‘रानमळ्याची वाट’ हा प्रकल्प करताना श्रावणीने एकाही कवितेला हातात कागद घेतला नाही, चुकली-अडखळली नाही, तिचा आत्मविश्वास ढळला नाही…
पडघम - साहित्यिक
इंद्रजित भालेराव
  • श्रावणी बरकुले, ‘रानमळ्याची वाट’ या कविताप्रकल्पाची काही छायाचित्रे आणि इंद्रजित भालेराव
  • Mon , 26 April 2021
  • पडघम साहित्यिक इंद्रजित भालेराव Indrajeet Bhalerao रानमळ्याची वाट Ranmalyachi Vaat श्रावणी बरकुले Shravani V Barkule

एकदा सहज फेसबुक पाहताना एक मुलगी माझी कविता म्हणतान दिसली. ‘गावाकडं चल माझ्या दोस्ता’ ही कविता ती म्हणत होती. महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना ती पाठ असते. पण या मुलीचं वेगळेपण हे होतं की, प्रत्यक्ष गावाकडच्या रस्त्यानं चालताना या कवितेचं चित्रीकरण केलेलं होतं. आणि मुलगी अगदी उत्स्फूर्तपणे स्वाभाविक अभिनयासह कविता म्हणत होती. माझीच कविता मला जिवंत झाल्यासारखं वाटलं. मी त्या कवितेखाली प्रतिक्रिया नोंदवली. पेज विष्णू बरकुले यांचं होतं आणि मुलीचं नाव तिथं नव्हतं. मी त्याची विचारणा केली. आणि कोणत्या वर्गात शिकते हेही विचारलं. विष्णू बरकुले यांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवली : मुलीचं नाव – श्रावणी बरकुले, वर्ग – ३रा, वय ९ वर्षं. आणखीच आश्चर्य वाटलं.

आणखी काही दिवसांनी मला त्याच पेजवर तीच मुलगी माझी ‘जन्म’ ही कविता म्हणताना दिसली. ही १०० ओळींची कविता फारसं कुणी म्हणताना दिसत नाही. ही नऊ वर्षांची मुलगी कापसाच्या रानात उभी राहून एक अक्षरही चुकू न देता ही कविता म्हणत होती. तिचं वय पाहता तिचं पाठांतर, तिचा स्वाभाविक अभिनय, तिचा आत्मविश्वास, हे सगळं मला एक दैवी चमत्कारच वाटला. मी अक्षरक्ष: तिच्यासमोर नतमस्तक झालो. मी प्रतिक्रिया नोंदवली – “माझ्या आईची कविता तशाच कापसाच्या रानात उभी राहून सादर करणारी तुही माझी मायच की रे श्रावणी!” मला त्या लेकराचं भारी कौतुक वाटलं.

दुसऱ्या दिवशी माझे कविमित्र, परतूरच्या वीजमंडळात कर्मचारी असलेले, संतसाहित्याचे गाढे वाचक-अभ्यासक हरीश कवडे यांचा फोन आला. म्हणाले- “अहो सर, ही माझ्या मित्राची मुलगी आहे. तिचे वडील आणि मी सेलूच्या महाविद्यालयात सोबत शिकायला होतो. तेव्हा तुम्ही आमच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आला होता. तेव्हापासून आम्ही तुमच्या कवितेने भारावलेले आहोत. त्याचं गाव परतूर जवळचंच खांडवी आहे. तिचे वडील काही दिवस गावचे सरपंच पण होते. आता ते पूर्णवेळ शेती करतात.’’

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

दोन्ही कवितांचं कल्पक चित्रीकरण विष्णू बरकुले यांनीच केलेलं होतं. नंतर त्यांचंही माझ्याशी बोलणं झालं. ते म्हणाले, ‘तुमच्या आणखी काही कविता करायच्या आहेत’. मी त्यांना म्हणालो, ‘माझ्या एकट्याच्या नको. शेती-मातीशी संबंधित आणखी काही कवी निवडून आपण त्यांच्याही कविता करूयात.’ मग आम्ही बहिणाबाई, नामदेव, ज्ञानदेव, सावता माळी, तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग. ल. ठोकळ, ग. ह. पाटील, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, बी. रघुनाथ, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ या कवींच्या कविता निवडून सादर करायला सुरुवात केली.

कधीही कविता टाकण्याऐवजी एक वेळ, वार आणि या कवितामालिकेला एक नावही निश्चित असावं असं आम्ही ठरवलं. प्रत्येक रविवारी सकाळी आठ वाजताची वेळ ठरवली. सगळ्या कविता शेतीमातीशी संबंधित असल्यामुळे आम्ही या कवितामालिकेला साधं, सोपं, सरळ आकर्षक नाव ठरवलं – ‘रानमळ्याची वाट’. चार-पाच आठवडे झाले आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. हरीश, विष्णू आणि माझा उत्साह वाढला. श्रावणी तर झपाटूनच गेली होती. कवितामालिकेच्या लोकप्रियतेत श्रावणीसोबत तिचे वडील विष्णू यांच्या कल्पक चित्रीकरणाचाही मोठा वाटा आहे.

कवितेच्या आशयाला अनुरूप शेत शोधणं, त्याचा कल्पक उपयोग करून घेणं, श्रावणीला तिथं नेणं, एकेका कवितेचं माझं समाधान होईपर्यंत पाच-सहा व्हिडिओ न कंटाळता करणं, रविवारी वेळेवर ते अपलोड करणं, गरज पडली तर त्यासाठी परतूरला जाणं, या सगळ्या गोष्टी विष्णू अतिशय उत्साहानं करत होते. पालक म्हणून त्यांची धडपड मला आदर्श वाटली. नंतर तर असंही समजलं की, त्यांना दोन मुलीच आहेत. त्यांनी मुलाची वाट पाहिली नाही. मला हाही एक आदर्शच वाटला.

हे सगळं होईपर्यंत आमची कुणाचीच एकमेकांशी प्रत्यक्ष गाठभेट नव्हती. मला वाटलं एकदा श्रावणीच्या गावी जाऊन सगळ्यांना भेटून यावं. २२ नोव्हेंबर २०२० रोजी मी खांडवीला जाऊन आलो. तोपर्यंत दहा कविता प्रसारित झाल्या होत्या आणि त्यांना उत्तम प्रतिसाद होता. माझ्या खांडवी भेटीचा एक उत्सवच झाला. नको नको म्हणातानाही श्रावणीच्या मळ्यात तीनेकशे लोक जमले होते. गावापासून मळ्यापर्यंत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक निघाली. स्वत: श्रावणीने माझ्या कविता म्हणत गाडी हाकली. फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. शेतात एक सत्कार आणि काव्यवाचनाचा छानसा कार्यक्रमही झाला. उपस्थित सर्वांना विष्णूने जेवण दिलं.

दहा कविता होईपर्यंत श्रावणी नेमकी कोण? कुठली? माझी मुलगी की नात? अशी उत्सुकता लोकांच्या मनात निर्माण झाली होती. प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा श्रावणीविषयी माहिती सांगणारा एक पाच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून टाकूयात असं मी ठरवलं होतं. मळ्यातच मी तसा व्हिडिओ तयार केला. परत आल्यावर दुसऱ्या दिवशी मी तो सहज म्हणून माझ्या पेजवर टाकला. पाच-सहा हजार लोक फार तर तो पाहतील असं वाटलं होतं. पण २४ तासांत तो अडीच लाख लोकांना पाहिला. पाहता पाहता श्रावणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचली. नंतर मी तिथल्या स्वागताचे, मिरवणुकीचे असे लहान लहान व्हिडिओ आठवडाभर टाकत होतो. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्रावणी रातोरात सेलिब्रेटी झाली. तिला भेटायला लोक खांडवीला येऊ लागले. राजकीय पक्षांचे लोक मदतीची विचारणा करू लागले. तिच्या घरी जाऊन लोक सत्कार करू लागले. तिला कार्यक्रमाला बोलवू लागले. तो ओघ अजूनही संपलेला नाही. श्रावणी धावतेच आहे, पळतेच आहे. माध्यमंही तिला भरपूर प्रसिद्धी देत आहेत.

श्रावणी जिद्दी आहे. काही अवघड कविता तिला जमणार नाहीत असं मला वाटायचं. पण ती म्हणायची, ‘हो, करते मी’. कितीही दीर्घ आणि अवघड कविता असो, श्रावणीला तो सोपीच वाटायची. तिच्या काही उच्चाराच्या अडचणी होत्या. त्यावर मी तिला काही सराव सांगितले. तिनं ते केले. काही कवितांच्या अभिवाचनाच्या ऑडिओ तिला पाठवायचो. मग एकाही अक्षरांची आणि एकाही आरोह-अवरोहाची चूक श्रावणीनं होऊ दिली नाही. त्यामुळे अनेक जाणकारांनी तिला दाद दिली. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक आणि जाणकार समीक्षक राजशेखर शिंदे यांनी तर प्रतिक्रिया दिली की, ‘गेल्या ४० वर्षांपासून मी कवितावाचनाचे कार्यक्रम ऐकतोय. सर्व दिग्ग्जांना मी ऐकलंय. ही मुलगी पुढं चालून नक्की मोठी जाणकार अभिनेत्री होणार.’

प्रा. राजशेखर शिंदे यांनी नुसती दादच दिली नाही, तर प्रत्येक कविता त्यांनी आपल्या पेजवर शेअर केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांनीदेखील श्रावणीच्या अभिवाचनाचं खास कौतुक केलं. प्रकाशक अरविंद पाटकर आणि अनिल मेहता यांनाही श्रावणीचं फार कौतुक वाटलं. काही जाणकारांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. त्याबरहुकूम श्रावणी दुरुस्त्या करत गेली. कवीलोकांची दाद मात्र फारशी नव्हती. श्रावणीला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे कदाचित ते भांबावून गेले असतील! कारण मी श्रावणीच्या गावी जाऊन आल्यावर तिला मिळणारी रसिकांची दाद लाखांच्या घरात गेली होती. अशी दाद अन्य कुणाच्या काव्यवाचनाला दिसत नव्हती.

दरम्यान गणेश घुले यांनी त्यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या लोकप्रिय कार्यक्रमात श्रावणीला आपल्या पेजवर बोलावलं, तेव्हा तर तिने त्या संपूर्ण लाईव्ह कार्यक्रमात शेतात फिरत कवितेला पूरक ठिकाणी जाऊन सलग आठ कविता सादर केल्या. त्या लाईव्ह कार्यक्रमालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.

हे सर्व सुरू असताना श्रावणीचे आणखी उपक्रमही सुरू होते. दरम्यान दिवाळी आली. तेव्हा माझी ‘दिवाळीचा सण’ ही कविता तिने फार आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं सादर केली. या कवितेसाठी लागणाऱ्या चित्रीकरणासाठी विष्णू पार विदर्भातल्या डोंगरातही जाऊन आले. माझा मुलगा चंद्रगुप्त याला चित्रफितीच्या संकलनाची आवड आणि जाणही आहे. दिवाळीच्या या गाण्याचं संकलन त्यानं अगदी चित्रपटाच्याही तोंडात मारेल इतकं छान केलं. श्रावणीचा अभिनय, विष्णू, हरीशचं चित्रीकरण आणि चंद्रगुप्तचं संकलन, यामुळे ते गाणं खूपच उठावदार झालं. दरम्यान विष्णूनं गाई ओवाळतानाचं एक लोकगीत श्रावणीकडून करून घेतलं. तेही लोकगीत दिवाळीत टाकलं. त्यालाही अमाप प्रतिसाद मिळाला.

दरम्यान मोठ्या पेरण्या शेतात सुरू झाल्या. विष्णूनं आणि मी ठरवलं की, एखादी पेरणीची कविता या दरम्यान यायला हवी. कारण शेतात त्या त्या वेळी जे वातावरण आहे, तशाच कविता आम्ही निवडत होतो. त्यामुळे कवितेला उठाव येत होता आणि त्या लोकांनाही आवडत होत्या. विठ्ठल वाघांच्या ‘तिफणी’चा विचार आम्ही केला. पण तिचे अनेक व्हिडिओ झाले आहेत. वाघसरांच्याच ‘बोली’ या मासिकाचा एक अंक माझ्याजवळ होता. त्यात तिफणीची पारंपरिक आरती होती. पण ती दीर्घ आणि किचकट होती. मी त्या आरतीचं पुनर्लेखन केलं. श्रावणीला तिचा पारंपरिक आरतीच्या चालीतला व्हिडिओ पाठवला. तिने त्याबहरहुकूम आरती पाठ केली. विष्णूनं श्रावणीपासून तिफणीसह अशी काही सजावट केली की, तो व्हिडिओ एक मास्टरपिसच झालाय. त्याला प्रतिसादही तसाच मिळाला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

चित्रीकरणात धोका पत्करून हवा तो परिणाम साधण्यासाठी विष्णू आणि श्रावणी दोघंही कधीही तयार असतात. भर पावसाळ्यात नदीच्या खळखळत्या पाण्यातून चालत माझी ‘आमच्या रानामधला ओढा | वाहे झुळूझुळू थोडा’ ही कविता सादर करताना असाच धोका त्यांनी पत्करला होता. तुकारामांचे दोन अभंग आम्ही घेतले. त्यातला एक होता – ‘वृक्षवल्ली आम्ही सोयरे’. त्याचे चित्रीकरण करण्यासाठी विष्णू आणि कवडे यांनी अनेक जागा पालथ्या घातल्या. आणि बरोबर त्या अभंगाला शोभेल अशी जागा निवडली. भयाण डोंगरातलं एक निर्मनुष्य देऊळ, त्यासमोरची वानरांनी भरलेली भयाण वडाची झाडं आणि त्या खाली वानरांचा उच्छाद, हे सगळं पाहून की, तुकोबाचा अभंग जिवंत झाल्यासारखा वाटला!

जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात हरीशला वाटलं की, माझ्या ‘गाऊ जिजाऊस आम्ही’ या गीतमालिकेतल्या काही कविता सादर कराव्यात. सहा कविता निवडून त्यांनी डोंगर-किल्ल्यावर जाऊन त्या चित्रित केल्या. त्या वेळी योगायोगानं त्यांना चंद्रगुप्तही चित्रीकरणासाठी लाभला होता. त्यामुळे या कविता अत्युत्तम झाल्या. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अण्णाभाऊ साठे यांची ‘दौलतीच्या राजा’ ही कविता खूप चालेल असं वाटलं, पण नाही चालली. त्यामानानं वामनदादा कर्डकांची ‘या थुई थुई धारा’ ही फार चालली. शेतात तुषार सिंचनाचा संच लावून विष्णून तिचं चित्रीकरण केलं होतं. ग. ल. ठोकळ यांच्या दोन कविता आम्ही या मालिकेत घेतल्या होत्या. त्यातल्या ‘चल होती का तय्यार, करू संसार’ या कवितेला कमी, तर ‘देवाचं देणं हे देवाचं देणंस, सोन्याच्या ताटाला मोत्याचं दानं’ प्रचंड प्रतिसाद मिळाला. बहिणाबाईंच्या ‘कापणी’पेक्षा ‘उपणणी’ या कवितेला जास्त प्रतिसाद मिळाला. पण प्रतिसादावर अवलंबून नव्हतो आम्ही. आम्हाला एक दर्जेदार उपक्रम लोकांना द्यायचा होता.

मी ज्याला कमी प्रतिसाद म्हणतो तोदेखील पंधरा-वीस हजार इतका होता. पण लोकांनी एरवी लाखाच्या पुढं प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला तो कमी वाटत होता. पण आम्ही सतत प्रतिसादाकडं दुर्लक्ष करून दर्जेदार कार्यक्रम देत होतो. ग. ह. पाटील यांच्या कन्या सौ. मंदाताई खांडगे यांनी आवर्जून अधूनमधून फोन करून श्रावणीचं कौतुक केलं. पंढरपूरच्या क. भा. महाविद्यालयातील प्रा. रमेश शिंदे यांनीही सतत दाद दिली. श्रावणीला आणि तिच्या वडिलांना फोन करून त्यांचं बळ वाढवलं.

हा उपक्रम म्हणजे मराठी कवितेच्या सादरीकरणातला वेगळा प्रयोग होता. असा प्रयोग कधी कुणी केला नाही. पु. ल. देशपांडे-सुनीताबाईंनी मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू यांच्या कवितेचे प्रयोग केले. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. काही थोर कवींचे स्वत:च्या काव्यवाचनाचेही कार्यक्रम तुफान गाजले. पण या सगळ्यांसोबत त्यांचा स्वत:चा मोठा नावलौकिक होता. मात्र श्रावणीसारख्या एका शेतकऱ्याच्या नऊ वर्ष वयाच्या मुलीनं सादर केलेला हा प्रयोग ‘न भुतो न भविष्यति’ होता. लोकांना तिच्या पाठांतराचं प्रचंड कौतुक वाटतं. आतापर्यंत तिनं ३० कविता सादर केल्या, पण एकाही कवितेला हातात कागद घेतला नाही, चुकली-अडखळली नाही, तिचा आत्मविश्वास ढळला नाही.

आपण नव्या पिढीने सतत हातात मोबाईल घेण्याला कंटाळलो आहोत. मुलं तर पार वाया चाललीत. अशा वेळी श्रावणी हे एक विधायक उदाहरण आहे. लहान मुलंदेखील मोबाईलचा इतका चांगला वापर करू शकतात! श्रावणीचं उदाहरण इतर मुलांसमोर ठेवलं तर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.

श्रावणीचं पाहून आता अनेक मुलं फेसबुकबवर कविता सादर करताहेत. संगमनेरची समृद्धी राजेंद्र भाग्यवंत या मुलीनं ‘नाती-गोती’ ही दहा कवितांची मालिका केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकतीच पालमजवळच्या खेड्यातली श्रीराम आणि अमृता सातपुते ही बहीण-भावंडं पुढे येत आहेत. सुप्रसिद्ध कवयित्री आणि प्रकाशिका अस्मिता चांगणे यांच्याही मुली पुढं येत आहेत. मला वाटतं- हा फार मोठा विधायक परिणाम आहे. या लेकरांना आपण योग्य प्रतिसाद दिला तर नक्कीच पुढच्या पिढीवर कवितेचे संस्कार होतील आणि मराठीचं काय होईल ही भीती राहणार नाही.

श्रावणीनं सादर केलेल्या ३० कविता म्हणजे सातशे वर्षांचा मराठी ग्रामीण कवितेचा इतिहास आहे. ज्ञानदेव, नामदेव यांच्यापासून ते थेट आजपर्यंतच्या कवींनी लिहिलेल्या या निवडक शेतीविषयक कविता आहेत. ज्याला ज्याला शेतीमातीची ओढ आहे, त्याने कधीही काढून या कविता पाहाव्यात आणि काळजावर गारवा मारून घ्यावा. या कवितांमधून जसा ग्रामीण कवितेचा इतिहास आलाय, तसंच शेती आणि शेतकऱ्यांचं वर्षभराचं सगळं सृष्टीचक्रही आलंय. पेरणीपासून उलंगवाडीपर्यंतची सगळी शेतीची कामंही त्यात आली आहेत. डोळ्यांचं पारणं फिटावं असं चित्रीकरण, कान तृप्त व्हावेत असं सादरीकरण आणि मन तृप्त करणाऱ्या वाङ्मयीन जाणिवा, यामुळे या कविता पुन्हा पुन्हा पाहिल्या जातील.

शेतीचं तंत्र बदलल्यामुळे जुन्या कवितांतून येणारे कामाचे संदर्भ आता राहिले नाहीत. तरी विष्णूनं तशा सगळ्या साधनांची निर्मिती करून, तशा क्रिया घडवून आणून चित्रीकरण केलेलं आहे. तिफणीच्या आरतीचं मी वर सांगितलंच आहे. आता हल्लर आल्यामुळे तिवडे राहिले नाहीत. पण विष्णूनं बहिणाबाईंची ‘उपणणी’ ही कविता सादर करण्यासाठी तिवडे तयार करून त्यावर उभं राहून धान्य उधळण्याचा सगळा जामानिमा केला होता. ग. ह. पाटलांच्या ‘लुटा लुटा रे खळे लुटा’ या कवितेसाठी बलुतेदारांना धान्य वाटताना दाखवायचं म्हणून पोसाव्यासह सगळे लोक गोळा गेले. विष्णूच्या शेतात पक्कं बांधलेलं घर आहे. एका कवितेत झोपडी दाखवायची होती. त्यासाठी विष्णूने नवी झोपडी बांधून घेतली. विष्णूच्या हौसेला मोल नाही!

विष्णूच्या पेजवर या सगळ्या कविता उपलब्ध आहेतच, पण आता ‘श्रावणी बरकुले’ या नावानं यु-ट्युब चॅनेल सुरू करून तिथं या  कविता टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या आता कायमच्या उपलब्ध होतील.

गेले नऊ महिने सुरू असलेला श्रावणीचा संपर्क आता थांबणार, त्यामुळे हूरहूर वाटतेय. नऊ महिन्यांपूर्वी नावगावही माहीत नसलेली ही माणसं अचानक काळजात जाऊन बसली. कविता निवडणं, तिच्या अभिवाचनाची ऑडिओ तयार करणं, कविता श्रावणीनं पाठ करणं, विष्णूने चित्रीकरण करणं आणि रविवारी पेजवर कविता टाकणं, अशा सगळ्या घटनाक्रमात आमचा आठवडा पाहता पाहता निघून जात असे. लगेच पुढची कविता आणि पुढच्या आठवड्याची कामं सुरू होत. असे आठवड्यांमागून आठवडे आणि महिन्यांमागून महिने पाहता पाहता नऊ महिने झाले. एप्रिलच्या मध्यावर आम्ही ही कवितामालिका थांबवत आहोत. पण कुठंतरी थांबलंच पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांचं औत जिथं थांबतं, तिथं आम्ही थांबत आहोत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

श्रावणी, विष्णू यांच्यासोबत हरीश कवडे हेही तितक्याच समरसपणे सहभागी झाले होते. संतकवितांची निवड आणि अभिवाचनाची तयारी त्यांनीच करून घेतली. शिवाय स्थळाची निवड करणं, त्याची प्राथमिक छायाचित्रं माझ्याकडे पाठवणं, त्याविषयी चर्चा करणं हे सगळं हरीशच करत होता. यात त्यांचा काडीचाही स्वार्थ नव्हता. कवितेचा एक सुंदर प्रकल्प उभा राहतोय, यातच त्यांना आनंद होता.

याआधी डॉ. अशोक जोंधळे आणि आशा जोंधळे यांच्यासोबत ‘मायबाई’, ‘माझा बाप शेतकरी’, ‘गाऊ जिजाऊस आम्ही’ असे काही कवितांचे संगीतप्रकल्प केले होते. तेव्हाची आठ-दहा वर्षं माझी अशीच धुंदीत आणि आनंदात गेली होती. ‘रानमळ्याची वाट’ हा प्रकल्प मला करोनाची देणगीच वाटतो. या काळात सगळे सांस्कृतिक उपक्रम समाजमाध्यमाने जिवंत ठेवले होते. नव्हे, त्यात वाढही केली होती. अर्थात पुढंही आम्ही गप्प बसणारच नाही. तीन-चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर असाच काहीतरी जिव्हाळ कार्यक्रम घेऊन येणार आहोत…

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा