठं आहे. माझ्याजवळ करण्यासारखी खूप कामं आहेत. मी लिहिते, मी वाचते, मी कौन्सिलिंग करते, मी व्याख्यानांसाठी सतत भटकते. तशीही खूप भटकते. अगदी आठ-आठ दिवस एकटी महाराष्ट्रभर भटकून येते. त्या भटकण्यातूनच महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीचा माझा अभ्यास होतो. त्यातून माझ्या एका पुस्तकाची निर्मिती होते.

हे सगळं कशाचं द्योतक आहे? मी माझं एकटेपण एन्जॉय करते. मी पहिल्यांदा जेव्हा चार-पाच मित्रमैत्रिणी मिळून त्यात चंद्रमोहन कुलकर्णी, सरिता, राजीव तांबे  सोबत होते, आम्ही १० दिवसांची एक टूर काढली. कारने आम्ही चार जण वाट्टेल तिथे भटकलो. पुण्यातून सरळ आम्ही मध्य प्रदेशात पोचलो. देवास, इंदोर वगैरे करत करत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात सारीकडे फिरत फिरत १२व्या दिवशी परत आलो. मी १०-१२ दिवसांचा हा प्रवास त्यांच्यासोबत सातत्याने करेल की नाही, याची मलाच खात्री नव्हती. मी आधीच सांगितलेलं होतं, जिथं माझा मूड परत फिरण्याचा होईल, तेथून मी परत फिरेल. पण या ट्रीपमध्ये सर्वांनी एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस दिली. कदाचित म्हणूच किंवा या ग्रुपशी ट्युनिंग जुळलेलच होतं म्हणूनही असेल, पण मी ही ट्रीप एन्जॉय केली.

नंतर माझ्या सहा मैत्रिणींसह मी सर्व बुद्धकालीन स्थळं बघण्याचं ठरवलं. तशी आम्ही ट्रीप अरेंज केली. एकाला दुसरी, दुसरीला तिसरा असे करत करत आम्ही १९ लोक झालो. त्याही वेळी मी हेच जाहीर केलं. मी कुठूनही परत फिरू शकते. या ट्रीपमध्ये न पटू शकणारे काही मित्रमैत्रिणी होत्या, काही घटना घडल्या. कधी चिडचीड झाली, पण माझी स्पेस मी राखून ठेवली. माझं मन:स्वास्थ्य मी ढळू नाही दिलं. माझ्या मनाचं मॅनेजमेंट मी बरोबर केलं. मी त्यांच्यात राहूनही माझी मी जगू शकले.

नंतर नंतर तर आमचा भटक्यांचा एक ग्रुपच तयार झाला. त्यात काही पाच-सहा मित्रमैत्रिणी अगदी हवेहवेसे असले तरी काही फक्त प्रवासी असतात. आधीच ते समजून घेतलं की, त्या सर्वांमध्ये असूनही माझी मी एकटी असतेच असते. एकटी तर मी केवढी फिरते. एकटीनं कधीही; अगदी कधीही मनात आलं की, गाडी काढायची आणि एका दिवशी २००-२५० किमीचा प्रवास करून एखाद्या गावातल्या हॉटेलमध्ये थांबायचं. स्वच्छ हॉटेलातल्या स्वच्छ रूममध्ये दिवसभर नुसतं पडून राहू शकते, किंवा त्या शहरात भटकून येते, किंवा मित्रमैत्रिणींना जमवून  गप्पांचा फड जमवू शकते. किंवा एखादं प्रोजेक्ट घेऊन गेले असेल तर त्याचा फडशा पाडून येते.

‘आकांक्षा’ मासिकाच्या कितीतरी अंकांची तयारी, फोनाफानी मी अशी कुठून तरी केली आहे. करंट इश्यूची मोर्चेबांधणी अनेकदा माझी अशीच झाली. साहित्य संमेलनांचं, कार्यशाळांचं आयोजन मी एकटीनं एखाद्या हॉटेलातल्या खोलीत बसून केलं आहे. ‘विमुक्ता’ आणि ‘मुन्नी’चं कितीतरी लेखन मी असंच कुठेतरी पुढे नेलं आहे. अगदी ट्रेनमधल्या टू टायरमध्ये बसूनसुद्धा माझी ‘विमुक्ता’ पुढे सरकली आहे. पहाटे चार वाजता उठून अनेक प्रकल्प मी आखले आहेत. एकटीनं काम करून पुढे जाणं मला खूपच सोयीचं वाटतं. आपण आपल्या मनाचे मालक. याला काय वाटेल, तो काय म्हणेल याची पर्वा करत बसलो तर अनेक क्षण तुमच्या हातचे निसटूनच जातात. आता मी कुणाची फार पर्वा करत बसत नाही.

‘यू बिलीव्ह ऑन युवर सेल्फ. यू आर ओन्ली फ्रेंड्स ऑफ यू. गो अहेड. सक्सेस यूवर्स बेस्ट’, असं आमचे बा. क. कल्याणकर मला नेहमी म्हणायचे. वेळ कुणासाठी थांबत नसतो. मृत्यू कधी तरी येणारच. आणि तो कसाही येऊ शकतो. तुम्ही त्यावर काय नियंत्रण ठेवू शकता? कुणी म्हणतं ‘अगं, भलत्या वेळी तब्येत बिघडली तर निदान हाताशी कुणी असेल तर पटकन डॉक्टरला फोन करेल. तुला लगेच मदत मिळेल. पण मृत्यू आला की, तो कुणालाच जुमानत नाही. माझे वडील पहाटे गेले, तेव्हा आम्ही घरात १० जण होतो. कुणाला कळलेही नाही. माझा चुलत भाऊ गेला, तेव्हा त्याच्यापासून पाच फुटावर वहिनी उभ्या होत्या, शेजारच्याच खोलीत कार्डिऑलॉजिस्ट मुलगा होता आणि भाऊ ज्या खुर्चीवर बसला होता, त्याला लागूनच असलेल्या टेबलवर त्याचं औषध होतं. काहीच कामी नाही आलं. तिथेच कोसळला आणि तिथेच गेला. आईदेखत आमचा राजू अग्नीचा भक्ष्य ठरला. अख्खी डॉक्टरांची फौज तैनात असतानाही भाऊला कॅन्सरमुक्त नाही होता आलं.

त्यामुळे मृत्यूचं मला कधीच भय वगैरे वाटत नाही. आता तर नाहीच. ती माझी फेज कधीच संपली. आता माझ्या जाण्यानं माझी मुलं निराधार नाही होणार. त्यांचं त्यांचं माणूस आता प्रत्येकाजवळ आहे. आई कुठल्याही वयात नकोच असते जायला. माझी आई माझ्या पन्नाशीत गेली तरी मला पोरकेपण आल्यासारखं वाटत होतं. पण हा फिल वेगळा आणि सुरुवातीला माझ्या जाण्यानं माझ्या मुलांवर जी काय परिस्थिती उद्भवली असती, ते वेगळं. या दोहोतला फरक आज समजू शकते. एखादं माणूस आपल्यातून निघून जातं, तेव्हा आपण नक्कीच दु:खी होतो. कारण त्याची सवय झालेली असते आपल्याला. त्याचं सातत्य असतं आपल्या आजूबाजूला. पण सातत्य जेव्हा खंडीत होतं, तेव्हाच खरं तर ते पुन:श्च अस्तित्वात येण्याची संभावना असते ना.

आपल्या आठवणी, आपलं नवजीवन, आपले अनुभव, दु:खाचं गाठोडं न समजता ते त्यांच्या त्यांच्या दु:खातून मुक्त झालेत असं समजायचं. नाहीतर नकारात्मक विचार करत बसले असते तर ऐन बालपणात गेलेले वडील,  सर्वांत लाडका माझा भाऊ, मित्र ज्याच्याशी मी प्रत्येक गोष्ट  शेअर करू शकत होते, तो माझा लाडका राजू ऐन माझ्या तारुण्यात गेला. माझ्या पाठीशी सतत उभा असलेला, आणि भाऊ आहे तर अख्ख जग आपल्या हाती आहे हा विश्वास असलेला माझा मोठा भाऊ, आमच्या घराचा आधारवड  गेला, तेव्हा माझा मित्र गेला तेव्हा, कितीदा मी कोसळले असते. त्यांच्या मृत्यूनं मला निराशेनं घेरलं होतंच. पण समोर मुलं होती, संसारात असलेलं रोजचं चॅलेंज होतं. दु:ख करायला, त्याला आंजारायला, गोंजारायलाही वेळ हवा असतो ना! 

मृत्यूमुळे आपल्या वसतीला असलेलं एखादं नातं असं पुसून नाही टाकता येत. काही मृत्यू तर कणाकणानं आपल्याला उद्ध्वस्त करतात. पण शेवटी माझं मीच स्वत:ला सावरलं. यालाच ‘जीवन ऐसे नाव’ हे लक्षात घेतलं. आणि जाणारा प्रत्येक जण आपापल्या परी त्रस्त होता. भाऊ व्याधीनं त्रस्त होता. आई म्हातारपणानं, राजू प्रेमभंगानं. अशोक कॅन्सरनं. मृत्यूनं सुटलीत ना ती. मग आपण का ही दु:खाची गाठोडी अशी उरी धरून ठेवायची. जगणं शिकता आलं पाहिजे. आणि दु:खावर मातही करता आली पाहिजे. मृत्यू हा तुमच्या आयुष्यात येणारा एक अभिन्न भाग आहे. तो येणारच. त्याला हसत हसत स्वीकारायचं की नाईलाजास्तव हे आपलं आपल्याला ठरवायचं आहे. मात्र समाधानानं मृत्यू यावा, असं वाटत असेल तर याच आयुष्यात माणसानं माणसासारखं जगून घ्यायलाच हवं. काहीतरी असं करून की, गेल्यावर कुणी आपल्या नावानं बोटं मोडता कामा नये. आणि ते आपल्या हातात आहे.

मी तर माझ्या स्वत:च्या दुखावलेल्या, अपमानीत झालेल्या स्वाभिमानाला चिवट व लढाऊ वृत्तीनं आणि सकारात्मक ऊर्मीनं रसातळाला गेलेलं माझं आयुष्य पुन्हा एकदा रसरसून जगले. तो माझा हक्कच होता. दु:खाला कुरवाळत बसणं, त्याचे अति लाड करणं मला कधीच जमलं नाही.

थोडक्यात काय तर आता मृत्यूचं भय नाही वाटत. आणि मृत्यू येताना आपण एकटेच असू, या काळजीनं आज मी जे माझं एकटेपण उपभोगते, एंजॉय करते, ते त्या काल्पनिक भयानं कशाला घालवू? एकटी असताना मी मस्त मजेत असते. मला वेगवेगळे पदार्थ करण्याचाही उत्साह असतो. चार मित्रमैत्रिणींना घरी बोलवून खाऊ घालण्याचाही उत्साह असतो. कामात बदल करायचा की, ऊर्जा आलीच म्हणून समजा. अगदी वाचता वाचता कंटाळा आला की, साफसफाई करायला घ्यायची, केवळ पुस्तकांचं तासनतास मी निरीक्षण करत कपाटासमोर उभी राहते, माझ्याही नकळत.

आता फ्लॅटवर राहायला आल्यापासून बाग नसली तरी रोज माझ्या ४० कुंड्यांना गोंजारते, त्यांच्याशी संवाद साधते. ती फुलली की, मी आनंदी होते, ती कोमेजली की, मी दु:खी होते. माझ्याही मूडचा अदमास त्यांना येतो. मित्रांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारते. चांगलं काहीतरी वाचलेलं शेअर करते. पहाटे चार वाजतापासून उठलेली मी रात्री १० पर्यंतच्या माझ्यामाझ्या कामात व्यस्त असते. आनंदी आणि ऊर्जितही असते. झिम्म पावसात कधी एकटीच भटकून येते, कधी गॅलरीत खुर्चीवर बसून कॉफी पीत आवडतं पुस्तक वाचत राहते किंवा हलकासा गारवा सुरू झाला की, स्वत:ला शॉल लपेटून गादीवर लोळत आवडती कादंबरी दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदाही वाचू शकते. ‘बस, एक मस्त गरमा गरम कॉफी के साथ जिंदगी का ये अकेलापन भी बहुत अच्छे से मैं मेरे अंदर महसूस कर सकती हूँ.

मी माझ्यात माझं एकटेपण सामावून घेतलं आहे.

माझ्या या मूडला मॅच होईल असा एक शेर आहे माझ्या मुलाचा. आमचा शायर नील म्हणतो -

आज ना परवा है

अपने असीर का

हम आगोशी है पसंद मुझे

धूप मेरे आँगन में हो और...

और है पसंद हरतरफ खामोशी मुझे

चाय कि प्याली, या पढ़ने को

अमृता भी चलेगी

मेरे कमरे मे रौनक-ए-हस्ती                                                                  

है पसंद मुझे !!

(असीर - कैद, आगोशी - आलिंगन, रौनक-ए-हस्ती - अस्तित्वाची शोभा)  

कॉफी प्यायला सोबतच्या खुर्चीवर कुणीतरी सोबत असावं किंवा गच्च पावसात भन्नाट गाडी चालवताना शेजारच्या सीटवरून कुणीतरी स्टेअरिंगवर हात ठेवून म्हणावं, ‘अग, हळू जरा. कशी वेड्यासारखी गाडी चालवतेस. केवढा पाऊस कोसळतोय’. असलं जगण्याचं, तो फिल अनुभवण्याचं वय केव्हाच मागे पडलं. प्रेमाला वय वगैरे नसतं हे माहिती आहे मला. पण माझी ती मानसिकता खूप मागे पडली. हे मात्र माझ्यापुरतं खरंय.

गेल्या सहा महिन्यांपासून करोनाने जगात थैमान घातलं आहे. एक वेगळंच जग आपल्यापुढे आलं. आणखी वेगळं येणार आहे. लोक धास्तावले आहेत. अनेक लोक उद्ध्वस्त झालेत. संसार संपला, जगणं बदललं, कल्पनातीत प्रश्न पुढे आले. वृद्धांची किंवा आजारी लोकांची तर घाबरगुंडी उडाली आहे. पण मी माझं मन स्वस्थ ठेवलं आहे. माझ्या मुलांवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. माझ्या प्रकाशनव्यवसायावर परिणाम झाला आहे. दोन्ही मुलांचे हॉटेल व्यवसाय बंद पडले आहेत. पण मी नागपुरातून हजारोंच्या संख्येनं रोज जाणारे मजूर बघितले आहेत, बेघर झालेले लोक पाहिले आहेत, गर्भावस्थेत ४००-५००-१००० किमी अंतर प्रवास करून जाणाऱ्या स्त्रिया पाहिल्या आहेत. त्यांना जमेल तशी मदतही केली. ‘त्यांच्यापेक्षा आपण किती सुखी’ हा मंत्र मी स्वत:शी संवादून घेतला आहे. म्हणूनच ना तर मी नैराश्यात गेले, ना मुलांना जाऊ दिलं. त्यांचं मन:स्वास्थ्य जपणं आजच्या घडीला माझं प्रथम कर्तव्य मी समजते.

सगळ्या जगाचं जे होईल, तेच आपलंही होणार आहे, आणि याही अनुभवातून आपण तावूनसुलाखून सुखरूप बाहेर पडणार आहोत, हा विश्वास मला तर आहेच, पण मी त्यांनाही देते. याहीपेक्षा कठीण काळातून आम्ही गेलो आहोत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘ते’ घर सोडलं तेव्हा माझ्याजवळ काय होतं, तर केवळ प्रचंड इच्छाशक्ती आणि काहीतरी करण्याची जिद्द. माझी आकांक्षा फार मोठी होती. आणि माझं आवडतं एकटेपण माझ्या सोबत होतं. याच दोन गोष्टींच्या भरवशावर माझ्या प्रिय एकटेपणाला घेऊन मी आयुष्याचा प्रवास सुरू केला होता. खूप काही करण्याची आकांक्षा माझ्या मनात चेतली होती. त्याला मी रोज माझ्या जिद्दीची हवा देऊन विपरीत परिस्थितीतही सर्व अडथळ्यांना पार करत जिवंत ठेवलं. तक्रार करत बसण्यापेक्षा आकाशात उंच भरारी मारण्याची संधी या एकटेपणानं मला मिळाली आहे, त्या संधीचं सोनं का म्हणून करून घेऊ नये? संधी एकदाच मिळत असते. त्याचा फायदा मी करून घेतला आणि मी योजिलेली अनेक कामं मार्गी लावली.

आज मला ते समाधान आहे. या समाजातल्या काही कामांमध्ये कणभर का होईना माझा हातभार लागला आहे. जेव्हा मी ‘सोशल लाइफ’ जगत असते, तेव्हा मात्र मी माझ्या एकटेपणाचे चोचले पुरवत बसत नाही. माझ्या स्वभावातली ही विसंगती अनेकदा मलाच आश्चर्यचकीत करते. एकांत प्रिय असूनही मला अनेकदा आजूबाजूला चार लोकही हवी असतात. गर्दीतल्या कार्यक्रमांना मी हजेरी लावू शकते. मोठमोठे कार्यक्रम आयोजित करू शकते. अडचण असेल तर माझी खोलीही मी कुणासोबत शेअर करू शकते. पण जेव्हा आतून मला एकटंच राहावसं वाटतं, तेव्हा मी माझ्या मुलालाही ‘आता तू खोलीबाहेर जा’’ हे सांगू शकते. कितीही प्रिय मैत्रीण असेल तरी त्या महफिलमधून मी माझ्या घरात येऊन माझ्यातच रमू शकते. पण हे सारं करत असताना मी कुणाचा अपमान होईल, असं वागणं कटाक्षानं टाळते. कारण माझं एकटेपण जपण्याचा जर मला अधिकार आहे, तर दुसऱ्यांना त्याची झळ पोचणार नाही, याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, याचं मला कायम भान असतं.

खुर्सी पर बैठकर खामोश-ए-अंजूमन का लुफ्त लेती हूँ

मेरे दामन में जो नशात-ए-पथ है

उसी को खुल्द मानती हूँ

मै क्या जुरअत-ए-फरयाद करूंगी

खल्वत-मे-शहपर- हसरत मांगती हूँ!

(अंजूमन - मैफल, नशात - हर्श, आनंद, खुल्द - स्वर्ग, जुरअत-ए-फय्याद - तक्रार करण्याची हिंमत, खल्वत - एकांत, शहपर - ज्याच्या साह्याने पक्षी उडतो तो मोठा पंख, हसरत - आकांक्षा)

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा -

माणूस वाईट नसतो, तर तो घडवणारी परिस्थिती वाईट असते, हा विचार करायला ही कादंबरी भाग पाडते

..................................................................................................................................................................

लेखिका अरुणा सबाने कादंबरीकार, प्रकाशिका, संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.     

arunasabane123@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......