राम कोल्हटकर : रसिकाग्रणी, शास्त्रीय संगीताचे मर्मज्ञ जाणकार, उत्तम संग्राहक, विनम्र आणि प्रसिद्धीपराङमुख पारदर्शी स्नेही
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर, विवेक गोखले
  • रामभाऊ कोल्हटकर
  • Tue , 13 April 2021
  • पडघम सांस्कृतिक राम कोल्हटकर Ram Kolhatkar कैलास जीवन Kailas Jeevan शास्त्रीय संगीत Classical music पं. कुमार गंधर्व Kumar Gandharv पं. भीमसेन जोशी Bhimsen Joshi पं. जसराज Jasraj किशोरी आमोणकर Kishori Amonkar अप्पा जळगावकर Appa Jalgaonkar पु. ल. देशपांडे P. L. Deshpande सुनीताबाई देशपांडे Sunitabai Deshpande गो. नी. दांडेकर G. N. Dandekar

‘कैलास जीवन’ या ‘स्किन क्रीम’चं नाव माहीत नाही, असं सहसा होत नाही. बहुतेकांचा या क्रीमशी अगदी लहानपणापासूनच संपर्क येतो. कुठेतरी खरचटलं वा भाजलं की, आजी वा आई हळुवारपणे त्या जागी ‘कैलास जीवन’ लावते आणि पिवळसर लोण्यासारख्या त्या क्रीमच्या थंडगार स्पर्शाने व कापरासारख्या वासानं बरं वाटतं. अगदी सुरुवातीला क्रीमचं नाव ‘कैलास लोणी’ असंच होतं. पण लवकरच ते ‘कैलास जीवन’ झालं. हा बदल झाला त्यालाही आता ६०-६५ वर्षं झाली. दरम्यानच्या काळात बाजारात कितीतरी नवनव्या ‘स्कीन क्रीम’ आल्या. काहींनी आपला दबदबा निर्माण केला, तर काही कधी आल्या अन गेल्या ते कळलंही नाही. गोरेपान करण्याचे किंवा वेदना थांबवण्याचे कुठलेही दिशाभूल करणारे वादे न करताही ‘कैलास जीवन’ टिकून आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर भारतभर आणि भारताबाहेर स्वित्झर्लंड, पोलंड, रशिया यांसारख्या अनेक देशांतही पोहचलं आहे.

रामभाऊ कोल्हटकर हे या ‘कैलास जीवन’चे मालक. ते उद्या, १४ एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षांत पर्दापण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची वेगळी ओळख करून देणारे हे दोन लेख…

..................................................................................................................................................................

रसिकराज

- हर्षवर्धन निमखेडकर

श्रीयुत राम कोल्हटकर यांच्याशी माझा एक-दीड वर्षांपूर्वीच परिचय झाला, पण या अल्पावधीत मी जे त्यांच्याबद्दल ऐकलं आणि वाचलं, ते चकित करून टाकणारं आहे.  एके काळी आमच्या नागपुरात श्रीमंत बाबूराव देशमुख यांना ‘रसिकाग्रणी’ म्हणून बहुमान दिला जात असे. रामभाऊंच्या रसिकतेबद्दल आणि औदार्याबद्दल ऐकल्यावर मला श्रीमंत बाबूरावांचीच आठवण आली. गंमत म्हणजे रामभाऊंशी ओळख झाल्यानंतर आमच्या दोघांच्याही काही समान ओळखी निघाल्या. पण तोवर मला या दिलदार आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या माणसाबद्दल काही माहिती नव्हती, याची मला हळहळ वाटते. इंग्रजीत म्हणतात तसं ‘the loss is certainly mine’.

(शिव)राम कोल्हटकर यांचा दृश्य व्यवसाय वेगळा आहे. ते एक अत्यंत यशस्वी उद्योगपती आहेत. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ‘आयुर्वेद संशोधनालय’ या संस्थेचं काम ते चालवतात. ‘कैलास जीवन’ या नावानं जगभरात प्रसिद्ध असलेल्या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती त्यांची ही कंपनी करते. आणि या कंपनीचे संचालक म्हणून उद्योगविश्वात त्यांचं नाव फार मोठं आहे.

पण त्यांची हीच एकमेव ओळख नाही. मराठी साहित्य आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांचं फार मोठं नाव आहे. खरा रसिक श्रोता आणि मर्मज्ञ जाणकार म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. आणि त्याहीपेक्षा एक दिलदार माणूस म्हणून ते जास्त परिचित आहेत. रामभाऊंकडे मोठमोठ्या गायकांच्या मैफिलींची रेकॉर्डिंग्ज आहेत. दुर्मीळ फोटो आहेत. बड्या लेखकांची हस्तलिखितं आणि पत्रं आहेत. कोणाला याबद्दल काही माहिती हवी असली, एखादं दुर्मीळ गाणं किंवा छायाचित्रं किंवा पुस्तक हवं असेल तर ते हक्कानं रामभाऊंना साकडं घालतात. आणि जराही मागेपुढे न बघता रामभाऊ त्यांची इच्छा पूर्ण करतात. आपल्याजवळ हा जो अमूल्य खजिना आहे, तो शेअर करण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यांच्या मनाचा हा मोठेपणा खरोखरच काबिलेतारीफ आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अनेक दिवंगत दिग्गज गायक आणि लेखक रामभाऊंच्या घनिष्ट परिचयाचे होते/आहेत. यात पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, विदुषी किशोरी आमोणकर, अप्पा जळगावकर, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, गो. नी. दांडेकर प्रभृतींचा समावेश आहे.

नामवंत लेखक आणि विचारवंत विनय हर्डीकर, प्रा. विवेक गोखले यांच्यासह अनेक विद्यमान साहित्यिक, पत्रकारदेखील त्यांच्या या मित्रपरिवारात आहेत. या सर्वांशी रामभाऊंचे अत्यंत घरोब्याचे संबंध आले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या बोलण्यात - लेखनात रामभाऊंचा उल्लेख येतो. पण एवढं सगळं असूनही ते विनम्र आणि प्रसिद्धीपराङमुख आहेत, स्वतःला कधीही प्रकाशझोतात येऊ देत नाहीत.

‘Business Mantra’ या नावाचं यूट्यूबवर एक चॅनेल आहे. त्यात सुमारे चार वर्षांपूर्वी सुधीर गाडगीळ यांनी राम कोल्हटकर आणि विठ्ठल कामत या दोघांच्या एकत्र घेतलेल्या दीर्घ मुलाखतीचे व्हिडिओ तीन भागांत उपलब्ध आहेत. रसिकांनी ते अवश्य बघावेत. रामभाऊ ही किती बडी हस्ती आहे, हे त्यावरून कळून येते. 

असे हे सन्मित्र सौजन्यमूर्ती रसिकराज उद्या, १४ एप्रिल रोजी वयाची ७४ वर्षं पूर्ण करून ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त त्यांचं अभिष्टचिंतन आणि निरामय भावी आयुष्यासाठी अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.

..................................................................................................................................................................

पारदर्शी स्नेही 

- डॉ. विवेक गोखले

मी नागपूरला स्थायिक झालो, त्याला तप उलटून गेलं. या दीर्घ वास्तव्यातल्या मौल्यवान स्मृतीतील एक म्हणजे रामभाऊंबरोबर केलेली नागपुरातील निवडक भटकंती. कुठे गेलो होतो आम्ही? श्रीमंत बाबुराव देशमुखांच्या वाड्यात आणि कैलासवासी शंकरराव सप्रे यांची गायनशाळा होती त्या वास्तूत.

रामभाऊ नागपूरला आले होते ते त्यांच्या ‘कैलास जीवन’ या उत्पादनाच्या व्यवसायाच्या निमित्तानं. व्यावसायिक कामं झाल्यावर म्हणाले, ‘चला, मला तो बाबुराव देशमुख यांचा वाडा पाहायचा आहे.’ आम्ही गेलो. तो जुना वाडा त्याच्या ऐतिहासिकतेमुळे प्रेक्षणीय होता. देशमुखांच्या नातसुनेने आमचे स्वागत केलं आणि कसं येणं केलं, अशी पृच्छा केली. आम्ही आमचा परिचय करून दिला आणि संगीताचे संदर्भ असलेली ती वास्तू पाहायला मिळावी, असा मानस सांगितला. लग्न झाल्यावर भीमसेन जोशी आणि वत्सलाबाई येथे राहिले होते, त्याचा संदर्भ रामभाऊंनी सांगितला; तर बालगंधर्वांच्या नाटकांच्या पदांच्या रेकॉर्डस आणि त्याच्या खास अशा पेट्या, बॉक्सेस पहायला तरी मिळतील असं मी म्हणालो. आम्ही दिलेल्या संदर्भांमुळे आमची ओळख पटून सूनबाईंनी आम्हाला वाडा दाखवला. ही जुनी श्रीमंती पाहायला मिळाली. दोन रेकॉर्ड ऐकता-ऐकता चहापान झालं. संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही ‘येतो’ असे म्हणालो. त्यावर ‘रेकॉर्डस् ऐकायला पुन्हा अवश्य या, ऐकवायला आम्हालाही आवडेल, कारण आता याचे जाणकार रसिक आहेत तरी किती अन कुठे!’ असं म्हणून त्यांनी निरोप दिला. रामभाऊंचे जाणं होणार नव्हतंच, पण माझंही पुन्हा जाणं राहिलं ते राहिलंच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पुढचं ठिकाण म्हणजे सप्रे मास्तरांची शाळा. वरच्या मजल्यावर आता गायनशाळा नसली, तरी खाली पायाशी एक खडकवजा मोठा दगड  होता. रामभाऊ मला सांगत होते, ‘वसंतराव देशपांडे या शाळेत शिकले होते आणि याच दगडावर तासनतास बसून अभ्यास करायचे, असं सांगतात.’ खालच्या दुकानातील एका वृद्धत्वाकडे झुकत असलेल्या व्यक्तीनं याला अनुमोदन दिलं. रामभाऊंच्या रसिकतेचं मला झालेलं हे दुसरं दर्शन. पहिले दर्शन झालं ते रामभाऊंनी एक समूह छायाचित्र मला पाठवलं आणि डावीकडून तिसरे कोण आहेत, हे माहिती असल्यास कळवावं, असं म्हटलं तेव्हा.

रामभाऊंची माझी ओळख केव्हा, कशी झाली ते मला आठवत नाही, पण ओळख झाल्यावर ती वर्धिष्णू आणि कायम आहे, हे खरं.  पुण्याला गेलो की, रामभाऊ म्हणजे एक भोज्जा असतो माझ्यासाठी. बिनधास्त असं विश्रामाचं आणि नवी ऊर्जा मिळण्याचं हमखास ठिकाण. जेवणाचं एकदा तरी निमंत्रण असतंच. गेल्यावर जेवणाआधी गप्पा, जेवताना गप्पा, पण जेवण झाल्यावर मात्र गप्प! कारण रामभाऊंची ग्रंथसंपदा मला मोहवत असते. वामकुक्षीला त्या दिवशी चाट मिळते. रामभाऊ संगीत, साहित्य आणि मित्र यांच्याबद्दल सांगतच असतात. दुपारी साडेतीन-चारला चहा होतो, तेव्हा वहिनीही सामील झालेल्या असतात. रामभाऊंच्या दोन्ही नाती लोभस आहेत. आजीनं करून घेतलेलं पाठांतर असं म्हणून दाखवतात की, जणू त्याचा अर्थ त्यांना कळलेलाच आहे.

गुडघ्याच्या ऑपरेशनच्या निमित्तानं गेल्या वर्षी मी महिनाभर पुण्यात होतो. ऑपरेशनपूर्वी आणि नंतर घरी, आणि तीन दिवसांच्या हॉस्पिटलमधल्या मुक्कामात ‘भेटण्याच्या वेळे’त रामभाऊ न चुकता भेटायला आले आणि प्रफुल्लित करून गेले. एका प्रसिद्ध बंगाली साहित्यिक लेखकाचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. ते आत्मचरित्रवजा होते. रोजच्या जीवनातल्या, साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींच्या निमित्तानं जीवनविषयक चिंतन साधू शकतं, याचा नमुना म्हणजे ते पुस्तक.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रभा अत्रे यांच्याकडे माझा संगीतावरील प्रबंध द्यायला मला जायचं होतं. रामभाऊही सोबत आले होते. त्या दिवशी आमच्या तिघांच्या गप्पा जवळपास तासभर छान रंगल्या. निरोप देताना प्रभाताई म्हणाल्या, ‘पुन्हा अवश्य या, कारण अशा तर्‍हेच्या विषयांवर बोलायला आता कोणी फारसं उरलंच नाहीये.’ रामभाऊंशी झालेल्या नव्या परिचयाबद्दलचं समाधान प्रभाताईंनी आवर्जून बोलून दाखवलं होतं.

मला कुमार गंधर्व आवडतात. त्यांचं गाणं माझ्या चिंतनाचा विषय आहे, हे रामभाऊंना जाणवल्यावर रामभाऊंनी त्यांच्या जवळचं पुष्कळ रेकॉर्डिंग तर मला दिलंच, पण ‘कालजयी कुमार’ हे द्विखंडी पुस्तकही मला भेट दिलं. एवढंच नव्हे तर डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या सहकार्यानं माझं मुलाखतवजा एक दीर्घ भाषण ठेवलं. ‘संगीतातील तत्त्वज्ञ गायक कुमार गंधर्व’ असं शीर्षक माझ्या भाषणाला शोभलं असतं. पुण्यातील वीस-पंचवीस जाणकार नामवंत मंडळी श्रोता म्हणून हजर होती. सत्यशील देशपांडे, पतंजली मदुस्कर, विद्याधर पंडित, किरण देशपांडे, ही काही वानगीदाखल नावे. तास दीड तास मी बोललो त्या दिवशी. एखाद्यातील गुणांना वाव मिळावा म्हणून काय करता येण्यासारखं आहे, हे त्या दिवशी मी शिकलो. एक सुखद योगायोग म्हणजे त्या दिवशी रामभाऊंचा वाढदिवस होता.

उद्या १४ एप्रिल २०२१ रोजी रामभाऊ वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गुणज्ञ, रसिक, पारदर्शी स्नेही रामभाऊ शतायुषी होवोत ही शुभेच्छा!

..................................................................................................................................................................

रामभाऊ कोल्हटकरांचा पहिलावहिला लेख ‘अक्षरनामा’च्या २०१९ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. तो वाचण्यासाठी क्लिक करा -

शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नसताना मी एका प्रतिभावंत गायकाचा ‘आतला’ स्वर ऐकला होता!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख