सर्वसामान्य जनतेचे शिक्षण, आरोग्य आणि जीवनमूल्यांसाठी त्यांच्या बाजूने कसे उभे राहावे, हे जगाने क्युबाकडून शिकण्यासारखे आहे!
पडघम - विदेशनामा
संजय पांडे
  • क्युबाचा नकाशा आणि ध्वज
  • Mon , 31 May 2021
  • पडघम विदेशनामा कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus क्युबा Cuba सोबेराना-२ Soberana-2 अब्दाला Abdala मंबिसा Mambisa

क्युबा हा भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत फक्त साडेतीन टक्के जमीन (१०९,८८४ वर्ग किमी) आणि फक्त १.१० कोटी, म्हणजे दिल्लीइतकी लोकसंख्या असलेला छोटासा कम्युनिस्ट देश आहे. हा देश आज करोनाच्या पाच लसी तयार करणाच्या मार्गावर आहे. जगात सर्वांत मोठी लोकसंख्या, क्षेत्रफळ, अर्थव्यवस्था व सैन्यशक्ती असलेल्या देशांना जे जमले नाही, ते या छोट्या देशाने साध्य केले आहे. स्वतःच्या लसी विकसित करून क्युबाने आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि बायोटेक क्षेत्रातली शक्ती सर्वांना दाखवून दिली आहे.

तसा हा खूप गरीब देश आहे. तरीही तिथे औषधनिर्मिती किंवा किंवा अन्न विकत घेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पैशांमधला एकही पैसा करोनावरील लस तयार करण्यासाठी वळवण्यात आला नाही. इतर प्रकल्पांसाठी त्यांच्याकडे असलेली सर्व संसाधने सर्जनशील पद्धतीने या दिशेने वळवण्यात आली. तिथल्या वैज्ञानिकांना फारच कमी संसाधनांमध्ये काम करण्याची सवय आहे, ती या वेळीही उपयोगी पडली.

करोना आणि क्युबा

मागच्या वर्षी करोना आला, तेव्हा क्युबाच्या २८,०००हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी देशातल्या ९० लाख म्हणजेच जवळपास संपूर्ण लोकसंख्येपर्यंत पोहोचले. देशाच्या सीमा बंद केल्या गेल्या आणि पृथक्करण केंद्रे आणि चाचणी व शोध काढण्याची एक प्रभावी प्रणाली स्थापन केली गेली. देशाचा जीडीपी ११ टक्क्यांनी घसरला. दरवर्षी येणारे ४० लाख पर्यटक रोडावून फक्त ८० हजारावर आले. त्यामुळे अगोदरच पर्यटनावर अवलंबून असलेली कमकुवत अर्थव्यवस्था गडगडली. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे आर्थिक उपाययोजना करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे करोना या देशाला चांगलाच महागात पडला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांकडून करोना लस खरेदी करणे किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या लस सामायिकरण उपक्रमात क्युबाला भाग घेता आला नाही.

मात्र तरीही करोनाशी झुंज देत असताना आणि देशभर अन्न व औषधांच्या गंभीर टंचाईला तोंड देत असलेल्या क्युबाने करोनाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी तब्बल १३ विविध औषधे तयार केली आहेत. करोनावरील दोन लसी तर अंतिम टप्प्यात आहेत. गेल्या महिन्यात हवानाच्या फिन्ले इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी जाहीर केले की, त्यांची ‘सोबेराना-२’ ही लस अत्यंत प्रभावी आहे आणि ती वैद्यकीय चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे. जर चाचण्या यशस्वी झाल्या, तर क्युबा स्वतःची करोना लस विकसित करणारा एकमेव लॅटिन-अमेरिकन देश बनेल.

‘सोबेराना-२’ यशस्वी झाल्यास देशाचे लसीकरण झाल्यानंतर क्युबाने कमी किमतीत ती निर्यात करण्याची योजना आखली आहे.

लसींच्या नावात काय आहे?

क्युबाचा इतिहास आणि चिवटपणा या लसींच्या नावातही दिसून येतो. त्याच्या दोन लसींचे ‘सोबेराना-१ व २’ असे नाव आहे. या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘सार्वभौमत्व’ असा होतो. पहिल्या सोबेराना चाचणीची घोषणा केल्यानंतर लोकांना हे नाव इतके आवडले की, ते बदलणे अशक्य झाले. क्युबाच्या क्रांतीचा नायक जोस मार्ती यांनी लिहिलेल्या काव्यानंतर दुसऱ्या लशीचे नाव ‘अब्दाला’ असे ठेवण्यात आले. स्पॅनिश वसाहतवादाविरुद्ध लढा दिलेल्या एका क्युबन क्रांतिकारकाच्या नावावरून पाचव्या लशीचे नाव ‘मंबिसा’ असे ठेवण्यात आले आहे. ‘अब्दाला’ व ‘मंबिसा’ या दोन्ही लसी नाकातून स्प्रेच्या माध्यमातून घ्यायच्या आहेत. ‘सोबेराना-२’ आणि ‘अब्दाला’ चाचणीच्या तिसर्‍या व शेवटच्या टप्प्यात आहेत. गेल्या महिन्यात ‘सोबेराना-२’साठी वैद्यकीय चाचण्यांचा अंतिम टप्पा सुरू झाला. या लसीच्या शेवटच्या चाचणीत ४४,०००पेक्षा जास्त लोक भाग घेत आहेत. क्युबातील १,२४,००० आरोग्य सेवा कामगारांना या पूर्वीच ‘अब्दाला’ लस देण्यात आली आहे. इराण आणि व्हेनेझुएलासह संबंधित देशांमध्येही या लसीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘सोबेराना-२’ आणि ‘अब्दाला’ या दोन्ही लसी पारंपरिक संयुग्मक लसी आहेत. ज्याचा अर्थ असा होतो की, करोना व्हायरस स्पाइक प्रोटीनचा एक भाग कॅरिअर रेणूसह एकत्रित केला जातो. त्यामुळे कार्यक्षमता आणि स्थिरता यांना चालना मिळते. त्यामुळे शीतगृहाच्या आवश्यकतेशिवाय कित्येक आठवडे या लसी टिकून राहतील आणि ४६.४ डिग्री तापमानात साठवल्या जाऊ शकतील. असे झाले तर ते गरीब उष्ण कटिबंधीय देशांसाठी वरदान ठरेल. पाश्चिमात्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांकडून लस खरेदी करण्यासाठी संघर्ष करणार्‍या विकसनशील देशांना हा व्यवहार्य पर्याय ठरू शकेल.

क्युबाच्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वास असल्याने काही देशांनी १० कोटी डोस खरेदी करण्यासाठी संपर्क साधला आहे. युनायटेड स्टेट्स आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये निर्मीत लशी परवडणार्‍या नसल्याने अनेक गरीब देश आता क्यूबाकडे वळत आहेत. मेक्सिको आणि अर्जेंटिनाने क्युबाच्या लसींमध्ये रस दर्शवला आहे. सध्या दरवर्षी एक कोटी लसी तयार करण्याची क्युबाची क्षमता आहे. व्हेनेझुएला आपल्या देशातच ‘अब्दाला’ लस तयार करेल, असे सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर केले.

ऐतिहासिक क्युबन क्रांती

एकेकाळी अमेरिकेसाठी अय्याशी आणि लूटीचा अड्डा बनलेल्या क्युबामध्ये फुलजेनसिओ बटिस्टा या हुकूमशहाची सत्ता होती. फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा या क्रांतिकारकांनी जुलै १९५३ ते डिसेंबर १९५८ या पाच वर्षांच्या दरम्यान या हुकूमशाहीविरुद्ध सशस्त्र बंड करत बतिस्ताला हद्दपार केले. मार्क्सवाद–लेनिनवादाच्या क्रांतिकारक विचारसरणीने प्रभावित या क्रांतिकारकांनी आपल्या पक्षाला ऑक्टोबर १९६५मध्ये ‘क्युबा कम्युनिस्ट पार्टी’ असे नाव दिले. तो भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी रशियादरम्यानचा शीतयुद्धाचा काळ होता. अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यापासून क्युबा फक्त १६५ किमीच्या अंतरावर आहे. शक्तिशाली अमेरिकेच्या नाकावर टिच्चून क्रांती झाल्याने क्युबा त्याच्या मर्मस्थानी झालेली जखम बनलेला आहे.

क्युबा बर्बाद करण्यासाठी निर्बंध

क्रांतीनंतर महाकाय अमेरिकेने या देशावर प्रतिबंधांचे हत्यार उपसले. तेथील उसाचे मळे, कारखाने, शहरे यांच्यावर बॉम्ब हल्ले करण्यात आले. फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांची हत्या करण्यासाठी सीआयएने शक्य होते ते सर्व काही केले. अमेरिकन व्यावसायिकांना क्युबामध्ये व्यापार करण्यास प्रतिबंधित करण्याक आले. शस्त्रांच्या विक्रीवर बंदी घातली. ऑक्टोबर १९६०मध्ये अमेरिकेन सरकारने क्युबाने गुडघे टेकावे म्हणून तेल निर्यात करण्यास नकार दिला. क्युबा सोव्हिएत रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबित झाला, तेव्हा क्युबामधील अमेरिकन कंपन्यांनी ते कच्चे तेल परिष्कृत करण्यास नकार दिला. शेवटी क्युबाने अमेरिकन-मालकीच्या ‘क्यूबान ऑईल रिफायनरीज’चे राष्ट्रीयकरण केले. त्यामुळे चवताळलेल्या अमेरिकेने क्युबामध्ये होणाऱ्या जवळपास सर्व निर्यातीवर बंदी घातली. शिवाय क्युबाबरोबर इतर देशांनी खाद्यपदार्थांचा व्यापार केल्यास त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्याची धमकी दिली आणि काही ठिकाणी अंमलातही आणली.

अमेरिकनच्या कंपन्या किंवा अमेरिकन भागीदारी असलेल्या कंपन्यांनी क्युबामध्ये आपापल्या जोखमीवर व्यापार करावा, असे जाहीर करण्यात आले. तथापि सर्व आयातींसाठी क्युबाला रोख रक्कम देणे बंधनकारक करण्यात आले. पत किंवा कर्जाची परवानगी नाकारण्यात आली. दोषी व्यक्तींना १० वर्षांच्या बंदिवासाची शिक्षा जाहीर करण्यात आली. १९६२ साली जॉन एफ. केनेडी यांच्या अध्यक्षीय काळात व्यापार निर्बंधांची व्याप्ती अजून कडक करण्यात आली. क्युबात बनलेल्या उत्पादनांवर बंदी होतीच, पण आता ती वाढवून क्युबाबाहेर एकत्रीकरण (असेंबल) करून बनवण्यात आलेल्या सर्व क्युबन उत्पादनांवरही निर्बंध घालण्यात आले. क्युबाला मदत करणार्‍या देशांना प्रतिबंधित करण्यात आले. कॅनेडीने अन्न आणि औषधांची विना-अनुदानित विक्री वगळता सर्व व्यापारांवर बंदी घातली गेली. १९६३मध्ये प्रवासी निर्बंध घातले आणि अमेरिकेत क्युबाची मालमत्ता गोठवली गेली. क्युबामध्ये ये-जा करणे गुन्हा ठरवल्याने क्युबाचे पर्यटन मोडकडीस आले.

या सर्व काळात क्युबा सोव्हिएत रशियाच्या मदतीने तग राहिला, पण नंतर तो कोसळला. तेव्हा क्युबाला मोठा धक्का बसला. क्युबाचा जीडीपी ३४ टक्क्यांनी घसरला आणि व्यापार निम्मा झाला. रशियासोबतची आयात-निर्यात ६० ते ७५ टक्क्यां घसरली. परिणामी अर्थव्यवस्था भयंकर कोंडीत सापडली. मात्र या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या अमेरिकेच्या हाती तेव्हाही काही लागले नाही. फिडेल कॅस्ट्रो यांच्यावर क्युबन जनतेचा विश्वास निढळ राहिला. १९९२मध्ये क्युबामध्ये व्यवसाय करणार्‍या इतर देशांमधल्या परदेशी कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करण्यापासून रोखून दंड आकारला जाऊ लागला. १९९६मध्ये या कायद्यात अजून कठोरता आणून क्युबासोबत व्यापार करण्यार्‍या इतर देशांच्या कंपन्यांना अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हा कायदा रद्द करणे ओबामा यांनाही जमले नाही. हे निर्बंध सागरी वाहतुकीसदेखील लागू होते. कारण क्युबा बंदरांवर थांबून आलेल्या जहाजांना अमेरिकन बंदरांवर सहा महिन्यांपर्यंत गोदीत घेण्याची परवानगी नाही. हे निर्बंध २००० साली थोडेसे सैल झाले, तेव्हा ‘मानवतेच्या’ कारणास्तव क्युबाला शेतीमाल व औषध विक्रीस सीमित प्रमाणात परवानगी देण्यात आली. मात्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत ६० वर्षे क्युबाची सामग्री विक्री करणार्‍या कंपन्या घाबरल्या आणि उत्तर अमेरिकेबरोबरचा आपला व्यापार बंद पडण्याची भीती असल्याने त्यांनी क्युबासोबतचा व्यवसाय बंद केला. केवळ २०२० या वर्षातच अमेरिकेने क्युबावर १००हून अधिक नवीन निर्बंध लादले आहेत.

धडपड आणि प्राथमिकता

अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे क्युबाच्या आर्थिक विकासाला खीळ बसली. त्यातून मार्ग काढण्यासाठी कॅस्ट्रो यांनी सार्वजनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत केली. खासगी संस्थांवर बंदी घातली गेली. शालेय व उच्चशिक्षण मोफत आणि अनिवार्य करण्यात आले. क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारने ठामपणे सार्वत्रिक आरोग्यसेवा ही राज्य नियोजनाची प्राथमिकता ठरवली आणि त्याचा विस्तार ग्रामीण भागांपर्यंत करण्यात आला. क्युबामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य-नियंत्रित अर्थव्यवस्था व समाजवादी तत्त्वांचे पालन करण्यात येते. उत्पादनाची बहुतेक साधने सरकारच्या मालकीची आणि सार्वजनिक संपत्ती म्हणून चालवली जातात. ७५ टक्के रोजगार सार्वजनिक क्षेत्रात आहे.

क्युबाचे माजी नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी शिक्षण, आरोग्य क्षेत्र सरकारच्या हातात ठेवून सर्वांना मोफत उपलब्ध करून दिले. अमेरिकेच्या बंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांतून मार्ग काढण्याच्या धडपडीतून क्युबात बायोटेक्नॉलजीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. देशात बहुतांश औषधे व लस निर्माण करू शकतील, अशा अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान आणि इम्युनोलॉजी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. त्याशिवाय क्युबाकडे पर्यायही नव्हता.  

क्रांतीनंतरच्या काळातली वैद्यकीय आव्हाने

१९५९ साली क्रांती झाल्यानंतर सरकारच्या नवीन उपायांमध्ये प्रणालीच्या सर्व स्तरांकरता एकात्मिक नियामक चौकट तैयार करण्यात आली. त्या वेळी वैद्यकीय संघटना सर्वांत शक्तिशाली होत्या. राजकीय आणि आर्थिक या दोन्ही कारणांमुळे या क्षेत्राच्या मनाप्रमाणे कायदे बनत असत. बदल व क्रांतिकारी विचारांशी असहमत असल्याने आणि पूर्वीसारखा गडगंज नफा कमवता येणार नाही, हे लक्षात आल्याने क्युबातले निम्मे उच्च प्रशिक्षित डॉक्टर्स देश सोडून गेले. सरकारी नियमन नसल्याने तोपर्यंत परदेशी कंपन्या त्यांच्या उत्पादनांसाठी हव्या त्या किमती निश्चित करत होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील प्रयोगशाळा, किरकोळ विक्रेते आणि त्यांच्याशी संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांची साखळी या कामात अग्रेसर होती. पण क्रांतीनंतर सरकारकडून बंधने घातल्याने अनेक विदेशी कंपन्यांनी काढता पाय घेतला. अमेरिकेशी होत असलेल्या संघर्षामुळे बर्‍याच कंपन्या बंद पडल्या. कर्करोग संस्था (१९२९) आणि ट्रॉपिकल मेडिसिन संस्था (१९३७) अशा संशोधन संस्थांचे प्रमुख क्रांतीनंतर वैचारिक मतभेदांमुळे देश सोडून गेले. १९५९ ते १९६७पर्यंत ६० लाख लोकसंख्येच्या क्युबातल्या ६३०० डॉक्टर्सपैकी ३००० डॉक्टर्स देश सोडून गेले. वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती केविलवाणी झाली. मागे उरले ते फक्त एक मेडिकल कॉलेज आणि २२ वैद्यकीय प्राध्यापक शाळा. एक अगदी लहान तज्ज्ञांचा गट उरला होता. त्यांनी क्युबामधील वैज्ञानिक अवकाश पुन्हा तयार करण्यास मदत केली.

वैचारिक बांधिलकीतून आव्हान पेलण्यास सुरुवात

१९६०मध्ये शिक्षण व आरोग्य क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण झाले. क्रांतीनंतर अमाप नफ्याचे केंद्र असलेले खाजगी दवाखाने-रुग्णालयांमध्ये सरकारने हस्तक्षेप करत वैद्यकीय शिक्षण बदलण्यास प्रोत्साहन दिले. सरकारने आपले लक्ष्य सार्वजनिक गुंतवणुकीतून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य प्रणाली आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देताना प्राधान्यक्रमाने प्रतिबंधक औषधांवर केंद्रित केले. वैद्यकीय पदवीधरांना ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सुविधा व सेवा देण्यासाठी आणि खासगी प्रॅक्टिसमध्ये भाग न घेण्यासाठी अभ्याक्रमातूनच प्रशिक्षित करण्यात आले. नवीन खाजगी दवाखाने उघडण्यास मनाई केली गेली आणि १९७०पर्यंत जवळपास सर्व खाजगी रुग्णालये सार्वजनिक मालकीची करण्यात आली. सार्वत्रिक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सहकारी तत्त्वावर दवाखाने-रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. काहींनी खासगी क्लिनिकमध्ये जाण्याचा किंवा चांगल्या-कमाईच्या पदांवर जाण्याचा निर्णय घेतला, परंतु वैचारिक प्रशिक्षणामुळे बहुतेकांनी नागरी किंवा दुर्गम ग्रामीण भागात सेवा देण्याचे ठरवले.

क्रांतीने भारावलेल्या अनेकांनी चांगले वेतन आणि अधिक आरामदायक जीवनाला तिलांजली दिली. याचे श्रेय अर्थातच शोषणमुक्त व समानतेवर आधारित साम्यवाद-समाजवादाच्या विचारधारेला द्यावे लागेल. क्युबाने ज्ञान सामायिकरण आणि सहकार्याचे मुक्त वातावरण तयार केले. एका केंद्रीकृत, देशव्यापी प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात वेळ आणि पैसा दोनही वाचवण्यात यश मिळवले. ही ‘केंद्रीकृत’ पद्धत म्हणजे सर्वांना एकसारखी वैद्यकीय सुविधा मिळण्याचे नियोजन.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

याव्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केल्याने आरोग्य आणि रोगाच्या नमुन्यांविषयी समुदाय-आधारित माहिती संकलित आणि संश्लेषित केली जाऊ लागली. हा डाटा पुढे मोठ्या प्रकल्पांसाठी उपयोगी पडला. क्युबाची सर्वसमावेशक, एकात्मिक राष्ट्रीय वैद्यकीय रेकॉर्ड सिस्टम हे ठरवते की, समाजात सर्वांत मोठा आरोग्याचा धोका कोठे आहे. त्यामुळे सरकार अधिक कार्यक्षमतेने संसाधनांचे वाटप करू शकते. या संरचनेमुळे औषधांचा खर्चदेखील कमी करता आला, कारण वैद्यकीय चाचण्यांमध्ये माहिती-संमती नोंदणीला वेग मिळाला. त्यातून औषध आणि उपचारांच्या विकासाची एक पद्धत तयार होत गेली. सरकारने हेतुपुरस्सर प्रणालीची आखणी पुढील संस्थात्मक शिक्षण आणि सामाजिक कार्यक्षमतेसाठी केली.

यशाच्या कथेचा पाया रचला, तो सरकारच्या नियोजनबद्ध इच्छाशक्तीने. गंभीर आर्थिक परिस्थिती असूनही नागरिकांसाठी उच्चशिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनाच्या बाजूने ती खंबीरपणे उभी राहिली. परिणामी नावीन्यपूर्ण, जागतिक-स्तरीय उत्पादनांबद्दलचे ज्ञान आत्मसात करण्याचा आणि त्यावर संशोधन व सुधारणा करण्याचा उत्साह वाढत गेला. नव्या संस्था बांधण्यात आल्या. या अथक प्रयत्नांना १९८०पासून फळे लागायला सुरुवात झाली. वैद्यकीय संशोधनाचे एकत्रीकरण सरकारच्या सार्वजनिक आरोग्य सेवा धोरणात करण्यात आले.

क्युबा हा कडक आर्थिक निर्बंधांना भीक न घालता धीटपणे त्याच्या सामना करणारा संपूर्ण राज्य-नियंत्रित अर्थव्यवस्था (अगदी अलीकडेपर्यंत) कम्युनिस्ट-समाजवादी देश आहे. क्रांतिपूर्व काळी हा देश औषध व आरोग्य यंत्रणांसाठी ज्या प्रकारच्या व्यवस्थेवर अवलंबून होता, त्यात परदेशी सहाय्यक कंपन्या ५० टक्के बाजारावर नियंत्रण ठेवत. उर्वरित ५० टक्क्यांपैकी २० टक्के आयातदारांच्या आणि ३० टक्के स्थानिक उत्पादकांच्या हाती होता. सरकारने या क्षेत्रात उतरण्यापूर्वी वैद्यकीय उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात न्यूनगंडात होता. ६०च्या दशकात सरकारने खासगी स्थानिक उत्पादकांचे अधिग्रहण केले आणि परदेशी उत्पादनांची आयात कमी केली. १९७०च्या दशकात सरकारने फार्मास्युटिकल उत्पादन प्रकल्पात पहिली गुंतवणूक केली. सुरुवातीला पश्चिम आणि पूर्व युरोपातून झालेल्या औषधांच्या खरेदीने हे प्रयत्न सुरू झाले आणि नंतर जैवतंत्रज्ञान आले.

क्यूबाच्या बायोफार्मा क्षेत्राची सुरुवात

क्युबाचा बायोफार्मा उद्योग गेल्या चार दशकांत वेगाने विकसित झाला आहे. त्यातून क्युबाच्या शास्त्रज्ञांची संसाधनात्मक समज व वैचारिक प्रतिबद्धता दिसून येते. १९६५मध्ये सेंट्रो नासिओनाल डी इन्व्हेस्टिगेशन्स सिन्टिफॅन्स (सीएनआयसी) ही संस्था स्थापन झाली. क्युबामधील औषध उद्योगातील अग्रगण्य लोकांनी त्यांचे पहिले वैज्ञानिक प्रशिक्षण सीएनआयसीमध्येच घेतले. त्यात बायोमेडिकल संशोधनात स्वत:ला समर्पित करण्याच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नफा न घेता काम करणार्‍या डॉक्टरांचा एक चमूही होता. सीएनआयसीने केमिस्ट आणि भिन्न वैशिष्ट्यांचे अभियंतेदेखील सोबत घेतले. पदवीधर विद्यार्थी किंवा संशोधक असलेल्यांची आकर्षक मोबदला आणि प्रशिक्षण देण्याची मागणी नव्हती, तर केवळ विज्ञानाची आवड असणारी आणि ही जबाबदारी पार पाडण्याच्या कौशल्यानुसारच सीएनआयसीमध्ये निवड करण्यात आली होती. पहिल्या वर्षी प्रशिक्षण घेण्यासाठी केवळ १३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एका शास्त्रज्ञाने प्रवेश घेण्यापूर्वी ६०० क्यूबन पेसोचे वेतन नाकारले आणि मायक्रोबायोलॉजी विभागात केवळ २०० पेसोवर करायला सुरुवात केली.

सीएनआयसी ही पदव्युत्तर शिक्षण संस्था उच्चस्तरीय वैज्ञानिक तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती. तिचे पहिल्या काही वर्षांचे मुख्य लक्ष्य तरुण वैद्यकीय पदवीधरांचे विज्ञान आणि गणिताचे ज्ञान वाढवणे आणि त्यांना संशोधन कार्यात प्रोत्साहित करणे हे होते. त्यासाठी सीएनआयसीने क्युबा आणि परदेशी प्राध्यापकांनी शिकवलेल्या अनेक अभ्यासक्रम सुरुवात केले. ते केल्यानंतर अनेक तरुण संशोधकांनी पाश्चात्य आणि पूर्व युरोपियन देशांमध्ये अभ्यास करण्यासाठी पदव्योत्तर शिष्यवृत्ती मिळवली. ज्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रातील आधुनिक संशोधनाची संधी मिळवता आली. पाश्चर इन्स्टिट्यूट, हार्वर्ड विद्यापीठ, हायडेलबर्ग विद्यापीठ आणि ज्यूरिख विद्यापीठ यांसारख्या संस्थांमध्ये सीएनआयसीचे अनेक संशोधक दाखल झाले. विचारधारेवरील निष्ठा आणि देशप्रेम यामुळे त्यांनी परदेशातल्या संधी नाकारून परत येऊन क्युबात अनुवांशिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा पाया रचला. तिथून क्युबाच्या बायोटेक उद्योगाची सुरुवात खर्‍या अर्थाने झाली.

१९७०-७५च्या दरम्यान सीएनआयसी ही एक बहु-विभागीय संस्था रसायन आणि जैविक प्रयोगात्मक संशोधनाचे केंद्र बनली. क्युबाच्या इतर वैज्ञानिक संस्थांची ती जननी ठरली. उदाहरणार्थ, १९७८च्या सुरुवातीच्या काळात सीएनआयसीच्या सूक्ष्मजीव आनुवंशिक विभागातील संशोधकांना जेनेटिक पुनर्सन्योजना(recombination)च्या फायद्यांची माहिती होती आणि ते आधीपासूनच सूक्ष्मजीवांच्या अनुवंशशास्त्रावर आणि आण्विक (मॉलिक्यूलर) जीवशास्त्रावर काम करत होते. सोप्या भाषेत यात पुनर्संचयनात (रिकोंबिंनेशन) विविध जीवांकडून आनुवंशिक सामग्रीचे मिश्रण (किंवा संयोजन) करून नवीन नवीन अनुवांशिक सामग्री (डीएनए रेणू) तयार करणे समाविष्ट आहे. १९८६मध्ये यू.एस. आधारित बायोटेक्नॉलॉजी कंपनी चिरॉनने ‘हेपेटायटीस बी लस’ मिळवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. त्याच वर्षी क्यूबाने ‘रीकोम्बिनंट’ ही लस स्वस्त पद्धतीने विकसित केली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

१९६६मध्ये सीएनआयसीमध्ये तयार केलेले एक छोटे परंतु प्रभावी न्यूरोफिजियोलॉजी युनिट १९९० मध्ये क्युबाचे न्यूरोसायन्स सेंटर बनले. या केंद्राने परिमाणात्मक पद्धतशीने दोष किंवा समस्या ओळखण्यासाठी मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांचे विश्लेषण करणारी एक आरोग्य प्रणाली बनवली. क्युबाच्या बायोफार्मा उद्योगास केंद्रबिंदू ठेवून १९९०च्या दशकापासून सीएनआयसीने उत्पादनांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले. ती संकल्पित भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण, परवाना आणि सह-विपणन करारांच्या स्वरूपात काम करू लागली.

‘वेस्ट हवाना बायोक्लस्टर’ म्हणून ओळखले जाणारे ‘सायंटिफिक पोल’ अधिकृतपणे १९९२मध्ये तयार केले गेले. १९८०च्या दशकात अमेरिकेतल्या पहिल्या कर्करोग रुग्णालयाचे अध्यक्ष ऑन्कोलॉजिस्ट रिचर्ड ली क्लार्क यांनी उत्तर अमेरिकन प्रतिनिधींसमवेत क्युबाचा दौरा केला आणि ते तेथील शास्त्रज्ञांनी इंटरफेरॉनवर केलेले संशोधन पाहून थक्क झाले. त्यानंतर लवकरच क्लार्कने त्याच्या रुग्णालयात क्युबातील दोन शास्त्रज्ञांना बोलावून आपले संशोधन व कौशल्य सामायिक केले. क्युबाच्या संशोधकांनी मानवी पेशींपासून इंटरफेरॉन स्वतंत्रपणे वेगळे काढण्याचा अभ्यास डॉ. कारी कॅन्टेल यांच्या हेलसिंकीस्थित प्रयोगशाळेमध्ये केला. तिथे ते मोठ्या प्रमाणावर इंटरफेरॉनचे पुनरुत्पादन कसे करावे हे शिकले. परत आल्यावर त्यांनी क्युबामध्ये इंटरफेरॉन तयार करण्यासाठी हवानाच्या एका छोट्या घरात प्रयोगशाळा स्थापन केली. त्यात ते १९८१मध्ये यशस्वीही झाले. मात्र हे उत्पादन कर्करोगाविरुद्ध ‘वंडर ड्रग’ असल्याचे सिद्ध झाले नाही, परंतु त्याऐवजी डेंग्यू तापावर खूप फायदेशीर ठरले. १९८०च्या दशकात क्युबात डेंगी आजाराने थैमान घातले होते.

सरकारच्या धोरणांमुळे १९८१मध्ये बायोलॉजिक फ्रंट आणि १९८२मध्ये सेंटर फॉर बायोलॉजिकल रिसर्च यांसारख्या नवीन आंतरशास्त्रीय कार्य गटांद्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक लहान पायलट प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली. तेव्हा संयुक्त राष्ट्राने विकसनशील देशांमध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या हस्तांतरणासाठी ‘औद्योगिक विकास संघटना’ (UNIDO) या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. क्यूबाने रिक्त स्थानासाठी अर्ज केला होता, परंतु ती जागा भारताला मिळाली. पुढे जाण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या क्यूबन सरकारने नंतर सीमित संसाधनांनी स्वत:ची संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला.

१९८६पर्यंत क्युबाने सीआयजीबी (सेन्ट्रो डी इंजेनिरिया जेनिटिका वा बायोटेक्नोलॉजी)चे उद्घाटन केले. ती आता तेथील सर्वांत उल्लेखनीय बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या संस्था सुरू झाल्या. १९८७मध्ये निदान प्रणालींचे उत्पादन आणि व्यावसायीकरण करण्यासाठी इम्युनोसे सेंटर बनवले गेले. १९९१मध्ये फिनले इन्स्टिट्यूट अधिकृतपणे सुरू झाली आणि १९९४मध्ये सेंटर फॉर मॉलिक्यूलर इम्युनोलॉजी. या संस्थांनी क्युबाला कोट्यवधी डॉलर्स किमतीची बायोफार्मास्युटिकल उत्पादने विकसित करण्यात व विकण्यास मदत केली.

विशिष्ट औषधांच्या यशामुळे उत्साहित झालेल्या क्युबाने बायोटेक क्षेत्रात अजून प्रगती करत बरीच नवीन औषधे आणि लसी तयार केल्या आहेत. वर उल्लेखलेल्या फुप्फुसाचा कर्करोग आणि एचआयबी लसींव्यतिरीक्त उसापासून तयार झालेले ‘पॉलिकोसॅनॉल’ (पीपीजी) हे औषध तयार केले आहे. ते अथेरोस्क्लेरोटिक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे होणारे अनेक विकार कमी करते. सीएनआयसीने हे उत्पादन विकसित केले. १९९६मध्ये या संशोधनाला जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (डब्ल्यूआयपीओ) सुवर्णपदक दिले. मधुमेहावरील पायांच्या समस्येवर उपचार करण्यासाठी सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग एंड बायोटेक्नॉलॉजी (सीआयजीबी) द्वारा विकसित ‘हेबरप्रॉट-पी’ या औषधालादेखील पुढे सुवर्णपदक मिळाले.

बर्‍याचदा क्युबामधील औषध संशोधनाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे मेनिंजाइटिस या आजाराला कारणीभूत असलेल्या मेनिंजोकोकस बॅक्टीरियाविरुद्ध ‘सीरोग्रुप व्हीए-मेंगोक-बीसी’ ही जगातील पहिली उपलब्ध लस होती. फिनले इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या या उत्पादनास १९८९मध्ये डब्ल्यूआयपीओचे सुवर्णपदक देण्यात आले होते. तरीही या लसीकडे महाकाय फार्मास्युटिकल कंपनी स्मिथक्लिन बीचम (आता गॅलॅक्सोस्मिथक्लिनचा भाग) यांचे लक्ष जाईपर्यंत आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष गेले नव्हते. बर्‍याच वर्षांनंतर स्विस औषधनिर्माता नोवार्टिसला चुकीच्या मार्गाने ‘मेनिंजाइटीस बी’विरुद्ध लढा देणारी पहिली लस विकसित करण्याचे श्रेय दिले गेले. परंतु त्याच्या आधीच क्यूबात ही लस मोठ्या प्रमाणात प्रयोगात येत होती.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

२००५मध्ये हवाना विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या विद्याशाखेशी संबंधित असलेल्या सिंथेटिक अँटीजेन्स या छोट्या प्रयोगशाळेला हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी (किंवा एचआयबी) विरोधात जगातील पहिली कृत्रिम लस (क्विमी-हिब) विकसित करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे (डब्ल्यूआयपीओ) सुवर्णपदक मिळाले. अलीकडेच फुपफुसांच्या कर्करोगासाठी ‘सीआयएमएव्हॅक्स-ईजीएफ’ हे अमेरिकेत वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी अमेरिकेच्या औषध नियामकांची परवानगी मिळवणारे पहिले क्यूबाचे बायोफार्मास्युटिकल उत्पादन आहे. ‘The Center of Molecular Immunology’ (‘मॉलिक्यूलर प्रतिरक्षाविज्ञान केंद्र)’द्वारे हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे. हे केंद्र प्रतिपिंडे, कर्करोगाची औषधे आणि इतर क्षेत्रात विशेषज्ञ आहे.

क्युबाने विकसित केलेली काही महत्त्वाची औषधे

लहान मुलांमधील मेनिंजायटीस रोखण्यासाठी क्युबाने १९८९मध्ये लस विकसित केली. पेटेंटचा कालावधी संपल्यानंतर २०१४मध्ये अमेरिकेने औषध कंपनी फाईझरने ही लस बनवली आणि ‘युनायटेड स्टेट्स फूड अ‍ॅण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन’ने (एफडीए) या अपवादात्मक औषधी उत्पादनाची नोंदणी केली.

क्युबाच्या ‘The Center of Molecular Immunology’ने CimaVax-EGF ही लस १९९४मधेच शोधली होती. तिच्यामुळे नॉन-स्मॉल सेल फुप्फुसाच्या कर्करोगाचा (एनएससीएलसी) उपचार करण्याच्या उद्देशाने झालेल्या तपासणी अभ्यासात एनएससीएलसीच्या रुग्णांच्या जगण्यात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले. मात्र उत्पादनाच्या २० वर्षांपेक्षा जास्त काळ गेल्यानंतर न्यूयॉर्कमधील बफेलो येथील रोझवेल पार्क कर्करोग संस्थेने एनएससीएलसीपीडित रुग्णांच्या उपचारासाठी या लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी वैद्यकीय चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

व्हिटिलिगो या आजारात त्वचा आपल्या रंगद्रव्य पेशी (मेलानोसाइट्स) गमावते. त्यामुळे त्वचा, केस आणि श्लेष्मल त्वचेसह शरीराच्या वेगवेगळ्या भागात पांढर्‍या रंगाचे मोठे ठिपके येतात किंवा  पॅचेसमध्ये त्वचेचा रंग कमी होतो. क्युबाने यावर ‘मेलाजेनिना प्लस’ हे मानवी नाळे (प्लासेंटा) पासून अल्कोहोल अर्क आधारित लोशन तयार केले. ते लावल्याने त्वचेच्या पांढर्‍या ठिपक्यांच्या भागात मेलानोसाइट्स उत्तेजित करून पुन्हा पूर्वीसारखा कातडीचा रंग मिळवता येतो. २० वर्षांहून अधिक काळ जगभरात उपलब्ध असलेल्या या औषधाला ‘चमत्कारी’ त्वचारोग औषध म्हटले गेले. 

आईपासून मुलांमध्ये पसरणार्‍या एचआयव्ही आणि सिफलिसला थांबवणारा क्युबा हा डब्ल्यूएचओद्वारे मान्यता प्राप्त जगातील पहिला देश होता. तोपर्यंत या कारणाने हजारो मुलांचे जीव जायचे. हवानाच्या सीआयजीबी (सेंटर फॉर अनुवांशिक अभियांत्रिकी आणि जैव तंत्रज्ञान)मध्ये ‘हेबरफेरॉन’ हे औषध विकसित केले गेले. हे दोन इंटरफेरॉनचे संयोजन आहे. त्याच्या जटिल प्रक्रियेचा परिणाम म्हणजे ट्यूमर वाढ, विशेषत: बेसल सेल कार्सिनोमा (सीबीसी) त्याचे आकार, स्थान आणि उपप्रकार थांबवली जातात. बहुतेक त्वचेच्या कर्करोगांमध्ये ते प्रभावी ठरले आहे.

क्युबाने २००६ साली ‘हेबरप्रॉट- पी’ हे इंजेक्शन शोधले. त्याची आतापर्यंत १५ देशांनी नोंदणी केली आणि जगभरातील लाखो रुग्णांनी उपचार घेतला आहे. मधुमेहाचा तीव्र अल्सर असलेले रुग्ण उपचारांच्या इतर स्वरूपाला दाद देत नाहीत. त्यांना मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी ‘हेबरप्रॉट-पी’ हा ‘एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर’ (ईजीएफ) प्रभावी ठरतो. हीही क्युबाचीच देण आहे. क्युबाने २००९ साली शोधलेली ‘निमोटोझुमाब’ ही एक उत्कृष्ट अ‍ॅड-ऑन थेरपी आहे. डोके आणि मान (एससीएचएन)च्या स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचे निदान झालेल्या रुग्णांना रेडिओथेरपीसमवेत निमोटोझुमाब दिल्याने त्यांच्या जगण्याचा दर तिप्पट वाढतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सुमारे ८० ते ८५ टक्के फुप्फुसांचा कर्करोग ‘नॉन-स्मॉल सेल फुप्फुसांचा कर्करोग’ (एनएससीएलसी) आहे. क्युबाने २०१३ साली शोधलेल्या ‘रेकटोमोमाब’मुळे शेवटच्या टप्प्यावर असलेल्या एनएससीएलसीग्रस्त रुग्णांच्या जगण्यात लक्षणीय वाढ होते. लॅटिन अमेरिकेत हे औषध मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या बाबतीत अमेरिका अजूनही मागे आहे.

रोजची आव्हाने कमी नाहीत

क्यूबन बायोफार्मास्युटिकल उद्योगाची निर्यात दुप्पट करणे (म्हणजे पाच वर्षांत दर वर्षी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गाठणे) हे अवघड लक्ष्य आहे. ते अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे सध्या तरी गाठणे अशक्य दिसते. त्यामुळे क्युबासाठी कच्चा माल मिळवणे हा एक सततचा संघर्ष आहे. विशेषत: डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकन निर्बंध कठोर झाल्यानंतर ते अजूनच अशक्यप्राप्य बनले. क्युबावरील अमेरिकेच्या बंदीमुळे वैद्यकीय उपकरणांवर निर्बंध आहेत. लसींवर काम करणार्‍या क्युबाच्या वेगवेगळ्या संशोधन पथकांमध्ये फक्त एक स्पेक्ट्रोमीटर आहे. तो गुणवत्ता नियंत्रण आणि लसीच्या रासायनिक संरचनेचे विश्लेषण करण्यासाठी महत्त्वाचा असतो. या स्पेक्ट्रोमीटरची ब्रिटिश निर्माता मायक्रोमास ही कंपनी अमेरिकन वॉटरसने विकत घेतल्यामुळे क्युबाला आता सुटे भागदेखील खरेदी करता येत नाहीत. अनेक दशकांपासून पुरवठा करणार्‍या पुरवठादारांवर बंदी आहे. त्यामुळे क्युबाला चीनकडून वैद्यकीय उपकरणे मागवावी लागतात. परिणामी पुरवठा खूप महाग आणि गुंतागुतीचा झाला आहे.

क्युबाच्या डॉक्टरांना इतर देशांच्या तुलनेत फार कमी वेतन आहे. त्यांना ५२ पाउंड म्हणजे फक्त ५४०० रुपये एवढेच वेतन मिळते. याव्यतिरिक्त ते अद्ययावत डायग्नोस्टिक तंत्रज्ञानाशिवाय काम करतात. काही वेळा वीज किंवा पुरेशा पाण्याशिवायही कामे करावी लागतात. रुग्णालयांमध्ये मूलभूत उपकरणे येण्यासाठी अनेक आठवडे थांबावे लागते. कर्मचारी प्रशिक्षित असूनही पायाभूत सुविधा, मशीन्स आणि उपकरणे नसल्याने त्यांच्या प्रतिभेचा वापर होत नाही. कधी कधी पॅरासिटामोल आणि इतर मलमपट्टीसारख्या मूलभूत औषधांचा नियमित साठा नसतो. मात्र या सर्व अडथळ्यांना आणि आव्हानांना तोंड देण्याची शक्ती मिळवत ते स्तुतीस पात्र अशी सेवा देण्यासाठी झटतात.

जेनेटिक अभियांत्रिकी व जैव तंत्रज्ञान केंद्राच्या दोन लसींच्या विकासाचे प्रमुख असलेल्या डॉ. गेरार्डो गिलन यांचा पगार २०० पाउंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये फक्त २०,७१८ रुपये एवढा आहे. त्यांना इतर विकसित देशांत १०० पट अधिक पगाराची ऑफर असूनही ते आपल्या देशाच्या उन्नतीसाठी झटत आहेत. ते म्हणतात, “आम्हाला आपल्या देशाच्या विकासासाठी वचनबद्धता वाटते. आम्ही काही सीईओ लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी नव्हे, तर लोकांना आरोग्यदायी बनवण्यासाठी काम करत आहोत.”

बायोफार्माचे यश आणि फायदे

आज क्युबामध्ये ३०हून अधिक संशोधन संस्था आणि उत्पादक राज्य-संचालित समूह ‘बायोकुबा फार्मा’च्या अधिन राहून काम करतात. मर्यादित स्त्रोत असूनही या लहान देशाकडे जवळपास १२०० आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. तो ५० पेक्षा जास्त देशांमध्ये औषध आणि उपकरणे विकतो. हा उद्योग पूर्णपणे सार्वजनिक अर्थसाहाय्याद्वारे व्यवस्थापित केला जातो. तो जगातील सर्वांत कार्यक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचा एक मुख्य घटक आहे. लोकांच्या आरोग्यसेवेसाठी धोरणात्मक महत्त्व असलेली औषधे विकसित करणे हे त्याचे लक्ष्य आहे.

क्युबामध्ये मलेरिया, पोलिओ, टिटॅनस आणि गोवर निर्मूलन झालेले आहे. करोनाशी हा देश यशस्वीपणे लढा देत आहे. त्याचे कारण वर्षानुवर्षांची प्राथमिक काळजी आणि आरोग्याकडे लक्ष देण्यात आहे. १९८०च्या उत्तरार्धात क्युबाने जगातील पहिली मेनेंजाइटिस आजारची लस विकसित केली. पुढे जाऊन देशात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या दहा लसींपैकी आठ तिथेच तयार होऊ लागल्या आणि कोट्यवधी डोस परदेशात निर्यात होऊ लागले. औषधे आयात करावी लागली नाहीत म्हणून २०१४ आणि २०१६ साली अनुक्रमे १.१९३ बिलियन डॉलर्स आणि १.९४० बिलियन डॉलर्स या देशाने वाचवले.

१९८०-९०च्या दशकात या क्षेत्राचा विकास करण्यासाठी क्युबाने सुमारे एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा धाडसी निर्णय घेतला, तो जगाने ‘बिलियन डॉलर बायोटेक जुगार’ मानला. मात्र आज हा सर्वांत यशस्वी क्यूबन आर अँड डी प्रोग्राम बनला आहे. जो इतर देशांसाठीही एक मॉडेल ठरला आहे. आजच्या क्युबाच्या बायोटेक उद्योगातील सिंहाचा वाटा ‘बायोकुबा फार्मा’मध्ये केंद्रित आहे. त्यामध्ये ३३ कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यात २१,६६०पेक्षा जास्त कामगार काम करतात. २०१४पासून विशेष वेतनवाढी करण्यात आल्या. त्याचा फायदा साडेचार लाख आरोग्य कर्मचार्‍यांना झाला. बहुतांश लोकांचा पगार दुप्पट झाला. ‘बिझिनेस मॉनिटर इंटरनॅशनल’ (बीएमआय)च्या अंदाजानुसार २०१५मध्ये ८६ मिलियन डॉलर्सचा व्यवसाय २०२०पर्यंत ११९ मिलियन डॉलर्स एवढा वाढले. अग्रगण्य राष्ट्रांच्या कामगिरीच्या तुलनेत हा निश्चितच सकारात्मक परिणाम आहे.

क्यूबन बायोफार्मा उद्योगाच्या यशस्वीतेचा अंदाज आपण या एका गोष्टीवरून घेऊ शकतो. देशात वापरली जाणारी ६० टक्क्यांपेक्षा जास्त औषधे तिथेच तयार केली जातात. १९९५पासून हे क्षेत्र निर्यात करून इतक्या नफ्यात राहिले आहे की, त्यातून देशाच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत चालवल्या जाणाऱ्या बर्‍याच कार्यक्रमांना वित्तपुरवठा केला जात आहे. वैद्यकीय उत्पादनांची खरेदी परवडण्यामागील हे मुख्य कारण आहे. त्यामुळे क्युबाच्या बायोफार्मा उद्योगाच्या दर्जेदारपणाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायाने मान्यता द्यायला सुरुवात केली आहे.

बायोफार्मास्युटिकल उद्योगाच्या यशोगाथेमागचे कारण

क्युबासारख्या गरीब, विकसनशील देशात रोखीवर चालवणारा, उच्च-तंत्रज्ञान आधारित आणि मालमत्ता हक्क, मालकी, स्पर्धा, नियमन, कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर चालणारा फार्मा उद्योग यशस्वीरित्या कसा विकसित झाला, हे समजून घेणे अर्थशास्त्र आणि आर्थिक विकासाच्या पारंपरिक आख्यानांवर अवलंबून राहून शक्य नाही. बर्‍याचदा उदारीकरण आणि खाजगीकरण हे अनिवार्य आणि नैसर्गिक स्थिती म्हणून सादर केले जाते आणि त्या चौकटीबाहेर विश्लेषणे केली जात नाहीत. म्हणून क्युबन यशाची कहाणी महत्त्वाची आणि वेगळी ठरते. क्युबन जैव तंत्रज्ञान क्षेत्राच्या विश्लेषणामधून जे काही समोर येत आहे, ते सर्वथा अपरिचित आहे. क्यूबन उद्योगाची योग्यरित्या तपासणी करताना, अशा अनेक सामर्थ्यवान कथा सापडतील. त्या मालमत्तेच्या हक्कावर आणि संशोधकांना परतावा देण्याच्या, पण नावीन्यपूर्णतेच्या जगभरातील बहुतेक पारंपरिक अभ्यासाच्या एकसारख्या समान स्वरूपाला आव्हान देतात. क्यूबन बायोटेक उद्योग निःसंशयपणे त्या देशाच्या सर्वांत यशस्वी प्रकरणांचे प्रतिनिधित्व करतो.

क्युबाच्या आरोग्य सेवा प्रणालीची अद्वितीय रचना, मोफत शिक्षण, संशोधन आणि नवकल्पना या देशातील सार्वजनिक गुंतवणूक, हे बायोफार्मास्युटिकल उद्योगाच्या यशोगाथेमागचे सर्वांत महत्त्वपूर्ण घटक आहेत. एखाद्या संस्थेची देशाच्या जडणघडण करण्यात जी ऐतिहासिक भूमिका असू शकते, त्याचे क्युबन मॉडेल एक उदाहरण आहे. क्युबाची सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली संपूर्ण लोकसंख्येच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. बायोफार्मा उद्योगाचा विकासच आर्थिक गरज आणि सार्वजनिक सेवेच्या मूल्यांसाठी परवडणारी औषधे यासाठी करण्यात आला आहे. प्रतिबंधांचा मुकाबला करण्यासाठी क्युबाने देशासाठी परवडणारी सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा व्यवहार्य मार्ग निवडला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीच्या गरजेनुसार कमी किमतीची, उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार केली जातात. आज क्युबा वैद्यकीय उत्पादनांचा, विशेषत: बायो-फार्मास्युटिकल्सचा यशस्वी निर्यातदार आहे.

क्युबन आरोग्य व्यवस्थेचे कीर्तिमान

घोषित स्वरूपात नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष असलेल्या क्यूबात ४५ टक्के नागरिक निधर्मीय, म्हणजे कोणत्याही धर्माला मानणारे नाहीत. क्युबाचा साक्षरता दर ९९.८ टक्के आहे. तो जगात सर्वाधिक असलेल्या देशांपैकी एक आहे. सरकार आरोग्यासाठी दरवर्षी प्रतीव्यक्ती सरासरी ३० हजार खर्च करते. बालमृत्यू दर हजारामागे ४.२ आहे. पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७७ वर्षे आणि स्त्रियांचे ८३ वर्षे इतके आहे.

क्यूबामध्ये डॉक्टरकी पैशांसाठी नव्हे तर इतरांना मदत करण्याची गरज म्हणून केली जाते. तिथे १५० रुग्णांसाठी एक डॉक्टर आहे. हे प्रमाण जगातल्या सर्व विकसित देशांना मागे टाकणारे आहे. युरोपात हेच प्रमाण १० हजार रुग्णांसाठी २.८ डॉक्टर असे आहे. तेथील डॉक्टरांना ते ज्या लोकांमध्ये काम करत आहेत, त्यांच्या आर्थिक-सामाजिक संरचनेची आकडेसकट पूर्ण माहिती असते. देशामध्ये सार्वत्रिक मोफत आरोग्य सेवा आहे आणि जगातील रुग्णांच्या प्रमाणात उच्चतम डॉक्टर्स आहेत. तिथे प्रत्येक नागरिकाची नियमित वार्षिक तपासणी केली जाते. जर एखादी व्यक्ती रुग्णालयात गेली नाही, तर तिला शोधत डॉक्टर तिच्या घरी जातात.

क्युबाच्या हेनरी रीव्ह ब्रिगेडची स्थापना २००५मध्ये करण्यात आली. त्यांनी आपत्ती व साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी जगभरात आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या केडर पाठवल्या. २०१०च्या भूकंपानंतर कॉलराचा प्रादुर्भाव सुरू असताना क्युबियाचे डॉक्टर हैतीमध्ये बचाव कामात होते. २०१४-१६मधील इबोला संकटाच्या वेळी ते पश्चिम आफ्रिकेत दाखल झाले. आणि जेव्हा करोना युरोपमध्ये पसरला, तेव्हा दोन हेनरी रीव्ह टीम इटलीमध्ये दाखल झाल्या. त्यांनी तिथे डॉक्टरांची कमतरता कमी करण्यात हातभार लावला. एप्रिल २०२०च्या अखेरीस क्युबाचे १०००पेक्षा अधिक आरोग्य सेवा कर्मचारी करोनाचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये मदत करत होते. तिथे वैद्यकीय मिशन किंवा मेडिकल टुरिझममधून येणारा नफा सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरला जातो.

कोणते मॉडेल योग्य?

जगभरात जैवतंत्रज्ञान क्षेत्र वित्तकेंद्रित मॉडेल आधारे विकसित करण्यात आले आहे, तर त्या उलट क्युबात ते १०० टक्के सरकारी गुंतवणुकीवर उभे आहे. बायोफार्मास्युटिकल उद्योगात जगभरातल्या बहुतेक देशांत सरकारी गुंतवणुकीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे क्यूबन सरकारची जैवतंत्रज्ञान क्षेत्रातली गुंतवणूक अगदी असामान्य म्हणता येणार नाही.

‘नेचर’ या मासिकाने २००९च्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, ‘क्युबाने जगातील सर्वांत स्थापित बायोटेक्नॉलॉजी उद्योगाचा विकास केला केला आहे, जो श्रीमंत देशांना पूर्वअट वाटणार्‍या उद्यम-भांडवलाच्या निधीच्या मॉडेलपेक्षा वेगळा असूनही वेगाने वाढला आहे.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

क्युबाची फार्मा प्रगती एक असे प्रकरण आहे, ज्यावरून समाजवादी विचारांवर विश्वास असलेले सक्षम, जिद्दी व समर्पित शास्त्रज्ञ कशा प्रकारे एखाद्या देशाची आर्थिक संरचना सुधारणारे निर्धारक घटक बनतात हे स्पष्ट होते. जेव्हा जैवतंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्राकडे जगातील अनेक देश शंकेने पाहत होते, तेव्हा क्युबातील वैज्ञानिकांनी या क्षेत्राची क्षमता काय करू शकते, ते दाखवून दिले आहे. खरे तर संशोधन आणि नव्या कल्पनांवर वेळ व पैसा खर्च करणे, या गरीब देशासाठी धोकादायक होते आणि अजूनही आहे, परंतु या देशाने आतापर्यंत त्यातून काही प्रमाणात का होईना आर्थिक विकास केल्याने त्याच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलत आहे. तो भविष्यात औद्योगिक प्रकल्पांबाबत धोरणकर्त्यांच्या निवडी फेरबदल करण्यास करणीभूत ठरू शकेल.

क्युबाने २०२१च्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये आपल्या एकूण १७८.८ बिलियन पेसोपैकी २४ टक्के हिस्सा शिक्षण आणि २८ टक्के हिस्सा आरोग्य व सामाजिक योजनांसाठी राखून ठेवला आहे. म्हणून हा मुद्दा केवळ सरकारच्या भूमिकेच्या वैधतेपुरता मर्यादित राहत नाही. क्यूबाचे उदाहरण अनेक प्रकारे सार्वजनिक आरोग्याच्या चांगल्या बाजू आणि सक्षम सरकारी धोरण व नियोजनाचे यश दर्शवते. क्युबाचा मार्ग प्रत्येकासाठी अनिवार्य असण्याची गरज नाही, परंतु बर्‍याच जणांसाठी नक्कीच तो वैध किंवा गरजेचा असू शकतो.

सर्वसामान्य जनतेचे शिक्षण, आरोग्य आणि जीवनमूल्यांसाठी त्यांच्या बाजूने कसे उभे राहावे, हे जगाने क्युबाकडून शिकण्यासारखे आहे!

.............................................................................................................................................

लेखक संजय पांडे ऑल इंडिया लॉयर्स युनियन, महाराष्ट्रचे सदस्य आहेत.

adv.sanjaypande@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा